"सबकुछ मायबोली" - (भुंगा)

Submitted by भुंगा on 19 January, 2012 - 00:24

सर्वप्रथम मायबोलीकराने लिहिलेल्या, मायबोलीकराने संगीतबध्द केलेल्या आणि मायबोलीकरांनी गायलेल्या या "सबकुछ मायबोलीकर" गीतासाठी मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा....!!!

मुळात मायबोली गीत स्पर्धा घेऊन अश्या गीताची निवड झालिये हेच माझ्या गावी नव्हतं.... अचानक एक दिवस त्यासंबंधीचा धागा पाहिला आणि हौसेखातर सहभागी होण्याची ईच्छा व्यक्त केली. मग रितसर देवकाकांशी संपर्क झाला आणि एक ट्यून योगच्या आवाजातली ऐकायला मिळाली. त्यानंतर भिडेकाकांची (म्हणजे आमचे लाडके उकाका उर्फ शकुनी मामा उर्फ शशी कपूर; एकाच माणासात किती ती व्हरायटी :फिदी:) ती कविता शोधून वाचली. मला अजिबातच कल्पना नव्हती की हा उपक्रम कोणत्या लेव्हलवर चाललाय आणि अ‍ॅडमिन आणि इतर याबद्दल कितपत सिरियस आहेत. योग आवाजावरून मला साधारण ४५ पार केलेला कोणीतरी जुना मायबोलीकर असावा असं वाटत होतं...... प्रत्यक्षात व्यक्तिमत्व एकदम उमदं निघालं. :डोमा:
मी भिडेकाकांची कविता घेऊन त्याच्या पहिल्या दोन कडव्यांना चालही लावली वेगळी आणि देवकाकांना ऐकवली फोनवरच..... तेंव्हा देवकाकांनी पण त्यांची चाल ऐकवली. तोपर्यंत काहीच अंदाज नव्हता की हा प्रोजेक्ट किती महत्वाचा आणि महत्वाकांक्षी आहे.

पहिलीवहिली भेट झाली या निमित्ताने ती देवकाकांच्या मालाडच्या घरी. तिथे अनिताताई, रैना, योग, देवकाका सगळे भेटले आणि मग थोडा थोडा अंदाज आला की हे काहीतरी भरीव काम चालू आहे, आणि आपल्याला यात "सिरियसली" सहभागी व्हायचय. :स्मित:

मग दुसरी प्रॅक्टिस झाली पार्ल्याला अनिताताई यांच्या घरी..... मी तर त्यांचा आजन्म "पंखा" आहे.... त्यांचे व्यक्तिमत्वच इतकं उत्साही आहे की अर्धं टेंशन तर तिथल्या तिथे पळून जातं. मुंबईच्या टीममध्ये खरोखर अनिताताई, देवकाका, भिडेकाका तरुणांना लाजवेल अश्या एनर्जीने सहभागी झालेले होते..... रैना, अनिताताई यांचे आवाज ऐकून बहुतेक योग मला घरीच पाठवणार याची खात्री झाली होती. अनिताताईंनी त्या दिवशी त्यांनीच लिहोलेलं आणि संगीत दिलेलं दिवाळीचं गाणं गायलय ते अजूनही कानात आहे साठवलेलं.......!!!

anitatai.jpg

मुंबईकर तसे सुदैवी. आमच्या दोनदा प्रॅक्टिस झाल्या. मी आणि देवकाका तर पुण्यालाही गेलो रेकॉर्डिंगला.
योगचा उत्साह आणि त्याचं डेडिकेशन इतकं जबरदस्त होतं की तो दुबईहून वेळात वेळ काढून इथे येऊन जातो, तर मुंबई पुणे आपण जायला काय हरकत असंच वाटून गेलं.....

यापूर्वीचा माझा अनुभव लाईव्ह ऑर्केस्ट्राचा होता.... पण रेकॉर्डिंगची कधी वेळ आली नव्हती. आयाअयटीच्या एका प्रोजेक्टला व्हॉईसओव्हर केलं होतं.. पण गाणं स्टुडिओमध्ये कधीच योग आला नव्हता.... तो योग आपल्या "योग" मुळे आला.

सांताक्रूझचा स्टुडिओ, पुण्याचा स्टुडिओ खूप जबरदस्त अनुभव होता....... मुळात रेकॉर्डिंग टेक्निक शिकलं तर हे जास्त सोप्पय असं वाटत होतं लाईव्ह पेक्षा..... पण कधी कधी दहा पंधरा रिटेक घेऊनही हवं तसं एक्स्प्रेशन मिळत नव्हतं तेंव्हा लाईव्हमध्ये एक चूक खपून जाते, पण इथे ते शक्य नाही ही गोमही लक्षात आलीच.

milind sing 1.jpg

milind 3.jpg
ओव्हरऑल, हा एकंदर गाण्याचा प्रवास बरंच काही "व्हॅल्यू अ‍ॅडिशन" करणारा होता हे नक्की. मला तर या संपूर्ण प्रोसेसमध्ये गाणं गाण्यापेक्षा संगीतकार म्हणून योग कसा विचार करतो, त्यातल्या टेक्निकॅलिटीज यात जास्त रुची होती.... म्हणून शक्य तितका वेळा त्याच्याबरोबर स्टुडिओत जाण्याचा प्रयत्न केला. बरंच काही नवीन शिकता आलं, अनुभवता आलं...... स्टुडिओमध्ये नदीम, जयदीप या लोकांनीसुध्दा हसतमुखपणे हवी ती माहिती दिली.

वैयक्तिकपातळीवर गमतीची गोष्ट म्हणजे शाळेपासून मी कधीच माझ्या आई-वडिलांना माझ्या कुठल्याही कार्यक्रमाला हजर राहू देत नसे. अगदी शाळेतल्या कार्यक्रमांपासून ते ऑर्केस्ट्रापर्यंत मी कधीच त्यांना माझे कार्यक्रम अटेंड करू दिले नाहीत. त्यांना त्यामुळे मुलाच्या गुणांची ऐकीव माहितीच मिळायची. माझ्या मनाचे खेळ म्हणा हवं तर....... ते असले की आपला परफॉर्मन्स "गंडतो" असं एक मनात नेहमी यायचं... कदाचित मीच दडपण घेत असावा. या गाण्याच्या निमित्ताने माझी आई आणि बायको दोघीही शेवटच्या दिवशी स्टुडिओत आल्या होत्या. आईसमोर जी "मायबोली तान" रेकॉर्ड झाली तीच गाण्यात आहे. खूपच छान वाटतेय हे शेअर करताना तुमच्याशी.

milind grp 1.jpg

अनिताताई, देवकाका, उकाका, रैना, सई, स्मिता, योग, पद्मजा, विवेक असे खूप चांगले लोक या उपक्रमातून प्रत्यक्ष भेटले.

ह्या गाण्याची सगळी मदार मायबोलीकरांनी सांभाळली पण त्याचं सारं श्रेय योगला आहे.....
मुंबई - पुणे करावं तसं हा माणूस दुबई - मुंबई करायचा. पुन्हा पहाटे उतरून थेट संगीत संयोजकाकडे तिथून स्टुडिओ आणि सतत डोक्यात गाणं भिनलेलं...... तरीही अतिशय प्रसन्न, हसतमुख व्यक्तिमत्व.
दर वेळी भेटल्यावर काही तरी नवीन अ‍ॅडिशन्स असायच्या गाण्यात मग ते म्युझिक पीसेस असोत किंवा यॉडलिंग..... शिवाय वेळोवेळी आम्ही केलेल्या काही सुचना त्याने ऐकून घेतल्या. मुळात आमचे मत मांडायला त्याने मुभा दिली हेच विशेष......... पुढच्या अश्या कुठल्याही उपक्रमांना मला योगला असिस्ट करायला नक्की आवडेल. (अर्थात त्याला ते भारी नको पडायला :हाहा: )
खरं तर, फायनल मिक्सिंगला पण मला हजर राहायचं होतं पण शक्य नाही झालं.... मी मिसलं ते. गाणं नक्कीच "कडक वाजणार" यात शंकाच नव्हती.

गाण्याविषयी म्हणाल तर सुरुवातीला साधी वाटलेली चाल जसजसे एक एक कप्पे भरत गेले, ट्रॅक्स अ‍ॅड होत गेले.... योगेशच्या मनातलं गाणं समोर येत गेलं... आणि नकळत ते माझं.. आमचं... आणि आता आपलं गाणं झालं. :स्मित:

सारंश म्हणून लिहायचं तर या अनुभवाने नक्कीच समृध्द केलेय... अनिताताईंनी सुचवल्याप्रमाणे शास्त्रीय संगीत शिकायची ईच्छा आहे येत्या काळात नक्कीच प्रयत्न करेन. त्यांचं मार्गदर्शन आहेच.
वैयक्तिक पातळीवर आणि सांघिक प्रयत्न म्हणून खूप देऊन गेला हा "शीर्षक गीत उपक्रम".

न चुकता आभार मानायलाच हवेत ते भिडेकाकांचे...... काय शब्द लिहिलेत, तोड नाही. संपूर्ण गीतातून मायबोली जिवंत उभी केली आहे. अ‍ॅडमिनचे आभार कारण हौशी नवशिक्या मायबोलीकरांनाच घेऊन हा उपक्रम करायची योजना त्यांनी मनावर घेतली. सरतेशेवटी संपूर्ण झलक पेश करणार्‍या क्रिएटिव्ह टीमचेही आभार, आमच्या प्रयत्नांना त्यांनी यथार्थ नटवलय....... धन्यवाद मनापासून...!!!!

पुढच्या कुठल्याही अश्या उपक्रमांना नेहमीच हजर असणार यात शंका नाही.....

या सुंदर गाण्यात ओपनिंग बॅट्समन म्हणून माझी निवड केल्याबद्दल योग आणि सर्व सहकार्‍यांचे मनःपूर्वक आभार!!!!!!! ही तान कायम माझ्या आणि आपल्या सर्वांच्याच स्मरणात राहील.......

चला आता एखादा "सेंटी डायलॉग" मारायला हरकत नाही मायबोलीकराला..... :डोमा:

"तुम मुझे यूं भुला ना पाओगे...... जब कभी भी सुनोगे गीत मेरे, संग संग तूम भी गुनगुनाओगे..." :फिदी:

हे शब्दशः आज खरं झालय यावर क्षणभर विश्वास ठेवणं कठीणच आहे..... गड्यांनो, पुन्हा एकदा भरभरून धन्यवाद.

"मायबोली..........ssssssss मायबोली.......... ssssssssss" :स्मित:

मायबोली शीर्षकगीताची झलक पहा:

झलक मधील गाय़कः

१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक

संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई

ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.maayboli.com/node/32337

हे जरूर ऐकाच...............

सर्व मायबोलीकर आणि अ‍ॅडमिन यांचे विशेष आभार .... आणि सर्वांचे अभिनंदन...!!!!

मायबोली रॉक्स...!!!!!!

भुंग्या, भुंग्या, भुंगेश............... लै लै म्हणजे लैच भारी गुणगुण आहे की राव तुझी.............
वाटले नव्हते मला.
वा! एकदम "दिलखुश पायानापल ज्युस"
वर म्हटल्याप्रमाणे एकदम तोडलस, मोडलस, इ.
काय आलाप आहे वा!
सुंदर, हार्दिक अभिनंदन.
(वरातीमागुन घोडे, असे म्हणु नकोस, कारण कालच पुर्ण ऐकायला मिळाले, निलुच्या कृपेने)

Pages