'न्याहरी- झटपट, चविष्ट आणि पौष्टीक' - पाककला स्पर्धा नियम

Submitted by संयोजक on 2 September, 2008 - 19:33

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे "Eat breakfast like a King, lunch like a common man and dinner like a beggar".
सकाळची न्याहरी हे आपल्या दैनंदिन खाण्यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं खाणं आणि तरीही आजच्या धकाधकीच्या काळात दुर्लक्षिलेलं. आहारतज्ञांच्या मते प्रत्येकाला सकाळच्या न्याहारीतून दिवसभर लागणार्‍या ऊर्जेतली १/३ ते १/४ ऊर्जा आणि जीवनसत्वं मिळायला हवीत.

आपल्यातले बरेचजण नुसता चहा किंवा दूध घेऊन कामावर पळत असतील किंवा कधी कधी गडबडीत काहीच न घेतासुद्धा. लहान मुलांची वेगळीच तर्‍हा, त्यांना काही खाण्यापेक्षा इतर सर्व गोष्टी करायला जास्त आवडते. घरोघरी प्रत्येक गृहिणीला नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे 'खायला काय करु'? आवडत्या पदार्थांपेक्षा नावडत्या पदार्थांची यादी नेहमीच मोठी असते.

आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर नक्कीच आपण आवडत्या पदार्थांची यादी मोठी करु शकतो. चला तर मग सज्ज व्हा आणि कामाला लागा.

स्पर्धेचे नियम :
१. शाकाहारी व मांसाहारी अश्या दोन्ही प्रकारच्या कृती चालतील.
२. या स्पर्धेसाठी वेळमर्यादा नाही तरीही पाककृती वेळखाऊ नसावी. तयारीसाठी लागणारा वेळ जास्त असला तरी चालेल पण पदार्थ करायला लागणारा वेळ हा सकाळी नोकरदार वर्गाच्या होणार्‍या घाई गडबडीशी सुसंगत असावा.
३. पाककृती घरातल्या नेहमी वापरल्या जाणार्‍या स्वयंपाकाच्या साधनांचा वापर करुन करता यायला हवी. (मायक्रोवेव्ह किंवा ओवनचा वापर नको) तसेच नवशिक्या व्यक्तींना पण करता येईल अशी सुटसुटीत असावी.
४. पाककृती स्वनिर्मीत किंवा पारंपारीक कॄतीत बदल केलेली असावी.
५. प्रत्येक पाककृतीसोबत तिच्या पौष्टीक मूल्यांची साधारण माहिती दिली जावी.
६. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
७. एका आयडीला एक प्रवेशिका पाठवता येईल.
८. पाककृती स्पर्धेसाठी 'फोटो अनिवार्य' ही अट काढून टाकली आहे. फोटो पाठवू शकत असाल तर जरुर पाठवा. फोटो नसल्यास गुणांवर परिणाम होणार नाही पण जर दोन पाककृतींना समान गुण मिळाले तर क्रमांकासाठी विचार करताना फोटोसहीत असलेल्या पाककृतीला प्राधान्य दिले जाईल.

लोकाग्रहास्तव सर्व स्पर्धांची अंतिम तारीख रविवार (१४ सप्टेंबर) ऐवजी सोमवार (१५ सप्टेंबर) केली आहे.

प्रवेशिका पाठवण्यासाठी आपल्याला या ग्रुपचे सभासद व्हावे लागेल.

स्पर्धा संपली आअहे आणि लवकरच मतदानाचा दुवा देण्यात येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users