फटका..

Submitted by -शाम on 5 March, 2012 - 23:46

महासत्तेचं सपानं पडलं अवई मोठी उठली
आता तुम्हीच सांगा पाव्हणं इथं प्रगती आहे कुठली..||

दहाच आले करून गेले अब्रुच्या चिंध्या
दारी कुणाच्या चालून आल्या सत्तेच्या संध्या
वजीर राजे बदली झाले... हौस कुणाची फिटली....||

दौर्‍यावरती दौरे आता होतील हो पुन्हा
हात जोडूनी मते मागण्या येतील ते पुन्हा
निवडून येतील तेच पुढारी... नोट जयांची वटली...||

तांदूळ खातो पोरांचा तो गुरुजी आवडीने
सचिव येतो ग्रामसभेचा त्याच्या सवडीने
सरपंचाने किती घरांची... सिमेंट्-वाळू लुटली...||

कर्ज फेडुनी शेतकरी तो कंटाळून गेला
फास घेऊनी मृत्यू त्याने आपुलासा केला
लाख भेटले उरलेल्यांना...सुखात त्यांची खटली..||

पाहून 'गझनी' किती जनांनी डोकी भादरली
कोण वाचतो ग्रंथ-पुराणे पिढी जुनी सरली
युगायुगाने तुझी माणसा... अक्कल खरेच घटली..||

बिनबाह्यांची फॅशन करूनी फिरत्याती पोरी
गळे घालूनी गळ्यात आता फिरती म्हातारी
कुणी घालते स्कर्ट आपरा... जिन्स कुणाची तुटली..||

पहा दुरूनी ऐकू येई 'मंदी'ची हाक
खर्च आवरा जपून ठेवा रुपया हमखास
उपास घडता म्हणाल तेंव्हा 'शाम' गोष्ट रे पटली...||

.....................................................................शाम

गुलमोहर: 

बिनबाह्यांची फॅशन करूनी फिरत्याती पोरी
गळे घालूनी गळ्यात आता फिरती म्हातारी
कुणी घालते स्कर्ट आपरा... जिन्स कुणाची तुटली..|| ............... Biggrin

चांगली फटकेबाजी.

खासच !