मन्ना डे - नाबाद ९३ !

Submitted by टवाळ - एकमेव on 2 May, 2012 - 02:09

प्रबोधचंद्र डे उर्फ मन्ना डे यांनी काल वयाची ९३ वर्षे पुर्ण केली. त्यांना उदंड आयुष्य लाभो ही देवाकडे प्रार्थना !

सगळं काही असून एका अर्थाने उपेक्षित असा हा महान कलाकार ! मन्नादांनी स्वतः ही बोच वारंवार बोलून दाखवली. अर्थात उत्तर आयुष्यात. त्यांच्या काळात अशी खंत करणे, हेवे-दावे करणे, दुसर्‍याचं काम पळवणे वगैरे प्रकार होत नसत. काम मिळवण्याची धडपड त्याही वेळेला होती. पण स्पर्धा ही निकोप असायची. स्वतःची रेषा मोठी दिसावी म्हणून दुसर्‍याची रेषा पुसण्याचे विचार त्यावेळेला कुणी करत नसत. त्याऐवजी मेहनत वाढवून स्वकर्तुत्वाने आपली रेषा कशी वाढेल याकडे त्या कलाकारांचे जास्त लक्ष असायचे. पण काही कलाकारांचे नशिब ही कधी कधी साथ देत नसते. त्यामुळे मुकेश, तलत आणि रफी यांच्या बरोबरीने (कधी कधी या सर्वांच्या वरचढ) काम करूनही मन्नादा कधी नायकाचा आवाज बनू शकले नाहीत. आता असं लक्षात येतय की कितीही नाही म्हटलं तरी भाषावार संगीतकारांचे कॅंप त्याही वेळेला होते. बघा ना, आर्.के. कँप सोडला तर मुकेशचा सर्वात जास्त वापर कल्याणजी आनंदजींनी केला. रफीचा वापर नौशाद आणि ओ.पी. नय्यर यांनी केला. किशोरला तर सुरवातीला फक्त दादा बर्मन यांनीच वापरला. तलत, हेमंतकुमार हे तसे फारसे कँपातले नव्हते. पैकी हेमंतकुमार तर स्वयंभू होते आणि स्वत:च ईतकी सुंदर कंपोझीशन्स करून स्वतःच गात होते. यामुळे मन्नादांना वाली फक्त बंगाली संगीतकार - सचिनदेव बर्मन आणि सलील चौधरी हेच होते. दादा बर्मन तर मन्नादांचे मेंटॉरच होते. चित्रपटातलं पहीलंवहीलं हिट गाणं - उपर गगन विशाल - मन्नादांना दादा बर्मन यांनीच दिलं. मन्नादांच्या नशिबाने ईथंच त्यांना पहिला फटका दिला. त्या काळातल्या हिट नायकांनी स्वतःचे आवाज आधीच ठरवून टाकले होते. उदा. दिलीप कुमार - मुख्यतः रफी आणि तलत. राज कपूर - मुकेश आणि काही प्रमाणात तलत. देव आनंद - हेमंतकुमार, रफी, किशोर. यामुळे मन्नादांचं पहिलं हिट गाणं देखील कुणा नायकाच्या तोंडी नसून बॅकग्राऊंडला होते. पण मन्नादा खचले नाहीत. आपलं नाणं जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा खणखणीतपणे वाजवतच राहीले. त्यांना लोकप्रियता पण खुप लाभली. पडद्यावर सादर करणारा कलाकार कुणीही असला तरी मन्नादांनी प्रत्येक गाणं हे समरसूनच गायलं. त्याचं फळही नंतरच्या काळात त्यांना मिळ्त राहीलं. पुढे शंकर-जयकिशन यांनी चक्क रफीला डावलून शम्मी कपूरचा आवाज म्हणून त्यांना उजाला मधून पेश केलं. उजालातली सगळी गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली. राज कपूर साठी आर.के. कँप मधे त्यांनी श्री ४२० मधे आवाज दिला. "दिल का हाल सुने दिलवाला", "मुड मुडके न देख" ही गाणी तुफान लोकप्रिय झाली. आर.के. कँप व्यतीरिक्त केलेल्या राज कपूरच्या "चोरी चोरी", "दिल ही तो है" ई. चित्रपटासाठी मन्नादांनी पार्श्वगायन केले. या सगळ्या काळात त्यांची समांतर ईतर भाषेतही गाणी चालू होती. मराठीमधे "घन घन माला नभी दाटल्या", "अ आ आई, म म मका" या आणि अशा अनेक गाण्यांचं पार्श्वगायन त्यांनी केलं. बंगालीमधे तर दादा बर्मन, सलील चौधरी आणि रविंद्र संगीत गायन त्यांनी केलं. मल्याळम भाषेतल्या "चेम्मीन" या सलील चौधरी यांनी संगितबद्ध केलेल्या चित्रपटाच्या पार्श्वगायनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. पण हे सगळं असूनही कुठेतरी काहीतरी राहून जात होतं. मन्नादांचं नाव फक्त शास्त्रीय संगितावर आधारित गाणी गाणारा गायक म्हणूनच प्रसिद्ध होतं. रफी करू शकत असलेल्या सगळ्या गोष्टी गळ्यातून उतरवण्याची तयारी असलेल्या मन्नादांना मात्र बहुतेक वेळेला सहनायक असलेल्या व गाणं असलंच पाहीजे ही अट असलेल्या मेहमूद साठी गाणं भाग पडलं. याचा वाईट परिणाम ईतकाच झाला की पडद्यावर मेहमूद असल्याने मन्नादांनी जिव ओतून गायलेल्या (मुख्यत: शास्त्रीय संगीतावर आधारीत) काही गाण्यांकडे लोकांनी गंभिरपणे लक्षच दिलं नाही. अर्थात त्यामुळे मन्नादांनी आपल्या पुढच्या गाण्यामधे याचा परिणाम होऊ दिला नाही हे त्यांचं मोठेपण. उदा. काही गाणी - जिद्दीमधले "प्यार की आग में", पडोसन मधली "सावरीया आणि एक चतूर नार", भूतबंगला मधील "आओ ट्विस्ट करें" ई. याव्यतिरिक्तही काही गाणी मला आठवतात - दुज का चांद मधलं "फुलगेंदवा न मारो" हे गाणं नुसतं ऐकलं की त्यातल्या हरकती किती कठिण आहेत हे लक्षात येतं पण पडद्यावर आगाने ते सादर केल्यामुळे गाणं बघताना हसण्याच्या नादात मन्नादांची कामगिरी दुर्लक्षली जाते. तिच गोष्ट दिल ही तो है मधल्या "लागा चुनरी में दाग" गाण्याची. पडद्यावर ते विनोदी पद्धतीने सादर केले गेले आहे. मेरे हुजूर मधले "झनक झनक तोरी बाजे पायलीया" पडद्यावर जरी विनोदी पद्धतीने सादर केले नसले तरी त्या गाण्यावर राजकुमारला बघून विनोद निर्मीती आपोआपच होते. देख कबिरा रोया मधलं "कौन आया मेरे मनके व्दारे" हे गाणं अनुपकुमारच्या तोंडी आहे जो केवळ किशोरकुमारचा भाऊ असल्याने विनोदी कलाकार समजला गेला. बात एक रात की मधे जॉनी वॉकरच्या तोंडी असलेली दोन अप्रतिम गाणी - पैकी एक "किसने चिलमनसें मारा" आणि दुसरे ओठावर आहे पण लक्षात येत नाहीये - ही अशीच वाया गेली.

आता दोन किस्से - पहीला प्रसिद्ध किस्सा आहे बसंत बहार चित्रपटातील "केतकी गुलाब जुही" या जुगलबंदीचा. तो मन्नादांच्या तोंडून ऐकताना आणखी मजा येते. संगितकार जयकिशनच्या असीस्टंट ने मन्नादांना फोन करून सांगीतले की मुख्यतः बसंत या रागावर आधारित एक जुगलबंदी आहे तेव्हा उद्या सकाळी दहा वाजता फेमस स्टुडीओमधे या. मन्नादा म्हणतात की दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठून थोडाबहूत रियाज करून मी स्टुडीओत पोचलो. आता चित्रपटातली जुगलबंदी म्हणजे समोर बहूतेक करून रफीच असणार. मजा येईल जरा गायला. स्टुडीओत पोचलो पण रफी काही दिसेना. सगळीकडे शोधलं. तर म्युझीकरूम मधे पं. भिमसेनजी जोशी बसलेले दिसले. वाटलं आले असतील एखाद्या शास्त्रिय गायनाच्या रेकॉर्डींगला. इतक्यात समोर शंकर दिसले. मला म्हणाले चला, चला ! आपण म्युझीकरूम मधे जाऊ ! मी तुम्हाला चाल समजाऊन देतो ! मी म्हटलं, शंकरजी, ते ठिक आहे. पण दुसरा गायक कोण आहे ? रफीच आहे ना ? तो तर आलेला दिसत नाही ! ते म्हणाले, नाही ! रफी नाही ! पं. भिमसेनजी जोशींबरोबर तुम्हाला ही जुगलबंदी गायची आहे ! मी अक्षरशः तिन-ताड उडालो. हे मला अपेक्षितच नव्हतं. माझ्या तयारीचा प्रश्न नव्हता. पण तरीही पं. भिमसेनजी जोशी ? मग मी काय केलं ? अक्षरशः पळालो ! दोन दिवस मुंबई सोडून गेलो. पण शेवटी पं. भिमसेनजी जोशीजींनी स्वतःच मला समजावलं. चित्रपटसंगितात हे चालायचंच. पण त्यातही मी नायकाचा आवाज - म्हणजे ती जुगलबंदी मी जिंकतो असं दाखवायचं होतं ! आणि हे मला मान्य नव्हतं ! पण शेवटी एकदाचा सुवर्णमध्य निघाला आणि ते गाणं रेकॉर्ड झालं !

दुसरा किस्सा आहे - "मेरी सुरत तेरी आँखे" या चित्रपटावेळचा. काही कारणाने माझ्या गळ्याला संसर्ग झाला होता आणि आवाज निट काम करत नव्हता. त्या चित्रपटातली बाकीची गाणी झाली होती. पण एक मुख्य गाणं - अहिरभैरव या रागावर आधारीत - पुछो ना कैसे मैने रैन बितायी - हे रेकॉर्ड होण्याचे बाकी होते. या गाण्यासाठी संगितकार दादा बर्मन यांना माझाच आवाज वापरायचा होता. आणि माझा गळा काही ठिक होत नव्हता. दिवस वाया जात होते. मी माझी असमर्थता दादांना सांगून पाहीली आणि वेगळा गायक घेण्याचे सुचवले. पण तेही हटूनच बसले होते. शेवटी हो-नाही करत एके दिवशी रेकॉर्डींग ठरले. फायनल टेकच्या वेळेला पहीलं कडवं व्यवस्थित झाल्यावर एके ठिकाणी माझा आवाज तुटला (चिरकला). त्या वेळेला आजच्या सारखं ट्रॅक रेकॉर्डींगची सोय नव्हती. चुकलं की पुर्ण गाणं परत रेकॉर्ड करावं लागे. मी दादांकडे बघीतलं. त्यांनी नजरेनेच मला "चालू राहू दे" असा ईशारा केला. रेकॉर्डींग झालं. मी हळूच दादांना विचारलं - म्ह्टलं दादा ! एका ठिकाणी माझा आवाज फाटलाय ! आपण पुन्हा रेकॉर्ड करू या का ? ते म्हणाले - नको ! उलट मला या जागी हेच अपेक्षित होतं ! याचं कारण चित्रपटात हे दृष्य अशा वेळेला आहे की नायक अतिशय हताश मनःस्थितीत आहे. तो शास्त्रीय गायक आहे. पण या वेळेला अतिशय उदास आहे, जगण्याला कंटाळलेला आहे. अशा परिस्थितीत अगदी परफेक्ट गाणे अपेक्षित नाही. उलट मी सांगूनही कदाचित नेहमीच्या वेळेला तुला हा ईफेक्ट देता आला नसता जो तुझ्या या फाटलेल्या आवाजाने दिला आहे.

मन्नादांबद्द्ल लिहीण्यासारखं खुप आहे ! पण वेळेअभावी आता थांबतो ! मा.बो. कर रसिक भर टाकतीलच म्हणा ! Happy

गुलमोहर: 

आज सकाळीच युट्युबवर काला पानी मधलं सांझ ढली बघत/ऐकत होतो. मन्ना डे यांनी सुद्धा अगदी देव स्वत:च गातोय असं वाटावं असा चमत्कार केला आहे Happy

पण त्यातही मी नायकाचा आवाज - म्हणजे ती जुगलबंदी मी जिंकतो असं दाखवायचं होतं ! आणि हे मला मान्य नव्हतं ! पण शेवटी एकदाचा सुवर्णमध्य निघाला आणि ते गाणं रेकॉर्ड झालं !>>>>>>>>

संगीताशी, कलेशी इतका प्रामाणिक असलेल्या कलावंताच्या पदरी अशी उपेक्षा यावी हे खरेतर आपलेच दुर्भाग्य आहे. Sad
लेखातल्या प्रत्येक शब्दाशी सहमत ! सुंदर झालाय लेख...., धन्यवाद !
मन्नादांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा Happy

थांबलात का ? माझे अत्यंत आवडते गायक. त्यांनी गायलेली बहुतेक गाणी माझ्या
संग्रहात आहेत.
वर उल्लेख न झालेली काही गाणी :-
१) रितू आये रितू जाये सखी री मनके मीत न आये
२) गोरी तोरी पैंजनीया
३) गोरी तोरी बांकी हाये हाये राम
४) ए मेरे प्यारे वतन
५) ना तो कारवाँ कि तलाश है
६) चांदी का बदन
७) आयो कहासे घनश्याम
८) आज नाच रे मोरा
९) मयूरपंखी रे सपने
१०) वो राही गया अंधियारा
११) तूमबीन जीवन कैसा जीवन
१२) फिर कही कोई फूल खिला
१३) सप्त्सूरन तीनक्राम गाये सब मुनीजन
१४) सुध बिसर गयी आज
१५) दिल का हाल सुने दिलवाला
१६) ए भाय जरा देखके चलो
१७) जीवनसे लंबे है बंधू
१८) रे मन सूर मे गा
१९) लपक झपक तू आ रे बदरीया
२०) तू छुपी है कहा
२१) गुरुर ब्रम्हा, गुरुर विष्णू
२२) चुनरी संभाल गोरी
२३) अपनी कहानी छोड जा
२४) साजन कि हो गयी गोरी
२५) आन मिलो आन मिलो शाम सावरे
२६) श्याम ढले जमूना किनारे
२७) दिल कि गिरह खोल दो

मन्ना डे ह्यांच्या लेजंडस हा ५ कॅसेटचा संग्रह माझ्या पदरी आहे त्यात त्यांची सगळीच गाजलेली गाणी आहेत.

मंदार, विशाल, विदिपा - धन्यवाद !
@ दिनेशदा - मस्त लिस्ट आहे !

आणखी एक खंत आहे (मला) - नौशादजी आणि मन्नादा - दोघांचाही ओढा शास्त्रिय संगिताकडे जास्त. तरीही या जोडीची गाणी अक्षरशः हाताच्या बोटावर मोजण्याईतकी. हे आपणा रसिकांचे दुर्दैव आहे ! बैजू बावरा साठी रफीला नौशादजींनी वापरल्यावर शंकर-जयकिशन यांनी बसंत-बहार साठी मुद्दाम मुख्य आवाज म्हणून मन्नादांना वापरलं होतं.

नौशादच्या बाबतीत तसे रफी उपलब्ध असल्यामुळे झाले असावे. नौशादचे आत्मचरीत्र मी वाचले आहे त्यामुळे रफीचे त्यांच्याशी कसे ऋणानुबंध होते हे विस्ताराने त्यात आले आहे जे पटले आहे.

मन्नाडे उपेक्षित राहिले हे मात्र पटले नाही शैलेंद्र

नुसती लोकप्रियता आणि शासकिय मान-मरातब हे खर्‍या कलाकारासाठी फार विचार करण्यासारखी गोष्ट नसते. जे केलं त्यापेक्षा कितीतरी जास्त करता आलं असतं ही खंत त्यांनी स्वतः बोलून दाखवली आहे.

वा! सुंदर लेख!
मन्नादांचा मी देखिल निस्सीम चाहता आहे...त्यांची काही गाणी तर मला नेहमीच खुणावत असतात....त्यातलं एक म्हणजे जिद्दीतलं..मेहमूदच्या तोंडी असलेलं...प्यार की आगमें तनबदन जल गया.
दुसरं म्हणजे..सूर ना सझे क्या गाऊ मै.
अजून अशी कितीतरी सुरेल आणि मधुर गाणी मन्नादांनी गायलेत की जी गाणी अजरामर आहेत.

तो कॅलिबरचा प्रश्न आहे.

पोटेन्शियल किती वापरले गेले ह्याबद्दल मन्नाडेंची खंत असावे असे वाटते. कमी पडले असे वाटले असल्यास त्यांनी क्लासिकलचे कॉन्सर्ट करायला हवे होते असे वाटले. माझ्या मते केवळ रीयाजानेसुद्धा संगीतक्षेत्राला योगदान देत असल्याचा फील येत असतो.

पोटेन्शियल किती वापरले गेले ह्याबद्दल मन्नाडेंची खंत असावे असे वाटते. कमी पडले असे वाटले असल्यास त्यांनी क्लासिकलचे कॉन्सर्ट करायला हवे होते असे वाटले.>>>
मला वाटते वरच्या प्रतिसादात टवाळने तेच सांगितले आहे. <<जे केलं त्यापेक्षा कितीतरी जास्त करता आलं असतं >>>
म्युझिकल कॉन्सर्ट्स आणि चित्रपटसंगीत यात खुप फरक आहे विदीपा. चित्रपटसंगीताच्या माध्यमातून जितक्या कमी वेळात, जितक्या जास्त लोकांपर्यंत पोचता येतं तितकं एक्स्पोजर कॉन्सर्टस्मधुन नाही मिळत, निदान त्या काळी तरी ते खुप सिमित होतं, आता काळ बदलला आहे, आजचे गायक चित्रपटापेक्षा अशी कॉन्सर्टस, स्टेजशोजमध्येच जास्त पाहायला मिळतात. पण मन्नादांची खंत अशी आहे की त्यांच्याकडे गुणवत्ता आहे हे माहिती असुन, त्याची खात्री असुनही तीचा फारसा वापर करुन घेतला गेला नाही.

मन्नादा - प्रत्येक गाणं जीव ओतून गायलेत अगदी.
अतिशय उच्च कोटीतील गायक.
लेख सुंदरच.
वक्तमधील - "ओ मेरी जोहरा जबी....." हे गाणेही सुंदरच.

वक्तमधील - "ओ मेरी जोहरा जबी....." हे गाणेही सुंदरच

अरे हो ! एक दुर्दैवी योग असा की काल मन्नादांच्या वाढदिवसाच्या आदल्याच संध्याकाळी " ऐ मेरी जोहराजबी" असं जिला उद्देशून बलराज सहानी पडद्यावर म्हणतात त्या अचला सचदेव यांच निधन झालं ! Sad

क्या बात है!!! सुरेख लेख Happy
मन्ना डे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
त्यांना उदंड आयुष्य लाभो ही देवाकडे प्रार्थना >>>>+१

"तेरे नैना तलाश करे ...." आवडत्या गाण्यापैकी एक. Happy

तू है मेरा प्रेमदेवता चा उल्लेख अजून कुणीच केलेला दिसत नाहीये

हा काय ! तुम्ही केलात ना ! Happy
तसा तर "भय भंजना"चा पण केला नाहीये ! तसंच उपकार मधलं "कस्मे वादे प्यार वफा", जंजीर मधलं "यारी है ईमान मेरा" पण राहीलय ! खुप राहीलय अजून ! येतील हळू हळू ! Happy

हरिवंशराय बच्चन यांची संपुर्ण "मधुशाला" - संगित जयदेव ! केवळ अविस्मरणीय ! कुणाकडे उपलब्ध असेल तर कृपया देणे !

छान लेख टवाळ!

>> आर्.के. कँप सोडला तर मुकेशचा सर्वात जास्त वापर कल्याणजी आनंदजींनी केला.
सलीलने पण केला रे!

>> पण त्यातही मी नायकाचा आवाज - म्हणजे ती जुगलबंदी मी जिंकतो असं दाखवायचं होतं ! आणि हे मला मान्य नव्हतं !
'एक चतुर नार' च्या वेळेस किशोर जुगलबंदी जिंकतो (त्याला शास्त्रीय संगीत येत नसून) असं दाखवलेलं त्याला पटलं नव्हतं असं ऐकून आहे.

त्याचं 'तेरे नैना तलाश कर' माझं सर्वात आवडतं गाणं!

मधुशाला कॅसेट स्वरूपात

१. अमिताभच्या आवाजात

२. मन्नादांच्या आवाजात

माझ्याकडे उपलब्ध आहे.

फार मस्त लेख. ते उपेक्षित रहिले कारण त्यांच मार्केटींग कमी पडलं. चित्रपट स्रुश्टी ही अशी जागा आहे की जिथे ठाई ठाई मार्केटींग ची गरज पडतेच. आता असे अनेक गुणी कलाकार आहेत ज्यांची इकडे उपेक्षा झालेली दिसते. उदा. सुमन कल्याणपुर, वाणी जयराम, खय्याम, जयदेव ....

छान लेख. मन्ना डें बद्दल वाचुन मस्त वाटलं. माहिती बद्दल धन्यवाद.
त्यांच्या अनेक पंख्यांपैकी मी पण एक आहे. लहानपणी कधीतरी त्यांचं "कस्मे वादे प्यार वफा सब" ऐकलं आणि कानात घट्ट बसलं. आजही ते गाणं ऐकताना मी हरवून जातो. त्यांच्या एवढा स्पष्ट आणि शुद्ध सूर लावणारा गायक दुर्मिळच. 'घन घन माला' त्यांनी म्हटलं आहे हे आजच कळालं. सलाम त्या गायनाला.

लेख आवडला ! ' तेरे नैना तलाश करे ' माझंही आवडतं. पैगाम मधील ' इन्सान का इन्सान से हो भाईचारा ' हे अजून एक लिस्टमधे.

अत्यंत समयोचित आणि तितकाच भावुकपणे उतरलेला हा लेख वाचताना माझे कॉलेजचे ते दिवस आठवले ज्यावेळी रंकाळा तलावाशेजारील बागेत आम्ही मित्र रफीपेक्षा तलत किती श्रेष्ठ वा जगजीत कौरच्या "तुम अपना रंजोगम अपनी परेशानी मुझे दे दो' या गाण्यापेक्षा मुबारक बेगमच्या '....कभी तनहाईयोमे हमारी याद आयेगी' मध्ये किती दर्द आहे यावर चर्चा रंगायच्या. अशावेळी कुणीतरी मन्नादाच्या {तो मन्ना डे असे म्हणत नसे....'मन्नादा मध्ये आपुलकी आहे..' असे त्याचे सार्थ मत !} "आविष्कार" मधील "हसने की चाह ने इतना मुझे रुलाया है, कोई हमदर्द नही दर्दही मेरा साया है !"......या हळुवार गाण्याने चर्चेला एक वेगळाच आयाम देत असे.

"मन्ना डे यांच्यावर अन्याय झाला, ते उपेक्षित राहिले...." या कथांवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. हिंदी चित्रपटसृष्टी ही एक मायावी नगरी असल्याने ज्याच्या त्याच्या वाट्याला जितके तांदूळ येतील तितकीच त्याची मिळकत असे म्हणणे क्रमप्राप्त आहे. "लता आशामुळे सुमन मुबारक शमशाद ह्या मागे पडल्या" या रडकथेला आपण महाराष्ट्रीयन लोक कधीच किंमत देत नाही, तद्वतच किशोरमुळे रफीला काम मिळू शकले नाही अशाही चर्चा आपण ऐकत असतोच. तलतवर तर या विषयाबाबतीत शेकडो पाने लिहिली गेली असतील. हा एक छंद असतो कित्येकांचा.

मन्ना डे याना जितक्या संधी मिळाल्या तितक्यांचे त्यानी सोने केले ही एकच बाब वादातीत मानली तर त्यांच्या कारकिर्दीचे ते एक योग्य असे विश्लेषण होईल.

सुंदर अशा लेखाबद्दल श्री.शैलेन्द्र यांचे अभिनंदन.

अशोक पाटील

Pages