'हा भारत माझा' - दिग्दर्शकांचं पत्र

Submitted by माध्यम_प्रायोजक on 23 April, 2012 - 04:23

प्रिय मित्रांनो,

म्हटलं तर गोष्ट तशी साधी आहे...
इंद्र सुखात्मेचा बारावीचा निकाल लागला आहे, आणि त्याला इंजीनियरिंगला प्रवेश घ्यायचा आहे.

लहानपणापासूनचं त्याचं स्वप्न होतं, आपण इंजीनियर व्हायचं. पण त्याच्या अण्णांना, म्हणजे वडिलांना वाटतंय, मुलांनी आपल्याला मोठ्या खर्चात घालण्यापेक्षा थोडी वेगळी वाट घेऊन समाधानी व्हावं.

इंद्रला मार्क पडलेत ९०%. पण अ‍ॅडमिशन थांबली आहे ९१ टक्क्यांवर!
आईचं म्हणणं इतकंच, की मुलांच्या सुखातच तिचं सुख आहे.

आमच्या ’हा भारत माझा’ या नव्या चित्रपटाची ही गोष्ट इतकी साधी आहे - तुमच्या आमच्या घरातली.

येत्या ४ मेपासून हा चित्रपट प्रदर्शित होतोय. अण्णा हजार्‍यांचं आंदोलन जोमात असताना आम्ही हा चित्रपट तयार केला आहे. तुमच्या आमच्या घरातली साधी गोष्ट असल्यामुळेच तुम्ही तो बघायला हवा. तुमच्या नातलगांना, मित्रांना, शाळाकॉलेजकार्यालयातल्या मित्रमंडळींनाही या चित्रपटाबद्दल जरूर सांगा.

इंद्रनं सरळमार्गानं जाऊन यशस्वी कसं व्हायचं? सगळा भारत भ्रष्टाचाराच्या विरुद्ध पेटून उठला असताना हा साधा प्रश्न तितका साधा उरत नाही.

’हा भारत माझा’ पाहिल्यावर तुम्हांला काय वाटलं, इंद्रनं, त्यांच्या कुटुंबानं घेतलेले निर्णय योग्य वाटले का, हे आम्हांला नक्की सांगा.

आपले,

सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर

Marathi hoarding_jpg(1).jpg
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान..

>>>> या नव्या चित्रपटाची ही गोष्ट इतकी साधी आहे - तुमच्या आमच्या घरातली. <<<<

साधी? खरच इतकी साधी असू शकेल का?
लहानपणापासूनचं त्याचं स्वप्न, उतरत का प्रत्यक्षात? की आयुष्यभराकरता ते स्वप्न उरात बोचून राहीलेला सल बनते? की त्या स्वप्नालाच तो भिरकावुन देऊ शकतो?

बिच्चारे वडील, आमच्यासारखेच चाकरदार दिस्ताहेत. पोराने लौकरात लौकर शिकुन कमावतं व्हाव अन आपल्या खान्द्यावरिल संसाराचा भार थोडा हलका करावा अस वाटणारे. त्यान्च काही चुकल का अस वाटून घेण्यात? घेतली का मुलाने वेगळी वाट? झाला का समाधानी?

बाकी ती टक्क्यानी आकडेवारी हल्ली पहिलीदुसरीपासूनच सुरू होते, ती काय नविन नाही. फक्त हातातोन्डाशी आलेला घास....... ! कस सहन केल असेल? कशी मात केली असेल त्यातुन येऊ घातलेल्या नैराश्यावर? काय उपाय योजले असतील? साध्या माणसान्नी योजलेले उपायही तसे साधेच अस्तील ना?

हे मात्र खरं, की जगात कुठही जा, कोणत्याही आईचं म्हणणं इतकंच, की मुलांच्या सुखातच तिचं सुख आहे. पण मुलाच सुख म्हणजे नेमक काय अन ते कशात आहे, हे ठरवता आल का तिला? मुलाला? वडिलान्ना?

पण ही साधी माणस ना, मध्यमवर्गिय की कायसस म्हणतात त्यान्ना, भारीच बोवा एकमेकान्च्या सुखदु:खात आपापले जीवन शोधत अस्तात. सापडतं का त्यान्ना त्यान्चे नेमके "जीवन"?

हे सर्व समजुन घ्यायला हा सिनेमा बघितलाच पाहिजे. कारण गोष्ट साधी असली, अन साधी आहे म्हणूनच तर ती या ना त्या सूत्राने/रुपाने आमच्याही जीवनात केव्हाही सामोरी येऊ शकते. जरा बघुयात तरी ही साधीच बाब.

मध्यमवर्ग हा कोणत्याही समाजाचा कणा अस्तो म्हणे. अन या ताठ कण्याच्या माणसान्नाच वाकवणारी परिस्थिती ते कशी हाताळतात?

मात्र यात अण्णा हजारेन्चा संबंध कसा काय येतो बोवा? बघितल्याशिवाय का कळणारे?
चला तर... चार मे काही फार लाम्ब नाही.

कृपया वरील पोस्ट अवेळी-अस्थानी वाटत असेल, तर सान्गा, काढता येईल Happy
तस नसेल, तर मात्र आजचे हे "स्वगत" कसय ते सान्गा Proud

मी facebook वर "Ha Bharat Maza - Special show for Maayboli " ही लिन्क बघितली... हा show कधि होता?