देनिस, कॅल्विन आणि निकोला

Submitted by सई केसकर on 10 April, 2012 - 10:22

कधी कधी मनाची मरगळ घालवण्यासाठी मी लहान मुलांची पुस्तकं वाचते. लहान असताना मला आजी नेहमी अरेबियन नाईट्स वाचून दाखवायची. त्यातला ठेंगू कुबड्या, ताटलीएवढ्या मोठ्या डोळ्याचा कुत्रा, जादूचा दिवा आणि त्यातून येणारा अक्राळ विक्राळ जिनी या सगळ्यांनी माझ्या मनात जणू एक सिनेमा उभा केला होता. तसंच इसापनीती, पंचतंत्र, अकबर आणि बिरबल या सगळ्या गोष्टीदेखील लाडक्या असायच्या. पण थोडी मोठी झाल्यावर जेव्हा मी स्वत: पुस्तकं वाचू लागले, तेव्हा मात्र मला मुलांसाठी लिहिलेल्या या सुरस आणि चमत्कारिक गोष्टींपेक्षा, मुलांच्या आयुष्याबद्दल, मोठ्या माणसांनी, लहान मुलांच्या शब्दात लिहिलेल्या गोष्टी जास्त आवडू लागल्या.

यातलं मी कधीही न विसरू शकणारं उदाहरण म्हणजे देनिसच्या गोष्टी. देनिस हा साधारण सहा वर्षांचा रशियन मुलगा आहे. देनिस त्याच्या आई बाबांबरोबर सोविएत राजवटीतल्या काळातील रशियात राहतो. त्याचे आई बाबा, त्याचा मित्र मिष्का, मैत्रीण अनुष्का ही पुस्तकातली मुख्य पात्रं आहेत. हे पुस्तक वाचताना पहिल्यांदा विक्तर द्रागुनस्की हा मोठा माणूस आहे यावरच विश्वास बसत नाही. पुस्तकातली प्रत्येक कथा कुठल्याही सहा वर्षाच्या मुलाच्या आयुष्यात घडू शकणारी आहे. माझी आवडती गोष्ट "बरोब्बर पंचवीस किलो". देनिस आणि मिष्का जत्रेत जातात. तिथे एका खेळात, बरोब्बर पंचवीस किलो वजन असलेल्या मुलाला किंवा मुलीला बक्षिश मिळणार असतं. देनिसचं वजन पंचवीस किलोच्या जरा वर भरतं तर मिष्काचं पंचवीसच्या थोडं खाली! मग देनिस मिष्काचं वजन बरोब्बर पंचवीस किलो भरेपर्यंत त्याला लिंबू सरबत प्यायला लावतो.

यातल्या काही गोष्टी नुसत्या मजेदार नसून थोड्या अंतर्मुख करायला लावणार्‍या आहेत. जेव्हा देनिसला छोटी बहिण होते, तेव्हा त्याच्या मनात तयार झालेलं छोटसं वादळ, सर्कशीत चेंडूवर चालणारी सुंदर मुलगी पाहून त्याला तिच्याबद्दल वाटणारं कौतुक/ आकर्षण, या सगळ्या हळुवार गोष्टी एखाद्या सहा वर्षाच्या मुलाच्या भाषेत लिहिण्याची प्रचंड प्रतिभा या पुस्तकात दिसते.

अमेरिकेतही असा एक लाडका सहा वर्षांचा मुलगा आहे. त्याचं नाव कॅल्विन. कॅल्विन आणि हॉब्स ही कॉमिक स्ट्रिप १९८० - १९९० च्या सुमारास अमेरिकेत प्रचंड प्रसिद्ध झाली. कॅल्विनचे जनक बिल वॉटरसन हे ओहायो मधल्या कडाक्याच्या हिवाळ्यात लहानाचे मोठे झाले. त्यामुळे कॅल्विनच्या बाललीलांमध्ये बर्फाची माणसं बनवणं हा एक महत्वाचा उपक्रम आहे. कॅल्विनचा या सगळ्या खोड्यांतील सवंगडी म्हणजे हॉब्स -- त्याचा खेळण्यातला वाघ. हॉब्सचं वैशिष्ठ्य असं की कॅल्विनच्या डोळ्यांना तो खराखुरा जिवंत वाघ दिसतो पण चित्राच्या पॅनेलमध्ये दुसरी कोणतीही व्यक्तिरेखा आली की हॉब्स निर्जीव खेळणं बनतो. ही कल्पना अत्यंत नाजूक आहे. आणि ती इतक्या जाणीवपूर्वक लोकांसमोर मांडणं फार अवघड आहे. पण आपल्या स्वत:च्याच लहानपणात डोकावून पाहिलं तर असे किती काल्पनिक सवंगडी सापडतील? लहान मुलांना काल्पनिक सवंगडी असू शकतात हे मोठं झाल्यावर समजणं (किंवा आपल्या लहानपणातून लक्षात राहणं) हीच कवीमनाची पहिली पावती आहे.

देनिसप्रमाणेच कॅल्विनचं आयुष्यदेखील कुठल्याही सहा वर्षांच्या मुलासारखं आहे. पण वॉटरसनकडे मोठ्यांनादेखील नीटसं न स्पष्ट करता येणारं तत्वज्ञान छोट्या कॅल्विनच्या तोंडी घालण्याचं कसब आहे. कॅल्विनच्या काही विनोदांतून वॉटरसनचं स्वत:चं निसर्गप्रेम, पशुप्रेम दिसून येतं. अर्थात, या स्ट्रिपमध्ये कॅल्विनला कुठेही कम्प्यूटरची बाधा झालेली दिसत नाही. सतत टी.व्ही बघायच्या त्याच्या हट्टालादेखील घरून शांतपणे विरोध केला जातो. आणि त्याच्या आई वडिलांची त्याला घरातून बाहेर खेळायला हाकलण्याची तळमळ आजच्या काळात जास्त उचलून धरली जाईल. एका स्ट्रिप मध्ये घरात मलूल चेहर्‍यानी टी.व्ही बघणार्‍या कॅल्विनला हॉब्स सूर्यप्रकाश न मिळालेल्या फुलाची उपमा देतो. अशा छोट्या छोट्या कल्पनांमधून वॉटरसन मुलांनी बाहेर भटकावं, आणि त्यांना लहानपण तंत्रज्ञानाचा विपरीत परिणाम न होता घालवता यावं, याचे मनाला भिडणारे धडे देतात.

फ्रांसमधल्या सहा वर्षांच्या मुलाचं नाव निकोलस (निकोला) आहे. अस्टेरीक्सचे लेखक गॉसिनी आणि जॉ-जॅक सॉम्पे या दोन प्रतिभावंत चित्रकारांच्या सहयोगातून या पुस्तकांचा जन्म झाला. निकोलाचं आयुष्य १९६० च्या आसपासच्या फ्रांसमधून आलेलं आहे. त्याच्या शाळेतले मित्र, त्याचे चिडके शिक्षक (ज्यांना मोठा बटाटा असं नाव व्रात्य कारट्यांनी बहाल केलं आहे), निकोलचे आई बाबा अशी या पुस्तकांमधली "पात्रावळ" आहे. या पुस्तकांची खासियत म्हणजे अगदी लहान मुलं जशी पुन्हा पुन्हा तेच तेच सांगतात, तसेच या पुस्तकात पुन्हा पुन्हा तेच तेच रेफरन्सेस येतात. निकोला स्वत: या गोष्टी सांगतो त्यामुळे तो प्रत्येक पात्राची पुन्हा नव्याने ओळख करून देतो (जसं की "माझा मित्र आलेक -- जो सारखा खात असतो"). या पुस्तकात निकोलाच्या आई बाबांची त्याच्या आईच्या आईवरून होणारी भांडणंदेखील मजेदार आहेत. (जागतिक) "घरो घरी मातीच्या चुली"चा छान प्रत्यय येतो. पण या पुस्तकांची सगळ्यात सुंदर बाजू म्हणजे सॉम्पेची रेखाटनं. त्यांनी रेखाटलेली शाळेची इमारत ही इतकी बोलकी आहे की तिच्यात कुठल्याही देशातल्या मुलाच्या/मुलीच्या मनाला थेट त्यांच्या शाळेत घेऊन जायची ताकद आहे.

भारतात प्रथम बुक्स ही संस्था खास लहान मुलांच्या साहित्यासाठी काम करते. भारतातील वेगवेगळ्या भाषांमध्ये दर्जेदार बालसाहित्य अनुवादित करायचा उपक्रम प्रथम बुक्सने हाती घेतला आहे. माझ्या नशिबाने मला यातील एका पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद करण्याची संधी मिळाली. आणि हा अनुवाद करताना, लहान मुलांना समजेल, आवडेल अशा इंग्रजीत, मराठीतले गोंडस शब्द तितक्याच गोंडसपणे अनुवादित करणं फार म्हणजे फार कठीण गेलं. पण ते करताना अतिशय आनंद मिळाला. काही दिवसांपूर्वी हे पुस्तक प्रकाशित झालं. माधुरी पुरंदरेंनी लिहिलेलं बाबांच्या मिश्या! विशेष म्हणजे या पुस्तकातली सगळी चित्रं देखील त्यांनीच काढली आहेत.

देनिस, कॅल्विन, निकोला आणि माधुरीच्या पुस्तकातली अनु या सगळ्या मुलांचे आनंद एकसारखे आहेत. आणि सोविएत बर्फात काय नाहीतर कॅपिटॅलिस्ट बर्फात काय, स्लेडवर बसून घसरगुंडी खेळण्यात येणारी मजा एकसारखीच! आणि विविध भाषांमधून या लहान मुलांच्या गोष्टी ऐकताना अबालवृद्धांना होणारा निरागस आनंदही एकसारखा. Happy

ता.क. माबोच्या पोस्टमध्ये चित्रं कशी टाकतात? चित्रासहीत पोस्ट इथे वाचा.

गुलमोहर: 

हार्दिक अभिनंदन. तुझ भाषांतर कुठे वाचायला मिळेल (विकत घेवून)? त्या लिंक वर ऑनलाइन घेता येइल पण मी दुकानात जावून आई/बहिणीला सांगणार आहे.

मल तुझं खरच खूप कौतुक वाटतं Happy
मला फक्त प्रतिसादात इमेज देता येते. मी लिखाण केलं नाही त्यामुळे माहिती नाही Uhoh

@शूम्पी,
हो. माझ्याकडे त्याच्या प्रती नाहीयेत. Sad
माझ्या आई बाबांनी काही विकत घेतल्यात पण मी अजून प्रत्यक्ष पुस्तक बघितलेलं नाही. Sad

देनिसच्या गोष्टी ह्या विक्टर द्रगून्स्कीच्या पुस्तकाबद्दल अनुमोदन. लहान मुलाचे भावविश्व नितांत सुंदर पकडलय. "कुठे असं ऐकलय, कुठे असं पाहलय" आठवली तरी हसू आवरत नाहि. काहि वर्षांपूर्वी इंग्लिश अनुवाद नेटवर मिळत असे. आता सापडत नाहि तो.

तुझे अभिनंदन !

जबरी ! अनुवाद वाचायला नक्की आवडेल.
देनिसच्या गोष्टी मी पण वाचायचे. लहानपणी ते 'मिष्का' नाव मला इतकं आवडायचं की आमच्या एका मांजराला मी त्या नावानं हाका मारायचे.
माझ्याकडे ही पुस्तकं 'रशियन' मधेही आहेत (जी मला वाचता येत नाहीत!!). पण इतकं 'कम्युनिस्ट कव्हर आणि कागद' आहे त्या पुस्तकांचा, त्यासाठी रशियन वाचता येत नसूनही कलेक्टीबल्स, संग्राह्य आहेत माझ्यासाठी Happy
रशियन लोककथेतला 'छोटा इवान', केव्हिन आणि हॉब्सपण खूप वाचलंय..आवडीनं !
निकोलस ओळखीचा आहे, पण का कोण जाणे खूप नाही वाचला गेला. त्यामुळे अजून मैत्री नाही त्याच्याशी. वाचायला हवा !

माझे बाबा लहानपणापासून मला सांगायचे 'सोपं लिहिणं सगळ्यात जास्त अवघड असतं' .. ही अशी पुस्तकं वाचून ते खरंच आहे असं आजही वाटत राहतं.
अगदी ह्याच कारणाकरता मला माजिद माजिदीचे सिनेमेही आवडतात. का कोण जाणे पण ते पाहताना मला ही अशी सगळी पुस्तकं आठवत राहतात.

तुझं अभिनंदन Happy

अभिनंदन सई!! छोट्यांच्या सुंदर सोप्या पुस्तकांबद्दल, त्यातील लेखनशैलीबद्दल, सहज सुरेख व्यक्तिचित्रांबद्दल अगदी सहमत!

ज्या गोष्टी समजून घ्यायला त्यांमधील चित्रे, रेखाटनेच पुरेशी असतात त्या गोष्टी आजही आवडतात!
लहानपणी इंग्रजीतील ओ नाम ठो कळत नसताना रशियन पुस्तकांचे सचित्र इंग्रजी अनुवाद असणारी सहा-सात पुस्तके मी पारायण केल्यासारखी नुसती चाळत बसायचे. एक चायनीज पुस्तक पण होते. त्यातील गोबर्‍या गालांचा मिचमिच्या डोळ्यांचा मुलगा व त्याची इटुकली मैत्रिण मला खूप आवडायचे. (भाषा व कथा काय आहे हे न कळताही :ड)

अभिनंदन सई.

तीन चिटुकल्या नायकांची मस्त ओळख करून दिलीस. जरा देनिस आणि निकोलाच्या पुस्तकांचे डिटेल्स द्या कोणीतरी प्लीज.

अभिनंदन सई.

एका मैत्रिणीच्या मुलासाठी मी नेहमी मराठी पुस्तकं आणते. ह्या वेळी माधुरी पुरंदरेंचं मराठीतलं आणि तुझं अनुवादीत अशी दोन्ही आणेन.

मस्त लेख!! देनिस व कॅल्विन दोघंही आवडीचे.
तुझ्या पुस्तकाबद्दल अभिनंदन! त्याची विक्री इथे मायबोलीवर होऊ शकेल का ?

@ मामी
देनिसचं पुस्तक आता मिळत नाही. Sad माझ्याकडचं देखील कुठेतरी हरवलं.
निकोलाचे सगळे अनुवाद अ‍ॅंमॅझॉनवर उपलब्ध आहेत. मी लोकांना हार्डकव्हर घ्यायचा सल्ला देईन कारण त्यातली चित्र फारच सुंदर दिसतात.
http://www.amazon.com/gp/product/0714846783/ref=oh_o00_s00_i00_details
अर्थात हार्डकव्हर महाग आहे. Sad
पण अ‍ॅमॅझॉनकडे पेपरबॅकसुद्धा उपलब्ध आहे.

धन्यवाद सई! मनात दडुन बसलेल्या आठवणी जाग्या झाल्या Happy माझ्याकडे देनिसचे हार्डकव्हर पुस्तक होते ( अजुनही असेल आईने जपुन ठेवलेले..) पुढल्या भारतवारीत आणेल आता. तेच पुस्तक ईथे सापडले पण बरेच महाग आहे http://www.amazon.com/Adventures-Dennis-Dragunsky-Translated-Glagoleva/d...

@ सोनपरी

हो. माझ्या मते ते कलेक्टिबल आहे म्हणून महाग असावं. मीही ते पाहिलं आहे. पण मला मराठी अनुवाद जास्त आवडतो. कारण तो मी सर्वात आधी वाचलाय.

मस्त गं...मला थोडाफार डेनिस आठवतोय्..दुसरी दोन मला माहित नाही आहेत्..मुलांच्या कृपेने माहीत होतील कदाचित...:)
तू फा.फे. वाचायचीस की नाही?? माझाजाम लाडका होता तो...:)

छान लिहिलयस, सई. आपल्या चिंटूचाही उल्लेख असायला हवा होता, असं वाटून गेलं. तोही देनिस, केव्हिन सारखाच लाघवी आहे. शिवाय फा.फे., नंदू नवाथे आहेतच.

आणि हो लेखात किंवा प्रतिसादात चित्र अपलोड करण्यासाठी खाली एक लिंक दिली आहे ती अशी:

मजकूरात image किंवा link द्या.

तिथे image वर क्लिक केले की मग बरोबर पुढे कळेल काय करायचे ते. ह्या चौकोनी बॉक्सच्या खाली बघा अगदी लिंक दिली आहे.

सई......सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन!
अगं मुलं लहान होती तेव्हा दरवर्षी भरणार्‍या रशियन प्रदर्शनातून असंख्य पुस्तकं आणली मुलांसाठी.
त्यातच डेनिसच्या गोष्टी, सुंदर वासिलिसा, युक्रेनी लोककथा, व्हिजिटिंग ग्रॅन्डपा, अशी अनेक पुस्तके अजूनही आहेत. व्हिजिटिंग ग्रॅन्डपामधला "शुरिक" हाही असाच एक गोड मुलगा आहे. तो आणि त्याचा भाऊ आजोबांकडे खेड्यात जातात आणि काय्काय धमाल करतात त्याचं वर्णन आहे.
बाकी ही कॅल्विन, निकोल ही मंडळी काही ओळखीची नाहीत.

"कुठे असं ऐकलय, कुठे असं पाहलय" आठवली तरी हसू आवरत नाहि. >>>>>>>>>>>
असाम्या अरे काय अचानक आठवण करून दिलीस!
अरे मुलांना जेव्हा ही गोष्ट वाचून दाखवायला सुरवात केली होती तेव्हा मी वाचूच शकलेनव्हते...हसण्यामुळे..........आत्ताही हसते आहे.

येस्स... देनीसच्या गोष्टी (इन फॅक्ट इतरही रशियन कथा - रशियन परिकथा, लोककथा, खिशातला कुत्रा न्यासू, अणूभट्टी ते आगगाडी, माझी आई सगळ्या जगातली सुंदर आई आहे, माशा...) एकदम भारी!

यातल्या काही चित्रमालिका बघितल्या आहेत. सुंदर आहेत. आपला लंपन, फास्टर फेणे, चिंटू, गोट्या हे पण असेच आहेत कि.

मस्त!

प्रथम बूक्सची लिंक इथे दिल्याबद्दल सई तुझे आभार Happy

माधुरी पुरंदर्‍यांची तर मी चाहती आहे. त्यांनी लिहिलेले पुस्तक आणि त्यात त्यांनीच काढलेली चित्रे पाहणं ही एक मोठी पर्वणी असते. आणि यासाठीच माझ्या मुलीचा मला हेवा वाटतो Happy तिच्यासाठी आणलेली पुस्तके तिच्याआधी मीच अधाश्यासारखी वाचून काढते.

http://www.koryagin.newmail.ru/doc/denis.htm

देनिसचा इंग्लिश अनुवाद हवा असेल तर इथे आहे.तुम्ही आधी मराठीमधे पुस्तक वाचले असेल तर कदाचित odd वाटेल वाचताना. 'सोनेरी ठिपक्यांचा गरुड' किंवा 'कलंगडांची गल्ली'

Pages