मार्लेश्वर (देवरुख) आणि कर्णेश्वर (संगमेश्वर)

Submitted by दिनेश. on 7 February, 2012 - 14:29

यावेळी भारतात जाताना, मालेश्वरला जायचे असे ठरवले होते. माझी आजी तिथे जात असे, त्यावेळी तिथे जायची वाट फार अवघड होती, असे ती सांगत असे. पुढे मिलिंद गुणाजीने काढलेला तिथल्या धबधब्याचा फोटो पण बघितला होता, पण माझे तिकडे कधीच जाणे झाले नव्हते.
मग इथे नंदीनी आणि जिप्सी ने पण लिहिले होते, या सगळे वाचून मला आपण अजून का गेलो नाही, असे वाटत राहिले.

मकरसंक्रांतीला श्री मार्लेश्वराचे गिरिजेशी लग्न लागते आणि त्यानिमित्त जत्रा असते ते माहीत होते पण यावर्षी मकरसंक्रांत १५ जानेवारीला येणार आहे ते लक्षात आले नाही. त्यामूळे आम्ही गेलो होतो तो दिवस, नेमका मंगलसोहळ्याचा होता. आणि वेळही शुभमुहुर्ताची.

दर्शनासाठी हजारो लोक रांगेत वाट बघत होते. (आता वर चढायला सुबक पायर्‍या आहेत.) आम्ही गुहेजवळ न जाता आधी धबधब्यापर्यंत गेलो. रांग तिथपर्यंत होती. मग परत फिरलो तेवढ्यात मामाचे साडू भेटले (ते मारळवासीच) त्यांच्या ओळखीने थेट गुहेत प्रवेश मिळाला. प्रचंड गर्दीमूळे तिथे काही मिनिटेच थांबता आले.

मग मामाच्या आग्रहावरुन संगमेश्वरच्या जवळ असलेल्या कर्णेश्वर देवळाला भेट दिली.
संगमेश्वर जवळ (४ किमी) कसबा नावाचा भाग आहे, तिथे आतमधे हे देवस्थान आहे.
जवळपास वस्ती मुसलमान आहे पण मामाने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या घरात पुरातन तुळशी वॄंदावन आहे.
संभाजी महाराजाना या गावात औरंगजेबाने अटक केल्याचे सांगतात. गावात केविलवाण्या अवस्थेत संभाजी महाराजांचे स्मारक पण आहे.
गावात होळीच्या दिवशी मोठा उत्सव असतो आणि त्यासाठी मोठा हौद बांधला आहे.
(याबाबत कुणीतरी सविस्तर लिहा रे, मी काही वाचल्याचे आठवत नाही.)

प्रत्यक्ष देवस्थान मात्र खुपच अनोखे आहे. सर्व बाजूनी मोकळे आवार आहे आणि मधोमध भरपुर कोरीव काम असलेले देवालय आहे.
मूर्तींची हेतूतः विटंबना केल्याचे जाणवतेच पण बाकी देवालय सुरक्षित आहे. तिथल्या पुजार्‍यांना विनंति केल्यास ते सर्व बारकावे दाखवतात. (जे एरवी आपल्याला कळणार नाहीत.)

मी त्यातला तज्ञ नाही, पण मला काही गोष्टी तिथे प्रकर्षाने जाणवल्या. तिथे दिसणार्‍या मूर्ती या वेगवेगळ्या शैलीतल्या वाटतात. त्या वेगवेगळ्या कलाकारांनी किंवा वेगवेगळ्या काळात घडवल्या असतील का ? १६०० वर्षांपूर्वी ते बांधल्याचे, कुठेतरी वाचले.
तसेच एकंदर देऊळ आणि खास करुन कळस एकसंध म्हणजे एकाच पाषाणातून कोरल्यासारखा वाटत असला तरी, दगडात अनेक रंग जाणवतात. ते रंग मूळचेच कि हवामानाचा, रसायनांचा परिणाम म्हणून तसे झालेय, कळत नाही.
देवळासमोरची दीपमाळ पण जरा वेगळ्या धाटणीची आहे.

त्या आवारातच सूर्यदेवाचे देवालय आहे. ती मूर्ती पण विद्रुप केलेली होती. गावकर्‍यांनी मग तिचे जोडकाम केले आणि ते जोडकाम दिसू नये म्हणून ती मुर्ती रंगवली आहे. तरी ती प्राचीनच आहे, असे पुजारी म्हणाले.

मी कुठेतरी वाचले होते, कि सूर्याची मानवरुपात आपल्याकडे पूजा होत नसे. ती प्रथा आपल्याकडे इराणमधून आली. पण तिथल्या मूर्तींच्या पायात चामड्याचे बूट असत आणि तोपर्यंत आपण चामडे देवळात वर्ज्य मानले होते. त्यामूळे आपल्याकडे ती मूर्ती कायम रथात दाखवलेली असते (म्हणजे बूट घातलेले पाय दिसायला नकोत. ) पण ही मूर्ती वेगळी आहे. म्हणजे रथात नाही आणि प्रभावळीत बारा राशी कोरलेल्या आहेत.

दुसरे म्हणजे या देवळाच्या बांधकामात सरळ रेषांचा वापर आहे, नेहमीप्रमाणे कमानी नाहीत. नक्षीकामातही काही वेगळे नमुने दिसतात, छत आणि भिंतीवर तर ते आहेच पण पायर्‍यांवर पण आहे.

इथे काही मोजके फोटो देतोय (बाकीचे फेसबुक वर आहेत.)

१) वाटेवरचा घाट.

२) मार्लेश्वराच्या गुहेच्या समोर असणारा हा धोकादायक धबधबा. हे कुंड फारच खोल आहे.

३) हा मागचा प्रसिद्ध धबधबा. पावसाळ्यात तो अनेक टप्प्यात कोसळतो. पण एरवी क्षीण का असेना, वाहता असतोच.

४) हे कर्णेश्वराच्या देवळाचे प्रथम दर्शन

५) देवळाचे एक प्रवेशद्वार

६) दीपमाळ

७) छत

८) खांब

९) दशावतार

१०) समुद्रमंथन

११) ओवरीमधला खांब

१२) पायरी

१३) शेषावरचा विष्णू, लक्ष्मी, ब्रम्हा (त्यावर दशावतार आहेत, पण दाखवल्याशिवाय दिसत नाहीत.)

१४) भिंतीवरच्या मंगलमूर्ती

१५) छतावरचा आणखी एक नमुना

१६) वेगळ्या शैलीतले कोरीवकाम

१७)

१८) आतल्या बाजूचा खांब

१९)

२०)

२१) सूर्यदेव

२२) मागच्या बाजूचा संगम (इथेही काही देवळे आहेत.)

गुलमोहर: 

दिनेशदा, कर्णेश्वर मंदिराची अजुन एक आख्यायिका आहे-
मन्दिराच्या आत ५ ताटे पालथी टाकलेली आहेत, ही प्रचंड मोठी ताटे आहेत, ती ५ पांडवांची आहेत. अज्ञातवासात असताना शत्रू आल्याची चाहूल लागल्यामुळे द्रौपदीने ती पालथी टाकली अशी गोष्ट आहे. शेजारील भिंतीवर काही लिहीलेले आहे, ते जर कोणास वाचता आले, तर ती ताटे सुलट होतील असे मानले जाते. प्रत्येक प्रवेशद्वाराच्या कमानीत १ आणि २ आत आहेत.
माझ्याकडे फोटो आहेत, बघते प्रयत्न करुन टाकता येतात का!

पांडवांना श्रेय देण्याचे कारण मला समजतच नाही कधी. एकतर त्याकाळी ही लेणीच खोदली गेली नव्हती... Happy आणि पांडवांनी ती खोदल्याची शक्यता शून्य..

कर्णेश्वराचं मंदिर पांडवांनी घडवल्याची आख्यायिका आहे. एका रात्रीत हे मंदिर उभं केलं>>>>>>मंजु, अगदि हिच आख्यायिका एकविरा लेण्यांबाबत सुध्हा सांगितलि जाते.

<< हिच आख्यायिका एकविरा लेण्यांबाबत सुध्हा सांगितलि जाते. >> नाशिकच्या पांडव लेण्यांविषयीं सुद्धां ! असा संदर्भ [ खरा/खोटा] जोडलेला असला कीं तीं तीं लेणी पहाताना एक वेगळीच गंमत येते हेंही खरंय !

एकविरा लेणी? म्हणजे तुम्हाला कार्ला किंवा विहीरगाव म्हणायचे आहे ना? त्याचा पांडवांशी काय संबंध? कार्ला लेणी कधी खोदली गेली ह्याबद्दल माहिती उपलब्ध आहे की... Happy

होय.. त्यालाच आख्यायिका म्हणतात पण प्रत्येक ठिकाणी पांडव?

मी अतुलनीयच्या धाग्यावर ही म्हणालो होतो की लेण्यांच्या माहितीसाठी लेणी महाराष्ट्राची हे पुस्तक एकदा वाचाच.. Happy

दिनेशदा मस्तच गावची आठवण आली , लवकरच मार्लेश्वरला जाईन,
कर्णेश्वर अजुन पाहीलेले नाही , या वेळी नक्कीच Happy
सुंदर प्रचि आणि उपयुक्त माहीती धन्स Happy

होय.. त्यालाच आख्यायिका म्हणतात पण प्रत्येक ठिकाणी पांडव? >>> इरावती कर्व्यांच्या युगांतमधे याचे खूप छान विवेचन दिलेले आहे.

बाकी ऐतिहासिक माहितीसाठी वरदा किधर हय???

मंजु, मीपण आख्यायिका लिहिणारच होते.. माझ्या हार्ड डिस्कमधे त्या ताटान्चा फोटो आहे का चेक करते.

कोकणात ट्रिप काढणार्‍यानी अशा ठिकाणाना जरूर भेट द्या. नेहमीचं तेच गपु/पावस्/गुहागर्/दापोली फिरून आलेल्यानी पण जरूर भेट द्या. जितके अधिक पर्यटक येतील तितका या स्थळाचा विकास होइल आणि या स्थ्ळाची दुरावस्था दूर होइल. (अधिक माहितीसाठी संपर्क साधा) Proud

>>इरावती कर्व्यांच्या युगांतमधे याचे खूप छान विवेचन दिलेले आहे.<<

गोनीदांनी त्यांच्या 'दुर्गभ्रमणगाथा' ह्या पुस्तकातही संपूर्ण किंव्हा अर्धवट सोडून दिलेल्या लेण्याबाबतच्या आख्यायिकांवर छान मार्मिक विवेचन केले आहे.

दा फोटो खुपच छान...
ब-याच वर्षापुर्वी गेलो होतो मारलेश्वरला ,त्यावेळी पाय-यांचे बाधकाम चालू होते,
काल परवाच ऑफीसमध्ये विषय निघाला होता ,
पावसाळ्यात खुप मजा येते...पण धोकादायक आहे.

भर पावसात जाण्यापेक्षा, पावसाचा भर ओसरल्यावर म्हणजे श्रावणात जाणे चांगले.
तसे पायर्‍यांना कठडे वगैरे आहेत, पण त्यावरुन उडी मारुन जाणारेच जास्त ना !
पण एक खुपच छान आहे, देवाच्या भितीने का होईना पण ना तिथे मद्यपान वा मांसाहार करता येतो ना करुन तिथे जाता येते.

व्वा दिनेशदा. माहिती आणि फोटो दोन्ही मस्त.
माझी या वेळी भारतात गेल्यावर भेट देण्याच्या स्थाळांची यादि वाढ्तेय Happy

दिनेशदा..
एवढे पाणी असून डोंगर मात्र ओकेबोकेच वाटले. त्या डोंगरावर कुठून चढायची वाट असेल असे वाटत नाही. >> वरती सांगली जिल्हा हद्द लागते. चांदोली अभयारण्य आहे. प्रचितगड जवळच आहे.

आजूबाजूला आणखी काहितरी विशेष असणार. >> बरोबर आहे. कसबा संगमेश्वर हे. जोशी कुळाचे कुलदैवत आहे. कर्णेश्वराच्या मागच्या बजुला "श्री लक्श्मी नरसिंह" चे देउळ आहे. लग्ना नंतर येथे अभिषेक केला जातो. एकंदर परिसर खूप छान असा आहे.

सुंदर. मलाही आपण म्हटल्याप्रमाणे तांबडीसुर्लातलं महादेव मंदीर आठवलं पटकन.

दिनेशदा,

संगमेश्वरच्या कसबा गावाजवळ नृसिंह लक्ष्मीच देऊळ आहे, खूपशा कोब्रा लोकांच ते कुलदैवत आहे. मी गेले होते तेव्हा पावसाचे दिवस होते, खूप सुंदर परिसर आहे तो, मुसलमान लोकांनी तिथे पण दंगा केल्याच्या आठवणी आहेत.

दिनेशदा छान माहीती पावसाळ्यानंतर मस्त हिरवागार परिसर पहायला मिळतो !

नृसिह लक्ष्मीचे देवालय नाही दिसले मला, पुढच्या वेळी शोधायलाच हवे. या देवळाचा जीर्णोद्धार पण कुणी जोशी यांनीच केलाय.

जेवढे दिसतेय त्यापेक्षा जास्त बांधकाम असणार पुर्वी, कारण आवारात काही कोरीव दगडांचे अवशेष पण दिसतात.

<< एवढे पाणी असून डोंगर मात्र ओकेबोकेच वाटले >> मार्लेश्वर व नजीकच्या ठीकाणाहून उगम पावलेले झरे,नाले हे कोकणाकडे धांव घेतात व कोकणातल्या काजवी, बांव, शास्त्री इत्यादी नद्यांच्या पाण्याचे ते मुख्य स्त्रोत आहेत. [ मार्लेश्वर नजीकचे असे सात स्त्रोत असून त्याना 'सप्तनद्या' असं कांहीसं नांव असल्याचं कांही स्थानिकानी सांगितल्याचं नक्की आठवतं]. त्यामुळे, सांगलीकडच्या [ मार्लेश्वरच्या वरच्या बाजूच्या ] डोंगरांवर झालेला अन्याय जाणवत असावा !

मस्त Happy

दिनेशदा वा मार्लेश्वरची ट्रीप.....फोटो आणि वर्णन एकदम मस्तच .....मी आई बाबानं बरोबर गेले होते शाळेत असताना तेव्हा सुद्धा पावसाचे दिवस होते, खूप सुंदर परिसर आहे. आजूबाजूच्या गर्द झाडी आणि डोंगरांन मुळे पडत्या पावसात अजूनच मस्त वाटत.
इथेच त्या देवळात साप आहेत ना?

हो साप इथेच असतात, मामा म्हणतो लोक दर्शन घ्यायच्या ऐवजी, मोबाईलच्या फ्लॅश लाईटमधे सापच शोधत बसतात. (गुहेत वीजेचा दिवा नाही.)

Pages