Submitted by सतीश देवपूरकर on 29 April, 2012 - 03:24
गझल
खळखळून हसलो नाही, मनमुराद रडलो नाही;
मी मनाप्रमाणे माझ्या केव्हाही जगलो नाही!
का माझ्यावरती कोणी ना उडवावे शिंतोडे?
नखशिखांत बदनामीने मी अजून भिजलो नाही!
ना कळे अशा मी कुठल्या मातीचा बनलो होतो;
मी कुठेच रुळलो नाही, मी कुठेच रुजलो नाही!
दररोज दिले दुनियेने दु:खांचे नवीन भारे;
दुनियाही दमली नाही, अन् मीही झुकलो नाही!
स्वाक्षरी बरोबर होती, तारीख बरोबर होती;
मी धनादेश खात्रीचा अन् अजून वटलो नाही!
ऎकून दाद जनतेची मज गझल म्हणाली माझी....
मी हृदयावरून गेलो, हृदयाला भिडलो नाही!
हृदयात जरी स्वप्नांचे पेटते निखारे होते;
मी धुमसत धुमसत जगलो, दिलखुलास फुललो नाही!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
गुलमोहर:
शेअर करा
दररोज दिले दुनियेने दु:खांचे
दररोज दिले दुनियेने दु:खांचे नवीन भारे;
दुनियाही दमली नाही, अन् मीही झुकलो नाही!
.....छाने..नै !!! अगदी बरोब्बर.....
खळखळून हसलो नाही, मनमुराद
खळखळून हसलो नाही, मनमुराद रडलो नाही;
मी मनाप्रमाणे माझ्या केव्हाही जगलो नाही!
वरील शेरात ''केव्हाही'' हे विशेषण अप्रस्तुत वाटत आहे.कधीच जगलो नाही अश्या अर्थाची रचना हवी. केव्हाही ऐवजी ''थोडेही'' जमून जाईल.
का माझ्यावरती कोणी ना उडवावे शिंतोडे?
नखशिखांत बदनामीने मी अजून भिजलो नाही!
शिंतोडे आणि भिजलो नाही या दोन शब्दांनी दोन्ही मिसर्यांत संबंध आणायचा प्रयत्न केला गेला आहे... परंतु '' मी नखशिखांत बदनामीने अजून भिजलो नाही त्यामुळे माझ्यावर कोणी शिंतोडे का उडवू नये'' अश्या खयालाचा हा शेर .... अजिबात भिडत नाही.
ना कळे अशा मी कुठल्या मातीचा बनलो होतो;
मी कुठेच रुळलो नाही, मी कुठेच रुजलो नाही!
सहसा हिंदीत ''किस मिट्टी का बना हुआ है '' वगैरे वापरले जाते.... शिवाय माती कुठे रुळत किंवा रुजत नसते.
दररोज दिले दुनियेने दु:खांचे नवीन भारे;
दुनियाही दमली नाही, अन् मीही झुकलो नाही!
वा!!! उत्तम शेर.
स्वाक्षरी बरोबर होती, तारीख बरोबर होती;
मी धनादेश खात्रीचा अन् अजून वटलो नाही!
छान....
ऎकून दाद जनतेची मज गझल म्हणाली माझी...
मी हृदयावरून गेलो, हृदयाला भिडलो नाही!
गझल स्त्रीलिंगी आहे,सबब, दुसरा मिसरा, '' मी हृदयावरुन गेले,हृदयाला भिडले नाही'' असा असायला हवा
हृदयात जरी स्वप्नांचे पेटते निखारे होते;
मी धुमसत धुमसत जगलो, दिलखुलास फुललो नाही!
ठीक ठाक.
चुभुद्याघ्या.
कैलासरावांशी सहमत. शिवाय
कैलासरावांशी सहमत.
शिवाय सर्वच शेर वर्णनात्मक असल्याने गझलेत बर्याच अंशी निर्जीवता असल्यासारखी वाटली.
शब्द आणि काफिये ह्यांच्या निवडीच्या जोरावर वाचकाला भुलवण्याची हातोटी मात्र उल्लेखनीय!
स्वाक्षरी बरोबर होती, तारीख
स्वाक्षरी बरोबर होती, तारीख बरोबर होती;
मी धनादेश खात्रीचा अन् अजून वटलो नाही! >> व्वा!
धनादेशाचा शेर छान आहे पण अजून
धनादेशाचा शेर छान आहे पण अजून तितका आवडला नाही म्हणजे अजून आवडेल असा झाला असता
खालील प्रकारे वाचून पाहाल का प्लीज ; त्यात कोणता बदल जास्त छान आहे ते प्लीज कळवा
स्वाक्षरी बरोबर होती, तारीख बरोबर होती;
मी धनादेश खात्रीचा अन् अजून वटलो नाही
किंवा
मी धनादेश खात्रीचा असुनीही वटलो नाही
किंवा
मी धनादेश खात्रीचा होतो पण वटलो नाही
किंवा
मी धनादेश खात्रीचा पण अजून वटलो नाही
किंवा
मी धनादेश खात्रीचा नव्हतो का ?.............वटलो नाही!!
किंवा
मी धनादेश खात्रीचा मज अजुन वाटलो नाही
किंवा
पण धनादेश खात्रीचा मज कधिच वाटलो नाही
इत्यादी ..............
चू भू द्या घ्या
कैलासराव, आपल्या
कैलासराव, आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! आपल्या सूचनांचा मी आदर करतो. आपल्या सूचनांसंदर्भात मी माझी खालील वैयक्तीक मते लिहीत आहे..................
“खळखळून हसलो नाही, मनमुराद रडलो नाही;
मी मनाप्रमाणे माझ्या केव्हाही जगलो नाही!”
खळखळून हसलो नाही, मनमुराद रडलो नाही...या वाक्यात दोन क्रियांचा उल्लेख आला आहे: हसणे व रडणे. या दोन्ही क्रिया माणसाच्या आयुष्यात घडत असतात. खळखळून हसणे व मनमुराद रडणे या शब्दप्रयोगात दोन्ही क्रियांची तीव्रता व्यक्त झालेली आहे. अशा त-हेच्या क्रियांसाठी सशक्त मानसिकतेची गरज असते. प्रत्येकास ते जमतेच असे नाही. माणूस इतरांची, जग काय म्हणेल याची परवा करत बसतो. अनेकदा मनात असूनही माणूस भिडस्तपणे खळखळून हसतही नाही वा मनमुराद रडतही नाही. म्हणून दुस-या ओळीत आम्ही म्हणतो......
मी मनाप्रमाणे माझ्या केव्हाही जगलो नाही!
आता “केव्हाही” हा शब्द कसा संयुक्तीक आहे ते सांगतो.
माणसाचे जीवन हे परिवर्तनशील असते! कुणालही सलग सुख किंवा दु:ख वाट्यास येत नाही. माणसाची जगण्याची त-हा, शैली, पद्धत ही वेळोवेळी बदलत असते. मनाप्रमाणे घटना घडतीलच असेही नसते. म्हणून मनाप्रमाणे सदासर्वदा (वेळेस महत्व) जगता येतेच असे नाही. काळाबरोबर जगण्याची त-हाही बदलते. म्हणून “केव्हाही” (वेळसापेक्ष) हा शब्दच जास्त चपखल वाटतो!
“थोडेही” शब्दात हा अर्थ प्रतीत होत नाही. “थोडेही” शब्दामधे amount of जगणे प्रतीत होते. “काळानुरूप” अशी शेड येवूच शकत नाही. “थोडेही” शब्द वापरला तर शेराची उंची जरा खुजी वाटते. बाकी आपली मर्जी!
“का माझ्यावरती कोणी ना उडवावे शिंतोडे?
नखशिखांत बदनामीने मी अजून भिजलो नाही! “
शेरातील दोन्ही ओळी एकजीव व्हायलाच हव्यात, ही कामयाब शेराची पहिली अट असते. “शिंतोडे” व “भिजणे” या दोन शब्दांनी ते कार्य झाले आहे हे आपणास कबूल आहे, असे सुदैवाने दिसते. पण, आपण जो शेराचा अन्वयार्थ लावला आहे तो फारच निम्नस्तरीय, शब्दश: घेतलेला, व वरवरचा अर्थ आहे.
हा शेर उपहासात्मक आहे, ज्यात दुनियेच्या (लोकांच्या) विकृतीवर बोट ठेवले आहे! आपण शब्दांचा फारच वरवरचा अर्थ पाहता असे आपल्या प्रतिसादावरून दिसते. “शिंतोडे” शब्दप्रयोग जाणीवपूर्वक केला आहे. शिंतोड्याचा शब्दश: अर्थ उडलेला किंवा पडलेला (पाण्याचा) थेंब असा आहे. “शिंतोडे उडवणे” या शब्दप्रयोगाचा लाक्षणीक अर्थ होतो.... थोडासा दोष देणे, जाताजाता कुत्सित बोलणे असा होतो. काही माणसांना प्रत्येकातले अवगुणच दिसतात. असे लोक जाताजाता दुस-यांना नावे ठेवतात, बदनामीचे शिंतोडे उडवतात. या प्रवृत्तीला समोर ठेवून आम्ही व्यंगात्मकरित्या म्हणतो की, आम्ही नखशिखांत बदनामीच्या शिंतोड्यांनी अजून भिजलो नाही, माखलो नाही! तेव्हा वर उल्लेखलेल्या विकृत लोकांना उद्देशून आम्ही खोचकपणे म्हणतो की, तुम्हाला अजून बदनामीचे शिंतोडे उडवायला scope आहे. उडवा ते बदनामीचे शिंतोडे. मला काही फरक पडत नाही.
या शेरातील अचूक शब्दयोजना (उदाहरणार्थ नखशिखांत), प्रतिके, उपहास, शब्दांचे व शब्दप्रयोगांचे लाक्षणीक अर्थ इत्यादी लक्षात घेतले तर हा शेर खूप वरच्या दर्जाचा वाटतो. हा नुसता तुम्ही म्हणता तसा “खयाल” नसून ते एक अनुभवाला आलेले सूक्ष्म व सत्य अवलोकन आहे. शिंतोडा शब्दाला एक वाईट अर्थाची शेड आहे. म्हणून बदनामीचे शिंतोडे असे सूचीत केले आहे. नखशिखांत म्हणजे आपादमस्तक, या शब्दात माणसे एखाद्याची किती बदनामी करू शकतात ही शेड आणली गेली आहे. शेरातील दोन्ही ओळींचा समग्र विचार करूनच त्याची गुणवत्ता ठरते. वास्तवीक पाहता इतक्या स्पष्टीकरणाची कुठल्याही रसिकाला/गझलकाराला/ सामान्य माणसाला आवश्यकताच नसते. शब्दांची पूर्ण जाण असणा-याच्या काळजास असा शेर टचकन हात घालतो! असो.
गझल लिहिणे, गझल समजणे, गझलेचे रसग्रहण करणे, गझल भावणे इत्यादींसाठी एक तबीयत लागते, एक सौंदर्यबोध असावा लागतो. क्षमस्व!
शेर हा नुसता खयाल नसतो, तो एक जीवनातला कटू वा गोड प्रत्यय असतो जो अत्यंत काव्यात्मक शब्दांत मांडलेला असतो! असो.
“ना कळे अशा मी कुठल्या मातीचा बनलो होतो;
मी कुठेच रुळलो नाही, मी कुठेच रुजलो नाही!”
>“कुठल्या मातीचा बनलेला असणे” हा मराठीतला शब्दप्रयोग आहे, जो माणसाचा पिंड, तबीयत, स्वत्व इत्यादींकडे निर्देश करतो. तेव्हा या शब्दप्रयोगाचा अर्थ आहे, कुठल्या पिंडाचा माणूस आहे असा होतो. तेव्हा माती रुळत नसते.... माती रुजात नसते...... असा अर्थ काढणे हास्यास्पद वाटते. मी कुठेच रुळलो नाही, मी कुठेच रुजलो नाही हे आमच्या पिंडाचे, तबीयतेचे, स्वत्वाचे वर्णन आहे. एखाद्या माणसाला रुळायला वा रुजायला (यातही फरकआहे ज्यावर नंतर कधीतरी बोलेन) जमतच नाही, कारण त्याचा स्वभाव, त्याची शैली, त्याचा पिंडच असा असतो की, त्याला स्वत:ला आपण “misfit”च आहोत असे वाटू शकते. म्हणून शेरातील दुसरी ओळ अशी लिहिली आहे. माणूस खूप हुशार असेल किंवा त्याच्यात उगाचच न्यूनगंड असेल तर असे घडू शकते. तो रुळत नाही आणि रुजतही नाही!
शेरांत वाक् प्रचारांचा योग्य वापर हे एक सौंदर्याचे लक्षण मानले जाते, ज्याने शेर बोलका होतो व अभिव्यक्तीही अधिक ताकदीची होते व कमी शब्दांत अनेक गोष्टी ध्वनीत होतात. असो.
“ऎकून दाद जनतेची मज गझल म्हणाली माझी...
मी हृदयावरून गेलो, हृदयाला भिडलो नाही!”
या शेरात “मी” व “माझी गझल” (म्हणजे निर्मिती) यांच्यातला संवाद आहे. माझी गझल लोकांची दाद ऎकून मला म्हणते आहे की, “मी” (माझ्या गझलेचा निर्माता, ज्याच्या आत्म्याचा उस्फूर्त उद्गार गझल रूपाने प्रकट होतो) हृदयावरून गेलो (जसे दारावरून जाणे म्हणतात) पण, हृदयाला भिडलो नाही. इथे स्त्रीलिंगी गझल वगैरेचा प्रश्नच येत नाही. गझल नव्हे तर गझलकाराच्या आत्म्याचा उस्फूर्त उद्गार म्हणजे गझलकारच हृदयास भिडतो वा भिडत नाही! वर दिलेली माझी वैयक्तीक मते आहेत. आपणास पटायलाच पाहिजेत असा आग्रह नाही. शेवटी ज्याचा त्याचा सौंदर्यबोध वेगळा. कोण स्वत:चा सौंदर्यबोध किती सबल करतो यावर सर्व अवलंबून असते! शेवटी झोपलेल्याला जागे करता येते पण......
प्रांजळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
..............प्रा. सतीश देवपूरकर
कणखरजी! आपल्या प्रांजळ
कणखरजी! आपल्या प्रांजळ अनुभुतीचा मी आदर करतो. पण, आपण कैलासरावांना लिहिलेल्या माझ्या प्रतिक्रियेचा बारकाईने आभ्यास करावा म्हणजे आपणास माझे म्हणने कळेल. असो.
शेर वर्णनात्मक असण्यात काहीच गैर नाही. पण ते वर्णन म्हणजे नुसते statement नसावे. वर्णन हे गद्य असू शकते वा काव्यात्मक वा पद्य असू शकते. चैतन्याने भारलेले वर्णन मग गद्य असो वा पद्य असो कधीच निर्जीव असत नाही. मढ्याला कितीही सजवले तरी ते जिवंत होत नाही. कारण त्यात मुळातच चैतन्य नसते.
शब्दांच्या व काफियांच्या नादी मी कधीच लागत नाही. शब्दशरणता, वृत्तशरणता, कल्पनादारिद्र्य इत्यादी गोष्टी शेरात कधीच लपून राहू शकत नाही. मुळात आपल्या आत्म्याच्या उद्गारात दमच नसेल तर कुठचीही, कितीही उल्लेखनीय हातोटी, कारागिरी शेरात चैतन्य उतरवू शकत नाही. मुळात सुंदर व्यक्तीच्या सौंदर्याला नकली दागिन्यांची अजिबात आवश्यकता नसते. हातोटी, कलाकुसर, गझलियतेचा आव, पवित्रा हे शेरास कधीच कामयाब करू शकत नाहीत, किंवा रसिकाला भुरळ घालू शकत नाहीत.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
....................प्रा. सतीश देवपूरकर
सपाट गझल. कमाल म्हणजे अशा
सपाट गझल. कमाल म्हणजे अशा गझलांवर एक ग्रंथ होईल इतकी चर्चा होत आहे
-'बेफिकीर'!
मी मोर्चा नेला नाही..........
मी मोर्चा नेला नाही..........
अगदी त्या स्टाईल झालिये ही
कसली कॉमेडी सुरू आहे!!
कसली कॉमेडी सुरू आहे!!
धन्यवाद बेफिकीरजी, आपल्या
धन्यवाद बेफिकीरजी, आपल्या प्रांजळ प्रतिक्रियेबद्दल! आपल्या सौंदर्यबोधाचे व रसास्वादाचे कौतूक करावे तेवढे थोडे आहे! प्रतिक्रियांची कृत्रीम बरसात बरीच पाहिली हो इथे! त्याची आता कीव येवू लागली आहे. परखड, रोखठोक, तर्कशुद्ध, रससग्रहणात्मक विवेचनाचीच वानवा आहे! “सपाट”, “अफाट” वगैरे गुळमुळीत प्रतिसादांची आता शिसारी बसू लागली आहे!
................प्रा. सतीश देवपूरकर
हितचिंतकजी! मराठी गझलेचे आपण
हितचिंतकजी! मराठी गझलेचे आपण हितचिंतक दिसता! तेव्हा आपणही काही गझलात्मक कॉमेडी करा ना! इथे विदूषकांची नितांत आवश्यकता आहे!
....................प्रा. सतीश देवपूरकर
भुंगाजी! फारच गूढ, धूसर
भुंगाजी! फारच गूढ, धूसर प्रतिक्रिया देता हो तुम्ही!!
खुलकर बोलो यार! कसला दबाव, कसली फिकीर? छोडो यार!
....................प्रा. सतीश देवपूरकर
प्रा.साहेब : हा माझ्यावर
प्रा.साहेब : हा माझ्यावर अन्याय आहे हो !! ................
फक्त माझ्या प्रतिसादावर आपण काहीही बोलण्याचे टाळत आहात ..................
कृपया असे करू नये ही माझी प्रार्थना आहे .................
मी इतक्यां प्रामाणिकपणे प्रतिसाद देत आहे ..........
कृपया त्यास टवाळी वगैरे समजू नये ....
इतरजण टवाळी करतात (इथे नाही पण इतर ठिकाणी )आणि आपण त्यांना पानभर प्रतिसाद देता .......
प्लीज असे करू नये ...........
मी नवखा आहे ,लहान आहे ........
पण आपण असे दुर्लक्ष केले तर मला शिकायला मिळेल का .तेंव्हा प्लीज .........
पुन्हा एकदा विचार करा ......
(हा प्रतिसाद पुन्हा वाचा ...........)
इतकीच विनंती
........................वैभव वसंतराव कुलकर्णी
हितचिन्तक ,भुन्गा , बेफीजी,:
आपण छान प्रतिसाद देता बहुधा म्हणून प्रा. साहेब आपल्या प्रतिसादास उत्तर देतात ..............(आपण लकी आहात राव !! )
माझी विनंती आहे की आपली कला मला शिकवाल का..........
प्लीज राव !!,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
धन्यवाद बेफिकीरजी, आपल्या
धन्यवाद बेफिकीरजी, आपल्या प्रांजळ प्रतिक्रियेबद्दल! आपल्या सौंदर्यबोधाचे व रसास्वादाचे कौतूक करावे तेवढे थोडे आहे! प्रतिक्रियांची कृत्रीम बरसात बरीच पाहिली हो इथे! त्याची आता कीव येवू लागली आहे. परखड, रोखठोक, तर्कशुद्ध, रससग्रहणात्मक विवेचनाचीच वानवा आहे! “सपाट”, “अफाट” वगैरे गुळमुळीत प्रतिसादांची आता शिसारी बसू लागली आहे!
................प्रा. सतीश देवपूरकर
>>>>
माफ करा प्रोफेसरजी... पण प्रतिक्रियांची कृत्रीम बरसात म्हणजे काय म्हणायचे आहे तुम्हाला क्रुपया स्पष्ट कराल का?
तुम्हि लिहिलेल्या गझलांवर मी किंवा इतर कोणत्याहि गझलेचं अगदी मोजकच ज्ञान असलेल्या गझल प्रेमींनी त्यावर"आवडली","छान" अश्याहि प्रतीक्रिया देउ नयेत असं सुचवायचय का तुम्हाला? फक्त जाणकार लोकांनीच भाष्य करावे का कुठल्यहि कलाक्रुतीवर?
तुमची वरील प्रतीक्रिया वाचुन फार वाईट वाटले...
बहुधा त्यांना विशिष्ट
बहुधा त्यांना विशिष्ट प्रतिक्रीया किंवा विशिष्ट आयडींनी दिलेल्या प्रतिक्रीया हव्या असाव्यात. तुम्ही लिहा नानुभाऊ, हा फोरम ओपन आहे. आणि तुम्ही पर्सनल काही लिहित नसलात तर कुणाची काही हरकत नसायला हवी.
खद्योतो द्योतते दावत्
खद्योतो द्योतते दावत् यावन्नोदयते शशी ||
उदिते तू सहस्त्रांशू न खद्योतो न चंद्रमा: ||
जेन्व्हा हे सुर्या तू उगवतोस
जेन्व्हा हे सुर्या तू उगवतोस तेन्व्हा काजवे आणि चन्द्र गायब होतात वगैरे वगैरे अशा आशयाचे सुभाशित वगैरे आहे हे .............
“का माझ्यावरती कोणी ना उडवावे
“का माझ्यावरती कोणी ना उडवावे शिंतोडे?
नखशिखांत बदनामीने मी अजून भिजलो नाही! “>>>
@ प्राध्यापक - आता तरी नखशिखांत भिजलात का बदनामीने