उपेक्षित

Submitted by झेलम on 20 September, 2007 - 10:05

"मी म्हणतो कशाला द्यायची ती वर्गणी?" हातात पर्स घेऊन बाहेर दारावर आलेल्या मुलांना वर्गणी द्यायला चाललेल्या मालतीबाईंवर मनोहरपंत करवादले.
"अहो असं कसं? यावेळेस पहिल्यांदाच ठेवतोय आपण सोसायटीचा गणपती! आपला थोडा हातभार नको का लागायला?"
"कशाला अजून एक गणपती म्हणतो मी? इथे मंडळं काय कमी आहेत? घाला म्हणावं धुडगूस आता दहा दिवस."
मनोहरपंतांच्या कुरकुरीकडे जरासा कानाडोळा करून मालतीबाई दार उघडायला गेल्या.

***
मनोहरपंतांच्या अशा वागण्याची मालतीबाईंना सवय झाली होती. आताशा सोसायटीतले लोकही त्यांना जरासे बिचकूनच वागत. मालतीबाई मात्र सर्वांच्या लाडक्या आजी झाल्या होत्या. कुणाचे आईबाबा बाहेर गेले तर जरावेळ मुलांना सांभाळण्यात, खाण्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून वाटण्यात, खालच्या मोकळ्या जागेत फुलझाडं लावण्यात त्यांचा छान वेळ जाई. आताही सोसायटीचा गणपती बसवायचं ठरलं तेव्हा दररोज सकाळ संध्याकाळ आरतीला जायचं त्यांनी ठरवलं होतंच. मुलांनी त्याना मखर करण्यासाठीही मदतीचं साकडं घातलं होतं.

दोन-तीन दिवसच राहिले होते बाप्पांचं आगमन होण्यात. आज सुरुचीला थोडावेळ मालतीबाईकडे ठेवून बाजारात गेलेली तिची आई तिला परत न्यायला आली होती. मनोहरपंत फिरायला बाहेर गेले होते.
"मावशी, त्रास नाही ना दिला रुचीने?"
"नाही गं, अगदी गोड पोर आहे. आताच वरणभात भरवलाय मी तिला. तू स्वयंपाकाची घाई करू नकोस."
"मावशी एक विचारू? आपलं गणपतीचं ठरलय त्याचा काकांना फार त्रास होतोय का हो? परवा राजेशला भेटले तेव्हा म्हणत होते काहीसं. मावशी समजदार आहेत हो आपल्या इथले मेंबर्स. अगदी मुलंपण. कुणी जोरात गाणी वगैरे लावणार नाहीत. हौसेनं करू उलट आपण सगळं."
"हो गं स्मिता. तू नको काळजी करू. अगं ह्यांचा विरोध फक्त बोलण्यात असतो. पण आरतीला येतील की नाही बघ दरवेळेस. मी समजावेन त्यांना. असे नव्हते ग हे पूर्वी".
मावशींच्या डोळ्यांत तरळलेलं पाणे बघून स्मिता म्हणाली "काय झालं मावशी? दुखावलं का मी तुम्हाला? अहो आम्ही तुम्हाला इतकं आपलं मानतो ना? मग मावशी तुम्हीपण आपलेपणानं सांगा ना काय झालं?"
मालतीबाईंना चाळीस वर्षांपूर्वीचा काळ डोळ्यासमोर दिसू लागला. कोकणात काकाकडे वाढत असलेल्या पोरक्या मालतीचं मुंबईच्या मनोहरपंतांशी शुभमंगल झालं. चुलत बहिणींसारखं गडगंज स्थळ नाही मिळालं. कसं मिळणार? इतका हुंडा कोण देणार? मनोहरपंतानी फक्त नारळ आणि मुलगी घेऊन लग्न केलं तेव्हा काका काकूनी सुटकेचा निश्वास टाकला. मनोहरपंतही सडाफटिंगच होते. त्यांचीही आई लहानपणीच गेलेली आणि वडील जाऊनही पाच वर्षे झालेली. भाऊ-बहिण कुणीच नाही. शिक्षण बेताचंच होतं पण एका कंपनीत कायमची नोकरी होती. दोन खणांची का होईना जागा होती वडिलांनी घेतलेली. त्याचं कर्जही ते फेडत होते. पण एकूणात बरं चाललेलं. मालतीबाईना तर त्या छोट्याशा जागेतही स्वर्ग गवसल्यासारखं झालं. संसाराची त्याना आवड होतीच. मुंबईला आल्यावर त्यांनी त्या दोन खोल्याही छान सजवल्या. मनोहरपंतांना आवडीचं खाऊपिऊ घालण्यात त्यांचे दिवस सुखात जाऊ लागले. मनोहरपंतानाही मालतीबाईंच्या छोट्यामोठ्या आवडी पूर्ण करण्यात वेगळाच आनंद मिळू लागला. दोघं एकमेकांत गुंतत गेले.

आपलं माणूस जाण्याचं दुःख काय असतं याची दोघांना पुरेपूर कल्पना असल्याने त्याना एकमेकांना आधार होता. बरीच वाट बघून मुलबाळ झालं नाही तेव्हा मालतीबाई किती निराश झाल्या होत्या पण त्यावेळेस त्याना धीर दिला तो मनोहरपंतानीच. हळूहळू मग मालतीबाईही त्या दुःखातून बाहेर आल्या. अशीच काही वर्षं गेली. एव्हाना जागेसाठी घेतलेलं कर्ज नुकतच फिटलं होतं. आता कुठे जराशी शिल्लक स्वतःसाठी रहात होती. कंपनीतही मनोहरपंत आता सुपरवाइझर झाले होते. कामगार त्याना मानत असत. जरा कुठे जम बसायला लागला होता तर कंपनीत कामगार आणि मालकाच्या झगड्याने तोंड वरती काढलं आणि वर्षभरात मालकाने कंपनीला टाळं लावलं. कामगारानी मालकावर केस केली, भरपाई मागितली पण कोर्टाच्या तारखांवर तारखाच पडत गेल्या. अडनिडं वय झालेल्या मनोहरपंताना मग नोकरी अशी धड मिळालीच नाही. कुठे ओळखीपाळखींच्याकडून मिळणार्या छोट्या कामानी चरितार्थ चालेनासा झाला. शिलकीची गंगाजळी संपत आली तसा मग मनोहरपंतांचा विरोध पत्करून मालतीबाईनी हातात पोळपाट लाटणं धरलं. मनोहरपंतांच्या मनात मात्र आपण बायकोला पोसू शकत नाही या जाणीवेने घर केलं. आता आपला काय उपयोग आहे असा विचार करकरून ्त्यांना नैराश्य आलं, मनात न्यूनगंड निर्माण झाला. आपलं कुणी ऐकत नाही, आता आपल्याला महत्त्व नाही असं वाटायला लागलं. त्यातूनच मग एखाद्यावर उगीच रागावणं, कुणी काही सांगितलं की आपला विरोध नोंदवून आपलं अस्तित्व दर्शवणं असं सुरू झालं. कालपरत्वे मालतीबाईंचा जम बसला. त्यांच्या लाघवी स्वभावाने आणि हातगुणामुळे त्याना सारखी बोलावणी असायची त्यामुळे परिस्थिती सुधारली पण मनोहरपंतांचा स्वभाव तसाच कडवट राहिला.
मालतीबाई स्मिताला आपली कहाणी सांगत असताना तिचेही डोळे भरून आले.
"काळ पण कसा असतो बघ स्मिता. आता दोन वर्षांपूर्वी केसचा निकाल लागला आमच्या बाजूने आणि आम्हाला चांगली नुकसानभरपाई मिळाली. मग आमचं शहरातलं जुनं घर विकून इथे लांब ही जराशी मोठी जागा घेतली. नाहीतरी आता कुणासाठी जपून ठेवायचा तो मिळालेला पैसा? आयुष्याच्या शेवटी तरी घेऊ थोडा उपभोग. आता सगळं ठीकाय गं पण तो काळ फार वाईट गेला. तरी मी बरीच लवकर सावरले. कष्टांची मला सवय होतीच त्यामुळे त्याचंही काही वाटत नाही पण ह्यांच्या मनात आपल्याला कोणी विचारत नाही या जाणिवेने घर केलं ते केलंच. आता पाच मिनिटात सांगितली तुला आमची कर्मकहाणी पण ह्यांची उमेदीची सगळी वर्षं गेली ना गं. सगळं कळतंय बघ मला. आता सारं काही छान आहे तर त्यानी आपल्या कोषातून बाहेर यावसं वाटतं बघ. त्यांचा पूर्वीचा हौशी स्वभाव मी पाहिलाय. देव करो आणि ते पूर्वीसारखेच होवोत. पण तोपर्यंत मी नाही तर कोण सांभाळणार यांना?"
***

स्मिता सुरुचीला घेऊन घरी गेली तरी तिच्या डोक्यात मावशींचीच कहाणी घुमत होती. राजेश ऒफिसमधून आल्यावर तिने लगोलग सगळा वृत्तांत त्याच्या कानी घातला. रात्री मग राजेश बाल्कनीत उभा राहून बराच वेळ काहीतरी विचार करत होता.

***
बेल वाजली तसं मनोहरपंतानी दार उघडलं. बाहेर सोसायटीचे तमाम मेंबर्स होते. राजेश त्यांच्या अग्रभागी होता. इतक्या लोकाना पाहताच मनोहरपंतांच्या कपाळाला आठ्या पडल्या पण त्याना बोलू न देताच राजेश म्हणाला, "काका आम्ही तुम्हाला विनंती करायला आलोय. नाही म्हणायचं नाही. तुम्ही आणि मावशी आपल्या सोसायटीचं first couple आहात. सगळ्यात सिनीअर. आता परवा गणपती येईल तर त्याची पूजा तुमच्याच हस्ते व्हायला हवी."
"माझ्या? अरे मी कशाला?" या अनपेक्षित हल्ल्याने गोंधळलेले मनोहरपंत म्हणाले.
"म्हणजे काय काका? तुम्हा दोघांचा मान पहिला. काका तुमचे आशीर्वाद असतील ना तर सारं छानच होईल. तुम्ही आम्हा सर्वांचे आवडते काका-मावशी आहात. बघा ना सगळी सोसायटीच आलेय तुम्हाला विनंती करायला. मग परवा सकाळी लवकर तयार रहा हं काका. गणपती आणायचाय आपल्याला. तुमच्याशिवाय आमचं पानच हलणार नाही."
इतक्या वर्षानी मिळालेला मोठेपणा पाहून मनोहरपंतांना गहिवरून आलं. त्यांची मान हळूच होकारार्थी हललेली बघून मालतीबाईंच्या डोळ्यात समाधानाची निरांजने तेवू लागली.

समाप्त

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त कथा झेलम! आवडली!

चांगली जमलीये कथा.

व्वा खास आहे एकदम
-प्रिन्सेस...

अगदि सहि जमलिय कथा!

खूप आवडली कथा, छानच जमली आहे Happy