प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे सेम नसतं - कथा २

Submitted by मेधा on 9 September, 2008 - 01:31

शर्मिला बसपाशी आली तेंव्हा बस जवळपास भरलेली असेल हे बाहेरुनच कळत होतं . खिड़कीची जागा मिळणं अशक्यच होतं. ' अगदी अनोळखी लोकांच्या शेजारी सीट नसू दे म्हणजे मिळवली' असं मनाशी म्हणत ती बस मधे चढली.
' लास्ट सीट हिअर' तिने चढता चढता बसंत ओरडला. बसभरचे लोक वळून तिच्याकडे पाहू लागले. तिला चढताना पाहून ड्रायव्हरने गाडीपण चालू केली.
सगळे जण आपल्याकरताच थांबले होते हे कळल्यावर ती जराशी ओशाळली. पण काही न बोलता ती बसंतच्या बाजूच्या सीटवर बसली.

कंपनीच्या ट्रेनिंगमधे तिची त्याच्याशी जुजबी ओळख झाली होती. त्यालाही आता दीड वर्षं होत आलं होतं. त्यानंतर दोन प्रॉजेक्टवर त्यांनी एकत्र काम केलं होतं. पण ते दोन्ही मोठे प्रोजेक्ट्स होते. बसंत टेस्टींगच्या नाहीतर क्लायंटना त्यांचा नव्या सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग देणार्‍या गृपमधे असे. शर्मिलाचं काम प्रोग्रॅमिंगचं असे. त्यामुळे एकमेकांशी जुजबी बोलणं होत असे तेव्हढंच. शिवाय शर्मिला स्वयंघोषित टिपिकल काकूबाई होती. तर बसंत अगदी तितकाच टिपिकल दिल्लीवाला होता. गोरा रंग, धारदार नाक, थोडेसे लांब, डोळ्यांवर येतील असे झिपरे केस, कपडे वगैरे एकदम नव्या फॅशनचे अन दिलदार स्वभाव यामुळे त्याच्या भोवती कायम मित्र मैत्रिणींचा गराडा असायचा. हिंदी, उर्दू , पंजाबी अन इंग्लिश चारी भाषांवर जबरदस्त प्रभुत्व, चौफेर वाचन अन तल्लख स्मरणशक्ती - तो पाच मिनिटं जरी बोलला तरी समोरच्यावर सहजवर छाप पाडू शके.

पुण्यातनं मेकॅनिकल इंजीनियरिंग शिकलेल्या शर्मिलाला मुंबैतल्या नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीची ऑफर आली होती तेंव्हा तिच्या घरचे फारसे खुष नव्हतेच. पण बोरिवलीला रहाणार्‍या मीनामावशीच्या घरी राहून काही दिवस ही नोकरी करून पहायची परवानगी कशी बशी मिळाली होती. पहिले काही दिवस ती मुंबईच्या ट्रेनला अन गर्दीला इतकी बिचकत असे की तिची मावशी तिला ऑफिसपर्यंत सोडायला येई. अगदी भिडस्त नसली तरी शर्मिला पटकन आपणहून कोणाशी फारसं बोलत नसे. इंग्लिश मधून गप्पा मारताना अडखळायला होई. हिंदी सुद्धा एकतर पुस्तकी नाहीतर हिंदी सिनेमातलं. आपलं काम झालं की इकडे तिकडे न बघता सरळ मावशीच्या घरी. बाकीची मंडळी एकत्र बाहेर जेवायला जात, सिनेमाला जात, कधी एकमेकांच्या घरी जात. शर्मिला या कशातही नसायची.

त्यांच्या कंपनीतल्या काही जणांनी दोन दिवसाकरता मुरूडची ट्रिप आखली होती.शनिवारी सकाळी मुंबईहून निघून रविवारी रात्री परत असा बेत होता. कोणाच्या तरी ओळखीने एक प्रायव्हेट बसच भाड्याने घेतली होती अन मुरुडमधे सरकारी गेस्ट हाउस मधे दहाबारा खोल्या बूक केल्या होत्या. शर्मिलाच्याच बॅचची बरीचशी मंडळी जाणार होती -शर्मिलाच्या जवळच्या दोन मैत्रिणी, त्यातल्या एकीची होउ घातलेला नवरा वगैरे. इतके सगळे ओळखीचे लोक आहेत म्हटल्यावर ती जायला तयार झाली होती.

यथावकाश बसमधे गाण्यांचा भेंड्या सुरू झाल्या. सुरवातीला नेहेमीच्या उत्साही मंडळींनी अगदी जोरजोरात गाणी म्हटली. बसंतही त्यात होताच. पण मग नेहेमीची आठवणारी र , ह अन ल ने चालू होणारी गाणी म्हणून झाल्यावर इकडे तिकडे भेंड्या चढू लागल्या. अपवाद एक जोगी- म्हणजे जोगळेकरच्या गॄपचा.
जोगळेकर म्हणजे चालता बोलता रेडीओ अशी त्याची ख्याती होती. कायम गाणी गुणगुणत असायचा. अन त्याला अगदी हजारो नाही तरी शेकडो गाणी येत होती. शर्मिलाच्या ग्रूपवर तिसरी भेंडी चढायला आली तेंव्हा बसंतने अगदी शेवटचा उपाय म्हणून शर्मिलाला विचारलं. क्षणाचा विलंब न लावता तिने गाणं म्हटलं होतं. जोगीला तर आश्चर्य वाटलं होतंच पण बसंत सुद्धा तिच्याकडे कौतुकाने बघत होता. तिने गाणी म्हणायला सुरवात केली त्यानंतर मात्र त्याच्या ग्रूपवर एकही भेंडी चढली नाही.

जवळ जवळ दोनेक तासांनी सगळ्यांचे घसे सुकले तेंव्हा चहा प्यायला म्हणून बस थांबवून मंडळी खाली उतरली, ' तुला इतकी गाणी येतात अन तू इतकी छान म्हणतेस हे कधी कळलंच नाही.' जोगी तिच्याकरता चहाचा ग्लास घेऊन आला होता.

'मी चहा वगैरे पीत नाही.'
'असू दे गं आजचा दिवस पी, छान असतो इथला चहा. तू गाणं वगैरे शिकलीयेस का?'

'छे, शिकले वगैरे नाही, असंच ऐ़कून ऐकून म्हणते.'

'अरे ती मराठी गाणी पण एकदम मस्त म्हणते माहीते का.' तिच्या मैत्रिणीने माहिती पुरवली.

' तू उगीच काही तरी सांगू नकोस सरिता. असंच आपलं म्हणते कधी कधी.'

'बरं आज संध्याकाळी परत खेळूया भेंड्या, तेंव्हा मराठी गाणी पण ठेवूया त्यात. चला , चला बस मधे चला सगळे पटापटा.' जोगीने सगळ्यांना बसमधे पिटाळलं.
परत बस चालू झाली तोपर्यंत भेंड्या खेळण्याचा उत्साह मावळला होता सगळ्यांचा. सगळे एकमेकांशी गप्पा तरी मारत होते नाहीतर डुलक्या तरी काढत होते.

शर्मिला अन बसंत पण इकडचं तिकडचं बोलत होते. खरं तर बसंतच बोलत होता अन शर्मिल मधून मधून त्याला काही तरी उत्तर देत होती. त्याने समुद्र क्वचितच पाहिलाय, पहिल्यांदा गोव्याचा समुद्र पाहिला तेंव्हा तो लहान होता अन चांगलाच घाबरला होता, बनारसला गेला होता तेंव्हाही नदीचं पात्र पाहून घाबरला होता. पण कॉलेजमधे गेल्यानंतर मात्र पोहायला शिकला अन तेंव्हापासून पाण्याची भिती वाटेनाशी झाली वगैरे वगैरे. शर्मिलाला पाण्याची भिती वाटते का विचारल्यावर ती म्हणाली 'तैरना आता है, तो डर किस बात का ?'

'तो आज तुम समुंदरमें तैरनेवाली हो ?'

त्याला नुस्तं मान हलवून नकार दिला तिने अन मनात म्हणाली ' हरे राम, इतक्या सगळ्या लोकांबरोबर रहावं लागेल , रात्रीचा शेकोटी वगैरे कार्यक्रम असेल म्हणून मी रात्री घालायला मॅक्सी न आणता अजून एक पंजाबी ड्रेसच आणलाय. अन या सगळ्यांच्या समोर मी समुद्रात काय कप्पाळ पोहणार. जरासे पाय भिजतील इतपत पाण्यात जाईन फारतर'

उघड मात्र त्याला म्हणाली 'समुन्दर मैं तैरनेसे ज्यादा समुंदरको देखने और सुनने में मजा है. तैरना आता है लेकिन समुंदर मे तैरनेका शौक नहीं है.'

मुरूडला पोचेपर्यंत सगळ्यांना जोरदार भूक लागली होती. सामान गेस्ट हाउस वर टाकून मंडळी खानावळीत गेली. आधीच सांगून ठेवल्यामुळे जेवण तयार होतंच.

जेवताना शर्मिला, जोगी, सरिता सगळे एकत्र बसले होते. तेंव्हा बसंत मुद्दाम शोधत त्यांच्या बरोबर बसला होता अन प्रत्येक पदार्थाबद्दल प्रश्न विचारत होता. तळलेले मासे, सोलकढी, उसळ सगळं आवडलं त्याला. पण जेंव्हा जोगी ने सोलकढीचा भुरका मारुन दाखवला तेंव्हा मात्र त्याची हसून हसून पुरेवाट झाली.
जेवून समुद्रावर जाताना सरिता म्हणाली ' दिल्लीवाला आवडायला लागलाय की काय शर्मिलाकाकूंना ?'

'चल गं चावट' म्हणत शर्मिलाने एक धपाटा घातला तिच्या पाठीत पण तिच्या गालावर लाली चढलीच .
समुद्रकिनार्‍यावर फ्रिस्बी अन व्हॉलीबॉलचे गेम्स चालू झाले. काही लोक पाण्यात डुंबत होतेच. बसंतने पण नेहमीचे कपडे उतरवून पोहण्याचे कपडे चढवले. शर्मिला अगदी स्वत:ची नजर सुद्धा चुकवून त्याला निरखत होती.
'किती स्ट्राँग वाटतो. दंड कसे पिळदार आहेत. अन गळ्यातली साखळी पण किती शोभून दिसते'

' कसल्या विचारात गढली आहेस एवढी ? अन असं सतत निरखून पाहिलंस त्याला तर तुझी दृष्ट नाही का लागणार ?' सरिताने परत शर्मिलाला चिडवायला सुरवात केली.

'किसकी नजर? किसको लगेगी?' मोनिका कधी त्यांच्या जवळ येऊन त्यांचं बोलणं ऐकायला लागली त्यांच्या लक्षातच आलं नाही.

'नथिंग' म्हणत सरिता तिला कटवायला बघत होती. पण तिने आधीच शर्मिलाच्या नजरेचा रोख ओळखला होता.

' ही इज नॉट युअर टाइप. बेकारमे पछतायेगी.' अगदी थंड आवाजात तिने शर्मिलाला सांगितलं.

या अनपेक्षित कुत्सित हल्ल्यामुळे शर्मिला इतकी भडकली की तिला काही बोलताच येईना.
' आय ऍम जस्ट वॉर्निन्ग यू फॉर युवर ओन गूड' म्हणत मोनिका निघून गेल्यावर ही शर्मिला रागाने धुमसत होती.

' अगं तुझ्या मनात काही नाही ना त्याच्या बद्दल, मग तू कशाला मनाला लावून घेतेस ? ती कशी आहे ते जगजाहीर आहे. जगातले यच्चयावत तरूण फक्त तिच्या 'टाइपचे' आहेत तुला माहित नाही का ? आज पर्यंत किती जणांना तिने फिरवलंय माहित आहे ना.' सरिताने जवळ जवळ खेचतच तिला दुसरी कडे नेलं.
'चल शिंपले वेचूया .'

मुरूडच्या किनार्‍यावर शंख शिंपल्यांची अगदी रेलचेल होती. वेगवेगळ्या रंगाचे, आकाराचे शंख शिंपले वेचता वेचता शर्मिलाचा राग जरा निवळला. नंतर सगळा वेळ ती कटाक्षाने बसंतला टाळत होती. रात्रीच्या जेवणाच्या वेळी पण तो त्याच्या मित्र मैत्रिणींचा कंपुतच होता. त्याने काही बाही विचारायला यायच्या आतच ती लवकर जेऊन तिथून सटकली.
जेवणानंतर परत समुद्रावर जाउन शेकोटीचा कार्यक्रम होता. खरंतर शेकोटी करण्याइतकी थंडी नव्हतीच. तरी शेकोटीशिवाय मजा नाही म्हणत दोन चार जणांनी शेकोटी पेटवायचा प्रयत्न केला. अर्थात त्या प्रयत्न्नांना काही यश येत नाही म्हटल्यावर मंडळी नुसतीच शेकोटीची गाणी म्हणायला लागली. परत भेंड्या सुरू झाल्या. जोगी ने शर्मिलाला आपल्या गॄप मधे घ्यायचा बराच प्रयत्न केला पण सकाळची आठवण सगळ्यांना होतीच. त्यामुळे सकाळचेच गॄप परत धरून भेंड्या खेळायला सुरुवात झाली. शर्मिला अन सरिता एका बाजूला बसल्या होत्या.

'ऍज लॉन्ग ऍज देअर इस वन पर्सन इन अनदर टीम व्हू कॅन व्हॅलिडेट इट, रिजनल साँग्ज आर ओके टू' जोगीने नवा नियम जाहीर केला.
लगेच मराठी , गुजराती, तामिळ , पंजाबी ,सिंधी मंडळीनी गलका केला. सगळ्यांना शान्त करत जोगी म्हणाला ' देखो हर गॄप मे कोई ना कोई है जिसको ये भाषा आती है. सबको अपने अपने गाने गानेका चांस मिलेगा.'

रात्री बर्‍याच उशिरापर्यंत भेंड्या चालल्या होत्या. मधेच कधी तरी खेळ राहिला बाजूलाच. गुजराती अन पंजाबी गाण्यांवर नाच सुरु झाले. गाण्यांचा जोशच असा काहीसा होता की सगळे जण नाचात सामील झाले. बसंतने इतका मस्त भांगडा करुन दाखवला की सगळे जण टाळ्या वाजवायला लागले. मग जोगीने पण सरिता, शर्मिला अन अजून एका मुलीला पकडून चार जणांची फुगडी घालून दाखवली . त्यालाही जोरदार टाळ्या मिळाल्या. मध्यरात्रीच्या नंतर कधी तरी मंडळी गेस्ट हाउसवर परतली.

दुसर्‍यादिवशी काही मुली गावात खरेदी करायला निघाल्या. 'मुंबईहून येउन इथे काय खरेदी करता तुम्ही ?' जोगी ने त्यांना चिडवलं.

'बांगड्या भरायला चाललो आम्ही.' सरिता म्हणाली. अन खरोखरच सगळी दुकानं पालथी घालून शेवटी बांगड्याच भरून आल्या सगळ्या जणी.

' हाउ बॅकवर्ड !' कोणी न विचारता मोनिकाने आपली नापसंती दाखवली.

'व्हॉट डू यू नो अबाउट द सिम्पल जॉय्ज ? यू जस्ट वॉन्ट डू डीफाय एव्हरीथिंग फॉर द सेक ऑफ डिफायिंग .' शर्मिलाला कालचा राग होताच. 'एनीवेज धिस स्टफ इज नॉट युवर टाइप!' मोनिकाला काही बोलण्याची संधी न देताच ती तिथनं निघाली.

जेवणं आटपल्यावर परत एकदा समुद्रावर जाऊन मग चहा झाला की परतीच्या प्रवासाला लागायचं होतं.

परत एकदा किनार्‍यावर फ्रिस्बी वगैरे चालू झालं. सरिता अन शर्मिला वाळूत किल्ले बांधत बसल्या होत्या.

'मॉडर्न मेम' दिसत नाही कुठे ?' सरिताने म्हटलं .

'गेली असेल आपल्या अकलेचे दिवे पाजळायला. नको तिथे पचकायची फारच खोड आहे बाई तिला.' शर्मिलाला तिचं नाव सुद्धा नको झालं होतं. 'चल आपण अजून थोडे शिंपले गोळा करू.'

' तूच जा बाई. मला कालचेच पुरे शिंपले. मी इथेच बसते. फार पाण्यात नको जाऊस हां' सरिता म्हणाली.

शर्मिला एकटीच निघाली. अभ्रकासारखे पांढरे, गोल गोल शिम्पले बरेच मिळाले होते. अजून थोडे मिळाले तर त्याचं काही तरी बनवता येईल म्हणून शर्मिला निघाली. चालता चालता ती तिच्या ग्रुप पासून बरीच दूर गेली. त्यांचा आवाज तिला येईनासा झाला म्हणून तिने वळून पाहिलं तर तिच्या नजरेच्या टप्प्यात होते सगळे. मग ती परत पुढे चालू लागली.

थोडं दूर गेल्यावर परत थोडे थोडे आवाज कानावर आले . तिने इकडे तिकडे पाहिलं तर कोणी दिसेनात. अन आवाज सुद्धा तिला नक्की कळेना. किनार्‍यापाशी थोडीशी झुडुपं होती त्यादिशेने आवाज आल्या सारखं वाटलं तिला म्हणून ती त्या दिशेने जाउ लागली. कोणाचा तरी अस्फुट ओरडण्यासारखा आवाज वाटला तिला. अगदी सावधपणे ती त्या झुडूपांच्या जवळ गेली. अन तिने पाहिलं की बसंत अन मोनिका .... शी ! शी! तिने डोळे गच्च मिटून घेतले. जनावरांसारखी करत होती ती तर . तो ओरडण्याचा आवाज त्यांचाच होता. इथे, असं उघड्यावर? शी! शी! नखशिखांत शहारली ती अन जवळ जवळ पळतच सरिताकडे निघाली. तिथे येई पर्यंत तिला इतकं मळमळत होतं की सरिताकडे पोचत पोचता तिला भडभडून उलटी झाली.

सरिताने तिला सावरलं, जोगी पाणी घेउन आला. अ़जून एकीने बडीशेप देउ केली. शर्मिला नुस्तीच सरिताच्या कुशीत डोकं ठेवून मुसमुसत होती.
सरिताला काही कळलं नाही. जेवणातलं काही बाधलं असेल म्हणून तिने सगळ्यांची समजूत घातली. आता खेळात कोणाचंही मन लागेना. सगळे मग निघालेच.

बस आल्याबरोबर शर्मिला अन सरिता एकत्रच बस मधे चढ्ल्या अन शेजारी शेजारी बसल्या. सगळे बस मधे बसले तरी दोन सीट रिकाम्या होत्या. जोगी डोकी मोजायला लागला तेव्हढ्यात त्याला बसंत अन मोनिका हातात हात घालून येताना दिसले. बसंतकडे पहाताच क्षणार्धात त्याला शर्मिलाला काय झालं ते कळलं.

बस सुरु झाल्यावर डोळे मिटून मागे रेलून बसत तो पुटपुटला
'याम चिंतयामी सततं मयि सा विरक्ता......'

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या वाक्याचा अर्थ काय?
शूनू, interesting गोष्टी आहेत हा तुझ्या...

अचानक वेगळा शेवट केलास शोनू ... मुरूडच्या ट्रिपचा मूड एकदम मस्त लिहिला आहेस.
>> 'याम चिंतयामी सततं मयि सा विरक्ता......'
म्हणजे काय ?

ओह प्रेमकहाणिची सुरुवात व्हायच्या आधिच शेवट झाला.

ह्म्म्म...
संदीप, त्याचा अर्थ 'मी जिचा नेहमी विचार करतो (जी मला आवडते), ती माझ्याबद्दल उदासीन आहे'

  ***
  If dreams are like movies, then memories are films about ghosts...

  मला तर त्या ओळीचा अर्थ माहित आहे तरी पण त्याचा इथे काही संबंध लागला नाही?!

  मला समजलेला अर्थ- जोगीला शर्मिला आवडते. तसेच त्याला मोनिका आणि बसंत विषयी कल्पना (आली) आहे. ते दोघे हातात हात घालुन येताना दिसल्यावर त्याला शर्मिलाला काय झाले असावे ह्याचा अंदाज आला. म्हणजेच शर्मिलाला बसंत आवडायला लागला आहे किंवा होता हे त्याच्या लक्षात आले. म्हणुन तो म्हणाला की 'मी जिचा नेहमी विचार करतो (जी मला आवडते), ती माझ्याबद्दल उदासीन आहे'

  किंवा

  शर्मिलाचे स्वगत जोगी म्हणाला- शर्मिलाला जो आवडतो तो तिच्याबाबतीत उदासीन आहे.

  शोनु, सांग बरे मी पास की नापास ?

  नाही काचबूटधारीणे..
  सा विरक्ता असं आहे ते, सा स्त्रिलिंगी म्हणजे 'ती 'उदासीन आहे (नाहीतर ते सः विरक्तः असं असतं.. ) त्यामुळे भाग १ बरोबर असू शकेल किंवा मग जोगी ला मोनिकाबद्दल काही वाटत असावे आणि ती उदासीन असल्याचा साक्षात्कार झाला असावा अशीही एक शक्यता येतेच.. Happy

  शोनू दोन्ही कथा एकदम वाचल्या आवडल्या.. प्रेमाचे अनेक कंगोरे असतात हे खरच, शोले मध्ये हे विशेष दाखवलय.. Happy

  मला वाटतय अजुन पुर्ण झालि नाहिये हि प्रेम कहाणि. सुरुवातिला नायिका ज्या बस मध्ये चढते तिथे फ्लॅश बॅक सुरु होतो खर ना शोनु?

  जोगी ला मोनिकाबद्दल काही वाटत असावे >>> तसा काही उल्लेख आला नाहीये कथेत त्यामुळे भाग १ च बरोबर असावा.

  सा आणि सः >>> ह्म्म संस्कृत एकदमच विसरले आहे Sad

  कथा संपली. दोनच दिवसांची गोष्ट आहे.
  मूळ श्लोक स्वाती ने पूर्ण दिला होता जुन्या हितगुजवर .
  त्याचा भावार्थ असा
  मला जी आवडते ती माझ्या बाबतीत विरक्त आहे
  अन तिला जो आवडतो त्याचं मन अजूनच कोणावर आहे.
  या सगळ्यांचा अन याला कारणी भूत असलेल्या मदनाचा ( व स्वतःचाही ) निषेध असो.
  झक्कींना पण माहित असेल कदाचित पूर्ण श्लोक.

  फसली म्हणायची कथा Sad

  स्वातीने म्हणजे बेटीने ना? आठवतय... ए शोनू आणि फसली वगैरे काही नाही हां.. चांगली वठलेय.. Happy

  नाय नाय ती नव्हे. म्हणजे तिने दिला असेल तर मला माहिती नाही. मला ( बोलाचेच ) लाडू फेम, एन जी बी बी च्या (सध्या गायब असलेल्या ) महामाता स्वाती देवींनी लिहिलेला लक्षात आहे.

  शोनु, छान आहे ग कथा... जोगीचा जीव शर्मिलावर आहे आणि शर्मिलाचा बसंतवर और बसंत तो किसी और को चहाता है. Happy

  आणि बसंत जिसको चाहता है वोह थोडेच दिनोंमे किसी और को चाहेगी Wink

  शोनु, फसली नाही कथा. त्या श्लोकाचा अर्थ माहित नसलेल्यांना पहिल्या प्रयत्नात कळ्ळी नाही. मला पण पहिल्या वाचनात जोगीच्या मनात काय असावे ते लक्षात आले नाही. slarti ने अर्थ सांगितल्यावर बोध झाला Happy

  http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103385&post=961613#P...

  इथे आहे ती चर्चा. अर्थ मी नाही, झेलम, नकुल इ. नी सांगितला होता.

  शोनू, कथा मस्त सुरू आहेत. मला पहिली जास्त आवडली. Happy

  शोनू, कथा शिर्षकाला न्याय करणारी आहे. मलाही पहिली जास्त आवडली.

  शोनू... छान आहे ही.. पण मला पहिली जास्त आवडली...

  माझ्या मते character estiblishments आणि वातावरण निर्मिती (ट्रिप ची सोडून) थोSSSSडी कमी पडली..
  e.g. शर्मिलेचं इतकं जास्त काकुबाई पण दाखवणं खरच गरजेचं होतं का? म्हणजे ते कथेसाठी खरच आवश्यक किंवा उपयोगी होतं का? असं मला वाटलं... तसच जोगी च्या शर्मिलेबद्द्ल काही भावना आहेत हे मलाही पहिल्या वाचनात कळलं नाही (खरं म्हणजे दुसर्‍याही नाही पण माहित असल्याने कळल्यासारखं झालं.. Happy ) तसचं बसंत ची आणि शर्मिलाची आधी ओळख असण्या नसण्यानी ह्या situation वर काही फरक पडला असता का? कारण तशीही ती सगळ्यांपासून फटकूनच होती...
  शेवट एकदम अचानक (abrupt) आणि अनपेक्षित आला...

  असो.. लहान तोंडी मोठा घास झाला असल्यास माफी असावी सरकार.. !! Happy

  चांगली जमलिये कि, नि शेवट पण वेगळ्या "type" चा Happy

  शोनू, साधीचं कथा पण छान फुलवलीस.

  उपास, शोले मधे कुठे प्रेमाचे वेगळे कंगोरे दाखवले आहेत?

  छान शोनू पण पहिली कथा कुठाय?? Sad

  'याम चिंतयामी सततं मयि सा विरक्ता......'
  हे काही वाचून कळलं नाही पण प्रतिक्रियांवरून कळाल Happy

  "The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
  Professor Richard L. Gregory.