तो आवाज आजही मला साद घालतो..!

Submitted by तुमचा अभिषेक on 16 April, 2012 - 06:22

तो आवाज आजही मला साद घालतो..!

"प्लॅटफॉर्म क्रमांक दो पे आनेवाली लोकल अंधेरी के लिये धीमी लोकल है..." एका महिला निवेदिकेचा गोड आवाज कानावर पडत होता. पण ज्या ट्रेनसाठी ही अनाऊंसमेंट होत होती त्या ट्रेनने मात्र केव्हाच स्टेशन सोडले होते. तीन-तीन भाषांमध्ये अनाऊंसमेंट करायच्या नादात हे असे होत असावे. पण निदान मग शेवटच्या वाक्यात आनेवालीचे जाने’वाली तरी करायचे. असो, कोणाला काय फरक पडतो. तसेही मुंबई लोकलने प्रवास करणार्‍यांमध्ये या बाईच्या आवाजावर विसंबून राहणारे मोजकेच असावे. आवाजावरून आठवले, या आवाजाच्या उगमाचा शोध कधी ना कधी तरी नक्की घ्यायचा होता मला. फलाटावरच्या एवढ्या कोलाहलातही स्पष्टपणे ऐकू येणारा आणि तरीही मंजुळ वाटावा असा. या कोकिळेचे एकदा तरी दर्शन घेणे तर नक्कीच बनत होते. तसे लग्नाआधीही अश्या बर्‍याच मंजुळांच्या प्रेमात पडलो होतो मी. बर्‍याच आधी जेव्हा मोबाईल नव्याने घेतला होता, तेव्हा रोज सकाळी न चुकता एक रेकॉर्डेड मेसेज यायचा. कधी, " हैलो..sss.., क्या आप रोज सुबह अपना भविष्य जानना चाहते है तो ये अमुक तमुक स्कीम अ‍ॅक्टीवेट किजिए, प्रतिमाह सिर्फ तीस रुपये शुल्क पे.." तर कधी, " हैलो..sss.., क्या आप अकेले हो, अब हम आपका अकेलापण दूर करने आये है, तो आजही इस अमुकतमुक नंबरपे डायल किजिए और बनाईये कुछ नए दोस्त...", तिने दिलेल्या अमुक तमुक नंबरवर तर मी कधी फोन केला नाही पण तिचे ते हेल काढत हेलो बोलने मात्र नेहमी मला साद घालायचे. पण शेवटी ती रेकॉर्डेड बाई असल्याने तिच्याशी बोलणे एक स्वप्नच राहिले. त्यानंतर एकदा रिलायन्समध्ये असताना कामानिमित्त दुसर्‍या एका कंपनीच्या असिस्टंट मॅनेजरबाईशी (की मुलीशी?) बोलणे व्हायचे. तश्या नेहमी कामाच्याच गप्पा व्हायच्या, पण तिचा तो ईंग्लिश बोलायचा अ‍ॅक्सेंट आणि मग माझे ईंग्रजी जेमतेम म्हणून तिचे मराठीत बोलणे, ते ही अश्या स्टाईलने की एखादी ब्रिटीश मुलगीच मराठी बोलतेय असे वाटावे. महिन्याभरात त्या कंपनीशी चाललेले आमचे व्यवहार आटोपले आणि तिच्याशी बोलायचा मार्ग बंद झाला. तरी तिच्या हसण्याची एकदा सहज आठवण आली म्हणून फोन केला तर समोरून मॅनेजरीनबाईंकडून अशी काही प्रतिक्रिया आली की दुसर्‍याच मिनिटाला समजून चुकलो, आपली नोकरी धोक्यात आलीय. पुन्हा कधी मग तसला नाद केला नाही.

हुश्श.. पण गेले ते दिवस. आता सध्या बायको नावाचा एक रेडीओ ऐकतोय जिथे रोज एकच चॅनेल एकाच फ्रिक्वेन्सी मध्ये वाजतो. आताही सकाळचे सुगम संगीत सुरू झाले होते. आज सकाळी सकाळीच जे तिच्या तावडीत सापडलो होतो. तसा माझ्या आणि तिच्या निघण्यामध्ये अर्ध्या-पाऊण तासाचा फरक असतो, पण आज मी उशीराच्या ट्रेनला तिच्याबरोबरच निघालो होतो. नेहमीच्या फर्स्टक्लासच्या डब्याजवळच्या बाकड्यावर येऊन बसलो. आमचा प्रवास गर्दीच्या उलट दिशेला होत असल्याने सकाळी फारशी अशी वर्दळ मिळत नाही. ट्रेन यायला अजून बर्‍यापैकी वेळ होता. हा बर्‍यापैकी वेळ म्हणजे दहा मिनिटे. मी नेहमी एखाद दुसरा मिनिट आधी स्टेशनवर पोहोचत असल्याने माझ्यासाठी जरा जास्तच. आता दहा मिनिटे बसायचेच आहे तर जरा पेपर चाळू म्हणून बॅगेतून काढू लागलो, तर बायकोने लगेच बॅग खेचून घेतली आणि पेपर नको, माझ्याशी गप्पा मार हवे तर म्हणून हट्ट धरून बसली. तिच्या शब्दकोशात "हट्ट" आणि "हक्क" हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. म्हणून मग पेपर वाचायचा प्रश्नच येत नव्हता. तसेही मला पेपर वाचायची फारशी आवड आहे अश्यातला भाग नाही, पण असे चारचौघात ईंग्लिश पेपर काढून वाचला की जरा छानसे ईंम्प्रेशन पडते. भले मग तुम्ही त्यातील बॉलीवूडच्या पेज थ्री च्या फिल्मी बातम्या का वाचत असेना. जराश्या नाराजीनेच पेपर आत ठेवला आणि तिच्याशी गप्पा मारायला घेतल्या.

खरे तर गप्पा अश्या आमच्या फारश्या झाल्याच नाहीत. दोघेजण शांतपणे बाकड्यावर बसून होतो. इतक्यात ही चमकून इथेतिथे पाहू लागली. मग माझ्यावर नजर रोखली. पण क्षणभरच, पुन्हा तिची नजर इथेतिथे फिरू लागली. आणि परत एकदा माझ्यावर रोखली. "कसला आवाज ऐकू येतोय?" आता मात्र मी चमकलो. आधीच मी माझ्या कर्णकौशल्याबद्दल प्रसिद्ध होतो. ज्याला ती बहिरेपणा समजायाची, आई तंद्री बोलायची आणि मी चिंतन मनन असे काहीसे नाव द्यायचो. तरीही थोडावेळ कानोसा घ्यायचा अयशस्वी प्रयत्न करून झाल्यावर तिच्याकडे बघत तसाच ठोंब्यासारखा बसून राहिलो. तिने माझ्याकडे पाहिले तसे चेहर्यावरचे कावरेबावरे भाव लपवण्याच्या नादात आलेला नेहमीसारखा एक मठ्ठ लूक बघून ती उसळली, (हे ही नेहमीसारखेच) "अरे कसलाच आवाज ऐकू नाही येत आहे का तुला? त्या स्पिकोमैनाचा शब्द न शब्द बरोबर कानात शिरतो." आता ही "स्पिकोमैना" म्हणजे मगासची स्पीकरवर अनाऊंसमेंट करणारी निवेदिका बरं का.. हे कथालिखाण जरी माझे असले तरी या शब्दाचे सारे श्रेय माझ्या बायकोलाच जाते. असो, आता मात्र मी तंतरल्यासारखे उभा राहून इथेतिथे पाहू लागलो. पण आजूबाजुला खूप कोलाहल होता. काही अंदाज लागायला मार्ग नव्हता. मग स्थितप्रज्ञासारखे उभे राहून हळूहळू कानावर पडणारे एकेक आवाज वजा करू लागलो. सारे आवाज शून्य झाले तसे हलकाच एक म्याऊ.. की च्याऊ.. की च्याऊम्याऊसा असा आवाज कानावर पडला. ट्यूब पेटायला वेळ नाही लागला की हा आवाज नक्की कोणाचा ते. आणि कुठुन येतोय हे ही लवकरच समजले. त्या रोखाने पाहत पुन्हा एकदा तो आवाज ऐकून खात्री करून घेतली आणि विजयीवीराच्या आवेशात बायकोकडे पाहिले तर ती आधीच त्या दिशेने बघत होती.

"मांजरीचे पिल्लू", मी म्हणालो.
"ते कळतेय रे, पण रडतेय का?"
"मला कुठे त्यांची भाषा येते?" माझे सावध उत्तर.
"पण भावना तर समजू शकतोस ना?"
तिच्या बोलण्यात पॉईंट तर होता, पण भावना समजायला निदान चेहरा तरी दिसायला हवा ना. आणि इथे ते कुठेतरी आत अडगळीत लपलेले होते. पण आता असा युक्तीवाद करने योग्य नाही हे मी अनुभवाने ओळखून होतो. अन्यथा, "रोज माझा चेहरा बघतोस तरी माझ्या भावना तुला कुठे समजतात रे.." असे काहीसे उत्तर येण्याची हमखास शक्यता होती.

आता जागेवर उभे राहण्यापेक्षा बघूया तरी पुढे जाऊन, म्हणून मी पाऊल सरसावणार तोच, त्या अडगळीत उभी करून ठेवलेल्या प्लायवूडच्या शीटमागून चार दुडकी पावले चालत आली. खूप छोटेसे, सुंदरसे आणि हल्ली काय बोलतात ते, क्यूटसे असे होते ते.. पण तेवढेच अशक्त.. जणू चार पायांवर रांगतेय असे वाटत होते. माझ्या हाताचा पंजा जरा मोठा असता तर सहज त्याला दोन बोटांच्या चिमटीत उचलला असता. याच मोहाने पुढे गेलो तसे ते सावध झाले आणि वेगाने, लडखडतच आत गेले. साहजिकच होते, मला आपला दुश्मन समजले असणार. म्हणून मग शहाणपणाचा निर्णय घेऊन मागे आलो. थोड्याच वेळात ते परत बाहेर आले. म्याऊ.. म्याऊ.., शब्दात व्यक्त न करता येणार्‍या भावनेची एक पातळ किनार असलेला आवाज सतत चालूच होता. भाषा अजूनही मला त्याची समजली नव्हती पण भावना मात्र नक्कीच समजू लागल्या होत्या.

"भूक लागलीय त्याला." मी बायकोला म्हणालो, "त्याची आई त्याच्यासाठी खाऊ आणायला गेली असेल. बराच वेळ झाला, आली नाही म्हणून बिचारे सुधुरबुधुर झालेय. लहानपणी मी सुद्धा असेच करायचो..." माझे तर्क सुरू झाले.
"पण त्याची आईच नसेल तर...", आणि अचानक बायकोने माझ्या सार्‍या तर्कांना सुरुंग लावला.
"अशी कशी नसेल., जगात आलेय तर आई असेलच ना...." मी किंचितसा गोंधळून म्हणालो, "आणि नसली तरी ते रडतेय मात्र भूकेने हे नक्की.!"
"हम्म.. मला पण तेच वाटतेय", हे बोलताना तिच्या चेहर्‍यावर एक प्रश्नचिन्ह होते ज्याचे उत्तर आता मलाच शोधायचे होते.
"तुझ्याकडे आहे का काही खायला?" मी विचारले.
"नाही रे, कालचे फरसाण थोडेसे असेल."
पण फरसाण त्या लहानग्या पिलाला कसे द्यायचे. आपण तरी कुठे आपल्या लहान बाळांना असले अरबट चरबट काही खायला देतो. पुन्हा या मांजरी नक्की काय खातात, काय पचवतात याबाबतही माझे ज्ञान तोकडेच होते. दूध आणि मच्छी या दोनच गोष्टी मला माहीती होत्या. मच्छी तर आता मिळायची राहिली पण दुधाची सोय मात्र होऊ शकत होती.
"रेल्वे कॅंटीनमध्ये दूध मिळाले असते...." खरे तर मी "मिळेल" असे बोलणार होतो, पण त्याचे "मिळाले असते" झाले कारण तोपर्यंत आमची ट्रेन आली होती.

...........................................................................

दिवसभराच्या कामात सकाळची ही घटना विसरून गेलो होतो. पण संध्याकाळी कामावरून परत येताना स्टेशनवर उतरलो तसे अचानक आठवले. समोरच्या प्लॅटफॉर्मवर सहज नजर टाकली. थोडावेळ तिथेच रेंगाळली पण जे अपेक्षित होते ते काही दिसले नाही. थोडेसे चुकचुकल्यासारखे वाटले तर खरे, पण समोरच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन त्याला शोधण्याएवढी प्रबळ इच्छाशक्ती मात्र झाली नाही. घराच्या वाटेवर चालताना त्याचाच विचार डोक्यात चालू होता आणि राहून राहून बायकोचे शब्द आठवत होते, "पण त्याची आईच नसेल तर..." खरेच, तर आता कुठे असेल ते? असेल की नसेल?? अजूनही उपाशीच असेल का??? मला स्वतालाही चहाबरोबर काही खायची इच्छा झाली नाही. अर्धा पेला तसाच बेसिनमध्ये रिकामा करून आत गेलो. आईने विचारले तर बाहेर खाऊन आलोय असे सांगितले. पण बायकोला मात्र कल्पना होती की मी काही खाल्ले नव्हते. तसे आमचे फोनवर बोलणे होतच असते त्यामुळे माझ्या खाण्यापिण्याचे सारे अपडेट्स तिच्याकडे असतातच. म्हणून तिने विचारणा करताच मी खरे काय ते सांगितले. तसे ती म्हणाली, "अरे सकाळी मलाही वाटले होते आपण त्याला असे सोडून जायला नको होते, पण आधीच तुला उशीर झाला होता म्हणून मी काही बोलले नाही." आणि नेमका हाच विचार मी केला होता की मला तर आधीच उशीर झाला आहे तर आता माझ्या भूतदयेच्या नादात हिलाही व्हायला नको. दोघांनीही एकमेकांचा विचार केला पण एकमेकांच्या मनातील विचार ओळखू शकलो नाही. पण आता मात्र त्यात कसूर केली नाही. तडक आम्ही दोघे स्टेशनच्या दिशेने निघालो, नाहीतर मला रात्रीचे जेवण गेले नसते. आणि आता कदाचित माझ्या बायकोलाही...

संध्याकाळ उलटून रात्रीचे आठ वाजले होते. अजूनही ऑफिसवरून घरी परतणार्‍यांची बर्‍यापैकी वर्दळ होती, पण प्लॅटफॉर्मच्या त्या भागात लाईट नसल्यामुळे किंवा गेल्यामुळे जरासा अंधार आणि सामसूमच होते. त्या अडगळीत शोधायचे म्हणजे घूस वगैरे अंगावर येण्याचीच शक्यता जास्त. तसाही दिवसाढवळ्याही त्यांचा मुक्त संचार चालू असायचा. म्हणून पहिला आजूबाजूला नजर फिरवून झाली. कुठे दिसले नाही ते, म्हणून मग जवळ जाऊन त्या फळकुटाच्या मागे डोकावून पाहिले. पण अंधुक प्रकाशामुळे काहीच दिसले नाही. हाताने ते जरासे हलवून, थपथप करून पाहिले. तसा त्याच्या दुसर्‍या टोकाने तोच तो घंटा किणकिणल्यासारखा मंजुळ आवाज. म्हणजे ते होते तिथे तर.. अजूनही जिवंत.. मोठ्या उत्साहानेच मी दुसर्‍या बाजूने त्याच्या जवळ गेलो. पण आता मात्र ते मला बघून आत पळाले नाही. कदाचित तेवढे त्राण अंगात नसावे. माझी चाहूल लागताच पडल्यापडल्याच मुंडी वर करून एकदाच काय ते म्यांव केले आणि तसेच निपचित पडून राहिले. मी बायकोला तिथेच थांबायला सांगून रेल्वे कॅंटीनमधून कपभर दूध आणि एक बशी घेऊन आलो. बायकोने एक ग्लुकोजच्या बिस्किटाचा पुडा घरूनच आणला होता. या बाबतीत बायका जात्याच हुशार असतात एवढे मात्र खरे. मी दूध बशीत ओतून त्यात बिस्किटे कुस्करली आणि बशी त्याच्यासमोर सरकवली. तसे ते आमच्याकडे ढूंकुनही न पाहता शांतपणे लपक लपक करत ते खाऊ लागले. "बघ ते कसे शहाण्या बाळासारखे खातेय, ते ही तोंडाचा आवाज न करता. नाहीतर तू, समोर आवडीचे आले की अधाश्यासारखे तुटून पडतोस नुसता त्यावर..." माझ्या बायकोचा तोंडाचा पट्टा सुरू झाला आणि मी त्याला हसून प्रतिसाद देउ लागलो. आम्हा दोघांच्या मनावरचे एक ओझे उतरले होते.

बशी मस्तपैकी चाटून पुसून साफ केल्यावर आमच्याकडे त्याने कृतज्ञतेने पाहिले. मी हात पुढे केला तसे माझा हातही चाटून झाला. तो स्पर्श काही खासच समाधान मिळवून देणारा होता. त्यानंतर मग हे रूटीनच झाले. रोज सकाळ संध्याकाळ त्याला खाऊ घालायचे, खेळवायचे. दोन-चार बिस्किटाचे पुडे आता माझ्या बॅगेत नेहमीच असायचे. रोज सकाळी मी पंधरावीस मिनिटे घरातून लवकर निघू लागलो होतो. म्हणजे पंधरा-वीस मिनिटे लवकर उठणेही आलेच. बायको एवढे दिवस मी एक्सरसाईज करायला लवकर उठावे म्हणून मागे लागली होती पण मी तिला जराही दाद देत नव्हतो. आता मात्र नवीन मित्राला भेटायला म्हणून पहिलाच अलार्म वाजला की स्नूझ न करताच तडक उठू लागलो होतो. झोपेपेक्षा प्रिय असे जगात मला काहीच नाही हा माझ्या बायकोचा समज मी खोटा ठरवला होता. माझा मित्र होताच तसा. दहाबारा दिवसातच त्याच्या तब्येतीत बर्‍यापैकी फरक पडू लागला होता. मरतुकडेपणा जाऊन त्याची जागा गुबगुबीतपणाने घेतली होती. छानश्या मिश्याही फुटल्या होत्या. (मला मात्र यासाठी वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत वाट बघावी लागली होती.) अंग गोल गरगरीत होत होते तसे शरीरावरच्या काळ्यापांढर्‍या ठिपक्यांनाही छानसा आकार येऊ लागला होता. कोणीही बघता क्षणीच प्रेमात पडावे असे राजबिंडे रुप निरखून आले होते. एकेकाला नावे ठेवण्यात एक्सपर्ट अश्या माझ्या बायकोने त्याचा बदलता आकारउकार पाहता त्याचे नामकरण "गोलू" असे केले. पण मला मात्र आजही त्याचा आवाजच वेड लावत होता. आता तर हळूहळू मला त्या आवाजाची भाषाही कळू लागली होती.

आज शुक्रवार, मी मस्तपैकी गोलूला मच्छी खाऊ घातली. त्याचे झाले काय मी नेहमीसारखे रेल्वेकॅंटीनमध्ये दूध आणायला गेलो तर ते संपले होते. आता काय घ्यायचे विचार करत होतो इतक्यात जवळच उभी असलेली एक कोळीण तिच्याकडचा एक छोटासा बांगडा पुढे करून म्हणाली, "आज हे खाऊ घाला भाऊ त्याला, बघा कसा आवडीने खातो ते." आणि खरेच पठ्ठ्या पक्का मच्छीखाऊ असल्याप्रमाणे त्यावर तुटून पडला. स्वारी जामच खुशीत दिसत होती. संध्याकाळीही जरा जास्तच लाडात माझ्याशी खेळत होता. ते पाहून नक्की केले की आठवड्यात दोन-तीन वेळा तरी याला मस्त मच्छी खाऊ घालायची. घरी येऊन हे बायकोलाही सांगितले. हल्ली आमचा घरी हाच विषय चालायचा. ती देखील ऑफिसला येताजाता तिच्या सवडीनुसार त्याचे हालहवाल कसे आहेत हे बघूनच जायची. आणि मग फोनवर एकमेकांना त्याचे अपडेट्स देणे, आज त्याला काय खिलवले, कसे खेळवले, सार्‍या गमतीजमती एकमेकांना सांगणे चालूच असायचे. गोलूच्या जोडीने मी देखील लहान झालो होतो. मला माझे बालपण आठवू लागले होते.

लहाणपणी एकदा असेच कुतुहलाने की आवडीपोटी रस्त्यावरून कुत्र्याचे पिल्लू उचलून घरात आणले होते. तेव्हा आजीने घरात ही घाण नको म्हणून त्याला हाकलले होते. त्या वयाला अनुसरून थोडाफार दंगा मी घातलाही होता. पण मग आईनेही आपल्या घरात कोणाला प्राणी पाळायची आवड नाहीये आणि तू लहान आहेस तर तुला जमणार नाही असे सांगून आजीचीच बाजू घेतली होती. त्यामुळे माझा हिरमोड तर झालाच होता पण त्यानंतर पुन्हा कधी कोणा प्राण्याच्या डोक्यावरून साधे हात फिरवायची इच्छाही झाली नव्हती. कदाचित यांची शी-शू साफ करणे म्हणजे फुकटचा डोक्याला ताप असतो हे माझ्या मनावर कायमचे बिंबवले गेले होते. पण आज मात्र हे सारे सहज मनमोकळेपणाने बायकोला सांगितले तसे ती म्हणाली, "अरे मग आता गोलूलाच आणूया ना आपल्या घरी." माझ्याही मनात आत कुठेतरी हाच विचार चालू होता. आता तर आम्ही जुन्या चाळीतही राहत नव्हतो जिथे जागेची अडचण व्हावी. चांगला पाच रूमचा फ्लॅट होता, ज्यामध्ये आम्हा नवराबायकोची स्वतंत्र मास्टर बेडरूम आणि त्याला लागूनच असलेली स्टडीरूम. गोलू इथे कुठेही राहिला असता तरी आईबाबांना त्याची फारशी अडचण झाली नसती. तसेही तो लवकरच माझ्या आईवडीलांनाही आवडू लागला असता याची खात्री होती मला.

रात्री जेवतानाच आईकडे विषय काढला. आईचा जेवताना मूड नेहमी चांगलाच असतो.
"अजून हे वेड आहेच का तुझे?" आई हसूनच म्हणाली.
म्हणजे आईच्याही अजून तो लहानपणीचा किस्सा लक्षात होता तर. आईची एवढी सहज परवानगी मिळालेली पाहून मला खरेच आभाळ ठेंगणे झाले. रात्रभर मी आणि माझी बायको गोलूच्याच गप्पा मारत बसलो होतो. त्याला घरात कधी आणायचे, कुठे ठेवायचे, रोज काय काय खाऊ घालायचे, कसे खेळवायचे, आपण कामावर गेल्यावर त्याची सोय कशी करायची इथपासून त्याचा शी-शू चा त्रास आईला कसा होऊ नये इथपर्यंत एकेका मुद्द्यावर आम्हा दोघांचे चर्चासत्र झडत होते. अचानक जे त्याला घरी आणायचे ठरले होते. पण उद्याच आणने शक्य नव्हते. सकाळी आम्ही ऑफिसला जाणार होतो आणि संध्याकाळी सुटल्यावर तिथूनच बायकोच्या भावाचा वाढदिवस साजरा करायला तिच्या माहेरी जाणार होतो. रात्री मुक्कामालाही तिथेच थांबायचा प्लॅन ठरला होता. म्हणून मग रविवारी सकाळी परततानाच गोलूला घरी आणायचे नक्की केले. बायको गप्पा मारता मारता कधी झोपी गेली समजलेच नाही. पण माझा मात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता. कधी एकदा उद्या जाऊन गोलूला सांगतोय की तू आता आमच्या घरी येणार आहेस असे झाले होते. त्याची ती चिमुकली पावले आता माझ्या अंगाखांद्यावर खेळणार होती. त्याचा तो म्यांव म्यांव आवाज आता सतत माझ्या अवतीभवती किणकिणनार होता.

सकाळी नेहमीपेक्षा आणखी दहा मिनिटे लवकर निघालो. आज त्याच्याशी जरा जास्त गप्पा मारायच्या होत्या. जरा जास्त खेळवायचे होते. बरोबर आईने दिलेली त्याच्या आवडीची अशी तळलेली मच्छीची तुकडी होती. तो ही आज जरा जास्तच खुशीत बागडत होता. जणू काही त्यालाही मी सांगायच्या आधीच हे समजले होते. वाटले, ऑफिसला दांडी मारावी आणि आताच याला घरी न्यावे. पण संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तिथूनच बाहेर जायचा कार्यक्रम असल्याने ते शक्य नव्हते. तरी किमान याच्या गळ्यात एक रिबीन बांधावी जी जगाला ओरडून सांगेल की आता हा गोलू अनाथ राहिला नाहिये, आजचा याचा स्टेशनवरचा शेवटचा दिवस आहे, लवकरच याला आपले स्वताचे असे घर मिळणार आहे. ट्रेन आली तशी अनिच्छेनेच पावले उचलली. दिवसभर बायकोशी फोनवर याच गप्पा चालू होत्या. रात्रीही तिच्या भावाच्या बर्थडे पार्टीलाही आमचा हाच विषय. पण आज मात्र माझी बायको नेहमी सारखे म्हणाली नाही की तुला माझ्या भावाचे, माझ्या माहेरच्यांचे काही पडले नसते म्हणून. आज ती देखील माझ्या उत्साहात सामील होत होती. गोलू तिचाही लाडका होता.

रविवारी सकाळी लवकरच तिथून निघालो. सासूबाई दुपारी जेवून जा असा आअग्रह करत होत्या, पण आम्हाला मात्र गोलूचे वेध लागले होते. त्यादेखील माझा हा उत्साह कालपासून बघत होत्या, त्यामुळे त्यांनीही जास्त आढेवेढे घेतले नाहीत. ट्रेन आज उगाचच खूप स्लो चालू आहे असे वाटत होते. कदाचित माझे मन जास्त वेगात प्रवास करत असावे. तसे ते केव्हाच डॉकयार्ड स्टेशनच्या फलाट क्रमांक दोनवर माझ्या गोलूच्या जवळ पोहोचले होते. यथावकाश ट्रेनही पोहोचली. उतरून समोरच्या प्लॅटफॉर्मवर नजर टाकली आणि एक अनपेक्षित धक्का बसला..! समोर ना गोलूचे घर, ती प्लायवूडची शीट दिसत होती ना गोलू कुठे दिसत होता. इतरही सारी अडगळ साफ झाली होती. मी बायकोकडे पाहिले. आम्हा दोघांनाही काही सुचेनासे झाले. मी रेल्वे ट्रॅक ओलांडूनच पलीकडे गेलो. प्लॅटफॉर्मवरच्या प्रत्येक खांबाच्या मागे, बाकड्याच्या खाली वाकून वाकून त्याला शोधू लागलो पण त्याचा कुठेच पत्ता नव्हता. बायकोही पुलावरून त्याला शोधतच पलीकडे आली पण तिलाही तो कुठे दिसला नाही. रेल्वे कॅंटीनवर चौकशी करता समजले की रेल्वेचे साफसफाई कर्मचारी सारी घाण, अडगळ उचलून घेऊन गेले. पण गोलू म्हणजे काही अडगळ नव्हती. त्याचे काय केले त्यांनी, त्याला कुठे सोडला. की त्यांच्या साफसफाई मोहिमेत त्याचे काही बरेवाईट तर... मनोमन दोनचार शिव्या हासडल्या त्यांना. एवढे दिवस ती अडगळ तशीच पडून होती पण यांना ती नेमकी कालच साफ करायची अवदसा आठवली. मलाही नेमके कालच कुठेतरी बाहेर जायचे होते. माझ्या मेहुण्यालाही कालच्या दिवशीच आपला वाढदिवस साजरा करायचा होता. नुसत्या विचारांनीच चिडचिड होत होती. पुन्हा रेल्वे कॅंटीनवर चौकशी केली, पण ज्यांच्याकडून मी नियमित दूध-बिस्किटे घ्यायचो ते कर्मचारी काल रात्रीच्या पाळीला नव्हते म्हणून कोणाला काहीच कल्पना नव्हती. तरीही मी वेड्यासारखा स्टेशनचा कोपरा न कोपरा पिंजून काढला. आजूबाजुच्या दोनचार गल्ल्यांमध्येही धुंडाळले. पण गोलू कुठेच नव्हता. दुपारी बारा-साडेबारा वाजेपर्यंत आमची शोधमोहीम चालू होती. शेवटी समजून चुकलो की आता आपण आपल्या गोलूला कायमचे मुकलो आहोत. निराश होऊनच घरी परतलो.

रविवारचे माझ्या आवडीचे नॉनवेज जेवण असूनही घास घश्याखाली उतरत नव्हता. राहून राहून गोलूचीच आठवण येत होती. संध्याकाळी आई सहज म्हणाली की मांजरीच्या पिलांना कुठेही नेऊन टाकले तरी ते रस्ता शोधत बरोबर परत येतात. हाच आशेचा धागा मनात ठेऊन आम्ही पुन्हा स्टेशनला गेलो. रविवार असल्याने नेहमीसारखी वर्दळ नव्हती पण ज्याच्या शोधात आलो होतो तो ही कुठे दिसत नव्हता. किती वेळ शोधत होतो त्याला काही कल्पना नाही, पण मग थकूनभागून एके ठिकाणी थांबलो. पूलाच्या कठड्यावर उभा राहून सार्‍या स्टेशनभर नजर फिरवू लागलो. आणि इतक्यात, अचानक, स्टेशनमध्ये शिरायच्या एका छोट्याश्या रस्त्यातून एक काळेपांढरे मांजरीचे पिल्लू आत शिरताना दिसले. अगदी गोलूसारखेच.. गोल गरगरीत.. की आमचा गोलूच होता तो.. ताडताड जिना उतरतच मी त्याच्या जवळ जाऊन पोहोचलो. अत्यानंदानेच त्याला उचलून छातीशी कवटाळले. तसे ते ओरडले, म्यांव म्यांव... पण हाय..!! हा आवाज तो नव्हताच. दिसायला जरी गोलूसारखा असला तरी हा माझा गोलू नव्हता. त्याचा तो आवाज मी कसा विसरू शकत होतो. त्या आवाजाची भाषा मी ओळखत होतो. हा मात्र माझ्यासाठी पुर्णपणे अनोळखी होता. नाराजीनेच मी त्याला खाली ठेवला. मला गोलू भेटला की काय असे वाटल्याने माझी बायकोही माझ्या मागे मागे पळत आली होती. पण माझा चेहरा बघून तिचाही भ्रमनिरास झाला. आता त्या स्टेशनवर जास्त वेळ थांबायची इच्छा होत नव्हती. बरोबर आणलेली बिस्किटे त्या मांजरीच्या पिलासमोर ठेऊन खिन्न अंतकरणानेच आम्ही मागे फिरलो. आता आमचा गोलू आम्हाला कधीच दिसणार नव्हता..!!

आज चार महिने उलटून गेले आहेत या घटनेला. डॉकयार्ड ते बेलापूर हा माझा रोजचा प्रवास आजही चालू आहे. कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी नजर मात्र प्लॅटफॉर्मच्या त्या भागावर खिळतेच. अजूनही मन तिथे रेंगाळतेच. कधी कधी एखादी ट्रेनही सोडली जाते. कधीतरी अचानक गोलू तिथे परत येईल ही वेडी आशा अजूनही आहेच. गोलूच्या अश्या अकस्मात जाण्याने आयुष्यात एक पोकळी नक्कीच निर्माण झाली पण त्यानंतर दुसर्‍या कोणावर मात्र जीव लावायची हिंमत झाली नाही. मी आणि माझ्या बायकोने, खरे तर माझ्या बायकोनेच, एक ठरवले आहे की आपल्याला पहिला मुलगा-मुलगी जे काही होईल त्याला आपण "गोलू" म्हणून हाक मारायची. या ना त्या रुपाने गोलू आमच्या आयुष्यात पुन्हा येणार हा तिचा विश्वास झाला. पण मला मात्र एखाद्या निवांत रात्री तो आवाज आजही साद घालतो..!

... तुमचा अभिषेक.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान

तुमच्या सर्वच कथा आवडताहेत.
लिहित रहा. Happy

मला आणि माझ्या बहिणीलाही मांजरे अतिशय प्रिय. लग्नापूर्वी हट्टाने अशीच इथून तिथून उचलून आणलेली मनीची पिल्ले सांभाळलेली आहेत. गुंडू नावाचे एक पिल्लू (बोका) बर्‍यापैकी मोठे होइस्तोवर सांभाळले. पण दुर्दैवाने कुठूनतरी अ‍ॅक्सिडेंट होऊन पाय व कंबरडे मोडून घेऊन घरी आले. उपचार करूनही काही फायदा झाला नाही. तसेच गेले ते. शेवटच्या दिवसांत त्याने अन्नाला/ पाण्यालाही तोंड लावले नव्हते. फार वाईट वाटले होते. आम्हा दोघा बहिणींच्या डोळ्यातले पाणी खळत नव्हते.

तुमची ही कथा वाचून गुंडू आठवला.

प्रिती, धन्यवाद,

निंबुडा आपला प्रतिसाद खासच. आपली कथा / लिखाण कोणाशी तरी रीलेट झाले आणि त्याच्याही चार आठवणी जाग्या झाल्या यापेक्षा दुसरे समाधान ते काय.

छान.

<<कधीतरी अचानक गोलू तिथे परत येईल ही वेडी आशा अजूनही आहेच. >>
अगदी बरोबर. असेच वाटले होते मला आमचे मान्जर हरवल्यानन्तर.

अनघामीरा , निशदे , अंजली .... धन्यवाद

काया, प्रिया.. तुमचे असे प्रतिसादच आणखी लिहायला प्रोत्साहन देतात.

सुसुकु.. लळा लागलेल्या अश्या आपल्या एखाद्या मित्राचे दूर जाणे चटका लावतेच.. आमच्या शेजारी एकाने पांढरे उंदीर पाळले होते, त्यांच्याही जाण्याने त्या घरातील लहान मुलांना रडवले होते. मी ही त्याच वयाचा होतो तेव्हा. मला मात्र जाम हसायला येत होते त्यांचे की उंदीर जाण्याने काय ही पोरे रडत आहेत. कुत्रा-मांजर ठीक होते.. पण तसे नसते..

Pages