ह्यूगो - मला अत्यंत आवडलेला चित्रपट

Submitted by दिनेश. on 28 March, 2012 - 10:01

एका प्रचंड मोठ्या घड्याळाच्या आकड्यांमधल्या छोट्या झरोक्यातून तूमचा प्रवास
सुरु होतो. लांबवर आयफेल टॉवर दिसतोय, मग हळू हळू धावत्या रेल्वेगाड्या
दिसायला लागतात. त्या गाड्यांबरोबर आपण पॅरिस स्टेशनमधे शिरतो. तिथे
भूतकाळातील पॅरिस रेल्वे स्टेशन, तिथली माणसे दिसतात. एक कडक वाटेल
असा पोलिस अधिकारी, एक नम्र फूलवाली, एक म्हातारी कॅफेवाली, तिचं छोटसं
कुत्रं, असे करत करत कॅमेरा परत एका घड्याळ्याजवळ येतो, त्यातल्या
प्रचंड काचेमागे आपल्याला निळेभोर, लोभस डोळे दिसतात... तो असतो ह्यूगो.

ह्यूगो चित्रपटातील हे पहिलेच दृष्य, मनाचा ठाव घेतं. आणि मग त्या गोंडस गोबर्‍या
मुलाची कथा सुरु होते. तो पॅरिस स्टेशनमधली घड्याळे चालवत असतो. ती घड्याळे
एवढी प्रचंड आहेत कि त्यातले काटेच नव्हेत तर आकडेही त्या छोट्यापेक्षा मोठे आहेत.

ती घड्याळे पुर्वीची आहेत. लंबकांवर चालणारी. त्यांना चावी द्यावी लागते. आणि हेच त्या मुलाचे काम. मग आपल्याला हळू हळू त्याची कथा कळू लागते.
एवढा छोटा मुलगा, अशी नोकरी का करत असेल बरं ?

तो मुलगा सर्रास चोर्‍या करतो. त्या पोट भरण्यासाठी तर असतातच पण तो एका
खेळण्याच्या दुकानातून छोटे छोटे खेळण्याचे भागही पळवतो. त्याचे एक स्वप्न
असते. आगीत मरण पावलेल्या त्याच्या बाबांनी त्याला एक यंत्रमानव दिलेला असतो.
त्या यंत्रमानवाची योजना, काही लेखन करण्यासाठी असते. पण त्यात काहीतरी
बिघाड झालेला असतो. तो यंत्रमानव त्याला दुरुस्त करायचा असतो. त्यासाठी
तो ते भाग पळवत असतो.

त्या खेळण्याच्या दुकानाचा मालक (बेन किंग्स्ले) एकदा त्याला पकडतो. पोलिसाच्या
ताब्यात द्यायची भिती घालतो आणि त्याच्याकडून सगळे भाग मिळवतो. त्याचबरोबर
त्याच्याकडे एक डायरी सापडते. त्यात अत्यंत अनोखी चित्र असतात.
त्या दुकानमालकाचे डोळे चमकतात. तो ती डायरी हस्तगत करतो. जाळून टाकीन
असे सांगतो. तो मुलगा त्याची पाठ सोडत नाही. रात्री त्याच्या मागोमाग जातो.
तो म्हातारा बधत नाही.
तो छोट्या खिडकीतून त्याच्या घरातील एका मुलीला खाली बोलावतो, डायरी
परत करायची गळ घालतो. ती प्रयत्न करेन असे सांगते.
पण दुसर्‍या दिवशी तो दुकानदार त्याच्या हातात डायरीची राखच ठेवतो. तो
मुलगा अत्यंत निराश होतो. पण कुठेतरी त्या दुकानदाराला त्याच्याबद्दल कणव
वाटू लागते. तो त्याला दुकानात काम कर असे सुचवतो. आता तो मुलगा घड्याळ
पण संभाळतो आणि दुकानातही काम करतो. त्यात तो काही नवीन शिकतो.

पण तो यंत्रमानव अजून नादुरुस्तच असतो. तसा तो थोडाफार चालतो पण एक
महत्वाची चावी मात्र मिळत नसते.
दरम्यान त्या मुलीची आणि त्याची दोस्ती झालेली असते. तिने कधीच चित्रपट
बघितलेला नसतो. हा तिला थिएटरचा दरवाजा उघडून चित्रपटाला घेऊन जातो.
तिथे ते दोघे रंगून सिनेमा बघत असतानाच, त्यांना तिथून हाकलले जाते.
ती त्याला लायब्ररीमधे घेऊन जाते. पुस्तकांची ओळख करुन देते.
तो तिला घरी घेऊन येतो (म्हणजे घड्याळ्याच्या खोलीत). यंत्रमानव दाखवल्यावर
तिला कळते कि तिच्या गळ्यात त्याची चावी आहे. यंत्रमानव सुरु होतो. कागदावर
काहीतरी अगम्य रेखाटून थांबतो. दोघे निराश होतात. पण थोड्याच वेळात
तो चालू होतो आणि कागदावर एक चित्र रेखाटतो.
डोळ्यात रॉकेट गेलेल्या चंद्राचे ते रेखाचित्र असते. त्याचा अर्थच त्या दोघांना लागत नाही.
काय अर्थ असतो त्या चित्रांचा ? त्या आजोबांचा काही संबंध असतो का त्या चित्राशी ? आणि आजीबाईंचा ? आजोबा कधीतरी त्या मुलाशी गोड वागतात का ?
शेवट काय होतो ? आजी आजोबांचे आधीच्या आयुष्यातले उद्योग काय असतात ?

याची उत्तरे ह्यूगो मधे मिळतील.

शिवाय यात दोन समांतर कथा आहेत.
तो पोलिस अधिकारी अपंग असतो. वरकरणी कठोर असतो. पण त्याचे फुलवालीवर
प्रेम असते. तिच्याशी तो संवाद साधू शकतो का ? ह्यूगोवर त्याचा राग का असतो ?
तो राग देखील खरा असतो का ?

कॅफे चालवणार्‍या आज्जी आणि त्यांच्यावर प्रेम करणारे आजोबा. पण आज्जीबाईंच्या
कुत्र्याला आजोबा अजिबात आवडत नाहीत. मग आजोबा काय करतात ?

मी फक्त ओळख करुन दिलीय पण हा पूर्ण चित्रपट म्हणजे एक जादुई अनुभव
आहे. चित्रीकरणाचे ऑस्कर तर मिळालेच आहे.
प्रत्येक भुमिकेसाठी निवडलेला चेहरा नुसता देखणाच नाही तर अत्यंत गोड आहे.
स्वतः ह्यूगो Asa Butterfield खुपच गोड आहे आणि त्याची छोटी मैत्रिण
Chloë Grace Moretz पण तशीच गोडुली आहे. दोघांच्या चेहर्‍यावरचे सहजसुंदर
भाव, अगदी मोहवून टाकतात.
http://www.youtube.com/watch?v=UGTfCw1x98A
इथे याची झलक बघता येईल.
या चित्रपटात भयावह (आता आपल्या हिरोला पुतळ्यांची पण भिती वाटते त्याला
काय करायचं ) असे काहीही नाही. आहे ते एक जादुई, स्वप्नमय कथानक.
उपकथानकातही माणूसपण जपलेलं आहे.

भारतात हा प्रदर्शित होईल का / झालाय का, माहित नाही.
पण बघाच.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युरी, यातले कॅमेराचे अ‍ॅंगल्स पण सुंदर आहेत.

ह्यूगो आपली डायरी मिळवण्यासाठी बेनच्या मागोमाग जातो, त्यावेळी रस्त्याच्या बाजूने
पुतळे असतात. आपल्याला काही ते भितीदायक वाटत नाहीत. पण कॅमेरा ह्यूगोच्या
उंचीवर ठेवून तो शॉट घेतल्याने, त्याला त्याची भिती वाटत असेल. हे नक्कीच पटते.

दुसरा असाच एक शॉट लायब्ररीमधला. सगळीकडे पुस्तकांच्या थप्प्या असलेल्या जागेचा शॉट घेताना, लावलेला कोन खुपच सुंदर आहे.

माझे लिहायचे राहिले. हा थ्री डी आहे. आणि हे तंत्र इथे गंमत म्हणून न येता,
विषयाची गरज म्हणून येते,

वा, दिनेशदा. मस्त परिचय. हे असं वाचून मग सिनेमा बघितल्यावर सगळे पाँईंट कव्हर केल्यासारखे वाटतात.

छान आहे चित्रपट. मी पाहिला आहे. तसे पाहिले तर लहान मुलांना केन्द्रस्थानी घेऊन स्टीव्हन स्पिएलबर्गचे चित्रपट जगभर गाजले आणि मार्टिन स्कोरसेसे हा तसा गंभीर विषयाकडे झुकणारा [आणि तितकाच जगन्मान्य, कल्पक] दिग्दर्शक. दोन छोट्यांच्या स्वप्नाळू जगाकडे त्याने प्रथमच लक्ष दिले आणि त्यातून निर्माण झाली ही सर्वांगसुंदर निर्मिती 'ह्युगो'. यंदाच्या ऑस्कर रेसमध्ये ह्युगोने त्या चित्रपटातील ट्रेनप्रमाणेच मुसंडी मारली होती ती किती योग्य तिचे प्रत्यंतर चित्रपट पाहताना येते.

दिनेशदा यानी 'स्पॉयलर अलर्ट' लक्षात ठेवून चित्रपट कथानक योग्य त्या ठिकाणी थांबविले आहे ते सर्वार्थाने योग्य आहे.

[एक छोटीशी दुरुस्ती दिनेश....शक्य असल्यास संपादन करावे :

"...डोळ्यात बाँब गेलेल्या सूर्याचे ते रेखाचित्र असते...."

~ सूर्य नाही. तो चंद्र आहे. "अ ट्रिप टु द मून" हा सन १९०२ साली निर्मिती झालेला एक मूक चित्रपट....त्याची फिल्म ह्युगो आणि इझाबेल पाहात असतात. शिवाय चंद्राच्या डोळ्यात जे गेले आहे तो 'बॉम्ब' नसून रॉकेट [कॅप्सुल] आहे. त्यातून पृथ्वीवरील माणसाने चंद्रावर पाय ठेवले अशी कल्पना त्या चित्रपटात मांडली होती.]

अशोक पाटील

दिनेशदा, तुम्ही या चित्रपटाची ओळख करून दिल्या नतंर बघीतला. खूप छान आहे. त्याशिवाय जुने चित्रपट बनवतानाचेही चित्रिकरण फार आवडले मला.

आभार अशोक, सुधारले मी.
भारतात हा चित्रपट आला, याचा मला खुप आनंद झाला. शक्य तितक्या लहान
दोस्तांना बघण्याचा आग्रह करणार आहे मी.

दिनेश मस्त ओळख चित्रपटाची. हल्लीचे ऑस्कर विजेते चित्रपट आणि माझी आवड यांचे गणित फारसे जुळत नाही. त्यामुळे चित्रपट बघायचा नाही असेच ठरवले होते. पण आता बघायचा प्रयत्न करेन Happy TV वर बघून तितकी मजा येणार नाही असे वाटतय पण अजून भारतात आला नाहीये. त्यामुळे थोडे थांबावे लागेल. रच्याकने तुम्ही सांगितलेला होम download करून ठेवला आहे. पण अजून दोन आठवडे तरी बघायचा योग नाहीये - परीक्षांमुळे Happy

मस्त ओळख दिनेशदा, बघायलाच हवा.

अवांतरः अशोककाका, तुमच्या घरी एकदा धाड मारायलाच पाहिजे Happy