आजही

Submitted by वैभव फाटक on 9 May, 2012 - 07:39

तू फुलात तू कळ्यांत तू दवात आजही
तू धरेत अंतरात तू नभात आजही

साद घालतो तुला सये जरा निघून ये
संगती न तू कधी परी मनात आजही

रोज गोड स्वप्न पाहतो तुझ्याच दर्शना
रोजचा उशीर थांबली प्रभात आजही

आर्त दाह जाळतो उरास आठवांसवे
धाडशील पावसास ? मी उन्हात आजही

एकदा तरी पहा कवाड खोलुनी जरा
वादळे किती समावली उरात आजही

----- वैभव फाटक ( ८-४-२०१२ ) -----

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान Happy

वैभवजी, गझल छान आहे. फक्त ४थ्या शेरात थोडा बदल सुचवतो....
“आर्त दाह जाळतो उरास आठवांसवे
धाडशील पावसास मी उन्हात आजही”

ऎवजी....
“आर्त दाह जाळतो उरास आठवांसवे;
धाड आज पावसास, मी उन्हात आजही!”
>>................प्रा. सतीश देवपूरकर

खूप छान आहे अख्खी गझल ......
प्रा.साहेबांचा प्रतिसाद खूप काही शिकवणारा आहे त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ध्यानात ठेवा....

मस्त Happy

'कळ्यांत' असे वृत्त पाळण्यासाठी केले आहे का? कारण 'कळ्यात' असे घेतले तर वॄत्त गडबडेल. तसेच समावली = सामावली असे असावे. पण तसे घेतल्यासही वृत्त गडबडेल. त्या ऐवजी विसावली असे घेतले तर कसे होईल?

नाही नाही उमेश जी .....कळ्यांत आणि कळ्यात मध्ये वृतासाठी गडबड करण्यात आली नाहीय दोन्ही शब्द समवृत्तीय आहेत ..........उलट कळ्यांत च्या बाबतीत भाषाशुद्धीचा विचार करता तिथे अनेकवचन हवे असल्यास असेच लिहावे लागेल .............त्या अंगाने विचार केला तर कळ्यात चा वापर पर्फेक्शनपूर्ण नाही ठरत.............

समावली बद्दल अपले मत समर्थनीय आहे ....................

सर्वांचे आभार...
उमेशजी : आपली 'विसावली' हा शब्द वापरण्याची सूचना खूप आवडली...तसा बदल करतो...
'कळ्यांत' हे मात्र मला बरोबर वाटले...