ये कुछ आधे अधुरे पन्ने है - पन्ना 13

Submitted by स्वप्ना_राज on 12 March, 2012 - 03:59

फिर किसी शाखने फेकी छाव
फिर किसी शाखने हाथ हिलाया
फिर किसी मोडसे उलझे पाव
फिर किसी राहने पास बुलाया

गेल्या अर्ध्या तासात किती वेळा ऐकलंय 'लिबास' मधलं हे गाणं? ३ वेळा? ४ वेळा? ५ वेळा? खरं तर पूर्ण गाणंच अत्यंत आवडतं पण ह्या दोन ओळीत जीव नुसता अडकल्यासारखा होतो दरवेळी. असं वाटतं की कोणीतरी माझ्याच मनातलं, अगदी आतलं, शब्दात उतरवलंय. जगण्याला, आयुष्याला प्रवासाची दिलेली उपमा एकाच वेळी किती चपखल आणि तरीही किती जुनीपुराणी वाटणारी. माझ्याआधी कितीजणांनी ह्याच वाटेवरून केलेला प्रवास, माझ्यानंतर कितीजण करतील. माझ्याबरोबर करणारेही कितीतरी - काही ओळखीचे असून अनोळखी, तर काही अनोळखी असूनही खूप ओळखीचे वाटणारे. प्रवाससुध्दा असा की चालून आलेलं अंतर तर दिसतं पण पुढे किती जायचं आहे ते माहीत नाही, 'अजून किती दूर आहे हो?' असं कोणाला विचारायची सोय नाही. जवळजवळ सगळेच मुक्काम ठाऊक नसताना चालणारे. असलाच एखाद्याला किंवा एखादीला मुक्कामाचा पत्ता माहीत तरी तोच पत्ता आपला असेल असं नाही. नव्हे, १०० तले ९९.९९ टक्के तो आपला नसणारच.

बरं, वाट तरी सरळसोट कुठे आहे? चालता चालता ध्यानीमनी नसताना मध्येच वाटेला अनेक वाटा फुटतात आणि मग पावलं अडखळतात. हा रस्ता घेऊ का तो? हा घेतला तर पुढे त्यालाही अनेक रस्ते फुटतील आणि तो घेतला तर त्यालाही. ह्या रस्त्यावर सावली असेल का रणरणतं उन्ह असेल? सरळधोप असेल का वळणावळणांचा? सोबतीला कोणी चालणारं भेटेल का फक्त स्वत:ची सोबत घेऊन चालावं लागेल? मुक्कामाच्या जवळ नेणारा हा रस्ता असेल का चकवा लावणारा असेल? ह्याच प्रश्नांच्या भेंडोळ्यातून सुटका करून घेऊन एखादी वाट पकडून चालायला लागावं तर पावलं पुढे जात नाहीत. जवळून जाणारी एखादी दुसरी वाट खुणावते. कधी तिच्याकडे दुर्लक्ष करून धरलेली वाट मुकाटपणे चालणं होतं तर कधी स्वत:चीच पावलं न जुमानता खुणावणार्‍या वाटेने जाऊ लागतात. वाट कुठलीही पकडा, न घेतलेल्या वाटा असतातच आणि मग आयुष्यभर ह्या न घेतलेल्या वाटांबद्दल एक कुतूहल रहातं.

असंच कुतूहल आपल्यासोबत क्षणभर का होईना चालून नंतर ज्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या त्यांच्याबद्दल रहातं. झाडांच्या पानांतून उन्हाचे कवडसे जमिनीवर पडावेत तसे आपलं आयुष्य जगताना दुसर्‍यांच्या आयुष्यातले तुकडे दिसत रहातात. रस्त्याने चालता चालता एखाद्या घरासमोरच्या बनत असलेल्या रांगोळीचे फक्त ठिपके दिसावेत आणि पूर्ण झालेली रांगोळी कशी दिसली असेल त्याचं कुतूहल रहावं तसं सगळं चित्र दिसत नाहीच कधी पण तरी प्रश्न पडायचे ते पडतातच.

आणि हे प्रश्न असे असतात की ज्यांची उत्तरं मिळणं कधीही शक्य नसतं.........

-------

"Are you waiting for the Registrar?" मी पेपरातून मान वर करून पाहिलं तेव्हा हातात फोल्डर घेतलेला एक मुलगा दिसला.

"Ya" एका प्रश्नाला सविस्तर उत्तर दिलं की पुढले प्रश्न अधिक सविस्तरपणे येतात हे सवयीने ठाऊक झाल्याने शक्यतो एका शब्दात उत्तर द्यायचा माझा शिरस्ता मी पाळला.

"I am waiting for him too" हातातला फोल्डर उंचावत त्याने प्रश्न क्रमांक २ विचारला "Want to get your transcripts signed, right?"

माझ्या तोंडातून पुन्हा एक "Ya" निसटला. त्याने उगाच मला शिष्ट समजू नये म्हणून जोडीला मी एक स्मितहास्यही केलं.

"I am waiting since past 2 hours. God knows when he will be here" तेव्हढ्यात त्याला एक फोन आल्याने मला तिसऱ्यांदा "Ya" म्हणावं लागलं नाही.

मी कॉलेजात इंजिनियरिंग करत होते तेव्हा अत्यंत खडूस म्हणून ख्याती असलेला Principalच्या ऑफिसातला माणूस. पुन्हा ह्याचं तोंड पहायला लागणार नाही ह्याचा अतीव आनंद कॉलेजातून बाहेर पडताना सगळ्यांनाच झाला होता. पण आता एमबीए करायचं तर transcripts आणणं आवश्यक होतं. आणि माझ्या दुर्देवाने मधल्या काळात तोच माणूस Registrar झाला होता. त्याचा खडूसपणा किती पटीनी वाढला असेल ह्याची कल्पना करत मी आलेल्या भोगाला सादर होऊन उभी होते.

एव्हाना ऑफिस बंद व्हायला जेमतेम अर्धा तास उरला होता. आता Registrar उगवला तरी तो दोघांच्या transcripts वर सह्या करेल अशी आशा नव्हती. उद्या पुन्हा खेटे मारायला लागणार.

"How many transcripts do you have to get signed?" त्या मुलाने पुन्हा मला विचारलं.
"Hmm...about 15" एव्हढ्या कॉलेजात मला अप्लाय करायचं नव्हतं पण करून घेतोच आहे तर एकदाची घेऊन टाकूयात जास्तीची असा सुज्ञ (!) विचार ह्यामागे होता. Registrar नामक प्राण्याची ह्यावर काय रिअ‍ॅक्शन होईल ह्याचा विचार मला आत्ताच करायचा नव्हता. Let me come to the bridge and then I will cross it.

'Same here. I got an idea. Let's help each other out. You get your transcripts signed & stamped from him one by one. I will put them in an envelope for you and stamp them. Then you can do the same for me. We will save time that way'.

त्या वेळी आयडियाची जाहिरात आलेली नव्हती. नाहीतर मी नक्की 'What an idea Sirji" म्हटलं असतं. त्याने आपलं नाव मला सांगितलं, मी माझं त्याला. तो माझा ज्युनियर निघाला. मग कुठले कुठले प्रोफेसर्स आम्हाला कॉमन होते, कॉलेजातून बाहेर पडल्यावर आत्तापर्यत काय केलं, आता कुठल्या कॉलेजात अप्लाय करणार आहोत वगैरेवर आमची माफक चर्चाही झाली.

यथावकाश Registrar महाशयांचं आगमन झालं. कपाळावर आठ्या घालत, आमच्यावर जन्मोजन्मी फिटणार नाहीत असे उपकार करत असल्याच्या थाटात पण फार काही न बोलता त्यांनी सह्या केल्या. मी आणि त्या मुलाने 'एकमेका करू सहाय्य अवघे धरु सुपंथ' ह्या उक्तीनुसार काम केलं.

आम्ही कॉलेजबाहेर पडताना अंधारु लागलं होतं. त्या मुलाने हात पुढे केला "Hey, wish you all the best for your course". मीही त्याला शुभेच्छा दिल्या.

तो उजवीकडच्या रस्त्यावर वळला आणि मी सरळ जाणारा रस्ता पकडला.

आज बाकीचा प्रसंग लख्ख आठवत असला तरी प्रयत्न करूनही मला त्या मुलाचा चेहेरा किंवा त्याचं नाव आठवणार नाही. कधी नियतीने दोघांना पुन्हा समोर आणून उभं केलंच तरी आम्ही एकमेकांना ओळखणार नाही. काही क्षणांपुरती भेटणारी माणसं निव्वळ योगायोग असतात का त्यामागे काही लॉजिक असतं ह्याचा विचार करायचं मी कधीच सोडून दिलंय. तरी पण कधी फाईलमधली उरलेली transcripts पाहिली की मनात विचार येतोच - त्या मुलाला कुठे अ‍ॅडमिशन मिळाली असेल? आता कुठे असेल तो? हा प्रसंग त्यालाही कधीमधी आठवत असेल का?

-------

आम्ही सहलीला केरळला गेलो होतो तेव्हाची गोष्ट. बरीच वर्षं झाली त्यामुळे सगळा तपशील नीट आठवत नाहीये. म्हणजे त्या दिवशी संध्याकाळी आम्ही सगळे एकत्र बाहेर पडलो होतो एव्हढं आठवतंय. पण आईबाबा, भाऊ कुठे गेले होते आणि मी त्या बीचवर संध्याकाळच्या वेळेला एकटीच का उभी होते ते आता कधी आठवेलसं वाटत नाही. बीचवर बर्‍यापैकी गर्दी होती पण मी जरा दूरच उभी राहून घरचे लोक परत यायची वाट पहात होते.

अचानक तिथे गावातल्या २-३ बायका आल्या. त्यांच्या हातात भाजलेली कणसं होती. ती खात खात त्या माझ्याजवळून गेल्या आणि पुन्हा मागे आल्या. मग मला निरखून बघत त्यांनी माझ्याभोवती चक्क २ फेर्‍या मारल्या. एव्हाना मी हैराण झाले होते, नाही म्हटलं तरी थोडीशी धास्तावलेही होते. परकं शहर, त्यातून भाषा येत नाही. त्यांच्या वागण्याचा अर्थ कळत नव्हता. तसेही मी तोकडे कपडे कधीच घालत नाही. त्या दिवशी तर सलवार कमीझच घातलं होतं. कधी मेकअप करत नाही त्यामुळे भोवतालच्या गर्दीत फार उठून दिसायचाही प्रश्न नव्हता. अंगावर काही दागिने नव्हते. काय भानगड आहे? इथे पर्यटकांना रॅगिंग करतात का काय?

सुदैवाने दुरून मला आईबाबा, भाऊ येताना दिसले. त्यांना बघून की काय कोण जाणे पण त्या बायकाही निघून गेल्या. आई भरभर चालत जवळ आली आणि म्हणाली 'कोण होत्या त्या बायका?".

'काय माहीत' मी खांदे उडवले.
'काय म्हणत होत्या तुला?'
'काहीच नाही बोलल्या अग. आणि बोलल्या असत्या तरी मला मल्याळी कळतं का?'
'मग अश्या काय फिरत होत्या तुझ्या भोवती?' तमाम आयांमध्ये एक छुपा पोलीस असतो. भेसळ करणारे, माफिया, देशद्रोही असल्या समाजकंटकांना जरब बसवायला सरकारने आयांची नियुक्ती करायला हरकत नाही.

'आता मला काय माहीत? त्यांना बोलावू का परत? तू विचार ना' मीही वैतागले. एव्हढी 'बालकी खाल' काढायची काय गरज?

'जाऊ देत ग, अंधार पडायला लागलाय, परत जाऊ या' असं म्हणत बाबांनी आमची वरात हॉटेलमध्ये नेली.

त्या बायका कोण होत्या? माझ्याभोवती दोन वेळा फेरी मारायचं त्यांना काय कारण होतं? आज इतकी वर्षं झाली ह्या गोष्टीला तरी हे प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. आणि ह्यापुढेही रहातील.
-------

"हॅलो, हा, अरे कबसे आनंदको फोन लगानेकी कोशिश कर रहे है. लगही नही रहा है' शेजारच्या बाईने पुन्हा फोनवर बोलायला सुरुवात केली.

मी आणि आई जेवता जेवता थबकलो. रणथंबोरची ट्रीप संपवून ट्रेनने आम्ही मुंबईला परतत होतो. समोरच्या सीटवर एक मुलगा आणि एक मुलगी त्यांच्या लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसले होते. कडेच्या सीटवर ही बाई. ह्या सगळ्यांनी बहुतेक सवाई माधोपूर यायच्या आधीच जेवण उरकून घेतलं असावं. आमच्या डीनरला आता हिच्या फोनकॉल्सचं बॅकग्राउन्ड म्युझिक होतं. तिचा हा चौथा किंवा पाचवा फोन होता.

"हा, हा, कल सुबह बंबई पोहोचेंगे. वो आनंद आ रहा है स्टेशनपर हमे लेनेके लिये उसको बोगी नंबर बताना था. हा, हा, सीधा अस्पतालही जायेंगे. फिर परसो मेरा ऑपरेशन है." थोडं इकडचं-तिकडचं बोलून तिने फोन ठेवला. आणि पुन्हा खिडकीच्या बाहेर बघायला लागली. अर्ध्या-पाउण तासाने कधीतरी त्या आनंदचा फोन आला. मग त्याला बोगी नंबर आणि अजून अनेक सूचना करून झाल्या. हे सगळं एव्हढ्या मोठ्या आवाजात की बोगीतच काय, गार्ड आणि मोटरमन दोघांनाही ऐकायला गेलं असेल. मला त्या कधीही न पाहिलेल्या आनंदची दया यायला लागली. त्याला ह्या बयोला ३-४ दिवस तरी झेलायला लागणार होतं.

सकाळी मला आणि आईला लवकरच जाग आली. एरव्ही मुंबई सोडून मला कुठेही करमत नसलं तरी मनाने अजून मी रणथंबोरमध्येच होते. अजून २ दिवस रहायला पाहिजे होतं अशी चुटपुट लागून राहिली होती. तिथलं जंगल, सफारी, रिसॉर्टमधलं टुमदार कॉटेज, रात्रीची निरव शांतता - काहीकाही मनातून जायला तयार नव्हतं. ब्रेकफास्ट हवा का म्हणून विचारायला कॅटरिंगचा माणूस आला तेव्हा काहीतरी खायचं म्हणून आम्ही ऑर्डर दिली. शेजारच्या बाईनेही काहीतरी मागवलं. आणि ब्रेकफास्ट आल्यावर अक्षरश: दहा मिनीटांतच सगळ्याचा फन्ना उडवला.

'अग, ऑपरेशन आहे ना हिचं उद्या. काही काळजी आहे का बघ. आपण तिच्या जागी असतो तर काळजीने अर्ध्या झालो असतो. खाण्यावरची इच्छा गेली असती." मी दबक्या आवाजात आईला म्हटलं.
"रात्री कसली घोरत होती माहीत आहे? मला एक मिनिटपण झोप लागली नाही. माझा तर बाई डोळ्याला डोळा लागला नसता.' आई म्हणाली.

नाही म्हटलं तरी मी त्या बाईकडे थोड्याश्या आदरानेच पाहिलं. आपल्याला असं काळजी न करता जगणं कधी जमेलसं वाटत नाही. कधी कोणाला जमत असेल असं आत्ताआत्तापर्यंत वाटत नव्हतं.

काही वेळातच मुंबई सेंट्रल आलं आणि आम्ही सामान घेऊन उतरायच्या तयारीला लागलो. स्टेशनबाहेर जायच्या जिन्याकडे जाण्याआधी मी वळून पाहिलं तर त्या बाईला उतरवून घ्यायला एक तरुण मुलगा आला होता. मोठमोठ्याने त्याला काहीतरी सांगत हसत तिने बिनदिक्कत आपली जड बॅग त्याच्या हातात कोंबली. बिचारा आनंद!

आता कधी रणथंबोरचे फोटो पहायला लागले की ती बाई डोळ्यासमोर उभी राहते. आणि वाटतं तिचं ऑपरेशन नीट झालं असेल ना? इतकं बिनधास्त रहायला तिला मुळातूनच आलं असेल का 'जीवन विद्यामंदिर' नामक आयुष्याच्या शाळेने शिकवलं असेल?
-------

"हं, आणखी काय आहे लिस्टमध्ये?' मिथिलाने, माझ्या मैत्रिणीने विचारलं. कॉलेज फेस्टिव्हलमध्ये आज 'बेग, बॉरो, स्टील' म्हणजे ट्रेझर हंट होता. हो नाही करता करता आमचा सगळा ग्रुप भाग घ्यायला तयार झाला होता.

"अं, सुई-दोरा, आजचा पेपर....." मी सुरुवात केली.
'आई ग, आता सुई-दोरा, पेपर कुठनं आणायचं?' अमिता वैतागली. तिने थोड्याश्या नाराजीनेच भाग घेतला होता.
'तू माठ आहेस अगदी. कॉलेजबाहेर पडताना तुझ्या डोळ्यासमोर फक्त स्टेशनला जाणारा रस्ता असतो. उद्या देवसुध्दा फाटकाजवळ 'वत्सा, काय देऊ तुला' असं विचारात उभा राहिला तर त्याला पण इग्नोअर् मारशील तू'. सुजीतने परस्पर झापलं. आणि सगळा ग्रुप खिदळला.

'मग काय तुझ्यासारखं इथेतिथे हिरवाई बघत जायचं आणि दहा वेळा रस्त्यावर लोटांगण घालायचं?' अमिताने वचपा काढला आणि बिचाऱ्या सुजीतचा पचका झाला.
"ए, फालतूपणा पुरे झाला. ती फाटकातून बाहेर पडल्या पडल्या बिल्डींग आहे ना तिथे कोणीतरी जायचं आणि एखाद्या घराची बेल वाजवून सुई-दोरा आणि पेपर देता का म्हणून विचारायचं. बोला कोण जातंय?" मिथिलाचा 'माश्याचा डोळा' फेम अर्जुन झाला होता.
"काहीही काय, ओळख ना पाळख आणि असं कसं जाऊन वस्तू मागायच्या. आणि ते रुल्समध्ये बसतं का?" समीरने पहिला सुरुंग लावला.
'गेमचं नाव काय आहे? 'बेग, बॉरो, स्टील'. सो बेगीग अ‍ॅन्ड बॉरोइंग इज अलाउड'
'अग पण गेमच्या नावात 'स्टील' पण आहे म्हणून आपण काय चोरी पण करायची का?' अम्याचा सवाल बिनतोड होता पण अस्थानी होता. मिथिला भडकली. 'लागलास बालकी खाल काढायला? जाऊ देत. तुम्ही कोणी जाताय का मी जाऊ?'

बरंच सव्यापसव्य होऊन २-३ जण जायला तयार झालो त्यात मीही होते - अर्थात फक्त मॉरल सपोर्टसाठी हे आधीच सांगून ठेवलं होतं.

सगळे बिल्डिंगमध्ये घुसलो आणि जे घर प्रथम समोर दिसलं त्याची बेल वाजवली. एका काम करणार्‍या बाईने दरवाजा उघडला.

'हम लोग वो सामनेवाले कॉलेजमे पढते है' तिच्या चेहेर्‍यावरच्या प्रश्नचिन्हाला आम्ही उत्तर दिलं.
'क्या चाहिये?'
'वो हमारे कॉलेजमे आज एक कॉम्पीटीशन है. कुछ चीजे जमा करके लाने बोला है. जो ग्रुप लिस्टमेसे ज्यादासे ज्यादा चीजे लायेगा उसे इनाम मिलेगा.'
'तो?'
'जी, वो हमे आजका न्यूजपेपर और सुई-धागा चाहिये था. हम वापस लाके देंगे थोडी देरमे. सिर्फ उधारपे चाहिये था'
'साब और मेमसाब घरपे नही है. मै नही दे सकती'
'प्लीज, आधे घंटेका सवाल है. हम वापस लाके देंगे. वो लोग आनेसे पहले'
तिने विचार केला आणि मग एक मिनिट असं म्हणून दरवाजा लावून घेतला. दरवाजा पुन्हा उघडला तेव्हा तिच्या हातात पेपर आणि सुई-दोरा होता.
'वापस लाके देना हा'
'हा जी, पक्का देंगे' असं म्हणत आमची वरात परत कॉलेजात आली. यथावकाश ट्रेझर हंट संपला. आमच्या ग्रुपला काही बक्षीस मिळालं नाही. सगळा प्रोग्राम संपेतो बराच उशीर झाला. रात्री कॉलेजातून बाहेर पडलो तेव्हा सगळ्यांच्या डोक्यातून पेपर आणि सुई-दोरा साफ निघून गेले होते.

दुसर्‍या का तिसर्‍या दिवशी कोणाच्या तरी लक्षात ही बाब आली. पण आता बराच उशीर झाला होता. कुठल्या तोंडाने परत करायला जाणार? आणि त्या काम करणार्‍या बाईऐवजी तिच्या साब किंवा मेमसाबने दरवाजा उघडला तर सालटी निघायची शक्यताच अधिक. कोणीच तयार झालं नाही.

आज कॉलेजातून बाहेर पडून इतकी वर्ष झाली. परवा काही कारणाने तिथे जाणं झालं तेव्हा पाहिलं की त्या जुन्या बिल्डिंगच्या जागी एक नवीन इमारत उभी आहे. ध्यानीमनी नसताना मनाचा तळ ढवळला आणि तो ट्रेझर हंट पुन्हा आठवला.

आम्ही म्हणालो होतो तसं अर्ध्या तासात जाऊन त्या वस्तू परत करायला हव्या होत्या. तेव्हा नाही जमलं तर निदान दुसर्‍या दिवशी तरी जायला हवं होतं. ओरडा मिळाला असता तो ऐकुन घ्यायला हवा होता कारण आमच्याकडून चूक झाली होती. आमच्या चुकीची शिक्षा त्या काम करणार्‍या बाईला तर झाली नसेल ना? तिचा जॉब गेला नसेल ना? आमच्या मूर्खपणामुळे 'ह्यापुढे कानाला खडा. उगाच कोणालाही मदत करायची नाही' अशी तिची धारणा झाली नसेल ना?

-------

"स्वप्ना, स्वप्ना, है क्या रूममे?" रात्रीचे जवळजवळ १० वाजले होते. जेवणात मस्तपैकी डबलका मीठा चापल्यामुळे डोळ्यांवर झोप येत होती तरी मार्केटिंगच्या केस स्टडीशी माझी झटापट सुरु होती. अल्पनाचा, माझ्या रूममेटचा आवाज ऐकून माझा जीव भांड्यात पडला. कॅम्पसवर एक फेरी मारली तर झोप पळून जाईल असा विचार करतच होते पण एकटीला जायचा जाम कंटाळा आला होता. बरी सोबत मिळेल असा विचार करून मी दरवाजा उघडला.

"सोयी नही क्या अबतक?"
"अरे नही रे, वो केस स्टडी कर रही थी. कही जा रही है?'
'हा, तुझे पता है ना वो पासवाला मंदिर? टर्म ब्रेकमे गये थे ना? वहापे आज एक कथ्थक डान्सका प्रोग्रॅम है. वो देखने जा रही हू. वो समीर कुछ नोट्स लेनेके लिये आनेवाला था. उसे दे देना. मैने उसे फोन लगाया पर उठा नही रहा है. एसएमएस कर दिया है के नोट्स तेरे पास छोडे जा रही हू. "
"अभी रातमे है प्रोग्रॅम?"
तिने कुठल्याश्या सणानिमित्त आहे म्हणून सांगितलं. आता मला तो तपशील आठवत नाही.
"ठीक है. और कौन आ रहा है साथमे?" मी विचारलं.
"कोई नही. मै अकेली जा रही हू."
मी आ वासून तिच्याकडे पहात राहिले. "अल्पना, तू पागल हो गयी है क्या?"
"क्यू? क्या हुआ?"
"इतनी रात गये उस मंदिरमे तू अकेली जायेगी?"
"अरे बाबा, अकेली कहा? वहापे और लोगभी तो होंगे."
"वो सब हमारे कॅम्पसके है?"
ह्यावर ती काही बोलली नाही.
"मै भी चलती हू तेरे साथ."
"तुझे ज्युडो कराटे आता है?"
"नही, लेकिन एकसे भले दो. मै तुझे अकेली नही जाने दुंगी. कोई आर्ग्युमेंट नही चाहिये. मेरे पास तेरी मम्मीका नंबर है."
"चल मेरी मा, तू मानेगी तो नही"

"तुम दोनोका दिमाग खराब हो गया है क्या?" आमची तिसरी रूममेट केव्हा आत आली ते आम्हाला कळलंच नाही.
"सुष, तू कब आई?"
"तुम दोनो जब मंदिर जानेका प्लान बना रहे थे तब. पता है वहासे कॅम्पस आनेवाला रास्ता कितना सुनसान होगा?कमसे कम ५-६ लोग चाहिये साथमे. २-३ लडके तो होने चाहिये.'
ह्यावर आम्ही काही बोलायला तोंड उघडणार एव्हढ्यात तिने हात उंचावून 'तुम्हारा हमेशावाला आर्ग्युमेंट नही चलेगा. मुझे पता है. अभी वो सुधांशूके रूममे लाईट है. किरण, मोहित वगैरे बैठे है वहापे. चाहिये तो उनको साथ लेके चलते है."
'अरे क्या सबको साथ लेके चलते है? फ्रीमे खाना बट रहा है वहापे? उनको इंटरेस्ट नही होगा तो काहेको घसीटकर लेकर जाना?" अल्पना वैतागली.
"फिर नही जाते है. याद रखना तुम दोनोकी मम्मीके नंबर है मेरे पास". आमच्या आयांनी टर्मब्रेक मध्ये येऊन हे एक नसतं लचांड मागे लावलं होतं.
"चल छोड यार सुष, हम लोग नही जाते है. कभी सुबहमे प्रोग्रॅम होगा तो जायेंगे" असं म्हणत आम्ही दोघी आपापल्या रुमकडे वळलो. आमची "बंगालन" रूममेट नंतर कितीतरी वेळ बाहेरच्या कॉमन रुममध्ये अभ्यास करत बसली होती. का पहारा करत होती कोणास ठाऊक.

आता इतक्या वर्षांनी कधी टीव्हीवर चॅनेल बदलताना कोणी नर्तकी नाचताना दिसली की हा प्रसंग आठवतो. नंतर परत त्या देवळात कुठल्याही कार्यक्रमासाठी काय पण कधीच जायची संधी मिळाली नाही. पण उगाच वाटतं की त्या सणाच्या दिवशी देवाच्या पायी आपली कला रुजू करणारी नर्तकी कोण असेल? तिचं नृत्य कसं झालं असेल?आपल्याला पहायला मिळालं असतं तर कसं वाटलं असतं? तो कार्यक्रम पहायचं आपल्या नशिबात लिहिलेलंच नव्हतं का? असं एखाद्या सणाच्या दिवशी रात्री एखाद्या देवळात नृत्य पाहायची संधी आयुष्यात पुन्हा येईल का? माझ्या रुमवर त्या दिवशी आली नसती तर निदान अल्पनाला तरी ती मिळाली असती का?
-------

"हॅलो आई, मी आत्ता निघाले इथून. बस मिळून यायला किती वेळ लागेल काय माहीत. तू हवं तर जेवून घे."
"नको, मी थांबते तुझ्यासाठी. काय म्हणाले?"
"काय म्हणणार? मॉडेम ठेवून घेतलंय. ३-४ दिवसात कळवतो म्हणाले"
"म्हणजे परत ३-४ दिवसांनी अंधेरीला जावं लागणार?"
"काय करणार?"
"ठीक आहे. तू ये सावकाश. मी जेवायला थांबते" असं म्हणून आईने फोन ठेवला. आणि मी कुठल्या मुहूर्तावर हे वायरलेस इंटरनेट घ्यायच्या फंदात पडले म्हणून स्वत:ला शिव्या देत बसची वाट पहायला लागले. जवळच्या सगळ्या सर्व्हिस सेंटरमध्ये नन्नाचा पाढा ऐकल्यामुळे तडफडत अंधेरीला जायला लागलं होतं. परत ३-४ दिवसांनी यायला लागणार होतं आणि एव्हढं करून ते दुरुस्त होईल ह्याची काहीच शाश्वती नव्हती.

'एक्सक्युज मी, सविता मॅडम?' माझ्या कानांवर आवाज आला. मी मोबाईलवर एसएमएस करत होते.
"एक्सक्युज मी, आप सविता मॅडम है ना?" कोणीतरी माझ्या समोर येऊनच विचारत होतं. मी मान वर करून पाहिलं तर एक माणूस माझ्याकडेच उत्तराच्या अपेक्षेने पहात होता.
"आप मुझसे बात कर रहे है?"
"जी हा, आप सविता मॅडमही है ना?" आता तोही थोडा गोंधळला होता.
"नही." मी दोन पावलं मागे सरकत त्याच्याकडे संशयाने पहात म्हटलं. एव्हाना बसस्टॉपवरची काही माणसं आमच्याकडे पहायला लागली होती.
"सॉरी मॅडम, आप हमारी सविता मॅडम जैसेही दिखती है. मुझे लगा वोही है. सॉरी" असं ओशाळून म्हणत तो घाईघाईने आपल्या वाटेला लागला.

तब्बल १५ मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर बस आली. मी तो माणूस आजूबाजूला तर नाही ना ह्याची खात्री करून घेतली आणि मगच बसमध्ये चढले. तशीही त्या बसमध्ये चढणारी मी एकमेव व्यक्ती होते म्हणा. पण सीटवर बसल्यावरही माझ्या मनात हाच विचार होता की दुरून एखाद्या व्यक्तीत परिचिताचा भास होऊ शकतो. पण जवळून पाहिल्यावर ही व्यक्ती कोणी दुसरीच आहे हे त्या माणसाला कळायला हवं होतं नाही का? का ते न जाणवण्याइतपत माझ्यात आणि त्याच्या त्या सविता मॅडममध्ये साम्य आहे? एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या व्यक्ती सारख्या दिसू शकतात? जगाच्या पाठीवर आपल्यासारखीच दिसणारी किमान एक तरी व्यक्ती असते असं म्हणतात त्यात तथ्य आहे? कोण असेल ही सविता मॅडम? कधी काळी हा तिला परत भेटला तर तिला ह्या प्रसंगाबद्दल सांगेल का? आणि मग तिलापण असंच आश्चर्य वाटेल?
-------

तुकड्यातुकड्यांनी बनलेलं आयुष्य. म्हटलं तर अर्थ आहे, म्हटलं तर काहीही नाही. कधीतरी आपलं स्वत:चं 'लाईफ' आहे, पण बर्‍याचदा नियतीचाच 'सारा खेळ' आहे. 'हे असंच का?" ह्याला उत्तर नाही. आणि 'हे तसं असू शकलं असतं का?" ह्यालाही नाही. खरं तर प्रश्न पडायलाच वेळ नाही तर उत्तरं शोधायला तरी कुठून असणार?

पण कधी कधी जादू होऊन ध्यानीमनी नसतानाही आपल्या स्वत:च्याच, पण स्वत:च्या नसलेल्या, अश्या आयुष्यातले काही क्षण फक्त आपले स्वत:चे होऊन आपल्या हाती लागतात. आणि उन्हाने तापलेल्या रखरखीत पायवाटेवर घमघमणारा शुभ्र मोगरा सांडावा तसं होतं. मग मनाच्या कोपर्‍यात साचलेले प्रश्न दबकत पुढे येतात आणि म्हणतात 'बघ, सापडतंय का उत्तर?". प्रश्नही कसले? अध्यात्माचे, जीवनाच्या तत्त्वज्ञानाचे गहन प्रश्न नव्हेत. कलैडोस्कोपमध्ये काहीही नक्षी बनण्याआधी जे साधे फुटक्या काचांचे तुकडे असतात ना तसल्या साध्या प्रश्नांचे तुकडे. इतके साधे की ते पडावेतच का हाही एक प्रश्न व्हावा.

कधीकाळी केलेल्या ट्रेनच्या प्रवासात खिडकीतून दिसलेली एक वाट आणि तिच्यावरून जाणारा एक ट्रक दिसू लागतात. कुठे बरं जात असेल ती वाट? माहित नाही.

अश्याच प्रवासात कधी दिसलेलं एक् छोटसं देऊळ, भगव्या झेन्डयाचं. हात जोडेपर्यंत गाडी पुढे निघून आलेली असते. कुठल्या देवाची मूर्ती होती त्यात? माहित नाही.

हॉटेलच्या बाल्कनीत मिटलेलं पुस्तक मांडीवर ठेवून गावाला वळसा घालून जाणारा हायवे पहात बसलं असताना अचानक हायवे सोडून एक गाडी गावात वळते. दूर दूर जात रात्रीच्या अंधारात तिचे दिवे नाहीसे होतात. कधी आपल्याच घरातल्या बिछान्यावर ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळत झोप यायची वाट बघताना दुरून ट्रेनची शिट्टी ऐकायला येते. नुकताच पाउस पडून गेला असेल तर रुळांची खडखड पण ऐकू येते. रात्रीचे १-२ वाजले असताना लोकाना परदेशी घेऊन जाणारं एखादं विमान नारळाच्या दोन झाडांमधून दिसणार्‍या चंद्रावरच चाललोय अश्या थाटात निघून जातं. कोण असतील हे रात्रीचे प्रवासी? माहित नाही.

लागोपाठच्या तीन संध्याकाळी रस्त्यात खेळत असलेल्या मुलांचा खेळ पहात दहा मिनिटं थांबणारा तो धोतर नेसलेला माणूस. आणि माझ्या घराच्या बाल्कनीमधून त्याला पाहणारी मी. हे दृश्य पहाणारंही आणखी कोणी असेल? माहित नाही. त्या दहा मिनिटांत त्याच्या मनात काय्काय येऊन गेलं असेल? माहित नाही.

उटकमंडच्या टॉयट्रेनने जाताना वाटेत दिसलेली छोटी गावं, सिग्नलला थांबलेल्या स्कूटर्स, गाडीकडे पाहून हात हलवणारी छोटी पोरं, घराच्या बाहेर धुणं आपटून धुणारी बाई. तेवढ्या काही क्षणांपुरती आमची समांतर आयुष्यं एकमेकांना छेदून जावीत असं कुठे लिहिलं असेल? कोणी? कधी?

माहित नाही. माहित नाही. माहित नाही.

कुछ सवालोंके जवाब धुंडे नही जाते
लाझमी नही हर सफरके लिये मंझीलका होना

----

वि.सू. - ह्याआधीच्या पन्न्यांची लिंक माझ्या विपूत आहे.

गुलमोहर: 

स्वप्>>ना..... वेलकम बॅक्.......कालच तुझी आठवण आली होती.. आणी मनात म्हटलं तू किती दिवसात काही लिहिलं नाहेस्..का? का?
आणी आजच आलीस इकडे.. तुझं सुंदर ,नितळ स्वच्छं लिखाण मला मनापासून आवडतं वाचायला..
सुर्रेख लिहितेस्..अगदी समोर बसून बोलल्यासारखं Happy
(तुला माझी अदृष्य विपु दिसली ,म्हणून आलीस ना आज इकडे?? )

मस्त मस्त मस्त! खूप ठिकाणी मला माझेच विचार वाचतोय असं वाटलं, पण मला इतक्या छान भाषेत लिहिता नसते आले Happy
<<तमाम आयांमध्ये एक छुपा पोलीस असतो. भेसळ करणारे, माफिया, देशद्रोही असल्या समाजकंटकांना जरब बसवायला सरकारने आयांची नियुक्ती करायला हरकत नाही.>> Proud

वॉव, सो नाईस टु सी यू अगेन ........

पण कधी कधी जादू होऊन ध्यानीमनी नसतानाही आपल्या स्वत:च्याच, पण स्वत:च्या नसलेल्या, अश्या आयुष्यातले काही क्षण फक्त आपले स्वत:चे होऊन आपल्या हाती लागतात. आणि उन्हाने तापलेल्या रखरखीत पायवाटेवर घमघमणारा शुभ्र मोगरा सांडावा तसं होतं.>>> क्या बात है...

पूर्ण लेखभर खास स्वप्ना टच जाणवत रहातोय......, पुन्हा एकदा सुंदर ,नितळ स्वच्छं लिखाणाचा (वर्षू नील +१००) आनंद दिलास त्याकरता धन्यवाद.....

असंच कुतूहल आपल्यासोबत क्षणभर का होईना चालून नंतर ज्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या त्यांच्याबद्दल रहातं. झाडांच्या पानांतून उन्हाचे कवडसे जमिनीवर पडावेत तसे आपलं आयुष्य जगताना दुसर्‍यांच्या आयुष्यातले तुकडे दिसत रहातात. रस्त्याने चालता चालता एखाद्या घरासमोरच्या बनत असलेल्या रांगोळीचे फक्त ठिपके दिसावेत आणि पूर्ण झालेली रांगोळी कशी दिसली असेल त्याचं कुतूहल रहावं तसं सगळं चित्र दिसत नाहीच कधी पण तरी प्रश्न पडायचे ते पडतातच.
>> मस्त!

स्वप्ना....मस्तच..
खूप दिवसांनी आला पुढचा पन्ना आणि नेहमीइतकाच फ्रेश आणि रसरशीत...
तु सलील कुलकर्णीचे हरवलेल्या काचा (नावात थोडा गोंधळ आहे) वाचले आहेस का...
ते वाचताना मला पन्नांची आठवण झाली...शैली बरीच वेगळी आहे पण असे वाटले की एकदिवस पन्ने पुस्तकरुपाने यावेत...

मस्त Happy

छान

ह्या वेळी पन्ना बराच मोठा झाला. तरी वेळात वेळ काढून तो वाचल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार Happy

वर्षा, दिसलीही असेल कदाचित तुझी अदृष्य विपू. Happy आशुचँप, नाही वाचलं ते पुस्तक.लायब्ररीत कधी दिसलं तर नक्की वाचेन आता.

मस्त !!!