धावत पळतच मी विमानाच्या गेट पाशी आले. तिथली सुन्दरी बोर्डिंग सुरु करणाच्या तयारीतच होती. हुश्श! ह्या सेक्युरीटी लाइन्स चा गोंधळ काही संपत नाही. असो. आता बोर्डींग सुरु होईलच तो पर्यंत पाणी अन काही तरी वाचायला घावं म्हणून मी तिथल्या दुकानाकडे वळले. दुकानात कामानिमित्त प्रवास करणारेच जास्त होते. सोमवार सकाळच्या फ्लाइटवर टुरिस्ट कोणी नसतातच फारसे. एक दोन मासिकं चाळून पाहिली, काही वाचण्याजोगी वाटेनात. जाऊ दे म्हणून पेपरबॅक पुस्तकं बघायला गेले. तिथे सगळी समर रीडिंग अन चिक लिट म्हणतात तसली पुस्तकंच भरली होती. त्यातलंच एक जरा बर्यापैकी रिव्ह्यु असलेलं पुस्तक उचलून मी चेक आउट काउंटरपाशी आले तर माझ्या मागोमाग अजून एक बाई , बाई कसली मुलगीच वाटत होती, तेच पुस्तक उचलून आली. मी तिच्याकडे बघून अनोळखी लोकांकरता असलेलं सरावाचं हसू धारण केलं चेहर्यावर. ती मात्र माझ्याकडे पाहून ओळखीची असल्यागत हसली.
माझ्या चेहर्यावरचा गोंधळ तिला कळला असावा, कारण पैसे भरून बाहेर येता येता ती परत हसली .
काळेभोर सरळ केस कानालगत कापलेले, कानात छोटेसेच सोनेरी कानातले, केसांवर चढवलेला चष्मा, शिडशिडित, जरा उंचच अंगकाठी, धारदार नाक अन काळेभोर टपोरे डोळे. मेकप नाहीच किंवा असला तरी केलाय असं दिसत नाही. सुंदर गुलाबी रंगाचा शर्ट अन काळी पँट. एका हातात पर्स अन जॅकेट. काळे सँडल्स अन त्यातून डोकावणारं फ्रेंच पेडिक्युअर. एवढं सगळं टिपलं तरी ओळ्ख पटत नाही अजून. कुठल्यातरी कॉन्फरंस मधे भेटली असेल का ही? कामानिमित्तची ओळख असणार आपली हिच्याशी.
'नै न पैचाना? मै तुमको दूरसेच पैचानी एकदम.' महमूद स्टाईल हिंदी, अन तो सानुनासिक, जरासा किरकिराच वाटणारा आवाज, हसल्यावर दोन्ही गालांना पडणार्या खळ्या!
'शाहीन! कितने सालोंके बाद मिल रहें हैं हम. अभी भी वैसेही हो.'
'तुम भी वैसेच हो अब्बीतक वंदू. खाली जरासाच वेट बढ गया है.'
'जरासा वेट? बाई गं या देशात येऊन जितकी वर्षं झाली तितके पाउंड तरी वाढलंय वजन माझं.'
'रैने दे रे, वेट की बात मत कर. कैसी है, क्या करती है, बच्चे कैसे हैं सब बता मेरेको. चल साथ में बैठते हैं.'
बर्यापैकी भरलेली फ्लाइट आहे. आत गेल्यावर कोणाला तरी विनंती करून जागा बदलून घेऊ अशा विचारात होते मी. तेव्हढ्यात ती काउंटर पाशी गेली अन तिथल्या बाईशी काहीतरी कुजबुज करुन परत आली.
मला म्हणाली ' बोर्डिंग पास देना जरा'.
परत बोर्डींग पास घेऊन काउंटरवालीशी कुजबुजुन आली अन एक नवाच बोर्डींग पास माझ्या हातात दिला. रो नंबर पाहून माझे डोळे आणखीनच विस्फारले. तेव्हढ्यात तिने आपलं व्हिजिटिंग कार्ड पण माझ्या हातात दिलं ' शाहीन हसन, व्ही पी इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस' अन एअर लाइन चं नाव.
माझा हात हातात घेउन म्हणाली ' टायटल फक्त भारदस्त आहे गं . अजून सी आय ओ लेव्हल पर्यंत जायला बराच वेळ आहे.' अन परत गालाला खळ्या पाडून हसली.
मी खल्लास. अशी सहज जाऊन त्या बाईशी कुजबुज करते काय अन माझा जनताक्लास बोर्डींग पास घेउन फर्स्ट क्लास चा दुसरा आणून देते काय! अन पुन्हा ' त्यात काय मोठंसं' असा आविर्भाव.
पण आम्ही शिकत असताना पण अशीच होती ना ती. अभ्यासात अतिशय हुषार, पण वर्गात कधी फारसं बोलणार नाही, बडबड करणार नाही. प्रोफेसरांनी काही विचारलं तर जेवढ्यास तेवढं उत्तर. पण सगळ्या विषयात स्ट्रेट ए! ती शिकवायची त्या लॅब मधे सुद्धा तसंच. उगाच नाही सलग तीन सेमेस्टर तिला बेस्ट टी ए चं बक्षिस मिळालं होतं. कधी अभ्यास करत असेल ते कळायचं पण नाही. कॅम्पस वरच रहायचो आम्ही सर्व तेंव्हा. अन जेंव्हा पहावं तेंव्हा ही त्या वेंकी च्या मागे असायची. तो लायब्ररीत बसून अभ्यास करत असे तेंव्हा ही त्याच्या वाटचं ग्रेडींग करत बसायची नाहीतर इतर लोकांना मदत कर, कोणाचे असाइनमेंट चेक करून दे, कोणाला प्रिंटर कसा वापरायचा ते दाखव असल्या उचापत्या चालू. वेंकी मात्र भयंकर अभ्यासू मुलगा. आपला अभ्यास, असाइनमेंट, क्विझ ची तयारी यातच बुडलेला असायचा. शाहीन ने त्याच्यात काय पाहिलं असेल? तो काही तिला फारसा वेळ देताना दिसायचा नाही. का ती त्याच्या मागे मागे असते ? कॅम्पस मधल्या अनेकांना या प्रश्नाने सतावलेलं होतं.
माझं शिकून संपल्यावर मला रॅलेमधे नोकरी मिळाली होती. त्यानंतर सुरुवातीची काही वर्षं चॅपेल हिलमधे वरचे वर जाणं होत असे. पण हळू हळू बरोबर शिकणारे सगळेच नोकरीला लागले, वेगवेगळ्या ठिकाणी पांगले . आपापल्या संसारात अडकले. त्यामुळे भेटी गाठी हळू हळू कमीच झाल्या. फोन किंवा इमेलवरच जास्त भेटणे होई. त्यात शाहीनची इतर कोणाशी फारशी मैत्री नव्हती. एक वेंकी सोडल्यास तिच्या जगात कोणी दुसरं नव्हतंच जणू. त्यामुळे एकदा कँपस सोडल्यानंतर तिच्याबद्दल फारसं काही कळलं नव्हतं.
इतक्या वर्षांनी भेटलो तर एकमेकींशी बरंच बोलायचं होतं. हा कसा आहे, ती काय करते, त्या अमक्याचं ऐकलंस ना काय झालं ते असलंच काही बाही अन शिवाय आपापल्या संसाराचे अपडेट्स.
विमानात येऊन स्थानापन्न झाल्यावर शाहीन ने लगेच प्रश्नांची सरबत्ती सुरू केलीच.
मी म्हटलं
'एकामागे एक किती प्रश्न विचारशील? आधी माझं ऐकून तर घे. माझी म्हणजे क्लासिक x + 1 केस आहे गं. शिकून संपल्यावर इथला अनुभव हवा म्हणून नोकरी. मग 'शिक्षण झालं , चांगली नोकरी आहे, आता काय हरकत आहे?' म्हणत घरच्यांनी स्थळं पाह्यला सुरुवात केली. त्यांनी शोधलेल्या मुलाशी लग्न केलं. तो ही x+1 मधेच अडकलाय माझ्यासारखा. आता दोन मुलं आहेत, एक लॅब्रॅडॉर अन दोन टर्टल्स आहेत. बाकी उपनगरात चार बेडरूम अन तीन गराज असलेलं घर, दोन गाड्या, मोठाला लॉन मोअर ट्रॅक्टर सगळं अगदी टिपीकल आहे. दोघांच्या नोकर्या, मुलांच्या शाळा, सॉकर, यातून वेळ काढून भारताच्या वार्या. अगदी मॉडेल फॅमिली आहोत आम्ही. तू सांग तुझं काय चाललंय, या एअर लाईन मधे कशी नोकरी धरलीस तू? अन व्ही पी ऑफ इंफॉर्मेशन सीस्टीम्स म्हणजे नक्की काय करतेस?'
एक मोठा निश्वास सोडला शाहीनने अन डोळे भरून आले तिचे.
'अगं सगळं टिपिकल म्हणून का त्रास होतोय तुला? ह्यातलं काहीही जर वेळेवर, मनासारखं नाही झालं तर कळलं असतं तुला या सगळ्याचं महत्व! तुला माझी अन वेंकीची स्टोरी माहितच असेल ना.?'
'अं! म्हणजे तेंव्हा तुम्ही एकत्र असायचात, तू त्याच्याशिवाय इतर कोणाशी बोलायची सुद्धा नाहीस वगैरे तर सगळ्या युनिव्हर्सिटीला माहित होतं. मग मी जेंव्हा ग्रॅजुएट होऊन कॅम्पस सोडून गेले त्यानंतर फारसं काही कळलं नाही कोणाबद्दल. तेंव्हा आजच्या सारखे इमेल वगैरे पण नव्हते ना.'
'तेंव्हापासूनच आमच्या दोघांच्या घरनं विरोध होणार हे माहीतच होतं गं आम्हाला. पण शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय कोणाला काही सांगायचं नाही असं ठरवलं होतं आम्ही. पण अर्थात आम्ही न सांगताही वेंकीच्या घरी कळलंच होतं. जोपर्यंत तो काही सांगत नव्हता तोपर्यंत त्याचे आई वडील ही काही म्हणाले नाहीत. माझ्या घरचे मात्र पूर्ण अंधारात होते. पण माझा थीसिस लिहून संपत आला होता तेंव्हा माझ्या बहिणीचं लग्न ठरलं. तिच्या होणार्या नवर्याचा मोठा भाऊ वेंकीला सिनियर होता मद्रासला. त्याला कुठून तरी कळलं. अन त्याने फार तमाशा केला. माझ्या घरची मंडळी काही फार कट्टर नाहीत पण मुलाकडच्यांनी त्यांना बरंच काही सुनावलं होतं.लग्न मोडल्यातच जमा होतं जवळपास. '
'मग ? तुला वाळीत टाकायला लागलं की काय त्यांना?'
'अशा प्रसंगातच माणसाची खरी ओळ्ख पटते म्हणतात ना? तसंच झालं बघ. दीदी सरळ मला हे लग्न कबूल नाही म्हणाली. माझ्या बहिणीचं कोणावर प्रेम असेल, भलेही तो वेगळ्या धर्माचा असेल, त्याचा माझ्या लग्नाशी काय संबंध?'
'खरंच? तुमच्यातच काय, भारतात कुठल्याही जातीत , धर्मात मुलीने असं वागणं म्हणजे काय हिम्मत पाहिजे. धन्य आहे बाई तिची.'
' अगं पण पुढंच ऐक ना! असिफ ने सांगितलं लग्न करेन तर याच मुलीशी , नाहीतर आजन्म असाच राहीन. त्याच्या घरच्यांना वाटलं दोन चार महिन्यात येईल ठिकाणावर अन दुसर्या कुठल्या मुलीशी मुकाट्याने लग्न करेल. त्यामुळे दोन्हीकडून लग्न फिस्कटलं.'
'मग घरच्यांनी तुला चांगलंच फैलावर घेतलं असेल ना. खानदानकी इज्जत वगैरे वगैरे.'
' हो, मग. ते तर झालंच. पण दीदीने चिकार मध्यस्थी केली. जवळ जवळ रोज फोन करायचे घरचे मला. मी इकडे डिझर्टेशन च्या शेवटच्या टप्प्यात अन घरून हे. अम्मी रोज फोनवर रडायची 'तुम्ही दोघी चांगल्या घरात पडलात की मी सुखाने डोळे मिटेन. पण तुम्ही खानदानाच्या नावाला बट्टा लावलात तर आमची जागा जहन्नम मधेच राहील.' इत्यादी . फक्त दीदीचं डोकं काय ते ठिकाणावर होतं. ती वेंकीशी सुद्धा बोलली होती .'
' वेंकी शी? ते का? त्याला समजावून सांगायला की 'ये शादी हरगिज नहिं हो सकती' वगैरे?'
'नाही गं, उलट तिने वेंकीला माझी काळजी घ्यायला सांगितलं होतं तेंव्हा. घरच्यांच्या रोजच्या रडारडीने मी कंटाळून गेले होते अगदी. इथे एक वेंकी सोडला तर अगदी जवळचं असंही कोणी नव्हतं. दीदीला माझी काळजी वाटायची. कसं असतं बघ बहिणींचं नातं! माझ्यामुळे तिचं लग्न मोडलं होतं. जवळचे,लांबचे नातेवाईक कुजबुज करत होते. अन ती माझी चिंता करत होती. वेंकीला सांगत होती ' वहां तुमही उसकी फॅमिली हो. तुमकोही उसे संभालना है.' मला वाटतं तिच्या सांगण्याचाच वेंकीवर प्रभाव पडला असावा.'
'म्हणजे? त्याला पण तुझ्या घरच्यांचं पटलं की काय?'
' छे, छे, तसं नाही गं. त्याला ह्या सगळ्या गुंत्याचा सिरीयसनेस कळला नव्हता. घरुन विरोध झाला तर आपण काय करू शकू वगैरे त्याने कधी विचारच केला नव्हता. त्याला बहुधा असं वाटलं असणार की घरचे जरा आरडा ओरडा करतील अन एखाद दोन महिन्यात कंटाळून परवानगी देतील. दीदीचं लग्न फिसकटलं तेंव्हा त्याला जाणवलं मामला किती कठीण आहे ते.'
'मग दीदीच्या लग्नाचं काय झालं शेवटी ?'
'एकदा असिफ दीदीच्या हॉस्पिटलमधे जाऊन तिला भेटला. त्याच्या कंपनीच्या तर्फे तो जर्मनीला चालला होता वर्षभरासाठी. त्याने दीदीला हॉस्पिटलमधे प्रपोझ केलं. तो म्हणाला पाहिजे तर आत्ता लगेच रजिस्टर लग्न करू अन दोघे एकत्रच जर्मनीला जाउ . नाहीतर तू माझी एक वर्ष वाट पहा .तिथून आल्यावर मग लग्न करू. पण मी तुझ्याशीच लग्न करेन नाहीतर एकटा राहीन.'
'अगदी फिल्मी स्टाइल वाटतंय की.'
'अगं एकदम फिल्मी. दीदी सुद्धा जर्मनीला जाऊन आपण काय करू वगैरे काही विचार न करता त्याला हो म्हणून बसली. तिच्या हॉस्पिटलमधल्यांनी तिला बरंच समजावलं की तो जर्मनीहून आल्यावर लग्न करा वगैरे . पण ती अजिबात ऐकायला तयार नव्हती. अम्मी अन पापांनी बोलणं टाकलं होतं तिच्याशी. रजिस्टर लग्न करून आठ दहा दिवस हॉटेलमधे राहून मग जर्मनीला गेले दोघे. एअरपोर्टवर सुद्धा फक्त मित्रमंडळी आली होती त्यांना सोडायला. तिथे गेल्यावर मात्र दीदीला फार त्रास झाला. असिफ कामात बुडालेला असायचा. ह्यांचं छोटंसं अपार्टमेंट .फ्रँकफर्ट मधे भारतीय मंडळी पण फारशी नव्हती तेंव्हा. असिफचे कलीग्स होते दोन चार. पण ते सगळे सडे. त्यामुळे ती फार एकटी पडली. कधी घरकामाची सवय नाही. परका देश, भाषा कळत नव्हती अन असिफशी सुद्धा फारशी ओळख नव्हती. दोघांची भांडणं व्हायला लागली चक्क.'
मला माझे लग्न झाल्यानंतरचे दिवस आठवले. रॅले सोडून अटलांटाला जावं लागलं म्हणून मी किती रुसले होते. अजिबात म्हणजे अजिबात आवडत नसे अटलांटा मला. शिकत असताना चार चार मुली एकत्र रहात होतो तिथे काही त्रास झाला नाही पण नवर्याशी जुळवून घेताना किती कटकट झाली होती. साध्या साध्या गोष्टींवरनं खडाजंगी होत असे आमची. ड्रायव्हिंग वरून तर सर्वात जास्त. मला पार्किंग जमत नाही अन त्याला ड्रायव्हिंग ह्यावर एकमत होईपर्यंत कितीदा आम्ही हरवलो , कितीदा स्पीडिंग तिकीटं मिळाली अन कितीदा टायर्स कर्ब ला घासले गेले देव जाणे. आता एकत्र कुठेही जायचं असलं की रथाचं चाक माझ्याहाती अन कुठे फारच छोटा पार्किंग स्पॉट असेल, फुटपाथला समांतर गाडी लावायची असेल तर ते फक्त नवर्याचं काम असतं.
' अगं सगळ्यांचं थोड्या फार फरकाने हेच होत असतं गं.' मी तिला अनुभवाने आलेलं शहाणपण सांगत होते.
'हो गं. हे आता त्यांना पण माहित आहे. पण तेंव्हा जरा समजाऊन सांगणारे पण कोणी नव्हतं. घरच्यांनी फोनवर तरी सांगितलं असतं समजावलं असतं तर तोही मार्ग बंद. दिवसेंदिवस एकमेकांशी बोलत नसत. त्यात एकदा असिफ आजारी पडला. बाहेर काहीतरी खाल्लं त्याची ऍलर्जी झाली. घरी आल्या आल्या उलट्या सुरू झाल्या. सगळ्या अंगावर रॅश. शेजारच्यांना सांगून त्याला हॉस्पिटलमधे नेलं ताईने. मग तिथे पोचल्यावर बरेच जण इंगजी समजणारे भेटले. ताईने स्वतःच डायग्नोसिस केलं होतं. ट्रीटमेंट काय करावी वगैरे सगळं जवळ जवळ तिनेच सांगितलं. दोन दिवस तिथे राहून असिफ घरी आला ते मनाशी काही ठरवूनच. अन त्याने एकदा काही ठरवलं ना की मग ते प्रत्यक्षात उतरवायला उशीर नाही लावत तो. जरा बरा झाल्यावर त्याने दीदीला माझ्याकडे पाठवलं. भारतीय पासपोर्टवर जर्मनीतून अमेरिकेचा व्हिसा मिळवणं म्हणजे किती कटकटी होत्या. पण ते सर्व त्याने केलं. मग दीदी इथे आल्यावर तिने इथल्या रेसिडेंसी बद्दलची सगळी माहिती मिळवली. परिक्षेची माहिती काढली. त्याकरता लागणारी पुस्तकं घेतली. लाँग स्टोरी शॉर्ट करायची झाली तर जर्मनीमधली असाइनमेंट संपल्यावर भारतात गेलेच नाहीत दोघे. असिफला व्हर्जिनिया मधे असाइनमेंट मिळाली. दीदीने जॉन्स हॉप्किंस मधे रेसिडेंसी केली अन'
'आता दोघंही आमच्या सारखी x +1 मधे अडकली असतील. हो ना? मी ऐकलं होतं तुझी बहीण चॅपेल हिल ला तुझ्याकडे आली होती ते. मला वाटलं होतं की ती पण तिथेच शिकायला आली असेल म्हणून.'
'दीदी अन असिफ अमेरिकेत आले ते इथलेच झाले गं एकदम. त्यांनी कधी परत जायचा विचारही केला नाही. तेंव्हा वेंकीने त्याचा थीसिस डिफेंड केला अन त्याला कॅलिफोर्नियामधनं दोन तीन ऑफर्स आल्या नोकरीच्या. नव्या नोकरीत लगेच सुट्या वगैरे मिळणार नाहीत म्हणुन तिथे जायच्या आधी तो भारतात गेला. '
' त्याच्या घरचे तर एकदम ट्रॅडिशनल असतील नं. तोसुद्धा कॅम्पसवर असताना किती पूजा वगैरे करायचा . एकदा सगळ्या मुला मुलींनी मिळून गणपतीची पूजा केली होती. त्यात सुद्धा वेंकीनेच किती तरी पुढाकार घेतला होता. आठवतंय मला चांगलंच.'
' अगं एकदम कडक अय्यंगार . नॉनव्हेज तर जाऊचदे कांदा लसूण पण खात नसत. त्याचे आई वडील कधी बाहेर हॉटेलमधे सुद्धा जेवत नसत. तिथे सोवळं पाळत नाहीत म्हणून. कधी घराबाहेर काही खायची वेळच आली तर फळं खात फक्त. रोज सकाळ संध्याकाळ पूजा चालायची घरात. शिवाय आज हा वार, उद्या ती तिथी, परवा अमक्या देवळात पूजा असं सारखं चालत होतं. वेंकीला आय आय टी एंट्रंस मधे चांगला रँक मिळाला होता. त्याला कुठल्याही आय आय टीला प्रवेश मिळाला असता. पण त्याच्या आजोबांच्या मनात नव्हतं त्याने दुसर्या कुठल्या गावात जाणं. मग त्यांच्या मनाविरुद्ध काही करणं त्याच्या वडलांच्या स्वप्नात सुद्धा आलं नसेल.'
'पण वेंकी इथे होता तेंव्हा त्याच्या घरच्यांना काहीच कल्पना नव्हती का तुमच्या बद्दल?' मद्रासची , मद्रास आय आय टीची सुद्धा बरीच मुलं होती आमच्या इथे. वेंकी अन शाहीनची जोडी सगळ्या युनिव्हर्सिटीमधे प्रसिद्ध होती. असल्या गोष्टी पसरायला वेळ लागत नाही.
' त्यांना माहित होतंच. पण त्याचे आजोबा फार धोरणी. इतक्या दुरून आपण नातवावर फारसा कंट्रोल ठेवू शकणार नाही याची त्यांना जाणीव होती. शिवाय शिकून संपल्याशिवाय तो लग्नाच्या भानगडीत पडणार नाही असंही वाटत होतं. कदाचित एखाद्या वर्षात आम्ही आपण होऊन एकमेकांना सोडून देउ असंही वाटलं असेल. घरचे रीत रिवाज, खाण्यापिण्याच्या सवयी हे सगळं जर जुळत नसेल तर लग्न टिकणार नाही अशी त्यांची ठाम समजून होती. होती काय अजूनही आहेच.'
'अजून, पण आता तर तुमच्या लग्नाला .... आय मीन केलंत ना लग्न तुम्ही? म्हणजे आय होप यू डिड.' माझा पाय फारच खोलात जायला लागला. काय बोलावं नक्की ते कळेना. त्यांचं लग्न झालं असं काही ऐकलं नव्हतं मी . तिचे डोळे भरून आले तसा माझाही आवाज कातर झाला.
'हं , आय विश टू...' मोठा सुस्कारा टाकून ती म्हणाली अन पर्स मधून रुमाल काढून डोळे पुसले.
आता आपण काय बोलावं, की बोलूच नये काही अशा संभ्रमात मी तिच्या हातावर थोपटल्या सारखं केलं. खरंतर तिच्या डाव्या अनामिकेत एक नाजूकशी हिर्याची अंगठी होतीच. इथल्या एंगेजमेंट रिंग सारखी नव्हती अन वेडिंग बँड सारखी पण नव्हती. माझ्या लक्षातच आलं नव्हतं हे.
'छान आहे गं अंगठी तुझी.' काहीतरी विषय बदलायचा प्रयत्न करत मी म्हटलं.
'हं, वेंकीच्या आईची आहे. त्यांनीच दिली आहे मला. दोन वर्षांपूर्वी गेल्या त्या.'
'हं' . माझ्यापाशी शब्दच नाहीत काही.
'वेंकी जेंव्हा मद्रासला गेला ना, त्याच्या आजोबांनी त्याचं मन वळवायचा चिकार प्रयत्न केला. त्याची सगळी सुट्टी आजोबांशी वाद घालण्यातच गेली. वडिल, काका, आजोबांचे भाऊ सगळे आजोबांच्या बाजूने त्याला तेच तेच सांगत. आई बिचारी काही बोलत नसे. तिला वाटे आपला मुलगा एवढा हुशार, एवढा शिकला वाचलेला. त्याने स्वतः पसंत केलीय मुलगी म्हणजे ती चांगलीच असणार. त्यांचं खाणं पिणं वेगळं असेल पण ती शिकेल हळू हळू वेंकटच्या आवडीचं करायला. पण आईचं कोण ऐकणार. तिला निवांतपणे वेंकीशी बोलायला सुद्धा मिळालं नाही त्या महिन्याभरात. तेंव्हा इमेल सुद्धा नव्हतं कोणाकडे. रोज बाहेरून मला फोन करायचा वेंकी. अन रोज आमचं तेच बोलणं व्हायचं. घरच्यांच्या परवानगी शिवाय, आशिर्वादाशिवाय लग्न करायला तो तयार नव्हता. त्याच्या घरच्यांची , त्याची तयारी असल्याशिवाय मी माझ्या घरच्यांशी काही बोलणार नव्हते. त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे दीदी अमेरिकेला आल्या पासून माझे अम्मी पापा तिच्याशी अन असिफशी बोलायला लागले होते. '
'मग त्याचं तिथेच लग्न लावून द्यायचा घाट नाही का घातला त्याच्या आजोबांनी ?'
' प्रयत्न तर बरेच केले त्यांनी . पण हा अजिबात बधला नाही. एका मुलीचे आई वडील त्यांच्या घरी आले सुद्धा होते. त्याने सरळ सगळ्यांच्या समोर त्यांना, त्या मुलीला सांगितलं 'माझी गर्लफ्रेंड आहे अमेरिकेत. तिचं शिकून संपलं की आम्ही लग्न करणार आहोत. ती भारतीय आहे पण मुसलमान आहे म्हणून यांना पसंत नाही.' मग अशी बातमी पसरल्यावर कोणी स्थळं सांगून येइनात. महिना तसाच निघून गेला. तिथून आल्यावर वेंकी सरळ कॅलिफोर्नियाला गेला. आमच्या जीवावर स्प्रिंट ने बरेच पैसे कमावले त्या काळात. रोज एकमेकांना फोन असायचे आमचे.'
' अजूनही कॅलिफोर्नियात असतो का तो? अन तू अटलांटामधे कधी पासून आहेस?'
' हो तो तिथेच आहे. मी ह्युस्टनमधे होते बरेच दिवस. गेले दोन वर्षं इथे आहे.'
'खर्र्,खर्र, धिस इज युवर कॅप्टन स्पीकिंग. वी विल बी लँडिंग ऍट शिकागो ओ हेर एअरपोर्ट शॉर्टली.'
अरे इतक्यात आलं सुद्धा शिकागो! कसा वेळ गेला बोलण्यात कळलं सुद्धा नाही.
'बरं तू कुठे राहणार आहेस शिकागोमधे? तुझं काम किती वाजता संपेल? मी तुला घ्यायला येईन संध्याकाळी. वेंकीला भेट अन पुढचं सगळं तोच सांगेल.'
वेंकीला भेट? शिकागोमधे? तो कॅलिफोर्नियात असतो ना?
' सगळ्या प्रश्नांची उत्तरं संध्याकाळी.' म्हणत परत गालाला खळ्या पाडत हसली अन आम्ही आपापल्या वाटेने गेलो.
माझ्या कंपनीचं शिकागो मधे पण एक ऑफिस आहे, तिथल्या एका प्रॉजेक्टकरता मी दोन दिवसांसाठी चालले होते शिकागोला. अटलांटाहून दोनच दिवस यायचं म्हणजे दोन्ही दिवसांचा भरगच्च प्रोग्राम असतो. पहिल्या दिवशी संध्याकाळी उशिरापर्यंत कामं चालतात. कामं उरकल्यावर हॉटेलवर जाउन रूम सर्व्हिस मधून काहीतरी जेवण मागवणे, घरी फोन करून मुलांशी बोलणे अन टिव्ही पाहता पाहता झोपेची आराधना करणे एवढंच तर असतं दरवेळेला. पण आज सहा वाजता शाहीन येणार होती. त्यामुळे मी पोचल्या पोचल्या सगळ्यांना सांगून टाकलं ' गॉट टू लीव्ह ऍट सिक्स टुडे. आय ऍम मीटिंग ऍन ओल्ड , लॉन्ग लॉस्ट फ्रेंड.'
मग दिवस सगळा घाई गडबडीचा गेला. बरोबर साडेपाच वाजता शाहीनचा फोन आला ' अर्ध्या तासात पोचतेय मी तुझ्या इथे. लक्षात आहे ना!'
सहा वाजेपर्यंत भराभरा सगळं आवरून मी बाहेर येईपर्यंत शाहीन आलीच.
वीस पंचवीस मिनिटात आम्ही हॅनकॉक टावर्स च्या भागात येऊन पोचलो. एखादा काँडो घेतलाय की काय यांनी भाड्याने असा मी विचार करत होते तेव्हढ्यात तिने एका छोट्या घरासमोर गाडी उभी केली. अगदी चिंचोळ्या प्लॉटवरचं ते घर बरंच जुनं असणार. मला वाटलं एखादं नवं BYOB रेस्टॉरंट असेल कदाचित. इथे जेवायचा बेत असेल.
तेव्हढ्यात वेंकी दार उधडून बाहेर आला. हा मात्र अगदी बदललाय. बाहेर कुठे दिसला असता तर ओळखलं ही नसतं त्याला.
'वंदू, सो गूड टू सी यू आफ्टर सो मेनी इयर्स.' ऍक्सेंट ही बदललाय याचा.
'ईटस वंडरफुल टू सी यू टू - आय मीन द टू ऑफ यू .' माझ्या हातातली बॅग वेंकीने घेतली अन शाहीन चक्क माझा हात धरून घरात गेली मला.
बाहेरून वाटत होतं तसंच अगदी जुनंच घर होतं. सगळी कडे हार्डवूड फ्लोअर्स -ते सुद्धा जुन्या प्रकारचे रुंद पाइन्च्या बोर्डने बनलेलं. जुन्या हँडमेड काचांच्या खिडक्या. हॉलमधे अगदी मोजकंच फर्निचर होतं. मुख्य म्हणजे चक्क टी व्ही नव्हता.
'व्हाय डोंट यू फ्रेशन अप वंदू . आय विल गेट अस समथिंग टू ड्रिंक.व्हॉट वूड यू लाइ़क?'
'अम्म, एनिथिंग यू गाइज रेकमेंड इज फाइन' म्हणत मी शाहीन्च्या मागोमाग वरती गेले. वरती एक गेस्ट रूम , एक लायब्ररी होती. माझं सामान सगळं गेस्ट रूम मधे लावत शाहीन म्हणाली ' वरती रूफ टॉप गार्डन आहे. काळोख पडला की जाऊ वरती.'
मी जरा केस विंचरून, आवरून खाली येईपर्यंत वेन्कीने सगळी ड्रिंक्स अन अपेटायझर ची तयारी करून ठेवली होती.
'मला काही फारसा स्वैपाक येत नाही गं. शिवाय इथे किचन वेंकीच्या ताब्यात असतं. बाकी बाहेर सगळं माझं राज्य.'
'बघू तरी मग वेंकीचं किंगडम.' म्हणत मी आत गेले. अगदी फूड नेटवर्क मधे दाखवतात तसलं किचन - सहा मोठाले बर्नर शिवाय एक ग्रिल . भिंती मधे दोन दोन कंव्हेक्शन ओव्हन, मोठा, रुंद दरवाजेवाला फ्रीझ, ग्रॅनाइट चा ओटा. कोणी स्वैपाक करण्यातल्या हौशी माणसाने बनवलेलं असणार किचन.
'धिस इज माय स्ट्रेस रिलीफ' त्या सगळ्याकडे हात फिरवत वेंकी म्हणाला.
मला वाटलं की हे असं घरात सगळं रिनोव्हेशन करण्याबद्दल म्हणत असेल तो.
'वंदू, अगं स्कूल मधे असताना जर याने असा स्वैपाकात इंटरेस्ट दाखवला असता ना तर त्याचं शिक्षण बोंबललं असतं. सगळा वेळ नुस्ता स्वैपाकात घालवला असता त्याने.'
'स्कूल मधे असताना कोणाला स्वैपाकात इंटरेस्ट असतो बाई ? पोटाची सोय झाली की काम भागतं. पोहे , पिठलं -भात अन पिझ्झा हे बेसिक फूड ग्रूप्स होते माझे . कधी तरी बदल म्हणुन रामेन नूडल्स. सो, डिड यू गेट ऑल धिस डन? हाउ कम यू गॉट इन्टरेस्टेड इन ऑल धिस ?' स्कूल मधे तरी हा कट्टर शाकाहारी होता. सांबार, रस्सम् , कुटू , पोरियल अन भात याच्या पलीकडे जात नसे गाडी याची. शाहीन तर महिनाभर सुद्धा सिरियल केळी अन दूध यावर काढू शकली असती. गॅस पेटवायची सुद्धा कटकट नाही.
'कॅलिफोर्नियात नोकरी लागली तेंव्हा पासून. रॅलेच्या मानाने तिथे सगळं महाग. शिवाय याची नोकरी सान फ्रांसिस्को मधे. बे एरियात तरी बरेच भारतीय असत. पण सान फ्रांसिस्को मधे फार कमी भारतीय मंडळी होती तेंव्हा.एकटा रहायचा, बाहेर खाणं परवडायचं नाही.फारसे कोणी मित्र नव्हते. शनिवार रविवार वेळ जाता जात नसे. तेंव्हा शिकला स्वैपाक. टी व्ही वर पाहून, पुस्तकात वाचून शिकला हळू हळू.' शाहीन अगदी कौतुकाने सांगत होती. किती बायका आपल्या नवर्याबद्दल काही कौतुकाने सांगतील ? मी स्वतः तरी किती वेळा नवर्याचं कौतुक बोलून दाखवते ? फार फार तर ' बरा आहे तसा.' म्हणेन इतकंच.
' यू गर्ल्स फिनिश कॅचिंग अप. आय नीड टू फिनिश सम थिंग्स हियर अँड देन आय विल कॉल यू' त्याने हाताला धरुनच आम्हाला स्वैपाकघरातून बाहेर काढलं.
बाहेर येऊन सोफ्यावर बसलो दोघी. शाहीन तर चक्क पाय वर घेऊन मांडी घालून बसली. मी पण जरा रेलून बसले मग.
' छान आहे गं घर! वेंकी कॅलिफोर्निया सोडून शिकागो मधे कधी आला? इथे काय करतो तो?' दोघांचं लग्न झालं नसलं तरी दोघं एकमेकांबरोबर आहेत याचाच मला आनंद झाला होता.
' त्याने कॅलिफोर्निया कुठे सोडलंय? तो अजूनही तिथेच असतो. महिन्यातून एक आठवडा आम्ही दोघे इथून टेलीकम्युट करतो. चार वर्षं झाली. पहिल्यांदा एक काँडो भाड्याने घेतला होता. यायला जायला सोयीचं म्हणून शिकागो' ही अशी एकातनं दुसरी भेंडोळी काढावीत तसं का बोलतेय!
' शाहीन, प्लीज! कॅन यू बिगिन ऍट द बिगिनिंग?'
' अरे हां हां . तुला मधलं पण काहीच कळलं नसेल ना! अरे वेंकीच्या घरच्यांनी तर ठाम विरोध केला आमच्या लग्नाला. अन माझ्या घरी पण तीच तर्हा. दीदी अन असिफचा सपोर्ट होता. पण आई बडीलांचा इतका विरोध असताना लग्न करायची पण आमची तयारी नव्हती. वर्षभर फोनवरुन रडारड, भांडणं, रुसवे फुगवे चालले होते आमचे. त्यातच मला ह्युस्टन मधे नोकरी मिळाली. तिथे गेल्यावर मी वेंकिशी बोलणंच टाकलं होतं. माझा नवा पत्ता , फोन नंबर काही कळवलं नाही त्याला. '
'मग हाउ डिड ही ट्रॅक यू? तेंव्हातर ऑर्कुट वगैरे काही नव्हतं. इमेल सुद्धा नसायची सगळ्यांकडे.'
'अगं माझ्या प्रमोशन ची बातमी युनिव्हर्सिटीच्या ऍलम्नी असोसिएशन च्या मासिकात आली होती. कंपनीच्या एच आर तर्फेच अशी माहिती सगळ्या लोकांच्या युनिवर्सिटीला जाते. ती बातमी नेमकी त्याने वाचली अन मग माझ्या कंपनीच्या पत्त्यावरुन मला भेटायलाच आला सरळ. '
'तो पर्यंत तू लग्न केलं असतंस तर ?'
' तेव्हढी त्याला खात्री असावी. म्हणजे होतीच असं म्हणतो तो अजूनही.'
त्यालाच कशाला, शाहीनला ओळखणार्या कोणालाही ती खात्री असणार की ही मुलगी लग्न करेल तर वेंकीशी नाहीतर जन्मभर एकटी राहील. वेंकीचीच कोणाला खात्री नसावी.
'अन वेंकीने कसं नाही कोणाशी लग्न केलं?'
' त्याच्या घरच्यांनी चिकार प्रयत्न केले गं, निरनिराळ्या तर्हेने त्याचं मन वळवायचे . पण तो काही बधला नाही.'
'मग तुम्ही परत भेटलात तेंव्हा तरी लग्न करायचंत की. इतक्या वर्षानी लग्न करताहेत म्हटल्यावर तयार झाले असते घरचे.'
' हॅ! तू जुन्या कर्मठ म्हातार्यांना भेटली नाहीयेस म्हणून असं म्हणतेस. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही म्हणतात ना, ते असल्याच लोकांना बघून. अन खरं सांगू का, चाळीशीच्या उंबरठ्यावर होतो आम्ही दोघे. ते काय लग्नाचं वय आहे का?'
'का नाही? इथले लोक तर कुठल्याही वयावर लग्न करतात, चाळीस म्हणजे काही फार नाही. मुलं सुद्धा होतात चाळीशीच्या नंतर.'
' इथले लोक वेगळे अन आपण वेगळे गं. तॉ कॅलिफोर्निया मधे चांगला स्थिरस्थावर झाला होता अन मी ह्युस्टनमधे. कोणालातरी नोकरी सोडावी लागली असती. चाळिशीच्या पुढे परत नव्या शहरात , नव्या नोकरीत जम बसवणे - जमलं नसतं बाई मला तरी. अन त्याने माझ्याकरता सान फ्रांसिस्को सोडलं असतं पण तो तिथे इतका रुळला होता ना की त्याला तिथून बाहेर काढणं मला पटलं नाही.'
'पण मग शिकागोत कसे काय तुम्ही ?'
'तो ह्युस्टनला आला ना पहिल्यांदा, त्यानंतरही एकदोनदा आला तिथे. मग एकदा मी सान फ्रांसिस्कोला गेले. लग्न करणं तर शक्य नव्हतंच, पण किती दिवस असे भेटत रहाणार असा प्रश्न होताच दोघांच्या मनात. त्याच सुमारास माझी एक कलीग अटलांटाला मूव्ह झाली. तिच्याच कंपनीत,म्हणजे त्या एअरलाइन मधे मला नोकरी मिळाली. नोकरी अगदी पर्फेक्ट होती, वरचा हुद्दा. भरपूर पगार, सगळं काही मनासारखं होतं पण मला ह्यूस्टन सोडवेना. तेंव्हा त्यांनी महिन्यातुन एक आठवडा ह्युस्टन मधून टेली कम्युट करायची ऑप्शन दिली. आजकाल नाही तरी मल्टी नॅशनल कंपन्यांमधे बॉस एका शहरात अन त्याची किंवा तिची टीम तीन चार वेगवेगळ्या शहरात असणे कॉमन आहे एकदम.'
'ते काही तू सांगूच नकोस. अशी तीन ठिकाणी विखुरलेली टीम मॅनेज करता करता नाकी नऊ आलेत माझ्या. महिन्यातून एकदा शिकागो, एकदा डेंव्हर असं जावंच लागतं मला.'
'त्याच सुमारास वेंकी एका प्रॉजेक्टच्या निमित्ताने तीन महिन्यांसाठी शिकागोमधे येणार होता. त्या तिन्ही महिन्यात मी मी ह्युस्टन ऐवजी शिकागोहून एक एक आठवडा काम केलं.'
'द रेस्ट ऍज वी लाइक टु से इज हिस्टरी. डिनर इज रेडी लेडिज.'
जेवता जेवता मी दोघांचं निरीक्षण करत होते. नवीन लग्न झालेल्या जोडप्यासारखे वाटत होते दोघे. कधी वेंकी वीकेंडला येऊन घरात सामान सुमान लावून ठेवतो तर कधी शाहीन. घरकामाला, बागेची काळजी घ्यायला एक कंपनी आहे. त्यांची माणसं येऊन सगळं संभाळतात. इथल्या घरातलं सगळं फर्निचर, सामान सुमान दोघांनी मिळून घेतलंय.
दरवेळेस भेटतात तेंव्हा आठवडाभर काय काय करायचं याचे प्लॅन तयार असतात.शक्य असेल तेंव्हा शिकागोच्या टीमचे गेम्स पहातात. स्टेडियम मधे नाहीच तिकिटं मिळाली तर स्पोर्टस बार मधे जाउन तरी पहातातच. एकमेकांबरोबर जो काही वेळ मिळतो तो उगीच ग्रोसरी , साफ सफाई, गवत कापणे असल्या कामात घालवत नाहीत.
गप्पा मारत जेवंणं झाली. शाहीन म्हणाली ' भांडी आवरायचं काम माझं. ते आवरून मी डेझर्ट वरती घेऊन येते. तुम्ही जा दोघे गच्चीवर.'
रात्र बरीच झाली होती. सभोवती अंधार दाटत चालला होता. आसपासची वर्दळ पण शांत झाली होती. शेजारपाजारच्या घरांमधून पण बहुतांश दिवे मालवलेले होते. अजून चंद्र उगवला नव्हता. मी शांतपणे आकाशाच्या पडद्याबर उलगडणारा कार्यक्रम बघत होते. वेंकी आराम खुर्चीत बसला होता डोळे मिटून.
मिटल्या डोळ्यांनीच मला म्हणाला ' वी एंजॉय एव्हरी मोमेंट वी गेट टु स्पेंड विथ इच अदर. हाउ मेनी मॅरीड कपल्स स्पेन्ड ट्वेल्व्ह क्वालिटी वीक्स लाइ़क धिस ?'
'ट्वेल्व्ह वीक्स? मोस्ट पीपल आर लकी इफ दे स्पेंड ट्वेल्व्ह डेज इन अ इयर विदाउट वरीइंग अबाउट युसलेस स्टफ. यू हॅव फाउंड अ पर्फेक्ट फॉर्म्युला. '
-------------------------------------------------------
मंगळवारी संघ्याकाळी घरी पोचेपर्यंत मुलं झोपून गेली होती. नवरा सुद्धा सगळं आवरून लेट नाइट बातम्या पहात बसला होता. मी आल्या आल्या त्याने कामाचा पाढा वाचायला सुरुवात केली. ' अमकं काम झाल, तमकं करणार होतो पण..' वगैरे वगैरे.
'राहू दे रे ते सगळं उद्या बोलू. कामं कुठे पळून जात नाहीत. वी नीड टू मेक अप अ लॉट ऑफ ट्वेल्व्ह वीक्स. आता तू नुसता बस इथे.' म्हणुन त्याच्या कुशीत डोकं ठेवून मी पण त्याच्या बरोबरीने टीव्ही पहायला लागले.
>> म्हणत मी
>> म्हणत मी वंदूच्या मागोमाग वरती गेले
ही वंदू कोण आली मधेच? बाकी चांगली आहे.
आवडली. *** If
आवडली.
***
If dreams are like movies, then memories are films about ghosts...
खरचं
खरचं आवडली.......
छान, आवडली
छान, आवडली मला.
छान आहे
छान आहे गोष्ट..शेवट आवडला...
हे असं असू
हे असं असू शकतं खरंच?? असेल तर फारच छान...
पण स्वप्नवत वाटतंय.....
दुसरी गोष्ट म्हणजे air port बम्बैया कम हैद्राबादी हिंदी बोलणारी शाहीन अचानक मराठी कशी बोलायला लागली? फ्लो छान आहे पण हे एक जाणवलं म्हणून लिहिलं..
शोनू ... कथा
शोनू ...
कथा आवडली ... वेगळंच असतं ना जग असं कोस्ट - टू - कोस्ट राहणार्यांचं !
पहिल्याच कथेच्या वेगळेपणामुळे आता उत्सुकता आहे बाकीच्या कथांची
मस्तच. ही
मस्तच. ही खरी गोष्ट आहे का ?
अप्रतिम!
अप्रतिम! गणेशोत्सवाचि जंगि मेजवानि मिळतेय मायबोलिकरांना! खुपच सुरेख लिहिता तुम्हि. पुढच्या प्रेमकथांचि आतुरतेने वाट बघतेय.
शोनू, मस्त
शोनू, मस्त अघळपघळ लिहिल आहेस. छान वाटले वाचतांना.
शोनू छान
शोनू छान आहे गं गोष्ट.
ओघवतं लिहिणं ही तुझी speciality आहे.
वंदू
वंदू म्हणजे स्वतः लेखिका.
लेखिकेने शाहीनचे संवाद मराठीतून लिहिलेलं मला आवडलं.
आवडली मला गोष्ट. सिंड्रेलाचा प्रश्ण मलापण पडला कारण वर्णनावरून घडून गेलेली वाट्ते आणि नसेल तर वर्णन करायची कला फारच छान.
शोनू ते ऍलम्नी नसून अलुम्नाय असं आहे.
छान आहे
छान आहे मला आधी वाटून गेलं की ट्रॅजिक शेवट आहे की काय. पण तसं नव्हतं, त्यामुळे सुखद धक्का बसला!
१२ quality weeks?!! hmmmm.....
शोनू, मस्त
शोनू, मस्त आहे गोष्ट. आधी मला पण वाटलं दु:खान्त असावा. पण छान केला आहेस शेवट.
आवडली.
आवडली. कथान्त मस्त जमलाय.
छानचं गं
छानचं गं शोनू.. कथाशैली छान आहे आणि कथेचा गाभा तर त्याहूनही अधिक..
शोनू.......
शोनू....... मस्त जमलीये गं.... !! खूप छान शैली आहे.......सगळं समोर घडतंय असं वाटत होतं
फॉर्मूला प्रचंड आवडेश
शोनू, छान
शोनू, छान लिहिल्येस! आवडली. तुझी लिहिण्याची शैली फारच मस्तंय! साधी, सोपी, सरळ! उगाच शब्दबंबाळ न होऊ देता!
सगळ्यांना
सगळ्यांना धन्यवाद. तुमच्या प्रोत्साहनामुळे खरडंत असते काही तरी. तुम्ही वाचताय, प्रतिक्रिया देताय यातचं सगळं आलं!
कथा आवडली
कथा आवडली फारच छान
Shree
शोनू, मस्त
शोनू, मस्त जमलीय कथा. फ्लो छान आहे. आधी जरा आरिफ आणि वेंकी ह्यांच्यात कन्फ्युज झाले पण आलं लक्षात हळूहळू.
(अशीच 'एका वर्षाची गोष्ट' ही पूर्ण झाली असती तर!!!!! :फिदी:)
अगदी सगळ
अगदी सगळ वर्णन मस्त ,शोनू ,कथा प्रचंड आवडली
१२ quality weeks?!! hmmmm....>>>मैत्रीयी अगदी अगदी
गोष्ट छान
गोष्ट छान आहे पण जरा विरोधाभास वाटला विचारांमध्ये. आई वडीलांच्या परवानगीशिवाय लग्न नाही करायचे करता करता चाळीशी गाठतात नी आता बिंदास live-in relationship ? एवढे विचारांचा पालट? मग तेव्हा तीच हिम्मत करून लग्न नाही करत? का शेवटी हेच एक उत्तर नी ऑप्शन रहाते का एवढ्या सगळ्या खटाटोपीतून गेल्यावर?
मला एक वाचक म्हणून हा प्रश्ण पडला...
शोनू, खूपच
शोनू,
खूपच छान जमलीये कथा, वास्तवाशी संबंध आहे का ?
मने, तेच तर
मने, तेच तर मला 'सेम नसतं' म्हणायचं होतं
मस्त
मस्त लिहीली आहे कथा. अगदी भराभर वाचत होते शेवटी काय होते त्या ऊत्सुकतेने.
शोनू मस्त!!!
शोनू मस्त!!! छान फ्लो आहे लिखाणात....
================
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया !!
शोनू, ओघ!
शोनू, ओघ! अगदी अगदी खरं. शैली तर छानच आहे.
मी ही आधी अगदी वचा वचा वाचली..... मग प्रिंटून नीट चावून चावून वाचली. अगदी समोर घडत असल्यासारखं वाटतय.
आणि ह्याला खरडणं म्हणत असलीस तर तुझ्या भाषेत एखादी 'गोष्टं' लिहीच
अजून येऊदे.
शोनू, कथा
शोनू, कथा एकदम झक्कासच.... खुपच आवडली.
फक्त त्या शाहिनच्या दिदीचा राग आला.... आधी मारे आसिफला नकार दिला.... मग त्याने प्रपोज केल्यावर गेली आपली खुशाल त्याच्या मागोमाग..
शोनू, झकास
शोनू,
झकास जमली आहे कथा! शेवट तर फारच छान. मला तुझ्या कथांचा NRI flavor खूप आवडतो. आता दुसरी सुध्हा वाचते आणि कळवते.
जुनी सखि
कल्पू
Pages