सवेरे का सूरज तुम्हारे लिये है ....

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

बाहेर किती मिट्ट काळोख पडलाय! जणू संध्याकाळ झालीसुद्धा! थंडीच्या दिवसात दिवस असतोही छोटा आणि हा आजच्यासारखा एखादा दिवस उगवतानाच बरोबर ढगाळ वातावरण घेऊन उगवतो. बातम्यांत त्या वेदरवाल्यानेही काही आशा दाखवली नाही एखादा क्षण तरी सूर्य दिसेल याची. 'As you can see on the radar map, we have a lot of cloud cover and it doesn't look like it is going anywhere any time soon. So today seems to be a typical, cold winter day. As the week progresses, weekend holds a very good chance for some good football weather.' सकाळी-सकाळी असं काही ऐकलं की दिवसातला निम्मा उत्साह संपतो तिथेच. खरं तर वेगळं काही नाही त्यात; हल्ली सगळेच दिवस हे असे कंटाळवाणे, उदास करणारेच जातात. त्यात हे असे थंडीचे दिवस असले की गारठलेल्या मनात जोडीला अंधार भरतो.

खिडकीच्या बाहेर डोकवावं तर सकाळीच साफ केलेल्या रस्त्यावर परत इंचभर तरी बर्फ पडलाय. त्यामुळे आजुबाजुच्या सगळ्या पोरांचा उत्साह नुसता उतू जातोय! शाळा बंद असल्या आणि हे असे बर्फाचे ढीग ठिकठिकाणी असले की मुलांना काय करु नि काय नको असं होतं. निम्मी मुलं आपापल्या घरांसमोर स्नोमॅन करण्यात दंग आहेत. बाकी कुठून-कुठून हसण्या-खिदळण्याचे, क्वचित 'मॉम' अश्या हाका ऐकू येताहेत, म्हणजे मागच्या स्लोपवर स्लेड्स् उतरल्या असतील. एरवी रंगीबेरंगी कपडे घातलेली, आायांनी पायापासून डोक्यापर्यंत गुंडाळून बाहेर पाठवलेली आणि थंडीने गोबरे गाल आणि नकटी नाकं लाल-लाल झालेली ही मुलं पाहून इतकी मजा वाटते! किती वर्षं मनाशी चित्र रंगवत होतो की आपलं पिल्लू आलं की ते पण असंच दिसेल नाही! पण आता पिल्लू आत छानपैकी झोपलंय आणि मला मात्र ही बाहेर खिदळणारी मुलं पाहूनसुद्धा उत्साह कसा तो वाटतंच नाही.

कितीतरी दिवस मी बाहेर दिसले नाही म्हणून हा घराच्या बाहेर पडल्या पडल्या मी दार लावून घ्यायच्या आत शेजारची लॉरा घरात घुसली. आम्ही अगदी सख्ख्या शेजारणी! खरंतर मैत्रिणीच, त्यामुळे तिचं असं घरात घुसणं किंवा मी तिच्या घरी जाणं यात आम्हांलाही काही वाटत नाही. पण त्या क्षणी तिच्या असं घरात येण्याचा रागच आला - बहुधा तिला जाणवलं असावं माझं काहीतरी बिनसल्याचं कारण मी काही बोलायच्या आत ती म्हणाली 'What happened? You guys had a fight or something? And where is Neil?' मी म्हटलं झोपलाय अजुन. 'Then what's wrong with you? You look like hell! Have you looked in the mirror?' मनात म्हटलं, आरसा काय वेगळं दाखवणार आहे? माझंच प्रतिबिंब ना? So of course, I will look like hell, because I feel like hell... मी काहीच बोलत नाही म्हटल्यावर तीही गप्प बसली - दोनच मिनीटं! त्याहून जास्त वेळ ती गप्प बसूच शकत नाही. उठून स्वयंपाकघराकडे जाता-जाता म्हणाली, 'I am going to get a cup of coffee. I don't think you have had yours yet.' एक क्षण रागच आला मला - इथे माझ्या मनात इतकी खळबळ चालली आहे आणि हिला कॉफी वगैरे कशी सुचतेय? तेवढ्यात आलीच दोघींसाठी कॉफी घेऊन. माझा मग मला देता-देता म्हणाली, 'Here - yours has a little bit of your favorite creamer, just like you like it. Now tell me what's going on. How long are you like this and how much longer are you going to avoid me and the rest of the world? Did you go to your PCP? Your OB-GYN? Are you sure it's not postpartum?'

तिनी हे असले भल-भलते प्रश्न विचारायला सुरुवात केल्यावर मला काहीतरी बोलणं भाग होतं. म्हटलं, बये मला स्वत:ला काऽऽऽहीही झालेलं नाही. आता मी स्वतःच डॉक्टर आहे ना? पण तरी मला कशातच उत्साह वाटत नाहिये. नीलचंसुद्धा करतेय कारण बिचारं चार महिन्याचं पिल्लू... आणि पोस्ट-पार्टम काय? नील चार महिन्याचा झाला - आत्तापर्यंत ठीक होतं ना सगळं? आणि तू काय मला नव्याने अोळखायला लागलीस का?

इतकं बोलले आणि जणू बांध फुटलेल्या धरणासारखं भडाभडा बोलतच राहिले... म्हटलं, 'तीन आठवड्यांपुर्वी विकासचा फोन आला होता भारतातून. तेव्हापासून मी फार अस्वस्थ आहे.' म्हणाली, काय झालं? तिच्या-माझ्यात गुपीत असं काही नाहीच. सारी सात-आठ वर्षांची अोळख पण सगळा जन्म एकमेकींबरोबर काढल्यासारखी मैत्री आमची. त्यामुळे केव्हातरी कॉलेजच्या गप्पा सुरु असताना तिच्याशी विकासबद्दल बोलले होते. तसं बोलण्यासारखं काही विशेष नव्हतं - म्हणजे माझ्या दृष्टीनी. आमच्या आवडी-निवडी सगळं-सगळं सारखं होतं. सुदैवानी मेडिकल कॉलेजमध्ये मुलं-मुली असं फारसं काही उरत नाही. त्यामुळे उगीच कोणी छळलं नाही मला. त्याला कोणी काही बोललं असलं तरी ते त्यानी माझ्यापर्यंत येऊ दिलं नसतं. आम्ही कविता करतो हे फक्त आम्हांला दोघांनाच माहीत होतं. अशीच एकदा कवितांची वही मला देताना म्हणाला, 'दोन नव्या आहे. पण शेवटची आधी वाच.' म्हटलं हे काय नवीन? तर म्हणे वाच म्हणजे कळेल... असं म्हटल्यावर मला घरी पोहोचेपर्यंत कुठला धीर! मी घरी जाताना गाडीतच वही उघडली आणि भर्रकन् शेवटच्या पानाकडे गेले - आणि एक क्षण सुन्न झाले. मला हेऽऽऽ वाचायला मिळेल असं अजिबातच वाटलं नव्हतं, कारण तिथे मुळी विकासची कविता नव्हतीच, तिथे त्यानी चक्क गाणं लिहून काढलं होतं 'एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात'. घरी जाईपर्यंत मी सावरले होते कशीबशी. तशीही मी गेले की सरळ आपल्या खोलीत जाऊन अभ्यासाला बसत असे, त्यामुळे कोणी काही विचारण्याचा प्रश्न आला नाही. आता आपल्यावर कुणाचा जीव जडला तर त्याला आपण काय करु शकतो? दुसऱ्या दिवशी त्याला वही परत दिली. त्यानी प्रश्नार्थक नजरेनी माझ्याकडे पाहिलं; तरी बरं, त्याला हे पक्कं माहित होतं की माझ्यासाठी तो फक्त एक छानसा मित्र होता. त्यामुळे मी त्याला म्हणाले, 'सांग, कोणापर्यंत पोहोचवायचाय तो निरोप?' त्याच्या लक्षात आलं असावं माझं उत्तर त्यामुळे तो विषय तिथेच संपला आणि आमच्यात गैरसमजाचा प्रश्न कधी आला नाही. इतका, की मला हा भेटल्याचं, आवडल्याचं मी पहिल्यांदा कुणाला सांगितलं असेल तर ते विकासला! ह्यालाही विकासबद्दल 'सगळं' बोलले होते, त्यामुळे त्या दोघांची भेट झाली तेव्हाही मला अजिबात कानकोंडं वगैरे वाटलं नाही. पण तरी त्या भेटीनंतर मी मनातल्या मनात सुस्कारा सोडल्याचं मला अजुनही आठवतंय. फक्त आता ते आठवलं की त्याचं हसू येतं कारण ह्याचा स्वभाव फारच साधा आहे. शिवाय लहानपणीच आई-वडिल दोघेही गेल्यामुळे एकूण स्वारी अबोलातच जमा होते! घरी सगळ्यांना माहीत झाल्यावर तो बऱ्याच वेळा घरी यायचा आणि निघताना मी बंगल्याच्या गेटपर्यंत गेले की नेहमीचा संवाद 'बाप रे! तुम्ही सगळे कायमच इतकं बोलता?' त्याचा प्रश्न ऐकला की मला हसू आवरायचं नाही. आणि आता! कधी-कधी प्रश्न विचारतो आणि माझं उत्तरही आपणच देऊन टाकतो! लॉरा अजिबात विश्वास ठेवायला तयारच नाही मुळी की हा कधीकाळी अबोल होता!

माझी इंटर्नशिप संपेपर्यंत लग्न करायचं नाही हे आधीच ठरलं होतं. पण तोपर्यंत ह्याला तिकडे थांबणं शक्य नव्हतं. इकडे त्याला कॅन्सर रिसर्च फेलो म्हणून रुजू होणं भाग होतं. त्याप्रमाणे तो इकडे आला आणि विकासनी माझं डोकं खायला सुरुवात केली... 'काय हे? दोन चांगले डॉक्टर आपल्या समाजाची सेवा करायचं सोडून अमेरिकेत निघाले. तू ही त्यातलीच निघशील यावर मी एरवी कधी विश्वास ठेवला नसता'. त्याची कशी समजूत घालावी तेच कळेना? जिवाभावाची मैत्रीण दूर, परक्या देशात जाणार, कदाचित कायमची याचं दुःख किती आणि समाजसेवेचं ऋण माझ्याहातून फिटणार नाही याचं दुःख, राग किती हे मला आजतागायत उलगडलेलं नाही. मेडिकलला प्रवेश घेतानाच त्याचं ठरलं होतं की शहरात प्रॅक्टिस करायची नाही.

लग्नानंतर मी इकडे आले, थोड्याच दिवसांत माझी इंटर्नशिप सुरू झाली आणि टिपीकल अमेरिकन जोडप्यासारखं आमचं आयुष्य सुरु झालं. सुदैवानी आमचं दोघांचंही कोणाशीही जमतं, त्यामुळे घर घेताना शेजारी कोणीही असलं तरी आम्हांला अडचण नव्हती. शेजारी लॉरा आणि तिचं कुटुंबच निघाल्यामुळे तर फारच छान झालं! दोघांची नोकरी, बस्तान बसवणं, घर घेणं, मग पिल्लासाठी प्रयत्न - या सगळ्यांत विकासची आठवण मनाच्या एका कोपऱ्यात गेली. क्वचित कधी ई-मेल, वाढदिवसाला फोन इतपतच संबंध राहिले... सुरुवातीला त्यानी लग्न करावं म्हणून मी खूप मागे लागले, ह्यानीही एक-दोनदा सुचवून पाहिलं. आधी थातुर-मातुर कारणं देत राहिला पण शेवटी एकदा म्हणाला, 'प्लीज, पुन्हा नको मागे लागूस. तुला कारण माहिती आहे; आणि हो, मी तुला चांगलं अोळखतो म्हणूनच इतके दिवस उडवून लावत होतो तुझे प्रश्न कारण आता तू उगीचच स्वतःला जबाबदार समजत राहशील. पण आपल्या दोघांनाही माहिती आहे की मी तुझ्यासाठी कायम एक जवळचा मित्रच होतो. तेव्हा हा जो निर्णय आहे तो सर्वस्वी माझा; तू कशालाच जबाबदार नाहीस.' आता वाटतंय या संभाषणानंतरच आमच्यातला संपर्क नकळत कमी-कमी होऊ लागला.

कधी जुने फोटो पाहताना, जुन्या आठवणी काढताना विकासची आठवण निघायची. नीलच्या जन्माआधीचा काही काळ आम्हांला दोघांनाही खूप जड गेला. प्रॉब्लेम तर काही नव्हता पण पिल्लू यायचं नावंच घेत नव्हतं. तेव्हा कधी तरी मला एकदम विकासची खूप आठवण यायची कारण न बोलता सगळं समजून घेण्याची अनोखी देणगी होती त्याच्याकडे. इकडे आम्ही दोघं एकाच मनःस्थितीत असल्यावर समजूत कोणी कुणाची घालायची? तेव्हा बहुधा ह्यालाही विकासची आठवण होत असावी कारण कधी घरी आल्यावर हा सांगायचा - 'विकासला फोन केला होता, पण जास्त वेळ बोलता नाही आलं कारण कुठेतरी जंगलात होता हा माणूस. तिकडे काय करतोय?' पण नीलचा जन्म झाला आणि आमचं सगळं जगच बदललं... खरं तर 'आमचं' असं काही वेगळं नाही; सगळ्यांचंच बदलतं. दिवसाचे चोवीस तास कमी पडायला लागले. रोज घरी आल्यावर याचा पहिला प्रश्न, आज काय केलं नीलनी? आम्ही खरंच इतके गुरफटलो, की नीलच्या जन्मानंतर विकासकडुन फोन किंवा ई-मेल नाही हे ही लक्षात आलं नाही!

आणि अचानक तीन आठवड्यांपुर्वी ध्यानी-मनी नसताना त्याचा फोन आला. त्याचा आवाज ऐकला तेव्हाच का कुणास ठाऊक मनात चर्र झालं कारण मला धड ऐकूही येईना इतका आवाज खोल गेलेला - म्हटलं काय झालं रे? आवाज का असा? एकदम विचित्र हसण्याचा आवाज आला - म्हणजे जणू एखादं मशिन हसावं तसा - असं मनात आलं आणि मी हादरलेच! तेवढ्यात तो म्हणालाच, 'अग, मशिनच्या मदतीनी बोलतोय! काम आवरत नाही ना आजकाल एकट्याला म्हणून मदतनीस ठेवलाय.'

'विकास, काय ही जीवघेणी थट्टा! तुला माहितिये मला नाही आवडत अशी भलत्या बाबतीत थट्टा केलेली.'

'अग, हो, हो! किती दिवसांनी बोलतोय, असं रागवू नकोस! आधी सांग, तुझं पिल्लू कसं आहे? वळायला लागला असेल ना?'

त्यानी नीलचा विषय काढल्यावर माझ्यातली आई जणू जागी झाली, आणि मी आपली बोलतेय भडाभडा, नीलच्या गंमती-जंमती, कधी आमची होणारी तारांबळ, दोघेही डॉक्टर असलो तरी त्याला साधी सर्दी झाली तरी अचानक आपल्या डॉक्टरकीचा विसर पडणं... अचानक लक्षात आलं विकास खूप खोकतोय; बहुधा बराच वेळ खोकत असावा... एकदम मी भानावर आले. म्हटलं, 'खरं-खरं सांग, काय होतंय तुला?'

आणि त्यावर त्यानी जे सांगितलं ते ऐकल्यापासून गेले तीन आठवडे माझं हे असं चाललंय... लॉरा, अग, का चांगल्या माणसाला सुखानी जगता येत नाही कधी? पाहिलं तर शेजारी लॉरा नव्हतीच; ती कधी उठली लक्षातही नाही आलं. असं मनात येत नाही तोवर ती आलीच - हातात टिश्यूबॉक्स घेऊन. म्हणाली, 'Wipe your tears and take a deep breath. I'll get some more coffee.' म्हटलं, नको, मला बोलू दे आता. अग, विकासला आधी स्वरयंत्राचा कॅन्सर झाला. डॉक्टर असुनही केवळ आदिवासी प्रदेशात प्रॅक्टिस करत असल्याने स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ कुठे होता! लक्षात येईपर्यंत स्वरयंत्र काढण्याशिवाय काही पर्याय उरला नव्हता. त्यानंतरही महाशय परत गेले दूर कुठे जंगलात जणु काही झालंच नाही असे. पण थोड्या महिन्यांत परत प्रकृतीची कुरबूर सुरु झाली. जेव्हा अती त्रास व्हायला लागला तेव्हा तपासणीसाठी पुन्हा मुंबईला आला आणि एकाच माणसाला दोनदा फाशीची शिक्षा ठोठवावी तसं झालं, स्टेज ३ चा ल्युकेमिया. तो सांगत होता आणि मी ऐकत होते. अचानक तो म्हणाला, 'ऊठ आणि आधी डोळे धुऊन ये'. मी भानावर आले तर खरंच, डोळ्यांना केव्हा धारा लागल्या मलाच कळलं नाही. मी पोट-तिडकीनी म्हणाले, 'अरे, इतकी वेळ येईपर्यंत का थांबलास? तुला माहिती आहे, त्यासाठीच हा झपाटल्यासारखा इकडे आलाय... आणि आपल्याच माणसाला त्याचा काही उपयोग नाही? अजुन ये इकडे ताबडतोब; नाही तर असं करु, मी त्याला पाठवते तुला इकडे घेऊन यायला - मी म्हटलं असतं मी येते, पण तुझ्याकडुन रागवून नाही घ्यायचं मला इतक्या छोट्या नीलला इथे ठेवून आल्याबद्दल'.

परत तिकडून हसण्याचा आवाज; म्हणाला, 'वेडी आहेस का? तू डॉक्टर आहेस, सांग बरं तुझ्या पेशंटला तू काय सांगितलं असतंस? उरलेले दिवस आनंदात काढा, भरपूर जगून घ्या - हेच ना?' तुला फोन करणं हाच माझा आनंद होता. आणि मी जगणार आहे ना! बघशील - नील मोठा होईल तसतशी तुला माझी आठवण येते की नाही ते!'

काल रात्री माझ्यासाठी एक ई-मेल होती, त्यात फक्त दोनच अोळी लिहिलेल्या होत्या...

जो हर दम तुम्हारी खुशी चाहते है
उदास होके उन को ना नाशाद करना
प्रकार: