नवरा बायको... 'त्यांच्या' नजरेतून!

Submitted by आशूडी on 12 February, 2012 - 10:18

गद्य विडंबनाच्या मागील अंकाला वाचकांनी दिलेल्या भरभरुन प्रतिसादामुळे आम्हाला पुढील अंक काढताना विशेष उत्साह आला. 'नवरा बायको' या सामान्य विषयावर चार ओळी लिहून मागवल्या असता आपल्या काही प्रसिद्ध लेखकांचे विचार इथे सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

नवरा बायको हे फारच प्रसिद्ध नाते असले तरी याच्या कल्पनेचा उगम नक्की कुणाच्या नादान डोक्यातून झाला याची माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही. तरी आपल्याला काही फरक पडत नाही. परंपरेच्या अजस्त्र गोंडस नावाखाली आपण हे नाते वापरतो. एकदा हे नाते सुरु झाले की त्याचे पुढे काय करायचे असते हे पहिले काही वर्ष दोघांपैकी एकालाही समजत नाही. म्हणजे आता आणखी एक मेंदू आपल्या मेंदूला जोडला गेला आहे हे पहिल्या मेंदूच्या लक्षात येत नाही. काही वर्षांनी आपल्याला हे समजले नाहीये, हे ही त्यांना समजत नाही. १६ वर्षांनी आपली चूक लक्षात यायला आपण आईनस्टाईन नाही. त्यामुळे पुढे कसे बोलावे, वागावे, भांडावे यावर आपल्याकडे नेमके शास्त्र, नियम लिहीलेले पुस्तक नाही. लग्न करण्यापूर्वी असलेले कुतुहल,चिकाटी, पाठपुरावा करुन संशोधनाने अनुमाने लावणे, निष्कर्ष काढणे अशी प्रयोगशील वृत्ती एकाएकी लोप का पावते यावर संशोधन केले पाहिजे. युरोप, अमेरिकेत तसे झालेही असेल एव्हाना. त्यांची रेफरन्स बुक्स आली की आपण पुढच्या अभ्यासाला सुरुवात करु.
- राम बरोबर

आपल्या लोकांना एक फार वाईट खोड असते. सतत एकमेकांची परीक्षा घ्यायची. सांगा पाहू, ही वीट मी कुठून आणली असेल? असे आयत्या सापडलेल्या मित्राला विचारतात.या प्रकाराला कंटाळूनच कदाचित 'नवरा बायको' हे प्रकरण सुरु झाले असावे. हे प्रकरण एकंदरीतच फसल्यामुळे पुढे अयशस्वी प्रकारांना प्रकरण म्हणणे सुरु झाले असावे. जे काही प्रश्न उत्तरे खेळायचे ते आपापसात खेळा आमच्या डोक्याला कशाला ताप? या वैतागातून या पर्मनंट त्रासाचा उगम झाला असावा. एखादा नवा पदार्थ केला की हमखास बायको विचारणार, 'ओळखा पाहू, आज मी काय केलंय?' लोकलचे, गर्दीचे धक्के खाऊन आलेल्या नवर्‍याला आणखी एक धक्का. आज काय वाढून ठेवलं आहे कोण जाणे! त्याने बुद्धीला ताण दिल्याचे दाखवून जमेल तितके कौतुक आणि उत्साह चेहर्‍यावर आणून म्हणावे, ' बंगाली मिठाई घालून केलेला ढोकळा? की रताळ्याचे बटाटेवडे?' 'अहं! नाहीच मुळी. आज मी किनई, झिंबाब्वे पध्दतीच्या आफ्रिकन भुसवड्या केल्यात!' आता बायकोने केलेल्या 'झिंबाब्वे पध्दतीच्या आफ्रिकन भुसवड्या' संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटांच्या गोरज मुहूर्तावर एखाद्या नवर्‍याने पहिल्या फटक्यात ओळखल्या तर मी टिळक पुतळ्यासमोर त्याचा जाहीर मुका घ्यायला तयार आहे! बाकी बायकांचीही मला जराशी दया येते. भोळ्या असतात बिचार्‍या. लग्न झाल्यावर एखादा 'वरण्यालायक' नाही हे जगाला 'न वरा, नवरा' असं ओरडून कशाला सांगायचं? तुमची अवस्था पाहून त्याला वरणारी तुमच्याहून महानच म्हटली पाहिजे. हे म्हणजे वेगात चाललेल्या अ‍ॅम्ब्युलन्ससमोर जाऊन शांत उभं राहण्यासारखं आहे.
- फु.ल. देतसांडे

" माझ्यात आणि दमयंतीमध्ये नेमकं काय चालू आहे ते तिच्या किंवा माझ्या आईला कसं समजतं?"
"The more you keep it personal it becomes universal! नवरा बायको या नात्याबद्दल जितका विचार करु तितकं ते जास्तच गुंतागुंतीचं वाटतं. सुखदु:खात सदैव सोबत राहण्याच्या आणाभाका घेऊन स्वतंत्र अस्तित्वासाठी केलेली रस्सीखेच म्हणजे नवरा बायको. "
"पार्टनर, स्वतंत्र अस्तित्व प्रत्येकालाच हवं असतं. अगदी साखरेच्या दाण्यामागे लागलेली मुंग्यांची रांग जरी पाहिलीस तरी तुला प्रत्येक मुंगी, तिचे चारी पाय वेगवेगळे दिसून येतील. मग तरी ही एकत्र आहोत असं जगाला भासवण्याची गरज का? "
"इथेच तर मेख आहे. परि तू जागा चुकलासी! मुंग्यांच्या स्वतंत्र अस्तित्वापेक्षा डोळ्यांना पहिल्यांदा दिसते ती रांग. झुंडीची ताकद फार मोठी असते."
"पार्टनर, मग तू का नाही घेत नवरा बायको च्या नात्याचा अनुभव?"
"अत्तर असो वा फिनाईल वास लांबूनही येतो त्यासाठी चव चाखून बघायची गरज नसते."
- ब.घू. गाळे

आजोबा सांगत होते लंप्या, काहीही कर पण लग्न करु नको. आजीची भांड्यांसोबत स्वयंपाकघरात जुगलबंदी चालू होती. म्हणजे आमच्या गाण्याच्या क्लासमधे कसं गुरुजींनी 'सा' लावला की सगळे आपपाल्या मनाने हवा तेवढा सा लावतात तशीच. आजीनं स्वयंपाकघराच्या दरवाजात येऊन एक वाक्य बोलायचं, मग पातेली, डाव,ताटांनी आपापले सूर लावायचे. आज काहीतरी महत्त्वाचं झालेलं असणार. सुमी तिच्या मैत्रिणींशी कानात बोलताना भुवया वर करुन आणि मान हलवून बोलते तसलं काहीतरी. मी एकदा विचारणार आहे सुमीला, तू कानात बोलताना भुवया वर केलेल्या आणि मान हलवलेली दिसते का चंपीला? एरवी ती बोलत असताना मला मात्र डोळे मोठे करुन सांगणार, माझ्याकडे बघ! हे म्हणजे बेश्टंच. आजी आता आजोबांच्या मावसबहिणीच्या लग्नापर्यंत आलेली आहे. म्हणजे अजून किटप्पाच्या नातवाचं बारसं होणार, मग परळ्याच्या बहिणीचं डोहाळजेवण, म्हणजे आता एक तास जेवायला मिळत नाही. आजीला इतिहासात पैकीत पैकी मारकं असणार, खात्रीच.पण आजोबांनी नक्की काहीतरी विस्तृत का काय म्हणतात तसाला घोळ घातला असणार. आजोबांचं एक वाक्य आणि आजीची एवढी वाक्य ऐकली म्हणजे मला दिवाळीच आठवते. आजोबांचं वाक्य म्हणजे गंप्याचा सुतळी बॉम्बच असणार आणि त्याला उत्तर म्हणून कणबर्गी गंग्याच्या वाडीत लावलेली लवंगीची माळ म्हणजे आजीची इतिहास- कविता. आजोबा म्हणतात, आजीकडे जादूची लवंगी माळ आहे. त्यांच्या लग्नापासून प्रत्येक लग्नाकार्यात त्यात एकेक लवंगी वाढत गेली आणि एकदा आजीनं ही माळ लावली की शेवटाला जाऊनच थांबते. तरी ती माळ संपत नाही, दरवेळीस तेवढ्याच जोरात वाजते. आजोबा असं बोलायला लागले की मला मी खूपच लहान असल्यासारखं वाटतं.मग घरातून पळत सुटून मारुतीच्या देवळापर्यंत धावत जावसं वाटतं. शेवटपर्यंत न थांबता, आजीकडच्या लवंगी माळेसारखं.
-हताश परायण खंत

पती-पत्नी! सृष्टीच्या निर्मात्याला ग्रीष्मातल्या उष्ण दुपारी वामकुक्षी घेताना पडलेले एक लखलखीत स्वप्न! ते स्वप्न पाहून त्याच्या विशाल भाळावर टपटप जमलेले घर्मबिंदू तप्त धरेवर सांडले आणि तिच्या रोमारोमातून हुंकार फुटले, वळीव! वळीव!! सभोवार दरवळलेला मृद् गंध हा स्वप्नातूनच सांडला असावा..! आणि सुरु झाली मानव जातीतील एक धीरोदात्त परंपरा! कुणी म्हणतात पती पत्नी हे दीप-ज्योती सारखे असतात. मला मात्र ते मुळीच मान्य नाही! पती पत्नी हे उदबत्ती सारखे असतात! उदबत्तीची शलाका आणि सुगंधी धूप जसे एकमेकांना अलग केल्यावर निरर्थक होतात तसेच पती पत्नी! सबंध आयुष्य एकमेकांसोबत झिजून स्वतःला त्या सुगंधाची जाणीवही न होणारे पती पत्नी म्हणजे मला पहाटेच्या मंगलसमयी सुगंधित पुष्पमाळांनी सुशोभित केलेल्या देवघरासमोरच्या नक्षीदार रांगोळीशेजारी जळणारी उदबत्ती वाटतात!! सुगंध वर जाऊन अवघ्या सृष्टीला हर्षोल्हासित करतो, पण काडीला मान टाकावी लागते ती खाली सांडलेल्या राखेवर! शोणा, विवाहाशिवाय मनुष्य, म्हणजे प्रत्यंचेशिवाय धनुष्य!
- कितीजी रवंथ

*आमचा मागील अंक तुम्हाला इथे वाचायला उपलब्ध आहे. - http://www.maayboli.com/node/20826
*मागील अंकाशी साधर्म्य ठेवण्यासाठी आम्ही 'नवरा बायको...'त्यांचे' ' असे शीर्षक सुचवले होते परंतु अनर्थाने होणारा गहजब टाळण्यासाठी संपादकांनी त्यात बदल केले.

गुलमोहर: 

Rofl

मस्त मस्त

बदलुन लिहण्यासाठी ऐकलल एक वाक्य लिहतो.

नवरा बायको सुई दोर्‍यासारखे असतात. टोचणारी सुई आणि जोडणारा धागा अनेक नवीन नाती निर्माण करतात. हे काम एकट्या सुई किंवा धाग्याच नसत. बर्‍याच वेळा जोडण्याची प्रक्रिया लक्षात न आलेली माणस फक्त टोचण्याने झालेल्या त्रासाची कुरकुर करतात. सुईच काम पत्नीन केल तर संसारात कुरकुर खुपच वाढते. म्हणुन संसारात जोडायच असत हे जोडप्याला माहित असायला हव आणि सुई कोणी व्हायच आणि धागा कोणी व्हायच हे आपापल्या स्वभावानुसार ठरवुन घ्यायला हव. हा रोल आलटुन पालटुन बदलता ठेवला तर गंमत जास्त येते.

भारी Lol

पहाटेच्या मंगलसमयी सुगंधित पुष्पमाळांनी सुशोभित केलेल्या देवघरासमोरच्या नक्षीदार रांगोळीशेजारी जळणारी उदबत्ती >>> Lol

Pages