द्वैत

Submitted by UlhasBhide on 22 January, 2012 - 02:30

द्वैत

पानांच्या गर्दीतून वाट काढत
दाट सावलीखालच्या मउशार मातीवर उतरून
माझ्या अवतीभोवती विसावलेले उबदार कवडसे,
शेजारीच खळाळणार्‍या निरागस झर्‍यावर
सांडलेला सोनेरी वर्ख,
मधुनच एखाद्या रानफुलाला
‘भोज्जा’ करत बागडणारी गोड फुलपाखरं,
कुठल्याशा पक्ष्याने
प्रियेला घातलेली सु्रेल साद,
टेकड्यांच्या पिलावळीसहित
दूरवर ठाण मांडून बसलेले डोंगर,
मंद झुळुकेला लयीत दाद देणारं
माळावरचं हिरवंगार गवत,
स्वच्छ निळ्या आकाशात रेंगाळाणारा
एखाद-दुसराच चुकार ढग…...
…….. मोहक, सुंदर, विलोभनीय इ. शब्द
फिके पडावेत असं ते दृष्य,
विधात्याने रेखाटलेलं अप्रतीम चित्र.....

मंत्रमुग्ध होता होता वाटलं......
इथेच संपून जावं, माझ्यातलं 'मी'पण,
विलीन होऊन जावं या सगळ्यात,
साधलं जावं अद्वैत……….
पण…..पण, मी ’मी’च राहिलो नाही
तर वाटेल का या सार्‍याचं अप्रूप ?
उपभोगता येईल का हा अमूल्य आनंद ?.....
साखरेला चाखता येते का, स्वत:चीच गोडी !!
सुरेल गळ्याला लाभते का, रसिक कानांची तृप्ती !!!
……………
…… ह्म्म्म्म .....
अद्वैताच्या अंबरातून
द्वैताच्या जमिनीवर अलगद उतरत
एक छानसा आळस देत उठलो तिथून
नि घराच्या वाटेकडे परतताना
चार पावलांनंतर मागे वळून पाहिलं….
...... विधात्याचं ते निसर्गचित्रं
शतपटीने सुंदर भासलं.

.... उल्हास भिडे(२०-१-२०१२)

गुलमोहर: 

उल्हासदा कविता परत परत वाचली. समजली नाही म्हणून नाही हो. पण कुठल्या ओळी जास्त छान वाटल्या तेच ठरवता येईना म्हणून. कवितेशी मी इतकी एकरूप झाले की मी 'मीच' राहिले नाही. पण मी 'मीच' राहिले नाही तर कवितेतला आनंद अनुभवायचा कसा? म्हणून अद्वैताच्या अंबरातून अलगद जमीनीवर आले आणि प्रतिक्रिया देऊन टाकायचे ठरवले. 'अ प्र ती.......म.... कविता.'

Pages