शनिवारी शिजलेला कट : कोळंबी मसाला विथ कटाचा रस्सा (फोटोसहित)

Submitted by saakshi on 13 March, 2012 - 05:19
लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कोलंबी - १/२ कि. सोलून स्वच्छ केलेली.
हळद - १ छोटा चमचा
मीठ - चवीनुसार
तिखट - ६ चमचे
तेल अंदाजे

मसाल्यासाठी :
ओले खोबरे(मी एका नारळाचे घेतले होते) - पातळ,बारीक काप करून
कांदे - २ मध्यम आकाराचे - बारीक चिरून
आले-लसूण पेस्ट - १ मोठा चमचा
कोथिंबीर - बारीक चिरून १ वाटी किंवा जास्त

क्रमवार पाककृती: 

१. कोळंबी मीठ आणि हळद टाकून जरा मुरवत ठेवावी. तोपर्यंत मसाला करून घ्यावा.
२. मसाल्याचे सर्व साहित्य मिक्सरमधून काढून त्याची फाईन पेस्ट करून घ्यावी. मसाल्याचे दोन भाग करून घ्यावे.
३. कोळंबी मसाला :
कुकरमध्ये मसाला तेलात परतून घ्यावा. त्यात मीठ, ३ चमचे तिखट टाकून चांगले परतावे.
मग कोळंबी घालून(४-५ कोळंब्या रश्श्यासाठी बाजूला काढून ठेवाव्यात) पुन्हा हलक्या हाताने परतावे अन्यथा कोळंबीचे तुकडे होण्याची शक्यता जास्त.
अर्धा कप पाणी घालून कुकरचे झाकण लावावे. ४ शिट्ट्यात कोळंबी मसाला तय्यार!!
४. कटाचा रस्सा :
एका पातेल्यात तेल घेऊन मसाला ३ चमचे तिखट, मीठ घालून परतून घ्यावा. मसाला बाजूने सुटला पाहिजे. मग पाणी घालावे. पाणी घालताना चर्रर्रर्र आवाज आला की ओळखावे, कट चांगला होणार.
मग रश्श्यात टाकायला ठेवलेली कोळंबी घालून मंद आचेवर रस्सा आटू द्यावा.

कोळंबी मसाला आणि कटाचा रस्सा, दोन्हीवर बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून गरमागरम वाढावे आणि खावे...

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी भरपूर....
अधिक टिपा: 

हा प्रकार करण्याचे मनात आणले की diet वै. गोष्टींना मनातून हद्दपार करावे....
कोळंबी चापावी....मस्त लालभडक रस्सा भुरके मारत प्यावा... तुडुंब भरलेल्या पोटाने आणि कोळंबीच्या चवीने आरामात ताणून झोप काढावी तर ही पाककृती संपूर्ण होते Happy

माहितीचा स्रोत: 
पप्पा...
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages