आम्ही ट्रेकिंग करतो (म्हणे ) !

Submitted by कवठीचाफा on 3 September, 2008 - 03:59

" मी या दगडांवरुन आजीबात येणार नाही आधीच सांगुन ठेवतो" आपल्या चिरकलेल्या आवाजात संज्याने डरकाळी फ़ोडली.
" तु पक्का डरपोक रे लेकाचा, इथे काय हिमालय चढतोय का आपण?" रव्याने त्याच्या काळी पाच मधल्या आवाजात संज्याला सुनावले.
" नालायका, हलकटा झालच तर मेंदुलेस माणसा या निसरड्या दगडावरुन डोंगर चढण्याला तु ट्रेकींग म्हणतोस?" संज्या बिथरला.
" मग काय मुंबई पुणे रेल्वेट्रॅकवरुन चालण्याला ट्रेकिंग म्हणतात?"
"ए, बास करा यार! आपण इथे ट्रेकींगला आलोय की भांडायला? तु गप रे संज्या. आणि रव्या तुझे ते ट्रेकींग नक्की कधी चालु होणार रे?" शल्याच्या या वाक्यावर रव्याने कपाळावर हात का मारुन घेतला आणि आम्ही का खुसखुसायला लागलो याचे उत्तर आम्ही परत येईपर्यंत शल्या शोधत राहीला.
खरंतर आमचा गृप या ट्रेकींग वगैरेच्या भानगडीत कधीच पडत नव्हता पण रव्या काहीकाळ का होईना आमच्या गृपचा मेंबर बनला आणि त्याच्याच अग्रहाखातर आजचा हा कार्यक्रम आखला होता. एकतर दिवस असे श्रावणातले मधेच येणार्‍या सरी मधेच पडणारे उन मस्त माहौल होता. कुठेतरी पिकनिक काढावी असे जवळपास सगळ्यांच्याच मनात होते. त्यात रव्याने शिवतरघळला जाउया का ? असे विचारल्यावर सगळ्यांच्याच मनातली इच्छा पुर्ण होणार असे दिसायला लागले होते. त्यात आमच्या माननीय सदस्या निली आणि तेजु गणपतीसाठी म्हणुन फ़ारच लवकर गावी गेल्याने दोन मेंबर कमीच होते. याबद्दल
" यांच्यात गणपती नागपंचमीच्या दुसर्‍या दिवशी आणतात आणि दसर्‍यानंतर विसर्जन करतात" असे संज्याचे प्रांजळ मत होते.
ते असो, पण आता इतक्या उत्साहाने शिवतरघळ पर्यंत आल्यावर रव्याने बाजुला पडणार्‍या धबधब्याच्या वर एक पाण्याचे प्रचंड मोठे टाके असुन तिथपर्यंत ट्रेक करावा असली काहीतरी अघोरी कल्पना सुचवली. तसाही डोंगरदर्‍यांतुन भटकण्याचा आमचा अनुभव नसल्यात जमा होता. म्हणजे मुंबईत जाताना सुकेळी खिंडीतुन जाणे तेही गाडीतुन इथपतच. त्यामुळे आम्ही रव्याच्या सुचनेला होकार भरला.
घळीच्या वरच्या डोंगराळ भागात भटकंती करणे आता सोपे झालेय, पण आधी नव्हते. तेंव्हा आपला मार्ग आपणच शोधायचा आणि पुढे सरकायचे असला प्रकार होता. आता ते रव्याकथीत प्रचंड टाके शोधायचे तर धबधब्याच्या वरुनच काठाकाठाने मार्ग काढत जायला लागणार हे नक्की झाले. पण खरी गोची इथेच होती ना ! पाण्यामुळे शेवाळ आलेले दगड पाय टिकु देईनात. आपला रव्या सांगेल तसं पुढे सरकायच असं धोरण आम्ही ठेवलं. इथेच संज्याची कुरबुर चालु झाली होती पण आता जरा मोकळी जागा मिळाल्यावर त्याच्या रागाला तोंड फ़ुटले. त्याची कशीबशी समजुत काढुन आम्ही पुढे कुच करायला सुरुवात केली.
रव्या या असल्या खडकाळ भागाला सरावलेला असल्यामुळे रबरी चेंडूसारखा टणाटण उड्या मारत पुढे सरकत होता. आणि त्याची नक्कल करण्याच्या नादात आमचा पाय नेमका दगडावरच्या गुळगुळीत शेवाळ्यावर पडून आम्ही धडपडत होतो. सरते शेवटी अस्सल मराठी माणसाप्रमाणे आम्हाला पुढे धावता येत नाही हे बघुन रव्याला पुढे जाण्यापासुन रोखले. या सगळ्या धडपडीत एक नवाच शोध लागला पिंट्या कुठे दिसेनासा झाला होता. मग शोधकार्याला सुरुवात.
" आयला, पडला की काय धबधब्याच्या ओढ्यात?" संज्याला नेहमी कुशंकाच येतात.
" गप बे ! पाण्यापासुन चार हात लांब पळतो तो तुला माहीताय ना?" शल्या बोलायचं म्हणुन बोलला.
दहा-पंधरा मिनीटांनी पिंट्याची स्वारी एका आकाशी रंगाच्या तुर्‍याबरोबर मारामारी करताना दिसली. सगळेच वैतागुन तिथे गेलो.
" टोणग्या हा तुरा काढुन काय मोरपीसासारखा डोक्याला लावणार आहेस का रे ? कृष्ण कन्हैया सारखा?" संज्याचा राग अजुन शांत झाला नव्हताच.
" नाही रे ! हे लिलीचं फ़ुल आहे मला हे रोपटं घरी न्यायचय बागेत लावायला" प्रामाणीक स्वरात पिंट्या उत्तरला.
" अरे फ़ूSSSल, मग ते असं उपटून नाही निघायचं त्याच्या मुळ्या खोल असतात त्याचा पुर्ण कांदा काढून न्यायला लागेल, असा ओढशील तर तुटेल ते फ़ुल." रव्याचे नॉलेज वादातीत होतं. तेवढ्यात पिंट्या एका कोपर्‍यात सरकला. महासंशयी संज्याच्या नजरेतुन ते सुटंल नाहीच त्याला बाजुला करुन त्याने कोपर्‍यात नजर टाकली आणि ओरडला
"तरीऽऽच"
अर्थात आमच्या कुतुहलाला आतल्या आत गप्पबसता येईना, आम्हीही सगळे तिकडे डोकावलो तिथे चार-पाच तुटकी फ़ुले पडलेली होती लिलीची.
मग कसा बसा तो लिलीच्या फ़ुलाचा कांदा काढून पिंट्याच्या हातात कोंबल्यावर पुन्हा पुढे वाटचाल कसली वाटघसरच ती, सुरु झाली.
दगडामागुन दगड गेले, डोहा मागुन डोह गेले छान थंडगार पाण्याने भरलेले त्यांच्यात आगदी दिमाखात उड्या घेणारे लहान मोठे धबधबे गेले आगदी आता वर बहुतेक पठार असणार असं वाटायला लागलं आणि रव्या अचानक ओरडला,
" अरे तो तिकडे बघा, चंद्रराव मोर्‍यांचा वाडा"
" हो का ? खुप मोठी डेअरी आहे का रे त्यांची? " मुळात शल्या वैतागलेला कारण त्याचा दोन दगडांमधे अडकलेला पाय सुटायचं नाव घेत नव्हता. सहाजीकच न बघता तो बोलुन गेला.
एव्हाना सुळसुळीत झालेल्या पाउलवाटेमधुन स्वतःची आदळ आपट करुन घेत संज्या तिथपर्यंत पोहोचला आणि समोर दिसणार्‍या चंद्ररावमोर्‍यांच्या वाड्याच्या अवशेषांवर बसकण मारली. पिंट्याने तेवढ्यात आजुबाजुला शोध घेत आणखी एक हळदी रंगाचे लिलीचे फ़ुल शोधुन काढले आणि मग ते उकरुन काढण्यात बर्‍यापैकी वेळ गेला. हळुहळू आम्हा सगळ्यांनाच या फ़ुलांमधे रस वाटायला लागला होता. अहो, इतक्या वेगवेगळ्या उधळण केलीये निसर्गाने या रानटी फ़ुलांवर की जमिनीतुन जणु वेगवेगळ्या रंगाचे कारंजेच उडतायत असं वाटायला लागतं. जर सगळी एका ठिकाणी असली तर कुणाचीच नजर त्यावरुन हलणार नाही अगदी एखादा अरसीक माणूसही तिथे दोन मिनीटे थांबल्या खेरीज पुढे जाणार नाही. त्यात आजुबाजुला पसरलेल्या मखमली गवतामधे बाकीच्या इटूकल्या पिटूकल्या निळ्या लाल फ़ुलांमधे न उमलता ही फ़ुले पार एकांतात कुठेतरी एखाद्या जाळीखाली वगैरे उगवतात. शिवतरघळला पाण्याच्या आजुबाजुला सर्रास सापडतात. आजुबाजुच्या वेड लावणार्‍या निसर्गाच्या सानिध्यात वेळ पटकन निघुन जातो एखाद्या बंद मुठीतल्या वाळू सारखा.
" अबे, संज्या कुठाय?" शल्याला अचानक आठवण झाली.
मागे फ़िरुन पहातोय तर संज्या मघाशी बसला होता तिथेच अजुनही बसलेला.
" संज्या, इथे काय करतोयस?"
" तुझ्या त्या चंद्रराव मोर्‍यांची वाट पहातोय, लेका कुठल्या पाण्याच्या कुंडापायी किती ताबडशील रे आम्हाला?" बहुतेक संज्या दमला असावा.
" चल यार पलिकडून जरासे वर जाउन बघुयात नसेल तर नक्की परत फ़िरुया" समजुत काढत रव्या म्हणाला.
पुन्हा एकदा पलिकडचा काठ गाठला एकदाचा. आणि इतकावेळ भरुन आलेल्या पावसाने जोरदार सुरवात केली. आता मात्र ओढ्याच्या काठाकाठाने जाणे शक्य नव्हतेच त्यामुळे मग बाजुच्या झाडाझुडपातुन वाट काढत आमचा प्रवास सुरु झाला. पण हे काही फ़ारसे सोपे काम नाही याचा अनुभव लगेचच आला. कारण वरुन पावसाचा मारा इतका जोरदार होता की पाउल पुढे टाकायचे वांधे. पुन्हा एकदा रव्याचा अनुभव मदतीला आला. आजुबाजुच्या सागाच्या झाडांच्या पानांचा वापर करुन त्याने इतका अप्रतीम अडोसा केला की बस्सSS.
"बस, आणखी थोडावेळ मग पाउस एकदा थांबला की आपण सरळ खाली उतरायला सुरुवात करायची" असले जरा जीव भांड्यात टाकणारे शब्द एकदाचे रव्याने उच्चारले. पण यासाठी त्याला अर्धातास शल्या, संज्या आणि माझी रिले स्वरुपात चालणारी अखंड कटकट ऐकावी लागली.
एकदाचा निघायचा प्लान तर झाला पण आता पाउस थांबायचे नाव घ्यायला तयार नव्हता. दुपारचे तीन वाजले होते तरी संध्याकाळचे सात वाजल्यासारखा काळोख पडला होता. मग पुन्हा एकदा रव्याच्या नावाने शिमगा करण्याचा कार्यक्रम रंगात आला. त्यात झालच तर पावसाच्या नावाने बोटे मोडूनही झाली. आणि एकदाचा पाउस थांबला, आणि आम्ही आडोश्यामागुन बाहेर आलो. आता एकदाचा ओढा ओलांडून खाली उतरायच की मोकळे पुन्हा उनाडायला! पण तसं व्हायच नव्हतं ओढयाजवळ पोहोचल्यावरच लक्षात आलं की पाण्याची पातळी बदललीये. तरी पलीकडे जायला आम्ही पाण्यात उतरलो असु नसु समोरुन एक बंडी धोतरातला म्हातारा खणखणीत आवाजात ओरडला. दचकुन त्याच्याकडे पाहीलं तर तो साधारण चौकार देताना अंपायर जश्या हातांच्या हलचाली करतो तश्या काहीश्या हलचाली करत होता. एकंदर दहा-विस मिनीटे त्या हलचालींचा अर्थ लावण्यात गेल्यावर एकदाचा शोध लागला की हा प्राणी आपल्याला परत जायला सांगतोय, आता का?.......... या प्रश्नाचे उत्तर जास्त शोधायला लागले नाही. अचानक पाण्याची पातळी वाढायला लागली आणि बघता बघता ओढा दुथडी भरुन वहायला लागला. एकंदरीत मघाच्या पावसाने प्रताप गाजवला होता.
" आत्ता काय करायचं?" सगळ्यांच्या मनातला प्रश्न पिंट्याने विचारला उत्तर काय कप्पाळ देणार कोण !
" बघु, पाणि ओसरल्याशिवाय पलिकडे जाता येणार नाही तो पर्यंत इथेच" रव्याने कारण नसताना तोंड उघडले.
" आणि ते नाहीच कमी झालं तर?" आणखी एक भेदरलेला मारा.
" माहीत नाही !"
" आणि रात्रभर नाय उतरलं तरं?"
"मग वस्ती इथेच!"
पिंट्या रव्याची जुगलबंदी एकदम शांततेत बदलली.
मघापासुन ज्या रानाच्या निसर्गाचे कौतुक करत होतो त्याची आता भीती वाटायला लागली. त्यात शल्याने बाउंसर टाकला.
" काय रे? या जंगलात वाघ असतील का रे?"
आयाईSS! नुसत्या कल्पनेनेच काळीज जागा सोडून तोंडावाटे बाहेर यायची तयारी करायला लागले. प्रश्नाचे उत्तर मिळणे शक्यच नव्हते.
" रव्या तु तराफ़ा बनव ना रे लाकडांचा" एक काकुळतीची विनंती.
" टांग तुझ्या नानाची, लेका या असल्या पावसात सुकं लाकुड मिळणार कुठे? मिळालं तर तोडणार कसं? आणि तोडलं तर जोडणार कसं? आणि जोडलाच तुझा तराफ़ा तर लेका या पाण्याच्या झोतात पलिकडे जाशिल कसा?" एका प्रश्नाच्या बदल्यात संज्याने इतके प्रश्न उभे केले.
" लेका इतकं सगळं करायला दोन दिवस जातील तेवढ्यावेळात पाणि उतरुन जाईल आरामात" शल्याने संज्याला दुजोरा दिला.
" आता गप्प वाट बघत बस की लेका!" रव्यानेही दटावले.
" अरे, असे हातावर हात धरुन गप्प बसायचं?" संज्याचे पक्षांतर.
" हो रे, निदान कुठून वाट मिळते का ते तरी बघुया!" शल्याचा पाठींबा कायम.
" मला नाही वाटत वर कुठे जागा मिळेल" रव्याने अंदाज वर्तवला, साधारण त्याचे अंदाज बर्‍यापैकी बरोबर असतात. एकंदरीत पाण्याचा वेग आणि पातळी बघितल्यावर वर कुठे पात्र अरुंद असण्याची शक्यता कशी नाही हे रव्या सहज पटवुन देउ शकत होता. त्यावरुन एक जोरदार धुमश्चक्री उडाली.
बराचवेळ भांडाभांडी झाल्यावर कदाचीत पाण्याला दया आली असावी एकदाचे कमी झालं ते !
आणि मघाचा कल्पनेतला वाघ खरोखर मागे लागल्यासारखे आम्ही सगळे अलिकडच्या तिरावर सुसाटलो. आणि एकदाचा सुटकेचा निश्वास टाकला.
एव्हाना साडेपाच वाजुन गेले होते. या पाण्याच्या टाक्याच्या शोधात जी पायपिट आणि मनस्ताप झाला होता तो घेउनच आम्ही पुन्हा एकदा घळीत शिरलो. आतले शांत वातावरण आणि समोरची श्री रामदास स्वामींची आणि श्री गणेशाची दासबोध लेखन करणारी मुर्ती बघुन सगळे मनस्ताप आणि थकवा विसरलो. पुन्हा एकदा त्यांना वंदन करुन बाहेर आलो. आणि समोरच्या कोसळणार्‍या प्रपाताचे तुषार अंगावर झेलत उभे राहीलो.
आता परत निघायलाच हवे होते म्हणुन जड पावलांनी पायर्‍या उतरायला सुरुवात केली.
गाड्या स्टार्ट करुन परत निघाल्यावर जेंव्हा लागलेल्या पहील्याच टपरीवर शल्याने गाडी थांबवली तेंव्हा सगळ्यांच्याच मनात एकदमच विज चमकली शल्याने शिवतरघळीत गेल्या पासुन आत्तापर्यंत एकही सिगारेट ओढली नव्हती. मनोमन शल्याला मानले आम्ही सगळ्यांनी.
पावसाने पुन्हा सुरवात केली होती पण या वेळी मात्र श्रावणस्पेशल रिमझीम रिमझीम, मघाच्या प्रसंगाच्या आठवणी त्यात हळूहळू झिरपत शांत होत जात होत्या. आणि गाड्या संथपणे रस्ता कापत पुढे सरकत होत्या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा! सुन्दर वर्णन! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

काळी पाच मधल्या आवाजात ..... Happy

एकदम झकास शब्दांत वर्णन.. Happy

-::- -::- -::--::--::--::--::-
गणा धाव रे.. मला पाव रे..

शल्या, पिंट्या, संज्या, रव्या.. सगळे या या.. चाफ्या मस्त जमली रे, ही एक छान कथा वाचायला मिळाली.

चाफ्फ्या, मस्त मस्त मस्त मस्त.

एकदम झकास वर्णन.
खुपच आवडलं

एकदम पावसात चिंब भिजल्यासारखं वाटतंय.. तुझ्या वर्णनाने तिथला गारवा आमच्यापर्यंत पोचला रे!! नेहमीप्रमाणेच उ त्त म चाफ्फ्या!! Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नको दंड नको शिक्षा , शांत मंगलमय गणेशोत्सव हीच अपेक्षा!
Happy

चाफा ओढ्यात अडकण्याचा अनुभव आम्ही माळशेजला घेतला होता... त्यावेळची भिती आता मजा म्हणून मिरवतो... Happy

वर्णन छानच...

इंद्रा आगदी खरं बोललास, आत्ता मजा म्हणुन लिहीलं असलं तरी त्यावेळी फाSSर वाईट अवस्था होती रे ! Sad
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

मस्त Happy

सुंदर वर्णन..... Happy

फक्त एक गोष्ट जरा चुकली आहे.

आतले शांत वातावरण आणि समोरची श्री रामदास स्वामींची आणि श्री गणेशाची दासबोध लेखन करणारी मुर्ती बघुन >>>>>>

इफ आय अ‍ॅम नॉट राँग, ती लेखन करणारी मुर्ती कल्याणस्वामींची आहे.

Happy

कृपया तेवढा बदल करा.

धन्यवाद.

college मध्ये असताना जायचो अधुनमधून शिवथर घळीला..
पावसाळ्यात मस्त धमाल निसर्ग असतो आसपास..