अखेर

Submitted by UlhasBhide on 27 April, 2012 - 13:54

अखेर

जाता जाता अखेरचा हा घोट पिऊनी घेतो
जर जमले तर मरण्याआधी थोडे जगून घेतो

फसवुन गेले फासे, हरलो आयुष्याची खेळी
एकच मदिरा जिने कधीही प्रतारणा ना केली

आयुष्याचा भार वाहिला मदिरेच्या साथीने
रखडत खुरडत वाट चाललो मरणाच्या ओढीने

प्रवास संपे, अंतिम रेषा दोन अंगुळे उरली
अन् जगण्याची आस अचानक उचंबळूनी आली

नको वाटले जगणे, जेव्हा जीवन हाती होते
उभा मृत्युच्या दारी आता, पाउल का अडखळते

विचित्र सारी स्थिती पाहुनी, मी माझ्यावर हसतो
पिऊन प्याला अखेरचा हा, थोडे जगून बघतो

.... उल्हास भिडे (२७-४-२०१२)

गुलमोहर: 

“कवितेच्या नादात कवीराज कर्तव्य विसरतात.” >>> प्रद्युम्नजी,
तुमच्या या वाक्याचा संदर्भ लक्षात आला नाही.
हे कोण कवीराज ? त्यांचा इथे काय संबंध ??
माझ्या आकलनशक्तीबाहेरचा आहे तुमचा प्रतिसाद.
दुसरीकडे पोस्ट करण्याचं वाक्य नजरचुकीने इथे लिहिलंत की काय अशी शंका एकदा मनात येऊन गेली.

कविता कशी वाटली; म्हणजे बरी, ठीक, सुमार, टुकार, भिकार, न-कविता, ’र ला ट ला प’ इ.इ. पैकी काही अभिप्राय दिला असतात तर समजलं असतं.... असो ... तुमची मर्जी.

तर्कसुसंगत प्रांजळ, परखड अभिप्राय, मग ते नकारात्मक असले तरीदेखील मला आवडतात, स्वीकारणीय वाटतात. कारण चुका/त्रुटी समजल्यामुळे सुधारणेचा मार्ग प्रशस्त होतो.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

उल्हासजी
बरी, ठीक, सुमार, टुकार, भिकार, न-कविता, ’र ला ट ला प’ इ.इ. पैकी काही अभिप्राय>> माझ्या एखाद्या कवितेला मिळाले असते तर मला काहीच समजलं नसतं. 'सुमार वा भिकार' का? असा मी विचार करत बसलो असतो.त्यांपेक्षा माझा प्रतिसाद अधिक स्पष्ट आहे. पण तेच शब्द वापरायचे असतील तर माझ्या वैयक्तिक मते 'सुमार'!
आपण मायबोलीवरील एक आदरणीय व्यक्ती व उत्तम कवी आहात म्हणून 'कवीराज' असे संबोधले आहे.
जाणता अजाणता आपण मदिरेचा प्रसार केलात यासाठी ते वाक्य होते.
पहा प्रतिसाद पिवो और जिओ.
जमके पिओ

जबरी.....

प्रद्युम्नजी,
तुमच्या प्रांजळ मतांबद्दल धन्यवाद.
कविता मदिरेचा प्रसार करते या तुमच्या मताशी असहमत.
असो .... याविषयी इथे चर्चा करत राहणं संयुक्तिक वाटत नाही.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
(अवांतर : मी दारू पीत नाही, मला दारूची अजिबात आवड नाही.
एक विनंती, कृपया मला कवी म्हणू नका. मी थोड्याफार कविता लिहित असलो तरी कवी म्हणवून घ्यायला पात्र नाही हे माझं मत मी याआधीही एका कवितेवरील चर्चेसंदर्भात व्यक्त केलंय. अर्थात, तुम्ही काय म्हणावं, ही तुमची मर्जी. मी फक्त विनंती करू शकतो.)

अभिप्रायाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

सर्वांना धन्यवाद.

प्रवास संपे, अंतिम रेषा दोन अंगुळे उरली
अन् जगण्याची आस अचानक उचंबळूनी आली

मन या द्विपदीशी घुटमळत राहतं .. ! हे असंच होत असणार, खरं तर असंच होतं. आजूबाजूला पाहीलं कि अनुभूती येते. प्रगल्भ कविता आहे.

>जर जमले तर मरण्याआधी थोडे जगून घेतो
.....
विचित्र सारी स्थिती पाहुनी, मी माझ्यावर हसतो
पिऊन प्याला अखेरचा हा, थोडे जगून बघतो <<< मस्त ! आवडली Happy