पुणे ते गोवा कोकणमार्गे सायकलवर... दिवस तीसरा... लाडघर ते गणपतीपुळे

Submitted by विमुक्त on 12 April, 2012 - 10:16

२३ जानेवारी २०१२

आज तशी सकाळी ६ वाजताच जाग आली होती, पण उबदार अंथरुण सोडून उठायला ७ वाजले... मग पटकन फ्रेश होवून, नाष्टा केला आणि लाडघरचा निरोप घेतला...

(दुरर्‍या दिवशीची मुक्कामाची जागा...)

(तीसर्‍या दिवशीच्या प्रवासासाठी सज्ज)

आजच्या प्रवासाची सुरुवात समुद्र किनार्‍यावरुनच झाली... लाडघर ते बुरुंडी समुद्र किनार्‍यावरुन देखील जाता येतं... खरंतर मुरुड-कर्दे ते बुरुंडी हा एकच लांबच्या लांब समुद्र किनारा आहे... सकाळच्या गार वार्‍यात सायकलवर छान वाटत होतं... समुद्र किनारी आमच्या सोबतीला फक्त सीगल पक्षी होते... अफाट समुद्र, लाटांच संगीत, ताजी आणि दमट हवा आणि कोवळं उन्ह असं छान वातवरण जुळून आलं होतं... आजच्या सफरीची सुरुवात अगदी स्वप्नवत होती... साधारण अर्धा तास आम्ही समुद्र किनारी चाललो आणि मग डांबरी रस्ता धरला... मागे वळून पाहिलं तर समुद्राचा अगदी नयनरम्य देखावा होता...

काही क्षणातच आम्ही बुरुंडी गाव मागे टाकलं आणि दाभोळच्या दिशेने निघालो... लगेचच चढ लागला... कोकणातले चढ म्हणजे जरा वेगळेच... चढ एकदम स्टीप असतो, रस्ता जेमतेम ७ फुट रुंद आणि रस्त्याच्या दुतर्फा आंबा-काजूची झाडं... आणि आज तर सकाळच्या दवाने रस्ता मस्तपैकी ओला झाला होता, जणू काही सडा मारुन सजवल्या सारखा वाटत होता...

तीघेही आपाआपल्या तंद्रीतच सायकल चालवत होतो... चढ संपला आणि परशुराम स्मारक लागलं... कोण्या एका बील्डरने ही सगळी जागा विकत घेतलीय आणि आता तो इथली वनराई नष्ट करुन बंगले उभारतोय... आणि त्यानेच हे स्मारक उभारलय...

झाडं तोडून बोडकं केलेला माळ बघून खूपच खंत वाटली... जास्त वेळ न थांबता पुढचा प्रवास सुरु केला... थोड्याच वेळात उजव्या हाताला कोळथरेला जाणारा फाटा लागला... कोळथरेहून देखील दाभोळला जात येतं, पण आम्ही मात्र सरळ पंचनदी गावाला जाणारी वाट सोडली नाही... थोडासा चढ आणि मग मोठ्ठा उतार संपल्यावर पंचनदी गाव आलं... उतारावर सुपारीच्या बागा बघून रेवदंड्याची आठवण झाली... लहानपणी आम्ही अशा बांगामधे पडलेल्या सुपार्‍या गोळा करायचो आणि बोरं विकणारीला द्यायचो, त्याबदल्यात ती आम्हाला एक-दोन मुठ बोरं द्यायची... रोज शाळेत जाताना सुपार्‍या गोळा करणं हा आमचा उद्योग असायचा...

पंचनदी गावात एका घराच्या अंगणात रामफळं विकायला ठेवली होती... ती विकत घेतली, तर त्या आजीने आम्हाला खारीने चाखलेलं एक रामफळ असंच खायला दिलं... पुण्याहून सायकलने आलोय असं कळल्यावर त्या आजी खूप आनंदी झाल्या... घरातल्या सगळ्यांना बोलवून आमच्या बद्दल सांगीतलं आणि आमचं खूप कौतुक केलं... पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा घेवून आजींचा नोरोप घेतला... पंचनदीहून अजून १० कि.मी. चा चढ-उतार संपवून आम्ही दाभोळला पोहचलो...

(दाभोळच्या उतारावर प्रसाद)

(दाभोळ जेट्टी)

दाभोळहून फेरीने धोपवे गाठलं... धोपवे सोडलं आणि चढ लागला... दुपारच्या ११ च्या उन्हात चढावर जीव कासावीस होत होता... मान खाली टाकून एक-दोन-तीन-चार असे पेडल्स मोजत हळू-हळू चढ संपवला आणि एका झाडाखाली आडवे झालो... समोरच दिवाळं निघालेला एराँनचा प्रकल्प उभा होता...

रस्त्यावर अजीबातच रहदारी नव्हती, एकंदरीतच इथला सभोवताल भकास वाटत होता... चढावर अंगातली सगळी ताकद संपली होती, मग पंचनदीमधे घेतलेली रामफळं बाहेर काढली... आंबट-गोड अशी मस्त चव होती... घोटभर पाणी प्यायलो आणि गुहाघरचा रस्ता धरला... पावूण तासात गुहाघर गाठलं...

उन्ह खूप होतं आणि जेवणाची पण वेळ झाली होती, मग इथेच जेवून थोडा आराम करायचं ठरलं... वरण-भात, पोळी-भाजी, सोलकडी आणि वाटीभर आमरस असं पोटभर जेवलो आणि आराम करण्यासाठी गुहाघरच्या समुद्रकिनारी पोहचलो... गुडघाभर पाण्यात उभं राहिल्यावर गार लाटांमुळे एकदम प्रसन्न वाटलं... पांढर्‍याशुभ्र फेसाळ लाटा उन्हात अजूनच चमकत होत्या... खोलवर समुद्र निळा-हिरवा भासत होता... भर उन्हात सुद्धा समुद्रकिनारी छान वाटत होतं...

एखाद तास आराम केल्यावर पुन्हा सायकलींवर स्वार झालो... घरुन निघताना जरा कमीच पैसे सोबत घेतले होते, म्हणून मग गुहाघरला थोडे पैसे काढले आणि चिपळूण कडे जाणार्‍या चढाला लागलो... जेवणानंतर चढ नकोसा होतो अगदी, पण आजचा मुक्काम गणपतीपुळ्याला करायचा होता आणि ते अजून खूप दुर होतं, म्हणून हळू-हळू का होईना पुढे सरकत होतो... चढावर एकजण सायकल ढकलत निवांत चालत होता... हाय-हैलो झाल्यावर कळालं की तो रशीयावरुन ३ महिन्याच्या सुट्टीवर आलाय... मुंबईहून त्याने प्रवास सुरु केला होता आणि शेवट त्याला अंदमानात करायचा होता, पण अधे-मधे कुठे थांबायच हे त्याने ठरवलं नव्हतं... एकदम रमता-जोगी प्रकारचा तरुण होता... थोड्या गप्पा झाल्यावर त्याला बाय करुन आम्ही पुढे निघालो... जरा पुढे गेल्यावर उजव्या हाताला "वेळणेश्वर आणि हेदवी" अशी पाठी दिसली... चिपळूणचा रस्ता सोडला आणि उजव्या हातचा रस्ता धरला... अगदी निवांतपणे आम्ही सायकली चालवत होतो... अधून-मधून झाडांच्या सावलीत थोडावेळ आराम करायचो...वेळणेश्वरच्या जरा आधी त्या रशीयन तरुणाने आम्हाला गाठलं आणि म्हणाला,"Today, can I stick to you guys for the rest of the journey?"...

आम्ही होकार दिला आणि त्याला आमच्या टीम मधे शामील करुन घेतलं... त्याच्या सोबत अजून गप्पा झाल्यावर कळालं की, साहेबांकडे चांगला नकाशा सुद्धा नाहिये, नीट माहिती न काढताच साहेब सफरीला निघालेत आणि ते पण एका अनोळखी देशात... तरी सुद्धा तो एकदम निवांत होता...

हेदवी साधारण ५-६ कि.मी. असताना उजव्या हाताला वेळणेश्वरचा फाटा लागला... इथून वेळणेश्वर २-३ कि.मी. अंतरावर होतं... वेळणेश्वरला न जाता आम्ही हेदवीच्या वाटेने पुढे निघालो... हेदवीला गणपतीचं दर्शन घेतलं आणि फेरी पकडण्यासाठी तवसाळच्या दिशेने सायकली पळवल्या... सारखे छोटे-मोठे चढ-उतार लागतच होते... गेले २ तास समुद्र दिसलाच नव्हता आणि अचानक एका वळ्णानंतर समुद्र दिसला...

थोडावेळ समुद्राला लागूनच रस्ता होता आणि मग परत चढ सुरु झाला... चढत असताना उजव्या हाताला समुद्राचा नितांत सुंदर देखावा सतत नजरेत होता... चढ संपताच, देखावा बघण्यासाठी थांबलो...

(यशदीप, मी आणि रमन वोल्ह्कोव (रशीयन तरुण))

इथून थोड्या वेळातच तवसाळ गाठलं... लिंबू सरबत प्यायलो आणि फेरीत बसलो... फेरीच्या टपावर चढून समुद्र न्याहाळत बसलो... आज खूपच चढ-उतार होते... पाय जाम दमले होते आणि गणपतीपुळे अजून निदान २० कि.मी. दूर होतं... जयगडच्या जेट्टीवर पोहचलो तेव्हा सुर्य कलत आला होता... जेट्टी नंतरचा चढ संपल्यावर उजवीकडे जयगडला न जाता डावीकडची गणपतीपुळ्याची वाट धरली... आजचा सुर्यास्तपण सायकल वरुनच अनुभवला...

सुर्य मावळातच भरभर कळोख पसरु लागला आणि आमच्या सायकलीपण जोरात पळू लागल्या... साधारण एक तासात २० कि.मी. अंतर कापून आम्ही गणपतीपुळ्याला पोहचलो... आमच्या मागे-मागे येत तो रशीयन पण पोहचला... "you guys are crazy" असं म्हणत त्या रशीयन तरुणाने आजच्या सोबत केलेल्या प्रवासाच वर्णन केलं... त्याला खूप भुक लागली होती, म्हणून तो चायनीज हॉटेल शोधण्यासाठी गेला आणि "जमलं तर उद्या वाटेत भेटू" असं म्हणत आम्ही देखील मुक्कामाची जागा शोधू लागलो... एका जागी स्वस्तात मुक्कामाची सोय झाली... गरम पाण्याने अंग शेकत आंघोळी उरकल्या आणि जेवणासाठी बाहेर पडलो... प्रसादचा डावा गुडघा खूपच दुखत होता... त्याला चालताना प्रचंड वेदना होत होत्या... आजची रात्र आराम करुन जर बरं वाटलं तर पुढे येतो नाही तर इथूनच बसने पुण्याला जातो, असा त्याचा विचार होता... मला आणि यशदीपला पण तेच योग्य वाटलं...

विमुक्त
http://www.murkhanand.blogspot.in/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहीच लिहितो आहेस विमुक्त, अगोदरच्या भागाची लिंक पण देत जा प्रत्येक भागात.
सगळेच फोटो मस्त पण सीगल्सचा एकदम मस्त आहे! खूप आवडला.

सुंदर यात्रा सुरु आहे. हवाहवासा वाटणारा अनुभव आहे हा..
प्रचंड वाट पहायला लावलीस या भागासाठी..! आता नंतरचे लवकर येऊ देत ही _/\_..

छानच ! मानलं तुम्हाला ! हा सगळा परिसर फिरलोय मी अनेक वेळां - अर्थात गाडीने - त्यामुळे विशेष कौतुक वाटलं !!!

जबराच रे , सुंदर लिहिलं आहेस अन प्रची भारीच एकदम
मानलं तुम्हाला ! >>> +१
रशियन रमनचे पण कौतुक. खरा धाडशी दिसतोय.>>> हो ना एकटाच लगे रहो .....
हेवा वाटतोय तुमचा Happy

रशियन रमनचे पण कौतुक. खरा धाडशी दिसतोय.>>> खरंय. अगदींच राहवत नाही म्हणून थोडं विषयांतर-
खूप वर्षांपूर्वीं आम्ही चंद्रपूरहून नागपूरला येत होतों व वाटेत एका अगदीं छोट्या गांवात चहा प्यायला थांबलो. नेमका त्याच वेळीं १७-१८ वर्षाचा एक फ्रेंच तरुण सायकलस्वार तिथं आला. पृथ्वीचा पूर्वार्ध तो सायकलवरून पादाक्रांत करणार होता - एकटा ! पुढचा त्याचा मुक्काम होता हैदराबाद. आमच्या लक्षात आलं कीं दक्षिणेला जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाकडे जाणारा रस्ता सोडून तो चुकून ३०-३५ कि.मी. पुढें अल्लापल्ली-सिरोंचा रस्त्यावर आलाय. त्याच्या हें लक्षात आणून दिल्यावर त्याने मोडक्या तोडक्या इंग्लीशमधे विचारलं, ' पण असाच ह्याच रस्त्याने गेलो तर हैदराबादच्या दिशीनेच जाईन ना ?'; आम्ही त्याला खूप समजावलं कीं तसं बहुधा असलं तरीही हा रस्ता दाट जंगल भागातून जातो, पुढे पुढे रस्ता खराब आहे , नद्यांवर पूलही नाहीत वगैरे [ अर्थात, तेंव्हा नक्षलवाद्यांचं प्रस्थ त्या भागात वाढलं नव्हतं ]. तो गोड हंसून पण ठामपणे म्हणाला, ' अगदीं विरुद्ध दिशेने जाणारी वाट चुकून धरली तरच मागें वळायचं हा माझा शिरस्ता आहे; व मला जंगलाची भिती नाही वाटत, माणसांची वाटते.म्हणून मी गांवात नाही तर बाहेर मुक्काम करतो'. कांही मदत लागलीच तर अल्लापल्लीच्या ओळखीच्या कांही फॉरेस्ट ऑफिसर्सचीं नांव सांगून आम्ही त्याला शुभेच्छा दिल्या.पण पुढचे तीन-चार दिवस तो आतां कुठे असेल हाच विचार आमच्या डोक्यात सतत असे.

माबोवरची कांही मंडळी त्या फ्रेंच तरुणाच्या जातकुळीतलीच आहे; माबोकरतां हें अभिमानास्पदच आहे !

आज तिन्ही भाग एकदम वाचले. असा वेडेपणा करणारे लोक बघितले की खूप इन्पायरींग वाटते, खर तर याला वेडेपणा तरी का म्हणायचे मनाला एवढा आनंद देणारी गोष्ट करायची म्हणजे खर तर हा शहाणपणाच. नेहमीची चौकट मोडलेली बघितली की हुरुपही येतो.
हा अनुभव इथे लिहील्याबद्दल तुमचे आभार मानायला हवेत.
पुढचा भाग वाचायला नक्की आवडेल. जरूर लिहा.

दाभोळ जेट्टीच्या फोटोबद्दल धन्यवाद. गोनिदांचे मृण्मयी प्रचंड आवडते पुस्तक. त्यात वर्णन केलेले दाभोळ बंदर तुमच्यामुळे पहायला मिळाले.

हे असं फिरायला लई आवडेल, पण आता बहुधा वय उलटुन गेलं >>>
रैना हे पटले नाही. म्हणजे असा विचारही कोणाच्या मनात यायला नको. इट्स नेव्हर टू लेट.
मी जेव्हा स्काय डायव्हिंग केले तेव्हा आमच्यासोबत ७०-७५ वर्षाच्या दोन्ही पाय कमरेपासून अधू असलेल्या अगदी व्हीलचेअरवर खिळलेल्या आजीबाई होत्या. त्यांनी आमच्यासोबत स्कायडायव्हिंग केले. त्यांनी जर असा विचार केला असता तर त्या चांगल्या अनुभवाला किती मुकल्या असत्या. असो विमुक्त यांच्या धाग्यावर विषयांतर नको.

तुम्हि लोक ग्रेट आहात. अशी सहल म्हणजे स्वर्गीय आनन्द आहे.
तुम्ही माझ्या कॉलेज मित्रान्ची आठवण करून दिलित. थोडे विशयाला धरून विशयान्तर!
१. दोघे मित्र चेन्नैला M Tech करायला गेले होते. जाताना सायकल रेल्वेतून नेली होती. M Tech झाल्यावर येताना त्यानी सगळे सामान रेल्वेने पुण्याला पाठवले आणी दोघे पठ्ठे सायकल चालवत चेन्नई - गोवा - पुणे या मार्गाने मजा करत आले होते !

२. आणी एक मित्र शाळेत नव्वीत असताना तिघे जण पुण्यातून दिवाळी सुट्टीची सहल म्हणून रायगड ला जाऊन आले होते. घरी सान्गितले होते कि सायकल मित्राच्या घरी लावून ३ दिवस शळेच्या ट्रिपला चालले आहोत म्हणून.

तुमच्या पुढच्या उप्क्रमान्ना शुभेच्छा !