संवाद - श्री. नंदू माधव - 'बच्चनच की..!!!'

Submitted by माध्यम_प्रायोजक on 24 January, 2012 - 03:17

नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभ्यासू नट म्हणजे नंदू माधव. ’भूमिका जगणं’ म्हणजे काय, हे त्यांनी साकारलेल्या भूमिका बघून कळतं. ’दुसरा सामना’, ’डॉक्टर, तुम्हीसुद्धा?’ अशी नाटकं असोत, किंवा ’हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ’वळू’, ’बनगरवाडी’, ’शूल’ असे चित्रपट असोत, नंदू माधव यांचा अभिनय कायमच वाखाणला गेला आहे. आपली सामाजिक आस्था सदैव सजग ठेवून आजवर त्यांनी अभिनयक्षेत्रातला प्रवास केला आहे.

येत्या २६ जानेवारीला ’जन गण मन’ हा त्यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट प्रदर्शित होतो आहे. रामचंद्र सोनटक्के नामक एका ध्येयवादी शिक्षकाची भूमिका त्यांनी या चित्रपटात साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या कारकिर्दीविषयी, आणि सामाजिक कार्यासंबंधी जाणून घेण्यासाठी केलेली ही बातचीत...

nandumadhav4.JPG

तुम्ही मूळचे गेवराईचे. बीड जिल्ह्यातल्या या छोट्याशा गावातून मुंबईपर्यंतचा तुमचा प्रवास कसा झाला? अभिनेता व्हायचं, हे तुम्ही कधी ठरवलं?

नाट्यक्षेत्रामध्ये मी काही अपघाताने नाही आलो, तर मी अचानक आलो. कारण नाटक काही मला अपघातानं सापडलेलं नाही. माझ्या घरामध्ये लहानपणापासून सांस्कृतिक वातावरण होतं, आणि नाटक हे या वातावरणाचा एक भाग होतं. घरी नाटकाच्या तालमी होत असत, माझा मोठा भाऊ नाटकं लिहीत असे. त्यानं बक्षिसं मिळवली होती, जिल्हा आणि राज्यपातळीवर त्यांची नोंद झाली होती. वर्षादोनवर्षांतून दोन ते तीन नाटकं माझ्या गावी होत असत. मी त्यांच्या तालमींना असे, बॅकस्टेजला असे, प्रॉम्प्टिंग करायला असे. ही नाटकं मला पूर्ण पाठ असत, पण कधी मला मी नाटकात काम करावं, असं वाटलं नव्हतं. माझ्या डोक्यात सामाजिकता, सामाजिक प्रश्न असंच काही असे. मी ’कोसला’ तेव्हा वाचलं होतं आणि सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारी इतर काही पुस्तकं वाचली होती. या पुस्तकांबद्दलच्या चर्चा ऐकल्या होत्या, आणि त्या चर्चांमध्ये भागही घेतला होता. आहे हे असं का आहे, यात काही बदल घडू शकतो का, आपल्या देशाची, जगाची रचना कशी आहे, असे अनेक प्रश्न तेव्हा डोक्यात तयार होत होते. या अशा वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये, चर्चांमध्ये मला जास्त रस होता. खेळांमध्येही माझा बराच वेळ जाई. वादविवाद स्पर्धांमध्ये मला अनेक बक्षिसं मिळाली होती. त्यामुळे बोलायचं कसं, हे मला ठाऊक होतं. स्टेजची भीती नव्हती. पण घरात नाटक असूनही मी कधी नाटकात काम मात्र केलं नव्हतं, आणि काम करतोस का, असं कोणी मला विचारलंही नव्हतं.

एकदा असं झालं, की एक नाटक बसत होतं, आणि त्यातली एक भूमिका करायला कोणी तयार नव्हतं. ती भूमिका नाच्याची होती. माझे मित्र त्या भूमिकेसाठी प्रत्येकाला विनवत होते. मी म्हटलं, नाटकात नाच्याची, छक्क्याची भूमिका किंवा भिकार्‍याची भूमिका वाईट, असं कुठे असतं? ती भूमिका वठवायची असते, जगायची असते. मग म्हटलं, मीच ती भूमिका करतो. तर अशाप्रकारे माझं पहिलं नाटक घडलं. मग पुढच्या वर्षी मी म्हटलं, की आता मी दाखवतो नाटक कसं असतं ते, कारण मी पहिल्यांदा काम केलं ते नाटक बर्‍यापैकी चौकटीतलं होतं. मग पुढच्या वर्षी मी माझ्या भावानं लिहिलेलं नाटक केलं आणि ते राज्यात पहिलं आलं. इतरही अनेक बक्षिसं मिळाली आणि मग कळलं, की आपल्याला नाटक येतं करता. एकप्रकारचा धीर आला आणि मग नाटकाकडे एका जाणिवेनं बघायला लागलो. नाटकात नुसत्या भूमिका केल्या असं नाही. सफदर हाश्मी, बादल सरकार, हबीब तन्वीर यांच्या नाटकांची मांडणी कशी असते, ते नाटकं कसे करतात यांच्याबद्दल ऐकणं, वाचणं, चर्चा हे सुरु झालं आणि हाच प्रवास मला मुंबईला घेऊन आला.

मुंबईत येण्याआधी तुम्ही वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाला होतात. मराठवाड्यात वकिली करण्यापेक्षा मुंबईला येऊन अभिनयक्षेत्रात धडपड करण्याचा मार्ग तुम्ही निवडलात...

मी बीएससी, एलएलबी आहे, परंतु वकिलीची सनद घेतलेली नाही. मी स्वतःला डबल ग्रॅज्युएट म्हणवून घेऊ शकतो, परंतु अ‍ॅडव्होकेट नाही म्हणता येणार. मुळात सनद मिळाली की नाही हेही मला माहीत नाही, कारण मी परीक्षा दिली आणि मुंबईला पळून गेलो. त्यानंतर निकालसुद्धा बघितला नाही. पास झालो असेन तर कदाचित मी वकील असेनदेखील. मुंबईला आल्यावर मलाही धडपड करावी लागलीच. धडपड हा या क्षेत्राचा अविभाज्य भाग आहे. इथे पाय रोवायचे असतील, तर झगडावं लागेलच, हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे. मुंबईत पाय ठेवताक्षणी मला काम मिळेल, अशा कल्पना तरुणांनी बाळगू नयेत. इथल्या प्रत्येकाचा आर्थिक, सामाजिक स्तर काहीही असो, त्याला या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी झगडावं लागतंच. विनासायास मिळालेलं यश क्षणभंगुर असतं, असं मला वाटतं. त्यात तेवढी प्रगल्भता, परिपक्वता नसते. हा धडपडीचा काळ म्हणजे शिकण्याचा काळ असतो. या काळात तुम्हांला बर्‍याच नव्या गोष्टी बघायला मिळतात, वेगवेगळ्या ठिकाणांना तुम्ही भेटी देता, वेगवेगळी नाटकं बघता, त्यावर इतरांशी चर्चा करता. रात्ररात्र जागून तुम्ही पाहिलेल्या एखाद्या चित्रपट किंवा नाटकाबद्दल भांडता, वाद घालता. ह्या सर्व गोष्टी तुम्हांला प्रगल्भ, परिपक्व बनवतात.

मुंबईच्या नाट्यक्षेत्रातलं वातावरण हे मराठवाड्यापेक्षा जरा भिन्न होतं. बादल सरकार किंवा हबीब तन्वीर यांच्या नाटकांमुळे तुम्ही भारावला होतात. मुंबईतल्या वातावरणात तुम्ही कसे सामावलात?

फार फरक होता, असं म्हणता येणार नाही कारण मुख्य प्रवाहातल्या (व्यावसायिक) नाटकांत तेव्हा बदल होत होता. त्या काळात गाजत असलेली नाटकं म्हणजे 'वस्त्रहरण', 'टूरटूर' इत्यादी. नेहमीच्या साचेबंद नाटकांपेक्षा वेगळी होती ही नाटकं. अशा धाटणीची नाटकं आपल्याला करता येतील, आपल्या वृत्तीला साजेसा हा फॉर्म आहे, आपण ह्या नाटकांना न्याय देऊ शकतो, या नाटकांमध्ये आपण सामावू शकतो, असा विश्वास तेव्हा निर्माण झाला. तसंच, छबिलदासची नाटकंही होती. तशी नाटकं, उदाहरणार्थ, बादल सरकारांची, औरंगाबादमध्ये फारशी होत नसली तरी इतरत्र चालू होती. के. नारायण काळे अशाप्रकारची नाटकं करत होते. दुबेजी, विजया मेहतांचा ग्रूप होता. ही मंडळी सातत्यानं मुंबईत अशी नाटकं करत होती. त्याचे पडसाद त्याकाळी छोट्या छोट्या गावांतल्या नाट्यक्षेत्रांत उमटलेले आढळतील. कणकवलीत असं केंद्र वीसपंचवीस वर्षांपूर्वी तयार झालं होतं. कोल्हापूरला डॉ. शरद भूताडिया होते. सोलापूर हे महत्त्वाचं केंद्र होतं. सातार्‍यात तुषार भद्रे फार छान काम करत होता. औरंगाबादला आमच्या विद्यापीठात नाट्यविभाग असल्यामुळे तिथे वेगवेगळे प्रयोग होत होते, आणि त्यामुळे नाट्यक्षेत्रातल्या वेगवेगळ्या प्रवाहांची माहिती आम्हांला मिळत होती.

’दुसरा सामना’ आणि ’डॉक्टर, तुम्हीसुद्धा?’ या दोन नाटकांसाठी तुम्हांला राज्य शासनाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची पारितोषिकं मिळाली होती. पण त्याआधीच्या नाटकांबद्दल थोडं सांगाल का?

मुंबईला आल्यावर मी छोटीमोठी कामं करत होतो. 'घरघर' हे माझं खर्‍या अर्थाने पहिलं व्यावसायिक नाटक होतं. हर्षराज शिवशरण हा त्याचा लेखक आणि दिग्दर्शक होता. त्यात तुषार दळवी, मी, जयवंत वाडकर, विजय पाटकर असे चौघेजण होतो. एका आंधळ्याच्या घरामध्ये आम्ही शिरतो आणि त्यातून धमाल निर्माण होते. हिंदीतला (नवा) 'गोलमाल' याच कथानकावर बेतलेला आहे. त्यातलं माझं पात्र लोकांना भावलं. नट म्हणून मान्यता मला या नाटकानं मिळवून दिली. त्यानंतर मग 'डॉक्टर, तुम्हीसुद्धा?' आणि 'दुसरा सामना' ही नाटकं आली. माझा पहिला चित्रपट 'बनगरवाडी'. मला त्यासाठी पारितोषिक मिळालं. मग 'कथा दोन गणपतरावांची', 'सरकारनामा', 'शूल', 'वळू', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' इत्यादी चित्रपट आले.

नाटक आणि चित्रपटांतल्या विविध भूमिकांतून तुम्हांला प्रेक्षकांनी पाहिलं आहे. या सार्‍या भूमिकांमध्ये तुम्ही नंदू माधव न वाटता ती व्यक्तिरेखाच वाटता. रंगमंचावर, पडद्यावर तुम्ही त्या व्यक्तिरेखेत एकजीव झालेले असता, ती भूमिका जगता. याबद्दल काही सांगाल का?

भूमिकेचा अभ्यास सर्वांत महत्त्वाचा. त्या-त्या भूमिकेची मानसिकता तुम्हांला समजून घेता यायला हवी. मानसिकता समजून न घेता जर मी संवाद म्हणत असेन, तर ते नंदू माधवचे संवाद होतील. त्या व्यक्तिरेखेच्या तोंडी असलेले ते संवाद नसतील. त्या भूमिकेसंदर्भातले प्रश्न मनात निर्माण व्हायला हवेत, त्यांची उत्तरं मिळाल्यावर त्या भूमिकेची बांधणी करायला हवी. ही जी भूमिका मी साकारणार आहे, त्या भूमिकेतला माणूस असं म्हणतोय, याचं जगणं असं आहे, याचा स्वभाव असा असा आहे, हा अमुक एका गोष्टीला घाबरतो इत्यादी गोष्टी एकदा मनामध्ये पक्क्या झाल्या की मग कोणतंही दृश्य त्या भूमिकेच्या मानसिकतेतून साकारता येतं. नट म्हणून तुम्हांला एकदा त्या भूमिकेची मानसिकता थोडीफार कळली, की तुमचं काम सोपं होतं. मग भूमिका साकारताना तुम्ही नंदू माधव नसता.

कदाचित यामुळेच ’शोभायात्रा’ या नाटकात तुम्ही एका क्षणात बापटांच्या व्यक्तिरेखेतून गांधीजींच्या व्यक्तिरेखेत शिरू शकायचात..

या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक फार मोठे होते. नंदू माधवचं त्यात फार कर्तृत्व नाही. शफाअत खानसारखा लेखक जेव्हा लिहितो, तेव्हा त्याच्या एकेका शब्दामध्ये, एकेका हुंकारामध्ये, एकेका स्वल्पविरामामध्ये बरंच काही सामावलं असतं. एक नट म्हणून ते शोधणं हे माझं काम. हे कुठल्याही भूमिकेला अर्थातच लागू होतं.

nandumadhav1.JPG

’जन गण मन’ हा चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटात रामचंद्र सोनटक्के नामक एका ध्येयवादी शिक्षकाची भूमिका तुम्ही साकारली आहे. हा भोळाभाबडा, आनंद झाला की 'बच्चनच की..!!!' म्हणणारा शिक्षक तुम्ही उत्कृष्ट साकार केला आहे. या भूमिकेची तयारी तुम्ही कशी केली?

समीर जोशीनं मला पटकथा ऐकवली तेव्हा रामचंद्र सोनटक्के हा माणूस नट-कम-शिक्षक अशा पद्धतीचा असावा, असा विचार माझ्या मनात आला. केरळातल्या अशाच एका शिक्षकाबद्दल मागे वाचलं होतं. तो असाच आदिवासी पाड्यांवर, डोंगरांवर मुलांबरोबर जातो, त्यांच्याबरोबर कुंभारकाम करतो, आसपासच्या परिसरात (जंगलात) ज्या गोष्टी आढळतात, त्यांद्वारे तो त्यांना शिकवतो. महाराष्ट्रातही अशी हेरंब कुलकर्णी, हर्षवर्धन सपकाळ किंवा अनिकेत आमटे वगैरे मंडळी आहेत. या सर्वांवरून माझ्या डोक्यात त्या व्यक्तिरेखेची रुपरेषा तयार झाली. पाड्यावरच्या शाळांतल्या शिक्षणाबद्दल थोडीफार माहिती वाचली होती. रामचंद्र सोनटक्के हा खूप उत्साही माणूस आहे, त्याला खूप काही करायचं आहे, जग बदलायचं आहे. पण हे कसं करायचं, आमटेपण, बंगपण अंगात भिनवायचं कसं, हे मात्र त्याला कळलेलं नाही. परंतु, आधी त्याला पाड्यावरच्या मुलांशी जुळवून घ्यायचं आहे. त्या मुलांकडेही बुद्धिमत्ता आहे, पण या शिक्षकाला अजून ते कळलेलं नाही. शहरातली मुलंच हुशार, असा काहीसा त्याचा समज आहे. आता बुद्धिमत्ता ही एकाप्रकारची कधीच नसते. पाडावर राहणार्‍या मुलांची बुद्धिमत्ता आपण जाणून घ्यायला हवी, ते आपलं काम आहे. त्यांना शहरी नियम लावणं, हे चूकच आहे, कारण त्यांची पार्श्वभूमी वेगळी आहे. आजही आदिवासी मुलांमध्ये काम करणारी प्रतिभा शिंदे सतत सांगते आहे, की प्रमाण मराठीतली पुस्तकं या आदिवासी मुलांना चालणार नाहीत. पण कुठे आहेत अजून या मुलांसाठी वेगळी पुस्तकं? त्यांना ’पोळपाट’, ’उखळ’ हे शब्दच माहीत नसतील, तर ते शिकतील कसे? प्रमाण मराठीतली पाठ्यपुस्तकं त्यांच्या फारशी उपयोगाची नसतात, कारण त्यातले बरेच शब्द त्यांना अपरिचित असतात. आपण सरसकट सर्वांना एकाच तागडीत तोलू जातो, आणि तिथेच चुकतो. तर अशा अनेक बाबींचा विचार मी या भूमिकेसंदर्भात केला.

आणि मग त्यामुळे रामचंद्र सोनटक्केचा विचार करत असताना म्हटलं, 'हां, नुसतंच आपण ह्याच्याविषयी वाचून काही उपयोग होणार नाही...' मग काय करायच? मी दिग्दर्शक अमित अभ्यंकरला म्हटलं, ’अरे, मी शूटिंगच्या आधी तीन आठवडे तिथे गावात जाऊन येणार आहे मुलांकडे’. आमचं चित्रीकरण जिथे झालं, आणि ज्या गावातली सगळी मुलं चित्रपटात आहे, ते गाव म्हाळुंगे. या गावात एक शाळा आहे, आणि या शाळेतल्या आदर्श, ध्येयवादी शिक्षकांचं नाव आहे आनंद फल्ले. रामचंद्र सोनटक्के या व्यक्तिरेखेशी खूप साधर्म्य आहे त्यांचं. म्हणजे अगदी तंतोतंत नाही, पण त्यांचं ध्येयवादी असणं, काहीतरी वेगळं घडवण्याची ऊर्मी असणं, या गोष्टी समान आहेत. चित्रपटाचं कथानक अर्थातच यापेक्षा वेगळं आहे. भूमिकेची मानसिकता समजून घ्यायची असेल, तर हा माणूस आपण समजून घेतला पाहिजे, असं माझ्या लक्षात आलं. त्यांचं मुलांशी फार सुरेख ट्युनिंग होतं. ते मला माझ्यात भिनवून घ्यायचं होतं. पण तिथली मुलं मला फटकून होती. माझे कपडे बघून, किंवा एकंदर माझं शहरीपण बघून ती मला बिचकत होती. ती मुलं माझ्याशी बोलेनात, जवळ येईनात. मला कळेना काय करायचं ते. कसं बोलायचं या मुलांशी?

मग मी म्हटलं, "कुणी कुणी काय काय आणलंय रे? खायलाप्यायला काय गोळ्याबिळ्या आनल्यात का?"
"ह्येनी आनल्यात सर, ह्येनी आनल्यात सर.."
"दे की रे मला थोड्या.." असं करून मी त्यांच्याबरोबर बसलो.
फतकल मारली आणि मग मी चित्र काढायला लागलो. तीही मला सामील झाली. ’हे चित्र कसलं, ते चित्र कोणाचं’, असं बोलता बोलता, संध्याकाळी माझ्या अंगाखांद्यावर मुलं बसली होती.

nandumadhav3.JPG

मुलांशी एकदा दोस्ती झाल्यावर त्यांच्यात जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा मी प्रयत्न केला. त्यांना म्हटलं, तुम्ही सगळेजण मिळून आम्हांला एखादं नाटक करून दाखवा. मुलं लगेचच तयार झाली. त्यांना म्हटलं, 'तुमचंच बसवायचं तुम्ही नाटक. काहीही करा', आणि आम्ही गेलो. थोड्या वेळानं परत आलो तोपर्यंत मुलांचं नाटक बसलं होतं.
म्हटलं, 'झालं का नाटक तयार?'
'होऽ!'
'काय नाटक आहे?'
'काय नाई, आम्ही प्राण्यांचं नाटक केलंय.'
जंगल जवळ होतं तिथे. त्यामुळे त्यांना जंगलातल्या गोष्टी माहीत होत्या. या मुलांच्या नाटकात एक हत्ती होता, एक ससा होता, एक वाघ होता. हा वाघ सगळ्यांना त्रास देत असे. मग सगळ्यांनी ठरवलं की, हा वाघ आपल्याला खूप त्रास देतो, तर आपण सगळे मिळून त्याला अद्दल घडवूया. मग सगळे प्राणी कुठंकुठं लपून बसले. वाघ आल्यावर सशानं त्याचा कान पकडला, माकडानं पाय पकडला. हत्तीनं त्याच्या सोंडेनं वाघाची मान पकडली, आणि अशाप्रकारे त्या वाघाला अद्दल घडवली. असं ते मुलांनी बसवलेलं नाटक.

मजा बघा, आपण शहरी मुलांच्या बुद्धिमत्तेबद्दल वगैरे नेहमी बोलतो. पण या मुलांनी किती सुरेख नाटक बसवलं होतं. त्यांच्याच परिसरातली कथा होती ती. शिवाय हुकुमशाही चालणार नाही, ही भावनाही त्यात होती. या मुलांच्या अंगात प्रचंड क्षमता आहे. या क्षमतेकडे आपण सर्वच दुर्लक्ष करतो.

चित्रपटात मला जे दाखवायचं होतं, ते शिक्षकीपण या मुलांनी मला मिळवून दिलं. कसं बोलायचं, कसं वागायचं, हे मला या शिक्षकांनी आणि मुलांनी शिकवलं. माझ्यातली ’नंदू माधव’ची मानसिकता काढून टाकून चित्रपटात अभिप्रेत असलेली मानसिकता मला भिनवता आली. म्हाळुंग्याच्या या मुलांनी ’जन गण मन’मध्ये काम केलं आहे. दोन मुलं वगळता सगळी मुलं या लहानशा गावातली आहेत.

’जन गण मन’ हा चित्रपट तुम्हांला का भावला?

या चित्रपटाचा उद्देश खूप चांगला आहे. आजच्या शिक्षणपद्धतीवर या चित्रपटात भाष्य केलं आहे, आणि हे भाष्य करण्याची पद्धत मला आवडली. पण अतिशय हलक्याफुलक्या शैलीत मांडलेली ही गोष्ट आहे. तुम्हांला हसवताहसवता विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे. तुम्हांला तुमच्या भूतकाळात डोकावायला लावतो हा चित्रपट. अरे, आपणही असा भ्रष्टाचार पूर्वी केला आहे, किंवा आपणही असा वेडेपणा केला आहे, अशा गोष्टी आपल्याला सतत आठवत असतात. असंच काहीसं तुम्हांला हा चित्रपट बघूनही वाटू शकेल. .

अमित अभ्यंकर यांचा दिग्दर्शक म्हणून ’जन गण मन’ हा पहिलाच चित्रपट आहे. त्यांच्याबद्दल काय सांगाल?

अमितनं सर्वांना मोकळीक दिली याचं मला फार कौतुक वाटतं. काम करताना मोकळीक मिळणं मला फार महत्त्वाचं वाटतं. 'आता मी जे सांगितलं तसंच करायचं', असं त्यानं कधी सांगितलं नाही. अगदी लहान मुलांची मतंही तो ऐकायचा.
'सर, सर मला हे असं करायचंय, आणि इकडच्या ऐवजी तिकडून पळायचंय..', एखादा मुलगा म्हणे
'नको पळू बाळ तिकडनं, कारण आपला कॅमेरा तिकडे नाही ना? दिसणार नाही मग ते...'
तर तो म्हणायचा, 'नाई! पण मी याला धरतो, आणि याला खाली आणलं तर मग? मला पळता येईल मग तिकडून..'
'होऽ का?' असं म्हणून तो खरंच तसं करता येईल का, यावर विचार करत असे.
म्हणजे, खूप साधेपणानं तो लहान मुलांचं किंवा माझं बोलणं ऐकत असे, आणि हे फार महत्त्वाचं आहे. अनेकदा पावसामुळं आमचं चित्रीकरण थांबत असे. तरीही त्यानं कधी घाई करून 'चला, चला चला.. काम उरकून टाका!' असं केलं नाही. अगदी शेवटच्या दिवशी एक शॉट उरला होता फक्त. तो काही सेकंदांचा शॉट झाला की पॅकअप होणार होतं. चित्रपटातला काट्या नावाचा जो मुलगा आहे, तो बाण मारतो, असा तो शॉट होता. पण नेमकं तेव्हाच सूर्यप्रकाश कमी झाला. कृत्रिम प्रकाशयोजना करून काम भागवता आलं असतं, पण अख्खं युनिट तिथे रात्री थांबलं, दुसर्‍या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर तेवढा शॉट घेतला, आणि मग पॅकअप झालं.

रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांमध्ये तुम्ही खूप मोठं काम उभं केलं आहे. या दोन्ही माध्यमांपैकी तुमचं आवडतं माध्यम कुठलं?

रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांत काम करायला मला आवडतं. या दोन्ही माध्यमांची आपापली बलस्थानं आहेत. मात्र छोटा पडदा मला तितकासा भावत नाही. हे माध्यम फारसं क्रिएटिव्ह नाही, असं मला वाटतं. मी मुंबईला आलो, ते रचनात्मक काम करायला. माझ्या कामातून जर मला काही मांडता येत नसेल, तर ते काम करण्याची मला गरज वाटत नाही.

चित्रपटमाध्यमाबद्दल बोलायचं झालं तर, आज साकारलेलं दृश्य काही दिवसांनी, महिन्यांनी पुढे साकारायचं असेल तर केवळ वेषभूषा, रंगभूषा, इत्यादींमध्येच सातत्य हवं असतं, असं नाही तर त्यावेळच्या भावना, चेहर्‍यावरचे भाव याही बाबींची काळजी घ्यावी लागते. कधीकधी पहिलं दृश्य चित्रित झालेलं असतं, सातवं दृश्य चित्रित झालेलं असतं, मधली चारपाच दृश्यं झालेली नसतात. त्यामुळे भावनांच्या सातत्याचंही भान बाळगावं लागतं. मात्र एखादं दृश्य चांगलं होण्यासाठी, अपेक्षित परिणाम साधण्यासाठी अनेकवेळा रिटेक करता येऊ शकतात, हे चित्रपटमाध्यमाचं बलस्थान आहे. ’थांब, संवाद म्हणताना माझा उजवा हात अजून थोडा वर जाऊ दे, म्हणजे चांगला परिणाम मिळेल’, असं मी दिग्दर्शकाला सांगू शकतो. नाटकात अर्थातच ही सोय नसते, परंतु नाटकाआधीच्या तालमींना असणारा वेळ आणि त्यामुळे घडून येणारा सशक्त आविष्कार ही नाटकाची जमेची बाजू आहे.

सामाजिक भान असलेला कलावंत, अशी तुमची ओळख आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात मुंबईत ’सांगड कार्यकर्ता संमेलन’ तुम्ही भरवलं होतं. परेश मोकाशी, मिलिंद बोकील, डॉ. हिम्मतराव बावस्कर, उल्का महाजन, पोपटराव पवार, डॉ. अविनाश सावजी, रुबिना पटेल, सुरेश खोपडे, धनाजी गुरव, असीम सरोदे, पुष्पा भावे असे अनेकजण या संमेलनात हजेरी लावून गेले. वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारी ही मंडळी आणि कार्यकर्ते एकत्र आणण्यात तुम्ही यशस्वी झालात. ’सांगड’बद्दल थोडं सांगाल?

sangad.png

’सांगड’ची कल्पना खरं सांगायचं तर माझ्या डोक्यात वीस-पंचवीस वर्षांपूर्वी आली. गेल्या काही वर्षांतच ही सामाजिक जाणीव मला झाली, असं नाही. म्हणजे मी औरंगाबादला असताना ज्यावेळी नाटक या माध्यमाकडे बघत होतो, साहित्याकडे बघत होतो तेव्हाच मला कळलं की नाटक हा स्वतंत्र असा, सामाजिकतेशी संबंध नसलेला असा काही कलाप्रकार नाही. म्हणजे हबीब (तन्वीर) सर लिहीत असतील, बादल सरकार नाटक करत असतील, सफदर हाश्मी असतील, या माणसांनी नाटक लोकांपर्यंत नेऊन पोहोचवलं होतं. औरंगाबादला सामाजिक भान असलेला, सामाजिक चळवळीत कार्यरत असलेला एक ग्रूप होता. यात अविनाश धुळप, दिनकर सुलझपकर, डॉ. सुहास जेवळीकर, राम दुतोंडे अशी वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारी मंडळी होती, आणि ती महिन्याच्या एका शनिवारी एकत्र जमत आणि स्वतःचा हिशेब मांडत असत. या महिन्यात मी नवीन काय केलं, नवीन काय वाचलं, या महिन्यात मी काय कमावलं, किंवा मी किती रिकामा राहिलो, याचा प्रत्येकजण ताळेबंद मांडत असे. तर ही गंमत मला खूप आवडली होती. म्हटलं, अरे हे किती पुष्टी देणारं आहे, एकमेकांच्या विचारांना! एकमेकांना संपन्न करणारं आहे हे. आपलं क्षेत्र सोडून दुसरीकडे काय चाललं आहे, किंवा इजिप्तमध्ये काय घडतं आहे, युरोपातली आर्थिक परिस्थिती कशी आहे, यावर जर अभ्यासू लोक चर्चा करत असतील, तर ते किती चांगलं आहे! तर याच वेळी मला लक्षात आलं की, नाटक आणि सामाजिक प्रश्न हे काही वेगळे नाहीत. आदिवाशांचे प्रश्न, शेतकर्‍यांचे प्रश्न हे मला नाटकापेक्षा फार वेगळे वाटत नाहीत. तिन्हीकडे समस्या आहेत, तिन्हीकडेही नीट लक्ष देण्याची गरज आहे. कला आणि सामाजिकता यांना वेगळं करता येत नाही. ’सांगड’चं बीज हे माझ्या त्या दिवसांत अशाप्रकारे रुजलं.

मग मुंबईला आल्यानंतरही सातत्यानं ते माझ्या डोक्यात होतं. अनेकांशी याबद्दल मी चर्चा करत होतो. सर्वांत आधी मी पुष्पा भाव्यांशी याबद्दल बोललो. त्यांना माझ्या डोक्यात असलेली कल्पना सांगितली. त्यांना ती आवडली. पण त्या म्हणाल्या की, ’तू एकदा याबद्दल काही ज्येष्ठ मंडळींशी बोल’. तोपर्यंत माझा धनाजी गुरव, रुबिना पटेल, किंवा नाटककार शफाअत खान यांच्याशी बोलणं झालं होतं, त्यांच्या संपर्कात होतो मी. माझ्या नेहमीच्या वर्तुळातली ही मंडळी होती. पण अण्णा हजारे, किंवा डॉ. दाभोळकर, बाबा आढाव यांच्याशी माझी ओळख नव्हती. मग पुष्पाताईंनी मला सगळ्यांचे फोन नंबर दिले, आणि माझ्याबद्दल या मंडळींच्या कानावरही घातलं. मग मी डॉ. हिम्मतराव बावस्करांच्या गावी गेलो, त्यांच्याशी चर्चा केली, माझी कल्पना त्यांना ऐकवली, त्यांना ती खूप आवडली. मग तिथनं अण्णा हजार्‍यांच्या गावी गेलो. त्यांचं भ्रष्टाचाराच्या विरोधातलं आंदोलन सुरू व्हायच्या आधीची गोष्ट आहे ही. तर ते म्हणाले की, माझी इतर आंदोलनं सध्या चाललेली आहेत. पण हे कशासाठी, काय, असे सकारात्मक, नकारात्मक प्रश्न सगळ्याच ज्येष्ठांचे होते. पण दाभोळकर मला म्हणाले की, ९६च्या सुमारास त्यांनी असे काही प्रयत्न केले होते. त्यावेळी काही उणिवा असतील किंवा इतर काही कारणांमुळे ते उपक्रम बंद पडले असतील. पण ते तेव्हा बंद पडले म्हणून आता त्यांची गरज नाही, असं आम्ही म्हणणार नाही. जर कुणी काही चांगलं काम करत असेल तर नक्कीच त्याचं स्वागत होईल महाराष्ट्रामध्ये. आणि ती परिस्थिती आपल्याला आता दिसते. अण्णांच्या आंदोलनाला महाराष्ट्रामधल्या अनेक व्यक्तींनी आणि संस्थांनी खूप मोठी मदत केली, त्यात रस दाखवला. यातनं काहीतरी चांगलं घडण्याची शक्यता आहे, असं त्यांना वाटत होतं. तर मी मघाशी म्हणालो तसं परिवर्तन करताना केवळ एका समस्येचं उच्चाटन करुन चालणार नाही, कारण सगळे प्रश्न एकमेकांत गुंतले आहेत. आणि त्यातूनच ’सांगड’ हा उपक्रम उभा राहिला.

परिवर्तन आणि बदल या सहज घडून येणार्‍या प्रक्रिया नाहीत. मी मघाशी म्हटलं तसं बदल हा फक्त एखाद्या समस्येपुरता मर्यादित असून चालणार नाही. बदल सर्वव्यापी हवा. हा सर्वव्यापी बदल होत असताना एकमेकांचे हात एकमेकांच्या हातात हवेत, एकमेकांचे प्रश्न समजून घ्यायला हवे, कारण सगळ्या समस्या या एकमेकींशी संबंधितच असतात. अन्नपुरवठ्याचा प्रश्न, शेतकर्‍यांचे प्रश्न, आदिवाशांचे प्रश्न एकमेकांमध्ये गुंतले आहेत. म्हणून सामाजिक बदलांसाठी झटणार्‍या आंदोलकांनी एका मंचावर येऊन, एका विचारधारेत येऊन विचार करण्याची गरज आहे आणि ती गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या पहिल्या ’सांगड कार्यकर्ता संमेलनात’ काही अंशी पूर्ण झाली, असं म्हणता येईल. मे महिन्यातल्या या मुख्य संमेलनानंतर काही छोटी संमेलनं घ्यायची ठरली. त्याप्रमाणे एक पॉकेट संमेलन जळगावला काही दिवसांपूर्वी झालं. तीन जिल्ह्यांतले कार्यकर्ते तिथे जमले होते आणि त्यांनीही या मांडणीला दुजोरा दिला. त्यांना ही कल्पना खूप आवडली, आणि खूप छान मांडणी झाली त्या सत्रांमध्ये. आता पुढचं संमेलन २४ आणि २५ मार्चला चिपळूणला आहे. त्याच्यानंतर एक वार्षिक संमेलन आणि परत पुढच्या वर्षी पॉकेट संमेलनं. तीन वर्षांचा हा एक कच्चा आराखडा माझ्यासमोर आहे.

’सांगड कार्यकर्ता संमेलनाचं’ स्वरूप नक्की कसं असतं?

हल्ली प्रश्नांचं स्वरूप बदललं आहे. राज्यव्यवस्था बदलली आहे, आव्हानंही निराळी आहेत. काँप्युटर, मोबाइल यांच्यामुळे जग जवळ आलं आहे, असं आपण म्हणतो. देशांच्या भिंतीसुद्धा आता नाहीशा होत आहेत. जर सगळ्याच गोष्टींमध्ये असं साटंलोटं होतं आहे, तर प्रश्नांचा वेगळा विचार करून चालणारच नाही. शिवाय आपल्यासमोर असलेल्या प्रश्नांची व्याप्ती इतकी मोठी आहे, की आपलं परिप्रेक्ष्यसुद्धा आपण बदललं पाहिजे. विचारांची दिशा बरोबर आहे का, हे तपासले पाहिजे. त्यामुळे नवीन कार्यकर्ते जे काही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत, वेगळं काही सांगू पाहत आहेत, ते जुन्या मंडळींनी ऐकलं पाहिजे. नवीन विचार घेत असताना जुन्याचा जो काही मापदंड आहे, किंवा त्या मांडणीला पुष्टी देणारं जे काही आहे, तेही तपासून स्वीकारण्याची गरज आहे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणार्‍या कार्यकर्त्यांच्या नव्याजुन्या विचारांची देवाणघेवाण ’सांगड’मध्ये होते. हे कार्यकर्ते आपापल्या परीने मांडणी करतात्म प्रश्न विचारतात, उणिवा दाखवून देतात. अशी ही रचना आहे.


पहिल्या संमेलनात नेमाडे होते, पुष्पा भावे होत्या..कितीतरी वेगळं काम करणारे असंख्य कार्यकर्ते होते. या सर्वांची एकत्र मोट बांधणं हे कठीण. त्यादृष्टीनं ’सांगड’चा लोगो अतिशय चपखल वाटतो.

हो, ते नाव आणि तो लोगो आमच्या कार्यकर्त्यांना फार भावतात. ही जी दगडांची चळत आम्ही रचली आहे, तिला कुठेही आधार नाही. म्हटलं तर ती कधीही कोसळू शकते, पण म्हटलं तर तुम्ही घट्ट बसू शकता. ’सांगड’ हे नावही मला त्यासाठी महत्त्वाचं वाटतं. विचारांची देवाणघेवाण आणि हातात हात घेऊन पुढे जाणं, हे घडायलाच हवं आहे, आजच्या काळात.

nandumadhav2.jpg

***
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पैली! Happy
नंदू माधव माझे अत्यंत आवडते कलाकार आहेत. त्यांची इतकी सविस्तर आणि विविध मुद्यांना स्पर्श करणारी मुलाखत आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल मनापासून धन्यवाद!! Happy

मुलाखत सुरेख! त्यांनी भूमिकेसाठी घेतलेले परिश्रम आणि 'सांगड'मागील भूमिका वाचता त्यांची 'प्रगल्भ अभिनेता' ही मनातली प्रतिमा अधिक ठळक झाली.

नंदू माधव हे नेहमीच कसदार अभिनयासाठी आवडते. आज या मुलाखतीतून ते किती समाजाभिमुख आहेत ते ही समजले. उत्तम मुलाखत. धन्यवाद माध्यम प्रायोजक.

माझा अतिशय आवडता कलाकार.......... अभिनय सहज भासावा इतका कष्टाने दाखवणारे अभिनेते म्हणजे नंदू माधव...... धन्यवाद............ Happy