"मित्रा पार्किन्सना, ... "

Submitted by शोभनाताई on 23 March, 2012 - 04:29

११ एप्रिल हा जागतिक पार्किन्सन्स दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. त्यानिमित्य सदर लेख. पार्किन्सन्स मित्रमंडळ,पुणे मार्फत या दिवशी मेळावा आयोजित केला जाणार आहे मेळावा निशुल्क आहे. डॉ.ह.वि. सरदेसाई यांचे व्याख्यान हे मेळाव्याचे आकर्षण आहे.पार्किन्सन्सवरील मराठीतील पुस्तकांचे प्रकाशनही होणार आहे.आपल्या ओळखीत, नात्यात पार्किन्सन्स रुग्ण असल्यास कृपया त्याना माहिती द्यावी.
बुधवार दिनांक : ११ एप्रिल २०१२
स्थळ : लोकमान्य सभागृह, केसरीवाडा, पुणे.
वेळ : दुपारी ४.३०

"मित्रा पर्किन्सना,
मित्रा म्हटल म्हणुन दचकलास? साहजिकच आहे म्हणा तुझ दचकण ! तू चोर पावलानी आमच्या घरात प्रवेश केलास. कपाळावर बारीकशी अठी उमटली. तू आमच्या आवडत्या पु.लं.च्या घरी पाहुणचार घेणारा. त्यांच्या पंगतीत आम्हाला बसवलस म्हणुन थोडं मनाचं समाधान करुन घेण्याचा प्रयत्न केला. पण तु तर अरबाच्या उंटासारखा आतआतच येत गेलास.

किती राग राग केला तुझा. अतिथी देवो भव ऐवजी नको असलेला पाहुणा वाटायला लागलास. मग पदर खोचुन तुला हाकलण्याचे आमचे प्रयत्न सुरु झाले. तुला हाकलण्याचा हमखास उपाय अस सांगणारे आणि ऑलोपाथीच्या नादाला अजिबात जाउ नका अस सांगणारेही अनेक भेटले.

काय केल नाही? प्रथम योगासनाचा आधार घेतला.आयुर्वेदिक पंचकर्म, अ‍ॅक्युपंक्चरच्या सुया टोचुन घेण, हाताला धान्य चिकटवण, रेकी, प्राणिक हिलींग, सुज्योक्, निसर्गोपचार अगदी भोंदु वैदुही !
प्रत्येक उपचारानंतर तु थोडा घाबरतोस अस वाटायच.आणि अचानक भॉक करुन खदखदा हसत समोर यायचास.कशी फजिति केली म्हणुन घाबरवायचास. माझ्या नवर्‍याची तर बोलतीच बंद करायचा प्रयत्न केलास.

तुला हकलायला आता अ‍ॅलोपॅथीचा तगडा उपायच हवा होता. यातच ज्याच्या घरी पाहुणा होतास. अशा श्री. मधुसुदन शेंडे आणि श्री. शरदच्चंद्र पटवर्धन यानी सुरु केलेल्या पार्किन्सन मित्रमंडळाची ओळख झाली. इथ तुला हाकलण्याचा प्रयत्न नव्हता; तर तु आता कायमचा पाहुणा आहेस हा स्विकार होता. तुझ्यासह आनंदी राहता येत हा विचार होता. आम्हीही त्यांच्यात सामिल झालो. पुण्यात विविध ठिकाणी गट करुन सभा घेण सुरु झाल. तुझ्याबद्दलच अज्ञान दूर करण्यासाठी न्युरॉलॉजिस्टची व्याख्यान, मानसोपचार तज्ज्ञ, ड्रम थेरपी, नृत्य उपचार, सहली, एकमेकांची दु:ख शेअर करण.

तु जिथजिथ गेलास तिथ तुझ्यामागुन जाउन त्या लोकांच्या मनातले तुझ्याबद्दलचे गैरसमज दूर करण अशा अनेक गोष्टी सुरु झाल्या. तुला हाकलण्यासाठी योगासने प्राणायाम ओंकार आयुर्वेद इत्यादी गोष्टींचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता आता त्याच गोष्टी तुझ्यासह आनंदी राहण्यासाठी त्या वापरण सुरु झाल.
या लोकांच्या सहवासात आणि त्यांच्याबरोबर काम करताना तुला आम्ही कधी स्विकारल समजलच नाही. तुझ्याबरोबरचा शत्रु ते मित्र प्रवास तुलाच सांगतीय.

११ एप्रिल हा तुझा दिवस म्हणुन जगभर साजरा केला जातो, त्यानिमित्त तुला समजण्यात आमच्यासारखी इतरांनी चूक करु नये म्हणुन हा पत्रप्रपंच.
मित्रा तुला धन्यवाद पण द्यायचे आहेत. तुझ्यामुळे आम्हाला एक छान परिवार मिळाला. या वयात आम्ही नृत्य शिकलो. आमच्या दोघांच्या आवडीनीवडी कार्यक्षेत्र म्हणजे खरतर एकत्र न येणार्‍या समांतर रेषाच. पण तुझ्यामुळे आम्हाला एक लक्ष्य मिळाले. प्रतिकुलतेला अनुकुलतेत बदलता येत हे सिद्ध करता आल. आमची सेकंड इनिंग तुझ्यामुळे अर्थपूर्ण झाली. मित्रा, पुन्हा एकदा धन्यवाद ! "

गुलमोहर: 

काय लिहू?

माझ्या स्माईलीचा अर्थ चुकीचा घेतलात म्हणून संपादन करतेय पोस्ट. ह्या मंडळींकडून खूप काही शिकण्यासारखं आहे म्हणून काय लिहू हे लिहीलंय. अरेरे चा स्माईली म्हणजे कीव वगैरे अजिबात करायची नाहीये मला.

वा, शोभना, कित्ती छान लिहिलय्स Happy मी नक्की येईन याही वेळेस Happy
इतरांसाठी, माहितीसाठी या दोन लिंक्स पहा : http://www.maayboli.com/node/24509
http://www.maayboli.com/node/15418 यात मी ज्या शोभनाचा उल्लेख केला होता त्याच या शोभनाताई बरं का Happy

सुरेख हं! Happy

मित्रा तुला धन्यवाद पण द्यायचे आहेत. तुझ्यामुळे आम्हाला एक छान परिवार मिळाला. या वयात आम्ही नृत्य शिकलो. आमच्या दोघांच्या आवडीनीवडी कार्यक्षेत्र म्हणजे खरतर एकत्र न येणार्‍या समांतर रेषाच. पण तुझ्यामुळे आम्हाला एक लक्ष्य मिळाले. प्रतिकुलतेला अनुकुलतेत बदलता येत हे सिद्ध करता आल. आमची सेकंड इनिंग तुझ्यामुळे अर्थपूर्ण झाली. >>>

फारच सुरेख!!

अरे वा ,..... म्ह्न्जे अजुन अजुन नविन मीत्रान्चा सहवास कुठे मिळेल बरे?????? म्ह्न्जे --- मित्रा 'मधुमेहा" मित्रा ' रक्त दाबा' ... Happy

काकू, छान वाटलं वाचून. तुमचा प्रवास मी बघितलाय/ ऐकलाय. तर त्याविषयी कधीतरी थोडं सविस्तर लिहा ना.
<<आमच्या दोघांच्या आवडीनीवडी कार्यक्षेत्र म्हणजे खरतर एकत्र न येणार्‍या समांतर रेषाच. पण तुझ्यामुळे आम्हाला एक लक्ष्य मिळाले>> अगदी अगदी. मनापासून पटलंय. Happy

प्रतिक्रियेबद्दल सर्वाना धन्यवाद.आरती तुझ्या दोन्ही लिंक्स पुन्हा एकदा पाहिल्या.आमच मोठ्ठ काम केलस.
जागोमोहनप्यारे तुमच्या लिंकबद्दल खुप खुप धन्यवाद.आरति तु याहिवेळी येणार आहेस म्हणुनही धन्यवाद.

खुपच छान लिहिलय आणि तुमच कार्यही महत्वाचं आणि मोठं आहे.
या कार्यास मनापासून शुभेच्छा

सुधीर

सोमवारी, १६ एप्रिल २०१२, दुपारी १२.३० वाजता पुणे आकाशवाणी वरती या विषयावर शोभनाचे भाषण ( खरे तर अनुभवांवर आधारीत संवाद ) आहे. जरूर ऐका Happy