जन गण मन चित्रपटाविषयी.

Submitted by अनिताताई on 28 January, 2012 - 23:13

२५ जाने.ला ”जन गण मन” ह्या नव्या मराठी सिनेमाच्या प्रिमियरला जाण्याचा योग आला.आपली मायबोली ”माध्यम प्रायोजक” असल्याने इंद्रधनुष्य,भुंगा,प्रमोदजी,शर्मिला फडके आणि मी असे आम्ही ५ जण मायबोलीचे प्रतिनिधी म्हणून प्रिमियरला उपस्थित राहिलो.एक वेगळ्या विषयावरचा सिनेमा पाहण्याचा योग आला.

नेहमीचे चाकोरीतील विषय,शहरी चकचकाट,मालमसाला,आजकाल चित्रपटात आवश्यक असलेले आयटम सॉंग या सर्व गोष्टींना बाजुला सारून, म्हणजेच प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचणा-या प्रलोभनांच्या वाटेला न जाता,दुर्गम खेडयात राहणा-या लोकांचं होणारं शोषण,रोजच्या आवश्यक गरजा व शिक्षण यांपासून वंचित राहणारी त्यांची मुले यांचं चित्रण या चित्रपटात केलं आहे. अश्या विषयावर चित्रपट निर्मिती करणारे निर्माते, संदीप आणि सचिन कदम हे कौतुकास पात्र आहेत. दिग्दर्शनाचं काम करणारे अमीत अभ्यंकर यांचा हा पहिलाच चित्रपट.

म्हाळुंगे या खेड्यात घडणारी ही कथा असल्यामुळे हिरव्यागार नयनरम्य निसर्गाचा कॅनव्हास या चित्रपटासाठी वापरला आहे. रामचंद्र सोनटक्के या ध्येयवादी शिक्षकाची ही कथा आहे. या टक्के गुरुजींची नेमणूक आडगावातील एक शिक्षकी शाळेत झाली आहे.हे गाव,ही मुले लेव्हलची नाहीत म्हणून[सोनटक्के गुरुजी म्हणजे शिक्षक अधिक नट अशी व्यक्ती!], कुटुंबापासून दूर राहावे लागणे, तिथे असणारा सोयीसुविधांचा अभाव,तळागाळातल्या कसलाही गंध नसलेल्या मुलांना शिकवायला लागणार अशा कारणांमुळे शाळेत पाऊल ठेवल्यापासूनच इथून बदली करून घेण्याचा त्यांचा विचार पक्का झालाय.

स्वातंत्र्यदिन जवळ आलाय, त्यानिमित्ताने झेंडावंदन कार्यक्रम झोकात करायचा, शाळेतल्या मुलांना पांढरेशुभ्र कपडे घालून त्यांच्याकडून परेड करून घायची,” रॅंड्चा वध” या विषयावर नाटक सादर करायचे आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहणा-या शिक्षणाधिकारी गायतोंडे [ उदय सबनिस.] यांच्यावर छाप पाडून तिथून बदली करून घ्यायची हा टक्के गुरुजींचा मनसुबा!

पण या मुलांना शिकवायला लागल्यावर त्यांना कळतं की यांना फक्त त्यांच्या पाड्याचं नाव माहिती आहे! आपले राज्य कोणते?आपला देश कोणता? या गोष्टीचा त्यांना पत्ताच नाहीये!मग इथून या मुलांच्या शिक्षणाची सुरुवात होते.हा भाग हलक्या फुलक्या शैलीत छान रंगवलाय.
घरी या मुलांचे आई बाप सदा सर्वकाळ शिव्या देणारे,दारू पिणारे,मुलांकडून कामाची अपेक्षा करणारे,शाळेत जाऊ नका म्हणणारे,उत्पन्नाचं फारसं साधन नसल्यामुळे लूटमार करणारे. दुर्गम जागी राहणा-या, आदिवासी ,फासे पारधी जमातीच्या मुलांचं जगणं यथार्थपणे चित्रित केलंय. कसं असणार आहे या मुलांचं भवितव्य? ” बळी तो कान पिळी.” असा कायदा इथे चालतो.या लोकांचं शोषण करणारा स्त्री लंपट गावगुंड संदीप मेहता यांनी चांगला उभा केलाय.
हव्या त्या ठिकाणी बदली करून देणारा लाचखाऊ अधिकारी गायतोंडे उदय सबनिस यांनी छान रंगवलाय.

नंदू माधव हे एक कसलेले कलाकार आहेत.त्यांनी टक्के गुरुजींच्या भूमिकेत चांगलाच रंग भरलाय. ”काटु”चं काम करणारा बाल कलाकार चिन्मय संत भूमिकेशी एकरूप झालाय.त्याची बहीण झालेली अस्मिता जोगळेकर हीनं देखील शहरी मुलगी असून पाड्यावरची मुलगी छान रंगवली आहे. मधुरा वेलणकर आणि संतोष जुवेकर यांनी काटु-बबलीच्या आई बापाची कामे छान केली आहेत.विशेषत: मधुराला ही वेगळीच मिळालेली भूमिका तिनं समरसून साकारली आहे.
या चित्रपटाचा विषय चांगला आहे. प्रसंगांच्या मांडणीत थोडा विस्कळीतपणा जाणवतो नाहीतर अजून परिणामकारकता साधता आली असती.
डॉ.सलील कुलकर्णी यांनी कथानकाला साजेसं संगीत दिलंय.चित्रपटाचा शेवट थोडासा अपेक्षित पण हृद्य झालाय.एक चांगला विचार घेउन आलेला सिनेमा पाहिल्याचं समाधान सिनेमा संपल्यावर प्रेक्षकांना लाभतं.
सुखवस्तु,आत्ममग्न,डोळ्यांवर झापडं असलेल्या समाजाचं लक्ष या अस्वस्थ करणा-या सत्याकडे वळवण्याचं काम या चित्रपटानं केलंय म्हणून सर्वांनी हा चित्रपट पाहायलाच हवा!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चंबू,

हा चित्रपट mundu.tv या संकेतस्थळावर तुम्हांला $३ भरून कधीही बघता येईल. इंटरनेट आणि चित्रपटगृहांत एकाच वेळी प्रदर्शित झालेला हा पहिला चित्रपट आहे.

अनिताताई,
थोडक्यात दिलेला रिव्ह्यू आवडला.
सगळेच मायबोलीकर सिनेमा बघतायत, म्हणजे चांगला असावा.
मलाही पाहिलेआ पाहिजे.