एक रात्र भूss..र क ट ले ली..!!

Submitted by तुमचा अभिषेक on 6 May, 2012 - 08:53

या आधी मी " एक रात्र सरपटलेली ~‘~‘~‘ ...!! " या नावाची कथा प्रसिद्ध केली होती. नसेल वाचली तर खालील लिंकवर जाऊन जरूर वाचा.

http://www.maayboli.com/node/34540

तर याच कथेवरून तसेच काहीसे आणखी सुचले, दोन्ही कथा वाचल्या तर आपल्याला काहीसे साधर्म्य जाणवेलही.
पण ती कथा मी जराशी भयप्रद आणि थरारक बनवली होती. तर ही मात्र हलकीफुलकी केली आहे.

तरी तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो.
तर या कथेचे नाव आहे .. " एक रात्र भूss..र क ट ले ली..!! "

.......................................................................................................

तसे म्हटले तर फार जुनी गोष्ट नाहीये. कॉलेजच्या जमान्यातीलच आहे. पण कॉलेज सोडून मला पाच-सहा वर्षे झाली असली तरी कॉलेजच्या आठवणी काढल्यात की सार्‍या कालपरवाच्याच गोष्टी वाटतात. असो, कॉलेजचे नाव मुद्दामच सांगत नाही. उगाच खरेखोटे नाव सांगायचे आणि मग डिसक्लेमर मध्ये योगायोग समजा वगैरे लिहायचे, कश्याला हव्यात या भानगडी. तसेही कथानक खरे असले तरी यात कॉलेजची किंवा हॉस्टेलची बदनामी व्हावी असे काही नाही, तर मग राहू द्या ना नाव.. आणा डोळ्यासमोर एखादे कॉलेज आणि त्याचे टिपिकल हॉस्टेल.. माचिसच्या डब्ब्यांसारखे रांगेत असलेल्या रूम, रूममध्ये दोन खाटा, दिड-दोन टेबल... खाटांवर पसरलेली पुस्तके आणि टेबलावर पडलेली सिगारेट तंबाखूची पुडकी... व्हरांड्यात दोरी लाऊन सुकत घातलेली अंतरवस्त्रे आणि त्यापुढे पसरलेले भले मोठे मोकळे मैदान... बाकी हॉस्टेलचा उल्लेख केला म्हणजे आता काही चलाख वाचकांची विचारचक्रे फिरायला लागली असणार. कॉलेज-हॉस्टेल-बदनामी नक्कीच रॅगिंगची भानगड असणार. आता तसेच समजा हवे तर, पण ही रॅगिंग नुसती ज्युनिअरचीच नाही तर सिनिअरचीही घेतली जात होती. आणि ती घेणारे होते...

चला सोडा, तर कुठे होतो आपण.. कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये नाही का.. तर नेहमीसारखे सकाळी धावपळ, दुपारी कॉलेजच्या वेळी शांत शुकशुकाट आणि रात्री उशीरा अकरा-बारा पर्यंत गजबजाट असणारे हे हॉस्टेलचे टाईमटेबल तेव्हा बदलले होते. परीक्षा जवळ आल्या होत्या ना. परीक्षांचा अभ्यास करायची तयारी म्हणून महिनाभराची सुट्टी जिला "प्रीपरेशन लिव" (पी.एल) असेही म्हणतात ती चालू होती. आता रात्रभर अभ्यास करून पहाटे झोपणारी मुले दुपारी बाराला मेसच्या जेवणाच्या वेळीच उठू लागली होती. दुपारी पुन्हा थोडाफार अभ्यास करून संध्याकाळी समोरच्या हॉस्टेलच्याच मैदानावर क्रिकेट, फूटबॉल, बास्केटबॉल आपल्या आवडीनुसार खेळ रंगायचे, ते रात्री आठच्या सुमारास पुन्हा मेसचे जेवण करूनच जो तो आपल्या रूमवर परतायचा. काही महाभाग परीक्षेच्या काळातही टी.वी. रूमकडे वळायचे. पण त्यानंतर मात्र पहाटेपर्यंत नाईट मारून अभ्यास हा ठरलेला असायचाच. आता तुम्ही म्हणाल की रात्रीचाच अभ्यास का चालायचा? सकाळी फ्रेश मूडमध्ये नाही का करता येत? आता ज्यांनी हॉस्टेलचा अनुभव घेतलाय त्यांना असले फालतू प्रश्न पडणार नाहीत पण इतरांसाठी म्हणून सांगतो की परीक्षेच्या काळात अशी अपवादानेच एखादी रूम सापडायची जिचा दिवा रात्री एक-दोनच्या आत मावळायचा. कारण चौघांपैकी एका-दोघांना जरी रात्रीच अभ्यासाचा मूड आला तरी मग त्या ट्यूबलाईटच्या भगभगीत प्रकाशात इतरांना झोप येणे कठीणच. आणि एकाच वर्षाचे विद्यार्थी असतील तर आपला पार्टनर अभ्यास करतोय आणि आपण झोपा काढतोय ही अस्वस्थतेची भावना परीक्षेच्या काळात झोपूही देत नाही. तर सांगायचा मुद्दा हा, की ही रात्रीची वेळ आम्हा सर्व ईंजीनीअर्सच्या भवितव्याच्या दृष्टीने खूप महत्वाची होती. जर एखाद्या रात्री लोडशेडींगमुळे लाईट कटली तर दहातली दोन पोरं नापास असे म्हटले तरी आतिशयोक्ती ठरू नये. आणि याच वेळेची ते साले नाशाडी करत होते...
(अवांतर - ज्यांच्या शब्दकोषात "साले" हा शब्द, अपशब्द म्हणून येतो त्यांनी आपण हॉस्टेलकथा वाचत असूनही लेखकाने एवढया सौम्य शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या याबददल त्याचे कौतुक करणेच अपेक्षित आहे)

आता पुन्हा "ते साले" म्हणजे कोण हा प्रश्न पडलाच असेल तुम्हाला.. सांगतो हो, क्रमश: म्हटलेय का मी अजून..
तर "ते साले" म्हणजे रात्रीच्या वेळी मैदानात जमून... चला त्यापेक्षा एखाद्या दिवशीचे सांगायलाच घेतो..

मेसमधून बडीशेप चघळत, दातात काही अडकले नसतानाही फक्त आज आमच्या मेसमध्ये चिकन होते हे इतरांना समजावे म्हणून उगाच कांडीने दात कोरत, आम्ही बाहेर पडलो. आज रात्री स्ट्रक्चरल अ‍ॅनालिसिसचे दोन-तीन महत्वाचे आणि स्कोअरींग टॉपिक संपवून टाकायचे असा आमचा विचार होता. अर्थात त्यांनी परवानगी दिली तर... पण अजूनपर्यंत तरी मैदानात कोणी दिसत नव्हते. सारे कसे शांत शांत निवांत... असे वाटावे की मैदानातच चटई अंथरून अभ्यासाला बसावे. पण त्या गार वार्‍यावर अभ्यास होण्यापेक्षा झोप लागण्याचेच चान्सेस जास्त.. आणि हो, ते साले ही असणारच होते की मैदानात.. रूमवरही सुखाने अभ्यास करू देत नाही, तर हा तर त्यांचाच इलाका होता.

तसा अभ्यास तर आज बराच होता. कालचा होऊ न शकलेला ही आज निपटवायचा होता. पण जेवल्याजेवल्या अभ्यास, ते ही मटणाचे जेवण केल्यावर.. छे.. अर्धी पावले टी.वी रूमकडे वळली. काही कॅरमचे दोन डाव टाकून येऊया म्हणत जिमकडे निघाले तर आम्ही उरलेले सारे सावकाशपणे आमच्या नेहमीच्या राऊंडवर निघालो. कॉलेजभोवताली असणार्‍या भल्यामोठ्या गार्डनला जेवल्यानंतर दोन-तीन फेर्‍या मारने हा आमचा नेहमीचा रातक्रम. परीक्षेच्या काळात एखादीच फेरी व्हायची तर इतर वेळी आजूबाजुच्या कॉलन्यांमधून उतरलेल्या काही चांदण्या नजरेस पडल्या तर दोनाच्या चार फेर्‍याही व्हायच्या. पण आज मात्र आमची नजर "त्यांना" शोधत होती. तर इथे गार्डनमध्येही त्यांचा पत्ता नव्हता. मग नेमके येतात कधी आणि कुठून?? एखाद राऊंड मारून रूमवर परतलो. काही मित्र आधीच तिथे जमले होते. रात्री अभ्यासाला म्हणून जो तो आपापल्या क्लासमेटपैकी एखाद्याच्या रूमवर जातो. त्याच हिशोबाने आमचे दोन रूममेट दुसरीकडे गेले होते आणि आमचे तीन वर्गमित्र आमच्या रूमवर आले होते. आम्ही पोहोचेपर्यंत आपल्याच तीर्थरूपांची रूम असल्यागत आडवे तिडवे पसरले होते. अभ्यासाला अजून काही सुरुवात झाली नव्हती. ती नेहमी एखादी सिगारेट शिलगाऊनच करायची असते हा नियम होता आणि त्याचसाठी ते आमची वाट बघत होते. खिशातले पाकीट काढून मी त्यातल्या एकाकडे भिरकावले तसे दुसर्‍याने लगेच गादीखाली हात घालून माचिस काढली. दोन सिगारेटी पाच जणांत फिरल्या आणि पुस्तके उघडायला सुरुवात झाली. आज काय काय करायचे हे ठरवण्यातच साडेदहाचे अकरा झाले पण नंतर मात्र असा काही अभ्यास सुरू झाला की असेच मन वर्षभर लागले तर आमच्यातील प्रत्येक जण युनिवर्सिटी टॉपर आला असता. अकराचा काटा एक वर्तुळ पुर्ण फिरून बाराला बारा जोडला गेला. तास दीड तास सलग अभ्यास झाल्यावर पुन्हा एक ब्रेकची वेळ झाली. बर्‍याचदा अश्यावेळी भूकही लागलेली असते. कारण आठ-साडेआठला जेवलेले एव्हाना जिरलेले असते. म्हणून मग हॉस्टेलच्याच अल्पोपहारगृहात, जे परीक्षांच्या काळात रात्री साडेबारा-एक पर्यंत उघडे असते तिथे जायचा प्रोग्राम ठरलेला असतो. मॅगी, भुरजीपाव, किंवा मिसळपाव आणि वर एक कडक कटींग चहा हा ठरलेला मेनू. याव्यतिरिक्त काही मिळतही नाही यावेळेस. पण आज मेसच्या नेहमीच्या टिपिकल मसालेदार जेवणाच्या जागी (इथे मसालेदार या शब्दाने हुरळून न जाता "टिपिकल मसाले" या शब्दांवर भर द्यावा) तर अश्या जेवणाच्या जागी चिकन हादडले असल्याने तशी फारशी भूक नव्हती कोणाला. म्हणून रूमवरच बिस्किटचे पुडे फोडले गेले. आंघोळीच्या बादलीत पाणी भरून त्यात पाणी तापवायचा हीटर सोडून चार अंडी उकडण्यासाठी टाकली. आणि आता पुढच्या टप्प्यात काय अभ्यास करायचा हे डिस्कस करण्यास सुरूवात झाली. तोपर्यंत अंडीही उकडली गेली. त्यांचा समाचार घेऊन पुन्हा एकदा आम्ही सारे युनिवर्सिटी टॉपर अभ्यासाला लागलो. पण कोणी विषय काढत नसला तरी सार्‍यांच्या मनात एक शंका होतीच की थोड्याच वेळात आपल्या अभ्यासात विघ्न तर नाही येणार ना...

आणि ती शंका खरी व्हायला वेळ नाही लागला. अचानक एक आवाज यायला सुरुवात झाली... वूहूss.. व्हू व्हू.. नाही समजले ना.. थांबा तुम्हाला समजेल अश्या भाषेत सांगतो.. भूss भू भू.. भौ भौ.. पुस्तकी भाषेत किंवा आपल्या माणसांच्या बोलीभाषेनुसार हे असेच काहीसा आवाज काढतात ना. पण प्रत्यक्षात हा अनुभव घेतलेल्यांनाच ठाऊक की जब मिल बैठते है चार यार तेव्हा त्यांचे समूहगाण कसे चालू असते. आणि इथे तर गिणती करने कठीण व्हावे इतके त्या मैदानात जमायचे. बघता बघता त्या "वूहूss व्हू व्हू" चे व्हाऊss व्हाऊ.. व्होहो व्होहो.. कुईss कुईss.. आणखी बरेच काई काई, आपले बरेच काही आवाज सुरू झाले. मध्येच ट्रेडीशनल भौऊउssss करून एक लांबलचक सूर निघत होता. पण तो ही अट्टाहासाने एखाद्याला इरिटेट करायला चिरक्या आवाजात काढावा इतका बेसुरा होता. क्षणाक्षणाला बदलणारी आवाजाची फ्रिक्वेन्सी आणि आणखी आणखी बेसूर "चा" भेसूर होत जाणारा तो आवाज थांबायची चिन्हे दिसत नव्हती तशी एकेका खिडकीतून एकेकाचे "अबे ओये, हाड हुड" करत आवाज येऊ लागले. काही फुसके बार तसेच खाली जायचे तर काही आरोळ्या त्यांना जेमतेम दोन क्षणांसाठी शांत करायच्या. पण तिसर्‍याच क्षणी पुन्हा पहिल्यापेक्षा जोशात सुरूच. दिवसभराची शक्ती जणू काही यासाठीच साठवून ठेवली असावी. खरे तर अश्यावेळी हे आलटून पालटून क्रमाक्रमाने एकेका खिडकीतून येणारे मुलांचे आवाजही इरिटेटच करायचे, पण निदान आपल्यासारखाच त्रास इतरांनाही होत आहे हे समाधान आणि एकाच्या आवाजाने तरी हे शांत बसतील हा आशावाद असायचाच. आणि म्हणून एखाद दोन आवाज आमच्या खिडकीतूनही फेकले जायचे. रात्रीच्या वीराण शांततेत जिथे घूशीची हलकीशी सळसळही भयाण वाटू शकते तिथे यांचे रडगाणे एखाद्या झोपलेल्यालाही कसे दचकवून उठवत असतील याची कल्पना तुम्ही करू शकताच. आणि एकदा उठले की त्यानंतर झोपेचेही खोबरेच. कारण या पार्श्वसंगीतावर पुन्हा पटकन डोळा लागणेही अशक्यच होते. थोडक्यात काय तर झोपी गेलेले आणि जागे असलेले सारेच यांना वैतागले होते.

पण यावर उपाय काही सापडत नव्हता. म्हणजे आम्ही नुसते खिडकीतून शुकशुक करून हातावर हात धरून बसलो नव्हतो. काही जणांनी दगडही भिरकावून झाले होते. पण त्या अंधारात कसला नेम लागतोय. आणि एकाला लागूनही बाकीचे सारे कुठे शांत होणार होते. त्यांनाही आपली ताकद, आपले वर्चस्व ठाऊक होते. इथे तिथे लपून छपून का होईना आवाज हा सुरूच असायचा. खाली जाऊन त्यांच्याशी दोन हात करायचा प्रश्नच नव्हता. खुद्द वॉचमननेही आपली बसायची जागा बदलली होती. हॉस्टेल प्रशासनानेही कोरडे आश्वासन दिले होते. पण ते आपली पुढची पावले उचलेपर्यंत आणि कारवाई करेपर्यंत आमचे महत्वाचे अभ्यासाचे दिवस, किंवा रात्री म्हणा हवे तर, फुकट जात होत्या. म्हणून सरतेशेवटी आम्हीच सार्‍यांनी एकत्र येऊन यावर तोडगा काढायचे ठरवले.

दुपारी "ए" . "बी", "सी", "डी" सार्‍या मेसमध्ये नोटीसा लागल्या की आज संध्याकाळी सहा वाजता टी.वी. रूममध्ये या विषयावर सार्‍यांची मीटींग आहे. प्रत्येकाने या समस्येवर काय तोडगा काढायचा याचा आपापल्या परीने विचार करून या. जेवतानाही सार्‍यांचा हाच विषय चालू होता. पक्याने सुचवले की जेवणातूनच त्यांना विष देऊन मारूया. तर लगेच बंडया त्यावर म्हणाला की त्यापेक्षा आपल्या मेसच्या अप्पाचे कालचे शिळे जेवणच देऊया ना, साले उलट्या करत मरतील. विषय सारे हसण्यावारी नेत असले तरी गांभीर्य सारेच ओळखून होते. आणि संध्याकाळी त्याचा प्रत्यय आलाच. टी.वी. रूममध्ये ईंडिया-पाकिस्तान ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला नव्हती त्यापेक्षाही जास्त गर्दी झाली होती. मेसमध्ये चर्चिल्या गेलेल्या हलक्याफुलक्या आयडीयांनी हळूहळू वातावरण बनण्यास सुरुवात झाली. पण हळूहळू एकेक गंभीर प्रस्तावही समोर येऊ लागले. जसे की एखाद्या लोकल पॉलिटीशिअनची मदत घेऊन नगरपालिकेकडून काम करवून घेणे, किंवा या पॉलिटीशिअन लोकांना इन्वॉल्व करायचे नसल्यास पदरचे चार पैसे खर्च करून कुत्रे पकडणार्‍या विभागाशी संपर्क साधून त्यांना थोडेसे खिलवून त्यांच्याकडून यांचा बदोबस्त करने. पण याआधीचे आमचे काही अनुभव वाईट असल्याने येथील सरकारी यंत्रणा किती कामात येईल याची आम्हाला खात्री नव्हती. उगाच त्यांची खातिरदारी करण्यात आणि त्यांच्या मागेपुढे नाचण्यातच आमचा वेळ जाण्याची शक्यता जास्त होती. आणि सध्या तोच वेळ आमच्याकडे नव्हता. आम्हाला असा एखादा उपाय हवा होता जो कमीत कमी वेळात, कमीत कमी खर्चात आणि डोक्याला जराही त्रास न देता केल्याकेल्या ज्याचा गुण यावा.

गंभीर झालेले वातावरण पुन्हा हलकेफुलके करण्यासाठी पुन्हा पक्यानेच एक गंमतीशीर उपाय सांगितला पण यावेळी मात्र बंड्याने त्याच्या कल्पनेची टिंगल न उडवता त्यात आपल्या परीने रंग भरण्यास सुरुवात केली. आणि हळूहळू सुरुवातीला हसण्यावारी न्यावी अशी वाटणारी पक्याची कल्पना सारेच जण गंभीरपणे घेऊ लागले, पण त्यावर चर्चा मात्र हसतखिदळतच होत होती. आणि त्याच मूडमध्ये सारे टी.वी. रूमच्या बाहेर पडले. हा उपाय कितपत काम करेल याची कोणालाच खात्री नव्हती पण निदान आज रात्री तरी तो अंमलात आणन्यास सारेच उत्सुक होते.

टी.वी. रूममधून सारी पावले थेट मेसकडे वळली. त्यामुळे तिथेही बर्‍यापैकी गर्दी उसळली. गोंगाटही बराच चालू झाला. चर्चेचा ताजा विषय हाच होता. मध्येच एकादोघांना रंगीत तालिम करायची हुक्की आली.... अरे नको नको.. कशाला आधीच सावध करतोयस त्यांना म्हणत इतरांनी त्यांना दाबले. पण खरे तर ही खुमखुमी सार्‍यांनाच आली होती. कसेबसे आपल्या उत्साहावर कंट्रोल करून सारे जण आपापल्या रूमवर गेले. आता वाट रात्रीची बघायची होती. तयारी अशी काही फारशी खास नव्हती, फक्त मनाची करायची होती. वॉचमनलाही कल्पना देण्यात आली होती, जेणे करून ऐनवेळी ते बिथरले तर वॉचमनला काही धोका होऊ नये. पण हॉस्टेलच्या रेक्टरला मात्र मुद्दाम नाही सांगितले. तसेही या प्रकरणात आधीही त्यांची काही मदत झाली नव्हती. आताही मग कशाला आधी काही सांगा आणि त्यांची परवानगी मागा. ती देखील मिळाली तरी ते मेहेरबानी केल्याच्या थाटात देणार, आणि उरलेले वर्षभर ते दरवेळी सुनवून दाखवणार. त्यापेक्षा नकोच ते.

आम्ही कालचेच सारे रूमवर परत जमलो. आज गार्डनला राऊंड मारायचा प्रोग्राम देखील रद्द केला. मिशन की ऑपरेशन सुरू व्हायच्या आधी अभ्यास करून घेऊया असा विचार केला. तरी काहीतरी थ्रिलिंग करणार आहोत या विचाराने चित्त म्हणावे तसे लागत नव्हते. रात्रीचे साडेअकरा वाजले तसे अल्पोपहारगृहात पेटपूजा करायला गेलो. अर्थात तिथेही हाच हॉट टॉपिक. अप्पाला कॅंटीनही बारालाच बंद करायची सूचना देऊन परत रूमवर आलो. तोवर बाराला फक्त पाच कमी होते. साडेबारापर्यंत कसा बसा जेमतेम अभ्यास केला, मग मात्र मन लागेणासे झाले. उठून उठून सारे खिडकीपाशी जाऊन त्यांचा अंदाजा घेत होते. पण अजून काही त्यांचा पत्ता नव्हता. तसेही खिडकीतून डोकावण्याची काही एक गरज नव्हती. त्यांच्या आगमनाची घोषणा ते स्वताच करत यायचे. पण आज मात्र नेहमीच्या वेळेपेक्षा उशीर करत आहेत असे उगाच वाटत होते. नेमके फायनल मॅचच्या वेळी पाऊस पडावा तसे आज गायब तर नाही ना झाले कुठे असे वाटू लागले तेवढ्यातच... हाह हाह हा.. लुस्स लुस्स लुस्स ... आणि हलकेसे गुर्रर... कानावर पडू लागले. आणि अचानक सार्‍यांचे चेहरे उजळले. सारे उठून खिडकीपाशी येऊन उभे राहिलो. खिडकीतून वर खाली सारी बिल्डिंग न्याहाळून इतर सारेही आपापल्या खिडकीत आलेत का याचा अंदाज घेऊ लागलो. बघता बघता सारेच जमले होते. आमच्या लीडरने इशारा करताच सार्‍यांनी एकेक करू रूममधील लाईट्स बंद करायला सुरुवात केली. दोन-चार मिनिटांतच सार्‍या होस्टेलमध्ये काळोख पसरला. आता सारे आमच्या लीडरच्या पुढच्या इशार्‍याची वाट बघत होते. आणि लीडर मात्र आधी त्यांनी सुरुवात करायची वाट बघत होता.

वूहूss.. व्हू.. व्हूss .. करून त्या लोकांच्या लीडरने आधी आवाज दिला. आणि थोड्याच वेळात त्याचे सारे साथीदार त्याला भ्वाऊss व्हाऊ.. व्होहो व्होहो.. कुईss कुईss.. करत सामील झाले. आज त्यांचा आवाज आम्हाला इरीटेटींग वाटत नव्हता तर त्यांचे ओरडणे आम्ही मनापासून आणि लक्ष देऊन ऐकत होतो... कारण.... कारण काय विचारतात.. पुढे तर वाचा..

दुसर्‍याच मिनिटाला आमच्या लीडरने आवाज दिला.... भौऊउssss...
आणि तिसर्‍याच मिनिटाला व्हाऊss व्हाऊ.. खाई खाई खाई... हाईच हाईच.. गुर्ररss गुर्रर.. लप्प लप्प लप.. सारे हॉस्टेल दणाणून उठले.

आई गं.. सारे आवाज शब्दात तरी कसे मांडू.. जमल्यास स्वताच त्या मैदानातील श्वापदांच्या दृष्टीकोणातून विचार करून पाहा. हॉस्टेलच्या त्या अंधार्‍या बिल्डिंगमधून आपल्याला स्पर्धा देणारे, आपल्यासारखेच किंवा कैकपटीने भयानक आणि मोठाले आवाज ऐकून त्या मुक्या प्राण्यांची खरेच भितीने बोलती बंद झाली होती. एकदोन अतिशहाण्यांनी तोकडा प्रतिकार करायचा प्रयत्न केला, पण आमची पोरे फुल फॉर्ममध्ये होती. लक्ष्य एकच होते की त्यांना नुसते पळवूनच नाही लावायचे तर अशी दहशत बसवायची की पुन्हा चुकूनही हॉस्टेलच्या आसपासही फिरकली नाही पाहिजेत. आणि तेच होत होते. त्या अंधारात नक्की त्यांचे काय चालूय हे आम्हाला समजत नव्हते, पण त्यांचा आवाज मात्र चिडीचूप झाला होता. कदाचित पायात शेपूट घालण्याचा अंगप्रकार करून कुठल्यातरी कोपर्‍यात घाबरून बसले असावेत. पण आमचा गोंगाट मात्र, किंवा भो.. भो.. भोंगाट म्हणा हवे तर, पुर्ण उत्साहात चालूच होता. आजवर कधी कल्पनाही केले नसतील असे एकेक आवाज मानवी कंठातून बाहेर पडत होते. जणू एकमेकांना आपली कलाकारी दाखवण्याची चढाओढच लागली होती म्हणा ना. आमच्या या ध्वनी क्षेपणास्त्रांचा अनपेक्षित मार्‍यातून ती श्वापदे शेवटपर्यंत सावरलीच नाहीत. जवळपास वीस-पंचवीस मिनिटांच्या या एकतर्फी आवाजी धुमश्चक्रीनंतर दूरवर आम्हाला ते मैदानाचे कुंपण ओलांडून जाताना रस्त्यावरच्या लाईटच्या जेमतेम प्रकाशात दिसले. तेच त्यांचे शेवटचे दर्शन होते. त्यानंतर आणखी मिनिटभर सर्व कलाकारांनी आपापली हौस भागवून घेतल्यावर लीडरच्या हुकुमाबर सार्‍यांनी आपापल्या रूम लाईट लाऊन उजळवल्या आणि पुर्ण हॉस्टेलमध्ये मिशन सक्सेस झाले म्हणून एकच जल्लोष झाला.

काही हुशार पोरांनी ती कलाकारी रेकॉर्ड सुद्धा करून ठेवली, एक आठवण म्हणून. त्या रात्रीनंतर पुढचे बरेच दिवस आमच्या कॉलेजमध्ये या "भौऊ भौऊ" च्या रिंगटोन वाजत होत्या. कधीकधी नक्कलही ओरिजिनलपेक्षा कशी भारी असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे या रिंगटोन. कधी तुमच्या शेजारीपाजारी कोणाची वाजली तर त्याला त्याच्या कॉलेजचे नाव विचारायला विसरू नका.. कारण ते सांगायचे राहिलेच नाही का...

महत्वाचे मुद्दे -

१) पुन्हा एकदा प्राणीप्रेमींच्या भावना दुखावू नयेत म्हणून कथेत कुठेही त्या श्वापदांचे नाव घेणे टाळले आहे.

२) कथा पुर्णपणे काल्पनिक असो वा नसो, उद्या जर यातील उपाय तुमच्या कामी आला तर याचे सारे श्रेय लेखकालाच जाईल.

३) कृपया त्या रिंगटोनसाठी माझ्याशी संपर्क साधू नये. रिंगटोन तर नाही मिळणार, पण संपर्क साधण्याचेही चार्जेस आकारले जातील याची खात्री बाळगा.

धन्यवाद,
तुमचा अभिषेक

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Bhannat Happy

अभिषेक, मस्त उपाय आहे. आमच्या घरासमोरही कुत्री आवाज करीत. शेवटी एकाने डझनभर अ‍ॅटमबाँब फोडले तेव्हा पिडा गेली. Happy
आ.न.,
-गा.पै.

धन्यवाद गामाजी,
सध्या आमच्याही कॉलनीसमोर या लोकांनी उच्छाद माडलाय, तर परवा मी सहज जेवताना आईला म्हणालो की आपण पण सेम इथून असेच आवाज काढले पाहिजे आणि त्यांना आपल्या इलाक्यातून पिटाळले पाहिजे. आई या कल्पनेवर हसली आणि मला कथा सुचली.. Happy

लई भारी.. आधी डास आहेत असे वाटाले होते.
>>>

अनुताई मला पण
आधी डास नंतर ढेकुण आणि निघालं कुत्रं Proud

अभिषेकदादा : तेच ते नेहमीचच कॉपी पेस्ट समज माझ्याकडुन Proud

अगदी हाच उपाय माझे बाबा आम्हाला सांगत असत. त्यामुळे कधीही ह्या चौपाद प्राण्याची भीती वाटली नाही. छान गोष्ट!

प्रनु - धन्स Happy

अनघा मीराजी - ह्म्म.. पण लिहिताना वाचकांना तसे दुसरे इशारे द्यायचे डोक्यात नव्हते, नाहीतर आणखी थोडावेळ नक्की काय आहे हे न समजू द्यायची काळजी घेतली असती. बाकी एवढासाच तर जीव कथेचा, आणिक कशाला त्यात खेळ करा.

रीया - तुझी तीच प्रतिक्रिया येणार ही खात्री तर तुला अर्धी कथा वाचायला दिल्यावरच आली होते... Happy ......पण तू मला पब्लिक फोरम वर दादा का बोलतेस, उगाच तुझ्या वयाच्या सार्‍या पोरींना हीच सवय लागेल ना.. Angry

मनस्वीजी - बाबा ग्रेट आहेत तुमचे, जे पोरांच्या मनातून यांची भिती घालवली.. Happy

अभिषेक, नेहमीप्रमाणेच उत्तम शैलीतली कथा, मला आधी उंदिर वाटले होते जे रात्रीच्या वेळी रूमवर शिरून अन्नपदार्थ अथवा पुस्तकांची वगैरे नासाडी करत असावेत जेणेकरून तुम्ही सर्व त्रासले असाल. Proud

मस्तच!

मंजिरीताई, डास, ढेकूण झाले.. आता कोणाच्या डोक्यात उंदीरही आले.. सही आहे.. Happy

बागुलबुवा, चावणारी असती तर मग उपायही तसाच असता.. आम्हालाही ड्रॅकुला बनावे लागले असते.. Lol

रीया - तुझी तीच प्रतिक्रिया येणार ही खात्री तर तुला अर्धी कथा वाचायला दिल्यावरच आली होते... ......पण तू मला पब्लिक फोरम वर दादा का बोलतेस, उगाच तुझ्या वयाच्या सार्‍या पोरींना हीच सवय लागेल ना..

>>>

भारी ना मग
तू पुढची गोष्ट लिही
एक साईट दादाटलेली हाकानाका Proud

मला कथेच्या शीर्षकावरुनच भु भु च वाटले होते.. हे बाकीचे प्राणी डोक्यात आलेच नव्हते... रच्याकने अभिषेकच्या डोक्यात मात्र आता हे सगळे प्राणी गदारोळ घालत असतील.. Happy

मोनाली - धन्स.. Happy

रीयाजी - सही ग्ग, माझ्या डोक्यातही नव्हते की मी आता अशी मालिकाच छापू शकतो,
तुर्तास त्या "...टलेली" नावाचे हक्क मी स्वताकडे राखून ठेवले आहेत हे मी इथेच जाहीर करतो.. Happy

चिमुरी - सही.. पुन्हा एकदा तू दाखवून दिलेस की येथील सर्वात सुजाण वाचक तूच आहेस.. Happy

आवडली. इथे facebook सारखी like ची सोय हवी होती. पटकन आवडली म्हणता आले असते. (क्रुपया अ‍ॅडमिनने याची नोंद घ्यावी :-))

धन्स चना...
पण बरे आहे इथे अशी काही लाईकची सोय नाही, अन्यथा बर्‍याच चांगल्या प्रतिसादांना मुकलो असतो.. Happy

अभी इतक्या वेगवेगळ्या विषयांवर इतक्या भराभर लिहीतोयस की आता तुझं चित्र डोळ्यासमोर येतं ते असं की किमान तीन डोकी आठ-एक हात असलेला अभी Happy
लगे रहो दोस्त एकदम झकास जमतय Happy

आमच्या घरासमोरही कुत्री आवाज करीत. शेवटी एकाने डझनभर अ‍ॅटमबाँब फोडले तेव्हा पिडा गेली.>>>> माझ्या भावानेही हा उपाय केला होता. Happy

छान कथा!

हा हा हा... धन्यवाद रे चाफ्या...
सगळे इकडचे तिकडचे अनुभव आणि त्यात थोडी आपली आयडियेची कल्पना असेच असते रे... आता आपल्याला अनुभव हे वेगवेगळेच येतात ना.. कुठे एकसुरी जगतो आपण.. तसेच हे.. Happy

बाकी सध्या हिमेश रेशमिया अंगात संचारला आहे म्हणून धडाधड.. होईल शांत पण लवकरच.. Happy

@ सोनाली, धन्यवाद

बाकी हा फटाक्यांचा उपाय आमच्या दक्षिण मुंबईत काम करेल असे वाटत नाही.. शेवटी आमचा भाई लोकांचा एरीया आहे, येथील कुत्र्यांनी गोळीबाराचे देखील अनुभव घेतलेत..

अभिषेक, मस्त उपाय आहे. आमच्या घरासमोरही कुत्री आवाज करीत. शेवटी एकाने डझनभर अ‍ॅटमबाँब फोडले तेव्हा पिडा गेली.
आ.न.,
-गा.पै.

मायबोलिवरही असे बाँब फोडून पाहिले पाहिजे... Proud