धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा ‘बलिदानस्मरण दिन’!

Submitted by वेताळ_२५ on 22 March, 2012 - 01:34

sambhaji-maharaj.jpg
प्रकाशचित्र सौजन्य : आंतरजाल

२२ मार्च २०१२ फाल्गुन वद्य अर्थात् मृत्युंजय अमावस्या हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा ‘बलिदानस्मरण दिन’! त्यानिमित्ताने त्यांच्या स्वधर्मनिष्ठेचे केलेले हे स्मरण...

छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्य टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी अंतर्गत कलहाशी व
शत्रूशी समर्थपणे व प्राणपणाने लढणारे धर्मवीर!

मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हाला दिला। शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर जाहला।।

वरील दोन ओळींतच खर्‍या अर्थाने संभाजी महाराज यांच्या चरित्राने स्वराज्याला दिलेला महान असा स्वराष्ट्रवाद, स्वधर्माभिमान व्यक्त होतो.
संभाजीराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांच्या पोटी जेष्ठ शु. १२, शके १५७९ रोजी पुरंदर गडावर झाला. ते केवळ २ वर्षांचे असतानाच त्यांच्या मातोश्रींना देवाज्ञा झाली. अशा प्रकारे लहानपणापासून त्यांच्यावर काळाच्या आघाताला सुरूवात झाली. सईबाईंच्या पश्र्चात राजमाता जिजाबाई शंभूराजांच्या पालनपोषणाची सर्व व्यवस्था पाहू लागल्या. केशव भट आणि उमाजी पंडित हे शंभूराजांचे गुरू होते. संभाजीराजांना कोणकोणते शिक्षण दिले गेले हे सभासद व चिटणीसांच्या बखरीतून मोठ्या प्रमाणावर स्पष्ट होते.

‘‘संभाजीराजांनी विद्याभ्यास करावा, त्याला सुशिक्षित करावे म्हणून त्याला घोड्यावर बसविणे, शास्त्रविद्या, तालीम यांचे शिक्षण देवविले. अष्टप्रधान यात राजपुत्राची गणना आहे. सर्व आमात्य राजाचा वामभुज; युवराज, राजपुत्र हा सत्यभुज असे आहे. त्याअर्थी तो सुशिक्षित असावा म्हणून लेखनादि अभ्यास करविला. दंडनिती, राजधर्म हे सांगविले. राजपुत्र धर्म, पितृसेवा कायावाचामने करावी. पित्याने संतुष्ट होऊन युवराजपद कारभार सांगितला असा गर्वारुढ उत्पन्न होऊ नये. राजाचे कुळी अनीतिमान पुत्र निर्माण झाला म्हणजे ते राज्य व कुल शीघ्र क्षयास जाते. म्हणुन बहुत नीतिने रक्षिणे तसे रक्षिले. आणि मातबर सरकारकून प्रौढ यांच्यापाशी बसावे, दरबारात बसावे म्हणजे कारभार माहित होत जाईल.’’ अशी नोंद ऐतिहासिक कागदपत्रांत आढळते. अशा प्रकारे संभाजीराजांचे औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण झाले. याचबरोबर सैन्याचे नेतृत्व करण्याचा अनुभव त्यांना मिळावा या हेतूने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज स्वत:बरोबर एखाद्या आघाडीवर नेत असत किंवा पाच-दहा हजार सैन्याचे नेतृत्व त्यांना देत असत. संभाजीराजांची अतिशय काटेकोर पद्धतीने जडणघडण होत गेली.

याच दरम्यान त्यांच्या जडणघडणीच्या काळात त्यांना खूप मोठा अनुभव मिळाला. हा अनुभव होता छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरील आग्रा भेटीचा. या काळात महाराजांच्या सहवासात त्यांच्या अनेक पैलुंचा, गुणांचा संभाजीराजांवर नकळतपणे प्रभाव पडत गेला. वेगळ्या अशा राजकारणी धोरणांची, मुत्सद्दीपणाची त्यांना ओळख झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्भूत, अचाट साहसाचे ते साक्षीदार होते. त्यानंतरच्या काळात वेशांतर करून स्वराज्यात दाखल होईपर्यंत त्यांना प्रत्यक्ष समाज पाहता आला. हा अनुभव त्यांना पुढे राज्यकारभार चालविण्यासाठी खूप उपयोगी पडला. मिर्झाराजांकडे ओलीस राहणे, शाही फर्मान स्वीकारणे या गोष्टी देखील त्यांना दिशादर्शक ठरल्या. खूप लहान वयातच शत्रूचा सहवास त्यांना दीर्घकाळ लाभल्यामुळे त्यांची कार्यपद्धती त्यांना अनुभवता आली.

विद्याभ्यास, शस्त्रविद्या, दरबारातील कारभार, युद्धविद्या, सैन्याचे नेतृत्व या सर्व गोष्टीत संभाजी राजे पारंगत तर होतच होते. त्याबरोबरच त्यांचे संस्कृत व हिंदी या भाषांवरही प्रभुत्व होते. त्यांनी ४ काव्यग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्या बुधभूषण या संस्कृत ग्रंथात दोन अध्याय असून पहिल्या अध्यायात ‘स्वकुल’ व ‘स्वकाव्य वर्णन’ या विषयीचे लेखन आढळते तर दुसर्‍या अध्यायात ‘राजनिती’ व ‘दुर्ग निरूपण’ या विषयीची सविस्तर माहिती संभाजी महाराजांनी लिहिलेली आढळते.

शिवराज्याभिषेकानंतर त्यांनी अनेक मोहिमांवर नेतृत्व केले. पण खर्‍या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच संभाजीमहाराज लोकांना कळाले. छत्रपतींचा वारसदार हा तेवढाच कार्यकुशल व पराक्रमी आहे हे त्यांनी प्रत्येक बाबतीत सिद्ध केले.

केवळ ९ वर्षांच्या काळात त्यांनी १२८ लढाया जिंकून आपल्या पित्याच्या नावाला खूप मोठा सन्मान प्राप्त करून दिला. याच काळात कोकणात धर्माच्या नावाखाली हैदोस घालणार्‍या धर्मांध लोकांचा त्यांनी बंदोबंस्त केला. गोवा येथेही पोर्तुगिजांवर हल्ला केला. या स्वारीच्या वेळी त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता खाडीमध्येच घोडा घालून आदर्श नेतृत्त्व सिद्ध केले. धर्मांतरित लोकांना पुन्हा हिंदू धर्मात घेऊन त्यांनी शिवाजी महाराजांचे कार्य सुरू ठेवले. सततच्या स्वार्‍यांमुळे त्यांनी औरंगजेबाच्या नाकीनऊ आणले होते. त्यामुळेच तो चिडून दक्षिणेत आला होता. पण या अस्मानी संकटापुढे संभाजी महाराजांनी गुडघे ठेकले नाहीत. याउलट इतिहासाच्या पानापानावर शंभूराजांच्या नेतृत्वाखाली निर्भयपणे अहोरात्र झुंजणार्‍या मराठ्यांच्या विजयश्रीच्या कहाण्या आढळतात! नोव्हेंबर १६८१ मध्ये बुर्‍हाणपुरास आलेल्या औरंगजेबाला मराठ्यांच्या तिखट आणि चिवट प्रतिकारामुळे आपला पवित्रा बदलावा लागला आणि त्याने १ एप्रिल १६८५ रोजी विजापूरच्या किल्ल्याला वेढा दिला. सर्वसामर्थ्यानिशी दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाला असे करण्यास भाग पाडण्यातच संभाजी महाराजांच्या पराक्रमाची प्रचीती येते.

आक्रमक सेनानी व कुशल प्रशासक म्हणून त्यांनी राज्यकारभार फार कुशलतेने सांभाळला व उत्तमपणे शासनव्यवस्था सांभाळली. छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा पुढीलप्रमाणे होती,

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।

आपल्या कारकीर्दीत छत्रपती संभाजी महाराजांना अतिशय विषम अशा परिस्थितीस सातत्याने तोंड द्यावे लागले. अनुभवी औरंगजेब सुमारे सात लाख सैन्यासह स्वराज्यावर चालून आला होता, आणि तरुण, अननुभवी संभाजी राजांकडे सैन्य होते केवळ तीस ते पस्तीस हजार. शिवाय घरभेदी, फितूर लोकांच्या कारवाया होत्याच. पण या सर्व परिस्थितीतही छत्रपती संभाजी राजांनी मोगली सैन्याला दाद दिली नाही, औरंगजेबाला यश लाभले नाही.

नुकताच कुतुबशाहीतून फुटून मोगलांना मिळालेला सेनापती शेखनिजाम ऊर्फ मुकर्रबखान याने गणोजी शिर्क्याच्या मदतीने संभाजीराजांना पकडण्यासाठी भयंकर बेत आखला! राजांचा मुक्काम यावेळी संगमेश्‍वर या गावी होता. कोल्हापूरहून मुकर्रबखान आपल्यावर चाल करून येत असल्याची बातमी हेरांनी शंभूराजांना कळवली. ९० मैलांचे हे अंतर दर्‍याखोर्‍या आणि अवघड डोंगरवाटांमुळे पार करण्यासाठी खानाला किमान ८-१० दिवस लागतील असा राजांचा कयास होता, पण फितूर गणोजी शिर्क्याने कोकणातल्या चोरवाटांनी ४-५ दिवसांत संगमेश्‍वरी आणून सोडले. दुर्दैवाने घाला घातला. केवळ ४०० स्वारांनिशी असलेले हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती ३००० फौजेनिशी आलेल्या मुकर्रबखानाच्या जाळ्यात अडकले! घात झाला. ३ फेब्रु. १६८९ संभाजीराजे मोगलांच्या हाती जिवंत सापडले!

औरंगाजेबाने त्यांना तुळापूर येथे आणले. मोगल छावणीत शंभूराजांचा प्रचंड मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. देहाची कातडी रोज सोलण्यात येत होती. तरीही शंभूराजे जराही डळमळले नाहीत. किती हा ज्वलंत धर्माभिमान आणि केवढी पृथ्वीमोलाची ही सहनशीलता! या छळछावणीतच संभाजी महाराजांचे दोन्ही हात आणि पाय कलम करण्यात आले! इतके होऊनसुद्धा संभाजी महाराजांना नैसर्गिक मृत्यू येत नव्हता! ११ मार्च १६८९ शके १६१०! तो दिवस फाल्गुन वद्य अमावस्येचा होता. दुसर्‍या दिवशी चैत्र प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा होता. हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला हिंदूंच्या मनात कायमची दहशत निर्माण करावी या हेतूने धर्मांध औरंगजेबाच्या आदेशानुसार अमावस्येला शंभूराजांचे मस्तक धडावेगळे केले गेले! ज्या मस्तकावर सप्तगंगाच्या पवित्र जलाचा रायगडावर अभिषेक झाला तेच मस्तक छाटण्यात आले! ज्या गुढीपाडव्याला घराघरातून गुढ्या उभारल्या जातात त्याच दिवशी शंभूराजांचे मस्तक भाल्यावर टांगून मोगली छावणीतून आसुरी आनंदात मिरवण्यात आले! संभाजीराजे आणि कवी कलशांच्या निष्प्राण देहांचे तुकडे तुकडे करून वदू या गावाजवळ टाकण्यात आले. क्रौर्याची परिसीमा पार झाली!

३९ दिवस यमयातनांचा सहर्ष स्वीकार करून देव, धर्म, राष्ट्र आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी बलिदान करून शंभूछत्रपतींनी ज्वलंत आदर्श उभा केला. संभाजीराजे मृत्युंजय धर्मवीर बनले! छत्रपतींच्या या निग्रही बलिदानामुळे सारा महाराष्ट्र पेटून उठला! गावागावातली तरणीबांड मराठी पोरे हाती मिळेल ते शस्त्र घेऊन संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या पराक्रमी सेनापतींच्या नेतृत्वाखाली मोगली मुलखात अक्षरश: तांडव घालू लागली! शंभूराजांच्या पश्‍चात १८ वर्षे स्वातंत्र्याचा वणवा महाराष्ट्रात धगधगत राहिला आणि याच वणव्यात हिंदुस्थानवर हिरवा बावटा फडकवण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेसह औरंग्याही जळून खाक झाला.

पुणे जिल्ह्यातील वढू (बु.) येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. त्यांच्या समाधीचे दर्शन घेताना कोण्या एका कवीने सहजपणे उद्गार काढले आहेत,

कविराजकुशल, राजकार्यधुरंधर हा सिंहाचा छावा,
पिढ्यापिढ्यांना देत प्रेरणा घेई येथे विसावा.

गुलमोहर: 

तुळापुरी कैद झाला वीर धर्मभास्कर खरा झुजांर खरा झुजांर ||
संभाशिव छावा शिवाजीचा तिलक देशाच्या सौभाग्याचा ||
शिपाई भगव्या झेड्यांचाहा जीsssजी

मानाचा मुजरा !

व्यर्थ न हो हे बलिदान!

दुर्दैवाने आजच्याही घडीला असेच म्हणावे लागतयं

(चान्गले लिहीलय)

इतिहास फार कठोर झाला, त्यांच्या बाबतीत.
थोरल्या महाराजांना जर अधिक थोडे आयूष्य लाभते तर ..

>>त्या "मुद्रे" चा अर्थ मिळेल का कोठून?<<

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।

फारएण्ड हा त्या मुद्रेचा मराठी मध्ये अर्थ:

शिव पुत्र श्री शंभो याची राजमुद्रा आकाशा प्रमाणे अमर्याद आहे व
ज्याच्या अंकाच्या आधारावर आश्वस्त
अशी मुद्रा कोणाच्यावर छत्र म्हणून असणार नाही
(कोणाच्याही वर छत्र म्हणून राहील)

वेताळ, अतिशय मनपोषक लेख! आजच्या आमावस्येला मृत्युंजय हे नाव संभाजीराजांच्या बलिदानामुळे पडले आहे काय?
आ.न.,
-गा.पै.

अत्यंत प्रभावी पद्धतीने केलेली लेखाची मांडणी खूप भावली. विशेषतः अमावास्या ही खगोलीय आणि गुढी पाडवा ही हिंदुंसाठी धार्मिक अशा या दोन घटना या वीरपुरुषाच्या मृत्युशी निगडित करण्याचा घाट औरंगजेबांने घातला आणि त्याला कारणीभूत झाले आमच्याच अस्तनीत असलेले गणोजी शिर्क्यासारखे निखारे.

आपल्या सख्ख्या बहिणीचे कपाळ आपल्या कृत्यामुळे पांढरे पडेल याची जराशीही क्षिती गणोजीला वाटू नये ? हे मराठेशाहीचे दुर्दैव खरे.

मानाचा मुजरा राजांना!!
अप्रतिम लेख आहे वेताळजी!
क्रौर्याची परिसीमा पार झाली!>> दरवेळेस शंभूराजांबद्लची ही माहिती वाचली की काटा येतो, मनुष्य मनुष्याला इतक्या हिंसकतेने कसाच मारू शकतो, हे काही केल्या उमगत नाही. त्रासदायक मृत्यूनंतर निष्प्राण देहावर अंत्यसंस्कार तर सोडाच पण त्या देहाच्या अवहेलनेचीही परिसीमा.. विक्षिप्तपणाचा कळस.

महाराजांना नैसर्गिक मृत्यू येत नव्हता>> दुर्दैव हे की त्यांच्या सहनशक्तीचा मृत्यूनेही अंत पाहिला!

स्वराज्य-वीराला साक्षात दंडवत!

छान.

>>>> दुर्दैव हे की त्यांच्या सहनशक्तीचा मृत्यूनेही अंत पाहिला! <<<<
तिथेच ओशाळला मृत्यू
अन येथिल प्रत्येक मराठा वीराने हीच विजिगीषू वृत्ती बाळगली, म्हणुनच बचेन्गे तो और भी लढेन्गे म्हणणारे दत्ताजी इतिहासात अजरामर झाले. मुरारबाजी, बाजीप्रभू, तानाजी वगैरे माहित झालेली नावे, पण प्रत्यक्षात त्यान्चे सारखेच शेकडो/हजारो मराठ्यान्नी प्राणान्ची बाजी लावून हा मरहठ्ठा देश तगवला, अन म्हणुनच आज आपण इथे सुखनैव जगतो आहोत.

मला आलेल्या एका मेलमध्ये संभाजीराजांच्या क्रूर छळाचं वर्णन केलेलं होतं....
ते इथे देत आहे...... प्रचंड चीड आली वाचून आणि दु:खही झालं Sad

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

गुढीपाडवा म्हणजेच धर्मवीर...छत्रपति संभाजी महाराज पुण्यतिथी....!!!

( हिंदू - "सिंधु नदीच्या सभोवताली वसलेले..."हिंदू"......यात धर्म भेद नाहीच नाही". )

गुढीपाडवा म्हणजेच छत्रपति संभाजी महाराज पुण्यतिथी.

पाडवा. हिंदुं नववर्ष दिन. या दिवशी हिंदु घरोघरी गुढ्या उभारतात. त्याची 'याद' मनात ठेऊन औरंगजेबाने आजची संध्याकाळ निवडली होती. की उद्या पहाटे या हिंदुंना - काफरांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असणार...्या राजाच्या मस्तकाचीच गुढी - भाल्यावर टांगवून मिरवून दाखवू.

बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदुशकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानूसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे 'तख्तेकुलाह' म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेऊन त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती.

अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढलेली होती. मोगलांमध्ये ईदपेक्षाही उत्साहाचे वातावरण होते. दुतर्फा फौजेतील सैनीक महाराजांवर व कवी कलशांवर दगडे भिरकावीत होते. त्यांना भाल्याने टोचीत होते. त्यांचे नगारे वाजत होते, कर्णे थरारत होते. बारा ईमामांचे झेंडे फडकत होते. रायगडचा राजा, महाराजांचा व जीजाआऊचा शंभूबाळ आज रांडा पोरांच्या विटंबनेचा विषय झालेला होता.

पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर त्याला "हिंदू राजास" हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त - लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.

बलिष्ठ शरीर यष्टीचा एक पठाण कविराजांच्या छातीवर बसला. दोघांनी त्यांचे पाय उसाचे कांडे पिळगटावे तसे मागे खेचले. दोघांनी आपल्या राकट हातांनी कविराजांची मुंडी धरली. त्या पठाणाने कविराजांच्या जबड्यात हात घातला. कविराजांचे मुख रक्ताने भरून गेले. त्या धटींगणाने कविराजांची जीभ हाताने बाहेर खसकन खेचली. एकाने ती वीतभर लांब बाहेर आलेली जीभ कट्यारीने खचकन छाटली. कविराजांच्या तोंडातून रक्ताचा डोंब उबळला. संभाजी महाराजांचीही जीव्हा अशीच छाटली गेली. पहाणार्यांचेही डोळे पांढरे पडले. असूरी आनंदाने आवघी छावणी गर्जत होती.

कवी कलशांवर होणारे अत्याचार ही जणू संभाजी महाराजांवर होणार्या अत्याचारांची रंगीत तालीमच असायची. संध्याकाळ झाली. शंभू महादेव खांबास घट्ट बांधून ठेवलेले होते. स्वाभीमानाने तळपत झळकणार्या तेजस्वी योग्यासारखे. ज्यांच्या तेजाने शेशही डळमळून जावा अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे. अविचल. अभेद्य ! आभाळात अभिमानाने मस्तक उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे.

दोन दैत्य पुढे सरसावले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसर्याने समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या. त्या राक्षसांना जोर चढावा म्हणून कुराणातील आयते वाचले जात होते. रण वाद्यांचा दणदणाट होत होता. "दीन दीन" "अल्लाहो अकबर" च्या घोषात राजांची त्वचा डाळिंबाच्या टरफला सारखी सोलली जात होती. जास्वंदीसारखा लाल बुंद देह यातनांनी तळमळत होता. रक्ता मासाच्या चिंध्या होत होत्या. संपूर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडे पेलत दोन गाझी (धर्मेवीर) पुढे आले. त्या दोघांचेही हात पाय असे अवयव एक एक करून तोडून टाकले. एकाने खांड्याचे धारधार पाते संभाजी राजांच्या मानेत घुसवले. व हळू हळू कुराणातील आज्ञेप्रमाणे 'हलाल' करीत शिर चिरत धडावेगळे केले !!!

स्वातंत्र्य सुर्या आता तरी प्रसन्न हो. हिंदु धर्माच्या रक्षणार्थ एक तेजस्वी राजा आज स्वातंत्र्य देवतेच्या वेदीवर आपली आहूती देत आहे. आता तरी प्रसन्न हो.....!!!

ह्या महान हिंदूधर्मवीर छत्रपति संभाजी महाराजांस त्रिवार कोटी कोटी नमन...!!!

महाराजांना त्रिवार वंदन !!! वाचून रक्त उसळलच पाहीजे !!
ह्या महान हिंदूधर्मवीर छत्रपति संभाजी महाराजांस त्रिवार कोटी कोटी नमन...!!!

Pages