स्टफ्ड आप्पे, तांदळाचे फरे - विष्णु मनोहर यांच्या पाककृती

Submitted by चिनूक्स on 4 September, 2008 - 01:51

मायबोली गणेशोत्सवाकरता सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी दिलेल्या खास पाककृती
----------------------------------------------------------
. स्टफ्ड आप्पे

लागणारा वेळ:
८-१० मिनिटे
तयारीसाठी अर्धा तास

साहित्य:
भिजवलेले जाड पोहे - १ वाटी
चणाडाळ (भिजवलेली) - अर्धी वाटी
आलं, लसूण, हिरवी मिरची यांची पेस्ट - २ चमचे
कोथिंबीर - २ चमचे
दही - ३ चमचे
खाण्याचा सोडा - पाव चमचा
बारीक चिरलेल्या भाज्या (गाजर, मटार, फ्लॉवर, फरसबी इ.) - अर्धी वाटी
शिजवलेला बटाटा - १ मोठा
खोबर्‍याचे तुकडे - ४-५ चमचे
मीठ, लिंबू, साखर

कृती :
जाड पोहे हातांनी कुस्करून घ्यावेत.
चणाडाळ बारीक वाटून घ्यावी.
त्यात खोबर्‍याचे तुकडे, आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर, मीठ, साखर (चवीनुसार), दही, सोडा घालून, नीट एकत्र करून, १-२ तास भिजवून ठेवावे.
नंतर त्यात पोहे घालावेत.
शिजवलेल्या भाज्यांमध्ये बटाटा, मीठ, लिंबू, साखर, कोथिंबीर, मिरची घालून, एकत्र मिसळून छोटे गोळे बनवावेत.
हे गोळे डाळ व पोह्याच्या मिश्रणात बुडवून, आप्पे पात्रात ठेवून आप्पे बनवावेत.
खोबरं, हिरवी मिरचीच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

वाढणी/प्रमाण :
दोन माणसांसाठी

---------------------------------------------------------------

. तांदळाचे फरे

हा पदार्थ मी लेण्याद्रीला, म्हणजे अष्टविनायकातील जे पहिले स्थान आहे, तिथे शिकलो. गंमत म्हणजे हाच पदार्थ उत्तर प्रदेश, बिहार येथे फरा या नावाने प्रसिद्ध आहे. महत्त्वाची गोष्ट अशी, की लेण्याद्रीला याचा नैवेद्य चंद्राला दाखवतात. तर उत्तर प्रदेश, बिहार येथेसुद्धा याचा नैवेद्य चंद्रालाच, पण करवा चौथच्या वेळी दाखवतात.
पश्चिम महाराष्ट्रात कोजागिरी पौर्णिमेच्या वेळी नवीन तांदूळ निघतो. त्या दिवशी असे फरे आणि दूध यांचा नैवेद्य चंद्राला दाखवतात, आणि नवीन तांदूळ वापरायला काढतात.

लागणारा वेळ :
१ तास

साहित्य :
तांदुळाची पिठी - २ वाट्या
भिजवलेली उडदाची डाळ - अर्धी वाटी
बडीशेप - २ चमचे
आलं पेस्ट - १ चमचा
जिरेपूड - १ चमचा
कोथिंबीर
मीठ
लिंबू
साखर
साजूक तूप

कृती :
तांदुळाच्या पिठीत मीठ, २ चमचे तेल घालून छान मळून घ्यावे.
भिजवलेली उडदाची डाळ मिक्सरमधे जाडसर वाटून त्यात बडीशेप, जिरेपूड, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, साखर घालून सारण तयार करावे.
तांदळाच्या पीठाचा गोळा लाटून (पुरीच्या आकाराचा) त्यामध्ये हे सारण घालावे.
घडी घालून करंजीसारखा आकार द्यावा. टोकाच्या दोन्ही बाजू मात्र उघड्या असाव्यात.
पाण्यात थोडं मीठ घालून ४-५ मिनिटे उकळावे.
नंतर त्या पाण्यात या करंज्या सोडून, झाकण ठेवून साधारण १० मिनिटे शिजवाव्यात.
पाण्यातून काढल्यावर नीट निथळून घ्यावात.
हे फरे साजून तुपाबरोबर छान लागतात.

वाढणी/प्रमाण :
२ माणसांसाठी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! Happy
पाककृती मस्त आहेत, वेगळ्या आहेत एकदम.

हे मस्त लागेल. Happy
माझी एक शंका. फर्‍याला पाण्यात सोडल्यावर उघड्या बाजूतून सारण पाण्यात नाही का मिसळणार? आणि पाणी आत जाऊन सगळं पाणचट नाही होणार?

नाही चिऊ, पाणी उकळलेलं आहे त्यामुळे आतलं सारण शिजत असेल लगेच. बाजू बंद केल्या तर ते शिजणार नाही नीट. आणि त्यांनी निथळून घ्यायला सांगितले आहे. Happy

चिनू, छान आहेत कृती. आप्पे कधी केलेत नाहीत कधी पोहे घालून. आता प्रयोग करून पाहीन लवकरच. फर्‍यांच्या बाबत चिऊची शंका रेपीट!

अगदी वेगळ्या आणि फार कटकटीच्या नसलेल्या healthy आहेत की .. करून बघायला हव्यात.. Happy

मस्त आहेत रेसिपीज. चिऊची शंका मला पण वाटतेय. लालू म्हणतेय तसं पाणी उकळलेलं आहे म्हणून उडदाची डाळ अंड्यासारखी पाण्यात पडताच घट्ट होत असेल का?

अजुन एक क्रुती

कणकेचा(आटेका) फरा (उत्तर प्रदेश)

२ वाटी कणिक
१/२ वाटी उडिद डाळ, १/४ वाटी चणा डाळ
हिन्ग, मिरचि, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, उकळण्याकरता पाणी.

१/२ वाटी उडिद डाळ, १/४ वाटी चणा डाळ रात्रभर भिजवा, सकाळी निथळून घ्या, जरा जाडसर वाटून घ्या, वाटताना पाणी शक्यतो घालू नये, घट्ट गोळा तयार झाला पाहिजे. या गोळ्यात १/२ चिमुट हिन्ग ,बारिक चिरलेली कोथिंबीर, वाटलेली मिरची ,चवीनुसार मीठ घाला.

कणिक मळुन घ्या.

chinoox ने सान्गितल्या प्रमाणे फरे बनवा "कणकेचा गोळा लाटून (पुरीच्या आकाराचा) त्यामध्ये हे सारण घालावे.
घडी घालून करंजीसारखा आकार द्यावा. टोकाच्या दोन्ही बाजू मात्र उघड्या असाव्यात."

कढई मधे २ चमचे तेल घाला यात जरासे हिन्ग घाला आणि पाणी घाला. चवीनुसार मीठ घाला , उकळी आली की एक एक फरा सोडा.१० मिनीटात फरे शिजतात आणि पाणी पण घट्ट होते. (पाणि उकळते असल्याने सारण जराही बाहेर येत नाही.)
वाढताना थोडे पाणी आणि फरा घ्या व गरम गरम खा.