एका सत्कार्याची हाक

Submitted by झुलेलाल on 24 April, 2012 - 07:15

कणकवलीचे आमदार प्रमोद जठार यांचे एक खुले पत्र...
नमस्कार!
आज एका वेगळ्याच विषय संदर्भात आपणाशी संपर्क साधत आहे. विषय आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यसेवा !

सरकारची 'संवेदनशीलता' तर जगजाहीरच आहे. आपल्या जिल्ह्यात अनेक डॉक्टरांची पदे मंजूर आहेत पण तेथे नियुक्त्याच झालेल्या नाहीत. औषधांचा तर नेहेमीच तुटवडा असतो. तपासणीची आधुनिक आयुधे आहेत पण ती चालवण्यासाठी लागणारे तंत्रज्ञच नाहीत. रुग्णवाहिकांची तर अवस्था फारच वाईट आहे. विधानसभेत हा प्रश्न लावून धरला तर ठर...सरकारी छापाची 'कारवाई' चालू आहे अशी उत्तरे मिळतात. अत्यवस्थ व्यक्तीला गोवा, कोल्हापूर वा मुंबईला धाव घेण्यावाचून पर्याय नसतो. खाजगी आरोग्यसेवा सर्वांनाच परवडते अशी गोष्ट नाही. नाममात्र फी घेऊन सेवाभावी वृत्तीने काम करणारे डॉक्टर्स आहेत परंतु ते 'अल्पसंख्य' आहेत.

म्हणून जेंव्हा मी जिल्ह्यात काम करायला सुरुवात केली तेंव्हाच 'सिंधुभूमी फौन्डेशन' ची स्थापना करून आरोग्यसेवा हे प्राथमिक ध्येय ठेवले. कणकवली व वैभववाडी या दोन तालुक्यांसाठी दोन रुग्णवाहिका जिल्ह्यात घेऊन कामाचा श्रीगणेशा केला.. नुकतीच एक तिसरी रुग्णवाहिका कासार्डयाच्या तिठ्यावर घेतली. या तिठ्याच्या परिसरात अपघातांचे प्रमाण खूप आहे व केवळ रुग्णालयापर्यंत वेळेत पोचले नाहीत म्हणून अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. आपल्या संस्थेच्या पुढाकाराने शेकडो 'मोतीबिंदू ' ग्रस्तांच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या गेल्या आहेत.

कॅन्सर, मेंदूविकार, हृदयविकार व मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या सर्वच वयोगटातील लोकांवर औषधोपचार व शस्त्रक्रिया मुंबईतील के.ई.एम., जे.जे., सायन, हिंदुजा सारख्या रुग्णालयात गेल्या काही वर्षात 'सिंधुभूमी फौन्डेशन'ने केले आहेत. यासाठी लागणारा निधी महाराष्ट्र शासनाच्या 'जीवनदायी' योजनेतून अथवा खाजगी धर्मादाय संद्थांच्या माध्यमातून उभा केला जातो. रुग्ण व त्यांच्या नातेवायीकांवर खर्चच कोणताही भर टाकला जात नाही. ज्यांची मुंबई निवासाची सोय नाही त्यांची देखील सोय 'सिंधुभूमी फौन्डेशन' मार्फत केली जाते. 'सिंधुभूमी फौन्डेशन' ला या कामात के.ई.एम. रुग्णालयाचे डीन डॉ. संजय ओंक, जे.जे. चे डीन डॉ. तात्याराव लहाने अशांसारख्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विशारदांची मदत होत असते तर लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ, नाना पालकर रुग्ण सेवा सदन या सारख्या नामांकित संस्थांची मदत होत असते. 'सिंधुभूमी फौन्डेशन' ने केवळ गावाकडून आलेल्या रुग्णांना त्वरित मदत मिळावी यासाठी पूर्णवेळ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांचा सर्व भर आपली संस्थाच वाहत असते. आता पर्यंत जिल्ह्यातील शेकडो रुग्णांवरील उपचारांसाठी लाखो रुपयांची मदत संस्थेने उभी केली आहे. 'सिंधुभूमी फौन्डेशन'च्या कार्याचा पसारा आता इतका वाढला आहे कि आता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेरील रुग्णदेखील संस्थेकडे मदतीसाठी येतात व संस्था आपपरभाव न ठेवता त्यांना मदत करते.

गेले काही महिने माझ्या मनात एक विषय ठाण मांडून आहे आणि तो म्हणजे अनेक आजारी रुग्णांना लागणारे " Dialysis " ! ज्यांची दोनही मूत्रपिंड निकामी झाली आहेत अशा रुग्णांची जिल्ह्यात संख्या बऱ्यापैकी आहे. त्यातील बहुसंख्य दारिद्र्य रेषेखालील आहेत. जिल्ह्यात सरकारी अशी कोणतीही सोय नाही. कणकवली व कुडाळ अशा दोन ठिकाणी डायलिसीस ची खाजगी सोय आहे परंतु त्यांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. खाजगी डॉक्टरांकडे एका वेळच्या Dialysis साठी १८०० ते २००० रुपये खर्च येतो ज्यांना आठवड्यातून दोन वेळा dialysis करावे लागते त्यांना हा खर्च आठवड्याला चार हजार व महिन्याला १६-१८००० च्या घरात जातो. हा खर्च चांगल्या वेतनदारांनादेखील परवडणारा नाही तिथे गरिबांची तर बातच सोडा ! संपूर्ण कुटुंब या खर्चापायी रस्त्यावर येत अथवा त्या आजारानेग्रस्त रुग्णाला केवळ उपचारांसाठी पैसे नाहीत म्हणून प्राण गमवावे लागतात. आपल्या जिल्ह्यात अशा रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.

आपण आपल्या या गरीब बंधू-भगिनींना 'जीवनदान' देण्याचा संकल्प सोडूया..!
एक आवाहन..!!
कणकवली येथे एक Dialysis सेंटर उभे करण्याचे 'सिंधुभूमी फौन्डेशन' ने निश्चित केले आहे. एका Dialysis मशीनचा खर्च साधारण १० - ११ लाख रुपयांपर्यंत जातो. अशा दोन मशीन कणकवलीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्याचे आहे. दोन मशीन, त्यांना लागणारी उपकरणे, फर्निचर इ. सहित एकूण खर्च २५,००,०००/- रुपयांपर्यंत येतो. या मशीनची रुग्णांना अल्प खर्चात सेवा देणे व देखभाल करण्यासाठी कणकवली येथील काही डॉक्टर्स तयार आहेत. मशीनसाठी लागणारी रक्कम समाजाकडून यावी हि अपेक्षा आहे व त्यासाठीच मी आपणा सर्वाना आवाहन करीत आहे. समाजात दाते खूप आहेत फक्त त्यांच्यापर्यंत आपल्या वेदना पोचल्या पाहिजेत असा माझा अनुभव आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या कोकणातील गरीब बांधवाना आपल्या मदतीची खूप गरज आहे. कोकणातून बाहेर पडलेले आपण सर्वजण आपापल्या आयुष्यात खूप यशस्वी झालो परंतु आपला गाव मात्र आहे तेथेच राहिलाय. निदान त्यांना एक चांगला जीवन जगण्यासाठी, त्यांना निरामय आयुष्य देण्यासाठी आपण सर्वजण नक्कीच मदत कराल अशी अपेक्षा आहे.

आज आपल्या गावातील बांधव म्हणतायत..
दाता नको, आम्हाला त्राता हवा..,
आधाराचा समर्थ हात हवा..!

मग होणार ना आपणच आपल्या गावाचे तारणहार?

ज्यांना Project Dialysis साठी मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी त्यांचे धनादेश Sindhubhumi Foundation या नावाने द्यावेत.
Sindhubhumi Foundation चा संपर्क क्रमांक ०२२ २३७२ ११२२ / २३७२ ११२३ असा आहे.

या संदर्भात आपण माझे स्वीय सहाय्यक श्री. गणेश साळुंखे यांच्याशी ०9321811091 वा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री. अरविंद कुडतरकर ०94223 74024 यांचाशी संपर्क साधावा हि विनंती..!

आपला
-गणेश साळुंखे
स्वीय्य सहाय्यक
आमदार प्रमोदजी जठार

गुलमोहर: