एका लोकशाहीची एकसष्टी !

Submitted by दामोदरसुत on 16 April, 2012 - 07:27

एका लोकशाहीची एकसष्टी !
लोकशाहीची उत्क्रांति - साठ वर्षात उत्क्रांत झालेला एक नमुना (मॉडेल) !

अतिशय समर्थ आणि जाणत्या लोकांनी जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीची बरेच कष्ट घेऊन घटना लिहिली. ती उत्क्रांत होऊन साठ वर्षांनंतर जे मॉडेल अस्तित्वात आले आहे त्याची तुलना एका मर्यादेपर्यंत पत्त्याच्या डावाशी करता येईल. पण या डावात नेहमीच्या ५२+२ पत्त्यांशिवाय कोर्‍या पत्त्यांची संख्या अमाप आहे. मुळात या कोर्‍या पत्त्यांची, कोर्‍या पत्त्यांकरिता, कोर्‍या पत्त्यांनी चालविलेली लोकशाही असे तिचे अपेक्षित स्वरूप होते. आता साठ वर्षांनी ती सर्वसाधरणपणे अशी आहे.

पक्षांची नावे : इस्पिक, बदाम, किलवर, चौकट, जोकर

पक्षातील पदाधिकारी एक्का, राजा,राणी,...ते दुर्री.

शासनात पदे राष्ट्रपति, पंतप्रधान, .........................तेजिल्हापरिषदअध्यक्ष, ...........ते.,नगरसेवक्,सरपंच इ, त्याशिवाय कमिअधिक सत्तेची हजारो महत्वाची पदे अस्तित्वात आली आहेत.

ही सत्ता पदे सर्वसाधारणपणे एक्का ते दुर्री यांना मिळतात. एखाद्या कोर्‍या पत्त्याला मिळाल्यास अपवाद !अलिखित नियम सिद्ध करण्यापुरता .गंमत म्हणजे या पदांसाठी ज्या निवडणुका होतात. त्यात कोरे पत्ते हेच मुख्य मतदार असतात.
देशात सतत कोठल्या ना कोठल्या निवडणुका चालू असतात. निवडणुका, क्रिकेट आणी सिनेमा हे या देशाचे प्रमुख राष्ट्रीय उद्योग आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ति होणार नाही. या देशाला गरिबी, शेतकरी-आत्महत्त्या, दहशतवाद, भ्रष्ट-आचार यांनी पिडलेले आहे आणि आम्ही देशाला त्यापासून मुक्त करू असे पक्षांमधील आणि शासनातील सर्व पदाधिकारी सवयीने बोलत व कोर्‍या पत्त्यांना वर्षानुवर्षे सांगत आलेले असतात आणि कोरे पत्तेही सवयीने त्यांनाच मते देतात. एखाद्या कोर्‍या पत्त्याने निवडणुक लढवलीच तर त्याला कोरे पत्तेच हाग्या मार देतात. त्यामुळे पक्षांचे लोक त्यांच्या गैरकारभाराविरुद्ध कोणी बोलले की त्याला 'निवडणुक लढवून दाखव' असे आव्हान देऊन गप्प बबसवतात.
या पक्षांमधिल लोक शक्यतो एकमेकांशी सोयरीकी करून नातीगोती निर्माण करून सत्ता त्यांच्या त्यांच्यातच राहील असे पाहातात. निवडणूकीत एकमेकांविरुद्ध भयंकर आरोप करतात. दुर्‍या-तिर्‍या एकमेकांची डोकी फोडतात. पण निवडणूक संपताच 'किमान समान कार्यक्रमा'च्या नावावर गळ्यात गळे घालून सत्ता हाती राहाण्याची तजवीज करतात. आमचे मतभेद तात्विक होते आणि आता ते गैरसमज दूर झाले असे म्हणून कोर्‍या पत्त्यांचा 'मामा' करतात. निवडणुकीआधी व्यासपीठावर नेत्यांच्या 'हातमिळवणी'चे जे फोटो येतात ते खूप करमणूक करतात. त्यात कोण कोठे दिसेल त्याला 'सत्तेसाठी कांहीही' एवढीच सुसंगती असते.

अगदी सुरुवातीस बदाम बदामासारखाच वा किलवर किलवर सारखाच दिसायचा. त्यांचे त्यांचे आकार व रंग पक्के असायचे. पण हळूहळू बदल होत गेले नि इस्पिकचा राजा बदामचा गुलाम होणे वा बदामच्या गुलामाची चौकटची दस्शी होणे वगैरे आताशी नित्याची बाब आहे. खूप वेळा इस्पिक कोणता आणि किलवर कोणता हे समजेनासे होते. पण कांही वेळा बदाम व इस्पिकदेखील एकमेकात मिसळून जातात आणि 'कोर्‍यां'चा 'मामा' करतात.

कोर्‍यांच्या भल्याकरिता आखलेल्या योजना खरे तर एक्का ते दुर्री यांना मालामाल करण्यासाठीच असतात असे लोक बोलतात. आणि दुर्‍या तिर्‍या यांची मत्ता ज्या गतीने वाढते आहे ती गती पाहाता ही गोष्ट खरी वाटते.
कायदेमंडळातील भांडणे खरे तर मालातील वाट्यासाठी चालतात असे बोलले जाते, पदाधिकार्‍यांचे भत्ते व सवलतींबाबत मात्र 'वयं पंचाधिकं शतं' चे दर्शन घडविले जाते.
आता तर हा पत्त्यांचा डाव भरपूर पिसुन ठेवल्यासारखा भास्तो. सर्वांचे आकार आणि रंग सारखेच वाटू लागलेत. या पिसलेल्या डावात कोरे पत्ते मात्र कोठेच दिसत नाहीत. ते जिकडे पाहावे तिकडे इतस्ततः सर्वत्र विखुरलेले दिसत असतात. वारा आला की कोठेही भिरकावले जातात. पिसलेला डाव मात्र भरभक्कम राहातो.
.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

निवडणुका क्रिकेट आणि सिनेमा हे तीन राष्ट्रीय उद्योग आहेत>> फट्यॅक... जबरदस्त हाणलीत.
आणखी राष्टीय उद्योग सांगतो टीव्ही बघणे ,मोबाईल वापरणे, नाक्यावर गप्पा ठोकने. Lol

>>आणखी राष्टीय उद्योग सांगतो टीव्ही बघणे ,मोबाईल वापरणे, नाक्यावर गप्पा ठोकने<<
सहमत
आणखी एक आठवला-
निरनिराळे उत्सव साजरे करण्यासाठी मंडळे स्थापून वर्गण्या गोळा करून भयानक मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर गाणी लावून लोकांच्या झोपा उडविणे.

लेख छान जमलाय.
जगातला एकमेव प्रयोग आहे हा, यशस्वी म्हणता येणार नाही, पण
अगदीच फसला असेही नाही. आशा ठेवायला अजून वाव आहे.

आपल्याला ज्या सिस्टीममधे कसलेच स्थान उरलेले नाही, जिथे आपल्याला कोणीच विचारत नाही, ती सिस्टीमच खराब असल्याचे गळे काढणे, हा देखील भारतातील अनेकांचा आवडीचा उद्योग आहे.

आगाऊ, येथे तसे वाटले नाही मला. लोकशाही बद्दल टीका आहे असे वाटले नाही. लेखकाच्याच म्हणण्याप्रमाणे "ती उत्क्रांत होऊन साठ वर्षांनंतर जे मॉडेल अस्तित्वात आले आहे" त्याबद्दल असावी. म्हणजे थोडक्यात "आज जे काही चालले आहे" त्याबद्दल Happy तसा टोन कोणत्याही पेपरमधल्या १५ ऑगस्टच्या आसपास येणार्‍या 'आढावा' लेखांमधे असतोच.

"आज जे काही चालले आहे" >>> ते सगळे एकदम मान्य, फक्त त्याबरोबर-
६०वर्षापूर्वी ज्या समाजघटकांना सत्तेचे दर्शनही दुर्लभ होते त्यांना ती वापरायला मिळत आहे.
एकाच पक्षाच्या आत्यंतिक प्रभावातून मुक्त होउन जास्त सर्वसमावेशक लोकशाही आहे.
'कल्ट पॉलिटिक्स'चे वारे वेळोवेळी वाहूनही त्याचा पूर्वीसारखा परिणाम उरलेला नाही.
गेल्या ६०वर्षात एकदाही लष्करी बंड झाले नाही.
आणिबाणीला लोकशाही मार्गानेच परतवून लावण्यात यश आले.
ह्या आणि अशा अनेक गोष्टी गेल्या ६०वर्षातील 'उत्क्रांती'तच झाल्या आहेत.
माझा मुद्दा एकच आहे- आपल्या शहरी, मध्यमवर्गिय आणि वृत्तपत्रिय चौकटीतून बाहेर येउन पहा त्याशिवाय गेल्या ६० वर्षात काय 'एमपॉवरमेंट' झाली आहे ते लक्षात येणार नाही.

भारतीय लोकशाहीचा प्रयोग फसलेला? अजिबात नाही. मतदार वाटतो त्यापेक्षा नक्कीच जास्त हुशार असतो हे त्याने वेळोवेळी दाखवून दिलेले आहे. लोकसभेबरोबरच विधानसभांचेही निकाल हेच सांगतात. आपल्या आजुबाजूच्या देशांमधली लोकशाहीची गेल्या साठ वर्षांतली आणि सद्य स्थिती पाहता भारतीय लोकशाही नक्कीच सशक्त आहे.

पंचायती राज, त्यात महिलांना पन्नास टक्के आरक्षण या गोष्टी महत्त्वाचे आमूलाग्र बदल
म्हणून नोंदल्याच पाहिजेत.

देशातल्या पहिल्या निवडणुकीपासून प्रत्येक प्रौढ नागरिकाला मतदानाचा मिळालेला समान अधिकार हीदेखील अत्यंत अभिमानास्पद तरतूद आहे.