सवत माझी लाडकी..

Submitted by अविनाश जोशी on 15 March, 2012 - 11:41

शेखर
डॉ कदमांच्या दवाखान्यात मी नर्व्हस होउन गेल्या तासभर बसलो होतो. हा कद्या कधी वेळेवर येईल तर शपथ. माझा जवळचा मित्र प्रख्यात डॉ होता. त्याने सकाळीच फोन करुन दुपारी तीनला बोलावले होते. आनंदाची बातमी आहे म्हणाला होता. तीनच्या आतच आल्यामुळे तिथली सर्व जुनी मासिके वाचुन झाली होती. बर पठ्ठ्या फोनवर काही बोलायलाच तयार नव्हता. बसल्या बसल्या मी गतकाळात गेलॊ.

अभियांत्रीकी आणि एम. बी. ए. केल्यावर एका जगप्रसिद्ध कंपनीत निर्यात विभागात लागलो होतो. दोन वर्षात जगप्रदक्षीणा झाल्या होत्या. एका अशाच अमेरीकेतल्या प्रवासात मला कारने ठोकले होते. पोटापासून पायापर्यंत मार बसला होता. तातडीने सॅन दिआगो जवळच्या हॉस्पिटल मधे दाखल केले. चाळीस तास बेशूद्ध अवस्थेत काढल्यानंतर अस्मादीक शुद्धीवर आले. समोर चांगले चेहरे दिसण्याची शक्याताच नव्हती पण शेरीफ आणि विमा प्रतिनिधीची थोबाड दिसली. सर्व विचारणा झाल्यावर विमाप्रतिनिधीने हॉस्पीट्लला काही टेस्ट्स सांगीतल्या. अर्थात पैसे तेच देणार असल्यामुळे माझी काहीच हरकत नव्हती. पण त्यात स्पर्म टेस्ट आहे कळल्यावर मी बंड पुकारले. तातडीने मानसोपचार तज्ञ व विधीज्ञ हजर झाले. काही म्हणा अमेरीकेत ह्या दोन धंद्यात मरण नाही. दोन तज्ञांनी मिळुन आवश्यकता पटवुन दिली. मार लागलेल्या सर्व अवयवांची चाचपणी करण्याचे विमा कंपनीने ठरवले होते. नंतर कुठलाही खटला अंगावर घ्यायची त्यांची तयारी नव्हती. शेवटी कंटाळून मान्यता दिल्यावर दोघे हलले. त्यातही जाता जाता वकीलाने मला त्याचे कार्ड दिले आणि जर विमाकंपनीच्या विरुद्ध खटला भरायचा असला तर मदत करण्याचे आश्वासनही दिले.

कंपनीचा प्रतिनिधीही आला आणि तब्बल दहा दिवसांनंतर मला जायची परवानगी दिली. कंपनीनेही भारतात परत आणण्याची राजेशाही सोय केली होती. वर दोन महीन्याची रजाही दिली होती. भारतात सर्व काळजीतच होती. सर्व अवयव शाबुत असल्याचे पाहुन सुटकेचे निश्वास सोडले गेले.
" शेखर आता तु लग्न करुनच टाक बघु " आईचे पालुपद

" अग आई आत्त निदान दहा दिवसांनी तरी सुटलो. लग्न झाल्यावर कायमचाच अडकलॊ "

" चावटपणा बास झाला. आता दोन महीने सुट्टी आहे तर तुला मुलींची फ़ौजच उभी करते. लग्न करुन टाक आणि मग कुठे उनाडपणा करायचा आहे ते कर "

तेवढ्यात कद्या आला. माझ्या खोलीत नेऊन तपासले. स्त्रीतज्ञ असला तरी त्याचे परीक्षण फार उत्तम होते.

" कद्या मला जरा सोडव बाबा. आईच्या डोक्यातल्या खुळाला गनिमी काव्याने उत्तर दिले पाहीजे "

" अरे खुळ काय . सगळेच असे म्हणायला लागले तर आमचा धंदा कसा चालायचा? "

" कद्या अरे जरा लहानपणीची आठवण ठेव. पेन्सिल तु चोरायचास आणि पट्टी मी खायचो"

" बर बाबा. मी करतो काहीतरी. आता बाहेर जाताना जरा त्रास होत असल्यासारखा चेहरा कर आणि मी जे बोलेन त्याला विरोध कर."

शक्य तेवढा वाईट चेहरा करुन मी बाहेर पडलो.

" आई शेखुला विश्रांतीची गरज आहे. अजुन त्याची प्रकृती तेवढी ठीक नाही " कदम महाराज

" नाही ग. जरा लांबच्या प्रवासामूळे दमणुक झाली आहे तेवढीच. "

" गप रे. तो डॉक्टर का तु? " आईचा माझ्यापेक्षा त्याच्यावर जास्त विश्वास.

" मला अस वाटत त्याने मूंबईतल्या दमट हवेत राहू नये. आता डिसेंबर चालु आहे तरी हवा त्याला वाईटच आहे. कमीत कमी तीन चार आठवडे तरी कोरड्या हवेत त्याने जायला पाहीजे " कदम बुवा

" मग काय करायच? एकटा त्याला कुठे पाठवायचे ? "

" आई मी एक दोन दिवसात नागपुरजवळ एका खेड्यात जातोय. मामाचा मोठा वाडा आहे. नोकरचाकरही आहेत. शेखुला घेऊन जातो. मी लगेचच परत येणार आहे पण हा राहील पुढे."

गनिमी कावा मलाच खिंडीत गाठायला लागला. कुठल्याही खेड्यात ईतके दिवस काढणे शक्यच नव्हते.

" हे बघा मला काही झालेले नाही. मी ईथेच लोणावळा खंडाळा जाऊन रहातो "

" कशाला बियर ढोसत बसायला ? काही नाही रे जा त्याला घेऊन. आणि लोणावळ्याला आपल्या बंगल्यात राहायचे असल्यास मी पण येते आणि तिथेच पाहायचे कार्यक्रम करु "

विषयाला फारच फाटे फुटायला लागल्यावर मी कदम बरोबर जायला मान्यता दिली. सकाळ्च्या फ्लाईटने नागपुरला पोहोचलो. त्याच्या मामाने नागपुर विमानतळावर गाडी पाठवली होती. गाडी जुनी डॉज पण सुस्थितीत होती. हल्ली अशा भव्य गाड्या बघायला मिळणेही अवघड झाले आहे. सावरगावहुन गाडी पुढे गेली आणि एक सुंदर बंधारा दिसला. पाण्याला लागुनच एक संत्राची बाग होती आणि एका बाजुला एक भव्य चिरेबंदी वाडा होता. कदमचे मामा सरदेशमुख ह्या नावाला साजेसा.

आत शिरताच छान सारवलेले अंगण, पड्वी आणि झोपाळा होता. मामा रावजी मोठे उमदे व्यक्तीमत्व होते. कद्याने माझ्याविषयी सर्व माहिती पुरवलीच होती.

" हे बघा शेखरराव आता मुंबई, घाईगडबड सगळे विसरायचे. ईथे लोक निवांत असतात. ईथला निसर्गही थबकलेला असतो. सकाळी उठायच. नाश्ता आट्पुन बागेत किंवा तळ्यावर जायचे. जेवण वामकुक्षी आणि गप्पाटप्पा तुम्हाला आवडत की नाही बघाच."

" एका अटीवर. मला शेखर म्हणायचे. "

आणि खरच पहिले चार दिवस कसे गेले कळले सुद्धा नाही. मामांची दोन मुले आणि एक मुलगी साधारण माझ्याच वयाची होती. बहीण भावंडांच सुख मी पुरेपुर उपभोगत होतो. झोपाळा आणि तळ्याचा बंधारा माझी आवडती ठिकाणे झाली. झोपाळा तर मला ईतका प्रिय झाला की मी नंतर तो लोणावळ्याच्या बंगल्यातही बसवुन घेतला. माझ्या परदेशातील गमती जमती , त्यांच्या गावातल्या गमती ह्यात वेळ कसा जात होता कळ्लेच नाही. कद्या चा मुक्कामही लांबला. आठवड्यानंतर सकाळी मामा मामी गडबडीत दिसले.

" काय मामा अगदी गडबडीत ? "

" हो रे आज जवळ दत्तवाडीत लग्नाला जायचे आहे. अरे तुम्ही दोघेही चला ना. जरा विदर्भातली देशमुखी लग्न तर बघा "

" नको मामा. कुणी ओळखीचे नाही. "

" ही मुंबई नाही. ईथला माणुस पहील्यांदा नाव नाही विचारणार तर जेवण झाले का विचारेल. चला चला. त्यातुन हे बाजी देशमुख म्हणजे प्रस्थ आहे. गडगंज श्रीमंती आहे आणि लोकोपकार करण्याची आवड आहे. एकुलत्या एक मुलीचे लग्न आहे. चला मी वाट पहातो आहे. "

आवरुन त्यांच्या भल्यामोठ्या गाडीने पोहोचलॊ. दुरुनच ऎसपैस मंडप दिसत होता. जवळ गेल्यावर काहीतरी खटकत होते. मांडवात लगीनघाई दिसत नव्हती. शांतता पसरली होती. मामा लगबगीने मांडवात शिरले. मामी स्त्रियांच्या घोळक्यात गुप्त झाल्या. आम्ही मांडवा बाहेरच उभे होतो. मामांना बराच वेळ लागला तेंव्हा आत गेलो. मामा बहूतेक वधुपित्याशी बोलत होते. आम्ही जवळ जाताच त्यांनी बोलणे आवरते घेतले. त्यांच्या जवळच वधुवेशात मुलगी होती. तिचा चेहरा दु:खी नव्हता तर रागाने लालबूंद झाला होता. मामा आमच्या जवळ आले आणि हळु आवाजात म्हणाले.

" अरे पोरांनो जरा गडबड आहे. वरात आत्ताच परत गेली आहे"

" काय झाले. आणि मुलगी तर रागावलेली दिसतेय "

" हो रे शेखर. तिचे नाव शुभा. कशी नक्षत्रासारखी पोर आहे. ज्याच्या घरी जाईल त्याचे सोन करेल. नवरा मुलगा तिच्याच बरोबर नागपुरात शिकत होता. दोघे एकत्र फिरतही होते. येथेही तो लग्नापुर्वी दोन तिनदा येऊन गेला होता. दोन्ही घर संपन्न, दोघांकडेही सोयरीक मंजुर होती. पण आयत्यावेळेला नवरदेवाला काय दुर्बुद्धी झाली कुणास ठाऊक. आत यायला तयारच होईनात. अव्वाच्या सव्वा हूंड्याची मागणी केली. बाजींची तयारी होती, पण शुभाने लग्न करण्याचे नाकारले."

बोलता बोलता मामांचा आवाज मोठा होत गेला होता. आपले नाव ऎकताच शुभाने आमच्याकडे बघितले. दोन डॊळ्यांचे ज्वालामुखी आग होत होते. संतापाने काया थरथरत होती. मामांनी आमची ऒळख करुन दिली.

" रावजीमामा मला कुणाची सहानभुती नको आहे. "

" अग पोरी जरा समजावुन घे. दिला असता हूंडा तर काय बिघड्ले असते. नाहीतरी माझ्यानंतर सर्व तुझेच आहे. " बाजी

" हो पण अशी तडजोड मला नको "

" रावजी ही मुलगी कोण्याच्या ऎकण्यातली नाही. आईविना वाढलीय आणि हट्टी झाली आहे. दिला असता हुंडा. "

" बाबा. मी हूंडा मागितला म्हणुन चिडली नाही. त्याच्या वडीलांनी मागीतला असता तर वेगळी गोष्ट होती. पण ज्याच्या बरोबर जन्म काढायचा आणि जो मला गेली चार वर्षे अगदी जवळुन ऒळखतो, त्यानेच अशी अडवणुक करावी ह्याचा मला राग आहे. हे आत्ताच झाले हे बरे झाले." पोरगी मोठी मनस्वी होती.

" रावजी तुम्हीच सांगा. आपले देशमुखी रिवाज तुम्हाला माहित आहेतच. वरात परत गेली कळल्यावर कोण हिला स्वीकारणार आहे? "

मला काय झाले समजायच्या आतच मी बोलुन गेलॊ " माझी तयारी आहे अगदी ह्या मांडवात सुद्धा. "

शुभा

मी वाढले या आडगावात. गाई, म्हशी, बागा, गड्यांची मुले यातच मोठी झाले. शिक्षण तर छानच चालले होते. पण मुलात खेळ्ल्यामुळे आडदांड्पणाही फार वाढला. त्यातुन वडील जमीनदार. वंशपरंपरेनुसार हट्टीपणा आलाच. १२ वी नंतर नागपुरात शिकायला गेले. बाबांनी हॉस्टेलला न ठेवता एक बंगलाच घेतला आणि दोन नोकरही नेमले. मोठ्या शहरात आल्यावर माझ्यात संयमीतपणा आला. परंतु मी फ़्रेंड सर्कल मधे सरकु आणि धुमकेतू नावानेच प्रसिद्ध झाले. अशातच माझी समीरची गाठ पडली. दोघेही खेड्यातच मोठे झालो असल्याने चटकन गट्टीही जमली. तो अभियांत्रीकी करत होता तर मी कॉमर्स. दोघांच्या आवडीनिवडीही जुळत होत्या. आता मागे बघताना असे वाटते की शहरी मित्रमॆत्रीणींशी चटकन जमवुन घेता येत नसल्याने आम्हीच एकमेकांशी जुळवुन घेत होतो.

समीर जास्त पटकन शहरी वातावरणाशी जुळला. सुट्ट्यात आम्ही पिकनीकला जात होतो. दोनदा तर आमच्या घरीही गेलो होतो. त्यावेळेसच त्याचे काही वागणे खटकले होते. विशेषत: बाबांनंतर ईस्टेट विषयीचे प्रश्न. अर्थात त्या वेळेस मला प्रेमाची धुंदी एवढी चढली होती की ह्या गोष्टींना त्यावेळेस मी फारसे मह्त्वच दिले नाही. प्रेम कसले ते? आकर्षणच जास्त होते. मी त्याच्यावर जीवापार प्रेम करत होते पण तो माझी काळजी घेतो आहे असे कधीच वाटले नाही. तो दुसऱ्या मुलींच्या मागेही नसायचा पण बऱ्याच वेळेला त्याचा स्वार्थीपणा, त्याचे ओरबाडून घेणे जाणवायचे.

दोघांनीही पदव्या सहा आठ महिन्यांच्या कालावधीतच घेतल्या. समीरचे अमेरीकेला जायचे ठरत असल्याने त्याच्या मुंबईच्या चकरा विविध परिक्षा सुरु झाल्या. मी मात्र गावी परतले. पुर्वी मला गावात करमत नसे असे कधी झाले नाही. पण आता मात्र मी एकटी पडल्यासारखी वाटायला लागले. आमच्या बाबांना समीर पसंत होता माझ्यामुळे. एकदाच मला ते म्हणाले " जे काही करायचय ते विचार करुन कर. तुला मी कधीच नाही म्हणले नाही. तुझ्यावर माझा पुर्ण विश्वास आहे " मला त्यावेळेला कळत नव्हते आणि कळले तरी वळत नव्हते. समीरच्या घरी मला नाकारायचा प्रश्नच नव्हता. सुंदर, सुशिक्षीत आणि कोट्याधीश बापाची एकुलती एक मुलगी.

अमेरिकेला समीर जायच्या आधी लग्न उरकुन घ्यायचे ठरले. साखरपुडा आमच्याच घरी करायचे ठरले. त्या दिवशी समीरचे बरेच नातेवाईक आले होते. बाबांनी मानपानात काही कमतरता ठेवलेली नव्हती. आमची श्रीमंती पाहुन समीरचे नातेवाईक फारच हरकले होते. समीरच्या आईची वखवखलेली नजर तर मला विचीत्रच वाटली. मी समीरशी हे बोलताच त्याच्या उदगारांनी तर मला सावधच केले. तो चटकन म्हणुन गेला " जाउदेग. नाहीतरी नंतर सगळे माझेच होणार आहे" माझे खटकणे समीरच्या लक्षात आले असावे. तो आमच्याच ईथे तीन दिवस राहीला. लग्न आठवड्यानंतरच असल्याने मित्रमैत्रीणीना बोलावण्यासाठी आम्ही नागपुरला दोघेही दोन दिवस जाऊन राहीलो. आणि कायम एकत्र येण्यासाठी वेगळे झालो.

गावात लग्नाचा उत्साह होता. सर्व गावच झगमगुन गेले होते. सरदेशमुखांच्या घरचे लग्न प्रत्येक गावकरी स्वत:चेच मानत होता. लग्नाच्या दिवस उगवला. सर्वच जण लगबगीत होते. मी गौरीहार पुजत होते. मुहुर्त गोरज होता आणि वरात दहा पर्यंत येणार होती. मैत्रींणीच्या गराड्यात मी अडकले होते तरी जीवाला काहीतरी अनामिक हुरहुर लागली होती. अकरा वाजुन गेले तरी वरातीचा पत्ता नव्हता. बाबांची कसली तरी उलघाल चालली होती. थोडक्या वेळेत कळले की वरात गावाबाहेरच थंबली आहे. माझे काका दोनदा जाऊनही आले पण वरात आत यायला तयार नाही. बाबांकडे मी धावतच गेले.

"बाबा काय झाले? "

" काही नाही ग. येतील आत्ता ते"

" अरे पण असे बाहेरच का थांबले आहेत?"

" काय सांगायच पोरी ? समीरचा अमेरीकेचा खर्च सुमारे पंधरा लाख रुपये आणि दोन किलो सोन्याचे दागीने दिल्याशिवाय आत येणार नाही म्हणताआहेत."

" काय ?"

" तुझे काका दोनदा जाऊन समजाऊन आले. मी त्यांना नंतर देईन हे सांगुन आलो. त्यांच्या पाया पडुन आलो. आता सांग पोरी सोन एकवेळेला ठीक आहे पण एवढी कॅश कुठुन जमा करणार? तरी मी प्रयत्न करतोच आहे. नागपुरातही एक दोन ठिकाणी शब्द टाकतो आता. "

" पण समीर काय करतोय? तो त्याच्या वडीलांना समजाऊन नाहीका सांगु शकत. ?"

" पोरी तुझा समीरवर किती जीव आहे हे माहीत आहे. पण ही मागणी वडीलांची नाहीच आहे. ते बिचारे समजाऊन सांगत आहेत. मागणी केलीय समीरने आणि त्याच्या आईने"

"Oh I see . !!"

"बाबा! वरात परत जाउदेत. अशा मागण्यांसाठी तुम्ही शब्द पसरणे मला नाही आवडणार. मलाही काही गोष्टी खटकत होत्याच पण मी जुळवून घेत होते. हा मात्र कहरच झाला."

" अस काय करते आहेस. वेसेवरुन वरात परत गेली तर लोक काय म्हणतील ? तुझे परत लग्न जुळणेही अवघड होईल."

" पुर्ण विचार करुनच मी हा निर्णय घेत आहे. काका, तुम्ही परत जा आणि त्यांना सांगा की लग्न मोडले. त्यांची आता ईच्छा असली तरी मुलगी लग्नाला तयार नाही. "

बाबा आणि काकांच्या डोळ्यात आसु ही होते आणि सुटल्याचे भावही होते. मैत्रिणीही जाम चिडल्या होत्या. वचन देऊन फसवले, हूंडा घेता आहेत अशा लोकांना कायदाच दाखवला पाहिजे अशा चर्चा सुरु झाल्या. तेवढ्यात रावजी काका येताना दिसले. आता काही दिवस तरी अशा प्रकारांना मला तोंड द्यावेच लागणार होते. काकांबरोबर अजुनही दोघेजण आले होते. त्यातल्या त्यांच्या भाच्याला मी थोडे ऒळखत होते. सतीश नाव. सतीश कदम. दुसऱ्याला मात्र मी प्रथमच पाह्त होते. बाबाही त्यांच्याशी बोलु लागले. माझे नाव कानावर पडले म्हणुन मी टवकारुन पाहिले तर तो तरुण म्हणत होता. " माझी तयारी आहे अगदी ह्या मांडवात सुद्धा. "

शेखर

मी बोलल्यावर आजुबाजुचे सगळेच टवकारुन बघायला लागले. मामा चकीतच झाले. सतीश तर म्हणालासुद्धा बहुतेक अपघातात ह्याच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय.

" ओ मिस्टर काय म्हणालात? " वाघीण गुरगुरली

" मी चक्क मराठीत बोललो. आणि मला वाटते आपण सुविद्य आहात. आता परत सांगतो. मला तुम्ही आवड्लात. तुमचा विजीगीषू स्वभाव आवडला. दोघांचीही लग्न व्हायची आहेत. माझी तयारी आहे अगदी ह्या मांडवात सुद्धा. " मी ही ईरेला पेटलो होतो.

" अरेच्या बायको म्हणजे काय भाजी खरेदी आहे का? कोण तुम्ही "

" मी शेखर सुर्यवंशी. बी ई, एम बी ए. एका प्रसिद्ध कंपनीत निर्यात विभागात आहे. मुंबईत स्वत:चे घर आहे. लोणावळ्याला बंगला आहे. एकुलता एक आहे आणि मुख्य म्हणजे सतीश सारखे असंख्य मित्र आहेत. अजुन काही माहिती हवीय ? "

" तुम्ही माझ्याशी का लग्न करताय ? "

" लोक का लग्न करतात? आणि एकच सांगतो मला तुमच्या संपत्तीचा लोभ नाही. तु सोडून तुझ्या बाबांनी सर्व संपत्ती दान करायला अजिबात हरकत नाही. तुझे दान मात्र मलाच ."

" दान ? " स्वराची पातळी खाली आली होती.

" कन्यादान "

" अरेच्या तुम्ही तर हक्कच सांगु लागलात"

" तु विचारतेस तेवढे प्रश्न जर शकूंतलेने दुष्यंताला विचारले असते तर पुढचे रामायणच घडले नसते. "

हास्याचा फवारा. वातावरणातला ताण हलका. वाघीण हसली तर कशी दिसेल?

" शुभे तुला असाच नवरा हवा. समीर म्हणजे एकदम कंडम होता. तु वेळेवरच सावध झालीस ते बरे झाले. त्यातुन रावजी काकांचे संबध जुने आहेत. "

" हो पोरी. हा येऊन एकच आठवडा झाला आहे पण सर्वांना याने जीव लावला आहे. मुली बघणे टाळावे म्हणुन सतीश त्याला ईथे घेऊन आला. सहज म्हणुन मी येथे त्याला आणले आणि हा योगायोग घडला. तेंव्हा मुली तु नसत्या शंका घेऊ नकोस. तुझ्या जागी माझी मुलगी असती तरीही मी तिला हेच सांगितले असते. बाजी तुझे काय म्हणणे आहे ? "

" रावजी माझ्या तोंडुन शब्दच फुटत नाहीत. माझी लाज या पोराने वाचवली. पण ह्याच मांडवात लग्न करायचे असले तर ह्याच्या घरच्यांचे काय ? "

" माझ्या घरी आई आहे. बालपणीच वडील गेले. तिने लग्नाला हजर रहावे असे वाटते. पण मी लग्न करतोय म्हणल्यावरच ती माऊली खुश होईल. "

" शेखु मीच तुझ्या घरी फोन करतो. तु केलास तर तु तिची फ़िरकी घेतो आहेस असे वाटेल. ईथे रेंज नाही. मामा जरा मी तुमची गाडी घेऊन फोन करुन येतो."

" अरे सतीश घरातन लॅंड्लाईन वरुन कर ना. "

" नको मी जरा जाऊनच येतो. पण प्रथम विचारतो की शुभदादेवी आपण ह्या पामराला पदरात घेऊन त्याला उपकृत करणार आहात ना? नाहीतर माझे फोनचे पैसे वाया जायचे "

एक सुंदर लाजणे

" जा हो तुम्ही. पोरगी चार वर्षांनी प्रथमच शुद्धीवर आली आहे. आता मुहुर्त रात्री अकराचा आहे. तोच गाठू " बाजी

" चला शेखर राव तुमच्या कपड्याची व्यवस्था करु. तुम्हाला खास आमचा सरदेशमूखांचा लग्नातलाच पोषाख देतो. आमच्या घराण्यात तो पुर्वापार चालत आला आहे. उगीच नाही म्हणु नकोस. नाहीतर तु आणि सतीश ईथेच थांबा. मी सगळ्यांना घेऊनच येतो. माझ्या घरीच लग्न आहे म्हणल्यावर गावकरीही येणारच. बाजीराव जरा जोरात होउदे. आणि शुभे तुला काही प्रश्न विचारायचे असले किंवा अगदी लेखी परीक्षा घ्यायची असली तरी घेऊन टाक. "

" काहीतरीच काय काका " वाघीणीच हरीण झालं होतं. तेवढ्यात कद्या आलाच.

" हे बघ सतीश मी जरा घरी जाऊन येतोय. तु ईथेच थांब. आणि उगाच कबाब मे हड्डी होऊ नकोस "

" मामा मी तुमच्याबरोबरच येतो. तेवढीच तुम्हालाही मदत. फारतर मी लगेच परत येईन. तो पर्यंत कबाब ही संपले असतील. "

बातमी पसरली. परत मांडवात तो जोश आला. आम्हाला दोघांनाच ठेवुन सर्वजण ईकडे तिकडे पांगले. आत्तापर्यंत शुभाने धरलेला धीर सुटला होता. ती ओक्साबोक्षी रडु लागली. मी शांत झालो. प्रवेग थांबवण्यात काहीच अर्थ नव्हता.

" शुभे तु आत्ता अगदी पोटभर शेवटचे रडुन घे. "

" म्हणजे? "

" या पुढे कधी तुझ्यावर रडायची पाळी येणार नाही. " खुदकन हसली आणि माझ्याकडे सरकली.

लग्न वेळेत लागले. लग्न लागल्यावर आशीर्वादासाठी रावजींपुढे वाकु लागलो.

" नाही नाही शेखरराव पहिला मान यांचा " ते बोट करत म्हणाले. आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला.

" शुभा ही माझी आई. आणि आई ही माझी बायको"

" शेखु . तुला इकडची बायको करायची होतीस तर मला सांगायचे. मी पण आले असते "

" पण आई तु ईथे कशी ? "

" अरे ते तुझ्या कद्याला विचार . त्याने कायकाय उचापती करुन मला ईथे आणले ते. "

" हे बघ शेखु. आता ईथुन आपण मामाच्या घरी जाऊ. उद्या सकाळच्या विमानाने आपण सर्व मूंबईला जातो आहे. एअरपोर्टवरुन तुम्हा दोघांना खास गाडी सरळ लोणावळ्याच्या बंगल्यावर घेऊन जाईल. बंगल्यात सर्व जय्यत तयारी आहे. तुझी ती आवडती गाडीही बंगल्यावर पोहोचेल. मित्र परिवाराचे मी बघुन घेतो. आठ दहा दिवसांनी तु परत आल्यावर दणक्यात पार्टी करु "

शुभाला आमच्यातली आत्मीयताही जाणवत होती. सतीश माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे तिच्या लक्षात आले होते.

" सतीश मी तुला आता सतीश दादा म्हणु की सतीश भावजी ? "

" हे बघ काय म्हणायचय ते म्हण. पण माझा धंदा बुडवू नकोस. "

" काय म्हणायचय तुला?"

" हे बघ मी आहे स्त्री रोग तज्ञ. मला लवकर पुतण्या पाहिजे. म्हणुन तर तुम्हाला एवढ्या घाईने लोणावळ्य़ाला पाठवतो आहे"

" ईश्श !!"

कद्याची बत्तीशी फळाला आली. लोणावळ्य़ावरुन परतल्यावर महिनाभरातच त्याच्याकडे जावे लागले. थोड्याच दिवसात विकिचा जन्म झाला. विक्रांता असे नाव होते पण त्याचे विकि असा शॉर्टफॉर्म कधीच झाला होता. मुलगी झाल्यामुळे कद्याची निराशा झाली होती. अर्थात आम्ही दोघांनीही एकच मुल ठरवले होते. विकीच्या जन्मानंतर मी नोकरी सोडुन स्वत:चा निर्यात व्यवसाय चालु केला होता. घराजवळच एक जागा घेऊन ऑफीस सुरु केले होते. विकी मोठी होत होती. आमच्या तिघांना पुरुन उरत होती. मी माझा २ BHK काढुन बांद्र्याला एक ४ BHK घेतला. ऑफ़ीसही मोठ्या जागेत स्थलांतर केले. आता बऱ्याच वेळेला मुंबई बाहेर जावे लागत होते.

गेल्याच महीन्यात मला १०/१२ दिवसांकरता चीनला जायचे होते. पाऊस पडत होता. म्हणुन मी टॅक्सीच्या नादाला न लागता चालकाला मला सोडायला सांगीतले. तो पाऊस माझ्या जीवनात मॊठे वादळ घेऊन येणार आहे याची मला कल्पना नव्हती.

शुभा

शेखर एअरपोर्टवर गाडी घेऊन गेला. खर म्हणजे अशा वेळेला मी आणि विकिही त्याला सोडायला जातो. पण आज विकीच्या अंगात कणकण होती म्हणुन घरीच थांबले होते. सतीश थोड्या वेळाने येऊन विकीला तपासुन जाणार होता. माझे मन मात्र हुरहुरत होते. सतीश बिचारा पावसात भिजतच आला. विकीला तपासले.

" वहिनी काही काळजी करु नका. एकदम ठीक आहे. पण तुमचा चेहरा का असा पड्ला आहे ? तुम्हालाही काही होत आहे का ? " सतीश सारखा भाऊ. त्याच्या बायको निमा सारखी बहीण आणि आई अशी सर्व नाती मला मिळाली होती. मी ईतकी रमुन जायचे की मला कधीकधी बाबांची आठवणही यायची नाही. समीरची आठवण होऊ नये म्हणुन सर्वच काळजी घ्यायचे.

" सतीश. माझे जाऊ दे. तु अगोदर कपडे बदल आणि मी गरमागरम चहा करते तो घे. वाटल्यास मी निमालाही ईकडेच बोलावते. "

" भन्नाट. नाहीतरी तो खत्रुड नाहीच आहे. छान धम्माल करु "

निमाला तुटकपणे माझ्य़ाकडे बोलावले. ती बिचारी लगेचच आली.

" काय ग काय झाले. आणि इतक्या तातडीने ? मी स्वयंपाक अर्धाच टाकुन आले. "

" अग तुझा नवरा ईथेच आहे. सारखा त्याने निमा.. निमा असा जप चालवला आहे. बाथरुम मधे आहे बघ"

निमाची ट्युब पेटली.

" शेखर घरी दिसत नाही. म्हणुन तुम्हाला या फिरक्या सुचत आहेत. थांब जरा. बाथला बाहेरुन कडी लावते. बसुदे त्याला आत जप करत."

तेवढ्यात सतीश " नच सूंदरी करु कोपा " म्हणत आला. मग काय रात्रभर नुसता दंगा. शेखर बाहेर गेल्यावर मी अस्वस्थ असायची. माझ्या शंकेखोर स्वभावावरही बऱ्याच कॉमेंटस झाल्या. शेवटी पहाटे तीन वाजता विकि जागी झाली म्हणुन थांबलो. विकी बरीच फ्रेश दिसत होती. तिला झोप लागल्यावर आम्हीही झोपलो. झोपेतच सतीश दवाखान्यात निघुन गेल्याचे कळले. निमाने त्याला ब्रेकफास्ट करुन दिला असावा. निमाने मला शेवटी नऊ वाजता हलवुन उठवले. विकिनेही उठुन कार्टुन चॅनेल सुरु केला होता. निमा आणि मी आळसावुन किचन मधेच गप्पा मारत होतो. तेवढ्यात फोन वाजला. चहाचा कप हातात धरुनच मी भिंतीवरचा फोन उचलला.

" शेखर आहे का ?" कुणातरी स्त्रीचा दमुन आवाज.

" नाही. आपण कोण. शेखर गावाला गेलाय. "

" मी अनिता देशपांडे. मला शेखरला धन्यवाद द्यायचे आहेत."

"धन्यवाद कशाबद्दल ?"

" एक गोड बातमी आहे. अहो त्याच्या मुळेच तर मला मुलगा झाला. पहिल्यांदा शेखरला सांगावे म्हणुन फोन केला "

" काय.??? " निमा तर दचकलीच. पण त्या बाईला सुद्धा फोन शिवाय आवाज ऐकु गेला असावा.

" आल्यावर त्याला भेटीनच. फार अमोल भेट त्याने मला दिली आहे "

माझ्या हातातुन चहा्चा कप तर केंव्हाच पडला होता. मी ही खाली बसकणच मारली. निमा धावतच माझ्याकडे आली होती.

" काय ग काय झाले. शेखर ठीक आहे ना ? "

" त्याला काय होते आहे ? त्याने केलेले पराक्रमच आता कळत आहेत. "

" सांग काय झाले ते. "

" अग आत्ता एक अनिता नावाच्या बाईचा फोन होता. ती म्हणते शेखर पासुन तिला मुलगा झाला आहे. आजच झाल्यावर त्या सटवीने पहिला फोन शेखरला केला " मी रडतच होते. निमा मात्र हसतच सुटली.

" कुणीतरी फ़िरकी घेतली असेल. तुझा संशयी स्वभाव जग प्रसिद्ध आहे. शेखर तसा नाही "

" ते तु मला सांगु नकोस. पुरुष सगळे असेच."

" बर तुला आता मी कॉफी करुन देते. आणि तु जरा पड. मी सतीश ला ईकडेच बोलावुन घेते. मग बघु"

कशीबशी मी कॉफी संपवली. विकिच्याच खोलीत जाऊन पडले. आमच्या बेडरुम मधे जायची मला किळस वाटत होती. मला लगेचच झोप लागली. बहुतेक माझी अवस्था बघुन निमाने कॉफीत व्हॅलीयम घातली असावी. मी जागी झाले तर दोन वाजले होते. विकि केव्हातरी माझ्या जवळ येऊन झोपली होती. माझी चाहुल ऎकुन निमा बेडरुम मधे आली.

" काय ग? शेखर असा का वागला? माझ्यात काय कमी आहे? "

" शुभे हा विषय आत्ता बंद. अगोदर उठ . आवर आणि सतीश येईलच. आपण सगळे जेवुन घेऊ आणि मग शांत डोक्याने विचार करु." निमाने दटावले.

सतीश आल्यावर जेवुन घेतले. मी कसेबसे घास पोटात ढकलत होते. विकिला ही भरवले. तिला अजुन मरगळ होतीच. ती हॉलमधेच झोपली. किचन टेबलावरच आमची वॉर मीटींग सुरु झाली.

" हं वहीनी बोला आता. "

" काय बोलु ? बोलण्यासारखे तुमच्या मित्राने काही शिल्लक ठेवले आहे का ? "

" मला निमाने थोडक्यात सांगीतले आहे. आणि ऊगाच त्रागा करु नका. "

" मग काय करू. माझ्या नवऱ्याला मुलगा झाला म्हणुन पेढे वाटु ? "

" बर फोन कुठुन आला होता. आणि तुमच्या ओळखीत कुणी अनिता देशपांडे आहे का? "

" नाही हो. आणि फोन लॅंडलाइनवर होता. आता मी जाते बाबांकडे. "

" हे बघा अस काही करु नका. या प्रकरणाची शहानिशा करु. आम्ही दोघेही शेखर येइपर्यंत येथेच राहातो. माझी MTNL मधे ओळख आहे. मी फोन कुठुन आला त्याची चॊकशी करतो. आणि विकी अजुन लहान आहे पण हल्ली १० वर्षाच्या मुलांनाही TV मुळे नको ते ज्ञान असते. त्यामुळे तिच्या समोर कुठलीही चर्चा नाही. नशीब शेखरची आई दोन महीन्यांसाठी तीर्थयात्रेला गेली आहे."

" सतीश तु आता IVF करतोस. स्पर्म बॅंक करता तर तु शेखरचा वापर केला नाहीस ना. ?"

"नाही अजुन तरी नाही. पण अशा वेळेला अतिशय गुप्तता पाळली जाते. त्यामुळे त्याचे नाव किवा फोन नंबर मिळणे शक्यच नाही"

MTNL कडुन माहिती मिळवायला तीन चार दिवस गेले. माझ्या मनाचा प्रचंड कोंडमारा झाला होता. निमा त्या दिवसात माझी आई झाली होती. घरातल्या सर्व डिरेक्टरीज, मोबाईल फोन्स, लॅपटॉप सगळीकडे आम्ही अनिता नाव शोधत होतो. ऑफीसमधेही विचारले पण कुणालाच नाव माहीत नव्हते. शेखरचा दोनदा फोन आला त्याच्याशीही मी तुटकच बोलले. एका दुपारी सतीश आला तो गंभीर होऊनच.

" हे बघा. तो फोन खारच्या एका उच्चभ्रु हॉस्पीटल मधुन आला होता. ते कुठलीही माहीती द्यायला सुरवातीला तयारच नव्हते. पण मी गेल्यावर त्यांनी तुटक माहीती दिली."

" मग?"

" त्या दिवशी पहाटे अनिता नावाच्या स्त्रीला मुलगा झाला. तिला दोन दिवसापुर्वीच डिसचार्ज दिला आहे"

" मग पुढे ? आणि तिच वय काय होते"

" ३२. तिचा घरचा पत्ता अंधेरीतील आहे. आणि हो रेकॉर्डवर वडीलांचे नाव नाही. "

" चला लगेचच जाऊ "

" जरुर नाही. मी त्या पत्यावर जाऊन आलो. ती गावाला गेली आहे, एक दोन महीन्याने येणार आहे."

" घरात कुणीतरी असेलना? "

" नाही ती गेल्या वर्षापासुन एकटीच असते. मधेच पंधरा वीस दिवस घराला कुलुपच असते. फ़िल्म सिटी मधे कामाला जाते. बाकी फारशी माहिती शेजाऱ्यांना नाही. "

" बघ सतीश. माझेच म्हणणे खरे झाले का नाही ?" आज त्या दोघांकडे काही उत्तर नव्हते.

" वहिनी. शेखर आज येणार आहे आणि तुमचा भडका उडणारच आहे. आम्ही विकिला दोन दिवस आमच्या घरी घेऊन जातो. पुढचे विचार उद्या करु."

दोघेही विकिला घेऊन गेले. माझी घालमेल चालु होती. चार वाजता बेल वाजली. मोठ्या कष्टाने दार उघड्ले. बाहेर शेखर उभा होता. तो जरा बाहेर जाऊन आला की मी त्याला मिठीतच घ्यायची. आज मात्र बाजुला सरकत त्याला आत यायला जागा करुन दिली. तो आत येताच माझ्या तोंडुन बाहेर पडले

" शेखर, ही अनिता देशपांडे कोण?

शेखर

" शेखर, ही अनिता देशपांडे कोण? " आल्याआल्या शुभाच्या तोंडुन हे वाक्य ऐकुन मी हादरलोच.

" कोण अनिता ? कोण अनिता देशपांडे ? "

" अहो तेच तर मी तुम्हाला विचारतीय ? " मामला गंभीर दिसत होता. शुभा रागात असली की मला अहॊ जाहो करायची.

" हे बघ मला असली कोणी बाई माहीत नाही. बर काय झाले तिचे ? "

" कमालच आहे !! तिला तुमच्यापासुन मुलगा झाला आहे आणि तिचे नाव तुम्हाला माहीत नाही.? का तुम्ही नाव गाव कळल्याशिवायच संबंध ठेवता? "

" शुभे हे जरा अतिच होतय हं . बड्बड बंद कर. मी आवरून घेतो. मला जेवायला वाढ आणि मग आपण भांडत बसु. "

" तर तर . आता माझी बडबडच वाटणार. ती आहेना शेखर शेखर अस गुलुगुलु बोलायला. नटरंगीने मुलगा झाल्यावर पहिला फोन शेखरलाच केला. "

मला काहीही कळत नव्हत. मी तसाच बाथ मधे गेलो. बाथच एक बर असत. विचार करायला वेळ मिळतो. शुभा काय बड्बड्त होती हे कळतच नव्हते. विकीही दिसली नाही. बहुतेक कद्याकडे गेली असावी. बाथ घेऊन त्याला फोन करायचे ठरवले. बाहेर आलो तर टेबलवर जेवण तयार होते आणि एकच ताट होते.

" काय ग विकि नाही म्हणुन एकाच ताटात जेवायचे आहे का ? " माझा केवीलवाणा प्रयत्न.

" ऊगाच चावटपणा करू नका. अनिता भरवत असेल तुम्हाला, मला भुक नाही."

" का? तब्येत ठीक आहे ना?"

" मला काय धाड भरली आहे ? तुमचे पराक्रम ऎकुनच माझे पोट भरले आहे" कसेबसे घास गिळुन मी कद्याला फोन लावला.

" अरे आमच्या घरी ही कुणी आग लावली?"

" छान म्हणजे मजा तुम्ही मारा आणि इतरांच्या नावाने बोंब मारा"

" अरे काय बोलतोयस ? ये जरा ईकडे "

" नाही . गावाहुन मामेभाऊ आलेला आहे. तो उद्या सकाळच्या विमानाने परत चालला आहे. विकीलाही त्याच्याबरोबर पाठवायचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला आहे. सकाळी तुम्ही माझ्याकडे या. त्यांना एअरपोर्टवर सोडु आणि मग बसु" तो रुक्षपणे बोलत होता. मी काही बोलायच्या आतच त्याने फोन ठेऊन दिला. मामला फ़ारच गंभीर दिसत होता. रात्र कशीबशी पार पडली. दुसऱ्या दिवशी विकीकरता आणलेली खेळणी घेतली . " अहो आता तुम्हाला दोन मुलं आहेत. म्हणजे निदान मला माहीती असलेली " हा रीमार्कही पचवला. एअरपोर्टवरुन आम्ही सतीशच्या घरीच आलो. वातावरण फारच गंभीर झाले होते. कुणीच सुरुवात करत नव्हते.

" अरे तुम्ही सर्वांनी हा कसला कट रचला आहे ?"

" शेखर हा विनोदाचा भाग नाही. तर सत्य आहे."

त्याने आलेला फोन. तिचे शेखर शेखर बोलावणे. तुला धन्यवाद देणे. हे सर्व व पुढे केलेला तपास सर्वच सांगीतले.

" अरे पण माझी बाजु ऎकाल का नाही? "

" तु काय बोलणार अजुन ? "

" हे बघा तुम्ही सर्व जे काय बड्बडत आहात त्याच्याशी माझा यत्कींचीतही संबंध नाही. अगदी विकिशपथ"

मी शपथ घेतल्यावर सर्वच चपापले. मी विकीची खोटी शपथ घेणार नाही हे सर्वांना माहीती होते. पण आज शुभा काही ऎकायला तयारच नव्हती.

" घ्या घ्या खोट्या शपथा. आता काय दुसरा मुलगा आहे लाडकीचा , विकीच काही बरे वाईट झाले तर तुम्हाला काय पर्वा ? "

" वहिनी आता बास झाले. कुणाच्यातरी दोन मिनीटांच्या फोनवर तुम्ही विश्वास ठेवता आणि बारा वर्षे बरोबर काढ्लेल्या नवऱ्यावर नाही? आता ती अनिता परत आल्याशिवाय आपण काहीच निर्णय घेऊ शकत नाही. " कद्याच्या आणि निमाच्या डोळ्यात माझ्याबद्दल सहानुभुती दिसत होती.

" आणि ती बया नाही म्हणली तर ?"

" अहो ती येऊदे तरी. मग वाटलं तर आपणdna test करु. "

" त्याने काय होईल? "

" शेखरच त्याचा पिता आहे का नाही हे ठरवता येईल."

" अरे वा. म्हणजे यांचे पितळ उघड पाडायची शास्त्रात सोय आहे वाटते. "

" वहिनी ते अजुन ठरायचे आहे. आणि हो अनिताची परवानगी लागेल. मला असे वाटते की शुभाने दोन आठवडे गावाला जाऊन रहावे. हा विषय गावी मुळीच उघडु नये. सत्याचा शोध लागेपर्यन्त तरी."

शुभा दुस़ऱ्याच दिवशी गावाला निघुन गेली. मी अगदी एकटा पडलो. सतीश जरा मवाळ झाला होता.

" शेखु तु जरा रात्री आमच्याकडेच जेवायला येत जा. तु अगदी मोठाच प्रॉब्लेम करुन ठेवला आहेस. असा कसारे पाय घसरला तुझा?"

" अजुन माझ्यावर विश्वास नाही. आणि dna test निश्चीतच निगेटीव्ह येईल."

" ती टेस्ट शक्यता सांगते. म्हणजे ९०% टक्के आली तर पित्रुत्व निश्चित आणि खरे म्हणजे मुल सहा महीन्याचे होईपर्यंत ही टेस्ट घेत नाहीत."

" म्हणजे आता मी सहा महिने या स्थिथीत काढायचे का ? "

" काय इलाज. बर मागे पासुन स्पर्म बॅंकेकरता तुझे स्पर्म पाहिजे आहे"

स्पर्म देऊन मी घरी परतलो. दोन तीन दिवसांनी शुभा येणारच होती. दुसऱ्याच दिवशी कद्याचा फोन आला.

" अरे जरा ऑफ़ीसला दांडी मारुन लगेच ये. काही टेस्ट घ्यायच्या आहेत, बराच वेळ जाईल"

मी गेलो तर त्याने मला ऑपेरशन थीएटर मधे नेऊन बरीच सॅंपल्स गोळा केली. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव नेहमीसारखे झाले होते.

" शुभा आल्यावर भांडत बसु नका रे. तुमचा सोन्यासारखा संसार उध्वस्त नका करु "

" मी अगदी गप्प आहे. पण मला बघताच तिची तळपायाची आग मस्तकाला जाते त्याच काय? "

" हे बघ. ती तुझ्यावर मनापासुन प्रेम करते आणि त्यामुळेच ती पझेसिव्ह आहे. "

" हे माहीती आहे म्हणुन तर मी गप्प बसतो. पण काय रे एवढी सॅंपल्स ईतक्या टेस्ट्स काय भानगड आहे? "

" थांबरे या टेस्ट्स्चे रिझल्ट यायला ७२ तास लागतात. मग बघु "

घरी आलो तर शुभा आणि विकी आल्या होत्या.

" काय आलात ? आणि एकटेच ? "

" काय म्हणायचय तुला?"

" मी नाही म्हणजे रान मोकळेच मिळाले असेल."

ऊगीच तमाशा नको म्हणुन मी गप्प बसलो. पण तिचे टोमणे मारणे चालुच होते. प्रेम करणारी स्त्री एवढी हींस्त्र होऊ शकते हे मी प्रथमच पहात होतो. एका दिवसातच घरात राहाणे मला अशक्य झाले. मी ऑफ़ीसला फोन करुन आठवडाभर नाही असे सांगीतले आणि सरळ लोणावळ्याला निघुन गेलो. गेले २/३ आठवडे फारच चमत्कारीक गेले. आज सकाळीच फोन आला त्यामुळे कद्याकडे येउन बसलो. आणि त्याचाच पत्ता नाही. मला त्याच्या वेटींग रुम मधेच डुलकी लागली. जाग आली ती कद्याच्या हलवण्यामुळेच.

" अरे उठ!! झोपायचे असेल तर निदान बेडवर झोप. मला बील तरी लावता येइल "

" शहाण्या तुझी वाट पहात ईथे मी कमीत कमी तीन तास बसुन आहे. आणि कसली आनंदाची बातमी आहे?"

" दोन बातम्या आहेत. एक निश्चितच आनंदाची आहे. "

भलेमोठे एन्व्हलप माझ्या हातात देऊन म्हणाला.

" तुझ्य़ा कॅन्सरच्या सर्व टेस्ट्स चे रिझल्टस पुर्णपणे निगेटीव्ह आहेत."

" आणि दुसरी?"

" ती कशी आहे मी सांगु शकत नाही"

" का ?"

" अनिता नावाच्या स्रीच्या मुलाचा तु १००% बाप नाहीस. "

" अरे मग आनंदाचीचना. चल शुभाला सांगु."

" तिथेच तर गोची आहे. ही बातमी मी वहिनीला सांगु शकत नाही "

" का ? आणि त्या मुलाचा dna कुठुन मिळवलास. आणि तु एवढे १००% असे विधान कसे करु शकतोस? "

" तु सर्व अगोदर ऎकुन घे. तुझे स्पर्म घेतल्यावर लॅबने ते रिजेक्ट केले. कारण तुझा स्पर्म फ़्रॅगमेंटेशन काउंट ५०% वर होता. त्यामुळे मला कॅन्सरची शंका आली. त्याचबरोबर मी तुझे १२ वर्षापुर्वीचे अमेरिकन रिपोर्टही मागवले. त्यातही तुझा स्पर्म फ़्रॅगमेंटेशन काउंट ५०% वरच होता. "

" अरे बाबा मला समजेल असे बोल"

"स्पर्म फ़्रॅगमेंटेशन काउंट ३०% वर असला तर पितृत्वाची शक्यता शुन्यावर येते. तुझ्या बाबतीत तर तु कधीच कुठल्या मुलाचा बाप बनु शकत नाहीस. "

" चला अनिता प्रकरण संपले म्हणायचे मग तु असा सुतकी चेहरा का केला आहेस."

" मी काय बोललो त्याच्याकडे तुझे लक्ष नाही"

" तु म्हणालास "तु कधीच कुठल्या मुलाचा बाप बनु शकत नाहीस"

"oh my god!! मग विकिचे काय?"

"ती तुझी मुलगी नाही."

" काय?"

"शंका नको म्हणुन मी तुझे आणि विकिची dna test ही घेतली. आता मला सांग मी हे शुभाला कसे सांगु.?" माझ्या पायातले त्राणच गेले.

"नाहीरे शुभा संशयी असेल पण अशी नाही"

" शेखु हा आता सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. अनिता येइपर्यंत मी थांबीन आणि नंतर टेस्ट निगेटीव्ह सांगेन. नाहीतर तु म्हणलास तर आजचे रिझल्टस सांगेन. "

" नाही रे बिचारी फार भोळी आहे. विकिचा बाप मी नाही कळल्यावर ती जीव दिल्याशीवाय रहायची नाही."

"बघ बाबा. As you say "

"जाऊ देत. मी आता लोणावळ्यालाच दोन दिवस जातो आणि उत्तर सापडते का बघतो "

शुभा

त्या दिवशी सकाळीच शेखर न सांगता निघुन गेला. त्याच्याकडे बघवत नव्हते. मीच जास्त ताणते आहे हे मला समजते आहे पण माझा शेखु दुसऱ्या कुणाचा तरी होतो ही कल्पनाच मला सहन होत नाही. आज तो सतीश कडे येणार होता. तिथुन तरी घरी येईल अशी वेडी आशा होती. माझ्याकरता नाही तर निदान विकी करता तरी. विकीलाही काहीतरी बिनसले आहे हे कळले आहे. तिचा बाबा तिला का भेटत नाही हे तिला कळत नाही. काय होणार आहे पुढे कुणास ठाउक. बाबांनाही काहीतरी चाहुल लागली असावी. ते म्हणाले सुद्धा " पोरी शब्द आणि बाण एकदा सुटले की परत नाही घेता येत. शेखर हा हीरा आहे. त्याला कोंदण बन. " ते खरेही होते. बाबांच्या नावाने शाळा, दवाखाने, पाणी पुरवठा योजना उभारुन पंचक्रोशीत संपन्नता आणली होती. बाबांच्या इच्छेनुसार वाडा आणि बाजुची बाग मात्र खाजगी रहाणार होती.

दरवाजाची बेल वाजली तशी मी धावतच गेले व दार उघडले. दारात सतीश आणि निमा.

" या ना "

" आम्हाला पाहुन तुझा चेहरा का पडला ? "

" नाही म्हणजे मला वाटले शेखरच आला असेल"

" म्हणजे तो ईथे नाही आला ? बहुतेक लोणावळ्याला गेला असावा"

" चटकन चहा करते. का खायलाच करु ? "

" नको वहीनी . काही नको. शेखर इथे आला असेल म्हणुन त्याला त्याचे रिपोर्ट द्यायला आलो होतो " एक जाड जुड पाकीट टेबलावर ठेवत सतीश म्हणाला.

" हे कसले रिपोर्टस ?"

" जाऊ दे हो वहिनी. "

" सांगा ना " माझा आवाज रडवेला झाला होता.

" त्याला कॅन्सर झाल्याचा संशय होता म्हणुन जरा टेस्टस केल्या ."

" कॅन्सर ??" आता मात्र मी पुर्ण खचले होते.

" त्याला काहीही झाले नाही. पण तुम्हाला काय त्याचे? तो कॅन्सरने मेला काय आणि हाय खाऊन मेला काय. आता वेगळे रहाताच आहात. काही दिवसांनी कायद्याने वेगळे व्हाल. मग काय तु सुंदर आहेस, श्रीमंत आहेस, तरूण आहेस. दुसर लग्न करुन मोकळी होशील. "

"सतीश अस कस बोलवते तुला ? "

" मग काय तर? तु कशी त्याचाशी वागत आहेस ते बघ. कुणातरी बाईच्या दोन मिनीटांच्या फोनवरुन तु शेखरच जीवन उध्वस्त केले आहेस. कसा गबाळा राहू लागला आहे ते बघ. दारु पिण्याचे प्रमाणही वाढले आहे. आज त्याला काही खुपले तर तो माझ्याकडे येतो, तुझ्याकडे नाही. हे तुझे प्रेम नाही तर इगो आहे. समजा उद्या अनिताचा मुलगा त्याचा नाही असे सिद्ध झाले तरी फरक काय पडणार आहे. उद्या दुसऱ्या कुणाचा तरी फोन येईल, परत तुझा संशय उफाळेल. शेखरचे तुझ्यावरचे प्रेम, तुझ्यावरचा विश्वास तुला कधी कळलाच नाही. शेखर माझा मित्र असुनही मी तुझी बाजु घेतली. पण आज त्याच्यातल्या देवत्वाची जाणीव मला झाली आहे. त्याचे जोडे पुसायचीही तुझी लायकी नाही. " सतीशचे शब्द चाबकाच्या फटक्यासारखे माझ्या अंगावर कोसळत होते.

" मग मी काय करू "

" तुला बोलणे म्हणजे पालथ्या घड्यावरुन पाणी. तु स्वत:चाच विचार कर. बर जातो आम्ही. "

" सतीश. प्लीज थांबा ना. निदान निमाला तरी इथे राहुदेत. मी अगदी एकटी पडली आहे रे "

" तुला आता एकटेपणाची सवय करायलाच हवी, निदान तु दुसर लग्न करे पर्यंत तरी " निमा

" निमा. का अशी बोलतेस?"

" तु तुझे बोलणे आठव. आम्ही तर त्रयस्थ. बायको जेंव्हा बोलत असेल तेंव्हा शेखरला काय वाटत असेल? त्याने विकिची शपथ घेतल्यावर तरी तु स्वत:ला आवरायला हवे होतेस. "

दोघेही निघुन गेले. रिकाम घर मला खायला उठल. आज शेखर करता जीव व्याकूळ झाला होता. माझा आक्रस्तळेपणा मला जाणवु लागला होता. शेखरवर माझ जीवापाड प्रेम होते. पण माझे प्रेम स्वार्थी होते का ? गेल्या महिनाभरात मी त्याच्याशी नीट बोलले सुद्धा नाही. खरच असा कसा मी चटकन फोनवर विश्वास ठेवला? सोफ़्यावर बसुनच माझे हे सर्व विचार चालु होते. माझ्या वागण्याने मी शेखर, सतीश, निमा ह्या सगळ्यांना तोडुन बसले होते. शेवटी ठरवले की सकाळीच उठुन विकिबरोबर लोणावळ्याला जायचे व शेखरची माफी मागायची. खर म्हणजे माफी मागायची सुद्धा आपली लायकी नाही. तशीच कधी तरी झोप लागली. दारावरच्या बेलने मी जागी झाले. दार उघडले तर दारात एक जीन्स, टॉप घातलेली, कुराळ्या केसांची सुंदर स्त्री हातात एक गिफ्ट बॉक्स घेऊन उभी होती.

" मी अनिता. शेखरला भेटायचय. आहे का घरी" मी तिच्याकडे बघतच राहीले. डोक शांत ठेऊन ऎकण्याचे ठरवले.

" नाही. मी त्यांची पत्नी"

" तुमचे पती खरच ग्रेट आहेत."

" तुमची त्यांची कशी काय ओळख ?"

"ओळख कसली हो. त्यांना माझ नाव पण माहीत नाही. मी व्यवसायाने आर्ट डायरेक्टर आहे. माझा नवरा अनिल सिनेमाटोग्राफर आहे. पुर्वी साधारण आम्ही एकाच प्रोडक्शन वर काम करायचो. मी प्रेग्नन्ट व्हायला आणि त्याला चेन्नई मधे चार प्रोजेक्टस मिळायला एकच गाठ पडली. ओळखीने मी सिरियलची छोटी काम पत्करली. अनिल शुटींगमुळे जास्त लोकेशनवरच असायचा. खारच्या चांगल्या डॉ ला मी तब्येत दाखवत होते. अनिल चेन्नईत थोडे दिवस आला की मी चेन्नईला जायची. त्या दिवशीही मी चेन्नईहुन आले आणि टॅक्सी करता उभी असतानाच मला प्रसव वेदना अचानक सुरु झाल्या. त्याचवेळेस शेखर त्याच्या गाडीतून उतरत होता. मला कळवळताना पाहून त्याच्या लक्षात आले आणि त्याने ड्रायवरला मला सोडायला सांगीतले आणि मी काही बोलायच्या आतच तो निघुन गेला. मी दवाखान्यात पोहोचले तर डॉ म्हणाले की थोडासा उशीर सुद्धा बाळाला धोकादायक ठरला असता. "

मला आता मात्र मेल्याहुन मेल्यासारखे झाले होते.

" पण तुम्ही त्याला शेखर अशा ओळखीच्या नावाने कसं बोलावताय ? "

" मला माझ्या उपकार कर्त्याच नाव माहीती नव्हते. मी उतरताना चालकाला विचारले तर त्याने एक विजीटींग कार्ड हातात ठेवले. त्यावर घरचा / ऑफीसचा पत्ता, फोन आणि शेखर एवढेच नाव होते. "

मला खुदकन हसायलाच आले आणि हसता हसताच मी रडु लागले. अनिता गोंधळुनच गेली.

" माझ काही चुकल का ?"

" बाई तुमच्या एका फोनने इथे रामायण घडलय. "

" काय? "

"अहो तुम्ही एकतर त्याला शेखर असे हाक मारत होता. आणि तुमची वाक्य आठवा. "एक गोड बातमी आहे. अहो त्याच्या मुळेच तर मला मुलगा झाला. पहिल्यांदा शेखरला सांगावे म्हणुन फोन केला "
मी अनिता देशपांडे. मला शेखरला धन्यवाद द्यायचे आहेत." "आल्यावर त्याला भेटीनच. फार अमोल भेट त्याने मला दिली आहे " अशा वाक्यांचे अर्थ काय घ्यायचे ?"

"Oh my god." म्हणून ती हसायलाच लागली. मोबाइलवरुन तिने नवऱ्याला बोलावुन घेतले. तो बिचारा खाली गाडीतच बाळाला संभाळत बसला होता. तो वर आला तर आम्ही दोघी एकमेकांकडे बघत जोरजोरात खिदळतोय. अनिताने त्याला सांगताच तो ही आमच्यात सामील झाला.

" मॅडम ह्यावर एक भन्नाट चित्रपट होऊ शकतो."

" हो ना तुमच्या ह्या बायकोपाई भांडुन माझा नवरा रुसुन बसला आहे"

" तुम्ही त्याला छळल असणार. शुभा आमच्या इंडस्ट्रित मोकळेपणा भरपुर असतो पण ह्याचा अर्थ आमची नितिमत्ता रसातळाला गेली नसते. हाच फोन आमच्या कुणा सहकाऱ्याकडे गेला असता तर एवढी पाळी आलीच नसतो. पार्टनरवर पुर्ण विश्वास असतो आमचा. " ही गडबड ऐकुन विकि पण बाहेर आली होती.

" वहिनी पहिल्यांदा तुम्ही शेखरची माफी मागा. वाटल्यास मी ह्या सिच्युयेशनला साजेशी बरीच चित्रगीते देतो. "

" तुम्ही पण ना? जाउदेत मी पट्कन चहा करते "

" थांबा जरा अनिताशेजारी बसा. अनिता बाळाला घे. आणि ह्या गोड छोकरीलाही तुमच्याजवळ बसवा. मी तुमचा एक छान फोटो काढतो. तो तुमच्या नवऱ्याला द्या आणि सांगा की तुझ्या दोन बायका आणि दोन मुले" त्याने खिशातुन पटकन कॅमेरा काढुन फोटो काढला आणि प्रिंट हातात दिली.

" आणि चहाच म्हणाल तर मीच तुमच्या किचनमधे ह्या सुंदर छोकरीला घेऊन जातो आणि फर्मास चहा करतो. "

" अहो तुम्ही कशाला"

" मी परका आहे का ? अहो हे घर तर माझ्या बायकोच्या मुलाच्या बापाचे आहे. चल ग पोरी." म्हणत तो किचन मधे गेला सुद्धा,

मी अनिताच्या कुशीत शिरुन रडू लागले. हे जोडपे काही मिनीटातच घरात मिसळून गेले होते.

" हे बघ शुभा हा तर संशयकल्लोळ होता. पण जरी खर असतना तरी तु त्याला समजाऊन घ्यायला हवे होते. "

" हो माझे चुकलेच. मी तुमच्या नावानेही नाही ते बोलले"

" जाउ देत ग. आणि मला अहो जाहो नकॊ करु. कुठे आहे शेखर ? "

" लोणावळ्याला आमच्या बंगल्यात"

" अगोदर पळ तिथे. त्याने अगदी हाकलुन दिले तरी तु सोडु नकोस. आवरत बसु नकोस . आहेस तशीच जा. गाडी नसली तर माझी घेऊन जा."

" अनिता प्लीज तु ह्या पत्त्यावर जाऊन सतीश आणि निमाला सगळ सांग. लगेच. प्लीज. "

" बर बाई जाते. मोठ्या सवतीचे ऎकायलाच पाहीजे "

काही मिनिटातच मी विकिला घेऊन लोणावळय़ाला निघाले होते. अनितात आणि आपल्यात किती फरक आहे व आपण फारच आत्मकेन्द्रित आहोत हाच विचार करत होते. निमाला फोन करुन अनिता तिच्याकडे येत आहे आणि मी लोणावळ्याला जात आहे हे सांगीतले. पण पुढे काय वाढुन ठेवले आहे ह्याची मला कल्पना नव्हती "

शेखर

मी त्या दिवशी लोणावळ्यात कसाबसा पोहोचलो. विचाराचे चक्र गाडीहुनही वेगात धावत होते. बंगल्यात पोहोचल्यावर थोडे स्वीमींग केले आणि बाथटबमधे डूंबत बसलो. रिलॅक्स होण्याचे माझे हमकास उपाय होते. पण त्या दिवशी तेही फेल गेले. बरीच रात्र झाली तरी मी झोपाळ्यावरच बसुन होतो. माझे विचारही झोपाळ्यासारखे मागे पुढे होत होते.

विकी माझी मुलगी नाही.

विकी तुझी नाही तर कुणाची आहे? तिचे नाव कुणी ठेवले?

विकीला कडेवर घेऊन कोण फ़िरवत होत?

विकीला थोडा ताप आला तरी कोण रात्र रात्र जागत होत ?

विकीने बाबा म्हणताना कोण हरकुन गेले होते.?

विकीला हात धरुन कोणी चालायला शिकवले ?

विकी माझीच आहे.

पण शुभाने मला फ़सवल आहे,

तिने काय फसवल आहे?

लग्न तु केलेस

तुला लग्न मोडले हे पण कळले होते

तु तिला वेळ तरी दिलास?

आणि ती तुझ्यात किती समरस झाली आहे

एकदा तरी तिने अप्रामाणीकपणा केला आहे ?

तुझ्या प्रत्येक इच्छेला तिने मान तुकवली असेल

कदाचीत तिलाही कल्पना नसेल

पण अशा स्थितीत मी तिला कशी स्विकारु?

तुझे खरे प्रेम असले तर तु स्विकारशील

सुखदु:खैसमेकृत्वा हे लग्नातले वचन विसरलास का ?

पण तिच्या संशयी वृत्तीने तर प्रॉब्लेम केलेत

समजाऊन सांग

सतीश निमाची मदत घे

आणि ती कोण बाई आली की कोडे सुटेलच.

उलटेसुलटे विचार करताना पहाटे पाच वाजता माझा डोळा लागला. सकाळी दहा वाजले तरी झोप होतीच. काहीतरी अंगावर पड्ले म्हणुन जागा झालो तर विकी मला घट्ट मिठी मारुन बाबा उठ म्हणत होती. एका क्षणात माझ्या मनातील कोळीष्टक दुर झाली. माझी पोर ती म्हणतच मी तिला बिलगलो.

" काका बरोबर आलीस का?"

" नाही. मम्मा बरोबर. पण ती म्हणतीय तुझा बाबा रागावलाय "

" अग आपल्या माणसावर कुणी रागवत का? "

शुभा आमच्या मागेच उभी होती. शेखु शेखु म्हणत तिने मागाहुनच घट्ट मिठी मारली. विकी शहाण्यासारखी आम्हा दोघांना सोडुन कुत्र्याशी खेळायला निघुन गेली. शुभा माझ्या खाद्यावर डोके टेकवुन जोरात हुंदके देत होती.

" हो हो शर्ट खराब होईल माझा." तिने वर बघताच ती काही बोलायच्या आतच मी तिचे तोंड बंद केले

"No thank you. No sorry"

"शेखर तुझी खरी ओळख मला आत्ता पटली आहे "तिच्या हातात कहीतरी कागद दिसत होता.

" काय आहे ते. लेखी माफीनामा?" खुदकन हसली आणि हातातला फोटो दाखवत म्हणाली " ह्या तुमच्या दोन बायका आणि दोन मुले. ह्या सवती कडुन मी फार आयुष्य शिकलीय"
मी काही बोलायच्या आतच ती गंभीर झाली आणि म्हणाली.

" शेखर मी तुझ्यापासुन कुठलीही गोष्ट कधी लपवली नाही. पण लग्नाअगोदरची एक तुला सांगायच्रेच आहे,"

" शुभे सांगीतलेच पाहिजे का? Let us forget past. "

"नाही ते सांगीतल्याशिवाय मला शांती लाभणार नाही. लग्नाच्या अगोदर दोन दिवस नागपुरच्या बंगल्यात समीरने माझा गैरफ़ायदा घेतला. लग्न दोनच दिवसावर आल्याने मी गप्प बसले. आता तु काहीही निर्णय घेऊ शकतोस."

" मला माहीती आहे. म्हणजे निदान मी अंदाज बांधला होता"

"काय?"

" आत्ताच्या टेस्ट्स मधे माझ्या स्पर्म मधला डिफेक्ट लक्षात आला आहे, मला कधीच पितृत्व मिळु शकत नाही. विकि नंतर नको ठरवल्यामुळे ते आत्तापर्यंत लक्षात आले नाही."

" म्हणजे विकी तुझी नाही "

" वेडाबाई तुम्ही दोघीही माझ्याच आहात. फक्त माझ्याच"

" शेखर तुझ्या मनाचा मोठेपणा मला आत्ताच कळतोय आणि माझा कोतेपणाही"

" शुभा लीऑन उरीसचे एक वाक्य फार सुंदर आहे to know the faults and still go on loving is the ultimate love"

"खर आहेरे. सकाळीच माझ्या सवतीने हे वेगळ्या शब्दात सांगीतले." म्हणत तिने मला घट्ट मिठी मारली.
 

गुलमोहर: 

अश्याच प्रकारची कथा पूर्वी वाचल्याचे आठवते आहे. थोडे फार संदर्भ वेगळे आहेत इतकेच.
एक मराठी चित्रपटही आहे अश्याच कथेवर आहे, जिथे नायक नायिकेच्या चुकीचा स्वीकार करतो अगदी अश्याच पध्दतीने. लग्न ज्या पध्दतीने होताना दाखवलय तेही काही कथानकांमध्ये डिट्टो असेच दाखवलेले आहे.

लिखाणाबद्दल बोलायचं तर सुरुवातीच्या भागात "स्पर्म टेस्ट" चा उल्लेख केल्यामुळे (अमेरिकेत अपघात होतो तेंव्हा) कथा शेवटी कोणत्या वळणावर जाणार याची आधीच वाचता वाचता जाणीव होते.
शेवट प्रेडिक्टेबल होतो.

नव्या कथेत काळजी घ्यालच.

मनापासून शुभेच्छा....!!!!!!!!!

सुपर्ब..........
मला नव्हत वाटल कि मला इतकी आवडेल वाचायला वेळ नाही म्हणुन काही दिवस लांबली हि कथा, पण विषय आवडिचा होता म्हणुन वाचली...............ती पण एका दमात............खुप खुप खुप आवड्ली कि निवडक दहात नोंद केली.......................
पु.ले.शु........
लिहीत राहा.........वाचत राहु.............!

मस्तच.

पण हे वाक्य थोडे खटकले " झोपेतच सतीश गेल्याचे कळले." त्याचा अर्थ पुर्णपणे वेगळा निघतोय. जरा दुरूस्ती कराल का?

prafullashimpi

वाक्य बदल केला
"झोपेतच सतीश दवाखान्यात निघुन गेल्याचे कळले. "
धन्यवाद !!!

रहस्यमय कादंबरी मायबोलीवर क्रमश: येत आहे..
बोगोर बुदुर भाग १
http://www.maayboli.com/node/33713
बोगोर बुदुर भाग २
http://www.maayboli.com/node/33715
बोगोर बुदुर भाग ३
http://www.maayboli.com/node/33716

कथा तर छान आहेच..... पण मला चातक यान्चि comment खुप आवडलि.
'लाडकी सवत' यांच्या आवडीचा विषय- हसुन हसुन पोट दुखल

Pages