कल्याण दरवाजा

Submitted by इंद्रधनुष्य on 27 February, 2012 - 07:13

थंडीचा जोर ओसरल्याने मुंबई जवळील नाईट ट्रेकच्या मोहिमेचा बेत शिजू लागला. नाशिक रेंज मधिल पट्टा, हरिहर असे एक दिवसाचे ट्रेक करण्याचा मानस होता. पण टांगारुंच्या कृपेने तो फिसकटला. आयत्या वेळी कुठे जायचे हा प्रश्ण भटक्यांना कधीच पडत नाही... एक हाक दिली की सह्याद्रीतून हजारो प्रतिसाद येतात... तो प्रश्ण 'ऑफबिट सह्याद्री'ने सोडवला... महाशिवरात्रीचा मुहुर्त साधून माहुली-भंडारगड मार्गे 'कल्याण दरवाजा' अशी मोहिम ठरली होती... रोमा, गिरी आणि मी त्यात सामिल झालो.

रात्री आसनगाव स्टेशनला उतरून टेंपोने माहुलीचा पायथा गाठला... मध्यरात्री दिडच्या सुमारास चढाईला सुरवात केली आणि हाशऽहुशऽ करत तीन तासात नियोजीत स्थळी पोहचल्यावर लगेच ताणून दिली.

सकाळी ऊडी बाबाचा कार्यक्रम आटोपून गडाच्या मुख्य दरवाजा जवळ आलो. दरवाजा पुर्णपणे ढासळलेला होता. एके काळच्या राजमार्गावर प्लॅस्टिकचा कचरा अस्थाव्यस्थ पसरला होता. दरवाज्या जवळ देवड्यांची रचना पहावयास मिळाली... मात्र पुढिल पायर्‍यांचा भाग कोसळलेला आहे.

बहुतेक ट्रेकर्स माहुली ते भंडारगड असा ट्रेक करतात. परंतू आम्ही भंडारगडाचा उद्धवस्त 'कल्याण दरवाजा' उतरून माहूलीच्या पश्चिमेकडील नाळेतून वर चढणार होतो. भंडारगड आणि माहुली वर पिण्याच्या पाण्याचे प्रत्येकी एकच टाकं आहे. पुढिल ५-६ तासाच्या मार्गात पाण्याच दुर्भिक्ष आहे याची जाणिव होती म्हणुन जवळील दोन लिटरची बाटली फुल्ल करुन घेतली.

वाडा परिसर

वजिर सुळका

भंडारगडा वरुन पश्विमेला कोकणात उतरणार दरवाजा म्हणजे 'कल्याण दरवाजा'.

हा दरवाजा उतरायच म्हणजे ५० आणि ९० फुटांचे दोन रॉक पॅचेस् रॅपलिंग करून उतरावे लागतात.

तेथून पुढे कड्या जवळील निमुळत्या वाटेने खाली उतरल्यावर एका १० फुटी खिंडाराला (चिमणी असही म्हणतात) पाठ आणि पाय लावून उतरावे लागले.

जस जसं खाली उतरत होतो तशी वाट अजूनच खडतर होत होती. बर्‍याच ठिकाणी पायर्‍या नामशेष झाल्या होत्या... फक्त मातीचा घसारा शिल्लक होता तर उजविकडे दरीचा दरारा कायम होता. आधारासाठी कड्याचा दगड पकडावा तर तो ठिसूळ दगड चक्क हातात यायचा. अश्या खडतर मार्गावर आत्मविश्वासाचा पार बोर्‍या वाजतो. पाय आणि हातांचा योग्य तो समन्वय साधात आम्ही शेवटच्या १०० फुटी रॉकपॅच वर पोहचलो. दुपारचा दिड वाजला होता आणि सगळ्यांचे पाणी एव्हाना संपले होते. शेवटच्या रॉक पॅचचे वैशिष्ट्य म्हणजे ४० फुट खाली उतरल्या नंतर खाली विस-एक फुट Overhang आहे. त्यामुळे हवेत तरंगतच रॅपलिंग करत खाली यावे लागले.. पहिल्या बॅच मधिल सर्वच जण रॅपलिंगला सरावलेले असल्यामुळे आम्ही तो टप्पा लिलया पार केला.

सुळक्यांची नावे डाविकडून नवरी, नवरा, मधे भटोबा, वर्‍हाड आणि सगळ्यात शेवटी वजिर सुळका.

शेवटचा पॅच उतरल्यावर पुढे कड्या लगतच्या न दिसणार्‍या वाटेवरून ४५ अंशाच्या कोनात उतरून एका पठारावर आलो आणि सुटकेचा निश्वास सोडला. दुपाराच्या उन्हात थोडा वेळ सावलीत आराम करून वाटाड्या सोबत पुढे निघालो. आता आम्ही गडाच्या पश्चिमे कडून मार्गक्रमण करणार होतो, त्यामुळे उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार होता. पाण्याचा साठा आधीच संपल्यामुळे सगळे त्रस्त होते. कधी एकदा खिंड गाठतो असे झाले होते. गडाच्या या बाजुला कोणी फिरकत नाही. साधी ढोरवाट सुद्धा अस्तित्वात नाही. त्यातच वणव्याने थोडे फार शिल्लक असलेले जंगल पार साफ करून टाकले होते. राखेचा धुरळा नाका तोंडात जाऊन अधिकच धाप लागत होती. वाटेत प्रेत्यकजण लोटांगण घालत होता. आमच्या बॅच मधिल ओंकार थकल्यामुळे मागे पडला... त्याला सोबत म्हणून मी मागे राहिलो. काही वेळाने पुढे गेलेले मेंम्बर साद देईनासे झाले. त्यात मागे राहिल्यामुळे आम्ही वाट चुकलो... कडक उन्ह आणि पाण्याचा कमतरतेमुळे पुढे चालवेना. कधी खोडांच्या सावलीत बसत... तर कधी घसरत, धडपडत अगदी केविवलवाण्या अवस्थेत आम्ही कसे तरी पुढे जात होतो. नशिबाने वाटेत परतणारा वाटाड्या (गुरू) भेटला. त्याने कोयत्याने केळीच्या खोडाची सालं कापून दिली... चव कडू होती पण सालीच्या रसाने थोडा का होईना कोरडा घसा ओला करता आला.

वर पाहिले तर माहुलीची नाळ दुरवर दिसत होती... म्हंटले कसेही करून तिथं पर्यंत जरी पोहचलो तरी धन्य झालो. कारण नाळेत पोहचल्यावर कोणीतरी पाणी आणून देईल अशी वेडी आशा होती. पण कसले काय... आम्हाला सोडून पुढे गेलेले सगळे तिथेच गलितगात्र होऊन पहुडले होते. उन्हातील पदभ्रमणाने अगदी बेजार झाले होते.

संध्याकाळचे ५ वाजत आले होते. अंधार पडायच्या आत ती हजार फुटी नाळ चढून गडावर जायचे होते... मात्र गेले पाच-सहा तासातील अथक परिश्रमामुळे वर चढून जाण्याचे त्राण शिल्लक नव्हते. घश्याला कोरड पडल्यामुळे व त्यातच दुपारचे जेवण न झाल्याने पोट अस्वस्थ झाले होते. डोकं भिरभिरायला लागलं होतं. नाळे जवळ आल्यावर गिरी भेटला. त्याला माझ्या सोबत राहाण्याचे विनविले... म्हंटलं चक्कर आली तर जवळ कोणीतरी जाणकार असावा. :p पण त्यावेळी दोघांची अवस्था एकच होती. कधी हाताच्या जोरावर तर कधी ढोपरांवर रांगत रांगत आम्ही ती नाळ चढू लागलो.

पाणीऽऽ पाणीऽऽ करून घसा अगदी कोरड्या कालव्या सारखा सुकला होता. 'पाणी म्हणजे जिवन' हा पाठ्य पुस्तकांत वाचलेला अर्थ आम्ही प्रत्यक्षात अनुभवत होतो. अंधार पडायला एक तास बाकी होता. वर खिंडीत जाण्या शिवाय गत्यंतर नव्हते... तेथून पुढचा मार्ग सोपा होता आणि पाण्याच टाकंही जवळ होत. मनाची तयारी असली तरी Dehydration मुळे शरीर साथ देत नव्हते.

घळीत मोठमोठे दगड होते... उन्हे कलल्यामुळे थोडे गार होत आले होते... त्या वर उताणी झोपल्या त्यांचा शितल स्पर्श अंगात नवा जोर निर्माण करत होता. त्या जोरावर थोडं वर चढत... परत दगडावर उताणी झोप अस करत नाळेच्या शेवटच्या टप्प्या पर्यंत पोहचलो तेव्हा अंधार पडत आला होता. मात्र शेवटचा दहा मिनिटांचा टप्पा चढणे अगदी अशक्यप्राय वाटत होतं... 'वर गेलेल्यां पैकी कोणी तरी पाणी आणून देईल तरच मी आता वर जाईन, नाहितर रात्र भर नाळेतच मुक्काम ठोकेन' असे जाहिर केले.

एका थोरल्या शिळेवर पंधरा मिनिटांचा ब्रेक घेतल्यावर थोडं बर वाटलं... बजरंगाचे नाम स्मरण करत तडक उठलो नी गिरीला म्हंटले, 'काही झाले तरी खिंड गाठायचीच'... आणि तसेच काळोखात धडपडत उर्वरीत नाळ चढू लागलो. आणि काय नशिब बघा... वर खिंडीत पोहचताच भंडारगडा वरून विश्वेश अमृत कलश घेऊन उतरताना दिसला... शेवटी देवानेच आमची हाक ऐकली... पुढे गेलेला विश्वेश पाण्याने भरलेल्या बाटल्या घेऊन आला... आम्ही एक-एक बाटली गटगट रिकामी केली तेव्हा कुठे क्षुधाशांती झाली. त्या क्षणी मिळालेल्या त्या थेंबन् थेंबाचा मी सदैव ऋणी राहिन.

उशिर झालामुळे ती रात्र गडावर काढली... सकाळी ८ वाजता गड सोडला. माहुलीच्या पायथ्याला महाशिवरात्री निमित्त उत्सव होता... देवळा समोरील विहिरीवर आंघोळ करून शिवशंभोचे दर्शन घेतले.

भटकंतीची आवड तशी महाविद्यालयीन वया पासूनची... सह्याद्रीचे वेड कधी आणि कसे लागले ते आठवत नाही... आप्पांच्या पुस्तकातून तर कधी महारांजाच्या शौर्य कथातून तो सतत भेटत राहिला... आव्हान देत राहिला.. स्फुरण चढत गेले... गेल्या दहा वर्षाच्या गिरिभ्रमणात बरेच अविस्मरणिय क्षण जगलो... शिकलो.
गिरिभ्रमण म्हणजे हवापालट, निसर्गसौंद्रर्य, वन्य जिवन, गड किल्ले, साहस इत्यादी पुरता मर्यादीत न रहता, निसर्गाशी एकरूप होत साधं सोप सात्विक जिवन जगणं... हा गुरुमंत्र सह्याद्रीने दिला.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा ट्रेक कध्धी कध्धी विसरणार नाही मी!
Happy

one of the most best! Happy

तो ट्रॅव्हर्स अशक्य होता! १-२ दिवसापूर्वीच कुणीतरी वणवा लावल्यामुळे माती पूर्ण भुसभुशीत झाली होती. पाय ठरत नव्हता. तिसर्‍या रॅपलिंगनंतरचा छोटा ट्रॅवर्स पॅच कायम लक्षात राहिल! जेमतेम दहा पावलांचे अंतर कापायला मला पंधरा मिनिटे लागली असावीत. रोमा होता, म्हणून सुटलो.
नंतर त्या नाळेमध्ये आम्ही पोचलो तेव्हा बरोब्बर अंधार पडला होता.

छान वर्णन रे, पण पाण्याशी आणि शरिराशी असा खेळ करु नका. पाण्याबाबत अनेक
उपाय मी सूचवले आहेत. ते लक्षात ठेवा रे नीट.
अशा परिस्थितीचे वर्णन करता त्यावेळी, त्यापासून वाचायचाही आनंद मिळत नाही.
काळजीच वाटत राहते.

रॉक्या नाही तरी उडीबाबाचा प्रोग्राम केल्याबद्दल आभार. Happy

फोटो मस्त आणि वर्णन भारी.
पाणी पाणी अशी अवस्था वाचुनच घशाला कोरड पडली. अशा अवस्थेत देखील ट्रेक पुर्ण केलात ग्रेट. Happy

चंद्र कोरीचा आणि शेवटचा फोटो कातील आहे रे.

उडी भारीच... चंद्रकोरीचा फोटो बेस्ट... वर्णन अफलातुन.. ट्रेक करणार्‍या तुम्हा सगळ्यांना __/\__

दिनेशदांनी सांगितलेलं तेव्हडं पुढच्या वेळी लक्षात ठेवा, प्लीज...

__/\__

मात्र शेवटचा दहा मिनिटांचा टप्पा चढणे अगदी अशक्यप्राय वाटत होतं... 'वर गेलेल्यां पैकी कोणी तरी पाणी आणून देईल तरच मी आता वर जाईन, नाहितर रात्र भर नाळेतच मुक्काम ठोकेन' असे जाहिर केले. >>> Sad Sad

मस्त वर्णन आणि फोटो Happy
लिमलेटच्या गोळ्या जवळ ठेवत नाहीत का तुम्ही?

माहुलीच्या आसपासच्या जंगलातल्या पाड्यांवर कित्येक रविवार भटकताना हा वेगळ्याच प्रकारचे सुळके असणारा किल्ला माझं लक्ष वेधून घ्यायचा.

मस्त रे इंद्रा ... Happy
थोडक्यात संपवलेस कि रे... पण छान..
माहुली गडाचा अनुभव कायम लक्षात राहिल असाच आहे... Happy

बाप रे, फोटो पाहून एक क्षण श्वास रोखला गेला माझा.
पाठिवर इतकं जड घेऊन गड वगैरे चढणं म्हणजे जोखिमच..

तुम्ही सर्व जण महान आहात __/|\__ Happy
वर खिंडीत पोहचताच भंडारगडा वरून विश्वेश अमृत कलश घेऊन उतरताना दिसला... >>> मला वाट्ल हे चंद्राचे वर्णन आहे. Happy लय भारी मित्रा.........

.
गिरिभ्रमण म्हणजे हवापालट, निसर्गसौंद्रर्य, वन्य जिवन, गड किल्ले, साहस इत्यादी पुरता मर्यादीत न रहता, निसर्गाशी एकरूप होत साधं सोप सात्विक जिवन जगणे.स ही आहे.थरारक अनुभव आणि सुंदर फोतो.

भन्नाट .... ट्रेक आणि वर्णन दोन्ही Happy Happy Happy

पण पाण्याशी आणि शरिराशी असा खेळ करु नका ..... दिनेशदांना अनुमोदन

हा धागा मिसला होता मी...
जबरीच झाला की ट्रेक.. पण हल्ली हे ट्रेक डिसेंबर - जानेवारी मध्येच केलेले बरे.

रच्याकने... मला रॅपलिंग करून जमाना झाला रे... Happy