ही मुले............ ती मुले

Submitted by मंजिरी सोमण on 28 March, 2012 - 00:54

ही मुले :
ही मुले म्हणजे आमच्या ऋतुरंग च्या 'ए' 'बी' आणि 'सी' बिल्डींग मध्ये राहणारी छोटी छोटी निरागस मुले. ठराविक दिनक्रम, चाकोरीबद्ध सुरक्षित आयुष्य, एका ठराविक पातळीवरच सर्व गोष्टी घडतात असा बालसुलभ निरागसपणा ठामपणे आपल्या सोबत घेऊन वावरणारी अशी 'ही मुले'. तीनही बिल्डींगची मिळून मोठ्या संख्येने आढळणारी, प्रत्येक वयोगटातली अगदी सहा महिन्यांपासून ते दहा वर्षांपर्यंतची आमची 'ही मुले'. यांना आम्ही रोज बघतो.
प्रत्येक घरात एक किंवा दोन अशी 'ही मुले' लाडाची, कौतुकाची. प्रसंगी हट्टी, क्वचित बेजबाबदार, आपल्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द आई बाबांनी झेललाच पाहिजे अशी सवयीने आग्रही स्वभावाची बनलेली अशी 'ही मुले'.

ती मुले :
आमच्याच ऋतुरंग च्या 'इ' बिल्डींगच्या बांधकामाने अचानक जोर पकडला. येत्या दीड ते दोन वर्षांमध्ये ही 'इ' विंग पूर्ण झालीच पाहिजे म्हणून अनेक मजूर कामावर रुजू झाले. त्यांच्या बरोबरीने कामाला आल्या त्यांच्या बायका. रोजंदारीची मजुरी त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत थोडे दिवसांसाठी थाटलेल्या तुटपुंज्या झोपडीवजा खोपटात वाढणारी अशी 'ती मुले'. असतील एक दहा-बारा मुले..... वेगवेगळ्या वयोगटातली. सहा महिन्यांपासून ते दहा वर्षांपर्यंतची. त्यांना आम्ही रोज बघतो.
प्रत्येक खोपटात दोन-दोन, तीन-तीन मुले, नैसर्गिक कर्तव्यातून जन्माला आलेली. ना कसली दिनचर्या, ना साचेबद्ध आयुष्य, ना कसलं उद्दीष्ट डोळ्यासमोर... खरं सांगू, खर्‍या अर्थाने मूलपण अनुभवू शकणारी, कदाचित स्वच्छंदी म्हणता येतील अशी 'ती मुले'.

ही मुले :
सकाळी उठून आवरून शाळेत जायचं, आल्यावर वाकडी तोंड करत आईने केलेले सुग्रास अन्न टीव्हीच्या आधाराने कसबसं घश्याखाली ढकलणारी 'ही मुले'. संध्याकाळी कसलातरी क्लास किंवा ग्राउंड, त्याआधी थोडा मारून मुटकून केलेला अभ्यास, नंतर बिल्डींग मधल्या मित्र-मैत्रिणींबरोबर खेळ, सायकलिंग, स्केटिंग, झोपाळे... आई ओरडून घरी नेइपर्यन्त लॉन वर मनसोक्त खेळणारी, आपापल्या भावंडांशी यथेच्छ भांडण करणारी 'ही मुले'. मापात मारामारी, किंचीतशी, पण आई-वडिलांच्या जीवाचं पाणी पाणी करणारी पडझड. जरा कुठे शिंक आली की काळजीने लगेच डॉक्टरांकडे पाळणाऱ्या आई-बाबांबरोबरची 'ही मुले'. फास्ट फूड, मॉल्स, मल्टीप्लेक्स यांची सवय आणि आवड असणारी अशी 'ही मुले'.

ती मुले :
सकाळी लवकर उठून आवरून आईबाप कामाला जुंपायच्या आत तयार होणारी आणि आपल्या धाकट्या भावंडांसाठी दिवसभर पालकच बनणारी 'ती मुले'. 'ह्या मुलांकडे' विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहणारी, शाळेच्या व्हॅन साठी वेगवेगळे रंगीत गणवेष घालून थांबलेल्या 'ह्या मुलांना' न्याहाळणारी, सगळीकडे शुकशुकाट असेल त्यावेळी आपल्या बालसुलभ कुतूहलाने पण कोणीतरी पटकन ओरडेल म्हणून घाबरत घाबरत हळूच बागेतले एक दोन झोके घेऊन बघणारी 'ती मुले'. 'ह्या मुलांच्या' विविध गोष्टींकडे, बांधकामासाठी टाकलेल्या वाळूच्या ढिगावर गुपचूप आपल्या लहान भावंडांना मुकाट्याने खेळवत उत्सुकतेने बघणारी पण हट्ट न करणारी, परिस्थितीने समजूतदार व प्रौढ बनलेली अशी 'ती मुले'. पाचवीलाच पुजलेली पडझड, मारामारी, दुर्लक्षित आजारपणं, भुकेला कोंडा निजेला धोंडा अशी वृत्ती अंगात झिरपलेली, थंडी-वारा-ऊन-पाऊस या गोष्टींची खोपटेवजा घरापेक्षा जास्त जवळीक असणारी 'ती मुले'.

मुले सारखीच पण विरोधाभास प्रचंड.... निरागसता, अनभिज्ञता दोन्हीकडे सारखीच पण जगण्याच्या व्याख्या वेगळ्या. 'ह्या मुलांचे' हट्ट वेगळे, 'त्या मुलांच्या' जबाबदार्‍या वेगळ्या. 'ह्या मुलांची' कोडकौतुक वेगळी,' त्या मुलांच्या' फक्त जीवनावश्यक गरजा वेगळ्या, 'ह्या मुलांना' क्षणभर ही एकटे न सोडणारे जागरूक पालक, 'त्या मुलांच्या' डोळ्यात क्षणभर तरी आईबापाजवळ जाता येईल का असे भाव..... शाळेत कंटाळत, रडत जाणारी 'ही मुले' आणि शाळेबद्दल अनामिक कुतूहल घेऊन भावंडांना बिनबोभाट सांभाळणारी 'ती मुले'..... ना 'ह्या मुलांना' या विरोधाभासाची जाणीव ना 'त्या मुलांना' त्यांच्या अपरिहार्यतेची ....

परिस्थिती, नशीब, दैव, शिक्षण, पैसा, जागरुकता... काहीही म्हणा, हा विरोधाभास नजरेत येतो, खुपतो, टोचत राहतो. पुढे कदाचित मोठे झाल्यानंतर 'ही मुले' अशाच कुठल्याश्या हौसिंग कॉम्प्लेक्स मध्ये घरं आरक्षित करतील आणि मोठी झालेली 'ती मुले' त्या स्वप्न बांधणीच्या कामावर रुजू होतील. ही दरी अशीच राहणार कायम....

आपण काय करू शकतो? परिस्थिती बदलू शकतो?.... नाही, दरी कमी करू शकतो?........ खूप अवघड आहे...... पण एक करू शकतो... किमान आपल्या मुलांना एवढी जाणीव तरी नक्की करून देऊ शकतो की आपल्याला मनात येईल ती प्रत्येक न प्रत्येक गोष्ट सहज-साध्य आहे, जी 'त्या मुलांना' माहिती पण नाहीये... आपण रोज खातो ते अन्न 'त्या मुलांना' फक्त सणासुदीलाच दिसू शकतं याची जाणीव करून देऊ शकतो. ते वाया न घालवण्याची शिकवण देऊ शकतो. 'त्या मुलांच्या' आयुष्यातील खडतरपणाची/हार्डशिपची कल्पना देऊ शकतो. आपल्या अंगवळणी पडलेल्या जीवनशैलीत 'डाऊन टू अर्थ' राहायला शिकवू शकतो. जे आहे, जे मिळालंय त्याबद्दल देवाचे आभार मानायला शिकवू शकतो, ऋणी राहायला शिकवू शकतो.

एवढे तरी आपण नक्की करू शकतो, नाही का?

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

हा लेख आमच्या सोसायटीच्या वार्षिक नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. या अंकाचे प्रकाशन परांजपे बिल्डर्स चे श्री. शशांक परांजपे आणि निर्माता दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांच्या हस्ते झाले.
IMG_6851.JPG

मनोज ने केलेले अंकाचे मुखपृष्ठ.
rasicrang mukhaprushtha.jpeg

गुलमोहर: 

लेख पटला.
याच विषयावरचा एक लेख लोकसत्ताच्या पुरवणीत वाचल्याचं आठवतंय. पेपर टाकायला येणार्‍या मुलाला लेखिकेने आपल्या मुलाचा जुना रेनकोट दिल्यावरही हा मुलगा भिजतच यायचा; कारण तो रेनकोट त्या मुलाने आपल्या धाकट्या भावंडांना दिला होता. यावरून आपल्या मुले सहज मिळणार्‍या गोष्टींची कदर करायला शिकतील तर....असा प्रश्न लेखिकेला पडला होता.

मंजिरी,
माफ करा. माझा मुद्दा आपल्याला पटला नाही का ?
अक्षरओळख हि किमान गोष्ट आहे. अगदी फावल्या वेळात, बिनखर्चात होणारी.
आपल्या मुलांवर उत्तम संस्कार करताना, नुसती जाणीवच नव्हे तर उपेक्षितांसाठी
काहितरी करायची सवय पण लावणे गरजेचे आहे असे मला वाटते. आणि त्यासाठी
स्वतः उदाहरण घालून देणे, चांगले असते. असे नाही का आपल्याला वाटत ?
वरती, वरदा ने ते उत्तम रित्या सांगितले आहे.

त्यासाठी स्वतः उदाहरण घालून देणे, चांगले असते. असे नाही का आपल्याला वाटत ?>>>>>>>>>>>>

दिनेशदा, आपला मुद्दा पटतोय मला पण ही अक्षरओळख अगदी थोड्या कालावधीसाठी होऊ शकते, एकदा का त्या मजुरांचा मुक्काम हालला की परत पहिले पाढे पंचावन्न.. परत ती मुले तशाच परिस्थितीत जगणार, आधी करून दिलेली अक्षरओळख ही विसरून जाणार... काहीतरी कायमस्वरूपी उपाय.. अक्षर्मन नी सुचवल्याप्रमाणे... व्हायला हवा.
आगाऊ च्या पोस्टीप्रमाणे, घरातल्या कामवाल्यांशी वागणूकीतूनही आपण आपल्या मुलांवर संस्कार करू शकतो. वरदाचं उदाहरणही अगदी समर्पक आहे Happy
Happy

मन्जिरि , मस्त आवडला लेख .. तू स्वतः केलेलं निरीक्षण आणी ते श ब्दात खुप मस्त लिहिल आहेस.
शेवटचा परिच्छेद - आपण काय करू शकतो हे प्रत्येकाने ठरवायचे आहे हे खुप आवड्ल मला.

मन्जिरि , मस्त आवडला लेख .. तू स्वतः केलेलं निरीक्षण आणी ते श ब्दात खुप मस्त लिहिल आहेस.
शेवटचा परिच्छेद - आपण काय करू शकतो हे प्रत्येकाने ठरवायचे आहे हे खुप आवड्ल मला.

आपल्याकडे समाजसेवी संस्था काम करत आहेत त्याबद्दल प्रश्नच नाही. पण त्या
सगळ्या मूलांपर्यंत नाही पोहचू शकत. म्हणून आपल्यापुरती सुरवात करायची.
कोणी सांगावे, कदाचित त्या मूलांत आवड निर्माण होईलही. समोर येईल ते
वाचत राहिलही. निदान पुढच्या आयुष्यात काहीतरी वेगळे करायचा प्रयत्न
तरी करेल.
ते मजूर कष्ट करतात म्हणून आपल्याला घर मिळतं. त्यांना मजूरी मिळतेच, पण
आपणही काहीतरी देणं लागतो, असं वाटतं मला.
आणि ती मूलेदेखील आपल्याला बरंच काही शिकवून जातात. स्वानुभव आहे हा.

Pages