अंतराचा जाचच असतो ..

Submitted by कमलाकर देसले on 16 April, 2012 - 09:59

अंतराचा जाचच असतो ..

पारदर्शक असला तरी -
काच तो काचच असतो ..
नातं असलं तरी प्रिये -
अंतराचा जाचच असतो ..

सारखच असतं नातं नि जातं ;
त्यातून फक्त पडतं पीठ ..
दोन तळ्यात भरडल्यावर -
जगण्याचाच येतो वीट ..

खुंटा धरून ठेवण्याइतके -
आपण कधी नसतो शहाणे ;
किंवा जात्यात पडण्याआधी -
ठाऊक असतात कुठे बहाणे ..

जाता आलं तर जाऊच -
नात्याच्याही थोडं पुढे ..
दोघं मिळून बांधू पूल -
तोडून टाकू बुरूज ,कडे ..

गुलमोहर: 

काच तो काचच असतो ..>>>>>>>>>>>>>
काच हा सर्वमान्यपणे स्रीलिन्गी शब्द आहे........... आपण केलेला बदल अस्सल सोलापुरी , त्यातही तेलगु भाषिक मराठी बान्धवच करू शकतात असे मला वाटत असे ................आता तसे वाटत नाहीय.

वैभव वसंतराव कु... | 16 April, 2012 - 10:25 नवीन
काच तो काचच असतो ..>>>>>>>>>>>>>
काच हा सर्वमान्यपणे स्रीलिन्गी शब्द आहे........... आपण केलेला बदल अस्सल सोलापुरी , त्यातही तेलगु भाषिक मराठी बान्धवच करू शकतात असे मला वाटत असे ................आता तसे वाटत नाहीय

वैभवजी ,स्त्रीलिंगी काचेला पुल्लिंगी रूप देणे हा बदल अस्सल सोलापुरी वाटत असला ,किंवा तेलगू भाषिक मराठी बांधव तसे करत असतील . मी खानदेशी आहे . आमच्याकडेही क्वचित किंवा खूपदा काचेचा पुल्लिंगी उल्लेख होतो .
जसे की आरशाची काच ऐवजी आरशाचा काच असे संबोधतो . किंवा चष्म्याची काच फुटली ऐवजी खूपदा चष्म्याचा काच फुटला असेही बोलले जाते . प्रमाण भाषेत मात्र काच हा शब्द स्त्रीलिंगीच आहे हे नक्की .