रविवारी सकाळी चहा घ्यायला इला हॉलमध्ये आली तेव्हा अवि पेपर वाचत बसला होता. इलाला आलेली पाहून अवि जाणवेल इतका गंभीर झाला आणि त्याने पटकन समोर बसलेल्या आपल्या वडिलांकडे, बाबांकडे पाहिले व पुन्हा पेपर वाचू लागला. इला उठून चहा घ्यायला बाहेर आलेली पाहून सासूबाई मंगलाबाई धीम्या चालीने देवघरासमोरून उठून हॉलमध्ये आल्या.
इलाला कसलीच जाणीव नसल्याप्रमाणे तिने टीव्ही ऑन केला आणि चहाचा पहिला घोट घ्यायला कप ओठांपाशी आणणार तोच नेहमीच सौम्य आवाजात बोलणारे बाबा आज काहीसे गंभीर आवाजात म्हणाले...
"इला... आज जरा बोलायचंय तुझ्याशी..."
प्रथम सासर्यांकडे, मग सासूबाईंकडे आणि शेवटी नवर्याकडे उडती नजर टाकून इला गंभीर होत पुन्हा बाबांकडे बघू लागली.
तिला जाणवले की आज तिघेही आपल्याशी बोलू इच्छीत आहेत. काहीतरी मनात ठरवल्याप्रमाणे सगळे बसलेले आहेत. म्हणूनच बहुधा काल आपल्या नितीशला आपल्या नंडेकडे, म्हणजे अनुकडे तिच्या मुलाशी, रोहनशी खेळायला म्हणून राहायला पाठवले असावे.
"काय झालं बाबा?"
"इला.. टीव्ही बंद कर..."
इलाने गांभीर्य जाणवून टीव्ही ऑफ केला. अविनेही पेपर बाजूला ठेवला आणि सासूबाई जमीनीकडे पाहात गंभीर होत नुसत्या बसून राहिल्या.
"इला.. आज मला तुझ्याशी बोलायचंय... जरा महत्वाचं.... अनेक गोष्टींवर... एका घरात राहतो आपण सगळे.. प्रत्येकाच्या दुसर्याकडून काही ना काही अपेक्षा असतात.. . तुझ्याही आमच्याकडून असतील.. आमच्याही तुझ्याकडून असतील... त्या अपेक्षा व्यक्त करायच्या आहेत... मंगल आणि अवि आज एक अवाक्षर बोलणार नाहीत मध्ये... फक्त मी आणि तू बोलायचे.... "
इलाचा चेहरा पडला. हे सगळे ठरवून चाललेले होते. आई आणि अवि बोलणार नसतील तरी बसणार तिथेच होते. सगळे ऐकणार होतेच. धुसफूस होणार होतीच. रविवारी सकाळी सकाळी असा मूड ऑफ करण्याचे खरे तर काही कारण नव्हते. पण बाबांनी अगदी सूत्रसंचालकासारखी प्रस्तावना वगैरे केली होती. इला गंभीर झाली.
त्यातल्या त्यात एक बरे होते की बाबा स्वतः बोलणार होते. शांततेचा पुतळा आणि घरात हसरे वातावरण ठेवण्यासाठी प्रयत्न करणारी अशी ती एकच व्यक्ती होती बाबा म्हणजे! आणि आई आणि अवि बोलणार नाहीत हेही बरे होते. निदान डायरेक्ट भांडणे होण्याची शक्यता कमी तरी होणार होती.
मात्र या गोष्टींचे इलाला बरे वाटत असले तरी मनातून ती पूर्णपणे हादरलेली होती. आज कोणता प्रसंग निभावायला लागणार याचा तिला अंदाज येत नव्हता. प्रत्यक्ष बाबा कधी असल्या विषयात ढुंकूनही पडलेले नव्हते आजवर.
दोन माणसांमधील तणाव अनेकदा तब्येती बिघडवतो, डोकी फिरवतो, हातून बुर्या गोष्टी घडवतो. मनःशांती तर जातेच पण मन थार्यावरही राहात नाही. 'आता काय, पुढे काय' याचा ताण वागण्यात दिसतो.
आणि या तणावाला जाहीर तोंड फोडणे हेही नकोसे वाटते.
बाबा नेमके हेच करत होते. येथे तर दोन माणसांच्या जागी चार माणसे होती. याचाच इलाच्या मनावर ताण आला होता.
"इला, पहिल्यांदा मला असे म्हणायचे आहे की तू एकंदरच खुष दिसत नाहीस घरात. म्हणजे ज्या किमान गोष्टी असतात ज्या तू करायला हव्यास, त्या करतेस, पण तुझा वावर काहीसा त्रस्त, काहीसा बंडखोर असल्यासारखा दिसतो. असे का? तुला येथे काही दु:ख आहे का? काही त्रास होत आहे का?"
"पण असे का वाटते तुम्हाला बाबा?"
" का वाटते म्हणजे असे आहे... की आम्ही सगळे हे रोज पाहात आहोत.. सकाळी नाश्त्याची तयारी करून आणि नितीशला शाळेच्या रिक्षेत बसवून तू ऑफीसला पळतेस.. संध्याकाळी आलीस की तुमच्या खोलीत चहा घेत बसतेस.. मग अवि ऑफीसहून आणि नितीश खेळून आला की जेवणाची तयारी करतेस... दोन्ही वेळचा सगळा स्वयंपाक करायला तर बाईच आहे आपल्याकडे... घरातले काहीच काम तसे कोणालाच पडत नाही.. तरीही जे काही काम पडते ते तू आणि मंगल मिळून उरकताच.. पण ताटं घेतली, जेवणे झाली आणि भांडी उचलून बेसीनमध्ये ठेवली की तू तुमच्या खोलीत निघून जातेस.. अवि बाहेर टीव्ही पाहात बसतो... नितीश अभ्यासाला बसतो... तू मात्र एकदम आम्हाला दुसर्या दिवशी सकाळी दिसतेस.. आणि हे गेली सहा वर्षे पाहात आहे मी.. आजवर तुमची एकमेकांशी अनेक भांडणे झाली, पुन्हा दिलजमाई झाली.. पण एक गोष्ट मात्र कायम तशीच राहिली.. ती कधीच संपली नाही... ती गोष्ट म्हणजे 'नको असलेल्या परिस्थितीत आपल्याला राहावे लागत आहे' या भावनेचे चेहर्यावरील प्रतिबिंब, जे अगदी स्पष्ट असते तुझ्या चेहर्यावर... असे का???"
"असे काहीच नाहीये बाबा.. असे का उगाच मानताय तुम्ही सगळे?"
"इला बेटा... आज मन मोकळे करायचे आहे.. मन जेव्हा मोकळे होऊन जाते तेव्हा त्यानंतरचा वावर हा हलका हलका असतो... बोजा राहात नाही मनावर... तूही बोल... मीही बोलणार आहे... पण अगदी स्पष्ट, स्वच्छ मनातलं बोलायचं.. जे काय मनात असेल ते... फक्त एकच... आवाज चढवायचा नाही आपण दोघांनीही... आणि दुसरी अट जी मी या दोघांवर घातलीय ती ही.. की ते दोघेही मी सांगितल्याशिवाय बोलणार नाहीत..तेव्हा तू मनातले बोल.."
"पण मला खरच काही म्हणायचं नाही आहे अहो... खरच"
"तुला म्हणायचंच नसेल तर ठीक आहे इला.. पण मला तरी म्हणायचंय ना? मी जे म्हणतोय त्यावर तरी बोल ना? त्यावर उत्तर देणे हे तर अपेक्षित आहे ना?"
"बाबा अहो खरच... तुम्ही जे म्हणताय तसं जर तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल तर खरच सांगते.. माझ्या मनात काहीही नसते... मी आपली कामे झाली की वाचत वगैरे बसते इतकंच..."
"इला.. तू आत्ता जे म्हणतीयस त्याप्रमाणे तुझा चेहरा नसतो पण.. त्याचं काय? परवाचीच गोष्ट.. मंगल तुला म्हणाली की ऑफीसला जाताना तिला देवळात सोड... किती त्रासिक चेहरा केलास..."
"अहो... नाही... त्रासिक वगैरे नाही.. जरा घाई असल्यामुळे तसं वाटलं असेल तुम्हाला आणि आईंना.."
इलाने हे बोलताना सासूकडे पाहिले. सासूच्या चेहर्यावर जबरदस्त ताण आलेला होता. त्यांना खूप काही बोलायचे असावे असे वाटत होते. पण बाबांनी सांगितल्यामुळे संवाद शांततेत व्हावेत ही अट पाळण्यासाठी त्या गप्प होत्या हे स्पष्टपणे दिसत होते... आणि अवि मान खाली घालून नुसता बसला होता... त्याला आजच्या या संवादाचे भविष्य माहीत नव्हते... कदाचित मने निवळतील किंवा भांडणे होतील... एखादवेळेस इला वाट्टेल तशी बोलेल...
"इला.. मी व्यवसायाने शिक्षक होतो... प्राध्यापक होतो... मला चेहरे आणि मनातील विचार जाणण्याची नैसर्गीक हातोटी आहे... आणि मी प्राध्यापक होतो म्हणूनच आजचा संवाद अतिशय शांततापूर्ण आणि कन्स्ट्रक्टिव्ह करणे मला जमत आहे.. आज आपल्या सर्वांनाच मने मोकळी करायची आहेत.. तुझ्या आमच्याकडून असलेल्या.. आमच्या तुझ्याकडून असलेल्या अशा सर्व अपेक्षांबाबत बोलायचे आहे.. तेव्हा खरच आणि पुन्हा मनापासून सांगतो... अगदी मोकळं कर मन... काय तक्रारी असतील त्या सगळ्या बोलून टाक.. "
बाबांचे हे बोलून संपेपर्यंत सर्वांनाच एक धक्का बसला. इलाचा चेहरा पाहून. इलाचे डोळे तीव्रपणे बाबांवर रोखले गेले होते.. तिच्या चेहर्यावरचे ते भाव पाहून अविला जाणवले... आज बहुतेक भांडणे होणार... इलात असा क्षणभरात फरक का पडला?
फरक पडला कारण इतका वेळ ती हा संवाद टाळता येईल का ते पाहात होती... मात्र टाळता येत नव्हता.. आणि एखाद्या कोर्टात उभे करावे तशी अवस्था नको होती तिला.. तिच्या माहेरीही काही वेळा काही ना काही वाद व्हायचे.. नाही असे नाही... पण तेथील ते वाद सोडवण्याची पद्धत फारच वेगळी होती... कडाकडा एकमेकांशी पाच मिनिटे भांडले की मने स्वच्छ होतात आणि पुन्हा हसून खेळून वागणे सहज जमायला लागते हा तिचा अनुभव होता... विचित्र शैली होती ही.. पण हुकुमी होती... त्यात विश्वास होता... इलाच्या सख्या भावाच्या बायकोशी इलाचेच एकदोनदा वाद झाले होते... पण तिथल्यातिथे दोन पाच मिनिटे स्पष्ट बोलून सगळे संपलेही होते आणि पुन्हा खरे तर मोठा आनंद मिळू लागला होता... हे इकडे होत नव्हते.. इकडे सारखा दबाव होता... वयाने मोठे असलेल्याशी बोलण्याची एक दबावयुक्त पद्धत होती... अपेक्षा व्यक्त करण्याची शैली उपरोधिक होती.. काही स्पष्टपणे बोलायला गेलो तर अवि किंवा बाबा गप्प बसवत होते.. मग धुसफूस नाही होणार तर काय होणार.. त्यामुळे इलाच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला होता.. त्यामुळे तिने तिची जीवनशैली बदलली होती... घरातील किमान अपेक्षांची पूर्तता झाली की आपले विश्व आणि त्यांचे विश्व वेगळे ठेवावे.. हेच बरे.. पण आज काढलेल्या चर्चेत तर असे दिसत होते की तीची ही जीवनशैलीही त्यांना पचत नव्हती.. मान्य नव्हती.. आता जे काय आहे ते बोललेलेच बरे असे वाटू लागलेले होते... त्याचमुळे इलाच्या चेहर्यावरील भाव बदलले होते... आवाज तीही चढवणार नव्हतीच... तिलाही ते आवडले नसतेच सासरच्यांवर मोठ्या आवाजात बोलायला.. पण जे आहे ते स्पष्ट बोलायची संधी स्वतःहून पुढे येत आहे तर बोलून घेतलेले काय वाईट?
"बाबा.. तुम्ही निवृत्त प्राध्यापक आहात.. माझे सासरे आहात.. अविचे वडील आहात.. आणि मुख्य म्हणजे या घरातील नुसतेच एक मोठे माणूस नाही तर शांत, हासरे आहात.. तुम्ही बोल म्हणताय तर बोलते मी आज.. माझ्या कसल्याच अटी नाहीत... आई बोलल्या तरी चालेल मला.. खरे तर आवडेल.. अविनेही बोलावे... मी तर आवाज चढवणारच नाही.. पण समजा आईंचा किंवा तुमचा आवाज चढला तरी माझ्या मनात काहीच येणार नाही.. तुमचा हक्क आहे तो.. माझ्या आई वडिलांच्या जागी तुम्ही आहात.. म्हणून बोलते... बाबा... गेल्या दोन मिनिटांत, ही चर्चा तुम्ही सुरू केल्यापासून... किती वेळा तुम्ही तुम्हा तिघांचा उल्लेख 'आम्ही' असा आणि माझा उल्लेख 'तू' असा केलात? कमीतकमी दोन तीन वेळा! 'आमच्या तुझ्याकडून अपेक्षा' आणि 'तुझ्या आमच्याकडून अपेक्षा' हे शब्दप्रयोग, या शब्दप्रयोगांमधील 'आम्ही आणि तू' यात नुसतीच जाणवलेली नाही तर तुम्हाला मुळातच, कन्सेप्टच्या पातळीवरच स्वीकारार्ह वाटलेली सीमारेषा का आली? 'आपण' हा शब्द का आला नाही? वयानुसार, मानानुसार मी तुम्हाला उलट तर बोलू शकतच नाही, पण जाब किंवा प्रश्नही विचारू शकत नाही. पण आज तुम्ही हे दोघे मधे बोलणार नाहीत याचा हवाला देऊन मला धीर देताय म्हणून ही आगळीक करतीय मी. का असे आले नाही तुमच्या तोंडात की 'आपल्या एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा आपण आज व्यक्त करू'??"
अवि टक लावून इलाकडे बघत होता. सासूबाई तीव्र चेहरा करून जमीनीकडे पाहात होत्या. सत्यवादी उदारमतवादी प्राध्यापक शब्द आठवत होते.
"ती केवळ एक बोलण्याची पद्धत आहे इला.. हा मुद्दा म्हणजे शाब्दिक खेळ होईल.. या तुझ्या मुद्यातून फारसा गंभीर विषय सरफेसवर येईल असे वाटते का तुला? कोणत्याही घरात लग्न करून आलेली सून जेव्हा अशा चर्चेस सामोरी जाते तेव्हा तिच्याशी 'आम्ही आणि तू' असा शब्दप्रयोग निगडीत होणारच, कारण सहसा अपेक्षा या 'सासू व सून' यात अधिक असतात व सासू एका घरातील मूळ व्यक्ती असते तर सून दुसर्या! "
"अच्छा! मला एक सांगा! तुमच्या अविकडून, अविच्या आईंकडून, आईंच्या तुमच्याकडून असलेल्या अपेक्षांना कसे संबोधाल?"
"आमच्या कसल्या आता अपेक्षा एकमेकांकडून! आता आमचे उतारवय आहे"
"उतारवयातही तुम्ही 'आमच्या तुझ्याकडून व तुझ्या आमच्याकडून' असे विशेषण असलेल्या अपेक्षा व्यक्त करत आहात ना?"
"अपेक्षा व्यक्त करत नाही आहे मी.. मी म्हणतोय की तू तुझ्या अपेक्षा सांग..."
"मी आईंना देवळात सोडण्यापूर्वी त्रासिक चेहरा करायला नको होता ही अपेक्षा नाही?"
"ठीक आहे.. मग सांगतो.. अवि, मी आणि ही... आमच्या एकमेकांकडून ज्या काही अपेक्षा असतील त्या आम्ही एकमेकांना स्पष्टपणे सांगू शकतो.. "
"मला का तसे सांगू शकत नाही?"
"कारण तू अपेक्षा ऐकायला आणि पूर्तता करायला रिलक्टंट असतेस असे माझे मत आहे"
"कोणती अपेक्षा पूर्ण केली नाही मी?"
"तू मला सकाळी स्वतःसाठी चहा करून घेताना कधी विचारतेस की बाबा तुम्हीही घ्याल का अर्धा कप? ही अपेक्षा काही फारशी नाही ईला! काय असते, की यातून मन समजते एखाद्याचे! तू असे न विचारणे, तेही मला चहा अतिशय आवडत असताना, याने मला काहीच अडचण येत नाही कारण मी हव्या तितक्या वेळा अजून तरी स्वतःसाठी चहा करून पिऊ शकतो... पण स्त्री हे माया या गुणाचे एक रूप आहे.. आपले घर, आपल्या घरातील माणसे हे सर्व आपले आहे आणि हे सर्व आपल्याला आपल्या प्रेमातून एकत्र बांधायचे आहे ही भावना एखाद्या स्त्रीच्या मनात उपजत असावी अशी अपेक्षा करणे गैर नाही..."
आता सासूबाई तीव्र नजरेने इलाकडे पाहू लागल्या. अविही पाहू लागला. सासूबाईंच्या मते त्यांना अपेक्षित असे वळण प्राध्यापकांनी लावलेले होते चर्चेला!
"अच्छा! ही अपेक्षा मी पूर्ण करत नाही. ओके बाबा! मग ही अपेक्षा तुम्ही आईंकडून किंवा अविकडून पूर्ण करून घेता का?"
"त्याची गरज नसते. अवि अतिशय घाईत असतो सकाळी.. आणि मंगलचेही आता वय झालेलेच आहे.. तिला मी त्रास देत नाही.. मी माझा माझा चहा करून घेतो..."
"म्हणजे 'चहा' ही अपेक्षा तुम्ही 'ज्यांच्यात अपेक्षा स्पष्टपणे व्यक्त करू शकता' त्यांच्यात व्यक्त करत नाही आणि जी रिलक्टंट असते असे तुम्ही मत बनवून ठेवलेले असतेत तिच्याकडून ती अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून 'अपेक्षापूर्ती झाली नाही' याची चर्चा 'आपल्या' माणसांत करता"
"काय आहे माहितीय का इला? शब्दांशी खेळणे यात माझे आयुष्य गेले. मला त्यात स्वारस्य वाटत नाही. एका साध्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकशील का तू? की आजवर किती वेळा मला सकाळचा चहा विचारलास?"
"तितक्याच वेळा विचारला बाबा.. जितक्या वेळा ती अपेक्षा 'एक आपल्यातली व्यक्ती' म्हणून तुम्ही माझ्यापाशी व्यक्त केलीत"
तोंडात बसल्यासारखा चेहरा झाला प्राध्यापकांचा क्षणभर! पण इगो! मी मोठा प्राध्यापक! ही तर काय, साधी एक सून माझी! आवाज मात्र कोणाचाच चढलेला नव्हता.
"मी पुन्हा तेच सांगतोय तुला.. अशी अपेक्षा व्यक्त करावी लागणे हेच मुळात गैर नाही का?"
"होय, तोपर्यंत गैर आहे जोपर्यंत तुमच्यासाठी चहा इतका महत्वाचा नाही जितकी अविची ऑफीसची घाई आणि आईंचे उतारवय महत्वाचे आहे"
"म्हणजे?"
"म्हणजे हीच अपेक्षा तुम्ही त्यांच्याकडून या कारणासाठी ठेवत नाही की त्यांची स्वतःची अशी काही कारणे आहेत जी तुमच्या चहापेक्षा महत्वाची आहेत.. "
"तुला कुठे घाई असते सकाळी स्वतःचा चहा घेताना?"
"बाबा.. अहो काय बोलताय तुम्ही.. माझ्यासाठी मी चहा करते त्यात अर्धा कप आधण तुमच्यासाठी ठेवायला मला काय जड जाणार आहे का? चहा हा विषय नाहीये.. मला असे म्हणायचे आहे की अपेक्षाच बाएस्ड आहेत.."
"आता तुझ्या दृष्टीने चहा हा विषय नाही आहे याचे कारण तुझी चूक सरफेसवर यायला लागली.."
" नाही... मला तुमची ती अपेक्षा ज्ञात आहे.. मी मुद्दाम चहा करत नाही तुमचा... आणि विचारतही नाही.."
"का?"
"कारण मला तशी इच्छाच नसते..."
"तेच आम्ही म्हणतोय ईला आधीपासून.."
"तुम्ही पुन्हा आम्ही हा शब्द वापरताय बाबा.. तुम्ही तिघे विरुद्ध मी असे या चर्चेचे स्वरूप आहे का?"
"एक मात्र सांगायलाच हवं की..... होय... हेच स्वरूप आहे.."
"ठीक आहे... मग पुन्हा सांगते... की मला मनातून तशी इच्छाच होत नाही..."
"तीच का होत नाही हे विचारतोय मी..."
"तुम्ही दिवसातून किती वेळा चहा करून घेता बाबा?"
"तिसरेच काहीतरी मुद्दे काढून वट वाढवण्यात काही अर्थ आहे का? तुला तशी इच्छाच का होत नाही हे विचारतोय"
"मला मायाच लागलेली नाही..."
"कोणाची? कोणाचीच?
"नितीश सोडून कोणाचीच नाही.. अवि, तुमची आणि आईंची... अनुताईंची.. चौघांचीही नाही"
"छान.. असेच मनमोकळे बोललो तर काहीतरी चांगले घडू शकेल.. का नाही माया तुला?"
"कारण माझ्यावर कोणीच माया करत नाही... मला कोणी आजवर अर्धा कप चहा विचारलाय? मला गृहीत न धरता ..."
अवि हडबडून उठला आणि म्हणाला..
"एक मिनिट... एक मिनिट इला.."
त्याला गप्प बसवत प्राध्यापक इलाला म्हणाले..
"तू बोल इला... कोणीही मधे बोलणार नाही..."
"मला माहीत आहे अवि काय बोलणार होता ते... तो हेच म्हणणार होता की घरात जी व्यक्ती नवीन आलेली आहे तिने स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी एक्स्ट्रॉ एफर्ट्स घ्यावे लागतात, तिने ते घ्यायला हवेत.... हे बोलू पाहणार्या अविला तुम्ही गप्प बसवलेत आत्ता.. पण त्याच्या मनातील ही घट्ट बसलेली विचारधारा कशी बदलाल? मला इतरांची माया मिळावी यासाठी मी इतरांवर माया करायला हवी... म्हणजे लग्न ही एक देवाणघेवाण इक्वल असणारी संस्था झाली.. प्रेम, आपोआप मनातून वाटणारे प्रेम हे फक्त 'आपल्या वर्तुळातील लोकांसाठी' आणि माया किंवा मायेची अपेक्षा भलत्याच व्यक्तीकडून ... मला माया वाटावी असे वागणे ही जबाबदारी माझ्या सासरच्यांची का नाही? बोलायला 'आमच्या सुनेत आम्ही आमची मुलगीच पाहतो' आणि इथे आरोपीच्या पिंजर्यात उभे करून सवालजबाब! मीच तुम्हाला प्रश्न विचारते. दिवसातून आठ वेळा तुम्ही स्वतःसाठी चहा करून घेता, एकदाही मला का विचारत नाही?"
सासूबाई चवताळून पाहू लागल्या. अवि सरकल्यासारखा पाहू लागला. सून सरळ सासर्यालाच विचारत होती की मला चहा का विचारत नाही.
"कारण तू घरी नसतेस"
"मगाशीच माझी तुम्हाला तिघांनाही न आवडणारी दिनचर्या तुम्ही ऐकवलीत बाबा... मी अशा अनेक वेळी घरात असते जेव्हा तुम्ही स्वतःसाठी चहा करून घेत असता... आई नाही करत तुमच्यासाठी चहा...."
"इला....." - आता सासूबाईमधे बोलल्याच...
त्यांनाही बाबांनी हात करून गप्प बसवले..
"मी तुला चहा का विचारावा इला? माझे वय काय आणि तुझे वय काय?"
"मग मी तुम्हाला का चहा विचारावा? माझी घाई काय आणि तुमची घाई काय"
बाबा व्यथित झाले. आयुष्यभर प्राध्यापकी करून त्यांनी हा संसार या पातळीला आणलेला होता. अध्यक्षाच्या थाटात परिसंवाद आयोजीत करून सुनेकडून उलटे बोलणे ऐकून घेण्याची वेळ आली असताना आता अचानक बायकोला आणि मुलाला चर्चेत भाग घ्या म्हणता येत नव्हते.
"ठीक आहे.. चहाचे राहूदेत.. "
"आता तुम्ही चहाचे राहूदेत असे म्हणताय कारण सासरच्यांनी माझ्यावर माया केली नाही ही सगळ्यांची चूक सरफेसवर येतीय"
"आम्ही काय माया केली नाही? तुमचं लग्न झाल्यापासून कोडकौतुके चालू आहेत.."
"बाबा.. तुम्ही मला चहा करून द्यावात असे मी कधीच म्हणणार नाही... कारण काय माहितीय? कारण तुम्ही कितीही झाले तरी माझे वडील नाही आहात... माझ्या वडिलांनी मी म्हणेन तितके वेळा आणि मी नाही म्हणाले तरी मायेने माझ्यासाठी चहा केला असता..."
"मी तरी तुला मुलगीच मानतो ईला.. तू मला काय मानतेस यावर सगळे अवलंबून आहे.."
"बाबा... तुम्ही जर असे म्हणत असलात ना? तुम्ही जर मला खरच मुलगी मानत असलात ना? तर मी दोन पर्याय देते... एक तर मी मला जे बोलायचे आहे ते सलग बोलणार आणि ते संपेपर्यंत तुम्हीही मध्ये बोलायचे नाहीत किंवा ही चर्चा येथेच संपली... मला इन्टरेस्ट नाही"
"असे काय फार महत्वाचे बोलणार असशील तू ईला.. हेच की आम्ही तुझ्यावर प्रेम केले नाही.. ते तर आधीच ऐकलेले आहे आम्ही.. "
"ठीक आहे.. मग राहूदेत ही चर्चा..."
आता सासूबाईंना धीर धरवेना... त्या घुसमटत म्हणाल्या...
"बघू तरी काय बोलतीय ती... "
प्राध्यापक महाशय इलाला औदार्य दाखवत म्हणाले..
"ठीक आहे... बोल...."
इलाने सगळ्यांकडे पाहिले. तिला अजूनही वाटत होते की भांडणे ही होणारच! पण इला कर्तृत्ववान होती. तिला आयुष्यात आनंद हवा होता. तो आनंद कोणाच्यातरी दु:खातून आलेला आनंद नको होता. स्वतःचा निखळ आनंद हवा होता. तो मिळवण्यासाठी तितकेच निखळ प्रयत्नही करायचे होते. पण तिला अशी गुदमर नको होती. ही गुदमर सहन करण्यात अवघे तारुण्य घालवायचे आणि नंतर मुलाच्या भवितव्यासाठी झिजायचे आणि शेवटी म्हातारे होऊन आपल्या पुढच्या पिढीकडून अपेक्षा ठेवायच्या यातील 'गुदमर सहन करण्यात तारुण्य घालवायचे' ही साखळीची लिंक तिला नको होती. एकच आयुष्य आहे, भले स्त्रीचा जन्म का असेनात, पण तो मनापमाणे घालवणे हे तिला महत्वाचे वाटत होते.
आयुष्यात उद्भवणार्या 'परंपरा, संस्कृती, अपेक्षा' यांनी निर्माण केलेल्या प्रश्नांना तोंड देताना अपारंपारीक विचार करणे, साहसी वागणे हा तिचा स्वभाव होता. नेहमीच्याच प्रश्नांना नेहमीची उत्तरे न देणे, मनाचे स्वातंत्र्य मिळवणे याकडे तिचा अधिक कल होता. तिला जे करायचे होते ते तिने आधीही केले असते. पण या चर्चेला कारणीभूत ठरवून ते करणे हे अधिक समर्थनीय मानले जाईल असे तिला आत्ता वाटत होते.
तिची स्वप्ने काव्यमय नव्हती. स्वार्थी स्वप्नेही नव्हती की आपण सासूसासर्यांपासून वेगळे व्हावे वगैरे! पण तिच्या स्वनांचे अधिष्ठान होते ते मनस्वी जगता येण्याच्या उर्मीवर! नात्यातील अपेक्षांची तटबंदी तिला क्षुल्लक वाटायची, पण होता होईतो तटबंदीच्या आत राहणे बरे असेही वाटायचे. आयुष्याने विचारलेल्या प्रश्नांना सर्वसामान्य उत्तरे देऊन कुढत राहणे मंजूर तिलाही नव्हतेच, पण ते नामंजूर करणे यासाठी आवश्यक ते करणे ही तिची मूळ 'तबीयत' होती.
हा सूक्ष्म फरक तिला अनेक आंबलेल्या मनाच्या आणि कुढलेल्या विचारांच्या सुनांपासून भिन्नत्व देत होता.
मागचा पुढचा विचार करायची नाही असे नाही, पण ध्येयावरचा फोकस अतिशय तीव्र असायचा, त्यापुढे विचाराची जळमटे भुर्रकन स्मृतींच्या व्हॅक्यूम क्लीनरमध्ये जायची.
काही क्षण शांत बसून तिने अचानक हे वाक्य टाकले.
"अविनाश.. आय एक्झिट धिस मॅरेज... मी एकटीच... वेगळी राहणार आहे..."
हे काय पडलंय म्हणून उचलायला जावं आणि बॉम्ब फुटावा तसे झाले त्या हॉलमध्ये!
या वाक्यामुळे एक फार फार मोठा, एक फार फार महत्वाचा फायदा झाला तिचा...
आता ती बोलताना कोणीच मधे बोलणार नव्हते... याचे कारण ज्या नात्याच्या अस्तित्वाला भक्कम करण्यासाठी ही चर्चा सुरू करण्यात आली होती ते नातेच तिने धुडकावले होते.... ती काय बोलते ते आता गप्प बसून ऐकणे आणि तिचे बोलणे संपल्यानंतर स्वतःचे मत मांडणे याव्यतिरिक्त काहीच हातात राहिले नव्हते कोणाच्या... असे कसे म्हणणार की बाईगं असला काहीतरी निर्णय घेऊ नकोस? तिला एकटीलाच या नात्याची गरज आहे या विचाराच्या फाऊंडेशनवर तर सगळे अवलंबून होते... तिलाच गरज नाही हा विचार मनात उलथापालथी घडवणारा होता....
"चहा घेणार बाबा???"
इलाने असे विचारले जसे काही विशेष काही घडलेच नव्हते.. दहाव्या मिनिटाला ती चहाचे चार कप हॉलमध्ये घेऊन आली.... प्रत्येकापुढे एकेक कप ठेवत तिने चहाचा पहिला घोट घेतला.. आणि बोलू लागली...
"आपल्याकडे लग्न हा प्रकार जरा चकवणाराच असतो सगळ्यांना! नाही आई? माझे काय, अनुताईंचे काय आणि तुमचे स्वतःचे लग्न काय! प्रत्येक लग्नाने लग्नाशी जवळून संबंधीत माणसांना केवळ चकवलेलेच आहे.. अपेक्षा काय असतात आणि प्रत्यक्षात काय घडते.. नाही? "
"दोन घरांचे, दोन कुटुंबांचे मीलन! दोन घरांचा असा नातेसंबंध, ज्यात केवळ गोडवा व नावीन्य हेच दोन पिलर्स असतात. कौतुक आणि आनंद या भिंती! आदर आणि पाहुणचार या दुसर्या दोन भिंती! आणि नवीन पिढीची निर्मीती हे छत! काय पण प्रकार आहे लग्न हा! काय अभिप्रेत असेल हा प्रकार सुरू करणार्याला? त्याला नेमके काय म्हणायचे असेल? की कोणत्याही दोन व्यक्ती एकमेकांच्या होण्यासाठी लग्न हा सोपस्कार एकदा उरकला की सगळे ठीक होते? कोण मुलीला आपली मुलगी मानते? कोण तिला आपल्या स्वतःच्या पोटच्या पोरीपेक्षा किंवा निदान तितके प्रेमाने वागवते? हा निसर्ग आहे आई! तुम्हीच नाही तर जगातील कोणतीही आई, माझी आईही या निसर्गाला बळी पडणारच. अपेक्षा! समजा आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न केले असते तर तुम्हाला नातू झाल्यावर राग सोडून तुम्ही आम्हाला भेटायला आला असतात. म्हणजे तुमच्या मनातील विचार हेही तुमच्या नियंत्रणात नाहीत. तुम्हला प्रेम कसले? तर नातवाचे! माझे काही नाही."
"मला एक सांगा बाबा, नक्की मनोमीलन होते का दोन घरांचे? काहीच खुपत नाही? काहीच वावगे वाटत नाही? काहीतरी तरी चुकल्यासारखे वाटतेच ना? माझी आणि अवीची अजून ओळखही झालेली नाही हे ऐकून तुम्हाला कसे वाटेल बाबा? आम्हाला मुलगा झाला आहे आणि तो पहिलीत आहे, पण अजून आम्ही दोघे एकमेकांना ओळखतही नाही आहोत. दुसरा मुळात कसा आहे यावर विचार करण्याची गरजही भासत नाही लग्न केल्यावर. कारण जसा कसा आहे तसा आपला आहे हे मान्य करायचे. का मान्य करायचे? कारण समाज म्हणतो? समाज जगवतोय मला आणि अविला? तुम्ही दोघांनी अविला जन्म दिला आहेत, पण तुम्ही ओळखले आहेत त्याला? तुम्ही दोघांनी एकमेकांना ओळखले आहेत? नाही. नाही ओळखलेत अजून एकमेकांनाही! पन्नास वर्षे होतील तुमच्या लग्नाला, पण नाही ओळखलेत! याचे कारण काय माहितीय? सहवासाच्या प्रेमाला तुम्ही प्रेम समजता. मी त्याला फक्त तडजोड समजते. हा हा विशिष्ट माणूस आपला म्हणून हा हा विशिष्ट माणूस आपला! तो आपल्यावर आणि आपण त्याच्यावर प्रेम करायचे म्हणजे करायचेच! त्याला पर्याय नाही. पण आई, तुमच्या मनात माझ्याबद्दल आणि माझ्या मनात तुमच्याबद्दल प्रेम नाही आहे ही फॅक्ट स्वीकारायला इतके जड का जाते आपल्याला? नाही आहे प्रेम! त्यात काय? नाही होऊ शकत दोन कुटुंबांचे, दोन घरांचे, दोन संस्कृतींचे वगैरे मीलन! खरे तर मीलन नवरा बायकोचेही होत नाही. तडजोडीवर दोन मजली इमारत बांधणे म्हणजे लग्न! पहिल्या मजल्यावर तुमच्या आमच्याकडून असलेल्या अपेक्षा आणि दुसर्या मजल्यावर आमच्या आमच्या मुलांकडून असलेल्या अपेक्षा! आणि माझे आणि अविचे मीलन ही ती तडजोड!"
"दोघांनी नोकर्या करणे, सासू सासर्यांबरोबरच राहणे. मुले होणे आणि घर बांधणे या फारच सामान्य बाबी आहेत अवि. लग्न या संस्थेचा वकूब तेवढाच! हे असे असे व्हावे याची मानसिक व सामाजिक व्यवस्था ही लग्न नावाची संस्था करते. इतकेच! पण लग्नामुळे मनातील प्रेम वाढते? दुसर्याचा बाप आपल्याला आपला बाप वाटू लागतो? दुसर्याची आई म्हणजे सासू आपल्या आईसारखी वाटते? नाही वाटत. चेहर्यावर आनंदाचे भाव घेऊन मनात कुजकट विचारांना पाणी घालत राहतात सगळे. एक अॅक्सेप्ट करा की तुम्ही तिघे, की मी तुमच्या कोणत्याच अपेक्षा किंवा अनेक अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. याचाच अर्थ मी 'लग्न करण्यास व लग्न ही संस्था अचूक काम करते' हे सिद्ध करण्यास नालायक आहे हे स्वीकारा की? मी स्वीकारायला तयार आहे. पण तुमच्या, तुम्हा तिघांच्या अपेक्षा पूर्ण करणे या व्यतिरिक्त लग्नाला, निदान एकत्र राहण्याला तरी काहीच अर्थ नाही? स्वतःच्या मुलीची दोन्ही बाळंतपणे माहेरी कौतुकाने करणार्या आईंना मला हे ऐकवावेसे वाटते की आम्ही आमच्या मुलीची बाळंतपणे आमच्याकडे केली? नुसते तोंडाने असे का बोलावेसे वाटले नाही की हे तुझेही माहेरच आहे असे समज, इथेच करू आपण तुझेही! नुसते तोंडाने का बोलावेसे वाटत नाही? याचे कारण ते मनात नसते. मनात फक्त अपेक्षा असतात. फक्त अपेक्षा! अवि, तू आणि तुझ्या आई वडिलांसारख्या माणसांनी लग्न या संस्थेची जी मनापासून खिल्ली उडवलेली दिसते ती पाहून दाद द्यावीशी वाटते दाद! टाळ्या पिटाव्याश्या वाटतात. प्रेम आणि माया म्हणजे दुसर्याच्या खिशातले दहा रुपये आहेत की जे अपेक्षा ठेवल्यावर मिळावेत? मुलगी सासरी येते तेव्हा तिने तिचे संपूर्ण लहानपण, बराचसा भूतकाळ, आपली माणसे, काही वेळा आपले गावही आणि स्वतःचे महत्व या सर्वांना जवळपास तिलांजली दिलेली असते. याची जाणीव एका अशाच घरात आलेल्या आधीच्या सुनेला, माझ्या सासूला होऊ नये? का? तेथे का हे घर आपले आहे आणि आलेली मुलगी बाहेरची आहे ही भावन निर्माण होते? मी या लग्नातून बाहेर पडण्यासाठी पुरेसे कारण नाही असे तुम्हाला तिघांनाही वाटेल. असेही वाटेल की हिच्या मनातील विचार आज असे आहेत, उद्या बदलतील. कळेल हिला आपली चूक! असेही वाटेल की हिच्या घरचे हिला परावृत्त करून पुन्हा इथे पाठवतील. पण नाही अवि! ते होऊ देणार नाही मी. यासाठी नाही की मी कमावती आहे. यासाठीही नाही की मला ही थट्टा वाटत आहे लग्नबिग्न म्हणजे. मला बाहेर पडायचं आहे ते फारच वेगळ्या कारणासाठी. मला आपण दोघांनी वेगळे व्हावे असेही वाटत नाही आहे. मला या कारणासाठी बाहेर पडायचे आहे की लग्न या संकल्पनेचा जो अर्थ इथे घेतला जातो तो बघता मला माझे इथे जमेल असे वाटत नाही. आई बाबांच्या पश्चातही तुझे विचार तसेच राहतील. एकमेकांचे एकमेकांवर प्रभाव पडून मग मीही तशीच होईन. मी न संतापता व पूर्ण शुद्धीत हे बोलत आहे. मी रागावून हा निर्णय घेत नाही आहे अवि. असे नाही की मी मला जगावेगळी समजते आणि ती प्रतिमा जोपासता यावी यासाठी असे काहीतरी 'येनकेनप्रकारेण' वाले प्रसंग निर्माण करावेत. मला आजवर व्यतीत केलेली सहा वर्षे नव्हेत तर पुढची चाळीस वर्षे दिसत आहेत. एकवेळ एखादा मला 'चल आपण लन न करता नुसते बरोबर राहू' असे म्हणाला असता तरी 'प्रेम' या भावनेसाठी मी ते निश्चीत स्वीकारले असते. पण मुद्दामहून समाजमान्य बंधनात अडकून अनेक वर्षे मनाविरुद्ध विचार करणे मला जमणार नाही. मनाविरुद्ध जगात काही होतच नाही असे नाही हे मी जाणते व्यवस्थितपणे. उलट मनाविरुद्ध होण्यास विरोध करत राहणे हेच माणसाचे आयुष्य आहे असे मी मानते. पण माझ्या विचारांवर वेगळा प्रभाव पडावा असे मला आता वाटत नाही. एखाद्या वेगळ्याच विचारधारेशी जुळवून घेणे हे मला शक्य आहे, पण त्या विचारधारेला स्वतःची विचारधारा बनवून स्वतःतील मूळ माणूस गुदमरवणे हे मला पटत नाही आहे. कोणाचीतरी कोणीतरी यापेक्षा अधिक व्यापक परिचय हवासा वाटत आहे मला. चहा केला की नाही. अशी वागते की तशी वागते या फारच क्षुल्लक बाबी आहेत बाबा. त्यामागच्या अपेक्षाही लौकीक अर्थाने समर्थनीय असतीलही. पण अशा चर्चांना सामोरी जाण्याची वेळच माझ्यावर का यावी? एक माणूस म्हणून मी व्यवस्थित वागत आहे ना? मी तुम्हाला तिघांना आरोपीच्या पिंजर्यात का उभे करू शकत नाही? अशी यंत्रणा लग्न या संस्थेच्या संस्थापकाने या योजली नसेल? तुम्ही तिघे 'आम्ही' या विशेषणाने तर मी 'तू' या एका परकेपणा स्पष्ट करणार्या विशेषणाने का वर्णिले जात आहोत. 'आपण' हा शब्द का नाही? मग कसले दोन घरांचे, संस्कृतींचे आणि मनांचे मीलन हे?"
"तुम्हाला सगळ्यांना वाटेल की हा पराचा कावळा करण्यात येत आहे. नाही, मला तसे वाटत नाही. माझ्याकडून प्रेम, माया, कर्तव्ये, अपेक्षांची अपेक्षेहून अधिक चांगली पूर्तता करणे या अपेक्षा येथे आहेत. असण्यात गैर नाही. पण मला इथे हक्क नाही. तो मी आणि अवि वेगळे राहूनही मिळणार नाही. दोष सासूबाईंचा किंवा अविचा नाही, तुमचाही नाहीच बाबा! पण लग्न या संस्थेचा जो अर्थ तुम्हा तिघांना लागतो तो मला कधीच लागत नाही. हे कोडे आपण दोघे, म्हणजे तुम्ही तिघे आणि मी वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू पाहात आहोत. नुसत्या पद्धती वेगळ्या असत्या तरी कदाचित एकाच ध्येयाकडचा प्रवास म्हणता अलं असतं. आपली ध्येयेच वेगळी आहेत. तुम्हा सर्वांना हवी आहे एक 'तहहयात अपेक्षापूर्ती करणारी' व्यक्ती आणि मला हवे आहे माझे माहेर या सासरी. सासर जर माहेर होऊ शकत नसेल तर मुलीने माहेर सोडून सासरी यावेच कशासाठी? उपकार आहेत ते मुलीवर आणि तिच्या घरच्यांवर? की तुमच्या मुलीला आम्ही पोसू? मला आणि माझ्या आई वडिलांना हे उपकार नकोच आहेत मुळी. आम्हाला प्रेम हवे आहे मिळाले तर, पण तुमचा लग्न या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. त्यात फक्त एकतर्फी अपेक्षांचा एक संच घरात हालत डुलत वावरत असतो. एखाद्या माजलेल्या हत्तीसारखा. ज्याचा माहुत असते तुमची 'आतली, मला प्रवेश नसलेली' संस्कृती. माझ्यासारख्याच इतर मुली का वागत नाहीत? तुमचीच मुलगी का वागत नाही? असे प्रतिप्रश्न करावेसे वाटत असतील तुम्हाला. पण एक सांगू? बाबांच्या बोलण्यात जेव्हा 'आम्ही आणि तू' ही शब्दरचना झळकली ना, तेव्हापासूनच मला वाटायला लागले की आजवर गेली सहा वर्षे मुळातच मला हे सगळे नको होते. नकोसे झालेले होते. एक प्रकारे तुमचे आभार मानायला हवेत की मला मी आणि माझे विचार नीट समजले. कोणताही गैरविचार, राग, त्वेष, द्वेष मनात ठेवून मी वेगळी होणार नाही आहे. नितीशवर हक्क सांगेन, पण त्याला तुमच्यापासून दुरावू देणार नाही. चारपैकी तीनच माणसांसोबत राहणे कदाचित माझ्या मुलाला जड जाईल, पण मुलगा माझाच आहे. मी माझ्या सासरी येऊन तेथील वातावरणाचा एक भाग बनून जावे अशी किमान अपेक्षा असते तुमची. पण मला हवे तसे वातावरण क्षणभर तरी मिळावे असे मला वाटत असेल हे मनात येऊ शकत नाही यामागे 'घराण्याबिराण्याचा' अभिमान असावा. फार काही नाही, सगळ्यांनी खूप खूप स्वप्ने पाहून रचलेले हे लग्न मी मोडतीय इतकंच! त्यामुळे काही मी आणि अवि भेटणारच नाही असे नाही. पण 'आपल्यापेक्षा खूप वेगळ्या विचारांच्या स्त्रीला प्रेमाने भेटायला जाऊ' असा विचार जर अविच्या मनात येऊ शकला, तरच मी भेटेन. माझे वेगळेपण एम्फसाईझ न करता मी तुम्हा सर्वांच्या वेगळेपणात मिसळू शकत नाही. सॉरी. "
खूप खूप वेळाने सासूबाई स्वतःशी बोलल्यासारख्या म्हणाल्या..
"आमच्या काळात मुली दुबळ्या होत्या हेच खरे... नाहीतर तेव्हा मलाही.. हेच वाटायचे इला"
आणि मग बाबा इलासकट सगळ्यांसाठी दुसरा चहा टाकायला उठले.
==============================================
-'बेफिकीर'!
साष्टांग नमस्कार, बेफिकिर...
साष्टांग नमस्कार, बेफिकिर... इतकच. सगळ्याच होऊ घातलेल्या सासू, सासरे, नवरे, दीर आणि सुनांनीही वाचावा असा...
>>>>> +१
कथा खरोखरच छान आहे!!!
कथा छान मांडलीत ; पण कथेतले
कथा छान मांडलीत ; पण कथेतले काही मुद्दे नाही पटले, ईला ही खूपच संकुचित वृत्तीची वाटली, ती कथेत पहील्यापासूनच सरळ-सरळ तुटकपणे वागताना दिसतेय. एखादेवेळेस जर तिने घरामधील लोकांत मिळून-मिसळून त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला असता आणि तरीही घरची मंडळी तिला तसे मुलीसारखे वागवत नसते तर ती गोष्ट आणि तिचा तो निर्णय बरोबर होता. पण येथे तर तिची वृती वेगळीच दिसतेय!
असो, तसं यावर लिहीण्यासारख खूप आहे पण तुर्तास गामा पैलवान आणि चौकट राजा यांच्या प्रतिसादांना अनुमोदन.
कथा छान मांडलीत पण कथेतले
कथा छान मांडलीत
पण कथेतले काही मुद्दे नाही पटले, ईला ही खूपच संकुचित वृत्तीची वाटली>>>अनुमोदन
"बाबा.. तुम्ही मला चहा करून द्यावात असे मी कधीच म्हणणार नाही... कारण काय माहितीय? कारण तुम्ही कितीही झाले तरी माझे वडील नाही आहात... माझ्या वडिलांनी मी म्हणेन तितके वेळा आणि मी नाही म्हणाले तरी मायेने माझ्यासाठी चहा केला असता...">>>>इला जर त्यान्ची मुलगी असती तर तिनेही ते म्हणतील तितके वेळा आणि नाही म्हणाले तरी मायेने त्यान्च्यासाठी चहा केला नसता का?
मला तुमची ती अपेक्षा ज्ञात आहे.. मी मुद्दाम चहा करत नाही तुमचा... आणि विचारतही नाही..>>>>आधि मला तुम्ही माया लावली तरच मी तुम्हाला माया लावेल...असा सूर दिसतो ......त्यापेक्षा (माझ्यासाठी मी चहा करते त्यात अर्धा कप आधण तुमच्यासाठी ठेवायला मला काय जड जाणार आहे का?>>>असे असताना) त्यान्च्यासाठी चहा विचारावा/करावा......अन कधीतरी..."बाबा, आज माझ्यासाठीपण चहा वाढवता का? प्लीज!!" असे विचारले असते तर ते (या कथेतील त्यान्च्या स्वभावानुसार) नक्कीच नाही म्हणाले नसते. मग तिथून त्या नात्यातली सहजता सुरु झाली असती असे मला वाटते.
आपले आपल्या नवर्याशी चान्गले पटते ना, मग ईतर नावडत्या गोष्टीकडे बर्याच स्त्रिया दुर्लक्ष करतात. ईथे लग्नाला ६ वर्ष झाल्यावरही इलाचे तिच्या नवर्याशी पटत नाही आणि तशी तिची ईच्छाही नाही. मग तिने वेगळे राहण्याचा निर्णय योग्य. पण तिच्या सासुला तिचे म्हणणे बरोबर कसे वाटले?.....तिच्या सासुला सुद्धा सुरुवातीला तसेच वाटत होते....ती या परिस्थितीतून गेली आहे....अन पुढे तिने परिस्थितीशी जुळवून घेऊन/त्यात थोडे बदल करुन जर त्या घरात स्वतःचे स्थान निर्माण केले असेल तर सुनेने (माया असलेल्या) मुलासकट सगळ्याना सोडून एकटे राहणे कसे काय योग्य वाटावे?
प्रक्षोभक पण झणझणित विचार
प्रक्षोभक पण झणझणित विचार करायला लावणारि .आवडलि.
काय जबरदस्त लिहिता तुम्ही
काय जबरदस्त लिहिता तुम्ही !!!!!!!!!!!!! अगदी खराखुरा प्रसंग समोर चालू असल्यासारखा वाटतो . विषय पण व्यवस्थित मांडला आहे तुम्ही . सुचते कसे हे तुम्हाला ? वाक्ये समर्पक आहेत .
कथा चांगली आहे... लिहीण्याची
कथा चांगली आहे...
लिहीण्याची पद्धत जबरदस्त... प्रसंग अगदी समोर घडत आहेत असे वाचताना वाटते.
छान आहे कथा...
छान आहे कथा...
sonalisl व चौकट राजा
sonalisl व चौकट राजा यांच्याशी सहत. अवीचे कॅरॅक्टर, त्याचे विचार न मांडल्यामुळे इला संकुचित वाटत राहते व तिचा एकटीने राहण्याचा निर्णय टोकाचा वाटतो. आणि त्याला सासूने माझीपण मते अशीच होती असे पटकन म्हणणे हेपण काही अंशी नाही पटले. पण तरीही काही मुद्दे व अपेक्षा मात्र तंतोतंत पटल्या....
जसे स्वतःच्या मुलीची दोन्ही बाळंतपणे माहेरी कौतुकाने करणार्या आईंना मला हे ऐकवावेसे वाटते की आम्ही आमच्या मुलीची बाळंतपणे आमच्याकडे केली? नुसते तोंडाने असे का बोलावेसे वाटले नाही की हे तुझेही माहेरच आहे असे समज, इथेच करू आपण तुझेही! नुसते तोंडाने का बोलावेसे वाटत नाही? याचे कारण ते मनात नसते. मनात फक्त अपेक्षा असतात. >> एरवी मुलीप्रमाणे मानणार्या सुनेला बाळंतपण मात्र माहेरच्यांनी करायला हवे होते असे ऐकवले जाते. माहेरी बाळंतपणासाठी पाठवणे ही परंपरा नसून मुलीला जास्त आराम, रिलॅक्स व डोहाळे पुरवले जावेत यासाठी पाठवले जाते, हे सासरी होणार असेल तर सासरी बाळंतपण व्हायला हरकत नसते.
बर्याच सासवा हौसेनी सुनेचे बाळंतपण करताना हल्ली दिसत असल्या तरीही अजूनही बर्याच ठिकाणी बाळंतपण करणे हे मुलीच्या माहेरच्यांचे कर्तव्य आहे या पारंपारीक(!???) मतावर बरेचजण (विशेषतः सासवा) कायम असतात.मी स्वतः या फेजमधून गेलेली आहे... त्यामुळे हा पॅरा विशेषकरून जास्त रिलेट झाला.
असो बाकी मांडणी छान, पण राहून राहून वाटतेय की इलाच्या निर्णयाचं समर्थन निशंक मनाने करता येणार्या काही घटना मांडायला हव्या होत्या.
इलाचे विचार पटले नाहीत. पण
इलाचे विचार पटले नाहीत. पण कथा आवडली.
मला कथा, लिहिण्याची पद्धत,
मला कथा, लिहिण्याची पद्धत, इलाचे विचार सर्व काही आवडलं. एक पुरूष असूनही तुम्ही अशी कथा लिहिलित त्याबद्दल तुमचं अभिनंदन.
इलाचा जो विचार आहे लग्नसंस्थेबाबतचा तो प्रचंड लॉजिकल आहे आणि त्यात कोणतीही तडजोड नाही. दोन व्यक्ती किंवा घरं ही संस्कारापेक्षा मनाने आणि व्हॅल्यूजनी अधिक जोडली जावीत हे फार सुंदर आहे.
बेफी अप्रतिम कथा.. मला खूप आवडली.
आवडत्या १०त.
सर्व प्रतिसादक, निवडक दहात
सर्व प्रतिसादक, निवडक दहात घेणारे व सर्व बाजूंचे विचार प्रतिसादरुपाने मांडून कथेत सहभागी होणार्यांचा आभारी आहे
-'बेफिकीर'!
माझ्या निवडक दहात
माझ्या निवडक दहात
"आमच्या काळात मुली दुबळ्या
"आमच्या काळात मुली दुबळ्या होत्या हेच खरे... नाहीतर तेव्हा मलाही.. हेच वाटायचे इला"
हे वाक्य सगळच बोलून जातं >> अगदी अगदी
बेफिकीरजी नमस्कार ! खूप
बेफिकीरजी नमस्कार !
खूप दिवसानंतर माबो वर येऊन पहिली तुमची सून इला भेटली . कथा सर्वांच्या प्रतिसादासह वाचली . कथा खूप छान आहे. पण साची , राजा , मामा पहिलवान , सोनाली यांच्याशी सहमत आहे. एवढ्या स्वतंत्र विचारांची स्री लग्न तरी का करते . तीला तीचे स्वछंदी विचार लग्नानंतरच समजले का ? खरे तर इला ज्या माहेरा बद्दल बोलते तेथेही वहिनी आली की परकेपणा जानवायला लागतो. त्यामुळे संसार मोडीत काढून आगदी लहान बाळाला सोडून जाण्यात काही अर्थ आहे वाटत नाही.
Khupach chan lihilay..
Khupach chan lihilay.. Manapasun aavdali.. Ek navin vichardhar mandleli aahe..
मस्त..... आज काल पुस्तक
मस्त.....
आज काल पुस्तक वाचनचा आनन्द मायबोली वर मिळतो
मला दोन वर्षे तेरा आठवड्यात
मला दोन वर्षे तेरा आठवड्यात जो आनंद मिळाला नाही तो तुम्हाला एक वर्षे बावीस आठवड्यात मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन
अगदिच अप्रतिम ........ मी
अगदिच अप्रतिम ........ मी देखिल अशिच बंडखोर आणि थोद्या वेगल्या विचार सरणिचि आहे.
एक्न्दरितच "ईला" उत्क्रुश्त सादर केली आहे.
खालिल वाक्यासाठी तर मानचा मुजाराच तुम्हाला ....
"आपल्याकडे लग्न हा प्रकार जरा चकवणाराच असतो सगळ्यांना
"दोन घरांचे, दोन कुटुंबांचे मीलन! दोन घरांचा असा नातेसंबंध, ज्यात केवळ गोडवा व नावीन्य हेच दोन पिलर्स असतात. कौतुक आणि आनंद या भिंती! आदर आणि पाहुणचार या दुसर्या दोन भिंती! आणि नवीन पिढीची निर्मीती हे छत! काय पण प्रकार आहे लग्न हा! काय अभिप्रेत असेल हा प्रकार सुरू करणार्याला? त्याला नेमके काय म्हणायचे असेल? की कोणत्याही दोन व्यक्ती एकमेकांच्या होण्यासाठी लग्न हा सोपस्कार एकदा उरकला की सगळे ठीक होते? कोण मुलीला आपली मुलगी मानते? कोण तिला आपल्या स्वतःच्या पोटच्या पोरीपेक्षा किंवा निदान तितके प्रेमाने वागवते?
दुसरा मुळात कसा आहे यावर विचार करण्याची गरजही भासत नाही लग्न केल्यावर. कारण जसा कसा आहे तसा आपला आहे हे मान्य करायचे. का मान्य करायचे? कारण समाज म्हणतो?
हाय सोनू सोना मायबोलीवर
हाय सोनू सोना
मायबोलीवर स्वागत करण्याइतका मी जुना नाही, पण स्वागत
धन्यवाद या प्रतिसादासाठी
असाच लोभ राहूद्यात
-'बेफिकीर'!
(No subject)
बेफि, काय अप्रतिम कथा लिहिली
बेफि, काय अप्रतिम कथा लिहिली आहे! शेवट तर फार आवडला. अतिशय सकारात्मक.... इला ग्रेट आहे. नायिकेचे अगदी समर्पक नाव ठेवलेत. मनूची बंडखोर, न्याय्य, स्पष्टवक्ती आणि सुस्पष्ट विचारसरणीची मुलगी- इला.
माझ्या निवडक १० त
बेफिकीरजी भुक्कडचे काय झाले ?
अजुनही चातकासारखा प्रतीक्षेत.......
सुरेख....... इलाची भुमिका
सुरेख.......
इलाची भुमिका आवडली.
(No subject)
मस्त आणि सुस्पष्ट! मुळात हे
मस्त आणि सुस्पष्ट! मुळात हे विचार फार कमी आणि कमी वेळा सासरचे लोक करताना दिसतात.
हल्ली असे आहे की बरेच लोक कर्तव्य म्हणून मुलांची लग्न करुन देतात आणि मग काही प्रोब्लेम नको म्हणुन अलिप्त रहाणेच पसंत करतात, याविरुद्ध अशी ही लोक पहायला मिळतात की आमचं सगळं छान चाललयं हे दाखविण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. दोन्ही प्रकार तसे स्वीकारावेसे वाटत नाहीत.
असो. बेफि.. keep it up.
-- श्रुती
अप्रतिम ! खुपच छान कथा आहे
अप्रतिम ! खुपच छान कथा आहे .............
हो, धन्यवाद! आपण नुकत्याच
हो, धन्यवाद! आपण नुकत्याच आलात का मायबोलीवर? आपलेही स्वागत!
योगदीपक, तृष्णा, बालिका,
योगदीपक, तृष्णा, बालिका, अभिश्रूती, आपलेही आभार
बर झाल मि वाचल
बर झाल मि वाचल ............... मला यचि आता खुप गरज आहे !!!!!
छान आहे कथा. मला आवडली.
छान आहे कथा. मला आवडली.
विचारविन्मुख झाले... आवाडत्या
विचारविन्मुख झाले...
आवाडत्या दहात!
हॅटस ऑफ बेफीजी !
- सुप्रिया.
Pages