मन्ना डे - नाबाद ९३ !

Submitted by टवाळ - एकमेव on 2 May, 2012 - 02:09

प्रबोधचंद्र डे उर्फ मन्ना डे यांनी काल वयाची ९३ वर्षे पुर्ण केली. त्यांना उदंड आयुष्य लाभो ही देवाकडे प्रार्थना !

सगळं काही असून एका अर्थाने उपेक्षित असा हा महान कलाकार ! मन्नादांनी स्वतः ही बोच वारंवार बोलून दाखवली. अर्थात उत्तर आयुष्यात. त्यांच्या काळात अशी खंत करणे, हेवे-दावे करणे, दुसर्‍याचं काम पळवणे वगैरे प्रकार होत नसत. काम मिळवण्याची धडपड त्याही वेळेला होती. पण स्पर्धा ही निकोप असायची. स्वतःची रेषा मोठी दिसावी म्हणून दुसर्‍याची रेषा पुसण्याचे विचार त्यावेळेला कुणी करत नसत. त्याऐवजी मेहनत वाढवून स्वकर्तुत्वाने आपली रेषा कशी वाढेल याकडे त्या कलाकारांचे जास्त लक्ष असायचे. पण काही कलाकारांचे नशिब ही कधी कधी साथ देत नसते. त्यामुळे मुकेश, तलत आणि रफी यांच्या बरोबरीने (कधी कधी या सर्वांच्या वरचढ) काम करूनही मन्नादा कधी नायकाचा आवाज बनू शकले नाहीत. आता असं लक्षात येतय की कितीही नाही म्हटलं तरी भाषावार संगीतकारांचे कॅंप त्याही वेळेला होते. बघा ना, आर्.के. कँप सोडला तर मुकेशचा सर्वात जास्त वापर कल्याणजी आनंदजींनी केला. रफीचा वापर नौशाद आणि ओ.पी. नय्यर यांनी केला. किशोरला तर सुरवातीला फक्त दादा बर्मन यांनीच वापरला. तलत, हेमंतकुमार हे तसे फारसे कँपातले नव्हते. पैकी हेमंतकुमार तर स्वयंभू होते आणि स्वत:च ईतकी सुंदर कंपोझीशन्स करून स्वतःच गात होते. यामुळे मन्नादांना वाली फक्त बंगाली संगीतकार - सचिनदेव बर्मन आणि सलील चौधरी हेच होते. दादा बर्मन तर मन्नादांचे मेंटॉरच होते. चित्रपटातलं पहीलंवहीलं हिट गाणं - उपर गगन विशाल - मन्नादांना दादा बर्मन यांनीच दिलं. मन्नादांच्या नशिबाने ईथंच त्यांना पहिला फटका दिला. त्या काळातल्या हिट नायकांनी स्वतःचे आवाज आधीच ठरवून टाकले होते. उदा. दिलीप कुमार - मुख्यतः रफी आणि तलत. राज कपूर - मुकेश आणि काही प्रमाणात तलत. देव आनंद - हेमंतकुमार, रफी, किशोर. यामुळे मन्नादांचं पहिलं हिट गाणं देखील कुणा नायकाच्या तोंडी नसून बॅकग्राऊंडला होते. पण मन्नादा खचले नाहीत. आपलं नाणं जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा खणखणीतपणे वाजवतच राहीले. त्यांना लोकप्रियता पण खुप लाभली. पडद्यावर सादर करणारा कलाकार कुणीही असला तरी मन्नादांनी प्रत्येक गाणं हे समरसूनच गायलं. त्याचं फळही नंतरच्या काळात त्यांना मिळ्त राहीलं. पुढे शंकर-जयकिशन यांनी चक्क रफीला डावलून शम्मी कपूरचा आवाज म्हणून त्यांना उजाला मधून पेश केलं. उजालातली सगळी गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली. राज कपूर साठी आर.के. कँप मधे त्यांनी श्री ४२० मधे आवाज दिला. "दिल का हाल सुने दिलवाला", "मुड मुडके न देख" ही गाणी तुफान लोकप्रिय झाली. आर.के. कँप व्यतीरिक्त केलेल्या राज कपूरच्या "चोरी चोरी", "दिल ही तो है" ई. चित्रपटासाठी मन्नादांनी पार्श्वगायन केले. या सगळ्या काळात त्यांची समांतर ईतर भाषेतही गाणी चालू होती. मराठीमधे "घन घन माला नभी दाटल्या", "अ आ आई, म म मका" या आणि अशा अनेक गाण्यांचं पार्श्वगायन त्यांनी केलं. बंगालीमधे तर दादा बर्मन, सलील चौधरी आणि रविंद्र संगीत गायन त्यांनी केलं. मल्याळम भाषेतल्या "चेम्मीन" या सलील चौधरी यांनी संगितबद्ध केलेल्या चित्रपटाच्या पार्श्वगायनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. पण हे सगळं असूनही कुठेतरी काहीतरी राहून जात होतं. मन्नादांचं नाव फक्त शास्त्रीय संगितावर आधारित गाणी गाणारा गायक म्हणूनच प्रसिद्ध होतं. रफी करू शकत असलेल्या सगळ्या गोष्टी गळ्यातून उतरवण्याची तयारी असलेल्या मन्नादांना मात्र बहुतेक वेळेला सहनायक असलेल्या व गाणं असलंच पाहीजे ही अट असलेल्या मेहमूद साठी गाणं भाग पडलं. याचा वाईट परिणाम ईतकाच झाला की पडद्यावर मेहमूद असल्याने मन्नादांनी जिव ओतून गायलेल्या (मुख्यत: शास्त्रीय संगीतावर आधारीत) काही गाण्यांकडे लोकांनी गंभिरपणे लक्षच दिलं नाही. अर्थात त्यामुळे मन्नादांनी आपल्या पुढच्या गाण्यामधे याचा परिणाम होऊ दिला नाही हे त्यांचं मोठेपण. उदा. काही गाणी - जिद्दीमधले "प्यार की आग में", पडोसन मधली "सावरीया आणि एक चतूर नार", भूतबंगला मधील "आओ ट्विस्ट करें" ई. याव्यतिरिक्तही काही गाणी मला आठवतात - दुज का चांद मधलं "फुलगेंदवा न मारो" हे गाणं नुसतं ऐकलं की त्यातल्या हरकती किती कठिण आहेत हे लक्षात येतं पण पडद्यावर आगाने ते सादर केल्यामुळे गाणं बघताना हसण्याच्या नादात मन्नादांची कामगिरी दुर्लक्षली जाते. तिच गोष्ट दिल ही तो है मधल्या "लागा चुनरी में दाग" गाण्याची. पडद्यावर ते विनोदी पद्धतीने सादर केले गेले आहे. मेरे हुजूर मधले "झनक झनक तोरी बाजे पायलीया" पडद्यावर जरी विनोदी पद्धतीने सादर केले नसले तरी त्या गाण्यावर राजकुमारला बघून विनोद निर्मीती आपोआपच होते. देख कबिरा रोया मधलं "कौन आया मेरे मनके व्दारे" हे गाणं अनुपकुमारच्या तोंडी आहे जो केवळ किशोरकुमारचा भाऊ असल्याने विनोदी कलाकार समजला गेला. बात एक रात की मधे जॉनी वॉकरच्या तोंडी असलेली दोन अप्रतिम गाणी - पैकी एक "किसने चिलमनसें मारा" आणि दुसरे ओठावर आहे पण लक्षात येत नाहीये - ही अशीच वाया गेली.

आता दोन किस्से - पहीला प्रसिद्ध किस्सा आहे बसंत बहार चित्रपटातील "केतकी गुलाब जुही" या जुगलबंदीचा. तो मन्नादांच्या तोंडून ऐकताना आणखी मजा येते. संगितकार जयकिशनच्या असीस्टंट ने मन्नादांना फोन करून सांगीतले की मुख्यतः बसंत या रागावर आधारित एक जुगलबंदी आहे तेव्हा उद्या सकाळी दहा वाजता फेमस स्टुडीओमधे या. मन्नादा म्हणतात की दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठून थोडाबहूत रियाज करून मी स्टुडीओत पोचलो. आता चित्रपटातली जुगलबंदी म्हणजे समोर बहूतेक करून रफीच असणार. मजा येईल जरा गायला. स्टुडीओत पोचलो पण रफी काही दिसेना. सगळीकडे शोधलं. तर म्युझीकरूम मधे पं. भिमसेनजी जोशी बसलेले दिसले. वाटलं आले असतील एखाद्या शास्त्रिय गायनाच्या रेकॉर्डींगला. इतक्यात समोर शंकर दिसले. मला म्हणाले चला, चला ! आपण म्युझीकरूम मधे जाऊ ! मी तुम्हाला चाल समजाऊन देतो ! मी म्हटलं, शंकरजी, ते ठिक आहे. पण दुसरा गायक कोण आहे ? रफीच आहे ना ? तो तर आलेला दिसत नाही ! ते म्हणाले, नाही ! रफी नाही ! पं. भिमसेनजी जोशींबरोबर तुम्हाला ही जुगलबंदी गायची आहे ! मी अक्षरशः तिन-ताड उडालो. हे मला अपेक्षितच नव्हतं. माझ्या तयारीचा प्रश्न नव्हता. पण तरीही पं. भिमसेनजी जोशी ? मग मी काय केलं ? अक्षरशः पळालो ! दोन दिवस मुंबई सोडून गेलो. पण शेवटी पं. भिमसेनजी जोशीजींनी स्वतःच मला समजावलं. चित्रपटसंगितात हे चालायचंच. पण त्यातही मी नायकाचा आवाज - म्हणजे ती जुगलबंदी मी जिंकतो असं दाखवायचं होतं ! आणि हे मला मान्य नव्हतं ! पण शेवटी एकदाचा सुवर्णमध्य निघाला आणि ते गाणं रेकॉर्ड झालं !

दुसरा किस्सा आहे - "मेरी सुरत तेरी आँखे" या चित्रपटावेळचा. काही कारणाने माझ्या गळ्याला संसर्ग झाला होता आणि आवाज निट काम करत नव्हता. त्या चित्रपटातली बाकीची गाणी झाली होती. पण एक मुख्य गाणं - अहिरभैरव या रागावर आधारीत - पुछो ना कैसे मैने रैन बितायी - हे रेकॉर्ड होण्याचे बाकी होते. या गाण्यासाठी संगितकार दादा बर्मन यांना माझाच आवाज वापरायचा होता. आणि माझा गळा काही ठिक होत नव्हता. दिवस वाया जात होते. मी माझी असमर्थता दादांना सांगून पाहीली आणि वेगळा गायक घेण्याचे सुचवले. पण तेही हटूनच बसले होते. शेवटी हो-नाही करत एके दिवशी रेकॉर्डींग ठरले. फायनल टेकच्या वेळेला पहीलं कडवं व्यवस्थित झाल्यावर एके ठिकाणी माझा आवाज तुटला (चिरकला). त्या वेळेला आजच्या सारखं ट्रॅक रेकॉर्डींगची सोय नव्हती. चुकलं की पुर्ण गाणं परत रेकॉर्ड करावं लागे. मी दादांकडे बघीतलं. त्यांनी नजरेनेच मला "चालू राहू दे" असा ईशारा केला. रेकॉर्डींग झालं. मी हळूच दादांना विचारलं - म्ह्टलं दादा ! एका ठिकाणी माझा आवाज फाटलाय ! आपण पुन्हा रेकॉर्ड करू या का ? ते म्हणाले - नको ! उलट मला या जागी हेच अपेक्षित होतं ! याचं कारण चित्रपटात हे दृष्य अशा वेळेला आहे की नायक अतिशय हताश मनःस्थितीत आहे. तो शास्त्रीय गायक आहे. पण या वेळेला अतिशय उदास आहे, जगण्याला कंटाळलेला आहे. अशा परिस्थितीत अगदी परफेक्ट गाणे अपेक्षित नाही. उलट मी सांगूनही कदाचित नेहमीच्या वेळेला तुला हा ईफेक्ट देता आला नसता जो तुझ्या या फाटलेल्या आवाजाने दिला आहे.

मन्नादांबद्द्ल लिहीण्यासारखं खुप आहे ! पण वेळेअभावी आता थांबतो ! मा.बो. कर रसिक भर टाकतीलच म्हणा ! Happy

गुलमोहर: 

सर्व प्रतिसादकांना मनःपुर्वक धन्यवाद ! योगायोगाने कालच मा.बो. वर शर्मिला फडके यांचा लेख प्रसिद्ध झाला. त्यांच्या प्रतिसादामध्ये साजिरा यांचा प्रतिसाद अतिशय मार्मिक होता. आपण सगळे सिने-संगितवेडे गाण्यामधे किंवा चित्रपटामधे आपल्या आयुष्यातल्या कुठल्या ना कुठल्या घटनेला बघत असतो. त्यामुळे कधी कधी हे चित्रपट किंवा गाणी नसती तर आपण काय केलं असतं हा प्रश्न पडतो. वर अशोक यांच्या प्रतिसादामधले "किशोरमुळे रफीला काम मिळू शकले नाही अशाही चर्चा आपण ऐकत असतोच" हे मात्र पटले नाही. कारण ही गोष्ट शब्दशः खरी आहे. तुम्ही किशोरच्या सुवर्णकाळातली रफीची गाणी ऐका. तो काम मिळत नसल्याने ईतका निराश झाला होता की काही वेळेला काही गाण्यात त्याने किशोरची नक्कल करण्याचाही (यॉडलींग) प्रयत्न केला. Happy

सकाळी सकाळी आठवलेली आणखी दोन गाणी -
सीमा - तु प्यार का सागर है
उजाला - अब कहा जाये हम

"किशोरमुळे रफीला काम मिळू शकले नाही अशाही चर्चा आपण ऐकत असतोच" हे मात्र पटले नाही. कारण ही गोष्ट शब्दशः खरी आहे....

~ शैलेन्द्र. ती गोष्ट सत्यच होती. पण त्याचे कारण 'चलती का जिसका नाम, उसीपे हो जाये हम सवार...' ह्या चित्रपटनिर्मात्यांच्या धंदेवाईक दृष्टिकोणामुळे घडलेला ते चक्र. शेवटी तुम्ही आम्ही केवळ कानसेन. आम्हाला जे भावते ते या गळेकापू धंद्यातील लांडग्यांना भावेलच असे अजिबात नसते. शेवटी ते पैसा यात ओततात आणि संगीतकाराला ते ऐकावेच लागते. सायगलसाहेबांना लोक डोक्यावर घेत, पण आज सायगलच्या आवाजात कुणी गातो म्हटले तर कोण संगीतकार त्याला संधी देईल ? त्यामुळे अशाबाबतीत आपण हळवे होऊन चालत नाही, इतकेच.

नौशादसारखा बुजूर्ग संगीतकार मनोजकुमारसारख्या सामान्य वकूबाच्या नटाच्या आग्रहासमोर झुकला तेथे अन्य किरकोळ संगीतकारांची काय कथा.

अशोक पाटील

"...हे चालूच असतं...."

~ अगदी अगदी मंदार. ती सृष्टीच बिनआतड्याच्या सर्पासारखी आहे. जिचा सुगंध मोहात पाडणारा तिकडे ती आपसूकच वळण घेते. मग सोमवारी ज्याच्यावर जीव ओवाळून टाकत होतो, ती मंगळवारी कोमेजून गेली, म्हणून कुणी हळहळत नाही. हळहळत असतो तो फक्त रसिक.

तलतवरदेखील मरणारे काय थोडे होते ? पण आजच्या मोबाईल मंडईत धुडगूस घालणार्‍यांना हे नाव माहीतही नसेल.

कालाय तस्मे नमः !! हेच बाकी सत्य सार.

अवलिया संगीतकार सज्जाद हुसैन ह्यांचे काही वाचलेले किस्से

"लता सिर्फ गाती है, बाकी सब रोती है"

"किशोरकुमार केवल उट्पटांग हरकते करनेवाला, उसको गाना कहां आता है"

वगैरे वगैरे.........

मन्ना डेंवर अन्याय झाला असेल कदाचित (म्हणजे त्यांना अपेक्षित असलेल्यापेक्षा संख्येने कमी/कमी महत्त्वाच्या अभिनेत्यांची गाणी मिळाली असतील) पण हे हिंदी चित्रपटसंगीतातील कँप्समुळे झाले हे पटले नाही. त्यांच्यावर शास्त्रीय बाजाची गाणी गाणारा गायक असा शिक्का बसल्यामुळे झाले असेल; अनेकांना त्यांचा आवाज नायकाचा वाटला नसेल. पण चित्रपटसंगीत ज्यांच्यामुळे चालतं त्या श्रोत्यांनी मन्ना डेंना, रफीपेक्षा गायक म्हणून वरच्या नसेल तर किमान त्याच श्रेणीवर ठेवले असेल हे नक्की.
काही गाणी फुकट गेली हेही पटले नाही. आजचे युग गाणे पाहण्याचे असेल, पण गाणी ऐकली जायची त्या काळात ही गाणी गायकाच्या नावाने ओळखली जायची. सोनू निगमलाही 'लागा चुनरी पे दाग'चे शिवधनुष्य उचलावेसे वाटले.
संगीतकार रोशन (लागा चुनरी पे दाग आणि ना तो कांरावां की तलाश) यांचा उल्लेख राहिला आहे की माझ्या नजरेतून सुटला.

मन्ना डेंची दोन गैरफिल्मी गाणी :
नथनी से टूटा मोती रे, सावन की रिमझिम में थिरक थिरक नाचे

नियतीने जुळवलेला एक योगायोग : मन्ना डे आणि बलराज सहानी दोघांची जन्मतारीख १ मे. यंदाच्या १ मे रोजी वृत्तपत्रांत जोहराजबीं अचला सचदेव यांच्या मृत्यूची बातमी होती Sad

देख कबीरा रोया, मधे मन्ना डे आणि सुधा मल्होत्राचे, जयजयवंति रागातले हे गाणे,
आहे.
बैरन हो गयी रैना, आवन कह गये अजहून आये..

हे क्वचितच ऐकायला मिळते. सिनेमात ते भ्रष्ट रुपात आहे.

हिदुस्तान कि कसम, मधे पण, हर तरफ अब यही अफसाने है, हे सुंदर गाणे आहे.
पण प्रि.रा. आणि राकु मुळे ते वाया गेले.

तिसरी कसम मधले चलत मुसाफिर, पण असेच थोडेसे मागे पडलेले.

मन्ना डेंनी, मराठीतही काही अभंग गायले आहेत.

चढ गयो पापी बिछुवा, तेरे बिना आग ये चांदनी तू आ जा, पंछी बनू उडती फिरू, काटे ना कटे रैना (हे अगदी क्वचित ऐकायला मिळणारे गाणे, मेरा नाम जोकर, राग गौड सारंग) या गाण्यात त्यांची स्वरसाथ मुख्य गायिके इतकीच सरस आहे.

Pages