मैफलींची भैरवी - पं. भीमसेन जोशी

Submitted by आशयगुणे on 25 January, 2012 - 01:50

माझ्या आयुष्यात ९ डिसेंबर २००७ ह्या दिवसाची नोंद 'अविस्मरणीय' आणि 'अवर्णनीय' अशीच होईल. माझं वय आत्ता फक्त २४ जरी असलं आणि साधारण ७० वर्षापर्यंत जरी आयुष्य जगेन असं म्हटलं तरीही 'त्या' दिवशी आलेला अनुभव परत उघड्या डोळ्याने बघायला मिळेल का, ह्याचे उत्तर मात्र नकारार्थीच वाटते! दिवसच तसा होता तो. त्याच्या आदल्या दिवशी, शनिवारी, काही सेकंदातच मी ठरवून टाकले होते की काहीही झाले तरी चालेल, आपण पुण्याला सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला जायचेच! ६ डिसेंबर, गुरुवारी सुरु झालेल्या ह्या संगीत सोहळ्याची चर्चा सगळीकडे दरवर्षीप्रमाणे सुरु होती. पेपरला बातम्या येत होत्या, इंटरनेटवर प्रतिक्रिया येत होत्या ( आता इतिहासजमा झालेल्या 'ओर्कुट' वर लोक त्यांचे अनुभव सांगत होते.) कुणी पं शिवकुमार शर्मा ह्यांनी वाजवलेल्या 'दुर्गा' रागात रमले होते, तर कुणी अजय चक्रवर्थी ह्यांच्या गाण्याची तारीफ करीत होते. काही लोक जसराजांच्या रंगलेल्या मैफलीचे वर्णन करीत होते आणि त्यातून बाहेर कसे येता येत नाही हे आनंदाने सांगत होते. मी मात्र गेल्या काही वर्षांची शोकांतिका उजळीत होतो. कॉलेज, परीक्षा आणि तत्सम क्षुल्लक कारणांमुळे अनेक संगीत मैफली चुकवलेला मी, त्यावर्षी सवाईला जाऊ शकलो नव्हतो. कारण होते माझे 'ग्रेज्युएशन'चे शेवटले वर्ष. पण एका गोष्टीने माझे लक्ष सवाईकडे वळवून घेतले होते. ती होती एक अफवा!

तसं पाहिलं तर पुणेकरांना बोलण्याची फार हौस! आणि ह्यामुळे, त्या शहरात रोज किती अफवा पसरत असतील ह्याची पुणेकरांनासुद्धा गिनती नसेल! पण ह्या अफवेकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणा ठरला असता. ती अफवा म्हणजे, 'ह्यावर्षी सवाईला पं. भीमसेनजी गातील अशी शक्यता आहे.' आणि ही गोष्ट मला पुण्याहून येणाऱ्या नातेवाईकांमुळे समजली.
भीमसेनजी गाणार! गेल्या काही वर्षांपासून ज्या एका व्यक्तीमुळे आपण 'व्यक्त' होत आलो आहोत ती व्यक्ती गाणार! ज्या एका व्यक्तीमुळे आपण एका उच्चकोटीच्या आनंदला हसून, रडून, नाचून, गाऊन, डोलून आणि स्वतःचे अस्तित्व विसरून दाद देत आलो आहोत ती व्यक्ती गाणार! त्यांच्या गाण्याची केवळ शक्यता वर्तवली गेली होती तरीही माझी ही अवस्था.
आणि ह्या अवस्थेत मी रविवारी सकाळी ४ ला उठलो. न कंटाळता उठायला लावणारी पहाट होती ती! लगेच आवरले, थोडासा नाश्ता केला आणि ५ च्या पुण्याच्या गाडीत बसलो. ' ते खरच गातील का?' - हा विचार सारखा मनात. २००३ नंतर पहिल्यांदा ऐकणार होतो मी त्यांना. १० वी, १२ वी, सी.इ.टी, ह्या परीक्षा, त्या परीक्षा, कॉलेज
वगैरेमुळे त्यांच्या अनेक मैफली चुकल्या होत्या माझ्या. भारतात जेव्हा कुठल्याही मुलाचा/ मुलीचा जन्म होतो तेव्हा परीक्षेचे कवच त्याच्या भोवती त्याच्या नकळत घातले जाते. कला, क्रीडा, नृत्य, शिल्प ह्या शत्रूंपासून त्याचे संरक्षण हे कवच नित्याने करीत असते. ८.१५ च्या सुमारास डेक्कनला उतरलो. आणि तिथून चालत रमण- बाग येथे जाण्यास निघालो. चालता चालता 'इअर-फोन्स' मधून 'राम रंगी रंगले' सुरु होतेच! साधारण ८.४५ ला मी तिकिटाच्या रांगेत उभा होतो आणि सवाईच्या त्या प्रचंड समुदायात शामिल झालो. लोकांचा समुदाय हा वर्षभर फक्त मोर्च्याच्या ठिकाणी किंवा दंगलीच्या वातावरणात आम्हा शहरी लोकांना बघायला मिळतो. पण हा समुदाय एवढ्या शिस्तीत जमलेला बघायचे भाग्य केवळ सवाईलाच! मी गेलो तेव्हा श्रीकांत देशपांडे गात होते. हातोडीने हाणल्या सारखे ते 'तोडी' चे स्वर काही मला ऐकवेना. किराणा घराण्याचे आत्ताचे गायक हे भीमसेन जोशी ह्यांची नक्कल कशी करतात ह्याचाच प्रत्यय येत होता. मी मात्र तेवढ्यात मागे असलेल्या दुकानातल्या वडा आणि कॉफी ह्याचा आस्वाद घेऊ लागलो. मग ह्यांचे गाणे संपेपर्यंत फोटोंचे प्रदर्शन बघ, विकायला ठेवलेली पुस्तकं चाळ अश्या गोष्टी मी केल्या. त्या सुरु असतानाच सतारीचे सूर कानी पडले. विख्यात सतारवादक उस्ताद विलायत खान ह्यांचे पुत्र उस्ताद शुजात खान व्यासपीठावर बसले होते. शुजातला मी पहिल्यांदा त्या दिवशी ऐकले आणि ती मैफल मी अजूनसुद्धा विसरलो नाही. त्याने सतारीला गायला लावीत 'रहिया बिलावल' हा राग वाजवला आणि नंतर पहाडी वाजवून वादनाचा शेवट केला. त्याचे वादन ऐकताना एकाच प्रश्नाने मनात घर केले होते. त्या सतारीच्या तारेला जाणवत तरी असेल की आपल्याला छेडले जात आहे? इतका अलगद हात आहे शुजातचा! त्याची सही घ्यायला 'back stage ' गेलो. सही घेऊन मागे वळतोच इतक्यात निवेदक श्री. आनंद देशमुख ह्यांनी एक सूचना केली. ती सूचना ऐकताना मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मीच काय पण माझ्यासारखे तिथले हजारो लोक टाळ्यांच्या जल्लोषाने त्या सूचनेचे स्वागत करीत होते आणि 'आपण बरोबर ऐकलं ना' ह्या संभ्रमात देखील होते! भीमसेन जोशी ह्यांना गायची परवानगी त्यांच्या डॉक्टरांनी दिली होती. पण फक्त अर्धा तास. तेवढ्यात माझा मित्र कृतार्थ मला भेटला. " च्यायला, हा कुठला डॉक्टर आहे रे. ह्याला पैसे द्यायला मी तयार आहे. अर्ध्या तासाची 'लिमिट' दोन तास करायला लावू त्याला",मी म्हणालो. खळखळून हसून कृतार्थने दाद दिली. तो देखील साहजिकच एकदम खुश होता.
लगेच लोकांचे फोन सुरु झाले. " अरे, ऐक! कुठे असशील, कसा असशील, थेट इकडे ये. अण्णा गाणार आहेत!" मी देखील घरी आईला फोन करून ही बातमी सांगितली. एकाएकी सवाईमध्ये माणसांची गर्दी वाढू लागली. ह्या माणसाने आपल्या सात सुरांमुळे लोकांवर काय जादू केली आहे ह्याचेच दर्शन तेव्हा घडत होते.
जसा वेळ पुढे जाऊ लागला तशी लोकांमध्ये अस्वस्थता वाढू लागली.कधी एकदा अण्णांची गाडी येईल ह्याकडे लोकांचे लक्ष लागले होते. त्यामुळे व्यासपीठावर गात असलेल्या अजय पोहनकरांच्या गाण्याकडे लोकांचे जरा दुर्लक्ष झाले. लोकांना त्या 'पहिल्या षड्जाची' आस अधिक होती. आणि इतक्यात आम्हाला ती गाडी येताना दिसली. टाळ्यांच्या कडकडाटाने लोकांनी त्या गाडीचे स्वागत केले. आणि आम्ही बरेच लोक त्या गाडी भोवती उभे राहिलो. पोहनकरांनी देखील गाणं लवकर संपवलं.
गाडी भोवती गर्दी वाढताच पोलिसांना बोलावले गेले. आम्ही मात्र गाडीची काच खाली कधी केली जाईल ह्याची वाट बघत होतो. तेवढ्यात भीमसेन ह्यांच्यासाठी कपभर कॉफी मागवली गेली. आणि त्या निमित्ताने 'त्यांचे' दर्शन सगळ्यांना झाले. धीर, गंभीर, शांत अश्या नेहमीसारख्या त्यांच्या अवस्थेत ते बसले होते. भोवती असलेल्या गर्दीने त्यांना अजिबात विचलित केले नव्हते आणि त्यांना त्या गर्दीची तक्रार देखील नव्हती. लोकांसाठी गाणारा हा गायक आपल्या चिंतनात मग्न होता! Happy
काही क्षणात त्यांच्यासाठी 'wheel -chair ' आणण्यात आली आणि तेव्हा ह्या महागायकाच्या वयाची साऱ्यांना आठवण झाली. हा माणूस तब्बल ८६ वर्षांचा होता! भीमसेनांना त्या खुर्चीत बसवले गेले आणि ती खुर्ची व्यासपीठावर नेली गेली. हे क्षणच इतके भावूक करणारे होते की काही लोकांना आपले अश्रू आवरले नाही. एका गायकाची तळमळच ती. शेवटच्या क्षणापर्यंत गावं असं वाटणाऱ्या पिढीतले गायक ते!
आणि भीमसेन व्यासपीठावर बसले. काही मिनिटे चाललेल्या टाळ्या थांबल्या आणि मग मात्र एकदम शांतता पसरली. गेल्या अनेक दशकांची आम्हाला सवय! मग त्यांचे वय ८६ असेल तरी काय झालं. ते 'भीमसेन जोशी' आहेत ह्याची साक्ष पटत होती. तबल्याला भारत कामत, हार्मोनियमला सुधीर नायक, तंबोऱ्यावर माधव गुडी, आनंद भाटे आणि श्रीनिवास जोशी. पण मैफल सुरु करायच्याआधी भीमसेन एक वाक्य बोलले ज्यात त्यांचे व्यक्तिमत्व आढळले - " मागच्यावर्षी शब्द दिल्याप्रमाणे थोडी संगीताची सेवा करू इच्छितो.....ते किती जमेल काय...मला आत्ता सांगता येत नाही ...आपण ठरवावं." मला ओरडून सांगावेसे वाटले, " पंडितजी, आम्ही कोण ठरवणार ह्याबद्दल...आपले सूर कानी पडणं हेच आमचं भाग्य आहे....आम्हाला असे लज्जित करू नका!"
आणि होयचं तेच झालं. स्पष्ट, दमदार षड्जाने सुरुवात झाली. थोडी आलापी सुरु झाली आणि सर्वांच्या लक्षात आले. हा राग मुलतानी. आलापित त्यांची साथ अधून मधून श्रीनिवास करीत होता. आणि पंडितजींनी त्यांचा ख्याल सुरु केला - ' गोकुल गांव का छोरा'. तीच बढत, तिची तार षड्जापर्यंत अलगद राग उलगडत जाणारी शैली आणि वयाची ८६ वर्ष पूर्ण केली तरी 'भीमसेन जोशी' आहेत असं सांगणारे ते त्यांचे सूर! त्यांच्या प्रत्येक जागेला आम्ही दाद देत होतो, एकमेकांकडे बघून हसत होतो, माना डोलवत होतो. आणि त्यांचा ताना सुरु झाल्या. प्रत्येक तान रसिकांकडून 'वाह वाह' घेऊन जात होती. लोकांचे डोळे हळू हळू पाणावत होते. इथे कुणीही कुणाला ओळखत नव्हते. पण त्यांच्या सुरांची भाषा सर्वांना 'connect ' करत होती. ह्या ८६ वर्षांच्या 'म्हाताऱ्याने' आम्हाला बांधून ठेवले होते. ' कंगन मुन्दारिया मोरी' ह्या द्रुत तीनतालातील बंदिशीने त्यांनी मुलतानी संपवला तेव्हा मीच काय, माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना आपली आस्व आवरता आली नाही. नंतर सुरु झालं अभंग! 'अवघाची संसार, सुखाचा करीन', ह्या ज्ञानोबांच्या अभंगाने वेगळाच रंग भरला. भीमसेनांच्या मैफलीत अभंग ऐकणे ही एक पर्वणी असतेच पण ह्यावेळेस तो अभंग किती समर्पक होता. ८६ वर्षांच्या त्या आयुष्यात त्यांनी 'आनंदे भरीन तिन्ही लोकी' हे वाक्य आपल्या सुरातून साध्य केलं आहे की! पण हा अभंग ऐकताना एक गोष्ट माझ्या ध्यानी आली. त्यांच्या आत्तापर्यंतच्या अभंगात 'विठ्ठला' ही हाक अगदी जोशपूर्ण असायची. त्यांच्या जुन्या ध्वनिफितीत तसे जाणवेल देखील. तरुणपणी विठ्ठलाला दिलेली हाक ही त्या वयाला अनुसरून वाटते. त्यादिवशी त्यांनी गायलेले 'विठ्ठला...' ह्यात एक वेगळेच समर्पण जाणवले. उरलेल्या शेवटच्या वर्षात कसल्याच अपेक्षा न ठेवता देवाला मारलेली एक करूण हाक! अभंग ऐकताना मात्र आमचा अश्रूंचा बांध फुटला. इतका वेळ पाणावलेले डोळे आता अश्रू ढाळत होते. शेवटची दहा मिनिटे भीमसेनजींनी 'रस के भरे तोरे नैन' ही त्यांची आवडती भैरवी गायली. योगायोग असा की मी त्यांची कॅसेटवर सर्वात पहिली भैरवी ऐकली ती हीच. आज प्रथम प्रत्यक्ष ऐकत होतो. ऐकता ऐकता त्यांच्या व्यक्तिमत्वाला वंदन केलं. हवेत हात जोडले आणि त्यांना नमस्कार केला. आणि माझ्या मनात अनेक विचार सुरु झाले.
एक १५ वर्षांचा मुलगा गाणं शिकायसाठी घराबाहेर पडतो काय, गुरूच्या शोधात ग्वालियर, दिल्ली काय थेट जलंधरला जातो. तिकडे त्याला कळतं की आपला गुरु आपल्याच गावजवळ कुंदगोळ ह्या गावी आहे. मग गाडी मागे फिरते....भीमसेन नावाचा १५ वर्षांचा मुलगा सवाई गंधर्वांचा शिष्य बनतो. पण गुरु त्याच्याकडून अनेकप्रकारचे कष्ट करुन घेतात. त्या मुलाला अंगात ताप असूनसुद्धा मैलभर चालून मोठमोठ्या घागरीतून गुरुसाठी पाणी आणावे लागते आणि मग गुरु गाणं शिकवतात. पण ह्यासार्वातूनच 'भीमसेन जोशी' तयार होतात. कणभर चूक स्वर लागल्यामुळे गुरु अडकित्ता फेकून मारतात आणि तो कपाळावर लागल्याची खूण त्यांच्या डाव्या डोळ्यावर आयुष्यभर राहिली. पण ह्याबद्दल काहीही न बोलता, त्यांची गुरुभक्ती कायम ठेवून त्यांनी 'सवाई गंधर्व' महोत्सव सुरु केला. वर्गात शिक्षकांनी ओरडलं, किंवा मारलं की त्या शिक्षकावर 'खुन्नस' काढणाऱ्या आमच्या पिढीला एवढे उदाहरण पुरेसे आहे! Happy
भीमसेनांचे गाणे संपले तेव्हा मागे साथीला बसलेल्या त्यांच्या शिष्यांच्या देखील आपले अश्रू आवरता आले नाहीत. एवढेच काय, स्वतः भीमसेन देखील आपले अश्रू आवरू शकले नाहीत. काय वाटलं असेल त्यांना त्या क्षणी? आयुष्य सार्थक ही भावना की अजून बरेच गायचे आहे ही? माझ्यामते दुसरीच. कारण ह्या गायकांचे आयुष्य सार्थक कधीही होत नाही. कारण असमाधानी वृत्ती हीच ह्या लोकांचा पाया असते!
सवाईला असलेल्या काही लोकांनी ह्या मैफलीचे ध्वनिमुद्रण केले आणि नंतर ते इंटरनेटवर अपलोड देखील केले. त्यामुळे माझ्या 'कॉम्पुटर'मध्ये ते अगदी सोन्यासारखे जपून ठेवले आहे मी. जेव्हा जेव्हा ते ऐकतो, तेव्हा आपोआप नतमस्तक होतो,डोळ्यात अश्रू येतात आणि असा गायक पुन्हा अनुभवायला मिळेल का हा सदैव प्रश्न पडतो. ह्या मैफलीनंतर भीमसेन कधी गायले नाहीत. त्यांच्या आयुष्यातली ही शेवटची मैफल. मैफलींची भैरवीच म्हणूया आपण. ही भैरवी अनुभवायची नियतीने मला संधी दिली. माझे भाग्य म्हणू की अभाग्य?

- आशय

गुलमोहर: 

उत्तम लिहीले आहे.

आयुष्यात एकदाच सलग दोन तास पंडीतजींना नाशिकमधे ऐकले आहे साधारण २००० वगैरे साल असावे.

त्यावेळचा दरबारी अजून आठवत असतो.

व्वाह....... मस्तं लिहिलयत........
त्या वेळचा प्रसंग तर डोळ्यासमोर दिसत असल्यासारखं वाटलं......

सुरेख! Happy

ही मैफल पहाण्याचं भाग्य मलाही लाभलंय!माझीही स्थिती याहून वेगळी नव्हती.
तिथला क्षणन क्षण तुमच्या लिखाणाने पुन्हा आठवला. खूप धन्यवाद!

राग अहिया बिलावल. (चुकून रहिया झालयं का?)>>>

योग्य नाव अल्हैया बिलावल असे आहे. सकाळचा राग आहे, अतिशय आक्रमक शैलीत गायला जावू शकणारा.

सा ग रे ग प ध ग, रे ग प म ग, म रे सा - चलन असे आहे साधारण, ध ग ही संगत खूप महत्वाची

Happy

<<इथे कुणीही कुणाला ओळखत नव्हते. पण त्यांच्या सुरांची भाषा सर्वांना 'connect ' करत होती. >> वाचतानाहि लेखकासारखी अवस्था झाली होती... खुप खुप छान लेख. Happy

तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रियांसाठी धन्यवाद! मुळात ज्या व्यक्तीबद्दल मी लिहिले आहे तीच इतकी थोर आणि इतक्या मोठ्या उंचीची आहे की माझे जे काय लेखन आहे ते आपोआप थोडे वरच्या उंचीचे होऊन जाते! तुम्हा सर्वांना हे लिहिलेले आवडणे ह्याचे कारण 'भीमसेन जोशी' हेच आहे! Happy

उस्ताद शुजात खान ह्याने वाजवलेला राग नेमका कुठला ह्यावर एक दोन प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यांना मी एवढेच सांगीन की तो राग 'रहिया बिलावल'च होता. हा राग उस्ताद आमीर खान ह्यांनी शुजातला शिकवला असे त्यानी सतारवादन सुरु होयच्या आधी सांगितले होते. त्यामुळे ह्याची आणि 'अल्हैया बिलावल'ची गफलत करू नका Happy

आपल्याला फोटोसहीत आणि भीमसेनांच्या त्यादिवशीच्या 'video ' सहित हा लेख वाचायचा आहे का? तर कृपया ह्या लिंक वर 'click ' करा.
http://relatingtheunrelated.blogspot.com/2012/01/blog-post_25.html
येथे माझे दुसरे लेखसुद्धा आहेत! Happy

छान

फार सुंदर अनुभव. आमची पण अवस्था तुमच्यासारखीच आहे. Happy
आशयगुणे, तुमच लेखन खूप आनंद देणारं असतं. असेच लिहीत रहा.

आशय, अतिशय सुंदर लिहिलंत. नुसतं वाचतानाही डोळे भरून आले. वरच्या लिंकबद्दल अनेक धन्यवाद. आणखी विडियो उपलब्ध आहे का?

धन्यवाद! माझ्याकडे एवढ्याच लिंक्स आहेत. पण सारी मैफल माझ्याकडे ध्वनिमुद्रित आहे. कुणाला हवी असेल तर मला तुमचा id e -mail करा. तुम्हाला आनंदाने देईन.
gune.aashay@gmail.com