'कवितेची पाककृती' - हमखास कविता होणार याची ग्वाही

Submitted by बेफ़िकीर on 22 March, 2012 - 06:18

लागणारा वेळ -

एक सेकंद ते एक जन्म यातील कितीही

आपापल्या इच्छाशक्तीवर व कंपूबाजीवर अवलंबून

========================================

लागणारे जिन्नस -

एका भाषेतील बर्‍यापैकी शब्दसंग्रह

विरहाचा अनुभव

टक्केटोणपे खाण्याचा छंद

जगाचा राग

लय व वृत्त यांचे ज्ञान नसणे (होय, हा जिन्नसच आहे )

कशालाही कविता मानण्याची व दुसर्‍याला ते मान्य करायला लावण्याची (अनुक्रमे) विवशता व आक्रमकता

=======================================

लागणारे आपणबाह्य जिन्नस -

आजूबाजूला एक जग असणे आवश्यक

एक समाज असणे आवश्यक

प्रेम झालेले असणे, नसणे, होऊ शकत नसणे, मोडणे, जुळणे, तुच्छ वाटणे यातील काहीतरी एक आवश्यक

कागद, पेन, स्क्रीन, कॉ बोर्ड किंवा जीभ (हा आपणबाह्य नाही) यातील काही ना काही जवळ असणे

=====================================

किमान मानसिक जाणिवा -

आपल्याला सगळे त्रास देतात

आपलेच लोक आपल्याला छळतात

मृत्यू जीवनापेक्षा प्रामाणिक आहे

ती कधीच माझी नव्हती

चंद्र हा एक फक्त ग्रह आहे

जगात इतर कोणीही कवी नाही

तिला साडी बरी दिसते

रामदास स्वामी जन्मले नसते तरी चालले असते

साहित्यसंमेलन हे एक सोंग आहे

खरे तर मला समीक्षक व्हायचे होते

================================

कौटुंबिक किमान आवश्यकता -

घरच्यांनी हाकलून दिलेले असले पाहिजे

लग्न झालेले असल्यास पाठीत पोक काढणे आवश्यक

=================================

किमान शारिरीक आवश्यकता -

पुरुष -

वजन चाळीस किलोच्या वर नसावे

दाढीचे वजन किमान दोन किलो भरावे

डोळे खोल व जाणिवा सखोल असणे आवश्यक

डोळ्यात धगधता अंगार एका अशक्त क्रांतीला घेऊन उभा असलेला हवा

जिभेवर तंबाखू नसेल तेव्हा शिव्या हव्यात

पृथ्वी ही उभे राहण्यासाठी व तंबाखू थुंकण्यासाठी आहे हे मान्य झालेली देहबोली हवी

आठवड्यातून दोन वेळा आंघोळ आवश्यक

स्त्री -

सौंदर्याच्या प्रस्थापित कल्पनांना स्वतःच्या उदाहरणातून धुडकावणारे सौंदर्य हवे

आवाज गाढवासारखा असायला हवा

वजन नव्वदच्या खाली येऊन चालणार नाही

रंग काळेपणाकडे झुकणारा काळा असा हवा

दोन डोळ्यांनी एकदम दोन विविध ठिकाणी पाहता आलेच पाहिजे

जगातील पहिली स्त्री कवी असल्याचा अभिमान हालचालीत दिसायला हवा

===================================================

कविता करण्यापूर्वी धरण्याची गृहीतके -

शब्दात सामर्थ्य आहे

समाज ढोंगी आहे

लिंगचाचणी बेकायदेशीर असली तरी रोज हजारो मुली मरतातच

माहेर सारखे दुसरे ठिकाण जगात नाही

आई आणि वडील यांनी हाकलून दिलेले असले तरी ते चांगलेच असतात

देशाचे काहीही खरे नाही

राजकारणी ही शिव्या ऐकण्यासाठी निर्माण झालेली जमात आहे

ज्ञानेश्वरांना आयुष्य समजले नाही

गीता हा ग्रंथ पांचट आहे

आपण महाबळेश्वरला झाडीत असलो तरी नेहमी उन्हातच असतो

प्रेयसी क्रूर असते व नंतर निष्ठूरही होते मात्र सुंदर राहतेच

आकाशात दिसणारे सर्व ग्रहगोल हे फक्त कवींच्या सोयीसाठी निर्माण झालेले आहेत

पुल देशपांडेंनी मराठी साहित्याची वाताहात केली

व पू काळे हा सजीव अनावश्यक होता

जी ए कुलकर्णी नावाची अनेक माणसे असल्याने कोण कथा लिहितात हे माहीत नाही

नेमाडेंच्या लेखनात उद्याचा समाज नसतो

माडगुळकर गाजले नसते तर रविवार पेठेत टपरी टाकून बसले असते

बालगंधर्व ही स्त्रीच होती

===============================

कविता केव्हा करावी -

दिवसातले चोवीस तास कवितेसाठी उपलब्ध असतातच

पण तरीही काही अनुभुती आल्यावर कविता केल्यास ती प्रभावी होते

मेंगळट कुत्रे आळसणे

मांजराचे म्योंव

एक वाहन रस्त्यावरून जाणे

आकाशात उजेड, निळाई, सूर्य, चंद्र, अंधार, तारे यापैकी काहीतरी दिसणे

नळाला पाणी येणे

शेजारचे भांडण

आपण स्वतः श्वास घेणे

कविता करावीशी वाटणे

कविता करावीशी न वाटणे

अशा अनंत माध्यमांमधून कवितेची प्रेरणा मिळत असते

=====================================

ठिकाण -

घर

घराबाहेर

गल्लीत

बसमध्ये

कॉमन संडास

पान टपरी

दवाखाना

मठ

स्मशान

शिशुवर्ग

लिज्जत पापडचे केंद्र

इत्यादीपैकी कोठेही कविता करावी

त्यातल्या त्यात पाचवे ऑप्शन असे आहे की माणूस सर्व प्रकारे व्यक्त होऊ शकतो

==========================

कविता का करावी -

कविता करू नये असे काही नसते म्हणून

तो गुन्हा नाही म्हणून

पाहुणे येऊ नयेत म्हणून

कोणी उधार मागू नये म्हणून

पत्नीचा अथवा पतीचा संसारातला इन्टरेस्ट संपावा म्हणून

===========================

कवितेत काय असावे? -

काहीही असावे

(काहीही नसलेल्या कवितांचेही दिवस आता चांगले आहेत. त्यामुळे आता सर्वांनाच समान स्कोप मिळतो)

==========================

एखादे लेखन कविता वाटण्यासाठी आवश्यक असलेले शब्द व विषय -

चंद्र - सर्वात जास्त वापरला गेलेला एक गोलाकार

चांदणे

माहेर

सासर

शिवार

आई (कवीची)

वडील (कवीचे किंवा कवीच्या प्रेयसीचे, कवी स्वतःच स्त्री असला तर त्याने लिंगनिरपेक्ष व्हावे)

मूल (झालेले, होणार असलेले वा न झालेले)

गाव (सहसा खेडेगाव योजतात)

नदी (वाहती हवी)

झाडे (अंगात आलेली नव्हेत, प्रत्यक्ष झाडे, ही झाडे जुन्या आठवणींसाठी हुकुमी असतात)

घर (टुमदार किंवा झोपडीवजा सहसा घेतले जाते)

पाऊस (याची कवितेतून सुटका नाही )

श्रावण (हा एक ऋतू आहे असे काहींना वाटते, पण तो खरे तर फक्त कवितेचा विषय आहे )

समुद्र

डोंगर

दरी

बंधन

प्रेम

विरह

मिठी

चुंबन

वेणी

फुले

मोगरा (मोगरा हा नुसता फुले या सदरात मोडू शकत नाही, त्याचे स्थान वेगळे)

चाफा (याचेही स्थान वेगळे)

गुलाब (याचा तर प्रश्नच नाही)

अबोली (एकाच वेळी फूल व प्रेयसी यांना उद्देशून हे फूल वापरता येते)

गजरा

शेवंती

जास्वंदी

यौवन

विरह

टिरह (हल्ली एक टिरह नावाचा प्रकार निघालेला आहे, तो विरहाच्याही पुढचा असल्याचे कळते)

स्पंदने

अश्रू, आसवे

श्वास (यातच नि:श्वासही कहर होतात)

उमलणे

धुंद

वसंत (या शब्दासाठी दहा यमकवाले शब्द असल्याने हा सोपा जातो)

हात

पाऊल

पाय

कंबर

पदर (आई व प्रेयसी यांच्यात कॉमन असू शकेल अशी फक्त ही एकच गोष्ट आहे)

देव

पुन्हा एकदा आई

===================================

काव्यप्रकारांप्रमाणे वैशिष्ट्ये:

१. अभंग

अभंगासाठी विठ्ठल , रखुमाई, ज्ञानेश्वर, तुकाराम व पंढरपूर यातील एकावर श्रद्धा असणे ही किमान अट आहे. यात या सर्वांचे उल्लेख व नद्यांचे उल्लेख आवश्यक.

२. लावणी

राया, नका, कबूतरे, ज्वानी, भावजी व चोळी हे शब्द अत्यावश्यक

३. वीररसयुक्त गीत

यात आवाज टिपेला हवा, शब्द कोणतेही चालतील. डोळ्यात अंगार हवा. हालचालीत शूरवीराचा रुबाब हवा. विषय 'शेजार्‍यांवर टीका' असा असला तरी केवळ देहबोलीवर गाजणारा हा एकमेव प्रकार आहे

४. ओवी

ओवी रचायची असल्यास व घरी मिक्सर असला तरीही एक जाते घेऊन यावे

५. स्त्रीवाद

गर्भातच मुलीला मारणे या विषयावर विविध लांबीच्या व विविध वृत्तातील किमान दहा कविता जवळ हव्यात

सासरी छळ या विषयावरची कविता सादर करताना रडता यायला हवे

माहेर या विषयावर 'आपण माहेरात येऊन पोचल्याचा' आनंद चेहर्‍यावर दिसायला हवा

६, सामाजिक

समाज नेहमी अन्यायी व वाईटच असतो हे लक्षात ठेवायला हवे

त्याशिवाय सामाजिक कविता होऊ शकत नाही

७. गझल

गझलेत आधी यमके एका वहीत लिहून ठेवावीत

काल्पनिक प्रेयस्या, काल्पनिक विरह, काल्पनिक कुटुंबीय कल्पावेत

समाजाने आपल्यावर वर्षानुवर्षे अन्याय केलेला आहे याचे (केलेला नसलाच तरी) भान ठेवावे

उर्दूपेक्षा मराठी गझल उच्च आहे हे विधान पहाटे उठून पाचशे वेळा घोकावे

तरीही घरात काही उर्दू शायरीची पुस्तके हवीत

रात्री अकरा वाजता ती पुस्तके नाईट लॅम्पमध्ये वाचली तरच गझल जमू शकते

गझल महोत्सवांना न जाणे ही एक किमान अट आहे

वृत्त शिकावे लागत नाही, ते टिकाकार आपोआप शिकवतात याचे भान ठेवावे

रोज एक गझल करावी

सुरेश भटांना नावे ठेवणे हा मोठे गझलकार होण्याचा एक सोपा उपाय आहे

दुसर्‍याच्या गझलेत काय खटकले हे जाहीर सांगता यावे

==============================

कवितेतील काही काव्यजोड्या

मोगरा हा शब्द आला की सुगंधी जखमांचा उल्लेख यायला हवा

मिठी नेहमी रेशमी असते

तारुण्य नेहमी मल्मली असते (दुसर्‍याचे) .............. (तुमचा अनुभव काही असो)

वाळवंटात मृग़जळ दिसायला हवेच

वसंतात तुमचे मन खट्टू होणे आवश्यक

मैफील फक्त सुनीसुनी असायला हवी

रात्र ही नेहमी 'उलटून गेलेलीच' असायला हवी

खंजीर हा शब्द सहज वापरता आला पाहिजे, प्रत्यक्ष नेलकटर का हातात धरवेना

अश्रू लपवल्याशिवाय ते अश्रू आहेत हे कोणालाही कळणार नाही

चंद्रावर डाग नसले तर तुम्ही फेल

साडी माहेरची हवी, जावेने दिलेली असली तर तुम्ही कविता करण्याच्या लायकीचे उरलेला नाहीत हे लक्षात ठेवा

धरतीने पावसात नेहमी हिरवाच शालू नेसायला हवा, पंजाबी ड्रेस चालणार नाही

फूल आलं की काटे यायला हवेत, हे उलटे चालत नाही, काटे आले तर फुले पाहिजेतच असे नाही

डोळे आणि ओठांनी न बोलणे ही जोडी अजरामर आहे

कवी स्त्री असली आणि दिवस गेले तर तिसर्‍या महिन्यापासून गर्भलिंगचाचणीवर कविता सुरू करावी

(चाचणी करणार असोत नसोत - कविता पाहिजे)

=======================================

इतके सर्व सांगून झाल्यावर अजून काय पाहिजे

आम्ही कवितेचा फोटो मात्र टाकत नाही आहोत

या लेखाची प्रेरणा (http://www.maayboli.com/node/33651?page=1) दिनेशदा व भुंगा या सदस्यांनी दिल्याबद्दल त्यांना ही पाककृती करायला लागण्याची शिक्षा मिळेल

आपला नम्र

-'कवी बेफिकीर'!

===============================

गुलमोहर: 

Lol

येक नंबरच Rofl आता घरी जावुन २-४ कविता घालतोच (पापड ...कुरवड्यांसारख्या) उन्हाळी कामे उरकुन घ्यावीत म्हणतो Biggrin

बेफि,

खूप मोठी रेसिपी. एक वेळ मुक्त छंद कविता वाचली जाते. पण हे म्हंजे.... भलतच हो..! रेसिपी सारखं लक्षणं हे नावही संयुक्तिक वाटते. 'कवीलक्षण'. कविता पाडणे, होणे, येणे, लिहिणे, प्रसवणे, 'सुचणे' , स्त्रवणे, झरणे, मोहरणे, ढापणे, जुळवणे इत्यादी सर्वाम्साठीचे 'cookbook'.

Happy

गझलेत आधी यमके एका वहीत लिहून ठेवावीत - हे शिकावे लागेल

काल्पनिक प्रेयस्या, काल्पनिक विरह, काल्पनिक कुटुंबीय कल्पावेत - हे शिकावे लागेल

समाजाने आपल्यावर वर्षानुवर्षे अन्याय केलेला आहे याचे (केलेला नसलाच तरी) भान ठेवावे - हे मी करतोच

उर्दूपेक्षा मराठी गझल उच्च आहे हे विधान पहाटे उठून पाचशे वेळा घोकावे - - हे शिकावे लागेल

तरीही घरात काही उर्दू शायरीची पुस्तके हवीत - आहेत

रात्री अकरा वाजता ती पुस्तके नाईट लॅम्पमध्ये वाचली तरच गझल जमू शकते - वाचतोच

गझल महोत्सवांना न जाणे ही एक किमान अट आहे - कुणी बोलवतच नाही Lol

वृत्त शिकावे लागत नाही, ते टिकाकार आपोआप शिकवतात याचे भान ठेवावे - शिकलो

रोज एक गझल करावी - - हे शिकावे लागेल

सुरेश भटांना नावे ठेवणे हा मोठे गझलकार होण्याचा एक सोपा उपाय आहे - - हे शिकावे लागेल

दुसर्‍याच्या गझलेत काय खटकले हे जाहीर सांगता यावे - हे तर लई भारी जमतंय Lol

बापरे. ही रेसिपि ह्या जन्मात जमणे नाही. Happy
बेफी, शीर्षक कसे असावे ? जसे की हातभर लांब, दोन ओळींचे फक्त, शीर्षकाचा कवितेशी काहीही संबध कसा नसावा, गुढ शीर्षक ई.ई. हे पण अ‍ॅड करा. Happy

Biggrin

खूप मजेदार लिहिलंय बेफिकीरजी
कविता, गझल, मुक्तछंद या सगळ्याचा अंतर्भाव झालाय हे पाहून बरं वाटलं.

फक्त या रेसिपीमधे गार्निशिंग हा भाग सांगायचा राहून गेला.
आजकालच्या रेसिपीमधे गार्निशिंगला खूप महत्त्व असतं.
गार्निशिंगसाठी आपण विविध प्रकारची विरामचिन्हं वापरू शकतो.
उदाहरणार्थ " ! , ? . ; ’ इ.इ. चिन्हे गार्निश केल्याने काव्यकृती प्रेझेंटेबल होते.
(अति-नवकाव्यात गार्निशिंगसाठी स्मायलींचा वापर देखील करावा)
असं काहीतरी ऍड करायला हवं होतं असं वै.म.

बाकी लिखाण एकदम मस्त विनोदी झालंय.... आवडलं.

बेफी, मी इथल्या बहुतेक (वाचतील आणि वाचवतील त्या) कविता वाचतोच.
प्रतिसाद द्यायचे धाडस करत नाही.... पण ही रेसिपी आवडली बरं का.
(काय घ्या, एखादी पाडूनच टाकिन मी पण !!!)

व्वाह... मस्तच आहे रेसिपी....
जिन्नसही साधे आहेत , शिवाय रोजच्या वापरातले.... Lol

तेवढं जरा शीर्षकाबद्दलही मार्गदर्शन कराच कुणीतरी.... Wink

<<<कविता केव्हा करावी ->>>> हा भाग विशेष आवडला....

दिनेशदांचा प्रतिसादही आवडला.... Happy

खूप सोप्पीय रेसिपि ...........
मला वाटत होतं काहितरी मला न जमणारं सान्गाल तुम्ही .........मूड ऑफ झालाय ......आता एखादी कविता पाडावीच लागणार .............एक मात्र नवीन सांगितलंत ते शिकीन म्हणतोय..............

१. अभंग
अभंगासाठी विठ्ठल , रखुमाई, ज्ञानेश्वर, तुकाराम व पंढरपूर यातील एकावर श्रद्धा असणे ही किमान अट आहे. यात या सर्वांचे उल्लेख व नद्यांचे उल्लेख आवश्यक.

>>प्रतिसाद द्यायचे धाडस करत नाही.... पण ही रेसिपी आवडली बरं का.
हल्ली मी पण प्रतिसाद द्यायचे धाडस करत नाही Wink Proud

:बाब्बो...बाब्बो...! :-))) वाक्यावाक्याला फुटलो हाय अशी बेफाट पाक-कृती यापूर्वी खाल्ली नव्हती,आणी खरतर आज मला हिनीच खाल्लं... Wink

Pages