वक्त नें किया, क्या हसीं सितम - कैफ़ी आझ़मी

Submitted by टवाळ - एकमेव on 9 May, 2012 - 02:39

साल १९६४. भारत-चीन १९६२ च्या युद्धाच्या जखमा अजूनही ताज्या होत्या. निर्माता-दिग्दर्शक चेतन आनंद यांचा या युद्धाच्या पार्श्वभुमीवरचा "हकिकत" प्रदर्शित झाला. एका युद्धपटाला मिळतो तितकाच प्रतिसाद या चित्रपटाला सुरवातीला मिळाला. त्यावेळेला आजच्या सारखी प्रदर्शनाआधीच संगीत प्रसिद्ध करण्याची पद्धत रुळली नव्हती. पण लेह-लद्दाखचे खर्‍या युद्धभुमीचे (रमणीय तरी अतिशय बिकट अशा लोकेशन्सवर) केलेले चित्रीकरण, रुढार्थाने धर्मेंद्र-प्रिया राजवंश हे जरी नायक-नायीका असले तरी खरा नायक या चित्रपटाचा विषय आणि त्याचे टेकींग, बलराज सहानी, विजय आनंद, जयंत आणि ईतर मातब्बर अभिनेत्याच्या अभिनयाची जुगलबंदी आणि अबोव्ह ऑल मदन मोहन यांचे संगीत. "होके मजबूर मुझे, उसने बुलाया होगा", "मै ये सोचकर उसके दरसें उठा था", "जरासीं आहट होती है तो दिल सोचता है" या गाण्यांनी रसिकांना रिझवलं. एका शोकांतीके बरोबर चित्रपट संपतो. प्रेक्षक जड अंतकरणाने उठणार ईतक्यात युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या प्रेतांवर, त्यांच्या वस्तुंवर कॅमेरा फिरतो आणि पार्श्वभुमीवर गाणे सुरु होते - "कर चलें, हम फिदा, जान-ओ-तन साथीयों, अब तुम्हारे हवालें, वतन साथीयों". मदन मोहनचं संगीत, रफीचा आर्त पण समज देणारा स्वर आणि कैफी़ आझ़मी यांचे जबरदस्त शब्द. प्रेक्षागृहातून बाहेर पडू पहाणारा प्रेक्षक मटकन खाली बसतो आणि त्या गाण्याने एक अख्खी पिढी भारून जाते.

"सांस थमती गयीं, नब्ज जमतीं गयीं
फिरभी बढतें कदम को न रुकने दियां
कट गयें सर हमारें तो कुछ गम़ नहीं
सर हिमालय का हमनें न झुकनें दिया
आज धरती बनीं है, दुल्हन साथीयों
अब तुम्हारें हवालें, वतन साथीयों"

माझी आणि कैफ़ीजींच्या काव्याची ही पहीली ओळख. वास्तविक हक़िकतच्या खुप आधीपासून कैफ़ीजी लिहीत होते. १९५२ च्या बुझ़दिल पासून. गुरुदत्त यांच्या १९५९ च्या "कागज़ के फुल" या चित्रपटाने कैफ़ी आझ़मी हे नाव खर्‍या अर्थाने लोकांसमोर आलं. चित्रपट अयशस्वी ठरला (किंवा ठरवला) आणि त्याचे अपयश हे गुरुदत्त यांच्या अकाली मृत्युला कारणीभुत / निमित्त ठरले. असे असले तरी या चित्रपटाच्या गाण्यांनी लोकांना रिझवले. "वक्त नें किया, क्या हसीं सितम", "देखी जमानें की यारी, बिछडें सभीं बारी-बारी" या गाण्यांना प्रचंड लोकाश्रय लाभला. कैफ़ीजींचा मुळ पिंड हा एका कवीचा/शायराचा होता. त्यामुळे त्यांच्या गैरफिल्मी गझल, उर्दु काव्य यांना आधीपासूनच रसिकाश्रय लाभला होता. मी मात्र ईथे फक्त त्यांच्या हिंदी चित्रपटसंगीतातल्या योगदानाचाच विचार करतो आहे. हिर-रांझा या डोळ्यांवर अत्याचार करणार्‍या (राजकुमार-प्रिया राजवंश) चित्रपटात कैफ़ीजींच्या काव्यात्मक संवादांनी आणि गाण्यांनी थोडीफार जान फुंकली होती. पण काव्यात्मक संवाद पुर्ण चित्रपटभर हा खरोखरच कंटाळवाणा प्रकार होता. त्यातली "मिलो न तुम तो हम घबरायें" आणि "यें दुनियां, ये महफ़ील, मेरे काम की नही" (सं. मदन मोहन) ही गाणी लोकप्रिय ठरली.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे २७ मे १९६४ रोजी निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेचे बी.बी.सी. ने केलेले चित्रीकरण फिल्म्स डिव्हीजन कडे होते. दिग्दर्शक राज मरब्रोस यांना ते चित्रीकरण आपल्या चित्रपटात वापरण्याची ईच्छा होती. त्यांनी ती संगीतकार मदन मोहन यांच्याकडे व्यक्त केली. चित्रपट होता "नौनीहाल". प्रकरण सरकार-दरबारी रुजू झाले. पण भारताचे पहिले पंतप्रधान. त्यांच्या अंत्ययात्रेचे चित्रीकरण व्यावसायिक चित्रपटात वापरणे ही व्यवसायाची क्लुप्ती असली तरी या प्रसंगाचे गांभिर्य राखणे जरूरी होते. मदन मोहन यांनी आपले मित्र कैफ़ीजींना पाचारण केले. त्याच्या कडून एक सुंदर गाणे लिहून घेतले. त्याला अप्रतिम चाल बांधली. आणि केवळ त्या गाण्याच्या जोरावर ते चित्रीकरण चित्रपटात वापरण्याची परवानगी मिळवली. ते गाणे होते -

मेरी आवाज सुनो, प्यार का राग सुनो
मैने ईक फुल जो सिनेंसे लगा रखा था
उसके परदेंमे तुम्हें दिल़सें लगा रखा था
था जुदा सबसें मेरें ईष्कका ईजहार सुनो

एका फालतू चित्रपटाला या गाण्याने आणि मदन मोहन यांच्या संगीताने थोडा काळ का होईना जगवलं. याच चित्रपटातले "तुम्हारी जुल्फं के सायें में शाम कर लुंगा" हे गाणेही गाजले.

कैफीजींची काही लोकप्रिय गाणी खालीलप्रमाणे -

१. चलतें चलतें युंही कोई मिल गया़ था - पाकिझा
२. चलो दिलदार चलो - पाकिझा
३. आज हम अपनी दुवाओंका असर देखेंगे - पाकिझा
४. थाडे रहीयों ओ बांके यार - पाकिझा
(पाकिझा चा उल्लेख मी मुद्दाम टाळलाय कारण इतरत्र याविषयी भरपूर लिहीलं गेलं आहे)

५. बहारों, मेरा जिवन भी सवारों - आखरी़ खत
६. धीरें धीरें मचल, ऐ दिल-ए-बेकरार - अनुपमा
७. कुछ़ दिलनें कहां - अनुपमा
८. जानें क्या ढुंढती रहती है ये आँखें मुझ़में - शोला और शबनम़
९. जीत ही लेंगे बाजी हम तुम - शोला और शबनम़
१०. हर तरफ अब यही अफसाने है - हिंदुस्थान की कसम
११. तुमं बिन जिवन कैसे जिवन - बावर्ची (मन्ना डें यांचे अप्रतिम गाणे)
१२. भोर आयी गया अंधीयारा - बावर्ची
१३. काहें कान्हा करत बरजोरी - बावर्ची
१४. ये नयन डरें डरें - कोहरा
१५. झुम झुम ढलतीं रात - कोहरा
१६. तुम जों मिल गयें हो - हसतें जख्म़
१७. बेताब़ दिलकी, तमन्ना यहीं है - हसतें जख्म़

अलीकडच्या काळातली "अर्थ" ची गाणीही त्यांचीच होती.

कैफीजींवर काही लिहावं की लिहू नयें या द्बिधा मनःस्थितीत मी होतो. याचे एकमेव कारण त्यांच्या मुलीचा - शबानाचा - मला न आवडणारा सेक्युलर (आणि म्हणून कुरुप) चेहरा. पण वर दिलेल्या गाण्यांच्या यादीवर नजर टाकली की लक्षात येईल, की त्यांची आठवण न करणे हा स्वतःवरतीच अन्याय झाला असता. कारण मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे त्यांचही योगदान आपल्यासाठी ईतर कुठल्याही महान कवीईतकंच मोठं आहे.

"खिंच दो अपनें खुन सें जमींपर लकींर
ईस तरफ आने पायें ना रावण कोई
तोड दो हाथ, अगर हाथ उठने लगें
छुने पायें ना सीता का दामन कोई
"

या छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायाची आठवण १९६४ मध्येच करून देणार्‍या कैफीजींचा एवढा तरी सल्ला आपल्या आंधळ्या न्यायव्यवस्थेने मानला असता ना तरी आजच्या सारखी विदारक परिस्थिती स्त्रियांच्या बाबतीत आपल्याला दिसली नसती. पण "वक्त नें कियां, क्या हसीं सितम, तुम रहें ना तुम, हम रहें ना हम" हे स्वतःचेच काव्य जगत असल्यासारखे कैफीजीं जिवनाच्या अंतीम टप्प्यात (कदाचित मुलीच्या आहारी जाऊन) एका ठराविक गटाची भलामण करताना दिसावे हे दुर्दैव.

या दर्जेदार गीतकाराचा उद्या १० मे रोजी १० वा स्मृतीदिन. त्या निमित्त कैफीजींना मानवंदना ! Happy

गुलमोहर: 

खासच....
शबानाच्या बाबतीत दिनेशदांशी सहमत. कारण जरी त्यांची मुलगी असली तरी कैफ़ी आझमी आणि शबाना आझमी ही दोन्ही पुर्णत: वेगळी व्यक्तिमत्वे आहेत, एकमेकांना कुठेही क्रॉस न होणारी !
सद्ध्या जागा राखून ठेवतोय...
लिहीन लवकरच ....

मला वाटतं सचीनदेवांचे संगीत असलेला 'बुझदिल' हा कैफींचा पहिला चित्रपट असावा. या चित्रापासुन त्यांनी आपल्या गीतलेखनाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मुळात स्वभावाने पक्के कम्युनिस्ट असलेले कैफ़ी मला वाटते फ़क्त जगण्यासाठी चार पैसे कमावण्यासाठी नाईलाजानेच चित्रपट गीतलेखनाकडे वळले असावेत.

तलत नायक असलेल्या ’लालारुख’ या चित्रपटातदेखील त्यांची दोन गाणी होती बहुदा. त्यातले खय्यामने संगीत दिलेले (चित्रपट आपटला तरी) . ’है कली कली के लब पर’ हे गाणे खुप पसंत केले गेले होते तेव्हा.
’आखरी खत’ मधलं "मेरे चंदा, मेरे नन्हे’ आठवतय? कैफ़ी वॉज अ‍ॅट हिज बेस्ट इन दॅट साँग...
वर दिलेल्या यादीतलं पाचवं गाणं ' बहारो , मेरा जीवन भी सवारो' देखील 'आखरी खत' मधलंच आहे, 'आखरी दाव' नव्हे. याच चित्रपटातलं 'और कुछ देर ठहर, और कुछ देर न जा' हे गाणं खय्याम आणि रफीने दिलेल्या अप्रतिम गाण्यांपैकी अगदी वरच्या रांगेतल्या काही गाण्यात मोडतं. Happy
कैफीजी, चेतन आनंद आणि मदनमोहन या त्रयीने दिलेले हकीकत, हसते जख्म आणि हीर रांझा म्हणजे तर कळस होता. 'हसते जख्म' मधली 'आज सोचा तो आंसु भर आये' आणि 'बेताब दिल की तमन्ना यही है' ही लताने गायलेली कैफींची गाणी कोणी विसरु शकणार आहे का?
'परवाना' मधलं मदनमोहनने केलेलं 'जिस दिन से मैने तुमको देखा है', तसेच 'कागज के फुल' मधल्या 'बिछडे सभी बारी बारी' या कैफींच्या गाण्याचा समावेश केल्याशिवाय 'रफीसाहेबांच्या उत्कृष्ट गाण्यांची यादी पुरी होवु शकते का?
गीता दत्तने अजरामर केलेलं 'वक्त ने किया क्या हसी सितम'..........
आणि अर्थातच कैफीजी आणि मदनमोहन या द्वयीचं वर दिलेलं 'बावर्ची' मधलं "तुम बिन जीवन कैसा जीवन" हे गानं. 'भिन्न षडज्' रागातलं हे गाणं माझं प्रचंड आवडतं गाणं आहे.
अजुनही आठवेल तसे लिहीत राहीनच...
तोपर्यंत तात्पुरती टँप्लीज Proud

अलीकडच्या काळातली "अर्थ" ची गाणीही त्यांचीच होती.>>> हा असा एका वाक्यात संपवायचा विषय आहे?
'इक जरा हाथ बढा दे तो पकड ले दामन,
उसके सीने में समा जाए हमारी धडकन,
इतनी कुरबत है तो फिर फासला इतना क्यूं है?'

प्रतिसादांबद्दल धन्यवाद मित्रांनो ! Happy

हा लेख लिहीण्याच्या आधी माझी विशाल कुलकर्णींशी चर्चा झाली होती. एक साहीर, मजरूह आणि नंतर थेट गुलजार सोडले तर ईतर गीतकार आणि त्यांचे काव्य या विषयी मला फारशी आवड नाही. आवड नाही म्हणून माझा फारसा अभ्यासही नाही. त्यामुळे मी विशालला तशी विनंतीही केली होती की मी या लेखाची सुरवात मी करतो आणि कैफी़जींच्या काव्याबद्दल विस्तृतपणे तु लिही. पण दुर्दैवाने त्याला पुरेसा वेळ या दोन्-तिन दिवसात उपलब्ध होणार नव्हता आणि उद्या १० मे हा त्यांचा स्मृतीदिन आहे. त्यामुळे मला जसं सुचलं त्याप्रमाणे मी लिहीलं. विशाल नंतर त्यात भर घालेलच. Happy

सिनेमाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त या ईंडस्ट्रीला आणि पर्यायाने आपल्या भाव-विश्वाला समृद्ध करणार्‍या सर्व दिवंगत आणि हयात कलाकारांना मानवंदना देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. त्यात चुका हमखास असणारच आहेत.

@ दिनेशदा आणि विशाल - शबानाचा उल्लेख मला टाळता आला नाही कारण मला कैफी़जींचा शेवटचा काळ अगदी स्पष्टपणे आठवतोय. आणि एवढं सुंदर काव्य लिहीणारा हा कवी शेवटी शेवटी (फेब्रु. २००२ च्या गुजरात दंगलींनंतर) बिथरल्यासारखा का बरं वागत होता याचं कारणही माहिती आहे. जाऊ दे ! विषयाला खरंच चुकीचे फाटे फुटत असतील तर मी तो भाग गाळेनही !

टवाळ,
माझ्या वाचनातून हे सुटले बहुतेक, किंवा आठ्वत नाहीये. काय झाले होते शेवटी शेवटी?

गाणी सुंदरच. धन्यवाद आठवण काढल्याबद्दल.
त्यांनी काम केलेला तो दंगलींवरचा चित्रपट आठ्वतो का कुणाला. मयुरी कानगो होती त्यात. छान होता तोही. काय नाव बरं.. नसीम?

अलीकडच्या काळातली "अर्थ" ची गाणीही त्यांचीच होती.>>> हा असा एका वाक्यात संपवायचा विषय आहे?
'इक जरा हाथ बढा दे तो पकड ले दामन,
उसके सीने में समा जाए हमारी धडकन,
इतनी कुरबत है तो फिर फासला इतना क्यूं है?'
>>>+१.

'अनुपमा' मधलं कैफींचं अजुन एक आवडतं गाणं..

या दिल की सुनो दुनियावालो, या मुझको युंही चुप रहने दो..
मैं गम को खुशी कैसे कहदुं , जो कहते है उनको कहने दो.

मस्त लेख Happy
हंसते जख्म मधलं लताचं 'आज सोचा तो आंसू भर आये' आठवतय.
'दिल की नाजूक रगें टूटती है
याद ईतना भी कोई ना आये'
आपण फक्त ऐकून मान डोलवायची, कान तॄप्त!!

जिसतरह हस रहा हू मै, पी पी के अश्के गम
यू दुसरा हसे तो, कलेजा निकल पडे

वयाच्या १०व्या वर्षी हे लिखाण !!!!
बेगम अख्स्तरनी गायलेली अप्रतिम गझल - इतना तो जिंदगीमे किसिकी खलल पडे

मस्त लेख. ही सिरीजच मस्त चालु आहे.

ही एक लेखमालिका चांगली चालू आहे. आधीच्या लेखांचेपण दुवे द्या शेवटी.
ही लेखमालिका वाचल्यावर मला जाणवले की आपण विविधभारतीचे किती देणे लागतो. लहानपणापासून रात्रंदिवस विविधभारती ऐकल्याने आमच्या जन्माच्या कित्येक दशके आधी झालेली गाणी, नुसतीच गाणी नव्हे तर गीतकार, संगितकार, चित्रपट, गायक, गायिका इ. बद्दल इत्यंभूत माहिती ऐकायला मिळाली.

लेख आवडला.
ही एक लेखमालिका चांगली चालू आहे. आधीच्या लेखांचेपण दुवे द्या शेवटी.>> +१
मी फक्त तलत आणि कैफी हे दोनच वाचले, अजुन किती आहेत ?

हाही लेख अप्रतिम!!!! Happy
सुरेख लेखमाला चालु आहे. रूनीला अनुमोदन. Happy

'दिल की नाजूक रगें टूटती है
याद ईतना भी कोई ना आये'
आपण फक्त ऐकून मान डोलवायची, कान तॄप्त!!>>>>तोष्दा +१

भाषेच्या नजाकतीसाठी शायर लोकांनी उर्दूला जे आगळेवेगळे स्थान प्राप्त करून दिले आहे ते त्या जातीच्या काव्याशी परिचित असणार्‍या प्रेमींना माहीत आहेच, पण याच उर्दूची सामाजिक बांधिकली आणि प्रश्नांशी किती आत्मियतेने सांगड घालून दाखविली आहे ते पाहण्यासाठी/अनुभवण्यासाठी कैफी आझमी यांच्या साहित्याचा मागोवा घ्यावा लागेल.

"कल्बे-माहौल मे लरजा शररे-जंग है आज
हौसले वक्त के और् जीस्त के यकरंग है आज
आबगीनों मे तपा वलवलए-संग है आज
हुस्न और इश्क हमआवाजो-हमाआहंग है आज
जिसमे जलता हूं उसी आग मे जलना है तुझे
उठ मिरी जान मिरे साथ ही चलना है तुझे..."

जवळपास ६०-७० ओळींची "औरत" ही कैफीची कविता वाचताना त्यातील उर्दूच्या सौंदर्याने वाचक थक्क होऊन जातो. स्वतंत्रपणाच्या आविष्काराला उर्दूची ही गूढ पातळी कदाचित मंजूर असेल पण चित्रपटसृष्टीला इतके सखोल उर्दू परवडणारे नव्हते. असे असूनही कैफींनी त्यामुळे केवळ पैशासाठी 'धंदेवाईक' दृष्टी कधीच ठेवली नाही. त्यानी जरूर हिंदीचा वापर केला चित्रगीतासाठी पण उगाच 'ट' ला 'ट' जुळणारी वा 'एबीसीडी छोडो, नैनसे नैन मिलाओ....' अशी छ्चोर गीते कधीच त्यानी लिहिली नाहीत.

एक प्रसिद्ध गीतकार म्हणून ते जरी लोकप्रिय झाले तरी सुरुवातीच्या काळातील चित्रपटांच्या अपयशामुळे त्यांच्यावर 'अनलकी' असा शिक्का ह्या दगडी काळजाच्या चित्रपटसृष्टीने त्यांच्यावर मारला असल्याने अक्षरशः ते पाचदहा रुपयासाठीही कासाविस झाले होते. 'कागज के फूल' मधील गाणी गाजली, पण त्या पाठोपाठ आलेल्या 'अपना हाथ जगन्नाथ,' 'शोला और शबनम', 'एक के बाद एक' डब्यातच गेल्याने कैफीना काम मिळू शकत नव्हते. पण चेतन आनंद यांच्या 'हकिकत' च्या गाण्यांनी इतिहास घडविला हे इथल्या सार्‍याच सदस्यांना माहीत असेल.

आजही 'जरासी आहट होती है तो दिल सोचता है.....कही वो वो तो नही...!" लताचे हे गाणे केव्हाही कुठेही लागू दे, मन थेट त्या लडाखच्या गर्द झाडीच्या भागात जाते आणि नजरेसमोर येते ती नायिका आणि तिची ती कधीच संपू न शकणारी प्रियकराची प्रतिक्षा.

'गर्म हवा...' तर खास कैफी यांचाच म्हणावा असा चित्रपट. कथा, पटकथा, संवाद, गीत सारे काही कैफींचेच.

लिहावे तितके कमीच आहे....या मनस्वी कलाकारावर.

अशोक पाटील

छान लिहिले आहे.
माझी नजर दोन गाण्यांना शोधत होती, त्यातले एक विशाल कुलकर्णी यांनी नोंदविले...हंसते जख्म मधले आज सोचा तो आंसूं भर आए
दुसरे अनुपमामधले : या दिल की सुनो दुनियावालो
----
कैफी, साहिर हे आरंभीपासून डाव्या विचारांचे होते. शबानाने वडिलांचा वारसाच चालवला. कलावंतांच्या कलाकृतींचा आस्वाद आणि त्यांची विचारसरणी आपल्याशी जुळाणे न जुळणे यांचा संबंध असावा का?
----
शौकत आझमी यांनी लिहिलेल्या 'कैफी और मैं' या पुस्तकावर आधारित नाट्यप्रयोग शबाना आणि जावेद सादर करतात.
-----
ज्यात संजीवकुमार आहे अशा चित्रपटाला फालतू म्हटल्याबद्दल निषेध Lol

सुनी सुनी आंखो मे जब तक तुम ना आये थे
खुशीयाँ थी तब औरोंकी गम भी सारे पराये थे
अपने से भी छुपायी थी धडकन अपने सीने की
हमको जीना पडता था ख्वाइश कब थी जीने की

ह्या वरिल गाण्यातच सगळं आलं. एका वेश्येच्या मनातली खळबळ इतक्या संयत पध्धतीने मांडणे केवळ अशक्य. तसच अनुपमा

कुछ दिल ने कहा . कुछ भी नही

एक दबलेली मुलगी जीला आईं माहित नाही. वडील फटकुन वागणारे. संपुर्ण सीनेमात केवळ २०-२५ वाक्य तिच्या वाट्याला आहेत. अशी मुलगी एकांतात स्वतःशी आपल्या मनातिल उठणार्‍या भावना कशी व्यक्त करेल? ह्याचं आदर्श उदाहरण.

बाकी अर्थ म्हणजे तर गजल ह्या विषयात ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांच्या साठी पर्वणी आहे

रेखांओं का खेल है मोहोब्बत
रेखांओं से मात खा रहे हो

जीन जख्मोको वक्त भर चला है
तुम क्युं उन्हे छेडे जा रहे हो

येवढ्या सोप्या शब्दात एखाद्याला समजावलेलं तुम्ही पहिलं आहे?

रझीया सुलतान च्या मनातली खळबळ

हम भटकते है, क्युं भटकते है दश्को सेहेरा मे
जिंदगी जैसे प्यासी प्यासी है, हैरां हैरां है

तिच्या वर प्रेम करणारा गुलाम ... त्याच्या मनात काय येईल

आई जंजीर की झंकार खुदा खैर करे.
( ह्या गाण्यात वापरलेला कब्बन मिर्झा चा आवाज हा त्या भुमिकेला इतका फीट होतो. ह्याचे श्रेय आर्थातच खय्याम साहेबांचे!!!)

मोजके चित्रपट, मोजकं काम, पण अति चपखल शब्द. खरच कैफी साहब आप कमाल हो!!!!