पाकिस्तानमधील परिवर्तनासाठी त्यांच्या लष्करात आधी परिवर्तन व्हायला हवे!

Submitted by sudhirkale42 on 23 April, 2012 - 13:15

अनुवादः सुधीर काळे, जकार्ता
पाकिस्तानी लष्कराने आणि लष्करशहांच्या डावपेचातील दुस्साहसामुळे पाकिस्तान आजच्या स्थितीला पोचला आहे. आज त्याला भेडसवणार्‍या आतंकवादाच्या पाउलखुणांचा उगम शोधू गेल्यास या पाउलखुणा अफगाणिस्तानच्या पहिल्या ’जिहाद’ युद्धापर्यंत गेलेल्या दिसतील. हे जिहादी युद्ध एक लष्कराच्या प्रेरणेने घडविले गेलेले युद्ध असून या युद्धाने पाकिस्तानला बुद्धिभ्रष्टतेच्या सीमेवर आणून उभे केलेले आहे. या राखेतून कुठलाच फिनिक्स पक्षी जिवंत होणार नसून लष्कराने आपली स्वत:ची विचारसरणी, मानसिकता, स्वत:चा दृष्टिकोन बदलल्याशिवाय पाकिस्तानमध्ये समजूतदारपणाचे पुनरागमन होणे शक्य नाहीं.
पाकिस्तानचे मुलकी सरकारही इथे अपयशी, थिटे ठरले आहे व त्याच्यावरही इस्लामच्या या बालेकिल्ल्यातील-पाकिस्तानमधील-सावळ्या गोंधळाची जबाबदारी येतेच. पण पाकिस्तानला आज आर्थिक दिवाळखोरीच्या कड्यावर आणून सोडणार्‍या रथाचे सारथी पाकिस्तानचे "परमपूज्य संरक्षक", तिचे खाकी वर्दीतील उच्च सेनानीच आहेत यात शंका नाहीं!
सावळ्या गोंधळाचे वाढते पुरावे असूनही पूर्वेकडूनच्या धोक्याचे निमित्त्य देणारे आणि अफगाणिस्तानवरील आपली पकड कायम ठेवण्याच्या शेख महमदी स्वप्नात मश्गुल असलेले पाकिस्तानी लष्कर परिवर्तनास नकार देत आहे. अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष ताजिकी आहे कीं उझबेक आहे कीं पठाण आहे याच्याशी पाकिस्तानला काय देणे-घेणे आहे आणि त्यांच्या भानगडीत नाक खुपसायची पाकिस्तानला काय गरज आहे ते देवालाच ठाऊक! त्यापेक्षा आपल्या समस्यांवर आपले लक्ष आपण केंद्रित नको कां करायला? आपल्याला धोका संभवतो तो पाकिस्तानमधूनच पण आपले लष्करशहा "बुद्धिबळपटू" स्वत:ला परराष्ट्र धोरणातील विशेषज्ञही समजतात व तिथेही लुडबुड करू पहातात!
आज जर स्टॅलिन जिवंत असता (असे आता कुठे व्हायला?) तर त्याने अतिरेक्यांना किंवा दहशतवाद्यांना ठार मारण्याआधी चित्रवाणीच्या कलामंचाMवर (TV Studios) लुडबुड करणार्‍या आमच्या परराष्ट्रनीतीतील "धुरंदरां"ना ठार केले असते!
कराचीतील हिंसाचाराची सूत्रे "मोसाद"च्या हातात थोडीच आहेत? मस्तुंग येथे शिया यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्यामागे CIA आहे? कराचीचे प्रमुख अन्वेषक चौधरी अस्लाम[१] यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यामागे भारतीय गुप्तहेर संघटना "रॉ" थोडीच आहे!
कसाही हिशेब केला तरी पाकिस्तानकडे सध्या पुरेशी अण्वस्त्रे आहेत. कुठल्याही व्यवहार ज्ञानानुसार (राष्ट्रीय सुरक्षिततेच्या चर्चासत्रांत या व्यवहार ज्ञाननाचीच जबरदस्त उणीव आहे!) पाकिस्तानकडे भारताकडून होणार्‍या खर्‍या-खुर्‍या वा काल्पनिक धोक्याला परावृत्त करण्याची आणि त्याला तोंड देण्याची भरपूर क्षमता आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या सर्व शक्ती घरच्या शत्रूकडून असलेल्या धोक्याविरुद्ध वापरल्या पाहिजेत आणि हा धोका आहे इस्लामच्या झेंड्याखाली काहूर माजविणार्‍या दहशतवाद्यांकडून.
यावर इलाज म्हणून अफगाणिस्तानच्या भवितव्याच्या चिंतेने झपाटलेल्या आपल्या फौजेतील आणि ISI मधील सेनानींना सद्बुद्धी देण्यासाठी आपल्याला हकीम लुकमान[२] यांच्या तोडीच्या एकाद्या ज्ञानी माणसासाठी जाहिरात द्यावी लागेल. अफागणिस्तानमुळे आपण चांगलेच पोळून निघालेलो, भस्म झालेलो आहोत. आजच्यापेक्षा जास्त त्रास घेण्याची आपल्याला गरज नाहीं. उलट पाकिस्तानाच्या हितासाठी आपण स्वत:ला अफगाणिस्तानच्या बिकट समस्यांपासून शक्य तितके दूरच ठेवले पाहिजे.
एक गोष्ट तर खरीच कीं अमेरिकेचा अफगाणिस्तानात शांतता आणायचा प्रयत्न पूर्णत: फसला आहे. हरायची किंवा माघार घ्यायची गोष्ट तर दूरच, तालीबान संघटना पूर्वी कधीही नव्हती इतकी आता मजबूत झालेली आहे. अफगाणिस्तान सोडायचा निर्णय अमेरिकेने घेतलेलाच आहे व त्यानुसार जेंव्हा अमेरिका आपले सैन्य तिथून पूर्णपणे काढून घेईल तेंव्हा अफगाणिस्तानात पुन्हा यादवी युद्ध माजेल ही दगडावरची रेघ आहे! या परिस्थितीत पाकिस्तानच्या डावपेचकुशल "विद्वानां"नी कुठल्याही मोहाला बळी न पडता कुणाचीही बाजू घेणे टाळले पाहिजे. तालीबनी विजयी होतात कीं आणखी कुणी दुसरा विजयी होतो यात पाकिस्तानला काय देणे-घेणे आहे?
म्हणूनचे भविष्यकाळातील युद्धाच्या डावपेचांत वापरण्यासाठी पाळलेले मोहरे आता कुचकामाचे आहेत. या तर्‍हेचे डावपेच खेळण्याची जबरदस्त किंमत आपण आतापर्यंत मोजली आहे! ती चूक आपण पुन्हा कदापीही करता कामा नये! आपण गुलबुद्दिन हिकमतयार याच्यासारखे मोहरे पूर्वी वापरले. त्यातून आपले काय भले झाले? आपण कितीही नाकबूल केले तरी आपले सध्याचे मोहरे आहेत सिराजुद्दिन हक्कानी आणि त्याचे टोळके[३]! त्यांच्याकडून आपले काय भले होणार आहे? ते आपला देश (अफगाणिस्तान) जपून ठेवायला ISI कडे थोडेच देणार आहेत? या परिस्थितीत या लष्करी धोरणाला महान डावपेच म्हणायचे कीं जुन्या घोडचुकांची पुनरावृत्ती म्हणायचे?
अबताबादच्या वृक्षाच्छादित परिसरात ओसामा बिन लादेन सापडला या घटनेने आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला जबाबदार असलेल्या सेनानींना खाडकन् जाग यायला हवी होती. अशा तर्‍हेने वस्त्रहरण झाल्यावर लज्जेपायी का होईना पण कमीत-कमी त्यांच्या वागण्यात एक तर्‍हेची नम्रता दिसायला हवी होती. पण त्यांनी तर स्वत:ला आपल्या बंकर्समध्ये आणखीनच खोलवर गाडून घेतले आहे!
जसजशी अफगाणिस्तानच्या युद्धातील सत्यपरिस्थिती उघड होऊ लागली आहेत तसतशी अमेरिका "बकरा" तर शोधू लागली आहे व तिच्या आपल्याकडूनच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत आपण डावपेचांसाठी "मोहरे" पाळायचा जुना बदनाम सिद्धांत सोडून दिला पाहिजे. हक्कानी टोळके अफगाणिस्तानच्या हितसंबंधांसाठी उपयुक्त असेल पण कुठल्याही परिस्थितीत त्यांना पाकिस्तानचे अमेरिकेबरोबरचे जुने आणि उपयुक्त संबंध तोडण्याचा किंवा त्यांच्यात बिब्बा घालण्याचा अधिकार नाहीं!
उत्तर वझीरिस्तानात किंवा इतर कुठेही एकादी लष्करी मोहीम कार्यान्वित करण्याचा निर्णय केवळ पाकिस्तानचा असेल, जे पाकिस्तानच्या हिताचे आहे तेच पाकिस्तान आचरणात आणेल आणि त्याबाबतीत अमेरिकेकडून आलेले हुकूम पाकिस्तान पाळणार नाहीं असे जे ज. कयानी म्हणतात ते १०० टक्के बरोबर आहे. सारी पाकिस्तानी जनतासुद्धा एकमुखाने हीच मागणी करत आहे.
या परिस्थितीत "हक्कानी टोळक्याला ISI चा पाठिंबा आहे" हा संशय सर्वांच्या मनात तसाच रेंगाळत का राहू द्यायचा? इस्लामाबादच्या उच्चभ्रूंच्या संध्याकाळच्या "ओल्या" पार्ट्यांमध्येसुद्धा हा विषय चघळला जात आहे हे नक्की! हा संशय जर निराधार, बिनबुडाचा असता तर प्रसारमाध्यमांना "गोंजारणार्‍या" ISI च्या यंत्रणेने हा संशय समूळ उपटून टाकण्यासाठी जिवाचे रान केले असते! पण पाकिस्तानने या विषयाला नीट न हाताळल्यामुळे हक्कानी टोळक्याला पाकिस्तानी लष्कराचे गुप्त समर्थन असल्याचा मुद्दा आता पेंटॅगॉन आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यातला एक बोचरा विषय झालेला आहे. या संशयाचे पिशाच्च असे वाढू देण्यात आपल्या "पालनहार" मंडळींची मोठी चूकच झाली आहे.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री लियॉन पॅनेटा आणि CIA चे प्रमुख ज. पेट्रेउस यांचे वक्तव्य म्हणजे कांही देवाने दिलेला कौल नाहीं आहे किंवा कुठली आकाशवाणीही नाहीं कीं ज्यांच्या वक्तव्यावर १०० टक्के कुणी विश्वास ठेवावा! ते जे सांगतील तो कांहीं ईश्वरी साक्षात्कार नव्हे! उत्तर वझीरिस्तान हा भाग तालीबानचे एक आश्रयस्थान बनले आहे कीं नाहीं किंवा हक्कानी टोळके या भागाचा एक सुरक्षित तळ म्हणून वापरता कीं नाहीं अशा प्रश्नांच्या बाबतीत आपण आपल्याशीच प्रामाणिक राहिले पाहिजे!
उत्तर वझीरिस्तान अशा दहशतवाद्यांचे आश्रयस्थान खरेच झाले असेल तर त्याबद्दल पाकिस्तानला कांहीं तरी ठोस कारवाई करायलाच हवी! अमेरिकेच्या आज्ञेचे पालन म्हणून नव्हे तर असे करणे पाकिस्तानच्या हिताचे आहे म्हणून! आणि त्या भागात आपण कांहीं करण्यास असमर्थ असलो तर आपल्या सारभौमत्वाबाबतचे अमेरिकेकडे पाठविलेले आपले निषेध[४] पोकळच म्हणावे लागतील.
मध्यपूर्वेपासून इराकपर्यंतपर्यंतच्या, अफगाणिस्तानपर्यंतच्या अनेक कुरापतींबद्दल आपण अमेरिकेला जबाबदार धरले पाहिजे यात शंका नाहीं पण मस्तुंगमध्ये आणि कराचीमध्ये थैमान घालणारी भुते अमेरिकेची नाहींत. त्यांना जन्माला घालून पोसले आहे आपणच व म्हणून या थैमानांची जबाबदारी पूर्णपणे आपल्याच खांद्यावर आहे.
ज्या दिवशी तालीबान संघटना अफगाणिस्तानात पुन्हा सत्तेवर येईल त्या दिवसाची आपण पाकिस्तान्यांनी धास्तीच घेतली पाहिजे. कारण या घटनेने धर्माच्या नावाखाली पाकिस्तानमधील होणार्‍या दहशतवादाला केवढी चालना मिळेल! मग कांहीं अमेरिका आपल्या बचावाला येणार नाहीं! त्यावेळी आपण एकटे स्वत:वरच निर्भर असू व त्यावेळी हक्कानी टोळके पूर्वी आपल्या डावपेचातले मोहरे होते कीं नाहीं याचा आपल्याला कांहींच फायदा होणार नाहीं. (ज्या व्यक्तीने "डावपेचातले मोहरे" हा शब्दप्रयोग शोधून रूढ केला ती अतिहुशार व्यक्ती कोण असावी? कारण त्या व्यक्तीला याबद्दलचे स्पष्टीकरण द्यावे लागेल!!)
पाकिस्तानला ज्या दहशतवाद्यांना तोंड द्यायचे आहे ते कशालाच बिचकत नाहींत! ते दयामाया नसलेले क्रूर लोक आहेत. पण तरी सामुदायिकपणे आपल्याला या धोक्यासंबंधी अद्याप जागृती आलेली नाहीं. म्हणूनच एक राष्ट्र म्हणून आपले त्यांना प्रत्युत्तर कधी मवाळ असते तर कधी जहाल! आपल्या न्यायालयांनी तरी आतापर्यंत किती दहशतवाद्यांना शिक्षा सुनावली आहे? अगदीच क्वचित्, अगदी हातांच्या बोटावर मोजता येतील इतक्यांनाच. सबब काय दिली जाते? कायदेशीर कारवाई कच्ची असते ही आणि पुरावाही यथा-तथाच असतो ही. पण एकादा आसिया बीबीसारखा खटला[५] सुनावणीला आला कीं त्याचा निकाल जलद लागतो व शिक्षाही कठोर ठोठावली जाते मग पुरावा ठोस असो अथवा कच्चा असो. कारण या तथाकथित गुन्ह्यामागे धार्मिक अर्थ ध्वनित असतो.
पाकिस्तानचे सरन्यायाधीश कराचीमधील अधिकारी वर्गाला-त्यातही खास करून पोलीस अधिकार्‍यांना-खडसावून त्यांची कानउघाडणी करीत आहेत पण असे नुसते ताशेरे ओढून काय साध्य होणार? न्यायसंस्थेतच काय त्रुटी आहेत, काय उणीवा आहेत इकडे जर सरन्यायाधीशांनी लक्ष दिले तर त्याचा खूप उपयोग होईल.
वर्षानुवर्षांच्या दुस्साहसांमुळे पाकिस्तानी लोकांची मनोवृत्ती विकृतच नव्हे तर दूषित झालेली आहे. आपण वास्तवसृष्टीत रहात नाहीं आहोत. आपल्या परराष्ट्र धोरणाच्या कल्पनांचे, आपल्या सामर्थ्यांचे आणि आपल्याला असलेल्या धोक्यांचे वास्तवतेबरोबर फारच थोडे नाते उरले आहे. या परिस्थितीच्या मूलगामी कारणांचा आपण शोध घेतला पाहिजे. आपण स्वत:च स्वत:ची अशी होळी कशी पेटविली? आपण आपल्या भ्रामक कल्पनांना कसे बळी पडलो?
पाकिस्तानी मनोवृत्तीची स्वत:च केलेल्या चुकांच्या विळख्यातून मुक्तता करण्याला आपण सर्वात उच्च प्राधान्य द्यायला हवे. यात जर आपल्याला सुदैवाने यश मिळाले तरच आपण एक सामान्य राष्ट्र म्हणून जगू शकू.
Ayaz Amir.jpg
(या लेखाचे मूळ लेखक आहेत अयाज अमीर. ते एक नावाजलेले पत्रकार व स्तंभलेखक असून आधी "डॉन" या वृत्तपत्रासाठी लिहीत. सध्या ते The News International या "जंग" ग्रुपच्या मालकीच्या वृत्तपत्रात लिहितात. २००८सालच्या निवडणुकीत ते पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज या पक्षातर्फे ते चकवाल मतदारसंघातून पाकिस्तानी लोकसभेवर निवडून आले.
मूळ लेख http://www.thenews.com.pk/TodaysPrintDetail.aspx?ID=69052&Cat=9 या दुव्यावर वाचता येईल)

गुलमोहर: 

छान माहिती... परिवर्तन व्हायला हवे, पण कोण करणार आणि कसे करणार?

मध्यपूर्वेपासून इराकपर्यंतपर्यंतच्या, अफगाणिस्तानपर्यंतच्या अनेक कुरापतींबद्दल आपण अमेरिकेला जबाबदार धरले पाहिजे यात शंका नाहीं पण मस्तुंगमध्ये आणि कराचीमध्ये थैमान घालणारी भुते अमेरिकेची नाहींत. त्यांना जन्माला घालून पोसले आहे आपणच व म्हणून या थैमानांची जबाबदारी पूर्णपणे आपल्याच खांद्यावर आहे.
----- धाडसाचे कौतुक करायला हवे.

उदय-जी,
धाडसाचे कौतुक करायला हवे
लेखकाच्या धाडसाचे कौतुक तर करायला हवेच पण अशी मते जाहीरपणे मांडणार्‍या उमेदवाराला लोकसभेवर निवडून देणार्‍या जनतेच्या प्रगल्भपणाचेसुद्धा कौतुक करायला हवे! असेच आशेचे किरण मला दिसतात व मला वाटते कीं माझ्या हयातीत न का होईना पण २०-२५ वर्षांत आपल्या दोन देशातील मैत्री आजच्या तरुण मंडळींना नक्कीच पहायला मिळेल.
किरण-जी आणि कंसराज-जी, धन्यवाद!

धाडसाचे कौतुक करायला हवे
लेखकाच्या धाडसाचे कौतुक तर करायला हवेच पण अशी मते जाहीरपणे मांडणार्‍या उमेदवाराला लोकसभेवर निवडून देणार्‍या जनतेच्या प्रगल्भपणाचेसुद्धा कौतुक करायला हवे!>>>> अगदी अगदी. हि खरेच विचार करायला भाग पाडणारी बाब आहे.

>>कसाही हिशेब केला तरी पाकिस्तानकडे सध्या पुरेशी अण्वस्त्रे आहेत. कुठल्याही व्यवहार ज्ञानानुसार (राष्ट्रीय सुरक्षिततेच्या चर्चासत्रांत या व्यवहार ज्ञाननाचीच जबरदस्त उणीव आहे!) पाकिस्तानकडे भारताकडून होणार्‍या खर्‍या-खुर्‍या वा काल्पनिक धोक्याला परावृत्त करण्याची आणि त्याला तोंड देण्याची भरपूर क्षमता आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या सर्व शक्ती घरच्या शत्रूकडून असलेल्या धोक्याविरुद्ध वापरल्या पाहिजेत आणि हा धोका आहे इस्लामच्या झेंड्याखाली काहूर माजविणार्‍या दहशतवाद्यांकडून.<<

या लेखातील हा भाग वाचा. शिवाय सबंध लेखात भारतावरील दहशतवादी हल्ल्यांबद्दल कांही आहे का ते शोधा. लेखकाला नैसर्गिकपणे त्यांनाच दहशतवादाची झळ पोचते आहे त्याबद्दल चिंता आहे. ती दर्शविण्याचे धाडस त्याने दाखवले आहे हे मात्र खरे! पण यांना गप्प बसवायला लष्कराला कितिसा वेळ लागणार आहे?
भारतीयांनी हुरळून जावे असे या लेखात काय आहे?

दामोदरसुत-साहेब,
एकादी सकारात्मक घटना दिसली व तिचा उल्लेख केला तर त्याला "हुरळून जाणे" का म्हणायचे?
अयाज अमीर गेली कित्येक वर्षे या धर्तीचे लेखन करीत आहेत. तसेच कामरान शफी (हे स्वतः पाकिस्तानी फौजेत होते व पुढे बेनझीरचे सचीवही होते), हूडाभॉय व श्रीमती हुमा युसुफ हे स्तंभलेखकही समतोल लिहिणारे आहेत. त्यांना प्रोत्साहन का नाहीं द्यायचे? असे करणे म्हणजे हुरळून जाणे नव्हे.
भारत-पाकिस्तान वैराचा शेवट झालाच पाहिजे! अन्यथा दोन्ही देश एकमेकांना नष्ट करतील.

>>भारत-पाकिस्तान वैराचा शेवट झालाच पाहिजे! अन्यथा दोन्ही देश एकमेकांना नष्ट करतील<<
अहो तुमच्या एकट्याचीच नव्हे तर प्रत्येक भारतीयाची 'वैराचा शेवट झालाच पाहिजे' हीच इच्छा आहे, इथे कुणाला व्हायचेय नष्ट?
आपल्या दृष्टीने प्रश्न हा आहे कि हे स्तंभलेखक कित्येक वर्षे लिहीत आले तरी भारताविरुद्धच्या पाकिस्तानच्या कारवायांमध्ये कांही फरक पडला आहे काय? ते बेनझीरचे सचीव असले काय वा फौजेत असले काय वा स्तंभलेखक असले काय दहशतवाद चालूच आहे ना?
दुसरी गोष्ट : हे फक्त सकारात्मक लिखाण आहे आणि त्याबद्दल आम्ही त्यांच्या धाडसाचे कौतुकच केले आहे. या कौतुकामुळे त्यांना लष्कराचा दृष्टिकोण बदलायला उपयोग होईल असे मानणे भाबडेपणाचे नाही तर काय आहे? हां , आपल्या विचारांचे स्वागत करणारे भारतात कोणीतरी आहे याचे मानसिक समाधान त्यांना मिळू शकेल. पण आपण केलेल्या या भलावणीने त्यांच्यावर गद्दारीचा आरोप ठेऊन लष्कराकडून त्यांना अधिक त्रास तर होणार नाहीना? तेव्हां 'अति सर्वत्र वर्जयेत'.

दामोदरसुत-साहेब,
मी गेली १० वर्षे नियमितपणे डॉन वाचत आलेलो आहे. पण सध्या भारताची भलावण करणारे लेखन जितके वाचायला मिळते तितके पूर्वी कधीही मी वाचलेले नाहीं. त्यावेळी पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती-कदाचित अमेरिकेच्या मेहेरबानीने असेल-आपल्यापेक्षा चांगली होती. त्याची मस्तीही त्यांच्या लिखाणात दिसायची. पण आता चित्र पार पालटले आहे व त्याचा प्रत्यय डॉन वाचताना मला पदोपदी येतो.
कारण कांहींही असो, पण जर वैर संपत असेल तर अशा प्रयत्नांचे स्वागत करावे अशा मताचा मी आहे.
आज पाकिस्तानी फौजेचे आणि जनतेचे धृवीकरण होत आहे (polarisation). कांहीं कट्टर धर्मांध होत आहेत, शियांचे, अहमदियांचे रोज शिरकाण चालले आहे तर कांहींना या धर्मांधतेची काळजी वाटू लागली आहे. अशा वेळी आपण भारतीय कसे वागतो, कुणाला समर्थन देतो याला अनन्यसाधारण महत्व आलेले आहे असेच मला वाटते.
बस्स, इतकेच पुरे सध्या तरी.

काळेसाहेब, फार चांगल्या लेखाचं, तितकंच उत्तम भाषांतर केलंत. धन्यवाद!

अयाझ अमीर, इरफान हुसेन आणि आर्देशीर कोवासजी हे डॉनचे सगळ्यात जुने स्तंभलेखक अतीशय समतोल विचारांचे लेख लिहीत आले आहेत.

>>कांहीं कट्टर धर्मांध होत आहेत, शियांचे, अहमदियांचे रोज शिरकाण चालले आहे तर कांहींना या धर्मांधतेची काळजी वाटू लागली आहे.
हुसेनांचा 'मायनॉरिटी रीपोर्ट' यावर बराच प्रकाश टाकतो!

>>सध्या भारताची भलावण करणारे लेखन जितके वाचायला मिळते तितके पूर्वी कधीही मी वाचलेले नाहीं. त्यावेळी पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती-कदाचित अमेरिकेच्या मेहेरबानीने असेल-आपल्यापेक्षा चांगली होती. त्याची मस्तीही त्यांच्या लिखाणात दिसायची. पण आता चित्र पार पालटले आहे व त्याचा प्रत्यय डॉन वाचताना मला पदोपदी येतो.<<

काळेजी,
भारतात कोठल्याही रंगाचे सरकार येवो व कोठलीही परिस्थिती असो, भारताचे धोरण तिकडच्या समंजस गटांबद्द्ल सहानुभूतिचेच राहिलेले आहे. सरड्यासारखे रंग बदलणारे नाही. काल मस्ती व आज नरमाई याला विश्वासार्हता म्हणता येत नाही. अगदी बांगला देश निर्माण व्हायच्या आधीची परिस्थिती असो वा बांगला देश निर्मिती नंतरची असो (म्हणजे युद्धाआधी वा विजयानंतर) भारताने संयमीत वर्तन केलेले आहे. पाकचा पंतप्रधान आपल्या पंतप्रधानाचे स्वागत करत असतांना त्याचे लष्कर मात्र दगाबाजीने 'कार्गील' करीत असते. अशी किति उदाहरणे द्यावीत? आज धर्मांधता त्यांचाच घात करू लागल्यावर त्यांची भाषा बदलू लागली आहे . जोवर जिहादींचे इकडे येणे प्रत्यक्षात पूर्णपणे थांबत नाही तोवर लष्कर व आयेसाय बदलले असे मानता कामा नये.
म्हणून म्हणतो कि या लेखकांच्या धाडसाचे कौतुक करा पण भाबडेपणाने करू नका. हुरळून जाऊ नका

आपण तिकडील प्रसारमाध्यमांमध्ये भारताबद्दल काय मत आहे त्याचा सातत्याने दीर्घकाळ अभ्यास करता आहात हे कौतुकास्पद आहे, कांहीनी तिकडेही लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. त्याबद्दल आपल्याला धन्यवाद.

सध्या भारताची भलावण करणारे लेखन जितके वाचायला मिळते तितके पूर्वी कधीही मी वाचलेले नाहीं. त्यावेळी पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती-कदाचित अमेरिकेच्या मेहेरबानीने असेल-आपल्यापेक्षा चांगली होती. त्याची मस्तीही त्यांच्या लिखाणात दिसायची. पण आता चित्र पार पालटले आहे व त्याचा प्रत्यय डॉन वाचताना मला पदोपदी येतो.
----- पुर्वी पाकिस्तान सुस्थितीत होता - लिखाणांत मस्ती दिसायची.
आज तितका सुस्थितीत नाही आहे - भारताची भलावण करणारे लेखन किंवा भाषा नरमाईची आहे.

दामोदरसुतांशी सहमत. हे मैत्रीचे वारे मला पुर्ण अनैसर्गिक दिसत आहेत. चार दोन आशेचे बुड बुडे पाक वर्तमान पत्रात वाचायला मिळतील. अशा मैत्रीच्या आशेने भारावलेले भारतात त्याच्या हजार पट लोकं आहेत. संपुर्ण पाक लष्कराची किंवा आय एस आय ची मानसिकता बदलणे हे नजिकच्या भविष्यात शक्य नाही आणि भारताच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. जेव्हाही भारताने मैत्री मधे पुढाकार घेतला आणि स्वारस्य दाखवले त्या प्रत्येक वेळी भारताला परती मधे काय मिळाले ?

२६-११ घटनेनंतर पाकला भारताशी मैत्री दाखवण्याची सुवर्ण संधी मिळाली होती... तिथे संपुर्ण असहकार्य दाखवले असतांना मैत्री हे निव्वळ दिवसा पडलेले स्वप्न वाटते.

दामोदरसुत-जी आणि उदय-जी,
लोकशाही राष्ट्र म्हणून भारताने पाकिस्तानी मुलकी सरकारांना योग्य सन्मान दिला पाहिजे. उदा. सध्या ज. कयानी यांनी भारताला "सियाचनवरून दोन्ही राष्ट्रांनी आपापल्या फौजा मागे घ्याव्यात" असे आवाहन केले. अशा वेळी भारताने कयानींना "तुमच्या राष्ट्राध्यक्षांना/पंतप्रधानांना आमच्याबरोबर चर्चा करायला येऊ दे" असा निरोप द्यायला हवा. तरच लष्कराला (व जगाला) योग्य तो संदेश मिळेल.

या उलट आपण जर अतिउत्साह दाखवून त्यांच्याशी चर्चा करू लागलो तर निवडून आलेल्या सरकारचा कचराच होतो! असे करणे आपण टाळले पाहिजे. जरासा द्राविडी प्राणायाम होईल, जरा वेळेचा अपव्यय होईल, पण लष्कराला त्याजी "जागा" दाखवून द्यायलाच हवी! समझोता व्हायचा असेल तर कसाही होईलच, नाहीं का?

कधीही हुरळून जाऊ नये. हस्तांदोलन करायला कचरू नये, पण हस्तांदोलनानंतर आपली पाची बोटे परत आलेली आहेत ना हे जरूर पहावे. पण हस्तांदोलनाला मागे-पुढे बघू नये असे मला वाटते.

मागे १९८७ मध्ये हँबुर्गला गेलेलो असताना तिथल्या पश्चिम जर्मन गृहस्थाबरोबर बर्लिनची भिंत पडण्याबद्दल चर्चा झाली. तो मनुष्य म्हणाला कीं त्याच्या हयातीत तरी हे शक्य होईल असे दिसत नाहीं. कारण एकीकडे चंगळवाद तर दुसरीकडे साम्यवाद यांची मोट कशी बांधली जाईल? दोन वर्षात (१९८९साली) भिंत पडून जर्मनी एक झाला व सध्याच्या जर्मन चॅन्सलर श्रीमती आंगेला मर्कल पूर्व जर्मनीच्या रहिवासी आहेत! कालाय तस्मै नमः!

संपुर्ण पाक लष्कराची किंवा आय एस आय ची मानसिकता बदलणे हे नजिकच्या भविष्यात शक्य नाही आणि भारताच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. >>> भारताला स्वतःचे नक्षलवादी (त्यांचे विचार) बदलता येत नाहीत. तेव्हा बाकिच्यां गोष्टींबद्दलचा आवाका आपण सर्व सामान्य माणसे समजु शकतो. जेथे लोकप्रतिनिधींना काहिही करायची सुधारणा घडवायची इच्छा नाही तेथे विकास साधणे कठीण ठरते.

मोनालिप-मॅडम,
१००टक्के सहमत! मी इतरत्रही बर्‍याचदा लिहिले आहे कीं भारतीय लोकांची निर्मितीक्षमता, कल्पकता आणि सृजनशीलता (creativity) इतकी प्रचंड आहे कीं असे नीचतम कर्तबगारीचे नेतृत्व असूनही आपला देश इतका पुढारलेला आहे.
आणि हे मला खास करून परदेशात जाणवते. जिथे जर्मन, जपानी, कोरियन लोक यशस्वी झालेले नाहींत तिथे भारतीय लोकांनी बाजी मारलेली आहे. आपल्याला कर्तबगार नेतृत्व मिळाले तर आपण कुठल्याकुठे नेऊ देशाला!

>>भारतीय लोकांची निर्मितीक्षमता, कल्पकता आणि सृजनशीलता (creativity) इतकी प्रचंड आहे कीं असे नीचतम कर्तबगारीचे नेतृत्व असूनही आपला देश इतका पुढारलेला आहे.
सोलह आने सत्यवचन श्रीमान !

सुधीरजी व अन्य पाकिस्तानचा कानोसा ऐकण्यात रस असणाऱे मित्र हो,
सोबतची चर्चा धाग्याच्या संबंधी नसली तरी 'सोचता पाकिस्तान' मधे गिलानीं प्रधान मंत्री म्हणून या पुढे राहावे किंवा नाही. राहायाला काही हरकत नसावी, असा चर्चेचा तोंडावळा आहे.

पाकिस्तानच्या लष्करात परिवर्तन व्हायला हवे पण करणार कोण? ज्या देशाची निर्मिती जर भारतद्वेषावर बेतलेली असेल तर तुम्ही परिवरर्ताची अपेक्षा कशी काय करता? जरी पाकिस्ताननी केलेली सर्व आक्रमणे विसरली, सर्व दहशदवादी हल्ले विसरले आणि चर्चेला बसलो तरी कुत्राची शेपूट वाकडीच असते हेच प्रत्ययास आले आहे. कितीही प्रयत्न केले, तरी आज ५४% पाकिस्तानी जनमत भारतविरोधी आणि जवळपास १००% अमेरिकाविरोधी आहे. आणखी प्रयत्न केले तरी ८०-२० रुलनुसार तिथले २०% भारतद्वेष्टे लोक इथे ८०% दहशदवादी हल्ले करण्यास सक्षम आहेत. तुमच्याकडे काही उपाय आहे का कि त्याने १००% पाकिस्तानी लोकांना भारताविषयी मित्रत्वाची भावना तयार होईल? जनमत बदलले कि लष्कर व आय-एस-आय काही कुरापत काढणार नाही. किमान तशी अपेक्षा करता येईल.

५४% पाकिस्तानी जनमत भारतविरोधी आणि जवळपास १००% अमेरिकाविरोधी आहे.
------ ५४ % हे कुठुन आले?
लष्करी पोलादी पकड असतांना नुसते % असुन उपयोग नाही, त्यांचा आवाज तेव्हढाच सक्षम असायला हवा. पाक क्रिकेट संघाचा कर्णधार असुनही त्याला त्याचे मत (भारतात मोहाली मधे एक आणि त्याच्या अगदी विपर्यास्त पाकमधे गेल्यावर) २४ तासांत बदलावे लागते तर अशा आवाजांचा काय उपयोग? उलट अशा वागण्याने (भारतात) अविश्वास वाढेल. तेथे लोकशाही नाही आहे, जे काही निवडणुकीचे नाटके होतांत त्यातुन आलेले बाहुले कुठलाच ठोस निर्णय घेण्यास स्वातंत्र नाही. उदा (अ) २६-११ नंतर आय एस आय प्रमुख पाशा भारतात येतील आणि चौकशी साठी मदत करतील हा पाक प्रधानांचा आदेश त्यांना नंतर मागे घ्यावा लागला. (ब) अमेरिकन दौर्‍यात त्यांनी लष्कराशी निगडित (अमेरिकेला अडचण असणारे) काही मोहोरे हलवल्याची घोषणा केली, पाक मधे परतल्यावर त्यांना ते मोहोरे पुन्हा पुर्वपदावर ठेवावे लागले.

गौतमिपुत्रशालिवाहन-जी आणि उदय-जी,
हा लेख पाकिस्तानच्या एका खासदाराने लिहिला आहे. मी नेव्हे. त्याच्या मनात असा बदल पाकिस्तानात व्हायला हवा आहे व त्यासाठी लष्कराने बदलले पाहिजे असे तो म्हणत आहे. आज एक खासदार असे म्हणतो आहे हे महत्वाचे. शिवाय कामरान शफी यांच्यासारखा सेवानिवृत्त मेजरसुद्धा लष्करावर जोरदार टीका करतो. सलीम शहजादसारखा पत्रकार मारला जातो त्याच्याबद्दलही जनमानसात तिरस्कार आहे. हुकुमशाही संपायला वेळ लागतो. पूर्व युरोपातील रशियाची हुकुमशाही संपायला ५० पेक्षा जास्त वर्षे लागली. चीनमध्ये असलेली हुकुमशाही १९४९पासून अद्यापपर्यंत सुरू आहे. इंदिराजींनी जर आणीबाणी आपण होऊन उठविलि नसती तर किती वर्षे चालली असती हेसुद्धा सांगणे कठीण आहे, पाकिस्तानातही तिचे उच्चाटन व्हायला वेळ लागेलच.

पण इतके टुकार सरकार असूनही (अगदी आपल्या सरकारपेक्षा!) आणि अनेक सबबी मिळूनही (ओसामा बिन लादेनची हत्त्या, मेहरान नाविक दलावरील हल्ला, "न भूतो ना भविष्यति" असा दोन पाठोपाठच्या वर्षीचे महापूर वगैरे) गेल्या पाच वर्षात ज. कयानी यांना सत्ता काबीज करायची छाती झाली नाहीं हेसुद्धा दुर्लक्षून चालणार नाहीं.

शेवटी भारताच्या हिताचे काय? आयुष्यभर भांडत रहायचे, एकमेकांचे रक्त सांडायचे? आपल्याला काय हवे आहे? ते मिळवायला पाकिस्तानमध्ये कसले सरकार हवे? उत्तर जर "मुलकी" असे असेल तर त्याला आपण समर्थन द्यायला नको काय? आज जरदारी दुबळे आहेत, त्यांना लष्करावर सत्ता गाजविता आली नाहीं हेही आपण पाहिले आहे, नवाज शरीफ जास्त तगडे वाटतात, (एका मुशर्रफला त्यांनी पचविले आहे!), इम्रानच्या धोरणांचा पत्ता लागत नाहीं पण लष्कराला आता तरी आवर घालण्याची भाषा तो करत आहे. इकडे लक्ष द्यावे असे मला वाटते. भोळेपणा अजीबात नको पण सोवळेपणाही नको असे वाटते.

बघू भविष्याच्या पोटात काय आहे? पण समेट केल्याशिवाय दोन्ही राष्ट्रांना गत्यंतर नाहीं आणि आज पाकिस्तानच्या मुलकी नेतृत्वाला भांडायचे नाहीं हे उघड आहे. आपला समेट झाला तर लष्कराचे महत्व कमी होणारच. म्हणून लष्कर ते होऊ देणार नाहीं. पण अशावेळी आपण मुलकी सरकारला समर्थन दिले पाहिजे असे वाटते.

sudhirkale42 लेख आवडला.

<<पण हस्तांदोलनानंतर आपली पाची बोटे परत आलेली आहेत ना हे जरूर पहावे>>
आली नाहीत तर काय करावे?

छान प्रश्न!
पण पट्टीचे वाटाघाटी करणारे हात सोडवून घेताना वेळीच नक्की पहातात व सगळी बोटे नसतील तर दुसर्‍या पक्षाच्या हाताची बोटे उपटून आणतात.
मात्र आपल्याला हे जमले पाहिजे.

सुधिर काळे जी,

परत एक चांगला लेख !

हा लेख पाकिस्तानच्या परीवर्तनासाठी लिहिला असला तरीही

माझ्या मते, भारताने आत्म परीक्षण करण्याची जास्त गरज आहे !

पाकिस्तानने खेळी करून, गाफील ठेवून, भारताला चांगलेच झुंझवले आहे,

गेल्या ५०-६० वर्षात युद्धभुमी वर पराभुत झालेला पाकिस्तान अगदी गनिमी काव्याने भारताशी गेली
२५-३० वर्ष लढतोय. ह्या हल्ल्या मूळे भारताला चांगल्याच जखमा झाल्यात.

अगदी काश्मिर मार्गे, नेपाळ मार्गे आणि आता बांग्ला देश सीमेतून भारतात अतिरेकी पाठवण्याचे काम
चालुच आहे.

आपल्या गुप्तचर विभागाला, किती अतिरेकी प्रशिक्षण शिबीरे आहेत? कुठे आहे? त्यात किती प्रशिक्षार्थी
आहेत? ह्याची इथंभूत माहीती आहे, पण त्यावर उपाय योजन मात्र नाही.

भारताला हवा असलेला दाऊद कराचीला रहातो, त्याचा फोन नं सुद्धा आपल्या गुप्तचर विभागाकडे
असावा, पण त्याचा काय फायदा ?

आता सर्वा वर कडी म्हणजे !!

पाकिस्तान आणी चीनची नविन मैत्री !

आता पाकिस्तान भारता मध्ये चिन ऊभा ठाकला आहे.

भारताला आतुन कणखर व्हावे लागेल, जर स्वतः कणखर झाला तरच पाकिस्तान मऊ सुत होईल.

भारता सारखा देशातील राजकारणी अगदी ह्ल्ली पर्यंत पाकीस्तानचे सरळ सरळ नाव घ्यायला कचरत
होते, "शेजारचा देश" म्हणत असत.

आपल्या राज कारण्यानी सुद्धा काही तरी धडा घ्यावा.

भारता सारखा देशातील राजकारणी अगदी ह्ल्ली पर्यंत पाकीस्तानचे सरळ सरळ नाव घ्यायला कचरत
होते, "शेजारचा देश" म्हणत असत.
------ "शेजारचा देश" ह्या शब्दापेक्षा "सिमेपलिकडुनची शक्ती" हा शब्दप्रयोग जास्त प्रचलित होता असे वाटते. भारतासाठी जगातले इतर सर्वच देश भारताच्या सिमेपलिकडेच असणार...

नवाज शरीफ यांच्या पाठोपाठ आता गिलानीसुद्धा शांततेच्या गोष्टी करू लागले आहेत हे 'टाईम्स ऑफ इंडिया'मधील ही बातमी वाचल्यावर ध्यानात येईल!
http://timesofindia.indiatimes.com/world/pakistan/Era-of-wars-over-ready...
स्वतःच अडचणीत असलेल्या गिलानींवर विश्वास ठेवायचा कीं नाहीं हा भाग वेगळा!

सुधीर जी,
ही लिंक पहा जोडून
http://videos.onepakistan.com/20778-sochta-pakistan-26th-april-2012.html
थोडक्यात पाकिस्तानातील अनेकांना सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर गिलाणींनी सरळ सरळ धुडकाऊन लावण्याची कृतीची किळस आली असल्याचे म्हटले आहे...
ता.क. मृत पत्नीशी शेवटचा संभोग करायच्या इजिप्तच्या लीलेला अनेकांनी ती उचलून धरलेली टिपणे अन्य ठिकाणी वाचनात आली.

विवेक नाईक यांच्याशी पूर्ण सहमत.
खरा दोष आपल्यातच आहे.
>>भारताला हवा असलेला दाऊद कराचीला रहातो, त्याचा फोन नं सुद्धा आपल्या गुप्तचर विभागाकडे
असावा, पण त्याचा काय फायदा ? <<
त्यांच्याबद्दलच्या कुठल्याच माहितीचा आपल्याला फायदा नाही. भारतीय जनतेला असा फायदा घेणारे राज्यकर्ते नको आहेत. नराधम अफजल गुरू आणि कसाब यांना आपणच कडेकोट बंदोबस्तावर खर्च करीत बिर्याणी खायला घालतो. कशाला वाटेल पाकींना आपला धाक ?
आता तर पाकींना येथे गुंतवणूक करायला परवानगी मिळणार आहे. आधीच दाऊदची येथे प्रचंड गुंतवणूक आहे म्हणे. मग आता तर त्याचे पैसे त्याचे आश्रयदातेच घेऊन येतील आणि त्याचे व स्वताचे उत्पन्न वाढवून दहशतवादाला लागणारा पैसा आपल्याकडून घेऊन आपल्याच विरुद्ध वापरतील.
आपण बसू त्यांच्या बुजगावण्यांच्या वक्तव्यांचे अर्थ काढीत.

गेल्या काही दिवसा आधी मटा मध्ये प्रसीद्ध झालेल्या माहीती नुसार गेल्या ३ वर्ष कसाब साठी ६ आचारी
कार्यरत आहेत.

मूबईत निर्माण झालेल्या Anti Terrorist Squad च्या कंमाडोनी कमी प्रमाणात व निक्रुष्ट प्रतीच जेव णा
बद्द्ल लिखीत स्वरूपात तक्रार केल्यावर अशी माहीती ऊजेडात आलीय,

जेंव्हा ऊच्चा युक्तांनी चौकशी केली तेंव्हा असे दिसुन आले कि हे ६ आचारी ATS ला काम करत होते.
त्यांना तिथून तडका फडकी कसाबच्या दिमतीला हजर केल गेल. ही बदली कुठल्या ही कागदोपत्री कारवाई
शिवाय करण्यात आली.

अश्या अनागोंदि कारभारा बद्द्ल काय बोलायचे ? गुन्हेगाराला ६ अचारी आणि कंमांडो साठी फक्त कमी प्रमाणात निक्रुष्ट दर्जाच जेवण !