एकदाच यावे सखया..

Submitted by तात्या अभ्यंकर on 12 March, 2012 - 04:09

एकदाच यावे सखया.. (येथे ऐका)

अशोकजी परांजपेंचे सुंदर शब्द असलेलं अशोक पत्की, सुमनताईंचं एक सुरेख गाणं. साधीच परंतु अत्यंत सात्त्विक अन् गोड चाल आणि सुमनताईंचा तितकाच गोड आणि हळवा गळा. 'सखया' हा शब्द खूप म्हणजे खूपच सुरेख!

पुन्हा गूज अंतरीचे हे कथावे व्यथांनी.. - ही ओळ खूप काही सांगणारी.

मध्यंतरीच्या काळात कुठेतरी अंतर पडले आहे, ते दूर व्हावे आणि पुन्हा एकदा तुझे गीत कानी यावे आणि 'भाव दग्ध विटला हा रे, पुन्हा फुलुनि यावा...!'

'पुन्हा फुलुनि यावा...' या ओळीतील पत्कीसाहेबांच्या अत्यंत हळव्या सुरावटीचं सुमनताईंनी अगदी सोनं केलं आहे. ही जागा त्यांच्या गळ्यातून इतकी सात्त्विकपणे उतरली आहे की क्या केहेने..! 'धुंद होऊनी मी जावे..' ही सुरावट देखील तशीच सुरेख...

प्रेमगीतातील ही सात्त्विकशीलता आणि मर्यादशीलता हल्लीच्या काळात क्वचितच पाहायला मिळते. कितीही जरी निरनिराळ्या राजसी-तामसी पाककृती असल्या, आपण त्यांचा वेळोवेळी आस्वाद घेतला तरी अहो शेवटी केळीच्या पानावरील साधा गरमागरम वरणभात, सोबत साजून लोणकढं तूप याला जशी सर नाही ना, तसंच या गाण्याचं आहे. अखेर कुठेतरी तुम्हाला निवारा मिळेल आणि तुमचं मन शांत होईल ते 'एकदाच यावे सखया', 'केतकीच्या बनी', 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या' किंवा विठ्ठला तू वेडा कुंभार..' याचसारख्या गाण्यांमधून..!

suman.jpg
पण आमचं हल्ली असं झालंय की आम्हाला 'कोलावरी डी..' सारखी गाणी हेच काय ते उच्च संगीत वाटतं आणि याचं कारण म्हणजे हल्लीच्या बाजारबसव्या वाहिन्या अशीच गाणी अगदी सतत तुमच्याआमच्या वर लादत असतात..

मग माझ्यासारखा नॉस्टालजियाने पछाडलेला एखादा खुळा उठतो आणि 'एकदाच यावे सखया..' या सारख्या गोड, अवीट गाण्याबद्दल आपलं मन मोकळं करतो इतकंच..!

-- तात्या अभ्यंकर.

गुलमोहर: 

एकदाच यावे सखया तुझे गीत कानी
धुंद होउनी मी जावे धुंद त्या स्वरांनी

असा चन्द्र कलता रात्री रानगंध यावा
सर्व भान विसरुनी नाती स्पर्श तुझा व्हावा
पुन्हा गुज अंतरीचे हे कथावे व्यथांनी

एकदाच वाटेवर या तुला मी पहावे
भाव दग्ध विटला हा रे पुन्हा फुलुनी यावे
असा शांत असता वारा रानपक्षी गावा
शब्दरूप प्रतीमा बघुनी जीव विरुनी जावा
स्वप्न हेच हृदयी धरीले ख़ुळ्या आठवांनी

गाणे आवडते आहेच, लेखही चांगला जमलाय.
मला आशाचे असेच एक गाणे आठवले..

सहज सख्या एकटाच, येई सांजवेळी
पाहीन मी वाट तूझी, त्या आम्रतरुखाली...

प्रतिसाद नोंदवणार्‍या सर्व रसिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, वाचनमात्रांचेही औपचारीक आभार..

तात्या.

तात्याबा,

अप्रतिम गाणं! शब्द आणि सुमनबाईंचा आवाज दोन्हीही!! काय चांगलं ते ठरवताच येत नाही.

तशीही मला कोलावेरीछाप गाणी कध्धीच आवडली नाहीत. जनावरासारखं नुसतं अंग हलवायला ठीक आहेत. मन हेलकावे घेत नाही त्यावर.

आ.न.,
-गा.पै.

तात्या, अजून मन मोकळं करा. वाचायला आहोत आम्ही Happy

जनावरासारखं नुसतं अंग हलवायला ठीक आहेत. मन हेलकावे घेत नाही त्यावर. >> गामा Happy

नव्याने प्रतिसाद नोंदवणार्‍या सर्व रसिकांप्रती पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो..

मायबोलीवर मला नेहमीच प्रोत्साहन मिळते हे आवर्जून सांगावेसे वाटते..

तात्या.

'एकदाच यावे सखया', 'केतकीच्या बनी', 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या' किंवा विठ्ठला तू वेडा कुंभार..' याचसारख्या गाण्यांमधून..!
----- तात्यासाहेब सहमत... बरेच दिवसांनी दर्शन झाले Happy . हे सर्व माझे पण आवडणारे गाणे.

छान.. हा राग कुठला? काही ओळींवर केतकीच्या बनी तिथे च्या अंतर्‍याचा प्रभाव आढळतो.

तात्या अभ्यंकर सुमन कल्याणपुर ह्या तर माझ्या खूप आवडत्या गायिक आहेत. तुम्ही लिहंलत पण छान.

<<<सहज सख्या एकटाच, येई सांजवेळी
पाहीन मी वाट तूझी, त्या आम्रतरुखाली...>>> दिनेशदा, मला वाटते, ते "वाट तुझी पाहीन मी , त्या आम्रतरूखाली " असे असावे.