एका 'मार्गदर्शका'ची सेवानिवृत्ती

Submitted by अशोक. on 14 March, 2012 - 12:33

काही वर्षापूर्वीची गोष्ट. कोल्हापूर-सोलापूर प्रवासात असताना राल्फ वाल्डो इमर्सनच्या लेखाचा समावेश असलेले पेंग्विनचे एक पुस्तक वाचत होतो. कवितेसंदर्भात इमर्सनची निरीक्षणे वाचताना त्याने केलेला 'एम्मा लाझारस' या कवयित्रीच्या १८६७ साली प्रसिद्ध झालेल्या 'पोएम्स अ‍ॅण्ड ट्रान्सलेशन' चा उल्लेख वाचला आणि त्याबरोबर एम्मा लाझारसच्या कवितेवर त्याने उधळलेली स्तुतीसुमनेही. त्यावेळेपर्यंत तिची कोणतीही कविता माझ्या वाचनात आली नव्हती, ना तिच्याविषयीची काही माहितीही माझ्याकडे होती. सोलापूर येईपर्यंत इमर्सनसारखा जगन्मान्य असा लेखक तिच्याविषयी आत्मियतेने इतके लिहितो ही बाब मी मनी नोंदवून ठेवली. ऑडिटच्या ज्या कामासाठी सोलापूरमध्ये येणे झाले होते ते आकस्मिकपणे लवकर संपले असले तरी अन्य सहकारी अन्यत्र त्यांच्या अपूर्ण कामात गुंतले असल्याने किमान दोनतीन तास मोकळे होते, त्यामुळे मग मी सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आलो. तेथील मंडळींना मी माहीत असल्याने नित्याचे स्वागत झाले. चहावगैरे नित्याचे उपचार झाल्यानंतर मी ग्रंथपालांची परवानगी घेऊन स्टॅक रूमकडे वळलो आणि पावले अगदी अलगदपणे 'रेफरन्स सेक्शन' कडे गेली आणि तिथे एका सुंदर कपाटात एकाखाली एक अशा तीन रॅक्समध्ये सोनेरी अक्षरांनी झळकणारे नाव समोर आले : ENCYCLOPEDIA BRITANNICA.

"L" लेटरने सुरू झालेला त्यातील एक ग्रंथराज उचलला आणि तिथेच सोय असलेल्या टेबलखुर्चीचा आधार घेऊन त्या 'एम्मा लाझारिस" विषयी जी काही माहिती मिळाली ती टिपून घेतली. New Colossus ही अमेरिकेच्या स्वातंत्रदेवता पुतळ्याला समर्पित केलेली आणि तितक्याच गाजलेल्या कवितेचीही माहिती मिळाली. तासभर वाचन केले आणि नित्यनेमाने स्वत:शीच पुटपुटतो तसे "थॅन्क्स, ब्रिटानिका" म्हटले आणि प्रसन्न चित्ताने त्या ग्रंथालयातून बाहेर पडलो; बाहेर त्या दिवशीची त्या परिसरातील संध्याकाळ नकळत अधिकच आल्हाददायक वाटली.

ही जादू 'एनसायक्लोपिडीया ब्रिटानिका' ची. आज (किंबहुना आत्ताच) समजले की एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका हा विश्वकोश, यापुढे छापील स्वरूपात मिळणार नाही. छपाईची किंमत परवडत नसल्याने प्रकाशकांना हा निर्णय घ्यावा लागला. तब्बल २४४ वर्षांपूर्वी पहिल्या खंडाचे प्रकाशन झाल्यानंतर प्रथमच हा निर्णय घेण्यात आला आहे. हे वाचताक्षणीच विलक्षण अशी काहीतरी हरवत चालल्याची जाणीव झाली आणि ३०-३५ वर्षापूर्वीचे कॉलेजमध्ये पाय ठेवण्यापूर्वीही अगदी हायस्कूलच्या दिवसात शेजारी राहणारे कुलकर्णीसर आम्हा मुलांना "ब्रिटानिका" संदर्भात आठवले. (ते विश्वकोशही म्हणत असत, पण ब्रिटानिका हेच नाव फार लाडके वाटत होते) सर जी काही माहिती देत ती अगदी अरेबियन नाईट्सप्रमाणेच वाटे. कॉम्प्युटर, इंटरनेट, टीव्ही तर नव्हतेच, पण गल्लीतील सर्वात श्रीमंत म्हटल्या जाणार्‍या फक्त खोत वकिलांकडे फोन आणि रेडिओ होता. अशावेळी 'माहितीचा पूर' नावाची संकल्पना रुजली नव्हती यात आश्चर्य नव्हते. हायस्कूल्सच्या लायब्ररीत ब्रिटानिका "न परवडणारी खरेदीची बाब' असणे साहजिकच होते, त्यामुळे त्यांचे ओळीने दर्शन झाले ते गोखले कॉलेजमध्ये पाय ठेवल्यानंतरच. लायब्ररीचा वापर कसा करावा या संदर्भात तिथले ग्रंथपाल आणि समिती सदस्यांनी सार्‍या लायब्ररीची आमच्या बॅचला सफर घडवून आणली आणि मी कधी 'रेफरन्स सेक्शन' मधील ब्रिटानिकाच्या रॅक्सकडे तेथील अटेन्डंट आम्हाला नेतील याची वाट पाहात होतो. पहिलाच दिवस असल्याने हातात थेट त्यातील एकही व्हॉल्यूम येणे शक्यच नव्हते. पण मी सहा.ग्रंथपाल याना बाजूला घेऊन आम्हा विद्यार्थ्यांना हा रेफरन्स सेक्शन पाहता येईल का याची चौकशीही केली. पुढे असे समजले की विद्यार्थीच काय पण प्राध्यापक मंडळींनाही ब्रिटानिकाचा कोणताही खंड घरी नेण्याची परवानगी नसायची. जर काही संदर्भ हवेच असले तर आपले कार्ड काऊंटरवर जमा करून मग अगदी तासदोनतास कोणत्याही 'लेटर' ने सुरू होणारा त्यातील एखादा खंड घेऊन इंग्रजीतील ती मुंगीच्या आकाराची बारीक अक्षरे वाचत बसण्याचा छंदच लागला मला आणि माझ्या दोन मित्रांना. पुढे तर एकदा ग्रंथपालांनी चक्क 'मॅग्निफाईंग ग्लास' ही दिला...विशेषतः खंडातील नकाशे अभ्यासण्यासाठी. कॉलेजची सारी वर्षे ब्रिटानिका हा अत्यंत चांगला स्नेही झाला होता.

माहितीचा किती प्रचंड खजाना त्या पानापानातून खच्चून भरलेला असतो हे ज्याने ब्रिटानिकाचे खंड हाताळले आहेत त्याच्या लक्षात जरूर येईल. कुतूहलापोटी "Z" खंडात काय सापडेल हे एकदा पाहताना तिथे चक्क मेक्सिकन क्रांतिकारक "झपाटा एमिलानो" विषयी इतकी छान माहिती मिळाली की जी ग्रंथालयात कुठल्याच सेक्शनमध्ये जमा नसणार कारण मेक्सिको तसेच लॅटिन अमेरिकेतील अन्य अनेक देशांविषयीच्या लोकक्रांती (काही प्रमाणात क्युबा सोडल्यास) संदर्भात भारतात अत्यल्प माहिती असते. हे शक्य झाले ते ब्रिटानिकामुळे.

एनसायक्लोपिडीआ ब्रिटानिकाच्याही अगोदर "विश्वकोशाची" संकल्पना अंमलात असल्याचे इतिहास सांगतो. नॅचरल हिस्टरी (इ.स.पू. सु. ७९-२३) हा प्लिनीचा सर्वांत जुना असा कोशरचनेचा प्रयत्न होता. आठव्या-नवव्या शतकांत आणि नंतर अरबी भाषेत धर्म, नीती, तत्त्वज्ञान इ. विषयांवर कोशसदृश रचना होऊ लागली. पश्चिमी प्रबोधनकाळापासून सगळ्याच ज्ञानव्यवहाराला नवी प्रेरणा व दिशा लाभली. ज्ञानाचे संघटन व विशिष्ट विषयपर आणि सर्वविषयसंग्राहक कोशरचना यांबद्दलच्या संकल्पना याच काळात अधिक स्पष्ट होत गेल्या. सोळाव्या शतकापासून फ्रान्स, इंग्लंड इ. देशांत कोशरचनेस नव्याने चालना मिळाली. त्याचीच परिणती म्हणजे "एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका" ची कल्पना मूर्त स्वरूपात आली आणि सन १७६७—७१ (स्कॉटलंडमधील एडिम्बर्गमध्ये १७६८ मध्ये पहिले प्रकाशन करण्यात आले होते.) हा प्रयत्न जनमानसात रुजलाही. ज्ञानक्षेत्रांतील संदर्भसेवेच्या विविध गरजा विविध प्रकारे पुरविणारे अनेकविध प्रकारचे कोश तयार होऊ लागले आहेत हे जरी एक सुचिन्ह असले तरी 'ब्रिटानिका' ला विश्वात जे स्थान लाभले आहे त्याची जागा त्यानंतर आजतागायत अन्य कुठलाही विश्वकोश घेऊ शकलेला नाही.

पण आता संचालक मंडळाला "पैशाचे गणित" झेपेनासे झाले असे खुद्द अध्यक्षांनीच आज जाहीर केले म्हणजे अन्य कुणाला विचारण्याचा प्रश्नच राहिला नाही. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका इन्कॉर्पोरेशनचे अध्यक्ष जॉर्ज काऊझ म्हणाले, की यापुढे ब्रिटानिकाच्या प्रती केवळ डिजिटल स्वरूपातच विकण्यात येतील. छापील आवृत्तीच्या विक्रीचा विक्रम १९९० मध्ये झाला होता. या एकाच वर्षात १ लाख २० हजार खंड विकले गेले होते. त्यानंतर अवघ्या सहा वर्षांत, म्हणजे १९९६ मध्ये हा खप अवघ्या ४० हजारांपर्यंत खाली उतरला. काऊझ म्हणाले, की गेल्या काही वर्षांपासून छापील खंडांची विक्री दिवसेंदिवस घटत असल्याने, कधीतरी ही वेळ येणार, याची कंपनीला कल्पना होतीच. धंद्याच्या गणिताला समोर ठेवले तर ही स्थिती नक्कीच चिंताजनक वाटणे स्वाभाविक आहे. कारण कसल्याही परिस्थितीच 'ब्रिटानिका' ने खंड सादर करण्याचा क्वालिटीत तडजोड केल्याचे उदाहरण गेल्या तिन्ही शतकाच्या कोणत्याही कालखंडात सापडणार नाही.

अर्थात जिथेजिथे हे खंड आहेत (माझ्या पाहणीनुसार्/माहितीनुसार "ब्रिटानिका" चे खंड हमखास सापडण्याची ठिकाणे म्हणजे महाविद्यालय आणि विद्यापीठ ग्रंथालय. शहरांतील कॉलेजीसमधून अगदी 'कंपल्सरी' म्हटली जाते अशा स्वरूपातील खरेदी होत असतेच. याला शासनाचे अनुदान १००% मिळते. पण बर्‍याच ग्रामीण भागातील महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या संचालक मंडळाला ब्रिटानिकाचे खंड आपल्या ग्रंथालयासाठी असले (च) पाहिजेत असे वाटत नाही, दुर्दैवाने. आतातर नवीन आवृत्ती प्रकाशितच होणार नसल्याने तो वादच संपुष्टात आला) तिथेतिथे पानापानातून ही मार्गदर्शनाची गंगामाई वाहती राहणारच आहे. शिवाय क्राऊझ यानी सांगितल्याप्रमाणे सर्व खंडांची सीडी-रॉम व्हर्जन १९८९ मध्ये प्रकाशित करण्यात आली आहेच शिवाय आणि १९९४ मध्ये ऑनलाईन व्हर्जन सुरू झाले.

"मार्गदर्शक मित्र" ऑनलाईन भेटत राहणार यात शंका नाही, पण त्याला हाती घेऊन टेबलवर ठेवून स्वत:च्या बोटानी त्याला हाताळण्यामध्ये जी आपुलकी वाटत होती, ती वेगळीच होती. तो आजही ओळखीच्या ग्रंथालयात भेटणार आहेच, पण त्याचे नित्यनेमाने "कात टाकून" येणारे सुंदर झळझळीत रुपडे कायमचे अस्तंगत झाले याची खंत नेहमी राहिल.

[आभार : ब्रिटानिका इन्कॉर्पोरेशनचे अध्यक्ष जॉर्ज क्राऊझ यांच्या आजच्या निवेदनातील आकडेवारीची माहिती ही "ई-सकाळ" वरून घेतली आहे, त्याबद्दल त्या संपादक मंडळाचा मी ऋणी आहे.]

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अशोक,

चांगली माहिती. शेवटी कालाय तस्मै नमः म्हणावंच लागतं. आख्खे खंडच्याखंड उचलण्यापेक्षा कळफलकावर बोटं नाचवणं सोपं! त्यामुळे हे होणारंच होतं अशी देजा व्हू जाणीव होते. शिवाय मुक्तकोशासारखे पर्यायही उपलब्ध झालेत.

It was bound to happen. Only a question of when, not if.

आ.न.,
-गा.पै.

छान लिहिलंय Happy
<<पण त्याला हाती घेऊन टेबलवर ठेवून स्वत:च्या बोटानी त्याला हाताळण्यामध्ये जी आपुलकी वाटत होती, ती वेगळीच होती>> +१
कुठलेही कोश वापरणं किती आनंददायी अनुभव असतो नाही! पानं उलटत उलटत हवी ती माहिती शोधत आसपासचीही अचानक नजरेला पडलेली माहिती वाचत काम करणं फार समृद्ध करून जातं... इंटरनेटवर हव्या त्या माहितीची थेट भेट होते हे खरं पण त्यात स्वतःच्या पायवाटेवरून रमतगमत, आसपास पहात, 'निसर्गसौंदर्य' टिपत जायची मजा नाही Happy

अमेरिकेत येताना स्वतःचा एनसायक्लोपेडियाचा सेट असावा हे महत्वाचं स्वप्न होतं. नोकरी लागल्यावर नवे फर्निचर, टि व्ही वगैरे घेण्याआधी ब्रिटानिआचे लेदर बाऊंड व्हॉल्यूम्स घेतले होते. नंतर घरातली जागा इतर पुस्तकांनी व्यापत गेली त्यामुळे अगदी जड अंतःकरणाने ४-६ वर्षांपूर्वी ते भारतातील एका शाळेला पाठवले. ऑनलाईन कितीही गोष्टी अव्हेलेबल असल्या तरी ब्रिटानिकामधल्या माहितीवर जितका सहज विश्वास टाकता येतो तितके अगदी विकीपेडिया बद्दल सुद्धा वाटत नाही ,

अशोक, मलाही हे पुस्तकापासून दुरावण्याचे दिवस, कठीण गेले, जातही
आहेत. कपाटात. अर्धे कपाट भरुन पुस्तकेच आहेत. पण माझे विषय
वेगळे..

अशोक जी,
या घटनेची दखल आपण फारच छान घेतलीत त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.
हा मार्गदर्शक 'पुस्तक' स्वरूपात भेटण्याऐवजी 'डिजिटल' या ' अद्ययावत ' स्वरूपात दिसणार आहेच. त्यामुळे या मार्गदर्शकाने 'सेवानिवृत्ती स्वीकारली' की 'कात टाकली' असे म्हणावे?
पुस्तकाच्या स्वरूपातील ग्रंथांमधून ज्ञान घेण्याचीच आपल्या पिढीला सवय असल्याने 'हुरहुर' वाटणारच! आणि ती आपण फार समर्थपणे व्यक्त केली आहे.

@ गामा पैलवान ~

खरंय ती 'देजा हू' ची अवस्था नक्कीच येते असे भूतकाळात डोकावताना. खंड उचलताना आज तुम्ही म्हणता तसा त्रास जाणवेल, नो डाऊट, कारण की बोर्डची सुलभता हातीबोटी आता रूजत चालली आहे. पण माझे ते दिवस ३०-३५ वर्षापूर्वीचे होते हे लक्षात घेतल्यास "ब्रिटानिका" आपल्याला जसाच्या तसा हाताळायला मिळतो याचेच अप्रुप जास्त होते.

[कोकण किनारपट्टीवर "चनक' नावाचा एक भलताच चविष्ट मासा मिळतो, पण तो जसाच्या तसाच पाहणे इतके मोहक आहे की प्रत्यक्ष ताटावर आल्यानंतर त्याला स्पर्श करावा की न करावा असा यक्ष (वा भक्ष्य) प्रश्न पडतो. तीच गोष्ट ब्रिटानिकाची पाने प्रत्यक्ष हाताळणे आणि आता स्क्रीनवर पाहणे यांच्यातील ती 'भावनिक' अनुभूती आहे.

@ वरदा :
अगदी माझ्या मनातील हे वाक्य आहे तुमचे : "पानं उलटत उलटत हवी ती माहिती शोधत आसपासचीही अचानक नजरेला पडलेली माहिती वाचत काम करणं फार समृद्ध करून जातं... " ~ एक छोटासा अनुभव सांगतो. जुन्या करारातील नबालची पत्नी अबिगेलविषयी मला काही माहिती हवी होती ती पाहात असताना तसेच टिपणवहीत नोंदी करत असताना इकडे पंख्याच्या झोताने ब्रिटानिकाच्या त्या खंडातील पाने पुढे गेली आणि अचानक "अ‍ॅन जोकिम" या व्यक्तिरेखेविषयीची माहिती माझ्या नजरेत आली आणि ही अ‍ॅन चक्क व्हर्जिन मेरीची आई निघाली. गॉश्श....हे मला अजिबात माहीत नव्हते आणि त्यापूर्वी कधी त्याची आवश्यकताही भासली नव्हती, पण आता समोरच आल्यावर अ‍ॅनविषयीची सर्व माहिती अधाशासारखी वाचून काढावी असे झाले, केलीही तसेच.

प्रत्यक्ष पुस्तक हाताळण्याचा हा एक फायदाच. अर्थात म्हणून मी डिजिटल आणि ऑनलाईन लायब्ररीचे महत्व बिलकुल कमी मानणार नाही. पण सातासमुद्रापलिकडे कुणी गेले तरी ".......दूर नदीच्या काठी माझी ती सुंदर खोपटी....." ची ओढ राहणारच. असेच काही या विषयाबाबत.

@ मेधा, दिनेश, दामोदरसुत
~ तुमच्या प्रतिसादाबद्दल स्वतंत्र लिहितो.

माझा एक व्यासंगी, पुस्तकवेडा मित्र आहे. इराण्याच्या हॉटेलात चहा घेत गप्पा मारताना कांहीतरी विषय निघाला , तर मला खेंचत घरी नेऊन त्याच्या कपाटातला 'ब्रिटानिका'चा एक खंड प्रेमाने उघडून ,हलकेच माझ्यासमोर ठेवत तो म्हणाला " हे दोन पॅराज वाच; डोक्यातला सगळा घोळ निघून जाईल तुझ्या ". मी केविलवाणा चेहरा करत म्ह्टलं ," अरे , सहज पाय मोकळे करायला खाली उतरलो होतो म्हणून चष्मा नाही घेतला बरोबर ". " अरे साल्या, सहज खाली उतरलो, म्हणून मेंदू नाही घेतला बरोबर, असंही म्हणशील उद्यां " असं वैतागून म्हणत त्याने ' ब्रिटानिका''तले ते दोन परिच्छेद मला वाचून दाखवले व मला म्हणाला " तुझ्या मूर्खपणामुळे आतां माझे सर्व कार्यक्रम बाजूला पडून माझे दोन-तीन तास 'ब्रिटानिका'तच जाणार ! म्हणून तुलाच तें वाचायला सांगत होतो. चल, निघ आतां ".
खरंच, 'ब्रिटानिका' हें प्रकरण आहेच तसं ! निरोप समारंभातल्या वरील छान लेखाबद्दल धन्यवाद .

सुंदर लिहिलंय.
छापिल पुस्तकं ते ऑनलाईन वाचन या संक्रमणातून जाणार्‍या सर्वांच्याच या भावना असतील.

वरदा, परफेक्ट मांडलंयस !! Happy

भाऊ Happy

कॉम्प्युटर, लॅपटोप, टॅब्लेट.... ह्या जमान्यात छापील आवृत्ती बंदच होणार, नव्हे ते टाळता येण्यासारखे नाहीच. आता त्यामुळे काही बिघडत नाही. ज्याना अशा गोष्टींची (ब्रिटनिका, इंजिनिअरिंग इंडेक्स, विकि) तहान (क्रेझ) असते, ते शोध घेतात आणि त्याना माहिती मिळते. आणखीन काय हवे? लेख छान आहे.

@ मेधा :

नवे फर्निचर, टीव्ही घेण्याअगोदर तुम्ही ब्रिटानिकाचे लेदर बाऊंड व्हॉल्यूम्स खरेदी केले होते हे वाचून तुमच्याविषयी माझ्या मनी किती आदर निर्माण झाला आहे याची तुम्हीच कल्पना करा. सिम्पली अमेझिंग, आय मीन इट.

मी स्वतः ब्रिटानिकाबद्दल इतके भरभरून लिहितो, सांगतो इतरांना वर्षानुवर्षे, पण मला आजतागायत तितकी रक्कम त्यासाठी बाजूला काढून ठेवणे जमलेले नाही. आज त्या संपूर्ण सेटची किंमत जवळपास सत्तर हजार रुपये आहे आणि नोकरीतील कामाच्या स्वरूपामुळे मी ज्या गावी असेन तिथे मला ब्रिटानिका "ईझीली" उपलब्ध होत असल्याने खरेदी 'केलीच' पाहिजे असे तीव्रतेने वाटलेही नाही. पण आता तुम्ही चक्क अमेरिकेतील घरात सर्वप्रथम ब्रिटानिकाना प्रवेश दिल्याचे वाचल्यावर तुमच्या ग्रंथप्रेमाची कल्पना लागलीच आली.

कोणत्याही कारणाने का असेना तुम्ही ते खंड इथल्या एका शाळेला पाठविले ही बाब निश्चितच अभिनंदनीय आहे. निदान त्या निमित्ताने तरी शाळेतील मुलांना माहितीचे स्त्रोत खर्‍याअर्थाने समजतील. आणि होय, ऑनलाईनची कितीही अव्हेलिबिलिटी बोटाच्या टिचकीवर असली तरी खंड प्रत्यक्ष हातात घेऊन त्या प्रवासाचा आनंद घेणे हा एक अप्रतिम सुंदर अनुभव आहे.

थॅन्क्स

@ दिनेश ~ नो डाऊट. पुस्तकापासून दुरावण्याचे दिवस फार कठीण जातात. माझ्या नोकरीतील सर्वात मोठी समाधानाची बाब माझे वेतन नसून त्या त्या गावातील कॉलेजीसची ग्रंथालये. टीम वर्क असते ऑडिटचे, अन् त्यातील माझा भाग संपला (जो मी वेगाने पूर्ण करीत असतो) की मी थेट शिरतो तेथील ग्रंथालयात आणि त्या कपाटातील पुस्तकांचा सहवास इतका प्रिय होतो [एकांतही मिळतोच] की, सहकारी भोजनासाठी हाक मारीत आले तरी मला तिथून निघावे असे वाटत नाही.

तुमचे विषय जरी वेगळे असले, तरी त्या संबंधातही ब्रिटानिकामध्ये विस्तृत प्रमाणावर माहितीचा साठा असणारच.

@ दामोदरसुत ~ नक्कीच 'कात टाकली' असे संबोधणे योग्यच आहे. फक्त इथून पुढे मी एखाद्या ग्रंथपालाला असे विचारू शकणार नाही, "नमस्कार, ब्रिटानिकाची नवीन आवृत्ती आली आहे तुमच्याकडे ?" ~ हा माझा नित्याचा नसला तरी कुतूहलाचा प्रश्न असे. तुम्ही जाणू शकता की ज्यावेळी अबक कॉलेजमध्ये गेल्यावर तिथे समजते की मागील महिन्यातच नवे व्हॉल्यूम्स आले आहेत, त्यावेळी इतरांपेक्षा मी किती हर्षभरीत होत असेन.

@ ऋयाम ~ धन्यवाद, अ‍ॅण्ड येस्स....कालाय....खरं आहे ! पण एक ग्रंथप्रेमी म्हणून हुरहूर ही वाटलीच म्हणून या लेखाचे प्रयोजन.

@ भाऊ नमसकर ~ "माझे सर्व कार्यक्रम बाजूला पडून माझे दोन-तीन तास 'ब्रिटानिका'तच जाणार ! म्हणून तुलाच तें वाचायला सांगत होतो." ~ ग्रेट रीअली. हे तर 'ब्रिटानिका वेडेपणाचे' उत्तम उदाहरण आहे. मी नक्की शेअर करणार माझ्या अन्य मित्रांसमवेत. तुमच्या या ब्रिटानिकाप्रेमी मित्राला आवर्जून माझा नमस्कार सांगावा.

@ ललिता-प्रिती ~ धन्यवाद. ऑनलाईन हीदेखील माहितीची गंगा आहेच, नो डाऊट. पण माझ्यासारख्या मागील पिढीतील व्यक्तीला ब्रिटानिकाचे खंड हाताळत असताना होणारा आनंद कपाटात घडी घालून ठेवलेल्या आईच्या पैठणीला येणार्‍या सुवासासारखा जाणवत राहील....नेहमीच.

अप्रतिम लेख... आणि प्रतिसादही सुंदर...

अजुन्पर्यंत मी एकदाही ब्रिटानिका' हाताळला/चाळला नाहिये याचं प्रचंड वाईट वाटतय... Sad

अप्रतिम लिहीले आहे!
माहितीच्या डिजिटल महापूरात, पुस्तकातून हवी ती माहिती शोधण्याचे थ्रील, ती मिळाल्याचे समाधान आणि आनंद मिळत नाहीच असे नाही पण कधीकधी गोष्टी इतक्या सहजसाध्य झाल्या की त्यातली मजा उणावते, रायगड चढून जाण्यतली मजा रोपवेत नाही!!!
वरदाला अनुमोदन, पण त्याच बरोबर हे ही म्हणेन की असा माहितीच्या प्रवाहात वाहत कुठूनकुठे पोहोचण्याचा अनुभव विकीपिडीआवरही येतो.

खुप छान लेख! ह्या 'मार्गदर्शका'च्या इतिहासाची पण छान माहिती मिळाली Happy

@ आगाऊ ~

वा ! काय विलक्षण योगायोग आहे 'रायगड' चा.
अगदी कालच एक जालीय मित्र श्री.आशिष निंबाळकर, जे 'महाड' या गावात नोकरीनिमित्त राहतात, रायगड चढून जायाचे होते म्हणून महाडमध्ये रात्री मुक्काम केला होता आणि मग पहाटे ४ ला गडाकडे कूच केले होते याचीच आठवण त्याना वि.पू.तून सांगत होतो शिवाय शिर्के कंपनीने रोपवेची सोय केली म्हणून घरातील ज्येष्ठांनाही नंतर घेऊन गेल्याचा तोही अनुभव कथन केला.

पण तुम्ही म्हणता तेच खरे.......रायगड चढून जाण्यात जी मजा आहे ती रोप वे त नाही. रोप वे ही एक 'फॅसिलिटी' तर गड चढणे हे 'थ्रिल' आहे. हीच केमिस्ट्री लागू होते ती ब्रिटानिकाचे ते देखणे खंड हाती घेऊन जगाची सफर करणे आणि उंदीरमामाला क्लिक करत स्क्रीनवरून फेरफटका यांच्या तुलनेत.

ब्रिटानीकावर लेख मस्तच अशोकराव.. माझ्या कडे नाही पण माझ्या काही मित्रांकडे आहेत .. पण त्याचा उपयोग ते लोकांसमोर आपल्या ज्ञानाच्या किंवा अभीरुचीच्या प्रदर्शनासाठी म्हणुन करतात.. पण मला वाटते की ब्रिटानीयाची मागणी कमी होण्यात इंटरनेट सर्च इंजीन्स आणी सर्वात ज्यास्त विकीपीडीयाचा हात मोठ्ठा आहे.. विकी मुळे कुठलिही अद्यावत माहिती लोकाना क्षणात उपलब्ध होत आहे.. त्यामुळे लोकांचा कल विकी कडे वाढतो आहे..:)

कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला असताना लायब्ररीमध्ये ब्रिटानिका सोडुन कुठल्याच पुस्तकाला हात लावला नव्हता.. तेव्हा सगळा गृप वेगवेगळे खंड घेवुन बसे व नंतर त्यात काय काय वाचले याची चर्चा चाले.. अर्थात इंटरनेट तेव्हा आवाक्याबाहेर असल्याने ब्रिटानिकाचा माहीतीचा खजिना खुप आनंद देत असे..:)

हो, मला सध्याच्या विद्यार्थ्यांना समजावता येत नाही की इंटरनेटवरची थेट भेट ही वेळ वाचवत असली तरी त्यामुळे अनेको गोष्टींना मुकायला होतं.
संशोधन संदर्भासाठी जेव्हा तुम्ही एखाद्या जर्नलमधला एखादा लेख पहाता तेव्हा त्याच्या आसपासचे लेख चाळले जातात. काहींची अनपेक्षित भेट होते. आणि याने आपला अभ्यास आणखी सखोल होतो. किंवा संदर्भ बघण्यासाठी काही महत्वाची जर्नल्स अथपासून इतिपर्यंत प्रत्येक खंड, प्रत्येक अंक, प्रत्येक लेख असं बघत जायचं. वेळ जातो पण हा प्रवास फार सुंदर असतो. किती कायकाय गवसतं... आणि यातून उभा राहिलेला संशोधनाचा पाया फार मजबूत असतो. आणि हा सगळा वेळखाऊच प्रकार असतो - वेळ वाया घालवणारा नव्हे. संशोधनाच्या निष्कर्षाएवढीच महत्वाची अशी ही प्रक्रिया असते.
ब्रिटानिका कडून त्यात्या विषयाचं कोशवा़ङ्मय असा माझा प्रवास झालाय. त्यामुळे ब्रिटानिकाविषयी एक सॉफ्ट कॉर्नर कायमच आहे
विकिपेडिया खूप छान आहे हे खरंय पण अजूनही ब्रिटानिकासारखा आंधळा विश्वास टाकू शकत नाही मी त्यावर Happy

अशोक, वरदा, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आजकाल, विकी किंवा गुगलवर देखील अनेक आजुबाजुचे संदर्भ दिसतात आणि ते सुद्धा अगदी कमी वेळात. अर्थात तुलना नाही होऊ शकत, पण तरी आजकाल माहिती मिळविणे फारच कमी खर्चाचे आणि कमी वेळाचे झाले आहे.

लेख आवडला.
मी स्वतः 'माहितीचा महापूर' वाल्या पिढीतला असल्याने ब्रिटानिकाशी तेवढी सलगी नाही. मात्र ऑथेंटिक सोर्स ऑफ इन्फर्मेशन म्हणून आजही विकी वगैरेपेक्षा ब्रिटानिकालाच जास्त पसंती/मान्यता आहे, हे अनेकवेळा जाणवले आहे.
ब्रिटानिका यानंतरही (वेगळ्या रुपात) आपल्यासोबत असणार आहेच, ही भावना आश्वासक आहे- नाही का अशोकराव? Happy

@ राम ~
धन्यवाद. लकी यू आर की तुमच्या काही मित्रांकडे ब्रिटानिकाचे सेट्स आहेत. तुम्ही म्हणता तसा तो अभिरुचीचे प्रदर्शन म्हणून ठेवण्याचा प्रकार असू शकेल; पण ज्या घरात पाय ठेवताक्षणीच जर मला 'एनसायक्लोपिडीया ब्रिटानिका' चे दर्शन झाले तर मला झटदिशी होणारा हर्ष मी शब्दबद्ध करू शकत नाही. म्हणजेच त्या घराविषयी आपले मत अनुकूल बनतेच. माझ्या एका डॉक्टर मित्राच्या घरी असा संपूर्ण सेट आहे आणि त्याला त्यात कसलेही गम्य नाही, पण तो त्याला एका अशा व्यक्तीच्या फॅमिलीकडून "प्रेझेन्ट" मिळाला की जी फॅमिली न्यूझिलंडस्थित आपल्या मुलाकडे कायमच्या वास्तव्यास चालली होती. ही भेट डॉक्टर नाकारू शकले नाहीत. साहजिकच ब्रिटानिका डॉक्टरांच्या बंगल्यात स्टडीमध्ये 'सेट' झाला आहे. असाही प्रकार असू शकतो.

मान्य की लोकांचा [त्यातही सध्याच्या पिढीचा] ओढा विकीकडे वाढत आहे. मी स्वतःदेखील हे माध्यम उपयुक्त मानतोच; पण जवळपास २५० वर्षांची आपुलकीची परंपरा असलेले ते सेट केवळ पाहत (वा चाळत) बसलो तरी समाधानाची लाट अंगावर पसरते. [अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे, अनुभव आहे.]

@ मंजूडी, साजिरा ~ थॅन्क्स फ्रेन्ड्स.
@ सतिश ~ मी कल्पना करू शकतो तुमच्या आनंदाची. कारण मी स्वतः त्या फर्स्ट इअर फेजमधून गेलेलो आहे. श्री.बोन्द्रे नावाचे एक चांगले गृहस्थ आमच्या कॉलेजचे ग्रंथपाल होते आणि मी प्रथम वर्षाचा विद्यार्थी असूनही सातत्याने ब्रिटानिकासाठी त्यांच्याकडे कार्ड जमा करत असे याचे त्याना फार कौतुक होते. पुढेपुढे तर ते कार्ड घेतही नसत आणि मला स्टॅकरूमच्या आतील बाजूस बसण्याची परवानगीही दिली. घरही कॉलेजपासून अगदी 'वॉकेबल डिस्टन्स' वर असल्याने वेळेचीही चिंता नव्हती. पदवी घेऊन मी कॉलेजला रामराम करून विद्यापीठात दाखल झालो तर याच श्री.बोन्द्रे यानी तेथील ग्रंथपालासाठी माझ्याबाबत एक पत्र दिले होते. तिथेही असाच सुखद अनुभव आला.

@ वरदा, महेश, ज्ञानेश ~ नंतर सविस्तर प्रतिसाद देतो तुमच्या पोस्ट्सना.

अशोक पाटील

अशोक, छान लिहिले आहे तुम्ही.
ज्ञानकोषाचेच खरे, पण एकूणच पुस्तके 'हाताळण्याचा' अनुभव निराळाच असतो डिजिटल कॉपी वाचण्यापेक्षा. (मी सोय म्हणून डिजिटल वाचन बरेच करते अलीकडे, तरीही असे वाटते खरे.)
Its .. organic.

योगायोगाने कालच टाइममधला हा लेख वाचत होते.

Pages