रंगकर्मींचे 'पसायदान'

Submitted by नीधप on 27 March, 2012 - 03:20

आज म्हणजे २७ मार्च २०१२ हा ५० वा जागतिक रंगभूमी दिन. १९६१ साली युनेस्को च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट ने जागतिक रंगभूमी दिनाची रूजवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ साली साजरा झाला. जगभर या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम व उपक्रम होत असतात.
युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट तर्फे नाट्यजगतातील महत्वाच्या कुणी दिलेला संदेश हा एक दरवर्षीच्या कार्यक्रमांपैकी महत्वाचा भाग.
पहिल्या वर्षी म्हणजे १९६२ साली हा संदेश ज्याँ कॉक्चू यांनी दिला होता.
यावर्षीचा संदेश अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक जॉन माल्कोविच यांनी दिलेला आहे. हा संदेश म्हणजे रंगकर्मींसाठीचे 'पसायदान' असल्यासारखाच आहे.
या पसायदानाचा मी केलेला अनुवाद इथे देत आहे.

" युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने मला ५० व्या जागतिक रंगभूमीदिनानिमित्त संदेश द्यायला सांगून माझा सन्मानच केला आहे. माझे सह-रंगकर्मी, मित्र आणि आप्तपरिवारासाठी मी माझे दोन शब्द मांडतो.

तुमचे काम (नाट्यकर्म!) खिळवून ठेवणारे आणि सृजनात्मक असो. ते विचारांना खाद्य देणारे, बुद्धीला चालना देणारे, हृदयाला भिडणारे आणि एकमेव असे असो. तुमच्या कामाचा उपयोग मानवता समजून घेण्यासाठी होवो व त्यामधे सहृदयता, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि दैवी सौंदर्याचा वास असो. तुम्हाला ज्यांचा सामना करावा लागतो असे सर्व अडथळे, सर्व बंधने, गरिबी आणि सगळ्या मूल्यांना तिलांजली देण्याची, नाश करण्याची वृत्ती या गोष्टींना तुम्ही पार करून जावे. तुम्हाला तुमचे आयुष्यभराचे नाट्यकर्म साकारण्यासाठी कौशल्य, मानवाच्या हृदयाच्या धडधडीच्या अनवट हरकती दाखवण्यासाठी लागणारी अचूकता, कारूण्य, जगाप्रती उत्सुकता यांचे वरदान मिळो. तुम्हापैकी जे सर्वोत्तम आहेत - सर्वोत्तम असणारेच केवळ आणि तेही क्वचित काही क्षणांपुरतेच - ते "जगण्याचे संचित काय?" या प्रश्नाला हात घालण्यात यशस्वी होवोत.
देव भले करो!"

- जॉन माल्कोविच

मूळ संदेश इथे वाचता येईल

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संदेश इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद.

भारतामधे या दिनानिमित्त काय कार्यक्रम चालू आहेत हे सांगशील का? कारण मीडीयामधे याबद्दल काहीच वाचले नाही.

आजच्या दिवसाभरात एखादे तरी नाटक वाचेन Happy

भारतात क्वचित काही ठिकाणी खास रंगभूमी दिनाला अनुसरून कार्यक्रम असतात.
पुण्यात आज प्रा. प्रवीण भोळे दिग्दर्शित 'बांधलेल्यांची मनोगते' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे. ललित कला केंद्राच्या आंगणमंचावर.
शक्यतो दर वर्षी प्रवीण आपल्या नवीन नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग या दिवशी करतो.

नाटकवाल्यांसाठी सगळेच दिवस रंगभूमी दिन असतात त्यामुळे नवीन नाटक करणे यापेक्षा वेगळे काय साजरे करणार Happy

पण जे नाटकवाले नाहीत त्यांच्यासाठी 'नाटक किस चिडीया का नाम है!' हे कळायला तरी काहीतरी करायला हवे. म्हणून आज या धाग्यापासून सुरूवात. Happy

वा! वेलसेड. कसले आहे ते इंग्रजी. किती कमी शब्दात केवढे पसायदान. अमेझिंग.
अनुवादासाठीही धन्यवाद नीरजा.

युनेस्कोअच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने मला ५० व्या जागतिक रंगभूमीदिनानिमित्त संदेश द्यायला सांगून माझा सन्मानच केला आहे. >>>>>>>>> अभिनंदन!
पसायदान सुरेख.

पण जे नाटकवाले नाहीत त्यांच्यासाठी 'नाटक किस चिडीया का नाम है!' हे कळायला तरी काहीतरी करायला हवे. म्हणून आज या धाग्यापासून सुरूवात. >>> उत्तम. Happy

मला वाटतं मराठी नाटकांची स्थिती जरातरी बरी म्हणावी इतर भाषिक नाटकापेक्षा. (अपवाद अर्थात बंगालीचा) की तसं नाहीये? त्याबद्दल जरा माहिती दे. तसंच रंगभूमीवर घडणार्‍या विविध experiments (प्रयोग) याबद्दल पण लिहत जा ना.

अभिनंदन! <<<
कोणाचे?

ते जॉन माल्कोविच यांच्या संदेशाचे भाषांतर आहे. तेव्हा अभिनंदन जॉन माल्कोविच यांचे करा. Happy

नाटकांची स्थिती चर्चेचा विषय नको.
मी आपलं मला जेवढं माहितीये तेवढं लिहित जाईन जमेल तसं. वेगवेगळे प्रयोग, रंगभूमीचा इतिहास आणि तत्सम इतर विषयांवर.
शक्यतो किस्सेवजा सुरस आणि चमत्कारीक माहिती वगळत जाईन. Happy
तुम्ही प्रश्न विचारायलाही हरकत नाही.

या धाग्याच्या अनुषंगाने रोज किंवा आठवड्यातून एकदा किंवा वेळ होईल तेव्हा (;) ) काही थोडे थोडे माहितीपुंजके (अ‍ॅनेक्डोटस) टाकत रहावे असं म्हणतेय पण कुठून सुरूवात करावी ते समजत नाहीये. म्हणजे असं की नटांचे अजब किस्से अश्याप्रकारचं नसेल तरीही जनसामान्यांना आवडेल, मजा येईल, नवीन काहीतरी मिळेल आणि जडही जाणार नाही असं काय असेल हे कळत नाहीये. तुम्ही सुचवा..

छान अनुवाद केलास. मुळ इंग्रजी संदेश तर छानच.

खरेतर ह्यावर समुद्राएवढे लिहिता येईल. पण नुसती कल्पना येण्यासाठी मला काय वाचायला आवडेल ते लिहिते. (तसेच लिही असे मात्र नाही हं)..
नाटक लिहिणे/करणे केव्हा, का सुरु झाले? लिहिणे मुद्दाम सुरु झाले की चुकुन? सर्वात आधी कशा विषयांवर नाटके लिहिली/केली गेली? कोणत्या देशात कशाप्रकारची नाटके होत? अडचणी काय आल्या? माईक वगैरे प्रकार होते/नव्हते त्यावर कशी मात केली गेली? समाजाचा काही प्रतिकुल प्रतिक्रिया आली का? त्यावर मात करायला किती त्रास झाला? नाटकात/सादर करायच्या पध्धतीत/विषयात बदल कसा होत गेला? बाया केव्हा भाग घ्यायला लागल्या? कोणती गाजली? कोणती चांगली असुन नाही चालली? काळाच्या पुढील कोणती होती? लेखकाचा प्रत्यक्ष नाटक बसवण्यात सहभाग काय होता/आहे? अभिनेते भुमिकेत गुंतले त्याचा काही वैयक्तिक जीवनार परिणाम ज्यामुळे त्यांनी ती भुमिका सोडली? जालावर उपलब्ध असलेल्या काही क्लिप्स देऊन "अप्रतिम अभिनय, दिग्दर्शन, लिखाण, सेट, हालचाली, वेशभुषा म्हणजे काय असते" ती उदाहरणे. (कारण आमच्यासारख्यांना नाटक नुसतेच प्रचंड आवडते, छान आहे हे कळते पण बारकावे नाही कळत, त्याचा शास्त्रीय अभ्यास नसतो म्हणुन).
अशा आहे अगदीच बाळबोध प्रश्न नाहित लिहिले मी. Happy कारण मी तरी ह्या प्रांतात बालवाडीतच आहे.

नी, या प्रश्नांची उत्तरं मलाही नाही माहित. जरा शोधाशोध करते आणि संदर्भ सांगते. एखाद्या आठवड्यात.. पण मुळात आपल्याला मिळणारा पुरावा म्हणजे प्रत्यक्ष नाटकं आणि नाट्यशास्त्रासारखं 'गाईडबुक' जे आदर्श नियम सांगतं. प्रत्यक्ष काय होत असे याचा पुरावा बहुदा नाहीच..
तरीही एकदा बघेन आणि सांगेन Happy

सुनिधी, तुझे बहुतेक प्रश्न म्हणजे माझा ललित कला केंद्रातले रंगभूमीच्या इतिहासाचे एक वर्ष आणि यूजीए मधल्या थिएटर हिस्ट्रीच्या दोन सेमिस्टर्स मिळूनही कमी पडेल एवढा ऐवज आहे. Happy

अच्छा, तुला सजेशन्स हव्यात.. (सॉरी, मग वरचं उत्तर सुनिधीला होतं बहुतेक.)

अगं काही एक सूत्रच असायला पाहिजे असंही नाही. सुरुवात तुला अगदी मराठी नाटकाच्या इतिहासाने करता आली तरी छान होईल. विष्णुदास भावे या नावापलिकडे आम्हा इतरांना फारसं माहित नसतं. आणि त्यानंतर ती परंपरा कशी वाढली, इ.

किंवा नेपथ्य, रंगभूषा, नाटकाचा फॉर्म, नाट्यविषय अशा अनेक पैलूंमधे कसे कसे बदल होत गेले. असं काहीतरी. मला शप्पत या विषयाची काही माहीती नाही. मी काय कप्पाळ सूचना देतेय तुला? Uhoh

नाट्यशास्त्रासारखं 'गाईडबुक' जे आदर्श नियम सांगतं. प्रत्यक्ष काय होत असे याचा पुरावा बहुदा नाहीच..<<<
नाट्यशास्त्र हे आदर्श नियमच केवळ सांगत नाही. प्रत्यक्ष काय होतं याबद्दलही खूप काही सांगतं.

हे जीवन म्हणजे एक रंगभूमी आहे आणि आपण सगळी त्या रंगभूमीवरची पात्रे आहोत...

आमच्या हापिसात ( अमेरिका) एक गोरा भारतीय accent ची खिल्ली उडवत होता. शेवटी म्हणाला हे नाटक फक्त मजेपुरतेच बरं! मी त्याला अस्खलित अमेरिकन accent मधे सांगितले,इतकी वर्षे मी तुझ्याशी नाटक खेळत आहे त्याचे काय? Happy

अगं आमच्या दृष्टीने ती बर्‍यापैकी normative texts आहेत. म्हणजे त्यात लिहिलेलं त्यांच्या आसपासच्या परिस्थितीवर आधारित असतं पण एकीकडे ते 'कसं असलं पाहिजे' अशा दृष्टीकोनातून मांडलेलं असतं. मग त्यात इतर तत्कालीन व्हेरिएशन्स/ प्रादेशिक फरक असतील किंवा या परंपरेच्या बाहेर असलेले काही गट असतील तर ते येत नाहीत. अशा टेक्स्टला जर जोडीने ऐतिहासिक, पुरातत्वीय पुरावा मिळाला तर मग तत्कालीन परिस्थितीचे आणखी काही पैलू व्यवस्थित उलगडू शकतात

नाट्यशास्त्रातल्या 'चारी' आणि 'मुद्रा' तर दिसतात की कितीतरी शिल्पांमधे. ते प्रॅक्टिसमधे असल्याशिवाय झालं का?
आम्हीतरी संस्कृत रंगभूमी शिकलो त्यात नाट्यशास्त्र, प्राचीन काळातली वेगवेगळ्या कालखंडातली नाटकांची टेक्स्ट्स या आधारे शिकलो.
अर्थातच लोकधर्मी आणि नाट्यधर्मी हे प्रकरण होतंच.

तेच सांगतेय गं. एखादी परंपरा पक्की अस्तित्वात असल्याशिवाय त्याच्या नियमांचं संहितीकरण (कोडिफिकेशन) होत नाही. पण त्या संहितेत आणि प्रत्यक्ष परिस्थितीत थोडाफार फरक असतोच किंवा काही गोष्टी वगळल्या गेलेल्या असतात. ग्रांथिक पुरावे, शिल्पं, पुरातत्व हे फक्त एकेक पैलू समोर आणतात तत्कालीन परिस्थितीचे. जितक्या जास्त पैलूतून एखाद्या गोष्टीचा पुरावा गोळा करता येईल तितका तो इतिहास पक्का होतो. म्हणजे उद्या भरताने स्पेसिफाय केलेल्या प्रकारचे रंगमंच सापडले किंवा एखाद्या प्रदेशात ते वेगळे सापडले तर आपल्याला ग्रांथिक पुराव्याच्या क्रेडिबिलिटीत भर टाकता येईल किंवा त्याची मर्यादा लक्षात येईल (दोन्ही एकसाथ ही होऊ शकते). Happy

ह्म्म शक्य आहे. पण रंगभूमीचा प्राचीन इतिहास हा एक भाग झाला. तपशीलांसाठी किंवा एक्झॅक्ट हेच्च ते असं कळण्यासाठी असलेले पुरावे कमी पडतात पण ढोबळमानाने स्वरूप समजण्यासाठी पुरेसे असते.
असो..

<<<<तुमचे काम (नाट्यकर्म!) खिळवून ठेवणारे आणि सृजनात्मक असो. ते विचारांना खाद्य देणारे, बुद्धीला चालना देणारे, हृदयाला भिडणारे आणि एकमेव असे असो. तुमच्या कामाचा उपयोग मानवता समजून घेण्यासाठी होवो व त्यामधे सहृदयता, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि दैवी सौंदर्याचा वास असो. >>>>

खूप छान मूळ मेसेज आणि तितकाच छान अनुवाद नीधप

धन्यवाद

Pages