बंद पडलेल्या घड्याळासारखं...

Submitted by आनंदयात्री on 20 January, 2012 - 03:43

असं वाटतं, बंद पडलेल्या घड्याळासारखं आयुष्य कायमचं थांबून जावं!

धावणार्‍या काट्यांसारखे एकमेकांसोबत क्वचित,
पण एकमेकांमागे नेहमीच आपण फिरत असतो...
जरा दम घ्यावा म्हटलं तर तिसरा लाल काटा
जणू क्षणांची जमावबंदी असल्याप्रमाणे पळवत असतो...

सगळे व्याप, ताप, भोग, रोग,
जखमा, औषधं, रंगत, संगत,
याच फिरण्यामध्ये बसवायचं असतं!
आणि वेळ चुकली की दरवेळी न बोलता
घड्याळ पुन्हा वेळेप्रमाणे लावायचं असतं!

कमवलेला पैसा आणि जमवलेली माणसं
मात्र संकटांचे गजर होतानांच नेमके हरवतात - काटे निखळावेत तसे!
काटे जोडणं सोपं असतं, नाती कशी जोडणार पुन्हा?

बिनकाट्यांची चिरंतन घड्याळं आणि बिनधाग्यांची शाश्वत नाती
जर शक्यच नसतील – तर आयुष्य बंद पडलेलंच बरं... कायमचं!

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.com/)

गुलमोहर: 

आनंद, आज फिस्ट आहे का आम्हाला? मला १ तासात अजुन एक जबरी कविता मिळाली वाचायला. जियो ! काय लजवाब लिहिलं आहेस. आजच्या काळातले सगळेच 'तो' आणि 'ती' असे घड्याळाचे काटे बनुन गेले आहेत. फार फार अपिल झाली.
जर शक्यच नसतील – तर आयुष्य बंद पडलेलंच बरं... कायमचं! >>> हे मात्र काहीतरी positive आवडलं असतं. Happy

कमवलेला पैसा आणि जमवलेली माणसं
मात्र संकटांचे गजर होतानांच नेमके हरवतात - काटे निखळावेत तसे!
काटे जोडणं सोपं असतं, नाती कशी जोडणार पुन्हा? >> ह्म्म्म....

विचार करायला लावणारी कविता....
आवडली....... Happy

आयुष्याची फक्त एकच दुखःची बाजू कवितेत मांडलीय.आनंदयात्रीजी आपण जिवाला कंटाळल्यासारखं लिहू नका,पुढच्या कवितेत आम्हाला सकारात्मक आनंदयात्री भेटतिल अशी आशा करतो.पु.ले.शु.

<<बिनकाट्यांची चिरंतन घड्याळं आणि बिनधाग्यांची शाश्वत नाती
जर शक्यच नसतील – तर आयुष्य बंद पडलेलंच बरं... कायमचं!>>
बहुत बहुत खूब...
आपल्या शर्तींवर जगायचं नाहीतर...
आवडली, नचिकेत

कमवलेला पैसा आणि जमवलेली माणसं
मात्र संकटांचे गजर होतानांच नेमके हरवतात >>>>
अगदी नेमकं सांगीतलंस.
कवितेचा शेवट निराशावादी असला तरी
कवितेच्या एकूण पिंडाला ठीक असाच वाटतो.

वाह्ह्, नचिकेत!
मला संपूर्ण कविताच आवडली, शेवटासकट!
घड्याळ्याच्या काट्यावर धावणार्‍या आयुष्यालाच घड्याळाचे रुपक देऊन जे काही मांडलं आहेस ते खासच!
शेवटी निगेटीव्ह शेड म्हणण्यापेक्षा- काय हवंय ते सुस्पष्ट मांडले आहेस त्यासाठी अभिनंदन!

एका लेखकाच्या लिखाणाच्या अनेक शेड्स असू शकतात, त्यातलीच एक समर्थपणे सादर केलीस, हे वै म Happy

दाद आणि उकाका+१

फालकोरजी,
सद्या १० वाजून १० मिनटानी बंद पडलेल्या घड्याळाची चलती आहे,ते हातात बांधल्यावर सर्व सकारात्मकच होते.(अवांतर)
बाकी कविता छान आहे.

"कमवलेला पैसा आणि जमवलेली माणसं
मात्र संकटांचे गजर होतानांच नेमके हरवतात - काटे निखळावेत तसे!
काटे जोडणं सोपं असतं, नाती कशी जोडणार पुन्हा?" एकदम सही.

लहानपणी शाळेत शिकलेली एक कविता आठवली
"असा एक दिवस येतो,सारा मोहरा फिरून जातो
वाटत असते अंधाराची रात्र नाहीच संपायची.
वाटत असते जीवन म्हणजे गणिताचे लांबट पुस्तक, भणभणून जाते मस्तक,जुळत नाही साधे कोष्टक"

तुमचंही असंच काहीसं झालेलं दिसतय. हे एक दिवसासाठी असेल तर ठीक आहे. आणि नक्कीच हे थोड्या वेळासाठी असतं. असावं.
पण कविता एकदम छान आहे. सध्याच्या काळातलं सत्य आहे हे.

जणू क्षणांची जमावबंदी .... सुंदर

घड्याळ पुन्हा वेळेप्रमाणे लावायचं असतं!....हे संदेश म्हणून शेवटी अजून छान वाटले असते... आहे तेही छानच!!!

नमस्ते मित्रहो!
खूप धन्यवाद! Happy
जे सुचलं ते लिहिलं... एवढंच सांगू शकेन.. अजून काय सांगू?

ज्यांना शेवट रुचला/पटला नाही त्यांच्यासाठी -

हरकत नाही दोस्त! चालायचंच ना? एखादा शेवट असाही! बागेश्री म्हणते तसं एकाच लेखकाच्या लिखाणात कधीकधी अनेक छटा असतात, त्यातली ही एक! सुरेखाजींनीही ते 'तुमचंही असंच काहीसं झालेलं दिसतय. हे एक दिवसासाठी असेल तर ठीक आहे. आणि नक्कीच हे थोड्या वेळासाठी असतं. असावं.' थोडं विस्तारून सांगितलंय.. तेच माझंही स्पष्टीकरण आहे. Happy

दाद, तुम्हाला दरवेळी काहीतरी सकारात्मक दिसतंच का हो? Happy