'टारफुला' - शंकर पाटील

Submitted by साजिरा on 17 April, 2012 - 08:06

'लिंब इजंला धार्जिणा असतो' या वाक्याने एकेकाळी मनावर गारूड केलेलं. साहित्य आणि साहित्यप्रकारांतलं फारसं काही कळत नसण्याच्या काळात अभ्यासाच्या पुस्तकांत कथा कादंबर्‍यांची पुस्तकं ठेऊन गुपचूप वाचायचो, शिवाय आधीच्या इयत्तेत असताना थेट बारावीपर्यंतची मराठीची पुस्तकं आसुसल्यागत वाचायचो, तेव्हा. पुढे हे वाक्य 'संदर्भासहित स्पष्टीकरण द्या'मध्ये प्रश्नस्वरूपात आलं तेव्हाही परीक्षकांना कंटाळा येईस्तोवर त्यावर लिहिलं जायचं. आता अभ्यासक्रम संपला, आणि परीक्षाही. पण शंकर पाटलांच्या लक्षात राहून गेलेल्या अनेक वाक्या-वाक्प्रचारा-शब्दप्रयोगांसारखंच हे चार शब्दांचं वाक्य जे मनात कोरलं गेलं, ते कायमचं. आजही कुठं खेड्यात गावात गेलो, की तुफान वळवाच्या पावसात बायकोने धाडलेल्या अंगठीकडे 'म्हऊ घातल्यागत' बघणारा म्हातारा तात्या कुठे दिसतो का, ते बघण्यासाठी नजर भिरभिरते.

परवा 'वळीव' हातात पडल्यावर झपाटल्यागत पुन्हा वाचून काढली. मग ठरवलं, 'टारफुला' पुन्हा एकदा वाचायचं. न कळत्या वयात ते वाचलं होतं, तेव्हा त्यातली 'कथा' फक्त कळली होती. भाषेचं सौंदर्य, ग्रामीण संस्कृतीतल्या अनेक गोष्टी-संदर्भ, पाटलांचे अनवट शब्दप्रयोग, मंत्रवून टाकणारी वाक्यरचना आणि गोळीबंद लिखाणाची शैली बहुधा कळायची राहूनच गेली होती.

सिद्धहस्त कथालेखक म्हणून नाव कमावलेल्या शंकर पाटलांची 'टारफुला' ही पहिली कादंबरी. २००७ साली निघालेल्या तिसर्‍या आवृत्तीच्या निमित्ताने या पुस्तकाला नागनाथ कोत्तापल्लेंची सुंदर प्रस्तावना लाभली आहे. १९६४ साली प्रसिद्ध झालेली ही कादंबरी शंकर पाटलांना का लिहावीशी वाटली आणि ती साठच्या दशकातल्या व त्यापुर्वीच्या मराठी कादंबर्‍यांत कशी वेगळी ठरते याचं सुंदर विवेचन कोत्तापल्लेंनी केलं आहे.

***

एका गावातल्या 'पाटीलकी'भोवती फिरणार्‍या या कथेला रूढार्थाने कुठचाही नायक नाही. तीन भागांत विभागलेल्या या कादंबरीत 'हा' नायक आहे, असं वाटेस्तोवर चक्रं फिरतात आणि बदलत्या घडामोडींसोबत नवीन नायक, नवीन प्रसंग आणि नवीन संदर्भ येतात. हा खेळ शेवटपर्यंत चालू राहतो, आणि गावातल्या सत्ताकारणाचा घोडा यापुढेही कुठच्या नायकाला जास्त काळ स्वार होऊ देणार नाही हे आपल्याला कळतं.

गावावर आणि 'पाटीलकी'वर वर्षानुवर्षे भक्कम मांड ठोकून बसलेले सुभानराव पाटील अचानक मरण पावतात- इथं 'टारफुला' सुरू होतं. गाव हवालदिल होतं. पाटलीणबाई नशिबाला शरण जाऊन गाव सोडून माहेरचा आसरा घेतात आणि पाटलांच्या जरबी आणि हिकमती कारभारात अनेक वर्षे 'कुलकर्ण' सांभाळणारे आबा कुलकर्णी एकटे पडतात. पाटलांची भक्कम छत्रछाया आपलं कुलकर्ण बिनधोकपणे चालत राहण्यासाठी किती आवश्यक होती याची जाणीव त्यांना होते. पाटलांच्या काळात 'रामराज्य' भासणार्‍या गावाच्या पोटात किती मळमळ लपून होती हे कळतं. जरब आणि हुकुमत स्वभावात नसलेले कुलकर्णी पाटलांच्या मृत्युनंतर गावात उद्भवलेली सुंदोपसुंदी असहाय नजरेने बघत राहतात. गाव पंखाखाली घेण्याचा कुलकर्ण्यात दम नाही हे ओळखलेले बंडखोर गावातल्या कारवायांना अक्षरशः ऊत आणतात. पाटील-कुलकर्ण्यांकडे आजवर डोळा वर करून बघू न शकणारे राजरोस सोटे-काठ्या घेऊन गावात फिरू लागतात, इतकंच काय, पण कुलकर्ण्यांना दमही देऊ लागतात. या सार्‍या कारवायांचं मुख्य कारण अर्थातच- पाटीलकी. माहेरी जाऊन बसलेल्या पाटलीणबाई भावाचा मुलगा दत्तक घेणार- या बातमीसरशी पाटलांचे भाऊबंद आणि विरोधक समांतर पाटीलकी सुरू करतात, आणि यातच दोन्ही दरडींवर पाय ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू बघणार्‍या आबा कुलकर्ण्यांचा खून होतो.

कुलकर्ण्यांचा शेवटचा अडसर निघाल्यानंतर गावात बेबंदशाही माजते. पाटलांची शेतं परस्पर बळकावून नांगरली जातात. जमिनीच्या खुणांचे दगड रातोरात सरकतात. पाटलांच्या 'शंभर आखणी चिरेबंद' वाड्यात भूत असल्याची आवई उठवली जाते, आणि सत्तेचं प्रतीक असलेल्या ज्या वाड्याने मानमरातब, न्यायनिवाडे, सनद्यांचे जोहार आणि खानदानी ऐश्वर्य बघितलं होतं, त्या वाड्याच्या नशीबात स्वतःच्याच कोसळत चाललेल्या भिंती आणि अंधार बघणं येतं.

हे असं बरेच दिवस चालू राहिल्यानंतर एक दिवस अचानक गावात दीड पुरूष उंची असलेल्या अरबी घोड्यावर बसून विंचवाच्या नांगीसारख्या मिशीला पीळ देत बंदूकधारी मर्द गडी येतो आणि त्याच्या खास शैलीत एकेका सनद्याची हजेरी घ्यायला सुरू करतो, तेव्हा अवाक झालेल्या गावाला कळतं, हे दादा चव्हाण नावाचं वादळ म्हणजे 'थोरल्या' महाराजांनी नियुक्त केलेला गावचा 'नवीन पाटील'. सारं गाव येडबडून जागं होतं. कुणाला आनंद होतो, तर कुणाला दु:ख. कुणा मेल्या मढ्यात चैतन्य येतं, तर कुणाची भितीने पाचावर धारण बसते. सहज शरण न येणार्‍या बंडखोरांनाही त्यांच्याच पद्धतीने उत्तर मिळतं, आणि सारे दांडगट हळुहळू सरळ होतात. भलेभले शरण येतात. जुन्या पाटलांच्या दुसर्‍याच्या ताब्यात गेलेल्या पेरणी झालेल्या जनिमी सुद्धा परत दिल्या जातात. बांध आणि वाटणीच्या खुणेचे दगड पुर्ववत होतात. दादा पाटलांमुळे वाड्यातली भुतं पळतात. सनदी पुन्हा नेकीने काम करू लागतात. चावडीवर, वाड्यावर पुन्हा पहिल्यासारखा नित्यनेमाने 'जोहार' होऊ लागतो. शंभर आखणी वाड्यातली सारी भुतं शंभर मैल दूर पळतात. वाडा आणि ढेलज पुन्हा समया, निरांजनं आणि मशालींनी उजळतो.

राऊनानांसारख्या जुन्या पाटलांच्या विश्वासातल्या बुजूर्गाला आणि स्वतःच्याच तीन तगड्या भावांना हाताशी धरून दादा पाटलांचा कारभार सुरू होतो. जुने सारे हिशेब मिटवले जातात. पाटलीणबाई वर्षाच्या उत्सवासाठी सन्मानाने वाड्यात येऊन पुन्हा समाधानाने माहेरी जातात. गाव सुटकेचा नि:श्वास सोडतं आणि दादा पाटलांचा एकछत्री अंमल सुरू होतो.

पण सत्ता आणि तारतम्य- हे दोघं नेहमीच एकत्र सुखाने नांदते, तर आणखी काय हवं होतं? सत्तेपाठोपाठ नशा आली की विवेकबुद्धी हरते. मुठीत आलेल्या सत्तेच्या आयाळीमुळे सारासार विचार, सम्यक विचार अडगळीत पडतो. एकछत्री अंमलाच्या कैफात गावचा पोशिंदा आणि जुलमी राज्यकर्ता यातल्या सीमारेषा दादा चव्हाण अस्पष्ट करत जातात. सत्तेसोबतच पैशाचीही हाव त्यांना सुटते. राऊनानांच्या खुनाचं निमित्त होऊन असंतोष पुन्हा धुमसु लागतो. या असंतोषाचा फायदा घेत विरोधक पुन्हा सक्रिय होतात. जुनं शत्रुत्व विसरून ते दादा पाटलांच्या विरोधात गुप्त कारवाया सुरू करतात. भरीस भर म्हणून ज्या नव्या दमाच्या गड्यांच्या जोरावर दादांनी गावावर दहशत बसवलेली असते त्या तरूण फळी पर्यंतही हा असंतोष पोचतो. राजकारण आणि सत्ताकारण नेहमीच अगम्य आणि अविश्वसनीय अशी नवी समीकरणे जन्माला घालत असतं. तसं इथेही होतं आणि भल्याभल्यांना हादरवणारे दादा पाटील अस्वस्थ होऊन चुकीची पावलं उचलत राहतात.

अनेक नवीन शक्यता दाखवत, गावाला पुन्हा अस्थिरतेच्या गर्तेत ढकलत, अधांतरी अवस्थेत ही कथा संपते तेव्हा आपल्याला कळतं- ती संपलेली नाही. अशी कथा संपत नसते. सत्ताकारणाची ही भोवरी अशीच उडत राहणार आणि भल्याभल्यांना धूळ चाटवून पुन्हा नवा प्रवास करत राहणार..

***

शंकर पाटलांनी या साधारण तीनेकशे पानांच्या कादंबरीचे सरळसरळ तीन भाग केले आहेत. पहिल्या भागात आबा कुलकर्णी; दुसर्‍या भागात दादा पाटील आणि तिसर्‍या भागात दाजीबा, केरूनाना, हिंदुराव असे ठळक नायक म्हणून समोर येतात. शेवटी राऊनाना, दाजीबा, केरूनाना, आबा कुलकर्णी यांच्या मुलांचं वागणं आणि बंड शेवटी अनेक नवीन शक्यता सुचित करून जातं. पिढ्या बदलतात, मात्र सत्तेचं चक्र अव्याहत फिरत राहत. या तीन स्वतंत्र दीर्घकथा किंवा लघुकादंबर्‍याही म्हणता येतील खरं तर. पण लेखकाने विणलेल्या गावाच्या अफाट आणि विस्मयजन्य पटापुढे या साहित्यप्रकाराला नक्की काय म्हणावं हा प्रश्न फारच गौण ठरतो. ग्रामीण जीवन जगलेले, अनुभवलेले शंकर पाटील ज्या पद्धतीने आणि बारकाईने तपशील आपल्यासमोर मांडत जातात ते आपल्याला थक्क करून सोडतं. गावातल्या रीतीभाती-पध्दती, विचार आचार, समाज आणि संस्कृती यांचा अख्खा पट आपल्यापुढे तर उभा राहतोच; पण एवढ्याशा गावातलं सत्ताकारण किती कल्पनेपलीकडलं आणि जीवघेणं असू शकतं याचीही कल्पना येते. यानिमिताने आपल्यासमोर शेकडो प्रकृतीच्या माणसांच्या वागण्याच्या, स्वभावांच्या, गुणदोषांच्या असंख्य पोतांचं नयनमनोहर चित्र आपल्यासमोर उभं राहतं.

***

'टारफुला' प्रसिद्ध होण्याच्या आधीही कादंबरीच्या कॅनव्हासवर हे असं माणसाच्या स्वभावाचे असंख्य पोत चितारणं हे मराठी कादंबरीला नवीन नव्हतंच. पण इथलं हे असं पोतांचं चित्र नुसतं चित्र राहत नाही. ती चित्रं हाडामांसाची माणसं बनून समोर येतात, इतकं ते वास्तव आहे. अत्यंत बारकाईने तपशील देत लेखक ही सारी पात्रं चितारत राहतो. ज्याने गावातलं खेड्यातलं आयुष्य थोडंफार का होईना अनुभवलं आहे, त्याला हे सारे कल्पनेचे घोडे नाहीत हे लगेच कळतं. असं वास्तव चितारणं हे मात्र मराठी कादंबरीला मात्र फारसं परिचयाचं नव्हतं. कल्पनाशक्तीला जास्त न ताणणं हा लेखकातला दोष मानला जात होता. 'बनगरवाडी', 'धग' सारख्या फारच थोड्या कलाकृती वास्तवतेची कास धरून, विस्तवाचा चटका बनून वाचकांच्यासमोर आल्या होत्या. परदेशी साहित्याची नक्कल करत इथल्या संस्कृतीशी-मातीशी अजिबातच नाळ नसलेल्या भावबंबाळ-शब्दबंबाळ शहरी कथा-कादंबर्‍या लिहिण्याची चढाओढ जिकडेतिकडे दिसून येत होती. एकतर झाडाखाली प्रेम करणारे टेनिस खेळणारे नायक नायिका, गुलाबी प्रेमपत्रं लिहिणारे आणि पाश्चात्य पद्धतीचे प्रेमभंग करवून घेऊन इगो कुरवाळणारे नायक नायिका; किंवा मग इथल्या फाटक्या देशी पद्धतीच्या जगण्याला न परवडणारे खोटे आणि कधीही वास्तवात न येणारे ध्येयवाद बाळगणारी त्यागी आणि 'सो आयडियल टू बी ट्र' अशी पात्रे- अशी जिकडेतिकडे रेलचेल होती. 'कोसला'सारखा धक्कादायक आणि नवीन प्रयोग आलेला असला, तरी अजून तो अजून पचायचा होता. बर्‍यापैकी दुर्लक्षित होता, आणि त्याचा गवगवा अजून व्हायचा होता. ज्या काळात 'टारफुला' आली, त्या काळचं हे फारसं सुखद नसणारं वास्तव बघितलं, तर मराठी कादंबरीच्या प्रवासातलं तिचं स्थान थोडंफार लक्षात येईल.

'टारफुला' म्हणजे पिकामध्ये बेगुमान वाढणारं तण. नको असलेलं, मूळ पिकावर वाईट परिणाम करणारं, आणि जे नष्ट करण्यासाठी शेतकर्‍याला जीवाचं रान करावं लागतं, असं तण. एकदा नष्ट झालं म्हणजे झालं, असं म्हणून चालत नाही. ते पुन्हा येतंच. आणि ते नष्ट करण्याचा प्रयत्न अव्याहत चालूच राहतो. एकदा नष्ट करण्यातच ते पुन्हा उगवण्याची बीजं जमिनीत लपतात. वेळ येताच पुन्हा ते उगवतं, फोफावतं. पिकाला आणि शेतकर्‍याला आव्हान देतं. सत्ताकारण हे असंच चक्र ते अव्याहत चालूच राहतं. सत्ताकारणातले नायक बदलतात. पण सत्ताकारणाचा संघर्ष तोच राहतो. माणसाच्या शेकडो प्रवृत्ती शेवटी फक्त सत्ताधारी आणि विरोधक या दोनच जातींत शेवटी विभागल्या जातात. इकडचे भिडू तिकडे कधी होतात, हे त्यांनाही समजत नाही. ही सत्ताकारणाची जादू. हे तण आजही निरनिराळ्या रुपांत जिवंत दिसतं, मारलं तरी पुन्हा फोफावतं. 'टारफुला'तलं सत्ताकारण आज साडेचार दशकांनंतरही जिवंत वाटतं, हे या कथेचं यश. त्या दृष्टीने 'टारफुला' कालातीत आहे, असं वाटतं.

***

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टारफुला नुकतीच वाचून हातावेगळी केलीय्,सध्या शंकर पाटलांचाच कथासंग्रह ''इल्लम'' वाचतोय.
टारफुला वाचताना एकेक प्रसंग डोळ्यासमोर घडतोय असं वाटतं. अफाट व्यक्तिचित्रण.... आजकाल शंकर पाटलांसारखी व्यक्तीचित्रणे व.बा.बोधेंसारखे फार दुर्मिळ लोक करताना दिसतात.

सुंदर आणि विस्तृत परिचया बद्दल धन्यवाद.

लहानपणी लातूर ला असतांना शंकर पाटलांच कथाकथन ऐकलय. ती आठवण जागी झाली. मला वाटत ' धिंड ' ही कथा होती. तेव्हा फारस काही कळत ही नव्हत ( आताही किती कळत हा ही एक प्रश्नच आहे )पण हे काहीतरी जबरदस्त आहे हे कळत होत. लहानपणच्या ज्या काही ठळक आठवणी आहेत त्या पैकी ही एक. शंकर पाटलांच कथाकथन यू ट्यूब वर ही आहे बहुतेक.

साजिरा,
इतक्या सुंदर परिचयानंतर आता वाचणे आलेच.
भाषेचं सौंदर्य, ग्रामीण संस्कृतीतल्या अनेक गोष्टी-संदर्भ, पाटलांचे अनवट शब्दप्रयोग, मंत्रवून टाकणारी वाक्यरचना आणि गोळीबंद लिखाणाची शैली
इतके अचूक वर्णन याआधी कधी झाले नसावे.
शंकर पाटील माझे अतिशय आवडते लेखक. ग्रामीण बाज पकडणारा इतका जबरदस्त लेखक नंतर फारसा वाचनात नाही.

अप्रतिम परिचय!
शेवटचा परिच्छेद जबरदस्त.
पहिल्यांदा वाचली तेंव्हाच प्रचंड आवडली होती, एकाच वेळी अत्यंत सखोल असे व्यक्तीचित्रण आणि मोठ्या सामजिक पटाचे भान हे अवघड गणित शंकर पाटलांनी संभाळले आहे.

मस्तच Happy

३-४ वर्षांपूर्वी वाचली होती ही कादंबरी, कोत्तापल्लेंची प्रस्तावना खरंच खूप छान आहे. ती नसती, तर मी कदाचित फार विचार करत न बसता वाचलं असतं हे पुस्तक. पण त्या प्रस्तावनेमुळे खरंच 'भाषेचं सौंदर्य, ग्रामीण संस्कृतीतल्या अनेक गोष्टी-संदर्भ, पाटलांचे अनवट शब्दप्रयोग, मंत्रवून टाकणारी वाक्यरचना आणि गोळीबंद लिखाणाची शैली' हे सगळं लक्षात घेत घेत वाचलं जातं.

मस्त परिचय साजिरा. बर्‍याच दिवसांत एखादी चांगली कादंबरी वाचली नाही असे वाटत असतानाच हा परिचय आला. आता आणतो हे पुस्तक.

सुरेख परिचय!
मुख्य म्हणजे *** वापरून परिचयाचे भाग केले आहेस, ते अतिशय परिणामकारक आणि उपयोगी आहे. मी कादंबरी अजून वाचली नाहीये, पण प्रस्तावनेनंतरचा विभाग वाचायला सुरू केला आणि २-३ वाक्यातच कळले की इथे कथावस्तू सांगत आहेस, तेव्हा तो संपूर्ण भाग टाळून पुढे गेलो; तरीसुद्धा शेवटचे विश्लेषण कळायला काहीच बाधा आली नाही. विश्लेषण आवडलेच.
वाचकपणाशी पूर्ण इमान राखून केलेला परिचय.
ता. क. वळीव, लिंब इजंला....., म्हऊ घातल्यागत..... वगैरे वाक्यांबद्दल अगदी अनुमोदन. ती वाक्ये वाचून सं.स्प.द्या हेच आठवले Happy त्या प्रश्नामुळे (किंबहुना, त्याबद्दलच्या धडकीमुळे) अशी कित्येक वाक्ये लक्षात राहिली आहेत. सं.स्प.द्या या प्रश्नाचे आपल्या शालेय मराठी शिक्षणात हे (आणि कदाचित हेच) योगदान असेल.

सं.स्प.द्या या प्रश्नाचे आपल्या शालेय मराठी शिक्षणात हे (आणि कदाचित हेच) योगदान असेल. >>> Happy कंस महत्त्वाचा आहे !!!

सं.स्प.च्या योगदानाबद्दल अनुमोदन, त्याचे लॉजिक पुढे खेचून ते हिंदी गाण्यांच्या ओळींना लावणे फारच मनोरंजक होते!
उदा.कवी असे का म्हणतो याचे संदर्भासहित स्पष्टीकरण द्या 'भोली भाली लडकी खोल तेरे दिल की प्यारवाली खिडकी'

१९६४ वा ६५ मध्ये प्रकाशित झालेली आणि मराठी कादंबरीच्या वाटचालीत मैलाचा दगड मानली गेलेली शंकर पाटलांच्या 'टारफुला' वर आजही अशी देखणी चर्चा होत आहे हे पाहिल्यावर मन भरून आले. एकदोन वर्षांनी टारफुल्याला चक्क ५० वर्षे पूर्ण होतील पण त्यातील कथानकाची महती वा व्यवहार आजही जसाच्यातसा प्रकर्षाने खेडोपाडी अथकपणे चालू आहे.

"टारफुला" चा अर्थ साजिरा यानी 'पिकामध्ये बेगुमानपणे वाढणारे तण" असा दिला आहे तो सूचक आहेच. पण मी ज्यावेळी ही कादंबरी वाचली आणि पुढे खुद्द लेखक शंकर पाटील यांच्याशी कोल्हापूरात 'गुलमोहोर गप्पाटप्पा' कार्यक्रमात बोलण्याची संधी मिळाली त्यावेळी आम्ही मुद्दाम त्याना अभिप्रेत असलेला 'टारफुला' चा अर्थ विचारला त्यावेळी त्यानी 'कॉन्ग्रेस गवत' असा सांगितला....जे कुठेही [पिकातच नव्हे] बेगुमान निर्लज्जपणे वाढते आणि ते कितीही वेळा जाळून टाकण्याचा यत्न केला तरी दुसर्‍या दिवसापासून तरारून येते. [पिकामधील तणकटाला जित्राबं निदान तोंड तरी लावून चघळतात, पण कोणतेही जनावर 'कॉन्ग्रेस गवता'च्या आसपासही जात नाही, इतके ते टाकावू आहे. राजकारणातही असा मुर्दाडपणा असणे हे त्या लोकांचे व्यवच्छेदक लक्षणच होय.

पारंपारिक पद्धतीचे नायक, नायिका, खलप्रवृत्तीच्या, साधुप्रवृत्तीच्या साच्यातील पात्रे न घेताही 'एक गाव' हाच केन्द्रबिंदू मानून शंकर पाटलांनी या कादंबरीचा असा काही विलक्षण साचा वाचकासमोर ठेवला की त्या काळात या ग्रामीण कादंबरीवर समीक्षकापासून सर्वसामान्य वाचकावर भूलच पडली.

फार थोड्या कादंबर्‍यांना असे काळाच्या ओघात नष्ट न होण्याचे भाग्य लाभते. विश्राम बेडेकरांची 'रणांगण', पेंडशांची 'रथचक्र', माडगुळकरांची 'बनगरवाडी', दळवींची 'चक्र', आनंद यादवांची 'गोतावळा', मनोहर शहाणे यांची 'पुत्र', उद्धव शेळके यांची 'धग' आणि शंकर पाटील यांची 'टारफुला' ही काही जातिवंत उदाहरणे आपल्या मायबोलीत आहेत.

साजिरा यानी आपल्या लेखात या वैशिष्ट्यांची नस अचूकपणे पकडली आहे.

अशोक पाटील

अप्रतिम परिचयपर लिहिलंस साजिरा !!!
सुभानराव पाटलांची जरब,
आबा कुलकर्ण्यांची कायम दडपणाखाली असल्यामुळे सततची घालमेल,
आणि दादा पाटलांतला ऊमदा, करारी पाटील म्हणता म्हणता मग्रूर मग माजोरडा मग जुलमी मग अस्वस्थ असा होत जाणारा प्रवास
हे सारं नाट्य शंकर पाटलांनी नुसत्या घटना मांडूनच नव्हे तर वाचणार्‍यालाही त्या नुसत्या घटनाच न वाटता त्या घडतांना त्यातल्या केंद्रस्थानी व्यक्तीची मानसिक आंदोलनंही अनुभवण्यास भाग पडलं पाहिजे अश्या काही विलक्षण रित्या चित्रित केलं आहे की बस्स!!

मागे टण्याने पण लिहिल्याचं आठवतंय टारफुला बद्दल.

धन्यवाद लोकहो.
चमन, आता बघितलं तर श्रद्धाने लिहिलेलं काहीतरी सर्चमध्ये दिसतं पण ते पान उघडत मात्र नाही. जुन्या मायबोलीवर होतं का? बाकी सर्चमध्ये 'वाचू आनंदे' ग्रुपमध्ये वाचल्याची नोंद केल्याच्या पोस्टस दिसल्या.

अर्भाटा, कथावस्तू वाचल्याने फार काही फरक पडणार नाही, असं वाटतं. कथा आधी माहिती असो की नसो, पण ती शंकर पाटलांच्या ढंगदार शैलीतून वाचणं हा एक अफाटच अनुभव आहे.
आणि त्या सं.स्प. चे माझ्यावर तरी फार उपकार आहेत. संदर्भ आणि स्पष्टीकरण म्हणजे नक्की काय ते पहिल्यांदा त्यामुळे शिकलो. Happy दुसरं म्हणजे या सं.स्प. च्या नावाखाली पानंच्या पानं भरून काढता येत असत. कधी कधी तर संपूर्ण कथा, अख्खा धडा. आणि वर स्वतःचे चार आणेही. Proud पण याचमुळे मराठीच्या पेपरला वेळ पुरला असं कधीच झालं नाही. अनेकांना आला असेल हा अनुभव.

अशोक पाटील, विवेचनाबद्दल धन्यवाद. Happy

एकूण एक शब्दाशी सहमत. अत्यंत ताकदवान चित्रण. ती भाषाच काही आगळी आहे.. मोहवून टाकणारी. अक्षरशः डोळ्यापुढे प्रसंग घडत राहतात.

धन्यवाद साजिरा. तू इतकं जबरदस्त लिहीलं आहेस, की लगेचच मिळवून वाचली.

टारफुला वाचलं.
जबरदस्त आहे.
हा लेख वाचुन वाचायच ठरवल होत.
लेखाची लिन्क मी वाचलेल पुस्तक मध्ये दिली आहे म्हणुन लेख वर काढतोय. Happy

Jabardast aahe kadambari mi 2-3 varsha purvi vachali aahe shankar patalancha katha pan mast aahet jase valhiv ,patalanchi chanchi,khulhyanchi chavadi,dhind,mast katha sangrah aahet

फारा पूर्वी वाचली होती.
ह्या परिचयामुळे आता पुन्हा वाचणे आले.
छान लिहिले आहे .. परिचय आणि कादंबरी दोन्ही

Pages