मी आणि कविता

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मायबोलीवर मी यायला कारणीभूत झाला तो विभाग म्हणजे 'गुलमोहर' आणि त्यातही खरं म्हणजे 'कविता'. सहज गुगलवर शोधता शोधता मायबोलीचं कवितांचं पान सापडलं आणि तिथे येता येता मग हळू हळू सर्वत्र संचार सुरु झाला. मायबोलीवर तशा मी बर्‍यावाईट अनेक कविता लिहील्या ('बर्‍या' हे आपलं उगीच...) इथल्या अनेक वाचकांनी त्या सहन केल्या. एकेकाळी मी अगदी रोजचा रतीब घालत होते कविता विभागात (अगदी 'नको' 'नको' म्हणत असणार, बिचारे वाचक..) मधेच कधी तरी ते कवितेचं भूत माझ्या मानगुटीवरुन उतरलं (हुश्श!) अगदी जसं अचानक बसलं तसंच अचानक उतरलं म्हणा ना!

कविता सुचेनाशा झाल्या. सुरुवातीला जरा विचित्र वाटायचं. हात शिवशिवायचा आणि काही उमटायचंच नाही, असं काहीसं. विचार केल्यावर लक्षात आलं की कविता सुचण्याची प्रक्रीया सुरु झाली तेव्हा तेही स्वीकारणं अवघडंच गेलं होतं की. खरं म्हणजे हळूवार असा हा लेखनप्रकार कधी माझ्या आयुष्यात येईल, असं कुणी मला सांगीतलं असतं, तर मी त्या माणसाला नक्की वेड्यात काढलं असतं. कविता म्हणजे असा लेखनप्रकार, ज्याची मनसोक्त टर उडवायची अशीच तर माझी व्याख्या होती, अगदी कॉलेजच्या शेवटच्या वर्षापर्यंत. पुलंच्या भाषेत सांगायचं तर आपलं 'प्राची' ला 'गच्ची' जुळवत मी अनेक नवकवींची टर उडवली. मराठी वाचक काही उदयोन्मुख कवीयत्रींना माझ्यामुळे मुकले. तर असो.

ह्या प्रकाराची खरी किंमत मला कळावी म्हणूनच कदाचित काही काळ हा लेखनप्रकार माझ्याकडे आला असावा. मग आता नाही सुचत तर नाही लिहायची कविता त्यात काय मोठठं ? पुन्हा कधीतरी काहीतरी मनाला अगदी आवेगानं भिडेल आणि कदाचित त्या अनुभवाची, माझ्या लक्षात येण्याआधीच कविता होईल. आता या काळात मी जेव्हा माझ्या कविता वाचते तेव्हा वेगळंच वाटतं. 'काय बकवास लिहीलंय?' इथपासून ते 'हे मीच लिहीलंय का?' (आता हे वाक्य कोणत्या अर्थी घ्यायचं ते मी चाणाक्ष वाचकांवर सोपवते..) इथपर्यंत वेगवेगळ्या प्रतिक्रीया माझ्या मनात उमटतात. अगदी हसूही येतं किंवा इतर अनेक कवींची मी कधीकाळी जशी टर उडवली तशीच टर माझ्याही काही कवितांची उडवावी असं वाटायला लागतं. अर्थात आता या लेखनप्रकाराची खरी ताकद आणि किंमत कळल्यावर असं काही न करणंच योग्य ठरेल. काही कविता ज्या आज पुन्हा वाचतानाही मला आवडतात त्या रंगीबेरंगीत घालायचं काम आजपासून जमेल तेव्हा करुन टाकायचं ठरवलंय.

विषय: 
प्रकार: 

आज्जी तुझ्या कविता वाचुन ठरवु की तुझ्या कविता मस्त की पुलाव.............

मराठी वाचक काही उदयोन्मुख कवीयत्रींना माझ्यामुळे मुकले.

Happy

किती मोठे समाजकार्य तुम्ही केलेले आहे खरंच !

छानच लिहीलय,

साधारण असेच थोड्याफार फरकाने प्रत्येकाचे अनुभव असतील.
मीही साधारण सातवित असताना कविता करू लागलो होतो. पुढे दहावी नंतर हा उद्योग बरीच वर्ष बंद होता पण आवड तर असतेचना त्यामुळे वाचन चालू रहातं. १० वर्षापुर्वी तो परत चालू झाला आणि मधे मधे बंद पडत चालू आहे. गेली ४ वर्ष गुलमोहोर मुळे हे चालू रहाण्यास नक्कीच मदत झाली.
कविता सुचण्याच्या बाबतीतही कधी एकदम बर्‍याच सुचू लागतात तर कधी सुचणं बंदच होतं. अर्थात हे उपलब्ध वेळ, मानसिक ताण, बर्डन्स, जबाबदार्‍या अशा अनेक गोष्टींवर अवलंबून आहे.

तुझ्या जुन्या कविता जरूर पोस्ट कर, आणि आशा आहे की नवीनही लवकरच वाचायला मिळतील.

सुधीर

mi mahila sabalikarana sathi kaam karato.jar kuna kade Mahila sabalikaranavaril kavita astil tr pathvun dya.

bbghadage

प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद..
घाडगे, काही तुम्हाला हव्या तशा कविता लक्षात आल्यास पाठवेन.
~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

मीनु छान लिहिल आहेस...
तुझ्या कविता खरच मस्त असतात ..
मागे तुझ्या blog वर हरवलेपण हि कविता वाचली होती .. खुप खुप खुप आवड्ली होती