भारताची 'अग्नि'परिक्षा भाग-१

Submitted by sudhirkale42 on 1 May, 2012 - 23:57

भारताची "अग्नि"परिक्षा (भाग-१)
मूळ लेखक: रॉबर्ट काप्लान
स्वैर अनुवाद: सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)

१९ एप्रिल रोजी भारताने लांब पल्ल्याच्या प्रक्षेपणास्त्राची यशस्वी चांचणी करून सध्याच्या सुरक्षा परिषदेतील इतर सभासदांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्या "पंक्ती"ला बसायचा सन्मान मिळविला! अशी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे बनविण्याची क्षमता फक्त पाचच राष्ट्रात आजपर्यंत होती: अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, आणि चीन. आता आपण सहावे असे राष्ट्र झालेलो आहोत. (शिवाय नेहमीप्रमाणे "इस्रायल" हे नांव कंसात असतेच, खरे-खोटे देव जाणे!)

परवा यशस्वी चांचणी केलेले प्रक्षेपणास्त्राला अग्नि-५ या नावाने ओळखले जाते! या आधी आग्नि-१ ते अग्नि-४ अशा संज्ञांच्या चार प्रक्षेपणास्त्रांची चांचणी करण्यात आलेली आहे. या सर्व प्रकारच्या प्रक्षेपणास्त्रांची थोडक्यात माहिती या लेखाच्या दुसर्‍या भागात तक्ता-१ मध्ये दिलेली असून विस्तृत माहितीसाठीचे दुवे तक्ता-२ खाली दिलेले आहेत.

या यशस्वी चांचणीवर अनेक देशांच्या सरकारांतर्फे तसेच प्रसारमाध्यमांतर्फे वेगवेगळ्या प्रतिक्रिया प्रसिद्ध झाल्या. त्यापैकी Stratfor या नियतकालिकातील भारत चीन यांच्यातील कडवी स्पर्धा हा रॉबर्ट काप्लान यांचा लेख उल्लेखनीय वाटला म्हणून त्या लेखाचा स्वैर अनुवाद खाली देत आहे.

चीनच्या बीजिंग व शांघाई शहरावर अण्वस्त्र हल्ला करू शकणार्‍या आपल्या लांब पल्ल्याच्या अग्नि-५ या प्रक्षेपणास्त्राच्या भारताच्या यशस्वी चांचणीनंतर भारत व चीन यांच्यामधील एक नवी सत्तास्पर्धा प्रकाशझोतात आलेली आहे. हे दोन देश एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि संपन्न संस्कृती या दृष्टीने आशिया खंडातील प्रमुख देश आहेत.

ही स्पर्धा केवळ अत्युच्च तंत्रज्ञान आणि भौगोलिक राजकारणावर (geopolitical) आधारित असून त्यातून या दोन महासत्तांमधील स्पर्धेत पायाभूत विसंगती आहे हे दिसून येते. आजवर या दोन मोठ्या राष्ट्रांच्या भौगोलिक विस्ताराच्या सीमा कधीच एकमेकांना ओलांडत नव्हत्या किंवा त्यांच्यात कुठल्याही तर्‍हेचा वाद नव्हता. ५० वर्षांपूर्वी हिमालयाच्या सीमारेषेवर मर्यादित लढाई झाली असली तरी तिच्यामागे पूर्वापार चालत आलेला ऐतिहासिक किंवा वांशिक खुन्नस नव्हता.

भारत आणि चीन यांच्यामधील भौगोलिकदृष्ट्या लक्षवेधक गोष्ट म्हणजे त्यांच्यामधील हिमालयाची अभेद्य भिंत! बुद्ध धर्माचा प्रसार जरी भारतामधून चीनमध्ये झालेला असला तरी तो श्रीलंका व म्यांमारमार्गे दक्षिण चीनच्या युनान प्रांतामधून झाला. (नकाशा पहा) एरवी या दोन देशात सांस्कृतिक अशी देवाणघेवाण अपवादानेच झालेली आहे.

Map of Tibet, India & China-01.JPG

पश्चिमेकडील काश्मीरपासून ते पूर्वेकडील अरुणाचलप्रदेशपर्यंतच्या सीमा आखणीवरून दोन्ही देशात तणाव असला तरी या नव्याने सुरू झालेल्या स्पर्धेच्या मुळाशी हा सीमावाद आहे असे वाटत नाहीं. या नव्या स्पर्धेच्या कारणाचे मूळ आहे शस्त्रास्त्रांबाबतच्या नव्या तंत्रज्ञानामुळे या दोन देशांतील प्रत्यक्ष अंतर बदलले नसले तरी "परिणामकारक" अंतर अचानक कमी झाले हे आहे.

तिबेटच्या विमानतळावरील चिनी लढाऊ जेट विमाने भारतावर हल्ले करू शकतात हे खरेच आहे. भारतीय उपग्रहसुद्धा अंतराळातून चीनवर पाळत ठेऊन असतात. या खेरीज हिंदी महासागरात चीन अनेक ठिकाणी अद्ययावत बंदरे विकसित करीत असताना भारत आपल्या नौदलाच्या लढाऊ नौका दक्षिण चिनी समुद्रात पाठवू लागला आहे. म्हणजेच भारत व चीन एकमेकांचे दक्षतापूर्वक निरीक्षण करीत आहेत.दिल्ली आणि बीजिंग येथील युद्धाचे डावपेच आखणारे विशेषज्ञ आता संपूर्ण आशियाखंडाचे नकाशे उलगडून बसले आहेत. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आणि वेगात लष्करीकरण करत असलेले हे दोन आशियाई देश एकमेकांच्या प्रभावक्षेत्रांवर अतिक्रमण करीत आहेत हे अगदी स्पष्टपणे दिसत आहे. आणि ही प्रभावक्षेत्रे पूर्वी कधीही नव्हती इतकी आता स्पष्ट, रेखीवपणे दिसू लागली आहेत.

केनया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि म्यांमार येथील बंदरविकासाच्या प्रकल्पांतून चीनच्या आर्थिक प्रभावक्षेत्राची होत असलेली वाढ त्या देशाच्या हिंदी महासागर क्षेत्रातल्या वाढत्या प्रभावाची द्योतक आहे आणि याचीही भारताला चिंता आहे.

ही तेढ त्यांच्या प्रचंड लोकसंख्येमुळे आणि युरोप-आशियाच्या नकाशावरील त्यांच्या परस्पर भौगिलिक स्थानामुळे निर्माण झालेली असून त्यात भावनेच्या पोटतिडिकेचा लवलेशही नाहीं. या दृष्टिकोनातून पाहिल्यास भारत-चीन स्पर्धेची तूलना अमेरिका-रशियाच्या शीतयुद्धकालीन भावनारहित स्पर्धेशी करता येईल.

भारत-चीनमधील त्यामानाने काबूत ठेवलेल्या स्पर्धेबद्दलचे निराळेपण तिची तूलना भारत-पाकिस्तान स्पर्धेबरोबर केल्यास लक्षात येईल. भारतातील भरपूर लोकसंख्या असलेले गंगा नदीचे खोरे पाकिस्तानच्या भरपूर लोकसंख्या असलेल्या सिंधू नदीच्या खोर्‍यापासून केवळ ५०० किमीवर आहे. अशा तर्‍हेची जी भौगोलिक जवळीक भारत-पाकिस्तान स्पर्धेत दिसते ती भारत-चीन स्पर्धेत नाहीं. धार्मिक घटकामुळे जणू भारत-पाकिस्तान स्पर्धेच्या आगीत तेल घातल्यासारखे होते. उत्तर भारताच्या इतिहासातील भारतावर केलेल्या मुस्लिम चढायांतून पाकिस्तानचा एका आधुनिक अवताराच्या रूपात पुनर्जन्म झालेला आहे असा समज पाकिस्तानात आहे. त्यात भारतीय उपखंडाच्या फाळणीच्यावेळी झालेल्या रक्तपातामुळे ही स्पर्धा आणखीच उत्कट आणि भावनावश बनली आहे.

भारत-चीन स्पर्धेत अशा तर्‍हेची अनेक शतके चाललेली भावनोत्कटता नसल्यामुळे या स्पर्धेमुळे धोरण आखणारे दिल्लीतील उच्चभ्रू लोक एका बाजूने खुष आहेत कारण चीनसारख्या एक महाशक्ती बनण्याच्या मार्गावर असलेल्या राष्ट्राबरोबर भारताची तूलना करण्यात येऊ लागल्यामुळे भारताची शान वाढली आहे असे त्यांना वाटते. आधी भारताबरोबर नेहमी दरिद्री आणि अराजकतेने बजबजलेल्या पाकिस्तानचे नाव जोडलेले असायचे. भारतीय उच्चभ्रूंच्या मनात चीनबद्दल झपाटल्याची भावना आहे. त्या मानाने चीनच्या उच्चभ्रूंना भारताचे इतके महत्व वाटत नाहीं. हे सहाजीकही आहे कारण ही स्पर्धा दोन तोडीच्या राष्ट्रांमधील स्पर्धा आहे व त्यात कमी ताकतीच्या राष्ट्राला बलवान राष्ट्राबद्दल झापटल्यासारखे वाटतेच. ग्रीस व तुर्कस्तानमध्ये अशाच तर्‍हेची असमान स्पर्धा आहे.

भारताच्या संदर्भात चीनची स्वाभाविक, अंगभूत ताकत ही केवळ चीनची भक्कम आर्थिक कुवत किंवा जास्त कार्यक्षम चिनी सरकार नसून त्यात भूगोलाचाही अंतर्भाव होतो. वंशाने "हान" जातीची बहुसंख्य चिनी प्रजा चीनच्या शुष्क पठारी भागात वसलेल्या आणि "हान" नसलेल्या अल्पसंख्य चिनी प्रजेने वेढलेली आहे. त्यात आतला (Inner) मंगोलिया, उइघूर तुर्क आणि तिबेट येथील जनतेचा समावेश होतो. त्याचबरोबर चीन सध्या आपल्या सीमेवरील त्याला धोकादायक वाटणार्‍या राष्ट्रांबरोबरचे तंटे सोडविण्याच्या मागे आहे आणि म्हणूनच चिनी सरकारने अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेवर नियंत्रण रहावे म्हणून या (हान नसलेल्या) अल्पसंख्यांकाना चीनमध्ये सामावून घेतले आहे.

या उलट केवळ अस्थिर, अस्वस्थ पाकिस्तानच नव्हे तर नेपाळ, बांगलादेश यासारख्या कमजोर राष्ट्रांबरोबरच्या खूप लांबीच्या आणि असुरक्षित अशा सीमांचा भारताला उपद्रव आहे. कारण या राष्ट्रांकडून भारताला निर्वासितांच्या रूपाने उपद्रव होतो. या खेरीज पूर्व आणि मध्य भारतात माओवादी नक्षली बंडाळीची डोकेदुखीही आहेच. परिणामत: भारत आपल्या नौसेनेद्वारे हिंदी महासागरात जरी आपल्या शक्तीचे प्रदर्शन करत असला व चीनविरुद्ध एक तर्‍हेची तटबंदी उभी करत असला तरी भारतीय लष्कराला वर उल्लेखलेल्या देशांबरोबरच अंतर्गत समस्यांमुळे एक तर्‍हेची बंधने आहेतच.

नेपाळ, बांगलादेश, म्यांमार आणि श्रीलंका या देशावरील प्रभावासाठी चीन आणि भारत आपापसात एक प्रकारे खेळत असतातच. तसे पाहिल्यास हे सर्व देश भारतीय उपखंडात मोडतात म्हणजेच चीन आपला संघर्ष भारताच्या अंगणात आणू पहात आहे.

अफगाणिस्तानचे भवितव्य ज्याप्रमाणे भारताच्या दृष्टीने एक निर्णायक कसोटी ठरणार आहे त्याचप्रमाणे उत्तर कोरियाचे भवितव्य हे चीनसाठी निर्णायक कसोटी ठरणार आहे. हे दोन्ही देश भारताच्या आणि चीनच्या शक्तीला आणि साधनसंपत्तीला एक प्रकारची सततची गळतीच आहेत. पण इथे भारताची अफगाणिस्तानबरोबर सीमा नसल्यामुळे तो सुदैवी आहे. या उलट चीन आणि उत्तर कोरिया यांच्यात सामायिक सीमारेषा आहे. अमेरिकेने सैन्य बाहेर काढल्यावर जो हलकल्लोळ अफगाणिस्तानात माजेल त्याचा भारतावर कमी परिणाम होईल पण उत्तर कोरियाच्या सत्तेचा गुंता सोडविताना चीनवर प्रचंड परिणाम होईल कारण कोट्यावधी निर्वासित चीनच्या मांचूरिया भागात घुसण्याची शक्यता आहे.

२०३०च्या सुमारास भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त होईल पण भारतीय लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण चीनपेक्षा जास्त असेल. त्यामुळे भारताचे भवितव्य जास्त उज्ज्वल वाटते. भारताची लोकशाही कितीही अकार्यक्षम असली तरी तिला मूलभूत कायदेशीर "औरसपणा"च्या समस्येला तोंड द्यावे लागत नाहीं. पण चिनी सरकार हुकुमशाही मार्गाने सत्तेवर आलेले असल्यामुळे चीनला औरसपणाच्या मूलभूत समस्यांना तोड द्यावे लागू शकेल.

शेवटी प्रश्न रहातो तिबेटचा. भारत आणि चीन यांच्यातील टक्कर हिमालय पर्वताच्या सीमेवर भिडली आहे व त्यात तिबेट भारतीय उपखंडाच्या सीमेवर एकाद्या धक्काशोषकासारखा (buffer, shock-absorber) उभा आहे. त्याचा भौगोलिक फायदा भारताला मिळतो.

चीनचा तिबेटवरील प्रभाव कमी झाल्यास त्याचा भौगिलिक आणि राजकीय फायदा भारताला मिळेल. भारताने तिबेटच्या दलाई लामाला राजाश्रय दिलेला आहे. तिबेटमधील चीनविरोधी उघड असंतोष चीनच्या दृष्टीने गैरसोयीचा आहे तर त्याचा भारताला फायदा आहे. जर चीनला तिबेटमध्ये गंभीर उठावाला तोंड द्यावे लागले तर भारताचा तेथील प्रभाव दिसू येण्याइतका सुधारेल. थोडक्यात चीन आज जरी जास्त मोठी सत्ता वाटत असला तरी या स्पर्धेत भारताच्या बाजूनेसुद्धा अनेक अनुकूल घटक आहेत.

भारत आणि अमेरिका आज औपचारिक रीत्या मित्रराष्ट्रे नाहींत. समाजवादकडे झुकणारे आणि राष्ट्रवादी असलेले भारतीय राजकीय नेतृत्व असे कधीही होऊ देणार नाहीं. पण युरोप आणि आशियाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या हिंदी महासागराच्या किनार्‍यावरील भारताच्या स्थानामुळे भारताची लष्करी आणि आर्थिक वाढ अमेरिकेच्या दृष्टीने फायद्याची ठरते कारण भारत चीनला प्रतिशह देऊ शकतो. आज अमेरिका पश्चिम गोलार्धात एक प्रभावी महासत्ता आहे आणि म्हणूनच पूर्व गोलार्धात दुसर्‍या एकाद्या महासत्तेचा उदय तिला नको आहे. भारत चीनला तोडीस तोड बनल्यास एक जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या डोक्यावरील बोजा कमी होईल व ही एक भारत-चीन स्पर्धेतील जमेची गोष्ट आहे! (पुढील मजकूर भाग-२ मध्ये दिलेला आहे.)

Stratforवर प्रसिद्ध झालेला मूळ इंग्लिश लेख खालील दुव्यावर वाचता येईल:
http://www.stratfor.com/analysis/india-china-rivalry-robert-d-kaplan?utm...

गुलमोहर: 

भारताच्या बीजिंग व शांघाई शहरावर अण्वस्त्र हल्ला करू शकणार्‍या आपल्या लांब पल्ल्याच्या अग्नि-५ या प्रक्षेपणास्त्राच्या यशस्वी चांचणीनंतर भारत व चीन यांच्यामधील एक नवी सत्तास्पर्धा प्रकाशझोतात आलेली आहे. हे दोन देश एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि संपन्न संस्कृती या दृष्टीने आशिया खंडातील प्रमुख देश आहेत.
>>>> पहिला शब्द चुकलाय.. Happy पुढे वाचतो.. Happy

चीनचा तिबेटवरील प्रभाव कमी झाल्यास त्याचा भौगिलिक आणि राजकीय फायदा भारताला मिळेल.
---- हा प्रभाव कमी कसा होणार ? दिवसंदिवस तो वाढतोच आहे. चिन त्यांच्या नागरिकांची (बहुतांश सेवानिवृत्त लष्कर) वसाहत तेथे अत्यंत योजनाबद्ध रितीने (mass settlement) वसवत आहे (असे माझे वाचन सांगते). वाढत जाणारी % गंभीर आहे... सरकारी चिन माध्यमे तेथे ३० लाख संख्या आहे आणि त्यात ९० % तिबेटी आहेत असे सांगते तर तिबेटी लोकांच्या मते ७५ लाख चिनी आणि ६० लाख तिबेटी असे प्रमाण आहे. आकडेवारीत खुप विरोधाभास आहे. १९५० आणि आजचे % मला बघायला आवडेल. दिवसंदिवस चिन ची तिबेटवरची पोलादी पकड मजबुतच होत आहे. काही काळानंतर तिबेट मधे तिबेटी अल्पसंख्य असतील.... तुलना केल्याशिवाय रहावत नाही, काश्मीर मधे उर्वरित भारताचे नागरिक कायम वस्ती करु शकत नाही, त्यांना जागाही विकत घेता येत नाहे. केवळ लष्करी जवान तेथे त्यांच्या कामाच्या संदर्भात काही काळ रहातात. सेटलमेंटचा प्रवाह आपल्याकडे उलट दिशेने वहातो आहे, मुळ काश्मीर मधे असणारे हिंदू, शिख यांना तेथुन बाहेर पडावे लागते.

भारताने तिबेटच्या दलाई लामाला राजाश्रय दिलेला आहे. तिबेटमधील चीनविरोधी उघड असंतोष चीनच्या दृष्टीने गैरसोयीचा आहे तर त्याचा भारताला फायदा आहे. जर चीनला तिबेटमध्ये गंभीर उठावाला तोंड द्यावे लागले तर भारताचा तेथील प्रभाव दिसू येण्याइतका सुधारेल.
----- सर्व जगात दलाई लामा यांना अत्यंत आदराचे आहे आणि तिबेटी जनता अत्यंत अहिंसक आहे... . असा उठाव ते करतीलही.... पण समोर चिन आहे. अस्तित्व टिकवण्यासाठी चिन स्वतःच्या नागरिकांवर (तिआनमेन १९८९) लष्करी रणगाडे चालवुन चिरडण्यात काहीच गैर समजत नाही.

काळे साहेब,
अग्नि ५ वर काही तरी लिखाणाची तुमच्या कडुन वाट पाहतच होतो.

Inter Continental Ballistic Missile उत्पादन करणार्‍या काही मोजक्या राष्ट्रां मध्ये आता हिंदुस्थान ची गणना होईल, ही खरंच कौतुकास्पद बाब आहे.

अग्नि ५, मित्र राष्ट्रांना सहाय्य करु शकणार का, ह्या विषयी हिंदुस्थान सरकार चे काय धोरण असेल, त्यातुन हिंदुस्थान आपले इप्सित साध्य करु शकेल काय ह्यावर जरूर भाष्या करावे.

अग्नि ६ with a range of 10000Kms is in the making. ह्या विषयी ही तुमच्या कडुन ऐकायला आवडेल.

<<< ही स्पर्धा केवळ अत्युच्च तंत्रज्ञान आणि भौगोलिक राजकारणावर (geopolitical) आधारित असून त्यातून या दोन महासत्तांमधील स्पर्धेत पायाभूत विसंगती आहे हे दिसून येते. आजवर या दोन मोठ्या राष्ट्रांच्या भौगोलिक विस्ताराच्या सीमा कधीच एकमेकांना ओलांडत नव्हत्या किंवा त्यांच्यात कुठल्याही तर्‍हेचा वाद नव्हता. ५० वर्षांपूर्वी हिमालयाच्या सीमारेषेवर मर्यादित लढाई झाली असली तरी तिच्यामागे पूर्वापार चालत आलेला ऐतिहासिक किंवा वांशिक खुन्नस नव्हता.>>>>

भारताच्या अग्नि ५ च्या परीक्षणा नतंर चिनने दाखवलेल्या Nervousness व त्याबरोबर चिनच्या
वक्तव्याने अग्नि प्रक्षेपणास्त्रा बद्द्ल चिनची मानसिकता जगा समोर आली. सहसा चिनच्या तोंडातुन
इतक्या सहजतेने प्रतिक्रीया येत नाही.

भारताच्या अग्नि ५ बद्द्ल अस काय आहे कि चिनला काळजी वाटावी ?

अग्नि ५ प्रक्षेपणास्त्र एका वेळी एका पेक्षा जास्त अण्वस्त्र वाहुन नेऊ शकते.
असे नेलेले अनेक अण्वस्त्र रस्त्यात एका पेक्षा जास्त Target वर टाकु शकते. एका Target वर
एका पेक्षा जास्त अण्वस्त्र टाकू शकते.

अशा अग्नि ५ प्रक्षेपणास्त्र ला प्रती प्रक्षेपणाने मारुन / ऊडवून टाकता येत नाही.

अग्नि ५ प्रक्षेपणास्त्र दुसर्या प्रहाराला फारच उपयुक्त आहे. भारताने अण्व स्त्रा बाबत
NO FIRST USE ची बंधन स्वता: घालुन घेतलीत. त्यामुळे दुसर्या प्रहाराला जास्त महत्व आहे.

अग्नि ५ प्रक्षेपणास्त्र हे स्पेशल अशा साठी आहे,

अशा अग्नि ५ प्रक्षेपणास्त्र भारताला देऊ न भारता ला महा बलाढ्य शक्ती बरोबर ऊभ केल्याबद्दल
DRDO ला शतशः आभार !!

उदय-जी,
मी मध्यंतरी हेन्री किसिंजर यांचे "On China" हे पुस्तक वाचायला सुरुवात केली होती त्यात अगदी सुरुवातीलाच त्यांनी लिहिले आहे कीं चीनवर राज्य कुणाचेही असो, पण त्यांची धोरणे फारच योजनाबद्ध पद्धतीने आणि दूरदर्शीपणे आखलेली असतात व ती कधीच बदलत नाहींत व त्यामुळे हळू-हळू, कासवाच्या गतीने चीन आपले धोरण यशस्वी करू शकतो. या दृढ आणि एकजिनसी धोरणापुढे आपला कसा काय निभाव लागणार हा विचार माझ्याही मनात येतोच.
पण नुकताच बुद्ध भिक्षूंनी स्वतःला जाळून घेण्याच्या चळवळीने जेंव्हां जोर धरला तेंव्हां चिनी सरकारचे धाबे नक्कीच दणाणले होते यात संशय नाहीं.
काश्मीरमध्ये इतर भारतीयांना जागा विकत घ्यायला मनाई करणारा महामूर्ख कायदा नक्कीच आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेण्यातला प्रकार आहे.
पण चीनमध्ये हुकुमशाही किती वर्षें टिकेल? आज ना उद्या ती पडणारच. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात हुकुमशाहीला फारच मर्यादित, छोटे आयुष्य असते. हुकुमशाही पडेल व त्या जागी लोकशाही येईल तेंव्हां खूप मोठे बदल होतील.
माझ्या नशीबी हे पहाण्याचे भाग्य नक्कीच नाहीं पण आणखी ५० वर्षांनंतर परिस्थिती नक्कीच बदलेल.
भारताला आता आहे त्यापेक्षा चांगले नेतृत्व मात्र मिळायला हवे. म्हणजे शेवटी असे सरकार निवडण्याची जबाबदारी मतदार या नात्याने आपल्यावरच येणार!

नाईकसाहेब,
अग्नी प्रक्षेपणास्त्रांबद्दलची जास्त माहिती व आणखी कांहीं (चिनी) प्रतिक्रिया दुसर्‍या भागात आहेत.

सेनापतीसाहेब,
शब्द मागे-पुढे झाल्याने मोठीच चूक झाली होती. ती ध्यानात आणून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. चौथा परिच्छेद त्यानुसार बदलला आहे.

पश्चिमेकडील काश्मीरपासून ते पूर्वेकडील अरुणाचलप्रदेशपर्यंतच्या सीमा आखणीवरून दोन्ही देशात तणाव असला तरी या नव्याने सुरू झालेल्या स्पर्धेच्या मुळाशी हा सीमावाद आहे असे वाटत नाहीं.
या नव्या स्पर्धेच्या कारणाचे मूळ आहे शस्त्रास्त्रांबाबतच्या नव्या तंत्रज्ञानामुळे या दोन देशांतील प्रत्यक्ष अंतर बदलले नसले तरी "परिणामकारक" अंतर अचानक कमी झाले हे आहे.

ही दोन कांहींशी परस्परविरोधी वाक्ये खूप कांहीं सांगून जातात! कारण वादच नसेल तर अंतराला काय महत्व? पण लेखाचा मुख्य रोख मला आवडला व म्हणूनच हा लेख वापरायचे मी ठरविले.

कारण वादच नसेल तर अंतराला काय महत्व?
----- वाद नाही आहे हे मला मान्य होत नाही. माझी मुख्य अडचण अजुनही १९६२ चे युद्ध सुरु का झाले, कारणे काय होती, अचानक का थांबले या बाबत आजही भारताच्या जनतेला सत्य माहित नाही आहे. भारताच्या जनतेच्या मनात अविश्वास आहे.

भारत सरकारने १९६२ च्या युद्धाची चिकीत्सा करणारा ब्रुक्स हँडर्सन - भगत अहवाल आजतागायत गुप्त ठेवला आहे. युद्ध का छेडले गेले ह्याबाबतचे सत्य काय आहे हे भारताच्या जनतेला अजुनही का नाही सांगितले जात. असे त्या अहवालात काय आहे जे भारताच्या जनतेपासुन लपवले जाते? सत्य परिस्थिती समोर आली तर त्यात घडलेल्या त्रुटी टाळता येतील. पन्नास वर्षांनंतरही सत्य झाकुन ठेवले तर त्या चुकांतुन भावी पिढी काय शिकणार?
लष्कराच्या ६२ च्या हालचाली, व्युहरचना २०१२ मधे कशा काय अत्यंत गोपनीय राहू शकतात. हा अहवाल चिन कडे नसेल असे मानणे भाबडेपणा ठरेल.

अमेरिकेतही संरक्षण आणि पर-राष्ट्रा संबंधीत अत्यंत महत्वाची गुपिते (classified documents) काही काळानंतर (३० वर्षे?) एका विशिष्ट प्रक्रिये मधुन बाहेर पडुन जनतेसाठी प्रकाशित होतात.

भारताला आता आहे त्यापेक्षा चांगले नेतृत्व मात्र मिळायला हवे. म्हणजे शेवटी असे सरकार निवडण्याची जबाबदारी मतदार या नात्याने आपल्यावरच येणार!
------- दुसर्‍या वाक्याला जोरदार अनुमोदन...

यथा प्रजा तथा राजा... आणि लोकशाहीत राजा जा प्रजे मधुनच येतो. जनतेच्या पात्रतेनुसारच तिला नेतृत्व मिळणार, म्हणुन पात्रता उंचावणे हाच एकमेव आणि दुरागामी परिणाम साधणारा उपाय आहे. प्रजा शिकली, सुधरली, वैचारिक प्रगल्भ झाली तरच राजा सुधरणार.

१९६२ चे युद्ध सुरु का झाले याबद्दल हेन्री किसिंजर यांच्या On China या पुस्तकात सुरुवातीलाच एक परिच्छेद आहे. ते लिहितात कीं भारताच्या वाढत्या प्रतिष्ठेला आवर घालण्यासाठी त्याला एक झटका देणे हेच त्यामागचे माओ-त्से-तुंग यांचे उद्दिष्ट होते. ती लढाई Start-to-finish असे उद्दिष्ट पुढे ठेवून सुरू केलेली नव्हतीच. भारताला त्याची 'जागा' दाखवून दिल्यानंतर चीनने एकतर्फी युद्धबंदी जाहीर करून सैन्य मागे घेतले.

भारताला परत गेल्यावर मी हे पुस्तक वाचायला पुन्हा नव्याने सुरुवात करणार आहे. भाषा अतीशय बोजड असल्यामुळे ते फारच क्लिष्ट झाले आहे. पडून वाचल्यास लगेच झोप लागते Wink !!

आयडू,
जागा राहून मी ते पुस्तक पूर्ण वाचले तर नक्कीच मी त्यातील मनोरंजक भागाबद्दल लिहीन. पण ते लई बोरिंग पुस्तक आहे!