मायबोली शीर्षक गीत - माझा सहभाग (अगो)

Submitted by अगो on 19 January, 2012 - 10:39

मायबोली शीर्षक गीताची निर्मिती होणार आहे असं वाचलं तेव्हाच आपलाही ह्यात सहभाग असावा असं तीव्रतेने वाटलं होतं. ऑक्टोबरच्या सुरुवातीला योगने आम्हां सगळ्या इच्छुक मायबोलीकरांना पहिला रॉ ट्रॅक ऐकण्यासाठी आणि चाल शिकण्यासाठी पाठवला. पहिल्यांदा ऐकतानाच चाल अतिशय आवडली. पाच कडवी असली तरी प्रत्येक कडव्याची चाल वेगळी असल्याने गाण्याचा उठाव शेवटपर्यंत टिकून राहत होता.

मुंबई-पुण्याची लोकं स्टुडियोत जाऊन रेकॉर्डिंग करणार होती. मी युकेत असल्याने ऑडॅसिटीवरुन रेकॉर्ड करुन फाईल्स पाठवायच्या आणि योग त्यातला निवडक भाग फायनल रेकॉर्डिंगसाठी घेणार असं ठरलं होतं. एकदोन स्काईप सेशन्स करुन बसवलेली चाल योगला म्हणून दाखवली. त्याने आवश्यक त्या सुधारणा दाखवून देत आता तू फाईल्स पाठवायला हरकत नाही असा ग्रीन सिग्नल दिला. दरम्यान मुंबईतल्या लोकांचे रेकॉर्डिंग झाले होते. आता आलेल्या नवीन ट्रॅकवर प्रोफेशनल वादकांनी म्युझिक पीसेस वाजवले होते आणि कोरस अ‍ॅड झाला होता ( नंतरची रेकॉर्डिंग्ज झाल्यावर अजून आवाज कोरसमध्ये मिसळले जाणार होतेच. )

तयार कॅरिओकी ट्रॅकची पट्टी उंच पडत असल्याने आत्तापर्यंत कधी ह्या प्रकारे गायलेच नव्हते. आता गायला घेतल्यावर लक्षात आलं की एरवी तुम्ही तुमच्या मर्जीने थांबता, परत गाणं चालू करता. इथे वेगवान प्रवाहात काठावरुन सूर मारुन डायरेक्ट पोहायलाच लागायचं होतं. एखादी हरकत किंचित जास्त झाली तर समोरासमोर तबलावादक ताल अ‍ॅडजस्ट करुन घेतो किंवा आलाप लांबला तर सरळ ते आवर्तन सोडून पुढच्या आवर्तनाला गाणं उचलता येतं असं इथे होणार नाही. योगकडून ह्या बाबतीत खूपच मोलाचं मार्गदर्शन मिळालं.

इथे एक गोष्ट सांगायलाच हवी की फायनल टेकमध्ये बरेच गायक असल्याने प्रत्येकाच्या वाट्याला एक-दोन ओळीच येणार होत्या. पण योगने प्रत्येकाकडून सगळं गाणं अत्यंत संयमाने बसवून घेतलं आणि पूर्ण रेकॉर्डिंग करुन घेतलं. प्रत्येक टेक परतपरत ऐकून त्यात सुधारणा सुचवत राहिला. नवीन टेक पाठवण्यासाठी प्रोत्साहन देत राहिला. त्यात त्याने इतका वेळ खर्ची केलाय की बस्स ! पण त्याने हे केलं म्हणून माझ्यासाठी हे गीत एक सुंदर शिकण्याची प्रक्रिया झाली.

घरात रेकॉर्डिंग करणं हा अजून एक मजेशीर अनुभव होता. आमच्या घराशेजारीच शहराचे मुख्य हॉस्पिटल आहे. रेकॉर्ड करताना पाच-सहा वेळा तरी असं झालं की गाणं मध्यावर आलेलं असताना बाहेर अ‍ॅम्ब्युलन्स ठणाणत जायची की ये रे माझ्या मागल्या :) पण मग रेकॉर्डिंग झालं.

Maayaboli geet recording 1.jpg

इतरांचीही रेकॉर्डींग्ज चालू होती. ट्रॅकवर नवीननवीन आवाज अ‍ॅड होत होते तसा मायबोली गीताचा 'फील' हळूहळू येऊ लागला होता. विशेषत: शेवटच्या कडव्यात सर्वांचेच आवाज अतिशय खुबीने वापरले आहेत ते ऐकताना फार छान वाटतं. टीम स्पिरिट अगदी पुरेपूर जाणवतं.

उल्हासकाकांनी इतकं उत्तम गीत लिहिलं आणि योगने त्याला अनुरूप अशी अतिशय सुरेख चाल लावली म्हणून आम्हाला अशा वेगळ्या प्रकल्पात सहभागी व्हायची संधी मिळाली. ज्यांनी ह्या गाण्याच्या व्हिजुअल्सची जबाबदारी घेतली आहे त्यांचेही मनापासून आभार. मायबोली प्रशासकांनाही अनेकानेक धन्यवाद. 'मायबोली गीताचा' एक भाग असल्याचा मला अभिमान वाटतो :)

मायबोली शीर्षकगीताची झलक पहा:

झलक मधील गाय़कः

१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक

संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई

ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळातच अगो चा आवाज "पॉवरफुल" आहे तेव्हा तीच्याशी चॅट करताना लोकांनी हे लक्षात ठेवावे Happy >>> अर्र, तरी मी चॅट करताना माईक शक्य तितका लांब ठेवते आणि रेकॉर्ड करताना तर ट्रॅकचा फुल व्हॉल्यूम आणि माईकचा कमी तरीही कानठळ्या बसवल्या बहुतेक तुला Lol
गणेशोत्सवातील गाणी पाठवताना पण माझी संयोजकांना कायम तळटीप असायची की बाफवर गाणे टाकताना आवाजाचे सेटिंग कमीतकमी ठेवा Proud

Pages