टाटा करायला ती खिडकीत येत नाही

Submitted by विजय दिनकर पाटील on 23 January, 2012 - 23:49

अडले कधीच नाही जीवन लयीकरीता
वृत्तात बांधते ती ही मुक्तछंदि कविता

शोधीत राहतो मी दुनियेत काव्य कायम
असुनी तिच्या रुपाने बगलेत काव्य कायम

ब्रम्हांड मानते ती, मी पोरगा नि घरटे
सार्‍या प्रदक्षिणाही त्या भोवतीच करते

करते घराकरीता प्रत्येक मागणी ती
सांगून कैक मुद्दे हमखास टाळतो मी

रागात मस्तकावर आभाळ घेत नाही
टाटा करायला ती खिडकीत येत नाही
--------
'कणखर'

गुलमोहर: 

व्वा विदिपा, सहज आणि थेट पोचेल अशी..
निर्विवाद आवडली... Happy

करते घराकरीता प्रत्येक मागणी ती
सांगून कैक मुद्दे हमखास टाळतो मी
>> फार सुंदर एक्स्प्रेस झाले आहे! मस्त!

"अडले कधीच नाही जीवन लयीकरीता
वृत्तात बांधते ती ही मुक्तछंदि कविता"

"ब्रम्हांड मानते ती, मी पोरगा नि घरटे
सार्‍या प्रदक्षिणाही त्या भोवतीच करते"

छान ....
एका संसारी स्त्रीचं संसारासाठी, घरासाठी निरपेक्ष योगदान
विशेषत: वरील द्वीपदींमधून सहजतेने प्रकट होतंय.

सुंदर कविता... विदीपा... याचे विश्लेशण वाचायला आवडेल... म्हणजे माझ्या सारख्या पामराना समजलेला आणी तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ ... Happy

टाटा सोडले तर बाकी अख्खी कविता आवडली
कदाचित हा तुमचा अनुभव असेल Proud
टाटा व्यतिरिक्त दुसरा एखादा शब्द वापरला असता तर अधीक खुलली असती

टाटा व्यतिरिक्त दुसरा एखादा शब्द वापरला असता तर अधीक खुलली असती >>>>

मराठी भाषेवर आपलं सर्वांचं प्रेम आहे, मायबोलीसारखी मराठी वेब-साइट त्यामुळेच इतकी दणक्यात चालतेय हे वेगळं सांगायची गरज नाही. मराठीत बोलणं आवश्यकच. पण प्रत्येक ठिकाणी मराठीचा अतिरेकी अट्टाहास नसावा. काही संकल्पना दुसर्‍या भाषेतून आल्या, आपण अंगिकारल्या देखील मग त्या शब्दांवर आक्षेप का ? इतका विटाळ का वाटावा ? आपल्या ’योग’ या शब्दासठी ’त्यांनी’ त्यांच्या भाषेतला प्रतिशब्द शोधला का ? Algebra या अरेबिक शब्दासाठी इंग्रजी शब्द वापरला जातो का ?
(मराठीत आपण 'बीजगणित' हा शब्द वापरतो हे ठाऊक आहे मला.)

भाषेवर प्रेम म्हणजे दुसर्‍या भाषांचा अव्हेर, असं समीकरण मांडणं कितपत योग्य आहे ??
’मैल’ (अंतर मोजायचं माप) हा शब्द जो आपण सर्रास वापरतो तो मराठीतला आहे की Mile या शब्दाचा अपभ्रंश आहे ?? ’आलबेल’ काय आहे ? All is well चा अपभ्रंशच ना ?

इतर भाषेतील अनावश्यक शब्दांचा वापर चुकीचाच आहे.
एखाद्याने "मी टेंपलमध्ये जाऊन गॉडची वर्शिप करतो"
असलं मराठी लिहिलं/बोललं तर ते आक्षेपार्हच काय हास्यास्पद आहे.

त्याचप्रमाणे या कवितेत टाटा ऐवजी, "ती अभिवादन करायला खिडकीत येत नाही"
असं लिहिलं तर ’टाटा’ तला आशय येऊ शकत नाही.

लक्ष्मिकांत बेर्डे एका विनोदी सिनेमात म्हणतात त्यानुसार
टाटा ऐवजी किर्लोस्कर म्हणावं का ??

(मुक्तेश्वर हे केवळ तुमच्या एकट्यासाठी नाही. शब्दांचा चुकीचा अट्टाहास धरणार्‍या सर्वांसाठी आहे.
गैरसमज नसावा.)

काका आग्रह बिग्रह नाही हो,
तुम्ही मात्र खुप त्रागा करुन घेतला. केवढ्या पोटतिडकिने लिहीले आहे तुम्ही .
मी फक्त एवढ्यासाठी त्या टाटावर आक्षेप घेतला साधारणतः टाटा लहान मुलांसाठी आपण वापरतो म्हणुन.
बाकी फारमोठा आक्षेप नाहीच आहे.

तुम्ही मात्र खुप त्रागा करुन घेतला. केवढ्या पोटतिडकिने लिहीले आहे तुम्ही . >>>>
मुक्तेश्वर, मी त्रागा करून घेतला नाही अजिबात. माझा स्वभावच नाही तसा.
या निमित्ताने मनातले विचार सांगावेसे वाटले म्हणून लिहिलं इतकंच.

टाटा लहान मुलांसाठी आपण वापरतो म्हणुन.
बाकी फारमोठा आक्षेप नाहीच आहे.
>>>> ध्यानात आलं.

छान आहे, लईत आहे, आशयघन का काय म्हणतात ती सुध्दा आहे.

पण मला राहून राहून अस वाटतय कि याला

बायकोची आरती.......... किंवा

बायको आराधना का म्हणू नये?

(Just jocks of part)

आवडली.

सर्वांचे खूप खूप आभार!!

उकाका - आपले विशेष आभार Happy

अविनाश,

पण मला राहून राहून अस वाटतय कि याला

बायकोची आरती.......... किंवा

बायको आराधना का म्हणू नये?>>>

बिनधास्त म्हणा की राव, बादवे तुम्हाला बायको आहे काय? Lol (म्हणजे अवलोकनातल्या फोटोवरून लग्न झाले नसावे असा अंदाज बांधतो आहे, गंमतीने घ्या, गैरसमज नसावा)

वी दि पा ; साष्टांग दंडवत या कवितेसाठी
एक सुचवू का ?....मी पोरगा नि घरटे --> मी , पोरगा नि घरटे असे स्वल्पवीरामासहित कराल का ?
'टाटा" चा वाद फाल्तू आहे....... लक्ष देऊ नये असा....... उलट त्या शब्दाने कवितेत अख्खि निरागसता ओतलीत तुम्ही........ म्हनूनच प्रतिसादाच्या सुरवातीलाच दंडवत केले आहे .

बगलेत काव्य ही नावीन्यपूर्ण संकल्पना डिओ मॅन्यूफॅक्चरर्सना सांगून प्रजासत्ताक दिनानंतर आलोच या कवितेवर भाष्य करायला

Rofl