वेल डिलिवर्ड, मॅडम! - अर्थात पोस्टातली मुलगी.

Submitted by अमा on 8 March, 2012 - 07:45

पूर्वी मी इकॉनॉमिक टाइम्स मध्ये लिहीत असे. टाउन टॉक ह्या त्यांच्या रविवार-पुरवणीतील एका पानावर हैद्राबाद शहरातील घडामोडी, येणारे सण, मुलाखती, थोडे लाइफ्स्टाईल पीसेस असे येत असे.
त्यापैकी रविवार, २३ सप्टेंबर, २००१ सालच्या अंकात हैद्राबादेत काम करणार्‍या पोस्ट विमेन बद्दल एक छोटा लेख लिहिला होता. महिला दिना निमित्त आज तो इथे भाषांतर करून लिहीत आहे. सर्व आकडे त्यावेळचेच आहेत त्यामुळे तुम्हाला माहिती रंजक वाटेल हीच अपेक्षा.

------------------------------------

पोस्ट्विमेन, लेडी पोस्टमेन, पोस्टपर्सन्स? धोधो पड्णारा पाऊस असो कि कडक हैद्राबादी ऊन, तुमची पत्रे घरपोच, अचूक व वेळेवर पोहोचविणार्‍या ह्या धीट, ही जराशी वेगळी आणि खूपशी अवघड वाट चोखाळणार्‍या भारतीय पोस्टातील महिला कर्मचार्‍यांना नक्की काय बरे उपाधि द्यावी?

जगातील सर्वात जास्त पोस्ट ऑफिसे भारतात आहेत. देशाच्या खेड्यापाड्यात, काना कोपर्‍यात पोस्टाची सेवा भारतीय जनतेस उपलब्ध असते. भारतीय पोस्ट सेवेची कार्यक्षमताही इतर देशांच्या पोस्टल सेवेशी तुलना करता येण्याजोगी, चांगल्या प्रतीची आहे. प्रत्येक पत्र घरपोच पोहोचविणे
हे भारतासारख्या विस्तृत देशात किती अवघड आहे याची आपल्याला कल्पना आहेच.

खेडोपाडी लोकांना साध्या, मूलभूत पोस्टल सेवांची गरज जास्त भासते, जसे मनिऑर्डर, पत्रे, तारा !
यामुळे त्यांना शहरी किंवा तालुक्याच्या गावातील लोकांच्या बरोबरीचे जीवन मान अंगिकारण्यात मदत होते. तर मोठ्या शहरातील पोस्टल सेवेच्या ग्राहकांच्या गरजा वेगळ्या असतात. त्यांना अतिशय वेगवान , कार्यक्षम आणि रिस्पॉन्सिव सुविधा हवी असते. उद्योगधंदे तसेच व्यावसायिक व सामाजिक
क्षेत्रांत काम करणार्‍या ग्राहकांच्या गरजा तातडिने पुरविणे पोस्टखात्याला बंधन कारक असते कारण नाहीतर हे ग्राहक प्रायवेट कुरीअर किंवा इतर मार्गांचा अवलंब करायला मागेपुढे पाहात नाहीत.
वेळेत काम करणे याला शहरात फार महत्त्व आहे.

महिला एकाच वेळी अनेक कामे करण्यात कुशल असतात. दुसर्‍यांच्या हाकेला धावून जाणे हा तर त्यांचा स्वभावधर्मच. मग पत्रे वेळेवर पोहोचविण्याचे काम त्या उत्तम प्रकारे करतील ह्यात काय नवल? हैद्राबादेतील पोस्टखात्याने ह्या बाबतीत पुढाकार घेतला आहे. महिलांना निवडून, त्यांना प्रशिक्षित करून व नोकर्‍या देऊन शहराच्या काही भागांत पत्रे वाटायचे काम त्यांना दिले गेले आहे.

" ह्या नोकरीत आजिबात आरक्षण नाही. आमच्या खात्यात महिलांनी काम स्वीकारले तर त्यांना पुरुषांप्रमाणेच वाढीच्या संधी दिल्या जातात. रिकाम्या जागांची जाहिरात एम्लॉयमेंट एक्स्चेंजतर्फे केली जाते. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीच्या निकालावर आधारित असते. " अशी माहिती श्री रामेश्वर राव, ( तेव्हाचे ) असि. डायरेक्टर, रिक्रुट्मेंट, एपी सर्कल यांनी दिली.

श्री. हनुमंत सिंग, ( तेव्हाचे) सि. सुप. पोस्ट ऑफिसेस सिकंद्राबाद डिविजन यांनीही वरील माहितीस दुजोरा दिला. " आमच्या कडे ३४० पोस्ट डिलीवरी पर्सन्स आहेत त्यापैकी फक्त ४ महिला आहेत. त्या मुशीराबाद, लालागुडा, व बीएचईएल विभागात काम करतात. त्या व्यतिरिक्त आमच्याकडे
१५० महिला कारकून आहेत ह्या काउंटर्स तसेच बॅक रूम ऑपरेशन्स संभाळतात. " असे त्यांनी सांगितले.

महिला पोस्ट डिलिवरी पर्सन्स ना कामात कोणतीही सूट त्या केवळ महिला आहेत म्हणून दिली जात नाही. सकाळी साडे आठला त्या कामावर येतात. पत्रांचे सॉर्टिंग व अ‍ॅरेंजिंग करतात व अकरा वाजता पत्रे वाटायला बाहेर पडतात. दुपारी साडेतीन पर्यंत त्या परत येतात व मग पत्रवाटपाची दुसरी फेरी करतात. रविवार व केंद्रसरकारच्या सुट्ट्यांव्यतिरिक्त हे काम अव्याहत चालूच असते. काही महिला १५०० रु. दर महिना सायकलभत्ता घेतात तर काही हे काम पायीच करतात.

मुशीराबादस्थित बी पुष्पादेवी ही नोकरी गेली अकरा वर्षे करत आहेत. पतिनिधनाच्या काही महिने आधी त्यांनी ही नोकरी सुरू केली होती. " मी आठ स्क्वेअर किलोमीटर चा भाग कव्हर करते.
गोवळकोंडा क्रॉस रोडस, संध्या थिएटरव आरटीसी क्रॉसरोडस ह्या भागातील कार्यालयात पत्रे द्यायचे माझे काम आहे. माझ्या कामाचे स्वरूप बघून आमच्या शेजार्‍यांनी पहिले आश्चर्य व्यक्त केले होते, पण त्यांना आता त्याची सवय झाली आहे. जितका आधार ह्या नोकरीने मला दिला आहे तितकाच आधार माझ्या घरच्यांनी मला ही नोकरी करताना दिला आहे. ह्या नोकरीच्या बळावरच मी माझ्या मुलीला शिकविते आहे व तिला डॉक्टर करायची माझी मनिषा आहे. " त्या म्हणाल्या.

पोस्ट ऑफिसातील नेहमीची गर्दी, आवाज आजू बाजूला चालूच होते. कार्डे पाकिटे घेणार्‍यांची लगबग, एकीकडे पत्रांचे पार्सलांचे वर्गिकरण, ठप- ठप स्टँप मारणारे कामसू हात, एक ऑर्डरली केऑस!!
ज्याची आपल्याला सवय होउन गेली आहे .... ह्या पार्श्वभूमीवर पुष्पादेवींच्या चेहर्‍यावरील शांत भाव व स्वच्छ विचार ऐकून मला खूप प्रसन्न वाटले. एक सरप्राइज!!

श्री. सिंग पण त्यांच्याशी सहमत आहेत. " पोस्ट विमेन खूप सुरळित व नीट काम करतात. त्या जास्त सिन्सिअर व जबाबदारीने वागतात. अर्थात पोस्ट्मेनही त्यांचे काम नीटच करतात त्यांच्या कामाबद्दल काही म्हणण्याचा माझा उद्धेश नाही. आमच्या कामात वेळ संभाळणे सर्वात महत्त्वाचे आहे.
मग तुम्ही स्त्री असा कि पुरुष!" केंद्रसरकारच्या श्रेणीप्रमाणे पोस्टविमेनना पगार मिळतो. ३०५० रु.बेसिक पासून सुरू होऊन डीए, एच आर ए आणि इतर भत्ते मिळतात. पोस्ट विमेनना १६ वर्षे काम केल्यानंतर एक बढती मिळते व २६ वर्षांनी अजून एक. एक लेखी परीक्षा देऊन त्या क्लेरिकल स्टाफ मध्ये काम निवडू शकतात. ( हे २००१ सालचे आकडे आहेत. )

रस्त्यावरची गर्दी, वाहतुकीचे प्रश्न, चालणे व रोजचे तेचते काम ह्यामुळे पुष्पादेवींना कधीकधी
क्लेरिकल काम घ्यावे असा मोह होतो. " कधीकधी एखाद्या इमारतीचे पाच मजले चढून जावे तर जिथे पत्र द्यायचे ते ऑफिस बंद तरी असते किंवा त्याची जागा व पत्ता बदललेला असतो. गेली चार
वर्षे आम्हाला सायकल अ‍ॅडव्हान्स मिळालेला नाही. " त्या एक सुस्कारा सोडून म्हणाल्या. अर्थात म्हणून काम करण्याचा त्यांचा निर्धार बदललेला आजिबात नाही. " माझे कलीग्ज, तसेच जनता खूपच सहकार्य करतात. प्रत्येक नोकरीचे काही प्लस मायनस पॉइंट असायचेच नाही का? " त्यांनी एक मंद स्मित केले.

आंध्र महिला सभा व आय आय सीटी ह्या भागातील दोन पोस्ट ऑफिसेस सर्वतः महिला कर्मचार्‍यांनी चालविलेली आहेत. पुढील वाक्य इंग्रजीतच लिहायचा मोह मला आवरलेला नाही.
Incidently, two post offices, At Andhra Mahila Sabha and IICT are totally run by women.
A welcome trend signifying one more male bastian under seige from resourseful and resolute women. Post women to be precise.

गुलमोहर: 

छान... पोस्ट ऑफिसात एकंदरच स्त्रीयांचे प्रमाण वाढत आहे... फ्रंटच्या खिडक्यांवरही मुलींचे प्रमाण वाढत आहे. एक चांगला बदल आहे.

दिनेशदा, हा लेख वाचून तुम्हाला नक्की पोस्टातली मुलगी नावाचा जुना मराठी सिनेमा आठवला असता असेच वाटले. म्हणून शीर्षकातच घातले. Happy हा काळही सर्वत्र मोबाइलचे, आंतर्जालाचे जाळे पसरण्याच्या आधीचा आहे. डाकिया डाक लाया अशीच परिस्थिती होती तेव्हा. आम्ही अजूनही दूरच्या गावी खात्रिशीर डॉक्स पोहोचविण्यासाठी स्पीडपोस्ट व रजि. पोस्ट सुविधा वापरतो. आठवी पास मुलांना पोस्टात नोकरी मिळते व ते सरकारसाठी डाटा कलेक्षनचे काम करतात असे पेपर मध्ये वाचले तेव्हा पासून मी मुलीला तू आता पोस्टातली मुलगी बनून आर्थिक दृष्टया स्वावलंबी बनू शकतेस असे सांगत असते.

छान लेख! आजच टिव्हीवर अग्निशामक दलातील कर्मचारी महिलांच्या मुलाखती बघितल्या.अशा सर्व महिलांना व त्यांच्या कुटुंबियांना सलाम!

छान व औचित्यपूर्ण.
वॉल्ट डिझनी पण बालपणी पोस्टात 'सॉर्टींग"व "डिलीव्हरी" हीं कामं करायचा; याचा अभिमान वाटून तिथल्या पोस्ट खात्याने नंतर त्याचे व त्याच्या जगप्रसिद्ध कार्टून्सचे खास 'स्टँप'ही काढले. महिला दिनाच्या निमित्ताने पोस्ट खात्याने असं कांही करणं अर्थपूर्ण होईल .

अश्विनी
छान लेख. ई.टा. मधल्या इतर लेखांचेही टाक ना इकडे भाषांतर.
मलाही पोष्टातली मुलगी हा सिनेमा आठवतो.
लेकीला काय सांगितलंस त्याचं बरीक हसू आलं हाँ!
काय करणार अश्या वयातल्या लेकींना असं काहीबाही कधीमधी सांगावं लागतं. मीही सांगायची!

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. प्रतिसाद हा जालीय प्रतिभेचा प्राणवायू आहे.

महिन्द्रा च्या जबरी गाड्यांचे इंटेरिअर्स डिझाइनही एक स्त्री करते असे आजच वाचले. मला त्या गाडया नेहमी टेस्टोस्टेरॉन ट्रिप वाट्त आल्या आहेत. ( हा माझा पूर्वग्रह!)
त्या डिझायनर बाईंचे फार कौतूक वाटले. काम करनेवालो को कोई रोक नहीं सकता. है ना Happy

छान लेख.
महिन्द्रा च्या जबरी गाड्यांचे इंटेरिअर्स डिझाइनही एक स्त्री करते असे आजच वाचले. मला त्या गाडया नेहमी टेस्टोस्टेरॉन ट्रिप वाट्त आल्या आहेत.>> Happy